डॉ. एडवर्ड जेन्नर - वैद्यकीय शास्त्रातील एका नव्या युगाचा उद्गाता

(In science, credit goes to the man who convinces the world, not the man to whom the idea first occurs. —FRANCIS GALTON)

१४ मे १७९६ हा दिवस इंग्लंडमध्ये नेहमीसारखाच उजाडला. पण बर्कले गावातील डॉ. एडवर्डकरता मात्र तो अतिशय विशेष दिवस होता. त्यामुळेच की काय पण आदल्या रात्री एडवर्डला शांत झोपही लागली नव्हती. तरीही ठरल्याप्रमाणे आज त्याला 'तो' प्रयोग प्रत्यक्ष करून पाहायचाच होता - तोही एका मानवावर - जेम्स फिफ्सवर.

जेम्स फिफ्सचे वडील एडवर्डकडे माळीकाम करणारे. त्यांचा मुलगा जेम्स साधारण आठ वर्षे वयाचा. जेम्सच्या वडिलांना जरी डॉ. एडवर्डने खूप समजावले होते की, यात जेम्सला काहीही हानी पोहोचणार नाही, तरी जेम्सच्या हातावर काऊपॉक्सचा द्रव टोचायचा या कल्पनेने डॉ. एडवर्डच्या मनाशी जराशी चलबिचलच होत होती. एका मनात संशयाची पाल चुकचुकत होती, तर दुसरीकडे 'प्रत्यक्ष कृती' साद घालत होती.

सारा नेल्म्स ही गवळण (मिल्कमेड) ठरल्याप्रमाणे एडवर्डच्या घरात दाखल झाली. साराच्या हातावर काऊपॉक्सचा (गायींना होणारा देवीसदृश आजार) एक फोड होता. तिच्या हातावरचा तो फोडच एडवर्डच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. त्याने जेम्स आणि त्याच्या वडिलांना बोलावणे धाडले. जेम्स जेव्हा समोर आला तेव्हा एडवर्डने दीर्घ श्वास घेऊन स्वतःशी जणू एक निश्चयच केला. साराच्या फोडातील द्रव एडवर्डने हळूच काढून जेम्सच्या उजव्या आणि डाव्या हातावर किंचित जखम करून त्यावर घासला. थोडासा रडवेला झालेला जेम्स खाऊ दिल्यानंतर तिथून नेहमीप्रमाणे उड्या मारत मारत खेळायला निघून गेला.

जेम्सच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताना सहजच एडवर्डला त्याचे बालपण नजरेसमोर तरळून गेले. त्याची आठ भावंडे, त्याचे आईवडील... एडवर्डच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे झालेले निधन...

एडवर्डचे वडील रेव्हरंड स्टीफन जेन्नर हे सतत चर्चच्या कामात गुंतलेले. त्यांना जी नऊ अपत्ये झाली, त्यात एडवर्ड हा आठवा. वडिलांचे सर्व मुलांबाबत शिक्षणाचे कडक धोरण होते. सर्वांनी शिकले पाहिजेच, असा त्यांचा दंडकच.

लहानपणापासूनच एडवर्डचा ओढा वैद्यकीय क्षेत्राकडे जास्त होता. त्या जोडीला आसपासचे निसर्गजीवन व फॉसिल्सबद्दलही त्याला फार आवड होती. वयाच्या चौदाव्या वर्षीच तो बर्कले येथील एका स्थानिक डॉक्टरकडे (डॅनियल लडलॉ) शिकाऊ डॉक्टर म्हणून जाऊ लागला. तिथे सात वर्षे शिकल्यानंतर तो पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी लंडन येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिथे त्याला भेटले डॉ. जॉन हंटर. त्यांच्या विचारांनी एडवर्ड चांगलाच प्रभावित झाला. 'नुसता विचार उपयोगाचा नाही. त्या विचारानुसार प्रत्यक्ष कृती, प्रयोग हा फार महत्त्वाचा', हा एक मंत्रच जणू त्याला गवसला.

