जाण

भकास माळरान आणि मध्येच दिसणारी हिरवळ मागे पडून आता काँक्रिटच्या जंगलात गाडी शिरत होती. ऊर्जामंत्री विश्वासराव पाटील मात्र फायलीतच गुंग होते. आज कसंही करून कॉलेजला मान्यता मिळवूनच मुख्यमंत्र्यांची केबिन सोडायची, हे त्यांनी मनोमन ठरवलं होतं. पण एकदम गाडी थांबली अन् ते भानावर आले.
"काय रे, काय झालं?"
"दादा, जाम आहे वाटते."
"उतरून पाहा जरा... "

ड्रायव्हर रंगराव खाली उतरला. पाहिलं तर एक मोठी रांग लागलेली. गाडी पुढे घ्यावी की नाही, याची चिंता त्याच्या डोळ्यांत उभी राहिली. गाडी विनाकारण थांबवली तर दादा सोलून काढतील याची भीतीही सोबत होतीच. तो एखादा पोलीस दिसतो का, ते बघू लागला. त्याचं नशीब जोरावर होतं. एक हवालदार त्याच्याकडेच येत होता.

"साईडला... साईडला..." हवालदार समोरच्या ट्रकला म्हणत होता.
"नमस्कार साहेब, घ्या." रंगरावानं तंबाखू समोर करत म्हटलं.
"जाम आहे का?" लगेच पुढचा प्रश्न.
हवालदारानं तंबाखू नको म्हणत, नाकाबंदी आहे, असं म्हटलं, तसा रंगराव खूश झाला.

"ऊर्जामंत्री आहेत गाडीत..."
"अरे देवा!" हवालदारही थोडा मनातून चरकलाच. पण लगेच रंगरावासोबत गाडीकडे गेला.
"नमस्कार साहेब!"
"हं, नमस्कार... काय झालं?"
"साहेब नाकाबंदी आहे."
"मग?"
"साहेबांची ऑर्डर आहे, चेकिंगशिवाय कोणतीही गाडी जाऊ द्यायची नाही."
"मग करा की चेकिंग, कोण नाही म्हणतंय. रंग्या गाडी काढ रे..."
"सॉरी साहेब, पण..."
"काय रे xxxxx, आमच्या गाडीची चेकिंग करणार? माजला का रे तू?"
पुढच्या शिव्या हवालदाराच्या परिचयाच्या होत्या. हे असं काही घडेल ते बहुदा त्याला माहिती असावं.

"साहेब, माझं काही नाही हो, पण वरून आदेश आहे."
"कोण आहे तो xxxxxx?"
"आज चेकिंगला धनंजय शेलार साहेब आहेत."
"श..शेलार.... " रंगराव जरा घाबरलाच.
"शिवा, हा शेलार म्हणजे आपली पोरं आत टाकणाराच ना?"
"हो दादा, आणि यानंच आपल्या सगळ्या गाड्यांच्या काळ्या फिल्मपण काढल्या होत्या, आणि रंग्यालापण खूप धुतला होता", शिवानं अजून माहिती पुरवली.
"आज तर याचा..." ऊर्जामंत्र्यांमधला जुना पैलवान जागा झाला.
"जाऊ का दादा?" शिवा एकदम जोशात म्हणाला.
"नाही थांब... हा असा ऐकणार नाही." त्यांनी काही वेळ विचार केला अन् सचिवांना म्हटलं,
"शिंदे, सीएमला फोन लावा."
"पण साहेब..." शिंदे जरा काचकूच करायला लागले.
"लावा की फोन, मी बोलतो... सीएमनंच चढवून ठेवलंय या शेलारला.. आता बघतोच त्याला."

