बदल

दिनांक - १०/०७/१९७३
सुलोचना : का रे, एकदम आल्याआल्या लोळायलाच लागलास, बरं वाटत नाही का?
बंडू : आई, मला सायकल हवी आहे.
सुलोचना : बाबांना विचार.
बंडू : ते मी विचारीन, पण एकदा तू विषय तरी काढून बघ.
सरूताई : बंड्या, काय भुणभुण चाललीये आईकडे?
सुलोचना : काही नाही हो. आता कॉलेज दूर आहे ना त्याचं, जाण्यायेण्यात वेळही खूप जातो आणि दमायलाही होतं असं म्हणतोय.
सरूताई : खरं का रे बंड्या? का मित्रांनी सायकली घेतल्या म्हणून तुलापण हवीय?
बंडू : आज्जी, तू पण ना! तू म्हणतेस तेही एक कारण आहे. पण तेवढं एकच कारण नाही.
सरूताई : पण बंड्या, बळवंता नको म्हणाला तर रुसू नकोस. तुझ्या पाठोपाठ राजू पुढल्या वर्षी कॉलेजमध्ये जाईल त्याचाही विचार करायला हवा, नाही का?
सुलोचना : एखादी बस नाही का इथून जाणारी? जरा चौकशी कर. बसने जाणारी मुलंही असतीलच की!
बंडू : चौकशी करतोच आहे, पण बसचा काही भरोसा नाही असं बाजूचा गण्या म्हणत होता.
(बळवंत बाहेरून येतो.)
बळवंत : कुठे जायचंय बसने?
सुलोचना : कुठे नाही हो, आधी ती भाजीची पिशवी मला द्या, हातपाय धुऊन घ्या, तोपर्यंत मी चहा टाकते.
सरूताई : निवडायची भाजी आहे का गं? दे इकडं, मी निवडून टाकते.
सुलोचना : नको, राहू दे, मी निवडेन सावकाश! तुमचा जप राहिला असेल तर करा, म्हणजे सगळ्यांबरोबर गरमगरम जेवता येईल.
(जेवणानंतरचा संवाद)
बळवंत : बरं, कसली चर्चा चालली होती?
सुलोचना : काही नाही. बंडू म्हणत होता की कॉलेज खूप लांब पडतं..
बळवंत : अगं, पण त्याला हवं होतं तेच कॉलेज मिळालंय ना, म्हणजे त्यानी आपल्या हुशारीनं मिळवलंय ना? मग?
सुलोचना : तसं नाही हो, त्याची कॉलेजविषयी काही तक्रार नाही. पण जाण्यायेण्यात खूप वेळ जातो आणि दमायलाही होतं असं म्हणत होता.
बळवंत : मग?
सुलोचना : सायकलची काही सोय होईल का असं विचारत होता.
बळवंत : त्याला म्हणावं, एक वर्ष कळ काढ. उद्या राजूला तिथेच अ‍ॅडमिशन मिळाली तर दोघांना जाता येईल अशी एखादी सेकंडहँड सायकल बघून ठेवतो.
सुलोचना : बरं.. तसं झालं तर बरंच होईल!
हा संवाद आहे ४० वर्षांपूर्वीचा - सुस्थितीत असलेल्या कुटुंबातला!

दिनांक : १०/०७/२०१३
अँडी (खरंतर आनंद) : मॉम, मला लवकरात लवकर बाईक हवी म्हणजे हवी.
मनीषा : आज हे काय नवीन?
अँडी : मॉम, यु नो, लास्ट इयरलाच माझ्या क्लासमेट्सना टू-व्हीलर्स मिळाल्यात.
मनीषा : अरे, पण मी तुला सगळीकडे ड्रॉप करत होते ना? मग?
अँडी : मग काय मग, म्हणूनच मला ममाज बॉय असं चिडवतात.
सुलोचनाबाई : आनंदा, त्यात काय वाईट आहे?
अँडी : तू मधेमधे बोलू नकोस गं आज्जी, तुला नाही कळणार! आणि प्लीज, मला आनंदा म्हणू नकोस. मॉम, तू डॅडशी बोलतेस की मीच बोलू?
मनीषा : उद्या डॅड टूरवरून येईल, मग मीच बोलेन.
अँडी : डॅडला तुझ्याशी बोलायला वेळ मिळाला पाहिजे ना, आणि त्याचा मूड बघून बोल, नाहीतर तुझ्यामुळे माझी गाडी जाईल!