वयाच्या चोविसाव्या वर्षी (१७७३) एडवर्ड एक डॉक्टर म्हणून बर्कले येथे परतला. लवकरच तो एक नामवंत फॅमिली डॉक्टर व निष्णात सर्जन म्हणून ओळखला जाऊ लागला. डॉ. एडवर्डचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सतत काही नवनवीन करू इच्छित होता. त्याने आसपासच्या वैद्यकीय मित्रांना एकत्र घेऊन एक छोटासा गट निर्माण केला. सगळे दोस्त मिळून एकत्र जेवण करीत व वैद्यकीय माहितीवर चर्चाही करीत, काही वैद्यकीय शोधनिबंधांचे वाचनही करीत. डॉ. एडवर्डने त्यात अंजायना पेक्टोरिस, ऑपथाल्मिया यावरील काही शोधनिबंधांचे सादरीकरण केले होते. पण हे करत असताना त्याला आसपास देवी (स्मॉलपॉक्स) या आजाराने जे थैमान घातले होते, ते फार डाचत होते. याला आळा कसा घालावा, याला काही औषध योजना करता येईल का, याचा तो सगळ्यांत जास्त विचार करत होता.

त्या काळात देवी (स्मॉलपॉक्स) हा नुसता शब्द जरी कानावर आला तरी सगळ्यांची पार घाबरगुंडी उडत असे. देवी हा संसर्गजन्य (कंटेजिअस) साथीचा रोग (एपिडेमिक). एकदा साथ आली की अशी काही पसरायची की बस्स. जेव्हा देवी येत तेव्हा जोरदार तापाबरोबरच त्याचे फोड सर्व अंगभर पसरत. या फोडामुळे एखाद्याचा डोळाही जात असे, पण सुदैवाने जीवतर वाचत असे. पण अनेक दुर्दैवी लोकांचा जीवही जात असे. (फक्त युरोपमध्येच एका वर्षात चार लाख लोक या आजाराने मरत होते.) जो कोणी यातून बरा होत असे त्याला ते देवीचे व्रण जन्मभर अंगावर बाळगावे लागायचे. दळणवळणाची साधने वाढल्यामुळे सगळ्या जगभर या देवीचा फैलाव झालेला होता. या सर्व गोष्टी पाहता डॉ. एडवर्डचे या देवीकडे विशेष लक्ष होते.

१७८८मध्ये डॉ. एडवर्ड विवाहबद्ध झाला तेही गमतीशीर पद्धतीनेच - त्या काळात प्रयोगाकरता म्हणून काही फुगे आकाशात सोडले जायचे. डॉ. एडवर्डने सोडलेला एक फुगा नेमका उतरला तो अँथनी किंग्जकोट यांच्या बागेत. तो फुगा आणण्याकरता गेलेल्या डॉक्टरांना भेटली अँथनीसाहेबांची सुस्वरूप कन्या कॅथरीन आणि मग पुढे तिच्याबरोबरच डॉ. एडवर्डची जन्मगाठ बांधली गेली.

१७९२ला जरी डॉ. एडवर्डना मानाची एम. डी. (से. अँड्रूज विद्यापीठ) पदवी मिळाली तरी देवीबद्दलचे कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतेच.

देवीपासून बचाव व्हावा यासाठी डॉ. एडवर्डच्या आधीही अनेकजण प्रयत्न करीतच होते.

१७२१ - इस्तंबूलमध्ये असलेल्या ब्रिटिश अँबेसेडरची पत्नी लेडी मेरी वर्टले माँटे हिने व्हेरिओलेशनची पद्धत ब्रिटनमध्ये आणली. व्हेरिओलेशनची पद्धत ही पूर्णपणे सुरक्षित नव्हती व त्यात देवी होण्याचीच शक्यता होती.

