उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
उठा, जागे व्हा, लक्ष्यप्राप्ती होईपर्यंत मागे वळून पाहू नका!
हे विचार जगासमोर आणणार्या स्वामी विवेकानंदांची दीडशेवी जयंती यंदाच्या वर्षी साजरी होत आहे. अवघं एकोणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या नरेद्रांचे विचार आज दीडशे वर्षांनंतरही जगावर गारूड करून आहेत.
स्वामी विवेकानंद आपलं संपूर्ण जीवन युवावृत्तीनं जगले. 'मला देश बदलण्यासाठी केवळ १०० तरुणांची गरज आहे' असं म्हणणार्या स्वामी विवेकानंदांचा युवापिढीवर गाढ विश्वास होता. तरुणांनी सद्वर्तनी, सदाचारी आणि क्रियाशील असावं, हा त्यांचा ध्यास होता. आजची तरुण पिढी जागी आहे, लक्ष्यप्राप्तीसाठी झटते आहे. परंतु निवडलेलं 'लक्ष्य' बरोबर की चूक, याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. स्वार्थाचा सुकाळ आहे, अनादर, अनास्था, अहंकार, असंवेदनशीलता या भावनाही वाढीस लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर भेकडपणाही! विचार संपवण्यासाठी व्यक्ती संपवण्याच्या वाढत्या घटना, ही अतिशय दु:खद आणि अस्वस्थ करणारी बाब आहे.
आपल्या आजूबाजूला घडणार्या अशाप्रकारच्या घटना बघून 'पुढे काय होणार?' अशी चिंता वाटते. 'तमोगुणाचा त्याग करा', हे सांगणारा नरेंद्र पुन्हा एकदा जन्माला यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार 'भूतकाळापेक्षा अधिक वैभवशाली भविष्यकाळ' निर्मिण्यासाठी भविष्याच्या अंतरंगात डोकावून पाहायलाच हवं. परिणामांचं गांभीर्य ओळखून त्यावर तोडगा काढण्यासाठी वेळीच पावलं उचलायला हवीत.
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, असा बालसुलभ प्रश्न असो, किंवा व्यवसाय निवडताना पुढील काही वर्षांत नॅनोटेक्नोलॉजी योग्य ठरेल कि बायोटेक, असे गहन प्रश्न असोत, भविष्यात हळूच डोकावून पाहण्याचा मोह कुणाला आवरला आहे? त्या नादात आपण सगळेच कल्पनेची भरारी घेत असतो.
उत्क्रांतीमध्ये हाताचा अंगठा जसा इतर चार बोटांपासून अलग झाला, तसाच पुढच्या काही पिढ्यांतच कळफलकाच्या वाढत्या वापरामुळे तो उत्क्रांत होऊन अधिक बळकट व लांब होईल की काय, अशी शंका कधी येते. तर काही वर्षांत बाळाच्या जन्मावेळी ’पेढा कि बर्फी’ हा प्रश्न गौण ठरून त्याचं उत्तर मोठेपणी त्यांनीच निवडण्याची शक्यता आपल्याला हादरवून टाकते! राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक अशी अनेक स्थित्यंतरं काळाबरोबर अपेक्षित असतात. त्याबद्दल अंदाज घेणं, आडाखे मांडणं हे केवळ स्वप्नरंजन नव्हे, तर त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी सुसज्ज होण्याचा एक प्रयत्न असतो. आपला भूतलावरचा आजवरचा प्रवास, त्यातून गाठीस आलेले अनुभव, तल्लख बुद्धिमत्ता, आणि तरल कल्पनाशक्ती यांचा असाच मेळ जमला आहे अंकातील 'वेध भविष्याचा' या विशेष विभागात.
हा अंक आपल्या हातात पडेल तोपर्यंत भारताची मंगळाच्या अभ्यासासाठी अंतराळयान पाठवण्याची तयारी पूर्ण होत आली असेल, आणि भारत काही मोजक्या देशांच्या यादीत बसायला सज्ज झाला असेल. हा प्रकल्प तडीस नेल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन! 'हे विश्वची माझे घर' हे वचन शब्दश: खरे करण्याची ही नांदीच ठरो.
