भारतीय सैनिकांच्या कारगिल येथील शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता 'छोडो मत उनको!' असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! पण कित्येकांना या तेजाच्या स्फुल्लिंगांचा विसर पडला आहे आणि त्याच जोडीला आजच्या तरुण रक्ताला योग्य दिशा नाही, आदर्श नाहीत म्हणून ओरड होताना ऐकू येत आहे. आजच्या तरुणाईपुढे कारगिलच्या शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना सर्वसामान्य माणसामध्ये व सैनिकांमध्ये एक सुंदर भावबंध निर्माण करण्याच्या कामी वाहून घेतलेल्या श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई 'लक्ष्य फाऊंडेशन'द्वारा सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची त्या समाजाला जाणीव तर करून देत आहेतच, शिवाय आपल्या मायेचा हात या लढवय्या सैनिकांच्या पाठीवर ठेवून त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण करत आहेत. मूळच्या मुंबईच्या, परंतु आता पुण्यात स्थायिक झालेल्या एका सर्वसामान्य, चाकरमानी गृहिणीच्या या ध्यासपंथी कार्याबद्दल अधिक जाणून घेताना मायबोलीच्या वाचकांसाठी अनुराधाताईंबरोबर केलेला हा खास दिवाळी संवाद!
लक्ष्य फाऊंडेशनची व तुमच्या भारतीय सैनिकांसंबंधी कार्याची सुरुवात कशी झाली?
लक्ष्य फाऊंडेशनची स्थापना २००९मध्ये झाली. परंतु त्याअगोदर २००४ साली मी, माझे यजमान गुरुनाथ, माझा मित्र विक्रम आणि त्याची बायको अपर्णा असे चौघेजण लडाखच्या सहलीला गेलो होतो. तिथे गेल्यावर लडाख, द्रास, कारगिलचा परिसर हिंडत असताना आम्हांला अनेक जवानांच्या तुकड्या वाटेत भेटत होत्या. ८० अंशांची चढाई असलेले १८ हजार फूट उंचीचे बर्फाच्छादित डोंगर, खडतर तापमान, अंगावर वीसवीस किलोची शस्त्रास्त्रे, अवघड वाट, निबिड अंधार, शत्रूकडून सातत्यानं होणारा बाँबवर्षाव सहन करत जिवाची बाजी लावून आणि निधड्या छातीनं आपल्या मातृभूमीचे रक्षण करणार्या, वीरगती प्राप्त करणार्या कारगिल योद्ध्यांच्या अतुलनीय शौर्याची जाणीव आम्हांला तो प्रांत न्याहाळताना होत होती.
कारगिल ते द्रास मार्गावरून जात असताना वाटेवरच्या सैन्याच्या एका पाटीनं आमचं लक्ष वेधून घेतलं.
'I only regret that I have but one life to lay down for the country’
- मला दु:ख आहे की माझ्याकडे या देशावर ओवाळून टाकायला एकच आयुष्य आहे
ते वाक्य आमच्या मनाला खूप लागलं. मी माझ्या यजमानांना ती पाटी दाखवून मराठीतून त्यांच्याशी बोलत होते. ते ऐकून तिथून जवळच उभ्या असलेल्या एका मराठी लष्करी अधिकार्यांनी, सुभेदार मेजर कदमांनी आम्हांला रोखलं आणि म्हणाले, ''आज सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच मराठी ऐकतोय.'' त्यांनी आम्हांला आग्रहानं त्यांच्या राहुटीत नेऊन चहा पाजला. त्यांच्या वाक्यानं पुन्हा एकदा मनात विचारांचं काहूर माजलं. महिनोन्महिने आपल्या मातृभाषेचा एक शब्दही न ऐकता त्या दुर्गम भागात, खडतर वातावरणात हे जवान आपल्या देशाप्रती आपलं कर्तव्य निभावत कशाप्रकारे जगत असतील या विचारांनी मन अस्वस्थ झालं.
द्रासच्या सरकारी अतिथिगृहाच्या खानसाम्याशी १९९९ सालच्या कारगिल युद्धाबद्दल बोलत असताना त्याचे, "आपको पता नहीं क्या, यहाँ तो हजारो लाशे गिरी थी'' हे उद्गार मन भेदून गेले. माझ्या मनात विचार आला, १९९९ साली जेव्हा हे जवान 'विजय किंवा वीरगती'ची आरोळी देत शत्रुपक्षावर त्वेषानं तुटून पडत होते, शर्थीची लढाई झुंजारपणे लढताना वीरगती प्राप्त करत होते, तेव्हा मी काय करत होते? तर मी माझं शहरी, सुरक्षित, चौकटीबद्ध असे सर्वसामान्य आयुष्य जगत होते. माझा संसार, नोकरी, घर यांपलीकडे फारसा विचार नव्हता तेव्हा माझ्या डोक्यात. वर्तमानपत्रांमधल्या कारगिल युद्धाच्या बातम्या, त्यांचे मथळे वाचले की तेव्हापुरतं माझं मन अस्वस्थ व्हायचं. पण त्याखेरीज माझं आयुष्य सुरळीतपणे चालू होतं. त्या भागात हिंडताना जबरी प्राणहानी सोसून भारतीय सैन्यानं परत मिळवलेल्या टायगर हिल व तोलोलिंगच्या शौर्यगाथा आपल्यापर्यंत नीट पोहोचल्याच नाहीत की काय, असं मला प्रकर्षाने वाटू लागलं. टायगर हिलचा तो मृत्यूच्या जबड्याचा थरार तिथला टापू पाहिल्याशिवाय ध्यानात येऊच शकत नाही. द्रासच्या विजयस्तंभावरची वीरगती प्राप्त केलेल्या जवानांची नावं वाचताना त्यांची वयं पाहिली - बावीस, तेवीस आणि चोवीस वर्षांची मुलं होती ही! मन गलबलून गेलं अगदी! त्या वयात असलेल्या आमच्या शहरी मुलांना या जवानांबद्दल काहीच माहिती नाही. या वयातल्या आमच्या मुलांवर आम्ही कोणतीच जबाबदारी सोपवत नाही. उलट त्यांना 'पायी नको चालूस, गाडी घेऊन जा,' म्हणत गाडीच्या चाव्या हातात देतो, मोबाईल घेऊन देतो. त्यांना या वयात सारं आयतं मिळत असतं आणि मग आम्ही 'या वयातल्या मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव नाही' असं म्हणतो. त्याच मुलांच्या वयात हे वीरयोद्धे सार्या देशाची जबाबदारी घेऊन, देदीप्यमान देशप्रेमाच्या, कर्तव्याच्या भावनेतून 'मी माझ्या देशाची सेवा करणार' म्हणून तिथे लढत होते. हे योद्धे वीरजवान भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेले होते. वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे, भाषांचे...पण इथे त्यांची एकच ओळख होती. आणि ती होती एक 'भारतीय' म्हणून. आपण शहरी लोक स्वतःला 'भारतीय' म्हणवतो - पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत आपल्या प्राणांची आहुती देणार्या या वीरयोद्ध्यांबद्दल आपल्याला व आपल्या तरुण पिढीला काहीच माहिती नाही, हे शल्य मला बोचू लागलं. त्या आवेगात आम्ही कारगिलच्या विजयस्तंभापाशी 'दरवर्षी आपल्या बांधवांना घेऊन इथे येऊ,' अशी शपथ घेतली. ही आमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात होती.