१७६५ - डॉ. जॉन फ्यूस्टरनेतर लंडन मेडिकल सोसायटीत एक शोधनिबंध सादर केला होता ज्यात काऊपॉक्समुळे देवीला प्रतिबंध करता येऊ शकेल, असे म्हटले होते. पण पुढे त्याचा पाठपुरावा नीट न केल्यामुळे त्यात फार प्रगती झाली नाही.

१७७०पर्यंत किमान पाच जणांनी काऊपॉक्सची लस ही देवीचा प्रतिबंध करण्यासाठी यशस्वीरीत्या वापरली होती. त्यातील जेस्टी या शेतकर्‍याने आपली बायको व दोन मुले यांना अशा प्रकारे काऊ पॉक्स टोचून १७७४च्या देवीच्या साथीमध्ये वाचवलेही होते.

पण डॉ. एडवर्डने ज्या प्रकारे हे लसीकरण संपूर्णतः यशस्वी आहे हे समजावले व सर्व जगभर याचा प्रसार केला त्याला खरोखरच तोड नाही.

जेस्टीच्या या प्रयोगाची डॉ. एडवर्डला पूर्ण माहिती होतीच. तसेच त्याच्याकडे येणार्‍या सारा नेल्म्समुळे त्याला हे पक्के माहीत झाले होते की, ज्या कोणाला काऊ पॉक्स होतो त्यांना कधीही देवी होत नाही - अगदी देवीची जोरदार साथ आली तरीही. याकरता त्याने अशा लोकांची कसून तपासणी करून एक यादीच करून ठेवली होती. हेच त्याचे मुख्य गृहीतक होते.

काऊ पॉक्स हा गायींचा आजार. त्यात गायींच्या अंगावर देवीसारखेच फोड येत. जी मंडळी (गवळी वगैरे) अशा गायी हाताळत, सांभाळत त्यांना हा काऊपॉक्सचा प्रसाद मिळत असे. यात जरासा ताप येऊन फक्त हातावर वगैरे किरकोळ फोड येत. हे फोड व देवीचे फोड यात कमालीचे साम्य होते. ज्यांना हा काऊपॉक्सचा प्रसाद मिळत असे त्यांना नंतर कधीही देवी होत नसे.

...आणि याची खात्री करून घेण्यासाठीच डॉ. एडवर्डने जेम्स फीफ्सला १४ मे १७९६ रोजी काऊपॉक्स मुद्दामून टोचले होते. दररोज तो जेम्सची तब्येत तपासत असे. नंतर जेम्सला थोडासा ताप आला होता - जे डॉ. एडवर्डने नीट नोंदवून ठेवले. पुढे जेम्स व्यवस्थित होता, त्याला कुठलाही देवीसदृश आजार झाला नाही. तरी जवळजवळ दोन महिने डॉ. एडवर्ड थांबला. आपल्या शरीरात काही घडामोडी होतात, जेणेकरून आपल्याला रोगप्रतिबंध करण्याची शक्ती मिळते, हे त्याचे योग्य अनुमान होते.

आता पुढे मात्र खरोखरच सत्त्वपरीक्षा होती. जेम्सच्या अंगात ही रोगप्रतिबंधक शक्ती आली आहे की नाही, हे पडताळून पाहायचे होते. डॉ. एडवर्डच्या प्रयोगाची ती सर्वांत महत्त्वाची बाब होती. सध्यासारख्या क्लिनिकल ट्रायल तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. डॉ. एडवर्डने मग एका देवी झालेल्या रुग्णाच्या फोडातील द्रव जेम्सला टोचला (जुलै १७९६ - चॅलेंज टेस्ट). जेम्सला देवी झाल्या असत्या तर डॉ. एडवर्डची नाचक्की ठरलेलीच होती, पण विनाकारण एखाद्याचा जीव घ्यायचा, इतका तो मोठा गुन्हाही ठरला असता. पण डॉ. एडवर्डचे अचूक निरीक्षण आणि त्यातून आलेला कमालीचा आत्मविश्वास हे इथे उपयोगी आले. तसेच त्याच्या गुरुने (डॉ. हंटर) सांगितलेला 'नुसता विचार नको, प्रत्यक्ष कृती करा', हा मंत्रही त्याने शब्दशः खरा केला.

