संवाद: वैद्य सुनिता तारकुंडे-आंबेकर

"कॉलनीचं 'सरस्वती' नाव सार्थ ठरवायला म्हणून सगळ्या सरस्वत्याच आहेत."
"सगळ्या सरस्वत्याच आहेत म्हणून तर कॉलनीचं नाव सरस्वती आहे."

ही वाक्यं आलटूनपालटून वडिलधारी मंडळी आमच्या, म्हणजे, आम्हां मुलींच्या आणि कॉलनीच्या संदर्भानं म्हणत. अर्थात ते खरंच होतं. दोनचार चुकार मुंजे सोडले तर आम्ही सगळ्या मुलीच. कॉलनीत गणपतीची वर्गणी जमा करण्यापासून ते होळीच्या बोंबा ठोकण्यापर्यंत सगळी कामं आम्हीच करत असू. दर काही वर्षांनी एक-एक बॅच शिक्षण-लग्न अशा कारणांनी बाहेर पडे आणि त्यांची जागा मागच्या फळीतल्या मुली घेत. कॉलनीत साजर्‍या होणार्‍या छोट्यामोठ्या कार्यक्रमांचं संयोजन करण्यात माझी मोठी बहीण स्वाती आणि आंबेकरांची सुनीता नेहमी आघाडीवर असत. 'टीमवर्क' कशाशी खातात आणि उपलब्ध असतील ते 'रिसोर्सेस' वापरून मोठ्यात मोठं 'टार्गेट' कसं साध्य करायचं, याचं बाळकडू मी ज्यांच्याकडून घेतलं, त्या या मुली. आज त्यांच्यातल्याच एकीची ओळख करून देताना खूप आनंद होतोय. सुनीता लहानपणापासून खूप हुशार, अभ्यासू म्हणून ओळखली जायची. खळीदार मनमोकळ्या हास्यानं समोरच्याला पटकन आपलंसं करण्याची तिची खुबी आहे. सुनीतानं वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला आणि तिच्या भेटीगाठी सुट्ट्यांपुरत्या मर्यादित झाल्या. ती आली की कुणाच्या तरी गच्चीवर मैफल जमे आणि सुनीताच्या पोतडीतून मेडिकल कॉलेजचे सुरस आणि रंजक किस्से बाहेर पडत.

बघूया, आज आपल्यासाठी सुनीताच्या पोतडीत काय आहे.

Sunita

नमस्कार सुनीता! सर्वप्रथम दिवाळीनिमित्त शुभेच्छा आणि तुझ्या सर्व व्यापांमधून आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद.

खरं तर आभार तुझेच मानायला हवेत. लहानपणीच्या रम्य विश्वात पुन्हा एकदा प्रवेश करायची संधी दिल्याबद्दल. तू ज्या आठवणींना उजाळा दिलास ना, त्या वातावरणात मी कित्येक वर्षांत फिरकलेच नव्हते. खूप मस्त वाटलं. तुम्हा सर्व वाचकांना मनापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या वाचकांना तुझी थोडक्यात ओळख करून देशील का?

गणरायास वंदन करून सुरुवात करूया. मी सुनिता तारकुंडे, पूर्वाश्रमीची सुनीता आंबेकर. मी BAMS आणि Masters in Ayurveda केलं आहे. याशिवाय मी नर्सिंगचा एक कोर्स केला आहे. मी अमेरिकेत RN (Registered Nurse) आहे. ह्युस्टनमध्ये मी आणि माझी बहीण मिळून एक छोटंसं आयुर्वेद सेंटर चालवतो. आमचं सेंटर छान चालतं. ग्राहकराजा संतुष्ट असतो. सेंटरव्यतिरिक्त मी 'केरळ आयुर्वेद' आणि 'आयुविद्या कॉलेज ऑफ अमेरिका' या दोन ठिकाणी 'फॅकल्टी' म्हणून काम करते. आठवड्यातून एकदा इथल्या चिन्मय मिशनच्या केंद्रात मोफत चिकित्सा करते.
आय अ‍ॅम व्हेरी पॅशनेट अबाऊट आयुर्वेद. आय लव व्हॉट आय डू - टचिंग लाईवज्!

vmb0kx5.jpg

ह्युस्टन आयुर्वेद सेंटरमध्ये तुम्ही कुठल्या सेवा पुरवता?

