फार फार वर्षांपूर्वी एका डोंगरावर एक चेटकीण राहत होती. खरंतर ती काही गोष्टीत असते तशी वाईट्ट चेटकीण नव्हतीच. पण ती नेहमी काही ना काही जादू करत असायची. त्यामुळे तिला सगळेजण चेटकीण म्हणत. तर ही चांगली चेटकीण रोज आपल्या घरामागच्या अंगणात बसून कसले कसले रस काढी. चूर्ण बनवी. त्यावर मंत्र म्हणी. मग आपल्या लांबलांब नाकानं त्यांचा वास घेई. सगळं छान जमून आलं, की आपल्या झाडांना आणि आजूबाजूच्या प्राणीपक्ष्यांना ते खायला घाली. मग हे प्राणी, पक्षी चांगले निरोगी आणि धष्टपुष्ट होत. झाडेसुद्धा छान फुलंफळं देत. कधीकधीतर आजारी प्राणी मुद्दाम दूरवरून तिच्याकडे येत. प्राणी अंगणात आले, की चेटकीण त्यांची तपासणी करे, मग त्यांच्या आजारावर स्वत: बनवलेली औषधं खायला देई. प्राणी बरे झाले की निघून जात. तरी चेटकिणीचे मन शांत नव्हतं. तिला अजून काहीतरी हवं होतं. रोज अंगणात उकिडवी बसून पाठीवरचं कुबड खाजवत ती कसलासा विचार करत राही. कसलेसे मंत्र पुटपुटत राही.
असेच पावसाचे दिवस होते. चेटकीण अंगणात बसून विचार करत होती आणि अचानक तिला एक कल्पना सुचली. दुसर्या दिवशी अगदी पहाटेपहाटे उठली. पटापट कामाला लागली. सगळं आटोपून बरोबर एक लाकडाचं मडकं घेऊन निघाली. बाहेर हलकाहलका पाऊस पडत होता. चेटकीण भराभरा पश्चिमेकडे चालायला लागली. सूर्य उगवायच्या आत तिला पश्चिमेकडे पोहोचायचं होतं. धापा टाकत चेटकीण पोहोचली तेव्हा सूर्य नुकताच उगवायला लागला होता आणि पश्चिमेच्या आकाशावर सुंदर इंद्रधनुष्य उमटलं होतं. पहाटेच्या निळ्याभोर आकाशात ते अगदी खुलून दिसत होतं. चेटकिणीनं इंद्रधनुष्याचे थोडे रंग मागून घेतले आणि आपल्या मडक्यात टाकले. गेली तशीच चेटकीण परत आली. आल्यावर आपल्या पक्ष्यांकडून थोडी मऊमऊ पिसं मागून घेतली आणि तीही त्या मडक्यात टाकली.
"आता काय हवं बरंऽ? हंऽऽ आता छानसा सुगंधच हवा या मिश्रणात", चेटकीण आपल्याशीच बडबडत होती.
"कुठून बरं आणावा हा सुगंध?" पुन्हा तिच्या डोक्यात खळबळ सुरु झाली.
आता चेटकीण पुन्हा मागच्या जंगलात गेली. दहा वेगवेगळ्या झाडांचे रस, दहा वेगवेगळ्या रंगाच्या दगडांचं चूर्ण आणि एका मोठ्या हिरव्याकाळ्या कोळ्यानं नुकतंच विणलेलं मोठ्ठं जाळं या वस्तू गोळा करून आणल्या. त्या पुन्हा एका द्रोणात टाकून त्यांचं एकजीव मिश्रण बनवलं. त्यावर आपले खास मंत्र टाकले. मग ते मिश्रण मिरीच्या एका वेलीच्या मुळाशी घातलं आणि निश्चिंत मनानं झोपी गेली.
सकाळी उठून पाहते तर काय ! तो मिरीचा वेल आकाशापर्यंत गेला होता. चेटकीण सरसर चढून वर जाऊ लागली. खूप खूप चढल्यावर एकदाची स्वर्गात पोहोचली. तिथे खळाळते चांदीसारखे झरे होते, पाचूची झाडं होती, सुंदर फुलं, फळं होती, पक्ष्यांची सुंदर गाणी होती. सगळीकडे सुंदर सोनेरी प्रकाश पसरला होता. इतर कुणी हे सगळं बघून अगदी भान हरपून बघत बसलं असतं. पण चेटकीण थोडीच साधीसुधी होती! तिनं अज्जिबात कुठेच लक्ष दिलं नाही. तरातरा गेली आणि खळाळत्या अत्तराच्या झर्यामधून एक थेंबभर अत्तर तेवढं घेतलं. अत्तर घेताना कुणाची परवानगीसुद्धा घेतली नाही. तिला वाटलं थेंबभर तर घेणार आहे, त्याने काय होतं? गेली तशीच वेलीवरून चेटकीण परत आली.
आता ते थेंबभर अत्तर आधीच्या लाकडाच्या मडक्यात टाकलं. मग सात हात खड्डा करून त्यातलं पाणीही त्या मडक्यात टाकलं. केशरी डोंगरावरची, मागच्या वर्षी आणलेली थोडी माती तिनं जपून ठेवली होती. ती मातीही त्या मडक्यात टाकली. मोरपिसानं ते मिश्रण छान ढवळलं. मग मडक्याचं तोंड झाडाच्या पानांनी घट्ट बांधून टाकलं. आता हे मडकं गोरखचिंचेच्या एका मोठ्या, जुन्या वृक्षाच्या मुळाशी पुरून टाकलं. त्यावर आपले मंत्र पुटपुटून पाणी टाकलं. इतकी सगळी कामं झाल्यावर दमून आपल्या बागेकडे डोळे लावून बसून राहिली. असे आठ दिवस गेले. नवव्या दिवशी चेटकिणीनं ते पुरलेलं मडकं बाहेर काढलं. त्या मडक्यातलं मिश्रण आपल्या बागेतल्या वाफ्यात थोड्याथोड्या अंतरावर टाकलं.