(डॅड टूरहून आल्यानंतरचा संवाद)
मनीषा : अरे, अँडीला यावर्षी बाईक घ्यायला हवी.
विवेक : बघू या.
मनीषा : अरे, बघू या काय?
विवेक : का, तो मागे लागलाय का तुझ्या?
मनीषा : प्रत्येक वेळेला त्यानं कशाला मागे लागायला हवं? आपण कधीतरी समजावून घ्यायला नको का?
विवेक : अगं पण नवीकोरी गिअरची सायकल आहे की त्याच्याकडे. ती घेऊन वर्षसुद्धा नाही झालं आणि महाशयांनी हट्ट करून आणलेली ही महागडी सायकल कितीवेळा चालवली?
मनीषा : अरे, पण आता त्याच्या सगळ्या मित्रांकडे बाईक आहे, मग त्याला वाटणारच ना! शिवाय आपल्याला काय कमी आहे? एवढे कष्ट करून आपण कोणासाठी मिळवतोय?
विवेक : चैनीसाठी!
मनीषा : तू उगाच वाकड्यात शिरू नकोस हं!
सुलोचनाबाई : काय झालं?
विवेक : काही नाही गं. हिचं नेहमीचंच - नको त्या सवयी लावायच्या, नको ते हट्ट पुरवायचे आणि नंतर डोक्याला हात लावून बसायचं!
सुलोचनाबाई : पण मागितलं की लगेच दिलंच पाहीजे का?
मनीषा : तुम्ही उगाच मधे पडू नका, चार दिवसांसाठी आलाय, आराम करा. उगाच वाद नको... आणि तुला सांगून ठेवते विवेक, तू इथे नसतोस. काही लागलं - सवरलं सगळं मलाच पहावं लागतं. आणि माझ्यासाठी मागतेय का? तुझाही मुलगा आहे ना? रोजची कटकट मला सहन करावी लागते.
विवेक : सायकलच्या वेळीही तू असाच वाद घातला होतास. आणली सायकल... काय झालं? तुला काळजी नको म्हणून, तो दमायला नको, दहावीचं वर्ष आहे म्हणून मग तूच ड्रॉप करायचीस ना?
मनीषा : मग? चूक होतं का माझं म्हणणं? चांगले मार्कं मिळवले ना त्याने, ते दिसत नाही तुम्हाला.
विवेक : पण म्हणून न मागता मोबाईल दिला की मी त्याला.
मनीषा : तो काय आजकाल लहान मुलांपासून मोलकरणींपर्यंत सगळ्यांकडे असतो!
विवेक : म्हणजे मी आणलं तर त्याचं कौतुक नाही.
मनीषा : तसं नाही रे! पण तो म्हणतोय तर घेऊया ना! आणि लोक काय म्हणतील?
विवेक : ठीक आहे. जाऊया उद्या. उगाच कटकट नको.
-----------------------------------------------