मला तुझा सेवा हा शब्द आवडला. कारण आम्ही सेवाच पुरवतो. माझा असा विश्वास आहे की इट इज अ डीव्हाईन प्रोफेशन. आयुर्वेदाच्या मोठ्या छत्रीखाली येणार्‍या जवळपास सर्व गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असतो. सध्या आम्ही नाडीपरीक्षा, आरोग्य चिकित्सा, योगासनं आणि प्राणायाम यांचे वर्ग, आयुर्वेदासंबंधित छोटे अभ्यासवर्ग, पंचकर्मादी आयुर्वेदात येणार्‍या उपचारपद्धती पुरवतो. आरोग्यासंबंधित असलेल्या तक्रारींचीच चिकित्सा किंवा उपचार करून सोडून न देता संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारण्यावर आमचा भर असतो. सेंटरमध्ये येणार्‍या सर्वांनाच त्याचं महत्त्व जाणवून देऊन ते रोजच्या आयुष्यात अंतर्भूत करण्यास मदत करणं हे आमचं खरं काम आहे, असं मी म्हणेन.

हे सेंटर इथे आल्यावर लगेच सुरू केलंस की आधी कुठला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला?

आयुर्वेदाचा वेगळा असा काही मेनस्ट्रीम अभ्यासक्रम अमेरिकेत तेव्हा उपलब्ध नव्हता. केवळ अनुभव घेण्याच्या दृष्टीनं मी नर्सिंगचा कोर्स केला. आयुर्वेद सेंटर सुरू करायच्या आधी मी जवळजवळ तीन वर्षं इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर्ड नर्स म्हणून काम केलं आहे. हे करताना मात्र मला इगो असल्याची जाणीव झाली. भारतात डॉक्टर होणं हे अतिशय प्रतिष्ठेचं समजतात. त्यामानाने नर्सिंगला तेवढं महत्त्व नाही. मी नुसती डिग्रीच घेतली असं नव्हतं तर माझी प्रॅक्टिस होती, डॉक्टर ही उपाधी नावामागे लागलेली होती. त्यामुळे अमेरिकेत आल्यावर नर्सिंगचा कोर्स करणं किंवा नंतर नर्स म्हणून काम करणं याला मनाची अजिबात तयारी नव्हती. मात्र एकदा करायला सुरुवात केल्यावर त्याबद्दल काही खेद वाटला नाही. खरं तर त्या कामाचा फायदाच झाला. वेगवेगळ्या लोकांच्या तब्येतीच्या तक्रारी आणि त्या-त्या आजारावर आयुर्वेदात असलेल्या उपचारपद्धती यांची मनाशी सतत जुळवाजुळव चालत असे. इमर्जन्सी सिचुएशन्स हाताळता येण्याचा आत्मविश्वास मला या काळातच मिळाला.

सेंटर सुरू करायची कल्पना कशी काय सुचली? सुरुवातीपासून हेच स्वरूप आहे तुमच्या व्यवसायाचं की वेळोवेळी नवनव्या सेवासुविधा तुम्ही पुरवत गेलात?