जेम्स फीफ्सला देवीच्या फोडातील द्रव टोचूनही देवीची लागण झाली नाही - डॉ. एडवर्डला कल्पना असेल की नाही समजत नाही, पण त्याने वैद्यकशास्त्रातील एक नव्या दालनाचे दारच जणू उघडून दिले होते.

आपल्या शरीरात एखाद्या रोगाचे जंतू / विषाणू वा जंतूनिर्मित टॉक्झिन (सध्याच्या भाषेत इम्युनोजेन) अशा प्रकारे टोचायची की तो रोग तर होणार नाही, मात्र शरीर त्या रोगाला प्रतिबंधक असे काहीतरी (सध्याच्या भाषेत न्यूट्रलायझिंग अँटिबॉडिज) नक्कीच करेल, जेणेकरून तो रोग त्या व्यक्तीला होणार नाही.

व्हॅक्सिनेशन ही संज्ञादेखील डॉ. एडवर्डनेच दिली ( लॅटिन भाषेत व्हॅक्का / व्हॅक्सा म्हणजे गाय. यावरूनच व्हॅक्सिनेशन शब्द आलाय).

इम्युनॉलॉजी या शाखेचा जनक, अशी यथार्थ पदवी डॉ. एडवर्डला प्राप्त झाली आहे. त्या काळी आजसारख्या अद्ययावत प्रयोगशाळा नसताना, या लशींचे मोठे उत्पादन होईल व त्याची सर्वत्र उपलब्धता करून देता येईल अशी सुसज्ज यंत्रणा नसतानाही केवळ निरीक्षण, हिंमत व प्रचंड मेहनत या जोरावर डॉ. एडवर्डने ही लस जगाच्या कानाकोपर्‍यात जावी, याकरता जो खटाटोप केला ते पाहून कुणाचीही मान त्यापुढे आदराने व कृतज्ञतेने कायमच लवून राहील, असे हे एक महान लोकोत्तर व्यक्तिमत्त्व. त्या काळातले सूक्ष्मजीव, विषाणू यांविषयीचे अतिशय मर्यादित ज्ञान व अप्रगत तंत्रज्ञान लक्षात घेता ही गोष्ट डॉ. एडवर्डने कशी काय साध्य केली, हे आजमितीला मोठे कोडेच वाटेल. वैद्यकीय क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व असाच त्याचा उल्लेख करता येईल.

डीपीटी, बीसीजी, एम एम आर, हिपॅटायटिस बी या व अशा अनेक लशी आज उपलब्ध असून विविध प्रकारे असंख्य संशोधक नवनवीन लशींच्या निर्मितीत गुंतलेले आहेत.

१९८०च्या मे महिन्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देवी हा रोग जगातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे, असे जाहीर केले. एखाद्या रोगाचे समूळ उच्चाटन करणे हा मानवाने मिळवलेला मोठाच विजय म्हणता येईल.
अशाच प्रकारे पोलिओदेखील जगातून नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे.

यापुढे गोवर व इतरही अनेक विषाणूंचे व सूक्ष्मजीवांचे रोग अतिशय प्रभावी लशीकरणातून जगातून कायमचे नष्ट होतीलच. त्या दृष्टीने अनेकजण त्या प्रकारच्या संशोधन वा तत्सम कार्यात गुंतलेले आहेत.