दरवर्षी या सीमाप्रांतात जाऊन तेथील आपल्या लष्करी बांधवांना भेट द्यायची, सोबत आपल्यासारखे सर्वसामान्य आयुष्य जगणार्या इतर बांधवांना घेऊन जायचं, आपल्या सैनिकांना कोणत्या अवघड परिस्थितीत - कशा तर्हेच्या कठीण हवामानात - किती काळ राहावं लागतं याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव द्यायचा, सैनिकांना थोडासा दिलासा द्यायचा, त्यांचा हुरूप वाढवायचा, घरी केलेले फराळाचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे, 'आम्ही मनानं तुमच्याबरोबर आहोत आणि आम्हांला तुमचा प्रचंड अभिमान आहे,' ही खात्री त्यांना द्यायची, त्यांच्याबरोबर रक्षाबंधन किंवा कारगिल-दिवस साजरा करायचा असे उपक्रम आमच्या मनात होते. त्याचबरोबर आजच्या मुलांना आपण इतिहासाचं भान द्यायला हवं, वर्तमानाचं धोरण द्यायला हवं आणि भविष्याची स्वप्नं द्यायला हवीत हेही जाणवत होतं. हे कसं साध्य करायचं? यावर उपाय शोधताना आणि सैनिकांसंबंधीच्या उपक्रमांना एक सुनियोजित स्वरूप देण्याच्या हेतूनं 'लक्ष्य फाऊंडेशन'ची स्थापना झाली. समाजावर, तरुणाईवर फक्त टीका करत बसण्यापेक्षा जर त्यांच्यासाठी काही सकारात्मक करता आलं, त्यांच्या पुढे या वीरजवानांचे आदर्श ठेवता आले, त्यांच्या मनात आपल्या देशाविषयी आणि आपल्या देशाचे रक्षण करणार्या शूर सैनिकांविषयी प्रेमाची व आदराची, सन्मानाची भावना निर्माण करता आली तर त्यातून नक्कीच एक चांगला, सशक्त समाज घडायला मदत होईल, याचा मला विश्वास वाटत होता. आणि संस्था म्हटली की समाजातील इतरही अनेक व्यक्ती सोबत जोडल्या जातात, त्या कार्याला एक भरीवपणा येतो, एक चौकट मिळते. 'लक्ष्य फाऊंडेशन'च्या माध्यमातून अशी मोलाची माणसे आम्हांला मिळत गेली आणि त्या प्रत्येकाच्या योगदानातून आज आमचे जे काही काम आहे ते पुढे चालले आहे.
तुम्ही आयोजित करता त्या सहलींना तुम्ही 'मिशन' म्हणता... मिशन लडाख. असे म्हणण्याचे विशेष कारण? इतर पर्यटन-सहलींपेक्षा काय वेगळं असतं या सहलीत?
मला इतर सहलींबद्दल फारसं काही माहीत नाही. पण आम्ही नेतो त्या सहली मौजमजेच्या सहली नसतात. निघायच्या अगोदरच सर्वांना कल्पना दिलेली असते की, या सहलीत आपले लक्ष हे सीमावर्ती भागातला निसर्ग, प्रदेश, हवामान, तेथील लष्करी छावण्यांमधून वर्षाचे तीनशेपासष्ठ दिवस अहोरात्र सज्ज असणारे आपले सैनिक जवान, युद्धभूमी व वीरस्मारकांना भेटी यांवर केंद्रित असणार आहे. हा प्रवास सोपा अजिबात नाही. जिथे जिथे आपल्याला लष्करानं कार्यक्रमाची, भेटीची किंवा संवादाची वेळ दिली आहे तिथे ती वेळ पाळावीच लागेल. मग तुम्ही कितीही थकलेले असा. इथे इतर गप्पा मारत बसू नका. शेअर मार्केट, राजकारण, वाढते बाजारभाव किंवा नाटक-सिनेमांच्या गप्पा न करता येथील जवानांचे आयुष्य, त्यांचा पराक्रम जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आम्ही दरवर्षी कारगिल दिनाच्या जवळपास असा ४०-४५ लोकांचा गट या सहलीत घेऊन जातो. आतापर्यंत सलग दहा - अकरा वर्षं साधारण ४५० लोकांना अशा सहलींना घेऊन जाण्याचं भाग्य आम्हांला लाभलं आहे. आजवर कारगिल भागाला मी चौदा वेळा भेट दिली आहे.
सीमा-प्रांतात जाऊन तुम्ही आपल्या भारतीय सैनिकांशी कशा प्रकारे संवाद साधता? त्यांच्यासाठी काही कार्यक्रम करता का?
छे छे! तिथे जाऊन आम्ही वेगळे असे काहीही कार्यक्रम सादर करण्याच्या फंदात पडत नाही. एकतर आमचे अनुभवविश्व फार मर्यादित आहे हो! आणि तिथल्या जवानांशी गप्पा मारण्यात, त्यांचे अनुभव ऐकण्यात, त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडण्यात आम्हांला जो आनंद मिळतो तो तिथे आपले काहीतरी कार्यक्रम सादर करण्यातून कसा मिळणार? आम्ही त्यांना त्यांची ख्यालीखुशाली विचारतो, त्यांना हुरूप देतो. रक्षाबंधनाला त्यांना राख्या बांधतो. आपल्यासारख्या नागरिकांनी जवानांना उद्देशून लिहिलेली जिव्हाळ्याची पत्रं त्यांच्यासाठी घेऊन जातो. खूप अप्रूप असतं त्यांना या पत्रांचं! जेव्हा अनेक महिने तुम्ही सीमेवर आपल्या कर्तव्यापोटी आपल्या देशबांधवांपासून, घरच्यांपासून दूर राहता तेव्हा असं प्रत्येक पत्र त्यांच्यात हजारो हत्तींचं बळ निर्माण करतं. आम्ही त्यांना खास घरी बनवलेले फराळाचे पदार्थ खाऊ घालतो, त्यांची आईच्या - बहिणीच्या प्रेमानं, आस्थेनं विचारपूस करतो. त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवतो. आज 'आपल्या देशबांधवांना आपली कदर आहे' ही भावना जशी त्यांच्यासाठी महत्त्वाची असते तशीच 'या निर्भय, झुंजार सैनिक बांधवांच्या जिवावर आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत आणि आपण निर्धोक जीवन जगत आहोत' ही आमच्या मनांत उमटणारी भावना आम्हांलाही हे कार्य पुढे नेण्याचे बळ देते.
तुमच्या ह्या सहलीच्या उपक्रमाला पर्यटकांचा प्रतिसाद कसा असतो? त्यांचा अनुभव कशा प्रकारचा असतो?
चांगला असतो प्रतिसाद! खरं सांगू का? तिथे आमच्याबरोबर येणारे जवळपास सर्वच पर्यटक हे त्या भेटीत अतिशय भावविवश होतात, प्रचंड भारावून जातात. नंतर साठ ते सत्तर टक्के लोकांचं भारावून जाणं हे महिनाभर टिकतं. वीस ते तीस टक्के लोक अगदी पुढचे सहा महिने त्या भारावल्या अवस्थेत काढतात. आणि दहा टक्के लोक हे वर्ष उलटून गेले तरी ते भारावलेपण विसरत नाहीत. ते दहा टक्के लोक आमच्याबरोबर जोडले जातात. आज त्यांच्याच बळावरतर ही संस्था उभी आहे. जेव्हा ते सहलीसाठी येतात तेव्हा ते 'लक्ष्य फाऊंडेशन'चे सभासद नसतात. पण सहल समाप्त होताना ते संस्थेचे सभासद स्वखुशीनं होतातच, शिवाय त्यातला प्रत्येकजण आपल्याबरोबर देशाप्रती आणि देशाच्या सैनिकांप्रती जाज्ज्वल्य अभिमानाची व कृतज्ञतेची भावना घेऊन घरी जातो.
तुम्ही भेट देता तेव्हा तेथील सैनिकांची प्रतिक्रिया काय असते?