अगदी ऐकल्यासारखे वाटतात ना हे संवाद? ४० वर्षांत हे चित्र एवढं कसं बदललं? विचार करण्यासारखा विषय आहे. हल्लीची मुलं स्वकेंद्रित आहेत, स्वतःच्याच विश्वात असतात, कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहेत, वगैरे कमेंट्स बोलायला आणि ऐकायला सोप्या आहेत. (आपण तरूण होतो तेव्हा आपल्या पिढीविषयी मागची पिढी असंच बोलत असणार.) पण कुठेतरी आपण, आपला समाज याला जबाबदार आहे का हे तपासून बघणं आवश्यक आहे. या ४० वर्षांत जग झपाट्याने बदललं आहे. विज्ञान-तंत्रज्ञान रोज नवीन, वेगवान साधनं निर्माण करत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात हळूहळू माणसं नोकरी-धंद्याच्या निमित्ताने मूळ गावापासून, घरापासून दूर जाऊ लागली. माझ्या आईच्या माहेरी, सख्खे-चुलत सर्वजण एकत्र होते, भावंडांची नाती दॄढ होती. सणासुदीला, लग्नकार्यांत त्यांना क्वचितच कोणाची मदत लागे. मेहनत, खर्च, सगळं काही वाटून घेतलं जायचं. पैशाची सुबत्ता नसल्यामुळे म्हणा, घरातील ज्येष्ठ लोकांच्या उपस्थितीमुळे शिस्तीचं वातावरण असल्यामुळे असेल, शिवाय स्वावलंबन ही संकल्पना जन्मापासून पाहिल्यामुळे असेल - अगदी पाच वर्षांपासून मुलं घरकामाला मदत करत असत. घरातील आजी-आजोबा, काका-आत्यांमुळे न बोलता त्यांचं कौतुक होत असे. हळूहळू घरातील माणसं जसजशी शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडू लागली तसतशी विभक्त रहायला लागली. तरीसुद्धा सणासुदीला, घरातल्या कार्याच्या प्रसंगी सगळी हजर असत व आनंदाने सर्व कामं करत, त्यात उपकाराची भावना नव्हती, आपपरभाव नव्हता. विभक्त राहत असले तरी मनाने एकसंध होते. घरात ज्येष्ठ मंडळी होती. त्यामुळे मुलांचं संगोपन, आला-गेला, पै-पाहुण्याचे स्वागत नीट होत असे. कामाला बाई म्हणजे भांडी घासायला एखादी गरजू महिला (शक्यतो ओळखीची किंवा नात्याची) एवढीच कन्सेप्ट होती. तीही घरातली होऊन जायची. स्वयंपाकघरापर्यंत बाहेरच्यांची मजल जायची नाही. बहुतेकजण वाड्यात किंवा चाळीत राहत असत, स्वतःचे घर हवेच अशी महत्त्वाकांक्षा नव्हती. गरजा कमी होत्या, सर्वचजण काटकसरीने संसार करत, त्यामुळे त्या मुद्द्यावर मतभेद किंवा टिंगलटवाळी होत नसे. भिंती कॉमन असल्याने मर्यादा पाळाव्या लागत. एकमेकांच्या अडीअडचणी न सांगूनही समजत. एकत्र कुटुंबसंस्था संपली तरीही वाड्यातले, चाळीतले लोक मदतीला येत. एकमेकांचा मान राखायचा, मदत करायची हा अलिखित नियमच होता. घरातले वाद, मतभेद चव्हाट्यावर आणले जात नसत. याचे काही प्रमाणात तोटेही सहन करावे लागत. घराण्याचं नाव वाईट होऊ नये म्हणून काही गोष्टींवर पाणी सोडावं लागे. पण नात्याची वीण घट्ट असल्यामुळे हे सहजपणे घडत असे. आचार-विचार यांची गुंफण योग्य प्रकारे घातली जायची व जपलीही जायची. संस्कार आणि शिक्षण याला समान महत्त्व होतं. चारचौघांत शेखी मिरवायची, स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करायची अशी पद्धत नव्हती.

हळूहळू सुबत्ता वाढली, स्वातंत्र्याच्या कल्पना बदलल्या, पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण करण्यात आम्ही स्वतःला धन्य समजू लागलो. स्त्रीमुक्ती या चांगल्या संकल्पनेचा विपर्यास होऊ लागला. पैसा मिळवणे हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून प्रत्येकजण पैशाच्या मागे लागला. नीतीमत्तेने, कष्टाने किंवा शिक्षणाच्या जोरावर मिळालेला पैसा पुरे पडेना. याचे कारण, नको त्या बाबतींत एकमेकांशी स्पर्धा करायचं घातक व्यसन माणसाला लागले. सुबत्तेमुळे चैन, करमणूक, दिखाऊपणा याला जास्त महत्त्व प्राप्त झाले. महागाईत हे स्टँडर्ड टिकवायचे तर आई-वडील दोघेही मिळवते असायलाच हवेत. मग मुलांना मिळणारा वेळ कमी होऊ लागला. त्यांना इतर ठिकाणी, पाळणाघरात किंवा घरातच सांभाळणार्‍या बाईबरोबर रहावे लागले. आताच्या आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या फास्ट युगात सततच्या अघोरी स्पर्धेमुळे घरी येईपर्यंत आईवडिलांचा पेशन्स संपू लागला. मग रोजची चिडचिड, वाद हेच मुलाला लहानपणापासून पहावे लागले. एकमेकांशी बरोबरी करायची, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे, कुरघोडी करायची हे पाहून मुलंही तेच शिकू लागली. आजी-आजोबांचे एकतर घरातून उच्चाटन झाले, नाहीतर जिथे ते होते तिथे त्यांचे महत्त्व संपुष्टात आले. त्यामुळे घरातील ज्येष्ठांना, आई-वडिलांना मान द्यायला पाहिजे ही रीतही संपली. खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी खर्‍या मैत्रीला तिलांजली दिली गेली. सख्ख्या नात्यांमधेही औपचारिकता आली. त्यातही स्पर्धा, तुलना याचे प्रमाण वाढले.