***

"काळेसाहेब, ऊर्जामंत्र्यांना सीएमसाहेबांशी बोलायचंय."
"शिंदे, ते बिझी आहेत आणि डिस्टर्ब करू नका म्हणून सांगितलंय."
"हे अर्जंट..." शिंदे समजावून सांगायला लागले, तोच पाटलांनी फोन ओढूनच घेतला.
"काय काळे, काय चाललंय हे?" ऊर्जामंत्री चिडले.
"काय झालं साहेब?" काळे जरा नरमले.
"तो तुमचा धनंजय शेलार, आमची गाडी चेक करणार.. आमची? सीएमना द्या..."
"साहेब, ते बिझी आहेत..."
"तुम्ही, तुम्ही शेफारून ठेवलंय या पोलिसांना, नाहीतर मंत्र्याची गाडी अडवायची हिंमत कशी होते यांची..."
"साहेबांची ऑर्डर आहे... काय करणार आपण तरी", काळेंनी पाटलांची समजूत काढायचा प्रयत्न केला.
"ते जमणार नाही. तुम्ही फोन द्या सीएमना, नाहीतर मी ...."
"देतो, देतो साहेब, जरा होल्ड करा..." काळे गडबडीत म्हणाले.

***

"सर!" काळेंनी हळूच हाक मारली.
"उं...... काय आहे?" मुख्यमंत्री अगदी गुंग झाले होते. नवीन शिक्षणधोरणाची फाईल अगदी बारकाईनं पाहताना त्यांना कोणाचाही व्यत्यय नको होता. तसं काळेंना सांगितलं होतं, पण ...
"ऊर्जामंत्री..." काळे फोन हातात धरुन म्हणाले.
"पाटील? आता काय आहे?" मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"इन्स्पेक्टर धनंजय शेलार नाकाबंदी चेकपोस्टवर आहेत..." काळेंनी एका वाक्यात प्रॉब्लेम सांगितला.
"हं... द्या..." काहीशा नाराजीनंच मुख्यमंत्र्यांनी फोन घेतला.

"नमस्कार पाटील साहेब, अगदी शंभर वर्षं आयुष्य आहे तुम्हांला", हसतहसत मुख्यमंत्री म्हणाले.
"नमस्कार साहेब, आज एकदम आमची आठवण?" ऊर्जामंत्री जरा चकितच झाले.
"हो, जरा ते शिक्षणसंस्थेच्या फायली बघत होतो, त्यात तुमच्या छत्रपती संस्थेची फाईल आली. मागच्या वर्षी आलो होतो मी तुमच्या शाळेत, ते आठवलं."
"हो साहेब... आवडली होती ना शाळा तुम्हांला?" अनायसे उर्जामंत्र्यांना जो मुद्दा बोलायचा होता, तो स्वतःच मुख्यमंत्र्यांनी काढला होता.
"हे काय विचारणं झालं का? मला तुमचे शाळेतले अभिनव प्रयोग खूप आवडले होते आणि तुमचं भाषणसुद्धा, आणि ती महाराजांची गोष्ट तर अगदी न विसरण्यासारखी होती."
"कोणती हो साहेब?"
"अहो ती नाही का, एकदा महाराजांना गडावर पोहचायला उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले होते. सूर्योदयाशिवाय दरवाजा उघडायचा नाही, हा नियम. मग तो नियम बनवणारा राजाच का असेना, म्हणून पहारेकर्‍यांनी त्यांनाही आत जाऊ दिलं नाही..."
"हो, हो! आठवलं. आमच्या संस्थेच्या नियमांच्या संदर्भात सांगितली होती ती कथा."
"हो ना! त्यात इतिहास तुमचा आवडीचा विषय... सगळे अगदी रंगून गेले होते... "
"मला ना शिवाजी महाराज म्हटलं की असंच होतं, किती बोलू अन् किती नाही..."
"अगदी अगदी.. पाहा, मीसुद्धा बोलतच बसलो. खरं तर महाराजांचा एकजरी गुण आपण आपल्या आयुष्यात बाणवला तरी आयुष्याचं सोनं होईल."
"अगदी मनातलं बोललात साहेब."

पाटलांना एकदम भरून आलं. शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं आदरस्थान! महाराजांवरचं त्यांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान अगदी कोणालाही वेड लावेल असं असायचं. त्यात ते उत्तम वक्ते आणि इतिहास रंगवण्याची हातोटी.