वर्तमानातील तसंच भविष्यातीलही एक मोठं आव्हान जगापुढे आहे, ते म्हणजे 'आरोग्य आणि स्वास्थ्य'. नुकतीच सिरियात १४ - १५ वर्षांनंतर परत झालेली पोलिओची लागण आणि पाकिस्तानात जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मूलन स्वंयसेवकांवर झालेले हल्ले या धोक्याच्या घंटा आहेत. भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्या या पैलूविषयी असलेल्या चुकीच्या समजुती, तारतम्याचा अभाव, राजकीय अनास्था आणि अस्थिरता यांचे जगभरात गंभीर परिणाम झालेले दिसून येत आहेत.
बदलत्या जीवनपद्धतीमुळे वैद्यकशास्त्रापुढे नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रातील नवनवी संशोधनंही दिलासा देणारी आहेत. वैद्यकशास्त्राची प्रगती टप्प्याटप्प्यानं नाही, तर टापांनी होत आहे. पर्यायी उपचारपद्धती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, शारीरिक - मानसिक आरोग्याबाबत आपली वाढती समज, अशा अनेकप्रकारे आपलं पाऊल वैद्यकशास्त्रात पुढे पडत आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्याबद्दलची सजगता वाढत आहे, ही समाधानकारक बाब आहे. तंत्रज्ञानातील घडामोडींमुळे निरामय आयुष्य जगण्यासाठी ज्या घटकांवर नियंत्रण ठेवायचे, ते मोजायची सोय करणं सोपं झालं आहे. ही उपकरणं शब्दश: आपल्या मुठीत (कि मोबाईलमध्ये?) मावत आहेत, त्यामुळे ’आपलं आरोग्य आपल्या हाती’, हे सर्वार्थानं खरं ठरतंय. मायबोलीकरांचे या वैद्यकीयक्षेत्राशी निगडित अनुभव आणि अभ्यासपूर्ण माहिती रंजक स्वरूपात ’निरामय’ या विशेष विभागात वाचता येईल.
याच्या जोडीला नेहमीची लोकप्रिय कथा, कविता, लेख, व्यंग्यचित्रं ही सदरं आहेतच, शिवाय दृक्श्राव्य विभागानं अंकाला कलात्मकतेचा स्पर्श झाला आहे.
आपण सगळे ज्याची आतुरतेनं वाट पाहात होतात, तो हितगुज दिवाळी अंक २०१३ आज आपल्या हाती सोपवताना आमच्या मनात आनंद, उत्कंठा, हुरहुर अशा संमिश्र भावना आहेत. बदलत्या काळात सोहळ्यांत फरक झाले असले, तरी दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून, खुसखुशीत खमंग फराळाबरोबर ’दिवाळीअंक’ हवाच! मराठी मनांत दिवाळीअंकाचं स्थान खास जिव्हाळ्याचं आहे. सणानिमित्त आपल्या भाषेच्या साहित्यात भर घालण्याची अनोखी परंपरा आपण जपतोय, याचा आम्हांला आनंद आहे. अंक आपल्या पसंतीस उतरेल, अशी आम्हांला खात्री आहे. आपल्या आप्तेष्टांबरोबर हा आनंद वाटायला विसरू नका.
आपण आमच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिलात, वेळोवेळी उत्तेजन दिलंत, त्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार!
मोठ्या संख्येने आलेल्या वैविध्यपूर्ण साहित्यातून सर्वाना रुचेल, पटेल असे साहित्य निवडणे हे संपादक मंडळासाठी मोठे आव्हान होते.
केवळ 'मायबोली'साठी म्हणून रात्रंदिवस काम करणार्या, मदत करणार्या आमच्या सर्व खंद्या साथीदारांची ओळख श्रेयनामावलीत होईल. ही सगळी मंडळी घरची आणि हक्काची म्हणूनच केवळ त्यांचे औपचारिक आभार मानत नाही.