आम्ही साधारण १९९९मध्ये ह्युस्टनला आलो. त्याआधी माझी नाशिकला प्रॅक्टिस होती. सुरुवातीची १-२ वर्षं मुलं लहान, सगळं एकटीनं सांभाळायचं आणि विचारायला कुणी नाही या अवस्थेत गेली. त्या दरम्यान माहिती काढण्याचा चंग होताच. आयुर्वेद हा शब्द कधीही कुणीही ऐकला नाही, अशी अवस्था होती. त्यामुळे योगा टीचर ट्रेनिंग घेऊन योगासनं शिकवायला सुरुवात केली. आयुर्वेद शिकलेला असेल ना तर तोच तुम्हांला स्वस्थ बसू देत नाही. चांगले चालायचे योगा क्लासेस. घर सांभाळून करता येत होते. पण 'आयुर्वेद'च करायचा होता. मग काय? वेगवेगळ्या योगा स्टुडिओत जाऊन आयुर्वेदावर मोफत व्याख्यानं, परिसंवाद, वर्ग घ्यायला सुरूवात केली.

मी नर्स म्हणून काम केलं हे तर सांगितलंच. तिथे पण मी आयुर्वेदविषयक सल्ले फुकट देत असे. पण दोन वर्षांतच कंटाळा आला. त्या कामाचं ओझं वाटू लागलं. वन मॉर्निंग जस्ट वेन्ट इन अ‍ॅन्ड रिझाईन्ड! इतकं हलकं वाटलं सांगते. त्याक्षणी माझ्या आयुष्यात असलेलं आयुर्वेदाचं स्थान, त्याची खरी किंमत मला कळली. याच धडपडीच्या काळात कॅलिफोर्नियाच्या डॉ. जय (वैजयंती) आपटेंशी गाठ पडली आणि धागा मिळाला. त्या आमच्याच कॉलेजच्या (टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे) सीनियर. ह्युस्टनला त्यांना आयुर्वेदाचे कोर्सेस चालू करायचे होते. त्यांच्या मार्गदर्शनानं पहिल्या आयुर्वेद विद्यालय-आयुर्वेद सेंटर-योगा स्टुडिओचा पाया घातला गेला. गेल्या १२-१३ वर्षांत धन्वंतरीच्या कृपेनं या सेंटरची प्रगती उल्लेखनीय आहे. याचं स्वरूपही काळानुसार बदलत गेलं आहे.

i4oc2db.jpg

अमेरिकेत आयुर्वेदीय उपचारांना मान्यता आहे का? आयुर्वेदीक औषधं तुम्ही भारतातून मागवता का?

आयुर्वेदाला योगासारखी मान्यता अजून मिळालेली नाही. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
More than a decade ago it was quackery then questionable then unproven then complementary alternative medicine (CAM) and now an integrative medicine.
एक प्रदीर्घ प्रवास आयुर्वेदानं केला आहे. काही निवडक हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिशनरना शिरकाव मिळाला आहे. पण या देशात आयुर्वेद अजूनही बाल्यावस्थेत आहे.

औषधं आम्ही भारतातून मागवत नाही. FDAने बर्‍याच औषधांना मान्यता दिली आहे. त्यांचं उत्पादन अमेरिकेत होतं. आम्ही इथल्या उत्पादकांकडूनच औषधं घेतो.

स्थानिक लोकांचा प्रतिसाद कसा आहे?

आपल्याला असं वाटेल, की भारतीय लोकंच आयुर्वेदीय उपचार घेण्यास जास्त येत असतील. मलाही सुरुवात करायच्या आधी असंच वाटायचं. म्हणून मोफत व्याख्यानं, मुख्य करून देवळांमध्ये किंवा भारतीय लोक जास्त असतील अशा ठिकाणी ठेवायचे. माझ्याकडे येणार्‍यांपैकी ८०-९०% लोक श्वेतवर्णीच असतात. शेवटच्या १०-२०%मध्ये भारतीय, मेक्सिकन इत्यादी येतात. तुम्हाला विशेष वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. योगशिक्षक, मसाज थेरपिस्ट, वैद्यकक्षेत्रातील बर्‍याच जणांना आयुर्वेद शिकण्यात रस आहे.

tphdhh0.jpg

आयुर्वेद आणि योगासनं ही भारताची देणगी आहे. योगासनं अमेरिकेत भरपूर लोकप्रिय आहेत. पण आयुर्वेदीय उपचारपद्धती तेवढी प्रचलित नाही. या पार्श्वभूमीवर सुरूवात करताना तुझं ध्येय किंवा मिशन काय होतं?