आम्ही रक्षाबंधनाला जेव्हा या सैनिकांना राख्या बांधतो, त्यांच्यासाठी खाऊ, शुभेच्छापत्रं घेऊन जातो, तेव्हा हे सैनिक आपल्या भावना व्यक्त करतात, "आप जो प्यार देते हो राखी के जरिए, वो हौसला देता है लडने के लिए|" मला ते प्रेमानं 'मॅम', 'अनुमावशी', 'अनुताई', 'माँ' म्हणून हाक मारतात. मोकळेपणानं गप्पा मारतात. आम्ही दरवर्षी तिथे जातो तेव्हा ही मुलं अगदी आतुरतेनं आमची वाट बघत असतात. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्यावर रचलेल्या हिंदी, इंग्रजी कविता त्यांना वाचून दाखवते. त्यांना आवडलेल्या कवितांच्या जास्तीच्या प्रती ते हक्काने मागवून घेतात.
''रक्षा बंधन''
अझीझ बहादुरों
यह बंधन नहीं, इज़हार प्यारका है,
प्यार है, और विश्वास है ,
विश्वास है, और उम्मीदे है,
उम्मीदे है, और गर्व है,
इस देशकी बहेनोंकी राखीपर
भाई मेरे सबसे पहले
तुम्हारा ही हक है|
-- अनुराधा प्रभुदेसाई
या सैनिक मुलांचे मला एरवीही फोन येत असतात. "अनुमावशी, तुमची आठवण झाली" किंवा "तुमचा आवाज ऐकावासा वाटला" म्हणून फोन करतात ही मुलं!
सियाचीन ग्लेशियर येथे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ ड्यूटीवर असलेल्या एका कॅप्टन मुलाचा मला असाच एका रात्री फोन आला. खूप दमला होता तो, अगदी थकला होता, पण आपली ड्यूटी प्राणपणानं शंभर टक्के पार पाडत होता. त्याला माझ्याकडून प्रोत्साहनाचे दोन शब्द ऐकायचे होते फक्त! त्यासाठी त्यानं सॅटेलाईट फोनवरून मला कॉल केला होता. आम्ही वीस मिनिटं बोललो असू. तो मुलगा उणे चाळीस डिग्री तापमानात त्याच्या कामासाठी रोज किमान ९ कि.मी. चालत होता. इतक्या बिकट तापमानात, जिथे निसर्ग तुमचा शत्रूच भासतो, अशा ठिकाणी देशाच्या रक्षणाचं काम करायला मिळतं आहे, याचा त्याला अभिमान वाटत होता. अशा सिंहाच्या शूर छाव्यांच्या आयुष्याची दोरी बळकट राहावी व त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, यासाठी मी कायम प्रार्थना करत असते.
सीमाप्रांताच्या कोणकोणत्या भागांमध्ये तुम्ही सर्वसामान्यांना घेऊन जाता?
आम्ही लेह, लडाख, कारगिल, द्रास या प्रांतांना भेट देतो. तेथील युद्धस्थळे, वीरस्मारके, विजयस्तंभ, वीरजवानांच्या छावण्यांना आमची भेट ठरलेली असते. आमच्या ग्रूपमध्ये अगदी छोट्या आठ-नऊ वर्षांच्या लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयोगटाचे लोक असतात. त्यांच्यात कोणी व्यावसायिक, कोणी वकील, कोणी डॉक्टर, शिक्षक, कोणी आयटी क्षेत्रात काम करणारे - असे विविध क्षेत्रांमधील लोक असतात.
१.
२.
३.
वीरस्मारक आणि विजयस्तंभ....
लक्ष्य फाऊंडेशनतर्फे तुम्ही शाळा-कॉलेजेस व कॉर्पोरेट संस्थांसाठी दृक्श्राव्य कार्यक्रमही करता. त्यांबद्दल सांगता का? या कार्यक्रमांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो?
मी 'ऋणानुबंध सैनिकांशी - कारगिल शौर्यगाथा' नावाचा दोन तासांचा दृक्श्राव्य कार्यक्रम सादर करते. त्यात सीडी प्रेझेंटेशन असतं. सोबत मी माझे अनुभव सांगते, प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर कारगिलच्या युद्धात नक्की काय घडलं, युद्ध कशा प्रकारच्या टापूत आणि हवामानात घडत होतं, आपल्या जवानांनी कोणत्या अवघड परिस्थितीत विजयश्री आपल्याकडे खेचून आणली, त्याची त्यांना काय किंमत मोजायला लागली, शहिदांच्या गाथा, त्यांच्या भावना - हे सारं मी श्रोत्यांच्या नजरेसमोर उभे करते. कारगिल युद्धात शहीद झालेल्या परमवीरचक्रविजेत्या विक्रम बात्रानं युद्धाच्या ठिकाणी जाण्याअगोदर मित्रांचा निरोप घेताना काढलेले "या तो तिरंगा लहराकर, नहीं तो तिरंगेमें लपेटकर आऊंगा; लेकिन जरूर आऊंगा", हे उद्गार आजही श्रोत्यांचे काळीज चिरत जातात. आजवर मी अशी शंभरापेक्षा जास्त लेक्चर वेगवेगळ्या शाळाकॉलेजांमधून व संस्थांमधून दिली आहेत. या १४ ऑगस्टला आम्ही 'युवा प्रेरणा' नावाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात थलसेना, नौदल व हवाई दल यांतले वरिष्ठ अधिकारी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. मी त्यांची मुलाखत घेतली आणि सर्वांत शेवटी माझं छोटंसंच असं अर्ध्या तासाचं सादरीकरण केलं. या कार्यक्रमाला साडेआठशे मुलंमुली उपस्थित होते. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मुलंमुली कार्यक्रमाच्या शेवटी येऊन सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त करतात. प्रत्यक्षात ते घडेल किंवा नाही हे माहीत नाही. परंतु तशी इच्छा, देशाबद्दल आणि आपल्या सैनिकांबद्दल अतीव आदराची व प्रेमाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते, ही मोठीच पावती म्हणावी लागेल. आणि त्यातून आम्हांला जाणवतं की, आजची तरुण पिढीही तितकीच संवेदनशील आहे. पण आपण जर त्यांच्यापुढे आदर्शच उभे केले नाहीत, त्यांना सकारात्मक दिशाच दाखवली नाही तर मग तक्रार करण्यात काही अर्थ नाही.
आजच मी खंडाळ्याला पोलीस ट्रेनिंग घेत असलेल्या मुलींना लेक्चर द्यायला गेले होते. पहाटे चार वाजता त्या मुलींचा दिवस सुरू झाला होता आणि माझं लेक्चर सकाळी अकरा वाजता होतं. पोलीस ट्रेनिंग म्हणजे कल्पना करा की, त्यांना अगदी रगडून काढलं जातं. मला दिसत होतं की, त्या मुली दमल्या आहेत. दीड तासानंतर मी त्यांना विचारलं की, मुलींनो, तुम्ही दमलेल्या दिसताय, तर माझं लेक्चर इथेच थांबवूयात का? तेव्हा त्या मुलींनी आग्रहानं उरलेलं लेक्चर तर ऐकलंच, शिवाय हा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे आणि तुम्ही आमच्यासाठी तो लवकरच पुन्हा एकदा खास सादर कराच म्हणून मला गळ घातली.
नगरच्या स्नेहालयातल्या मुलांना जेव्हा मी हे लेक्चर दिलं, तेव्हा त्या मुलांनी लेक्चरच्या शेवटी विचारलं, "मॅडम, तुम्ही उद्या सकाळपर्यंत इथेच आहात ना?" मी होकार दिल्यावर दुसर्या दिवशी सकाळी ती मुलं फुलांनी सजवलेली फुलदाणी आणि स्वतः बनवलेली शुभेच्छापत्रं आपल्या पाठीमागे लपवून हळूच मला भेटायला आली. मला ती फुलं आणि पत्रं देताना त्यांचे डोळे चमकत होते. "तुमच्यामुळे आम्हांला आमच्या देशाच्या सैनिकांच्या शौर्याबद्दल कळलं!" हे त्या मुलांचे उद्गार होते.