सर्व मायबोलीकरांना व त्यांच्या आप्तेष्टांना दिवाळीनिमित्त उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुदृढ, निरोगी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
सस्नेह,
संपादक मंडळ

प्रतिसाद
छान आहे संपादकीय!
छान आहे संपादकीय! :-)
मस्त वाटलं संपादकीय!
मस्त वाटलं संपादकीय! :-)
Sampdakeey farach chhan aahe.
Sampdakeey farach chhan aahe.
संपादकीय आवडलंच. आता अंक
संपादकीय आवडलंच. आता अंक वाचायला सुरुवात करते.
चांगलं लिहिलं आहे संपादकीय.
चांगलं लिहिलं आहे संपादकीय.
संपादकीय आवडले.
संपादकीय आवडले. :)
संपादकीय छान लिहिले आहे.
संपादकीय छान लिहिले आहे. आवडले. :)
संपादकीय कुठेही क्लिष्ट न
संपादकीय कुठेही क्लिष्ट न होता दिवाळी अंकाच्या व्यासपीठावरून वर्तमानकाळाचा आढावा अन भविष्याचा वेध घेणारे आहे.आवडले.
आवडले संपादकीय. बाकी अंक
आवडले संपादकीय. बाकी अंक वाचून प्रतिक्रिया देइनच.
वरच्या सगळ्यांनां +१
वरच्या सगळ्यांनां +१
संपादकीय आवडले.
संपादकीय आवडले.
छान संपादकीय.
छान संपादकीय.
व्वा! छान संपादकीय. आत्ता
व्वा! छान संपादकीय. आत्ता दिसला अंक. आता वाचणार सावकाशीने!
वाचनीय संपादकीय. वा. मनापासून
वाचनीय संपादकीय. वा. मनापासून अभिनंदन, मंडळाचं. तुमच्या मेहनतीला सलाम.
संपादकीय सुरेख.आता अंक
संपादकीय सुरेख.आता अंक वाचणार.
संपादकीय फार पसरट वाटलं.
संपादकीय फार पसरट वाटलं. सुरुवात भलतीच वाटली.
छान आहे संपादकीय.
छान आहे संपादकीय.
संपादकीय उत्तम आहे. आवडलं.
संपादकीय उत्तम आहे. आवडलं.
'एकूणचाळीस' ऐवजी 'एकोणचाळीस'
'एकूणचाळीस' ऐवजी 'एकोणचाळीस' अशी दुरुस्ती कराल का, संपादक?
संपादकिय सुंदर
संपादकिय सुंदर
व्वा! संपादकीय सुंदरच आहे.
व्वा! संपादकीय सुंदरच आहे. आवडलं!
'एकूणचाळीस' ऐवजी 'एकोणचाळीस'
'एकूणचाळीस' ऐवजी 'एकोणचाळीस' अशी दुरुस्ती कराल का, संपादक?>> दुरुस्ती केली आहे. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
संपादकीय छान आहे. अंक सविस्तर
संपादकीय छान आहे.
अंक सविस्तर वाचून प्रतिक्रिया देईन.
अवांतर- इस्त्रो च्या ऐवजी इस्रो असे लिहायला हवे ना? चू. भू. दे. घे.
संपादकिय सुंदर
संपादकिय सुंदर
संपादकीय सुंदरच आहे..... आता
संपादकीय सुंदरच आहे..... आता हळुहळु अंक वाचेन......
चैतन्य, योग्य तो बदल केला
चैतन्य, योग्य तो बदल केला आहे. धन्यवाद.
व्वा! काय लिहिलाय संपादकिय
व्वा! काय लिहिलाय संपादकिय ... अप्रतिम!
सुंदर अंक आहे.
सुंदर अंक आहे.
आवडलं संपादकीय...
आवडलं संपादकीय...
संपाद्कीय अप्रतिम
संपाद्कीय अप्रतिम