या प्रश्नाचं अर्धवट उत्तर बोलण्याच्या ओघात याआधी दिलं गेलंय. योगा आणि आयुर्वेद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही एकमेकांशिवाय अधुरे आहेत. योगा इज मोअर ऑफ अ स्पिरिच्युअल सायन्स अ‍ॅन्ड आयुर्वेदा इज मोअर ऑफ फिजिकल सायन्स. आयुर्वेद योगाएवढं प्रचलित नाही ही गोष्ट मात्र खरी. याचं कारण कदाचित पुरेसे वैद्य नसणं हे असू शकतं. आयुर्वेदिक औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स खूप होत असतात. परंतु ते प्रयत्न संघटित नसल्यामुळे वैद्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचत नाहीत. इथल्या नर्सिंग बोर्डासारखं आयुर्वेदाचं कुठलंही व्यासपीठ नाही. दुर्दैवाने योगाला अजूनही लोकं व्यायामाचाच एक प्रकार समजतात. आयुर्वेदाचा आरोग्याशी संबंध असल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने उपचार घेण्यासंदर्भात 'कॉशसली' विचार केला जातो. शिवाय आयुर्वेदाचा आयुष्यात शिरकाव करून घ्यायचा म्हणजे तुमचा संपूर्ण, अगदी १००% सहभाग अपेक्षित असतो. एक गोळी एक ग्लास पाण्यासोबत घेतली की काम झालं असं नाही. पथ्य पाळणं, योगासनं करणं, पंचकर्मासारखे विधी करणं हे सगळे सोपस्कार करावे लागतात. त्यामुळे कदाचित लोकांकडून उत्साह दाखवला जात नाही.

'आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार' तसंच 'आयुर्वेदाच्या माध्यमातून सेवा' हेच माझं ध्येय म्हणता येईल. 'अन्न-वस्त्र-निवारा' गरजांची जबाबदारी नवर्‍याने उचलल्याने मला माझं ध्येय ठरवायला आणि त्या दिशेनं वाटचाल करायचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

एक भारतीय म्हणून आणि एक स्त्री म्हणून अमेरिकेत स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे काही खास फायदे-तोटे जाणवले का?

भारतीय स्त्री, भारतीय शास्त्र - फक्त देश बदलला. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी मनुष्यप्राणी - त्याची नाती - त्याच्या भावना - त्याचे आजार सारखेच असतात. त्यामुळे सुरुवातीला भाषेची अडचण वगळता अमेरिकेत लोकांशी लोकांशी संवाद साधणं अजिबात अवघड गेलं नाही. विनासायास घडत गेलं. मागं वळून बघितलं तर आश्चर्य वाटण्याइतपत. I believe in Ayurveda and I follow it myself. त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊन वेगळं काही करतोय असं वाटतंच नाही. काम वाटत नाही. आणि तसं सांगायला गेलं तर भारतीय असण्याचा, भारतात आयुर्वेदातली डिग्री घेण्याचा मला फायदाच झाला. जिथे ही संस्कृती उगम पावली तिथेच मी शिक्षण घेतल्यामुळे माझ्या कामाविषयी एक प्रकारची विश्वासार्हता निर्माण झाली. नकारात्मक किंवा दुखावणारे अनुभव खरंच आले नाहीत कधी. बाकी आमची आई नेहमी म्हणते, तू आधी मुलगी मग आई-बायको-सून आणि मग डॉक्टर आहेस. ही टेप बॅकग्राऊंडला वाजवत ठेवते. त्यामुळे संसार आणि व्यवसाय याचा समतोल राखायला मदत होते.