महाराष्ट्रात आजवर बर्याच शहरांमध्ये व गावांमध्ये तुम्ही कार्यक्रम केले आहेत. गावांमध्ये कशा तर्हेचा प्रतिसाद मिळतो?
महाराष्ट्रातल्या गावांमध्ये मला शहरांपेक्षा खूपच चांगला अनुभव आजवर मिळाला आहे. अनेक गावांमध्ये कितीतरी घरांमधील माणसं सैन्यात आहेत. त्यामुळे त्यांना सैन्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. शहरांमध्ये सगळं आहे तर तिथे सैन्याबद्दल आस्था नाही आणि खेड्यांमध्ये त्यांच्यापाशी पुरेशी माहिती नसते किंवा मार्गदर्शन नसतं, पण तिथल्या मुलांना सैन्यात जावंसं फार वाटतं. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या सैनिक टाकळीसारख्या गावात तर घरटी किमान एक माणूस तरी सैन्यात आहे. पिढ्यान्पिढ्या येथील जवानांनी भारताच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी आपलं रक्त सांडलं आहे. गावांमधील तरुणाईला सैन्यात जायची तीव्र इच्छा आहे. पण अनेकदा त्यांच्यापाशी फक्त इच्छा असते. त्यासाठी पुरेसं पाठबळ, आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन नसतं. कित्येकदा माझा कार्यक्रम संपल्यावर ही मुलं मला भेटायला येतात. तेव्हा मग मी त्यांना जिल्हापातळीवर सैन्याचे जे कँप असतात किंवा माहितीपर कार्यक्रम असतात त्यांबद्दल सांगते किंवा त्यांना कोण मार्गदर्शन करू शकेल हे सुचवते. त्या ठिकाणचे, जवळपासचे सैन्याधिकारी मला भेटले की, त्यांना या तरुणांना मार्गदर्शन करण्याविषयी सुचवते. याउप्पर सध्यातरी मी जास्त काही करू शकत नाही.
आज आपल्या देशात सैनिक आणि शेतकरी हे दोन वर्ग उपेक्षित किंवा दुर्लक्षित आहेत. मी जिथेजिथे कार्यक्रम करते तिथले शेतकरी मला येऊन विचारतात, "ताई, तुम्ही सैनिकांविषयी एवढं बोलता... आमच्याविषयीपण का नाही बोलत हो?" त्यावेळी माझ्यापाशी त्यांना देण्यायोग्य उत्तरच नसतं.
आज आपल्या देशासाठी कर्तव्यभावनेतून लढणार्या सैनिकाची आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून तशी काहीच अपेक्षा नसते. आपण त्यांचं कौतुक केलं अगर नाही केलं तरी ते लढत राहणारच आहेत. त्यांचा देश आणि त्यांचं कर्तव्य त्यांना आपल्या प्राणांहून प्यारे आहेत. पण अशा सैनिकांनी आपलं रक्षण करावं, यासाठी आपण कधी त्यांच्या लायक बनणार आहोत? 'वीरभोग्या वसुंधरा' ही उक्ती आपल्याबाबत कधी खरी ठरणार आहे? एकीकडे तरुण पिढी वाया जात आहे, असं म्हणताना आपण या तरुणाईपुढे कोणती उदाहरणे ठेवतोय, काय आदर्श निर्माण करतोय याबद्दल आपण कधी सजग होणार आहोत?
तुम्ही वीरजवानांच्या शौर्यगाथा सांगणार्या पुस्तिकाही छापल्या आहेत. त्यांबद्दल सांगता का?
हो, अवश्य. मी जेव्हा शाळाकॉलेजांतून कार्यक्रम सादर करते तेव्हा तेथील मुलांना आपल्या परमवीरचक्रविजेत्या योद्ध्यांची नावं विचारते. एकदोन विजेत्यांव्यतिरिक्त मुलांना ही नावंच माहीत नसतात. त्याच वेळी त्यांना नटनट्या, बॉलीवूड स्टारच्या नातवंडांची नावंही तोंडपाठ असतात. तेव्हा आम्ही आपल्या शूरवीर जवानांच्या शौर्यकथा पुस्तिकारूपानं या मुलांसमोर आणायचं ठरवलं. आजवर आम्ही परमवीरचक्रविजेते, महावीरचक्रविजेते आणि वीरचक्रविजेते यांच्या शौर्यगाथा सांगणार्या एकूण नऊ पुस्तिका काढल्या आहेत. 'या तो तिरंगा लेहराकर आऊंगा नहीं तो तिरंगेमें लपेटकर जरुर आऊंगा' सांगणारा कॅप्टन विक्रम बात्रा, 'जर मृत्यू माझं काम संपवायच्या आधी माझ्या कर्तव्याच्या आड आला तर मी शपथेवर सांगतो की मी आधी मृत्यूचा खातमा करेन आणि पुढे जाईन' असं सांगणारा कॅप्टन मनोजकुमार पांडे हे दोघे शहीद आहेत. नायब सुभेदार योगेंद्रसिंग यादव आणि रायफलमन संजय कुमार हे दोघं जीवित आहेत. दोघा महावीरचक्रविजेत्यांमध्ये एक शहीद मेजर पद्मपाणी आचार्य आहे. तो त्याच्या आईला लिहितो, "आई, सहा महिन्यांनी माझा जो पुत्र जन्माला येईल त्यालाही तू माझ्यासारख्याच महाभारताच्या कथा सांग, त्याला सुसंस्कृत आणि सभ्य असा सैनिक बनव; जो या देशासाठी प्राण द्यायलाही तयार असेल, अगदी माझ्यासारखाच!" शहीद झालेला कॅप्टन विजयंत थापर, महावीरचक्रविजेता कर्नल सोनम वांगचुंग आणि वीरचक्रविजेता सुभेदार ताशी चापेल यांच्या शौर्याच्या कथा सांगणार्या या पुस्तिका मी मुलांना वाटते - जेणेकरून त्यांच्यासमोर या देशावरून जीव ओवाळून टाकणार्या शूरवीरांचे आदर्श निर्माण होतील, त्यांना त्यांच्यापासून स्फूर्ती मिळेल, त्यांच्यातील देशप्रेमाची भावना प्रखर होईल.
सैनिकांबरोबर तुम्ही दिवाळी फराळ कार्यक्रम, रक्षाबंधन, व्हॅलेन्टाईन दिवस असे कार्यक्रम करता, त्यांबद्दल सांगाल का?
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करत असतो, गोडाधोडाचं खात असतो, फटाके - रोषणाई करत असतो तेव्हा आपले सैनिक सीमाप्रांतांत डोळ्यांत तेल घालून आपल्या भूमीचं रक्षण करत असतात. त्यांना दिवाळी असो की दसरा, काहीच फरक पडत नाही. दिवाळीच्या दिवशी आपल्या या बांधवांप्रती असलेल्या प्रेमा-कृतज्ञतेपोटी त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटावेत, त्यांना आपल्या हातानं बनवलेला फराळ खाऊ घालावा, त्यांच्याशी बोलावं, संवाद साधावा या उद्देशातून आम्ही हा उपक्रम सुरू केला. दर वर्षी आम्ही आमच्या या बंधूंबरोबर दिवाळीचा पहिला दिवस साजरा करतो. त्यांच्यासाठी छोट्याशा भेटवस्तू घेऊन जातो. त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. वेगवेगळ्या सैनिकी रेजिमेंटबरोबर आम्ही हा दिवस साजरा करतो.
रक्षाबंधन, व्हॅलेंटाईन दिवस हे उपक्रमही सैनिकांना आणि सर्वसामान्यांना जोडण्याचे मोठे काम करतात. सैनिकांना राखीसोबत आलेल्या पत्रांचं खूप कौतुक वाटतं. आपल्यावर मायेची पाखर घालणारं, आपल्या देशसेवेची बूज ठेवणारं कोणीतरी आहे ही भावना तिथे टोकाच्या तापमानात, अत्यंत संघर्षाच्या परिस्थितीत लढत असलेल्या जवानासाठी खूप मोलाची असते.