आता मला सांगा, स्वतः तासन् तास टीव्ही पाहणारी आई मुलांना कशी सांगू शकणार त्याचे दुष्परिणाम? आणि समजा तिने सांगितलेच तर मुलांना कसे पटणार? मग तुम्ही म्हणणार, हल्लीची मुलं ऐकत नाहीत, आगाऊ आहेत, दुरुत्तर करतात. हेच व्यसनांच्या बाबतीत - वडिलांना एक नियम आणि मुलाला दुसरा असे कसे असू शकते? आणि हे कळायचं त्या मुलाचं वय किंवा परिपक्वता आहे का? आज अनेकजण तक्रार करतात की मुलं बिघडली, खोटं बोलतात किंवा घरी काही सांगत नाहीत. आपण कधी विचार केलाय का की सुरुवातीपासून ही अशी होती का? मग आताच असं का व्हायला लागलं? पूर्वी आपण त्यांच्या गोष्टी ऐकून घेत होतो. शाळेतून आल्यावर न विचारता लहान मुलं सगळं सांगत होती, आपण कौतुक करत होतो. हळूहळू आपल्याला वेळ देणं अवघड जाऊ लागलं, पेशन्स आणि इंटरेस्टही कमी झाला आणि आपण त्यांना झिडकारू लागलो, त्यांच्यावर रागावू लागलो. अशामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडलं. कधी उत्साहाच्या भरात मुलाने चुकीची केलेली गोष्टही प्रांजळपणे सांगितली आणि मग आपण त्याला समजावून सांगण्याऐवजी फैलावर घेतलं. हीच खरी वेळ होती त्याचं सर्व ऐकून घेण्याची, त्याला समजून घेण्याची आणि मग बरेवाईट समजावून सांगण्याची. पण आपल्याकडे वेळ कुठे आहे एवढा? लहानग्या राजूला वाटू लागलं की आपण आईवडिलांना तेवढे आवडत नाही किंवा आपल्या गप्पागोष्टींत त्यांना इंटरेस्ट नाही आणि मग हळूहळू तो घरी मनमोकळं बोलायचा बंद झाला. आपल्याला वाटलं, चला, मुलगा सुधारला, आपल्या धाकदपटशाचा काहीतरी फायदा झाला. पण मुलगा घरी सांगत नव्हता म्हणजे तसे करत नव्हता असे थोडेच! मग तो याच गोष्टी तुमच्याऐवजी मित्रांबरोबर शेअर करू लागला.