इकडे काय झालं, देवाला कळलं की, चेटकिणीनं अत्तराची चोरी केली. देवाला खूपच वाईट वाटलं. तो चेटकिणीकडे आला आणि म्हणाला, "तू माझ्या राज्यातलं अत्तर चोरलंस ना? मला ते अज्जिबात आवडलं नाहीये. आता तुला त्याची शिक्षा करणार मी. जेव्हाजेव्हा अत्तराचा वास घ्यायला जाशील ना, तेव्हातेव्हा तुझ्या डोळ्यांत पाणी येईल", असं बोलून देव स्वर्गात निघून गेला.
चेटकिणीला फार फार भीती वाटली. तिनं पटकन सगळी खिडक्यादारं बंद करून घेतली आणि आपल्या घरात गुपचूप बसून राहिली. अज्जिबात घराच्या बाहेर जाईना. असे पुन्हा आठ दिवस गेले आणि एकदा अचानक वार्याच्या झुळकीबरोबर एक स्वर्गीय सुगंध घरात शिरला. नवलाईनं चेटकीण बाहेर आली आणि बाहेरचे दृश्य बघून आनंदानं नाचायलाच लागली. तिची सगळी बाग रंगीबेरंगी गुलाबाच्या फुलांनी बहरली होती. अशी सुंदर फुलं ती पहिल्यांदाच पाहत होती. म्हणजे खरंतर तिच्या जादुई मिश्रणातूनच ती तयार झाली होती. अशी अप्रतिम रंगाची, मऊ, नाजूक पाकळ्यांची आणि स्वर्गीय सुवासाची फुलं तयार करायची, हेच तर तिचं स्वप्न होतं !
ती हळूच एका सुंदर फुलापाशी गेली आणि त्याचा वास घेण्यासाठी त्याला हातात पकडलं, तर टचकन एक काटा तिच्या हातात रुतला. विव्हळून तिच्या डोळ्यांत पाणी आले. शेवटी देवबाप्पानं सांगितलेलं खरंच झालं होतं.
- स्वप्नाली मठकर
प्रतिसाद
अतिशय क्यूट गोष्ट ! खूप
अतिशय क्यूट गोष्ट ! खूप आवडली.
कसली गोड आहे गोष्ट!! मस्त.
कसली गोड आहे गोष्ट!! मस्त. :)
मैत्रेयी +१.
मैत्रेयी +१. :)
गुलाबाच्या फुलांचा असा उगम
गुलाबाच्या फुलांचा असा उगम असेल ही कल्पना एकदम भारी आवडली. मस्त. भाषांतरीत गोष्ट ईशानला सांगेन नक्की :)
केवढी गोड गोष्ट? छानच.
केवढी गोड गोष्ट? छानच.
खूपच गोड आहे ही गोष्ट. मस्त!
खूपच गोड आहे ही गोष्ट. मस्त! :)
(No subject)
:)
सुंदर. मुलालाही सांगितली,
सुंदर. मुलालाही सांगितली, आवडली.
अरे वा , कित्ती छान कल्पना
अरे वा , कित्ती छान कल्पना :)
परीकथा... खूप दिवसांनी परीकथा
परीकथा... खूप दिवसांनी परीकथा वाचली.
लहानपणीच्या किशोर-बिशोरच्या दिवाळी अंकात शिरल्यासारखं झालं.
अगदी किशोर कुमार छावा मधली
अगदी किशोर कुमार छावा मधली गोष्ट वाचल्यासारखं वाटलं.
आता हे तर संगेनच मुलाला पण किशोर वगैरे काही मिळला तर शोधेन
गोड आहे गोष्ट एकदम आवडली
गोड आहे गोष्ट एकदम
आवडली
छान गोष्ट!
छान गोष्ट! :-)
छान आहे गोष्ट. अल्पना चित्र
छान आहे गोष्ट. अल्पना चित्र पण सुंदर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद :) मुलांना गोष्टं आवडली हे वाचुन छान वाटले.
खूप दिवसांनी परीकथा वाचली.
खूप दिवसांनी परीकथा वाचली. >>>>> +१०..
सुरेख परीकथा .....
आवडली
आवडली
kasalI goaD
kasalI goaD
कसली गोडुली गोष्ट आहे. मस्त
कसली गोडुली गोष्ट आहे. :) मस्त आवडली एकदम.
लोल. मस्तच.
लोल. मस्तच.
एकदम गोड गोष्ट!!! खूपच आवडली.
एकदम गोड गोष्ट!!! खूपच आवडली.
मस्त मजेशीर गोष्ट आहे! खूप
मस्त मजेशीर गोष्ट आहे! खूप आवडली.
छान आहे गोष्ट.
छान आहे गोष्ट. :)
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट :)
छान ट्विस्ट
:-)
छान ट्विस्ट
कसली गोडुली गोष्ट आहे. मस्त
कसली गोडुली गोष्ट आहे. मस्त आवडली एकदम.
>>+1
चांगली आहे गोष्ट
चांगली आहे गोष्ट
मस्तच आहे. पण चेटकिणीच्या
मस्तच आहे.
पण चेटकिणीच्या राज्यात सुर्य पश्चिमेकडे उगवतो का? :)
मजेशीर गोष्ट. चित्रही सुंदर
मजेशीर गोष्ट. चित्रही सुंदर आहे.
वाह वा सुन्दर परीकथा......
वाह वा सुन्दर परीकथा......