सेंटरचा वाढता पसारा बघता तुला व्यवस्थापनसुद्धा बघावं लागत असेल. त्याचं काही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलंस की अनुभवांतून शिकत गेलीस?

व्यवस्थापनाचं काही प्रशिक्षण घेतलं नाही. इतकी वर्ष काम केल्यानंतर माझ्या मर्यादा मला चांगल्या समजल्या आहेत. व्यवसायाच्या आकडेमोडी, नफा-तोटा, कायदेशीर बाबी इ. मध्ये मला फारशी गती नाही. त्यामुळे सतत धक्के बसतात. देवाने त्याचीपण सोय माझ्यासाठी लावून ठेवली आहे. माझे पती राजेश तारकुंडे, जे व्यवसायाने सॅप कन्सलटंट आहेत आणि माझी धाकटी बहीण संस्कृती गायकैवारी (Bachelor in Medical Technology) हे दोघं या बाजू सांभाळतात.

व्यवसायाच्या एवढ्या महत्त्वाच्या बाबी सांभाळण्यासाठी घरचंच कुणी तरी असणं ही खरंच छान गोष्ट आहे ना?

नक्कीच! माय सिस्टर हॅज सॅक्रिफाईस्ड हर करिअर टू हेल्प मी मॅनेज द सेंटर इन एव्हरी सेन्स. माझे पती आणि माझी बहीण या दोन व्यक्तींशिवाय अमेरिकेत माझं 'आयुर्वेद वैद्य' असं अस्तित्वच असू शकत नाही. आय अ‍ॅम सो ब्लेस्ड अ‍ॅन्ड लकी टू हॅव माय फॅमिली इन्व्हॉल्व्ह्ड टू धिस एक्स्टेन्ट टू फुलफिल माय ड्रिम अ‍ॅन्ड मिशन ऑफ लाईफ. सगळ्यांची खूप मदत होते. आम्ही दोघी बहिणी खूप हौशी आहोत. सगळे सणवार गौरी-गणपती, दिवाळी, पाडवा अगदी साग्रसंगीत साजरे करतो. सेंटरमध्ये येणार्‍या अभारतीय लोकांना सुद्धा आपले सण-प्रथा-पदार्थ समजावत असतो.

muqf4o3.jpg

दिवाळीनिमित्त आमच्या वाचकांना अभ्यंग स्नानाचं महत्त्व सांगशील का? घरी अभ्यंगस्नानासाठी काय सिद्धता कराव्यात?

आपले सण, तिथी, प्रथा आणि त्या वेळेस बनणारे पदार्थ या सगळ्यांचा आयुर्वेदाशी घनिष्ठ संबंध आहे. आयुर्वेदातल्या दिनचर्या आणि ऋतुचर्यांवर आधारित या सणांची आखणी आहे. त्यामुळे नीट माहिती मिळवल्याशिवाय कुठलीही प्रथा सोडून देऊ नये. नवनवीन संशोधनांनी याच प्रथा पुन्हा आपल्या आयुष्यात आणल्या जातात आणि त्यावेळी इव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस म्हणून आपण त्या अंगीकारतो. कदाचित आपली आजी पण हेच सांगायची, फक्त भाषा वेगळी होती.