विविध उपक्रम :
१.
२.
लक्ष्य फाऊंडेशन तर्फे केलेला वीरमातांचा व वीरपत्नींचा सन्मान, वीरमातांचा सत्कार, त्यांच्याशी साधलेला संवाद यांबद्दल सांगाल का?
मी हे काम सुरू केलं तेव्हा माझ्याच बँकेत असणार्या तीनचार जणांची मुलं सैन्यात होती हे मला माहीतच नव्हतं. या आईवडिलांना आपल्या मुलाला देशाच्या सीमेवर धाडताना मनात काय चलबिचल होत असेल याची कल्पना करणं अवघड आहे. आज सैनिक सीमेवर लढत असतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना रोजच्या व्यवहारांसाठी, कामासाठी किती यातायात करावी लागते - कोण असतं त्यांच्या मदतीला? पण त्यांचीही काही कुरकुर नसते.
एकदा आम्ही लडाखला असताना एका रेजिमेन्टमध्ये रात्री अडकून पडलो होतो. त्या भागात अतिवृष्टी झाली होती. आम्हांला बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद होते. तेथील कमांडर साहेबांनी रात्री साडेअकरा वाजता आमची एका राहुटीत राहायची तात्पुरती सोय करून दिली. आम्हांला सोबत करायला काही सैनिक आमच्या जोडीला दिले. ती हवाई दलाची छावणी होती. रात्री बारा-साडेबाराला तिथे पोचल्यावर त्या मुलांनी अगोदर आमच्यासाठी गरम चहा आणि भजी बनवली. त्यानंतर आमच्यासाठी जेवण बनवलं. आमचा असा हा अनोखा पाहुणचार चालला होता तेव्हा आजूबाजूला हेलिकॉप्टरचे आवाज येत होते. मध्येच कोणी मुलगा 'मॅम, जरा थोडा काम करके आता हूं|' म्हणून बोलताबोलता तिथून गायब व्हायचा, काही वेळानं परत यायचा आणि 'सॉरी हां, बीच में ही जाना पडा|' म्हणून दिलगिरी व्यक्त करायचा. त्यांना विचारलं, की अरे मुलांनो, असं कोणतं काम आहे ते सांगा तरी! तेव्हा त्या मुलांनी सांगितले की ते अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या सुटका-कार्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन जात होते आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवून परत येत होते. त्यांच्या चेहर्यावर असे भाव असायचे की जणू त्यांनी फार काहीच केलेलं नाही. माझ्या मनात आलं, की काय या जवानांची मूस आहे! मग ज्या कुशीतून ते जन्माला आलेत ती कूस किती धन्य असेल! या विचारातून मी वीरसैनिकांच्या मातांना संपर्क केला. खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. त्यांचा सन्मान करण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं भाग्य आणि त्यांचं आपल्या पुत्राबरोबरच आपल्या देशाप्रती असणारं प्रेम अनुभवायला मिळणं हा मी माझाच गौरव समजते.
मला पन्ना दाईच्या त्यागाची कथा खूप काही शिकवून गेली. देशासाठी आपल्या पुत्राला राजपुत्राच्या जागी पाळण्यात घालून राजपुत्राचा जीव बचावणारी पन्ना दाई... तिच्या कथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे.
वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान करणं म्हणजे खूप काही मोठं काम नाही. पण 'तुम्ही तुमचे पुत्र/पती देशासाठी दिलेत, आज तुमच्या सोबत आम्ही आहोत, आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे,' ही आपली भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश होता. अनेक सैनिकांच्या माता मला कित्येकदा फोन करतात, त्यांची सुखंदु:खं शेअर करतात, गप्पा मारतात. मी त्यांच्या मुलांची अनुमावशी आहे. मला या मातांनी खूप काही शिकवलं आहे.
एका वीरमातेने अनुराधाताईंना लिहिलेले पत्र :
''माझा मुलगा सध्या दिल्ली येथे लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी तो आर्मी ऑफिसर म्हणून जॉइन झाला. तेंव्हापासून घरगुती आनंदाचे क्षण त्याच्या वाट्याला फारच थोडे यायचे. सुट्टीवरुन परत जाताना तीच निर्भय करारी नजर अन् एकदा नमस्कार केला की मागे वळूनही पाहायचं नाही ही त्याची सवय. त्याने मलाही निरोप देताना डोळ्यांच्या आड अश्रू लपवायला शिकवले. लोकांना मुलगा आर्मी ऑफिसर आहे हे सांगताना खूप आनंद व्हायचा पण त्याच वेळी आत काळीज गलबलायचं. द्रास, कारगिल भागातील त्याचे चित्तथरारक अनुभव त्याने मित्रांना सांगतानाच कळायचे. घरच्यांना नेहमी 'खूप छान लाईफ असतं,' असंच सांगायचा.
त्याच्या जीवनातील दोन सांगण्यासारखे अनुभव. कारगिलची लढाई सुरू झाली आणि त्याचे पोस्टिंग द्रास सेक्टर मध्ये झाले. टीव्हीवर लढाईच्या बातम्या पाहून मन सुन्न व्हायचं, रात्री झोप लागायची नाही. मोबाईलवरुन, लँडलाईन वरुन कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. टायगर हिलवर आपल्या सैन्यानं विजय मिळवला. या विजय समारोहाचे टायगर हिलवरील कार्यक्रमाचे नियोजन त्याच्याकडे होते. त्याचा पंचविसावा वाढदिवस टायगर हिलवर साजरा झाला. योगायोगाने त्याचा वाढदिवस २६ जुलै म्हणजेच विजयदिन आहे. आनंद आणि अभिमान त्याने एकत्र अनुभवला.
माझ्या मुलाचे लग्न ठरले नी लढाई चालू असल्यामुळे २ वेळा मिळालेली रजा कॅन्सल झाली. कार्यालय बुक केलेले कॅन्सल करावे लागले. तिसर्या वेळी आम्ही ठरवले की तो आल्यावर पत्रिका छापायच्या व गडबडीत लग्न उरकायचे. ठरल्याप्रमाणे तो रजा घेऊन आला. विवाहाचे कार्यालय ठरले, विवाहविधी व्यवस्थित पार पडले आणि चित्रपटात शोभावे तसे आर्मीचा माणूस पत्र घेऊन स्टेजवर हजर झाला - 'तुमची रजा कॅन्सल केली आहे आणि ताबडतोब ड्यूटीवर हजर व्हावे.' विवाहानंतर चार ते पाच दिवसात धार्मिक विधी उरकून नवजोडी गोव्याला फिरून आली व परत मुलाला ड्यूटीवर हजर व्हावे लागले. त्यानंतर पूर्ण आठ ते नऊ महिन्यांनीच तो आपल्या पत्नीला भेटला. जाताना त्याला निरोप देणं, त्याच्या नववधूला समजावणं आणि आठ नऊ महिने तिच्या भावना जाणून तिला सांभाळणं खूप अवघड गेलं.
असे लहान मोठे प्रसंग येत गेले. मन कठीण करीत केले. घरात कोणतीही बॅकग्राऊंड नसताना शाळेपासून ठरवूनच तो आर्मी ऑफिसर झाला. पहिल्याच प्रयत्नात पास होत गेला. खूप अभिमान वाटतो आई म्हणून! आता तो वरच्या हुद्दयावर खूप चांगले काम करीत आहे. त्याचा संसार बहरला आहे. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद अशा मुलांच्या पाठी सदैव असतात.