आजमितीला एड्स्, लेप्रसी, हिपॅटायटिस सी व असेच इतरही अनेक महाभयानक रोग हे लसनिर्मितीकरता मोठी आव्हानेच आहेत. जरी या रोगांवर लस उपलब्ध नसली तरी भविष्यकाळात नक्कीच काही तरी प्रतिबंधात्मक उपाय निर्माण होईलच होईल, असा विश्वास जरूर वाटतो.
------------------------------------------------------
डॉ. एडवर्ड जेन्नरबाबत अजून काही -

डॉ. एडवर्ड जेन्नर - जन्म १८ मे १७४९, मृत्यू - २५ जाने. १८२३

१] १७८८मध्ये डॉ. एडवर्डला रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळाले ते मात्र एका वेगळ्याच कारणाने - कोकिळ (ककू) जातीतील पक्ष्यांचे संशोधन त्याला कारणीभूत होते.

२] सुप्रसिद्ध कॅप्टन कुकच्या पहिल्या पॅसिफिक समुद्र सफरीत मिळालेले जे अनेक स्पेसिमेन इंग्लंडला आणले होते, त्यांच्या वर्गीकरणासाठी डॉ. एडवर्डने त्याला मदत केली होती. ते सर्व पाहून कॅ. कुकने त्याच्या दुसर्‍या समुद्रसफरीसाठी डॉ. एडवर्डने यावे म्हणून गळ घातली होती - पण डॉ. एडवर्डने त्या गोष्टीला नकार देऊन देवीनिवारणाकरता पुढील सर्व वेळ देणार असल्याचे त्याला सांगितले होते.

३] जेम्स फिफ्सवर केलेल्या प्रयोगाची सर्व माहिती डॉ. एडवर्डने रॉयल सोसायटीकडे १७९७मध्ये पाठवली होती - पण ती नाकारली गेली. पुढे अजून काही लोकांवर हाच प्रयोग यशस्वीरीत्या केल्यावर त्याला थोडीफार मान्यता मिळाली.

४] An Inquiry into the Causes and Effects of the Variolae Vaccinae या नावाने एक खाजगी पुस्तिका डॉ. एडवर्डने छापली होती. त्यामुळे अनेकांना या शोधाची माहिती होऊन अनेक तत्कालीन डॉक्टरांनी याचा पुरस्कार केला.

५] डॉ. एडवर्डने गायीतील विषाणू माणसाला टोचले, हे साहजिकच त्या काळच्या काही मंडळींना बिलकुल आवडले नाही. त्यामुळे ज्या माणसाने ही लस टोचून घेतली आहे त्याला गायीचे तोंड प्राप्त झाले आहे, असे एक कार्टून त्या काळी ब्रिटनमधील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते (१८०२).

६] १८००च्या सुरुवातीस ब्रिटन - फ्रान्स युद्धात नेपोलियनने अनेक ब्रिटिश सैनिकांना युद्धकैदी म्हणून तुरुंगात टाकले होते. डॉ. एडवर्डने स्वतः नेपोलियनला त्यांना सोडून द्यावे म्हणून पत्र लिहिल्यावर खुद्द नेपोलियनने डॉ. एडवर्डचे देवीबाबतचे काम लक्षात घेऊन, डॉ. एडवर्डच्या शोधाला एक प्रकारची सलामी, या उद्देशाने त्या युद्धकैद्यांची सुटका केली होती.

७] ब्रिटनच्या चौथ्या किंग जॉर्जचा विशेष वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. एडवर्डची नेमणूक करण्यात आली होती.

८] १८०२मध्ये १०,००० पौंड व पुढे १८०७मध्ये २०,००० पौंड देऊन ब्रिटिश पार्लमेंटने डॉ. एडवर्डचा सन्मान केला होता.