"बरं, तुम्ही कसा काय केला होता फोन, ते विचारायचं विसरलोच", अचानक त्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारलं अन् त्यांना कोणीतरी स्वप्नातून जागं केल्यासारखं वाटलं.
"अं... काही नाही, इथे नाकाबंदी आहे, त्यामुळे कदाचित तीनचार तास उशीर होईल, आपली मिटिंग आहे ना चार वाजता.." त्यांना जसं सुचलं तसं ते बोलून गेले.
"हां, काही हरकत नाही हो. मिटींगला आहेच कोण, आपण दोघंच ना? या तुम्ही, जसं जमेल तसं. मी फार काही बिझी नाही आज."
"चालेल साहेब, जय महाराष्ट्र!"
"जय महाराष्ट्र!"

***

"काळे!"
"हां सर.."
"ती परवा एक नवीन पत्रकार आली होती नं, मुलाखतीसाठी?"
"हो सर, श्वेता देसाई."
"हां, तिला फोन करा, ब्रेकिंग न्यूजसाठी"

***

"नमस्कार! टी टाईममधे आपलं स्वागत. लोकप्रतिनिधी म्हणजे कायदे बनवणारा आणि स्वतःच ते कायदे पायदळी तुडवणारा, अशी काहीशी आपली समजूत व्हावी, अशा अनेक घटना रोजच पहायला आणि वाचायला मिळतात. पण कायदा, नियम हे सर्वांसाठीच असतात, हे केवळ सांगणाराच नव्हे तर ते नियम पाळणारा लोकप्रतिनिधी अपवादच. असाच एक अपवाद म्हणजे आपले ऊर्जामंत्री विश्वासराव पाटील....."

तिकडे टिव्हीवर विश्वासराव पाटील, इन्स्पेक्टर धनंजय शेलारचे कौतुक करत होते... पुन्हा एकदा त्यांनी शिवाजी महाराजांची कथा सांगितली आणि म्हणाले, " महाराजांचा एक जरी गुण आपण आपल्या आयुष्यात बाणवला, तरी आयुष्याचं सोनं होईल..."

"सर, आजच्या चहाला एक वेगळीच चव आहे, नाही?" टिव्हीकडे बघत काळे म्हणाले.

"ही तर महाराजांची कृपा!" मुख्यमंत्री हसतहसत म्हणाले.

- विजय देशमुख

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

मस्तं.
आवडली गोष्टं.

मस्तच!!!!

व्वा! हजरजबाबी मुख्यमंत्री. कथा आवडली.

आवडली.

आवडली. छोटीशीच पण मस्त कथा :)

छोटी पण छान आहे. :)

आवडली गोष्ट. एकदम perfect.

मस्त मस्त... आवडली.

कथा एकदम छोटी आहे पण आवडली.

छोटी आणि छान गोष्ट

मस्त गोष्ट! एकदम जमून गेलीय!

छान गोष्ट आहे!
प्रत्यक्षात कधी येणार पण?

कथा आवडली.

हे, हे, मस्त ! फक्कड जमलीय :)

मस्त.

मस्तच जमलीये. त्या बोधकथांसारखी.. पण आजच्या आपल्या काळातली.

कथा एकदम आवडली !!

लिहित रहा विजय

कथा आवडली, छोटी पण मस्त आहे. :) कथा न राहता वास्तवात अशा घटना घडायला हव्यात.

मस्त कथा :)

कथा आवडली.

कथा आवडली. :)
कथा न राहता वास्तवात अशा घटना घडायला हव्यात. >> ++

Mast katha.

वा, सुंदर कथा...

....... प्रत्यक्षातही असेच घडू लागले तर ..!!!!

छान

असा सुदिन लवकर उजाडो. कथा छानच.

मस्तच :-) आवडलीच.

बोधकथा आवडली. :)

छान कथा. आवडली.

:-)

मस्तच.