दुसरं टोक असं आहे की हल्ली बहुतेकांना एकच मूल... त्यामुळे सगळ्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावरच! मुलांकडे लक्ष देणे हे ज्यांचे एकमेव ध्येय आहे, त्या हात धुऊन मुलांच्या पाठीमागे लागतात. हा क्लास, ते कोचिंग, आहार, अभ्यास सगळ्यांत मायक्रोमॅनेजमेंट! इतकी की त्या मुलाचं बिचार्‍याचं डोकंच नंतर चालत नाही आणि मग त्याच्यापेक्षा कमी मार्क्स मिळवणारी स्ट्रीटस्मार्ट मुलं सहज त्याच्यापुढे जातात. मग घरी कटकट सुरू... तुझ्यासाठी आम्ही इतकी मेहनत घेतली, पैसे खर्च केले, त्याग केला, कुठे म्हणून ट्रिपला गेलो नाही, सिनेमाला गेलो नाही... अरे पण हा सगळा तुमचा चॉइस होता. मुलाने कुठे हे सगळं करायला सांगितलं होतं! मुलाच्या एखाद्या अपयशामुळे आईवडील सुतकात असल्यासारखे तोंड करून मुलाला इतकं गिल्टी फील करवतात की त्याचा उरलासुरला आत्मविश्वासही खलास होतो.

या सगळ्यामुळे आईवडिलांपासून मुलं मनाने दूर जाऊ लागतात आणि एक दिवस इतकी दूर जातात की त्यांना समजून घेण्यासाठी काउन्सेलरची गरज पडते. काउन्सेलर काय करतो? मुलाला बोलायला, व्यक्त व्हायला वेळ देतो आणि मग त्रयस्थपणे, डिटॅच होऊन परिस्थितीचा विचार करतो. सल्ला देण्याआधी मुलाच्या मनाची अवस्था सकारात्मक आहे की नाही हे पाहतो. आपण आईवडील हे का करू शकत नाही? एकतर आपला अहंकार जिकडेतिकडे आडवा येतो, दुसरं म्हणजे आपल्याला पेशन्स नसतो. (सगळं इन्स्टंट हवं असतं.) आणि हे काय चाललंय, याचं भानच नसतं (अवेअरनेस नसतो.) चूक झालेली करेक्ट करण्याची घाई असते. पण मुलं ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतील तर आपण कितीही मोलाचा सल्ला दिला तरी तो व्यर्थ ठरतो. या सगळ्याला आपण जनरेशन गॅप असं सोज्वळ नाव देऊन मोकळे होतो आणि हे सगळं नॉर्मलच आहे असं स्वत:ला आणि इतरांना समजावतो.

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला काळजी नको म्हणून, (आणि मुलाचा हट्ट किंवा हल्लीचा ट्रेंड म्हणून) आपण मुलाला स्वतंत्र मोबाइल देतो! या असल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी हाताळायला मुलं मात्र एकदम स्मार्ट आणि फास्ट झाली आहेत. पालक मात्र मुलाला जरा उशीर झाला की येरझार्‍या घालत मोबाइलवर कॉल करा, नाही उचलला किंवा आउट ऑफ रेंज लागला की 'कुठे गेला हा? मला न सांगता कुठेकुठे जातो...' काळजीचे रुपांतर शंकाकुशंकांमध्ये, त्याचे रुपांतर अविश्वासात आणि मग रागात! काळजी करणे ठीक आहे, पण किती इंपेशन्ट व्हायला लागलोय आपण! आपले आईवडील काळजी करत नव्हते का आपली? पण म्हणून एवढी अधीरता, एवढा अविश्वास! काळ बदलला, आता पूर्वीपेक्षा ट्रॅफिक वाढला, धोके वाढले, गुंडगिरी वाढली... सगळं खरं आहे, पण हे प्रत्येक नवीन पिढीच्यावेळी असंच असणार. कधीकधी आपण गावाला जाऊन परत येईपर्यंत आपलं पोहोचल्याचं पत्रं देखील पोहोचत नसे म्हणून शोधायला कुणी आल्याचं आठवत नाही. पूर्वी विचार करण्याची पद्धत सकारात्मक होती. आता टेक्नॉलॉजीबरोबर माणसाची अधीरता, नकारात्मक वृत्ती वाढायला लागलीय की काय अशी शंका येऊ लागली आहे. थोड्याथोड्या गोष्टींसाठी आपण यंत्राचे गुलाम व्हायला लागलो आहोत. कोणासाठी थांबायची आपली तयारी नाही, कोणावर विश्वास नाही. आपल्या या पिढीची अवस्था मधल्या माकडासारखी झाली आहे. ना घर का ना घाट का! मागच्या पिढीएवढं कणखर, ठाम राहता येत नाही आणि पुढच्या पिढीएवढं फास्ट आणि प्रॅक्टिकल होता येत नाही. मागच्या पिढीएवढी शारीरिक, मानसिक क्षमता आपल्यात नाही आणि सहनशक्ती नाही. यावर आपणच तोडगा काढायला हवा. मागच्यांच्या शिस्तीची पुढच्यांच्या स्वातंत्र्याशी नाळ जोडता आली पाहिजे. प्रेमाचा आणि विश्वासाचा भक्कम आधार पुढच्या पिढीला देता आला पाहिजे. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना समजून घेतल्या पाहिजेत. सदैव आपल्या काळातील उदाहरणांशी तुलना करणं टाळलं पाहिजे. जग फार झपाट्याने बदललंय, आपण स्वतःला वेळीच बदलणं शहाणपणाचं आहे. नाहीतर ही सो-कॉल्ड जनरेशन गॅप वाढतच राहील.