९] वर उल्लेख केलेला जेस्टी काय किंवा इतरही काही संशोधक काय - काऊपॉक्सच्या फोडातील द्रव टोचल्यामुळे अशा व्यक्तींना देवीपासून संरक्षण मिळते, हे सर्वांना माहीत होतेच. पण डॉ. एडवर्डने जे पुढे जेम्सला देवीचे विषाणू टोचूनही देवी होत नाही, हे सिद्ध केले त्यात त्याची वैज्ञानिकता व त्याचे मोठेपण दिसून येते. त्यामुळेच व्हेरिओलेशनची पद्धत पूर्ण बंद होऊन डॉ. एडवर्डची व्हॅक्सिनेशनची पद्धत रूढ झाली (१८४०).

१०] जेन्नर म्युझियममध्ये सारा नेल्म्सच्या (ज्या गवळणीच्या हातावरील काऊपॉक्सचा द्रव जेम्सला टोचण्यात आला होता) लाडक्या 'ब्लॉसम' या गायीची शिंगे अजूनही जपून ठेवली आहेत.

११] देवीतून मुक्तता लाभावी म्हणून एकदाच केलेले व्हॅक्सिनेशन उपयोगी पडत नाही, हे लक्षात घेऊन सर्व जगभर १९५०-६०च्या आसपास पुन्हा ही लशीकरण मोहीम राबवली गेली.

१२] १९८०च्या मे महिन्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देवी हा रोग जगातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे, असे जाहीर केले.

१३] २००१मध्ये अमेरिकेतील ट्विन टॉवर्सवर जे दहशतवादी हल्ले झाले, त्यानंतर दहशतवाद्यांकडील जैविक हत्यार म्हणून देवी (स्मॉलपॉक्स) हा प्रथम क्रमांकावर होता. अमेरिकेने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन पुन्हा देवीच्या लशीकरता / उपाययोजनेकरता जैवशास्त्रज्ञांचे सहकार्यही घेतले होते.

----------------------------------------------------------------------

देवीबाबत भारतात -.
१] दुसरा बाजीराव हा खूपच आधुनिक विचारसरणीचा होता. देवीच्या या लशीची उपयुक्तता जाणून त्याने तत्कालीन इंग्रज डॉक्टरकडून आपल्या बायका-मुलांना ही देवीची लस टोचून घेतली होती.

२] प्रसिद्ध सिनेनट शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली हिचे देवीमुळे १९६५मध्ये निधन झाले.

३] सुप्रसिद्ध गायिका लतादीदी आणि सुप्रसिद्ध गजलगायक गुलाम अली हेदेखील लहानपणी देवीने आजारी होते. गुलाम अलींच्या चेहर्‍यावर जे खड्डे / व्रण दिसतात ते देवीचेच व्रण.

४] १९७०-८०च्या काळात महाराष्ट्रात खेडोपाडी ही पाटी सर्रास दिसून यायची - 'देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा.'
----------------------------------------------------------------------------
संदर्भसूची :

* Riedel S. Edward Jenner and the history of smallpox and vaccination. BUMC Proceedings. 2005;18:21–25.
* http://en.wikipedia.org/wiki/Edward_Jenner

- शशांक पुरंदरे

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

शशांक, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती. उजाळा मिळाला. लेख आवडला!

चांगली माहिती. धन्यवाद.

अभ्यासपूर्ण लेख! खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद !

शशांक, मौलिक माहीती. इतकं सगळं एका ठिकाणी वाचायला मिळालं नसतं :)

शशांक, आपल्या कार्यक्षेत्राबद्दलची आत्मीयता असणारी माणसे फार कमी भेटतात.. आणि मी डॉ. जेन्नर बद्दल नव्हे तर शशांक पुरंदरे बद्दल म्हणतोय.

छान लेख.
सोप्या भाषेत लिहिलाय.

खूप परिश्रमपूर्वक हा छान माहितीपूर्ण लेख आमच्यासाठी लिहिलात. धन्यवाद.

लेख आवडला. शेवटी त्याने लसीकरणाचा प्रचार-प्रसार कसा केला हे थोडे विस्ताराने आले असते तर वाचायला आवडले असते.

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनापासून आभार ....

छान माहितीपूर्ण लेख .. :)