खरोखर तुमच्या कामाचे खूप कौतुक वाटते. तरुण पिढीत देशभक्तीची भावना निर्माण करण्याकरता तुम्ही करत असलेले उपक्रम छान आहेत. त्यासाठीची समर्पण भावना तुमच्या ठायी ओतप्रोत भरली आहे. तुमची कविता ऐकून तर खूपच आनंद वाटला. मीही कविता करते. 'पंचमहाभूतांपेक्षा श्रेष्ठ जवान' ही तुमच्या कवितेतील कल्पना खूपच सुंदर वाटली. आपले कार्य असे अखंड चालो. त्यातून देशसेवा करणार्या तरुण रक्ताला बळ मिळो. आपल्या पाठीशी उभे राहणार्या आपल्या कुटुंबियांना लाख लाख धन्यवाद! परमेश्वर आपणास उदंड आयुष्य आणि शक्ती देवो हीच मनापासून प्रार्थना. आपली मुलाखत अशीच वारंवार ऐकण्याची संधी मिळो. जीवनात योग आला तर आपली भेट अवश्य घेईन.''
प्रसारमाध्यमे सैनिकांचे कार्य सर्वसामान्यांपुढे आणायला कमी पडतात असे वाटते का?
प्रसारमाध्यमं टीआरपी बघतात हो! आज ते लोक दुकानं मांडून बसले आहेत. समजा उद्या कोणी 'शौर्य' नावाचा चॅनल फक्त भारताच्या सैनिकांच्या शौर्यगाथा दाखविण्यासाठी सुरू केला, तर माझी तयारी आहे, पण अहो, ते कार्यक्रम बघणार कोण आणि किती लोक? आज जे कार्यक्रम 'विकले' जातात तेच कार्यक्रम प्रसारमाध्यमंही उचलून धरणार ना! त्यामुळे त्यांना दोष द्यावा, असं मला वाटत नाही. आपणच कोठेतरी कमी पडत आहोत.
जिथे शाळेच्या पाठ्यक्रमातील भूगोलाच्या पुस्तकात भारताच्या नकाश्यात अरुणाचल प्रदेशाचा भाग संपूर्णपणे वगळला जातो, ते कोणाच्या लक्षातही येत नाही आणि मग पुस्तकं छापून झाल्यावर जेव्हा लक्षात येतं, तेव्हा काहीतरी डागडुजी करायचे प्रयत्न केले जातात. तिथे आम्ही निषेध व्यक्त करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही, हे अत्यंत खेदजनक आहे. आपल्या ज्या सीमांसाठी हजारो सैनिक आपलं रक्त सांडतात त्या सीमाच तुम्ही परस्पर बदलून टाकत असाल, तर ते कोणीही सहन करता कामा नये. पण अशा घटना घडत जातात आणि आपल्याला त्यांच्यामुळे काही फरक न पडल्यासारखं वाटणं, हे खूप अस्वस्थ करतं.
ह्या उपक्रमांखेरीज लहान मुलांच्या सहलीही तुम्ही नेल्या आहेत ना?
अगं, ते मी पूर्वी करायचे. तसे खूप उद्योग केले आहेत. मला लहानपणापासूनच ट्रेकिंग, अभिनय, वक्तृत्व, एन. सी. सी. यांची आवड होती. एकेकाळी कॉलेज नाट्यस्पर्धांमध्ये आमच्या कॉलेजला आम्ही मानाची 'इफ्टा ट्रॉफी' मिळवून दिली होती. नंतर मी 'मालगुडी डेज' या मालिकेतही काम केलं. गिर्यारोहणाच्या व दुर्गभ्रमणाच्या आवडीतून मी 'युनियन ट्रेकर्स' ग्रूप सुरू केला आणि ८ ते १२ वयोगटातल्या मुलांसाठी त्या माध्यमातून जवळपास १०-१२ ट्रेक आयोजित केले. पण 'लक्ष्य फाऊंडेशन'चं काम सुरू झाल्यावर हे सर्व मागे पडलं.
लक्ष्य फाऊंडेशनचे काम करण्यासाठी तुम्ही आपल्या नोकरीचा राजीनामा दिलात...
हो, अगदी गेल्या वर्षापर्यंत, म्हणजे २०१२पर्यंत मी युनियन बँकेतली माझी मॅनेजरपदाची नोकरी सांभाळून हे काम करत होते. नोकरी, घर, संसार आणि हे काम अशी कसरत करत होते. पण मग या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. शेवटी गेल्या वर्षी मी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आता माझा पूर्ण वेळ मी या कामासाठी देऊ शकते.
तुमच्या या सर्व कामाचे आर्थिक गणित तुम्ही कसे जमविता?
मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा सुरुवातीला मी स्वतःच्या खिशातले पैसे घालून हे काम करत होते. शेवटी 'चॅरिटी बिगिन्स अॅट होम.' असं मी सात-आठ वर्षं कोणतीही अपेक्षा न ठेवता काम केलं. पण आता लोकांनाच कळतं की, हे सैनिकांसाठीचंच काम आहे. लोक मला विचारतात की, आम्ही तुला काय मदत करू? मग मी त्यांना 'लक्ष्य फाऊंडेशन'साठी देणगी द्यायला सांगते. ८० जी अंतर्गत त्या देणगीसाठी कर सवलत मिळते. संस्थेचे सर्व हिशेब चोख ठेवलेले असतात. त्यामुळे काहीच प्रश्न नाही. आणि मी स्वतः यातून काही आर्थिक उत्पन्न मिळावे, अशा अपेक्षेनं काम करत नाही. मी माझी होती ती नोकरी सोडून इथे आले आहे. त्यामुळे ती अपेक्षाच नाही. आपल्याला देशप्रेमाची एक लाट सार्या भारतात निर्माण करायची आहे. आज 'झी चोवीस तास'नं घेतलेल्या माझ्या मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर मला जगभरातल्या अनेक देशांमधल्या भारतीय लोकांचे फोन आले की, आम्ही देशाबाहेर राहतो याचा अर्थ आम्हांला देशासाठी काही वाटत नाही असा नव्हे. तर तुम्ही सांगा, आम्ही काय करू शकतो? तसंच खेड्यापाड्यांमधूनही अनेक लोकांचे फोन आले. अनेक जवानांच्या पालकांचे फोन आले. ते म्हणाले, तुम्ही आमच्याच भावना बोलून दाखवत आहात. ते मला खूप भावलं. या वर्षी मी जेव्हा २६ जुलैला कारगिलला गेले, तेव्हा तेथील फर्स्ट लेडी मला म्हणाल्या 'अनुराधा, यू आर ब्लेस्ड!' मला याशिवाय काय हवंय? जर मी ब्लेस्ड आहे तर मग माझी मुलगी, माझी नातवंडं, माझ्या आजूबाजूला काम करणारे लोक - सर्वचजण ब्लेस्ड आहेत! शेवटी तुम्हांला काय लागतं? या जगातून जाताना तुमच्याबरोबर ही ब्लेसिंग, लोकांचे आशीर्वादच तर येतात! पैसा हा फार छोटा आहे या व्याप्तीपुढे... कारण सैनिकांच्या त्यागाची तुलना पैशांत कधीच होऊ शकत नाही. मला कोणी विचारतं की, तू काय काम केलंस - तेव्हा मी त्यांना एवढंच सांगू शकते की मी देशप्रेमाची एक लाट निर्माण करायचा प्रयत्न करत आहे, बस्स!
तुमच्या टीमबद्दल सांगाल का?
माझ्यासोबत बरेच सहकारी आहेत. मुग्धा जोशी, आशिष गोडबोले, संकेत शिंदे, निनाद लांजेकर, समीर भाटकर, सोनाली गोडबोले, किशोर राणे, सचिन राऊत... बरेच जण आहेत. पडद्याआड काम करणारे, कार्यक्रमांच्या आयोजनात, बाकी व्यवस्था बघण्यात मोठा वाटा उचलणारे, असे हे माझे सहकारी आहेत. 'लक्ष्य फाऊंडेशन'च्या ऑफिससाठी आपली जागा देणारे रवीन्द्र कंग्रालकर आहेत. पुण्याहून माझ्याबरोबर जे लडाखला आले तेही बरेच लोक आता जोडले गेले आहेत.