- अभिश्रुती

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

लेख अजिबात पटला नाही.

एकांगी लेख वाटला.. नविन ते सगळंच वाईट अशा अर्थाचा. त्यामुळे पटला नाही.

नाही पटला. बराचसा टिपिकल आणि एकांगे लेख आहे. हे असे लेख बर्‍याचदा "मध्यमवर्गीय मानसिकता" धरून त्याच्या आसपास लिहिलेले असतात. त्याच्याहूनही भिन्न वेगळं आणी भलंमोठं जग आहे अजून. लेखामधे सधन कुटूम्बाच्याच समस्या घेऊन त्यावर चर्चा केली आहे, शिवाय काही कॉन्क्रीट सोल्युशन्स तर दिलेलीच नाहीत.

लेख थोडा एकांगी झाला.... नोकरी करण्यासाठी घर किंवा देश सोडल्याने हातात पैसा आला, तो स्वतःचे निर्णय घ्यायाला स्वतंत्र झाला, स्वतःची लायकी दाखवयाला मोकळा झाला, उगाचच गावात किंवा एकत्र कुटुंबात राहुन हे शक्य झालं नसतं.... आताच्या काळात गावातही एकत्र कुटूंब टिकत नाहीत.

नंदिनी +१
शिवाय यात गेल्या काही वर्षांतले बदल असा विषय दिसतो आहे. भविष्याचा वेध कुठे आहे?

वरच्या सगळ्या प्रतिक्रियांशी सहमत. अशा टाईप्सचे लेख वाचायचा कंटाळा येतो.

पुर्ण लेख वाचवत नाहीये :( वरवर वाचला . नक्की काय म्हणायचेय लेखिकेला तेच कळत नाहीये.

लेख एकांगी नाहीच वाटत. आजकाल मध्यम वर्गीयांबरोबरच कनिष्ट वर्गीयातही आधुनिक तंत्रयुगाच्या परीणामांचे , पाश्चिमात्य आचार विचारांचे वारे जास्त दिसून येते. प्रस्तुत लेख आजच्या सर्वसाधारण वस्तुस्थितीस धरून योग्यच आहे.

बाप रे! मायबोलीकर मित्रमैत्रिणींना मी आणि मला त्यांनी आश्चर्यचकित केलेलं दिसतयं! असो. कोणाच्याही भावना दुखावायचा हेतू नाही, हे माझे ऑबझर्वेशन आहे. सग़ळ्यांना पटावं असा अजिबात आग्रह नाही. मागच्या आणि पुढच्या पिढीचे गुणही यात सांगितले आहेत असे मला वाटते. धन्यवाद गुरुकाका!

अशा टाईप्सचे लेख वाचायचा कंटाळा येतो.

>>हे माझे ऑबझर्वेशन आहे

हे ठीक आहे पण नक्की काय मेसेज द्यायचा आहे ते मात्र कळत नाहीये ..

>> मागच्या पिढीएवढं कणखर, ठाम राहता येत नाही आणि पुढच्या पिढीएवढं फास्ट आणि प्रॅक्टिकल होता येत नाही

हे तर प्रेत्येक पिढीबाबत खरं असतं ना? :) प्रत्येक पिढीला हेच वाटतं "आमच्या वेळी असं अजिबात नव्हतं" ..