'झी चोवीस तास'च्या डॉ. उदय निरगुडकरांचंही मला खास कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी आपल्या 'हार्ट टू हार्ट' कार्यक्रमात माझी मुलाखत घेतली आणि आमचं हे कार्य हजारो लोकांपर्यंत एका झटक्यात पोहोचवलं. आज हा विषय घ्यायला चॅनलवाले सहसा तयार नसतात. पण त्यांनी हा कार्यक्रम लोकांसमोर आणला आणि लोकांचे तब्बल २१,००० कॉल्स त्यांच्याकडे प्रतिसादादाखल गेले. चॅनलचं रेकॉर्ड ब्रेक झालं. आजवर झालेल्या सत्तर जणांच्या मुलाखतींमधून या मुलाखतीला लोकांचा एवढा उदंड प्रतिसाद मिळाला, की शेवटी लोकांच्या मागणीवरून त्यांना तो कार्यक्रम पुन:प्रसारित करायला लागला. हा कार्यक्रम एक करोड लोकांपर्यंत पोहोचला.
एक व्यक्ती म्हणून तुम्हाला या सर्व कामातून काय मिळाले किंवा मिळत असते?
मला परवा 'चला, बदल घडवूयात' नावाच्या एका कार्यक्रमात बोलावलं होतं. म्हणजे लोकांना वाटत असावं की, या सर्व कार्यात माझ्यात काहीतरी बदल झाला. माझ्या शाळेतील शिक्षिका सांगतात, "आम्हांला माहीत होतं की तू काहीतरी वेगळं करणार! आज ते दिसतंय आम्हांला...''
मी सैन्यदलाकडून दोन नियम शिकले. पहिला नियम म्हणजे मी कधीही माघार घेणार नाही. आमचा जवान 'विजय किंवा वीरगती' म्हणत पुढे जातो. त्याच्याप्रमाणेच मी माघार कधीच नाही घेणार! जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी माझी ताकद संपूर्णपणे या कामात लावणार आणि शर्थीचे प्रयत्न करत राहणार. जोपर्यंत माझं समाधान होत नाही, तोपर्यंत मी हे काम करत राहणार. आणि माझा दुसरा नियम असा आहे की, मी हा पहिला नियम कधीही विसरणार नाही. मी जे काही गेल्या दहा वर्षांमध्ये शिकले ते या मुलांकडून शिकले. सकारात्मकता शिकले, कर्तव्यनिष्ठा, समर्पणभाव, शिस्त व निर्धार या गोष्टी मी त्यांच्याकडूनचतर शिकले आहे. त्या गोष्टींबद्दल वारंवार बोलून त्या मी स्वतःत आणायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आता असं झालंय की, लोक मला 'फौजी' समजायला लागले आहेत!
तुमच्यासमोर हे कार्य करत असताना कशा प्रकारची आव्हाने किंवा अडचणी येतात? त्यांमधून मार्ग कसा काढता?
अडचणींबद्दल म्हणायचं तर लोकांना तुम्ही काय करत आहात, कशाबद्दल सांगताय हे अगोदर माहीत नसतं. 'ऋणानुबंध सैनिकांशी - कारगिलची शौर्यगाथा' हे कार्यक्रमाचं नाव जेव्हा मी लिहिते, तेव्हा त्यावरून लोकांना काहीच कळत नाही. मग अशा कार्यक्रमाला जावं की जाऊ नये हा तणाव लोकांच्या मनात आधीच असतो. पण एकदा ते कार्यक्रमाला आले की भारून जातात. अनेकदा चांगल्यातून चांगलं घडत जातं... त्याची साखळी जुळत जाते. पार्ल्याला झालेल्या एका कार्यक्रमाच्या साखळीतून 'झी चोवीस तास'ची माझी मुलाखत घडली व आमचं काम व संदेश जगभरातल्या हजारो भारतीय बांधवांना प्रेरणा देऊन गेले. पण काही वेळा अंतस्थ हेतू वेगळा असणारी माणसेही भेटतात. काही वेळा मी अशा अनुभवांनी होरपळले. काही वेळा जाणवलं की, आपण खूपच मोकळेपणानं काम करतोय, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात वेगळं काही आहे. हे लक्षात यायला मला जरा वेळ लागला. आपल्या सर्व कार्याला आपल्याबरोबर असणार्या कोणाच्या कृतीमुळे तडा जाऊ नये, याची काळजी घ्यायला लागते.
तुम्हांला या कार्याची प्रेरणा, ऊर्जा, बळ सैनिकांशिवाय कसे व कोठून मिळते?
माझी सगळी जोडलेली माणसं आहेत. हे सगळेजण मला सपोर्ट करतात. माझ्या घरचे, सासरचे लोकही त्यात आहेत. नाहीतर मी त्या कामांमध्ये अडकून पडले असते. तुम्हांला एक घटना सांगते. २०१० साली २६ जुलैला आम्हांला लडाखच्या सैन्याच्या कार्यक्रमाचं खास निमंत्रण होतं. त्या कार्यक्रमाला जाण्याअगोदर १० जुलैला माझे वडील गेले. घरात मी सर्वांत धाकटी आणि वडिलांची लाडकी होते. त्यांचं माझं एक खास असं घट्ट नातं होतं. पण मी माझ्या भावाला आणि वहिनीला सांगितलं की, माझं तिकडे लडाखला जाणं गरजेचं आहे. माझ्याबरोबर चाळीसजण तिथे पहिल्यांदाच जाणार होते. शिवाय तिथली माझी सैनिक मुलं माझ्या कविता ऐकण्याची, आम्हांला भेटण्याची खूप उत्सुकतेनं वाट बघत होती. त्यांना मी विचारलं की मी काय करू? तर ते सरळ म्हणाले की तू जा. माझ्यासाठी असं जाता येणं कठीण होतं. पण आपल्या वैयक्तिक दु:खापेक्षा एका मोठ्या विचाराला त्यांनीही सहमती दर्शविली व मला आधार दिला. मी तेव्हा त्यांच्याबरोबर राहू शकले नाही. पण माझी जी बांधीलकी होती, तीही पूर्ण करणं तेव्हा गरजेचं होतं. याशिवाय मला सैनिकांच्या पालकांकडूनही खूप प्रोत्साहन व आधार मिळतो. अनेक माणसं या कार्यक्रमांमधून जोडली जातात - त्यांच्याकडून मला सपोर्ट मिळतो. आता तर प्रसारमाध्यमांमधूनही या कार्याबद्दल लोकांना माहिती मिळत आहे. तुमच्यासारखे लोक माझं हे कार्य आहे ते इतरांपर्यंत पोहोचवत आहेत. लोक या कामाबद्दल बोलायला लागले आहेत. त्याबद्दल जागरुक होऊ लागले आहेत. मला आणखी काय पाहिजे?
आतापर्यंत तुम्हांला मिळालेले सन्मान व तुमच्या भविष्यातल्या योजना यांबद्दल सांगाल का?
आता तर असं झालंय की मला जर सैन्यात कोणाची अपॉइंटमेंट हवी असेल, तर मी फक्त सांगितलं की मला लगेच अपॉइंटमेंट मिळते. मला दरवर्षी २६ जुलैला त्यांच्या 'आर्मी डे'ला उपस्थित राहण्याचं खास आमंत्रण असतं. २०११ साली आतापर्यंतच्या कामाचं कौतुक म्हणून लष्कराच्या ८ माऊंटन डिव्हिजनच्या वतीनं लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांच्या हस्ते मला एक खास करंडक देण्यात आला. आता मला कुपवाड्याहूनही बोलावणं आलं आहे. अरुणाचल प्रदेशातूनही बोलावणं आहे. मी त्यांना थोडासा जरी मायेचा दिलासा देऊ शकले, थोडं जरी समाधान देऊ शकले तरी ते खूप आहे माझ्यासाठी. यंदाच्या 'डिफेन्स न्यूज'च्या अंकात 'लक्ष्य फाऊंडेशन'बद्दलचा लेख छापून आला आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर संस्थेच्या कामाची नोंद घेतली जात आहे.
भविष्यात योजना म्हणजे माझ्या मनात एक खूप मोठी योजना आहे. जसा 'हॉल ऑफ फेम' आहे, तसं मला एक शौर्यभवन बांधायचं आहे. मला माहीत नाही मला जमेल की नाही ते. मी साधी बाई आहे. माझ्याजवळ संपत्ती, प्रसिद्धी, पैसा, सत्ता, पक्ष असं काही नाही. लोकांकडच्या थेंबाथेंबांनी काही साध्य झालं तर बघूयात. माझं स्वप्न आहे की, आजच्या काळात मॉल, सिनेमा थिएटर आणि पबमध्ये निरुद्देश भटकणारा तरुणवर्ग अशा ठिकाणी येईल आणि म्हणेल, 'अरे, इथून काही घेण्यासारखं आहे!' आणि वीरजवानांच्या शौर्यासमोर नतमस्तक होऊन, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बाहेर पडेल. आपल्याकडे जीवनाचा वेग वाढलाय पण आपल्याला दिशाहीन होऊन चालणार नाही. भरकटलेल्या तरुणांना दिशा दाखवण्याचं काम हे एखादी सामाजिक संस्थाच करू शकते आणि तसं काम या शौर्यभवनाच्या माध्यमातून साध्य होईल, असा माझा दृढ विश्वास आहे. जय हिंद!!!
---------------------------------------० समाप्त ०-----------------------------------------
लक्ष्य फाऊंडेशन संपर्क :
श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई : भ्रमणध्वनी : ०९२२४२९८३८९.
ईमेल : lakshya.ladakh@gmail.com
संकेतस्थळ : http://www.lakshyafoundation.co.in/index.html
पुणे कार्यालय :
द्वारा श्री. रवीन्द्र कंग्रालकर
बी - २/५, न्यू फ़्रेंड्स सोसायटी,
पौड रोड, पुणे - ४११०३८.
मुंबई कार्यालय :
द्वारा श्री. आशिष गोडबोले
सी/७, क्रिस्टल कॉलनी, सूनावाला अग्यारी मार्ग,
माहीम (पश्चिम), मुंबई ४०००१६.
फेसबुक पान : https://www.facebook.com/pages/Lakshya-Foundation/350046628401929
****************************************************************************
(लेखातील छायाचित्रे व कविता : लक्ष्य फाऊंडेशन व श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांच्या सौजन्याने व परवानगीवरून साभार)
संयुक्तातर्फे
मुलाखतकार - अरुंधती कुलकर्णी
प्रतिसाद
फार इन्स्पायरिंग कार्य आहे
फार इन्स्पायरिंग कार्य आहे लक्ष्य फाऊंडेशनचे! सलाम! मधे एक-दोनदा याबद्दल वाचले होते पण एवढे सविस्तर माहित नव्हते.
संपादक मंडळ, संयुक्ता आणि अरुंधती कुलकर्णींचे मनापासून आभार.
मला 'लक्ष्य'बरोबर मिशन लडाखला जायला नक्की आवडेल.
चांगली माहिती. चांगली
चांगली माहिती.
चांगली मुलाखत.
धन्यवाद.
चांगली माहिती. फार
चांगली माहिती. फार इन्स्पायरिंग कार्य आहे लक्ष्य फाऊंडेशनचे!+१
फार छान वाटल मुलाखत वाचून
फार छान वाटल मुलाखत वाचून .
ऊत्तम काम करत आहे लक्ष्य फाउंडेशन .
अरुंधती कुलकर्णींचे
मनापासून आभार.
मला 'लक्ष्य'बरोबर मिशन
लडाखला जायला नक्की आवडेल.>>>>>+ 11111
अरुंधती, मस्त जमली आहे
अरुंधती, मस्त जमली आहे मुलाखत.
छान, प्रेरणादायी मुलाखत, अकु!
छान, प्रेरणादायी मुलाखत, अकु!
प्रचंड प्रेरणादायी कार्य आहे
प्रचंड प्रेरणादायी कार्य आहे हे.
सर्व जवानांना कडक सॅल्यूट .
श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांनाही सलामच.
अकु - खूप मस्त मुलाखत... मनापासून आभार.
अतिशय प्रेरणादायी परिचय.
अतिशय प्रेरणादायी परिचय. धन्यवाद.
छान मुलाखत आणी प्रेरणादायी
छान मुलाखत आणी प्रेरणादायी काम.
छान मुलाखत घेतलीस ग
छान मुलाखत घेतलीस ग अरुंधती!
अनुराधाताइंच्या कामाला सलाम.
आवर्जुन वाचावी अशी
आवर्जुन वाचावी अशी मुलाखत.
अकुचे प्रश्ण आणि अनुराधाताईंची सविस्तर उत्तरे दोन्ही आवडले.
धन्यवाद अरुंधती :)
'झी चोवीस तास'वर प्रसारित झालेली मुलाखत पण ऐकण्या सारखी आहे.
खुपच छान मुलाखत
खुपच छान मुलाखत घेतलीस...
हॅट्स ऑफ टू अनुराधा प्रभुदेसाई...
सुंदर मुलाखत! अनुराधाताईंना
सुंदर मुलाखत! अनुराधाताईंना आणि लक्ष्यला सलाम!
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण जेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करत असतो, गोडाधोडाचं खात असतो, फटाके - रोषणाई करत असतो तेव्हा आपले सैनिक सीमाप्रांतांत डोळ्यांत तेल घालून आपल्या भूमीचं रक्षण करत असतात>>>>>आपल्या वीर जवानांचे तर आम्ही आजीवन ऋणी आहोत. आज आम्ही जे सुखात आहोत ते केवळ या जवानामुळेच.
हे सर्व वाचूनच भारावून गेलो.
हे सर्व वाचूनच भारावून गेलो. तुमच्या लक्ष मधे शामिल व्हायला नक्कीच आवडेल.
खूपच छान मुलाखत!
खूपच छान मुलाखत!
प्रेरणादायी परिचय.
प्रेरणादायी परिचय.
एकदम सुरेख झाली आहे मुलाखत.
एकदम सुरेख झाली आहे मुलाखत. भारावून गेले.
अनुराधाताई..अवाक झाले हे सर्व
अनुराधाताई..अवाक झाले हे सर्व वाचून.आभार अंकु.
छान मुलाखत !!!!!!!!
छान मुलाखत !!!!!!!!
अतिशय सुरेख मुलाखत!
अतिशय सुरेख मुलाखत!
नमस्कार अरुंधती, अप्रतिम
नमस्कार अरुंधती,
अप्रतिम मुलाखत आहे. आणि अनुराधाताईंचं कार्य तर महाप्रचंड प्रेरणादायी आहे. जेव्हा एक जवान/अधिकारी शौर्य गाजवता गाजवता धारातीर्थी पडतो तेव्हा आपलं जे नुकसान होतं ते कुठल्याही मापाने मोजता येणारं नसतं. लक्ष्यचं कार्य म्हणजे या असीम त्यागाला केलेलं विनम्र अभिवादन आहे. आपल्या जवानांनी हे शौर्य आपल्यासाठी दाखवलेलं आहे. या शौर्याचा आणि त्यागाचा लाभ आपल्या पदरी आपसूक पडतच असतो. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते. म्हणूनच तो घेण्याइतकी आपली पात्रता असायला हवी.
लक्ष्यच्या कार्यातून आपल्याला पात्रता वाढवण्याची प्रेरणा मिळाली तरी पुष्कळ आहे.
जयहिंद!
आ.न.,
-गा.पै.