आपण असं ऐकलं आहे की दिवाळीनिमित्त अभ्यंग म्हणजे तेल लावून सूर्योदयापूर्वी स्नान केलं नाही तर नरक...! आयुर्वेद सांगतो, ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठ! का? आयुर्वेदानुसार सूर्योदयापूर्वी वातदोषाचं निसर्गात आणि शरीरात आधिक्य असतं. वात म्हणजे चलन-वलनाला मदत करणारा दोष. वाताचा गुण लघु आणि रुक्ष आहे. वाढलेला वात आपल्याला 'वात' आणतो. नाही का? वातवृद्धी संधिवात, निद्रानाश, मलावरोध, अस्वस्थता, विस्मरण अशी असंख्य रुपं घेऊन आपल्याला सतावते. या वाताला काबूत ठेवण्यासाठी दिनचर्येत अभ्यंग स्नानाचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणून सूर्योदयापूर्वी उठावं, यानंतर अभ्यंग करावं. यालाच बाह्य-स्नेहन असंही म्हणतात. स्नेह या शब्दाचे दोन अर्थ आहेत - तेल किंवा तूप आणि प्रेम. म्हणजे प्रेमानं सर्वांगाला तेल लावावं. दिवाळी हा सण वाताच्या ऋतूमध्ये येतो. निसर्गातील वातवृद्धीच्या ऋतुत,वाताच्या काळात करावयाची प्रक्रिया म्हणून अभ्यंगाचं अतिशय महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार वाताच्या विरुद्ध गुणांनी वाताचे शमन होतं. तेल हे गुरू आणि स्निग्ध आहे. म्हणून अभ्यंगासाठी तीळतेलाची प्रशस्ती सांगितली आहे. पूर्ण शरीरास तिळाच्या कोमट तेलाने मसाज करावा, नंतर उटणं लावून स्नान करावं. खरंतर आधी सांगितल्याप्रमाणे अभ्यंग हा दिनचर्येचा भाग आहे. कमीत कमी प्रथा म्हणून दिवाळीत तरी नक्कीच करावा. अतिशय व्यग्र मंडळींसाठी 'शिर श्रवण पादेशु' हा शॉर्टकट सुद्धा आहे. कमीत कमी डोके, तळपाय आणि कानाला स्नेहन करावं.

We know when sperm and ovum unite, this one cell (zygote) divides and redivides, differentiating into a variety of tissue. Initially, it differentiates into three layers called ectoderm, mesoderm and endoderm. Whatdevelops from ectoderm is skin, brain and nervous system. So origin of this major control center is same as skin. Correct? So when warm oil is applied on skin, it naturally calms down all these systems in our physiology. A lot of research is done regarding massage and its connection with sleep, pain and autoimmune diseases.

एरवी करतो ते मालीश किंवा मसाज अभ्यंगापेक्षा वेगळं आहे. अभ्यंग स्नानाचा तनामनावर झालेला परिणाम दीर्घकाळ टिकतो. याची अनुभूती आम्ही रोजच आमच्या सेंटरमध्ये घेत असतो. म्हणून वाचकांनी अभ्यंग स्नान करून दिवाळी साजरी करावी अशी विनंती!

आपल्याकडे दिवाळी म्हणजे खाद्यपदार्थांची लयलूट असते. तुमच्या 'Eating Right, the Ayurvedic way' या उक्तीला अनुसरून वाचकांसाठी काही सल्ला देशील?

पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपले सणवार आणि आयुर्वेद यांची शास्त्रीय सांगड आहे. निसर्गत: जड पदार्थ पचवायची ताकद थंडीच्या ऋतूत असते. पूर्वीच्या काळी अशा पचायला जड असणार्‍या पदार्थांची लयलूट फक्त दिवाळीच्या काळातच असणार यात अतिशोयक्ती नाही. परंतु आपली सध्याची जीवनशैली बघता आपल्यापैकी अनेक जण दिवाळीव्यतिरिक्तसुद्धा जड पदार्थ नक्कीच खात असणार. यात पिझ्झा, बर्गर यांसारखे पदार्थसुद्धा आले. आपल्या पिढीतल्या कुठल्याही कुटुंबाचा विचार केला तर आठवड्यातून एकदातरी पिझ्झा किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले जातातच. त्यामुळे पचनसंस्था डळमळीत होते. म्हणून दिवाळीचे पदार्थ जरा बेतानंच खावेत. अगदी आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं तर सावकाश म्हणजे 'स-अवकाश' म्हणजे पोटात थोडी जागा ठेवून खावेत. चमचाभर तूप घातलेली डाळ-तांदळाची खिचडी हा पचायला सोपा तरी पौष्टिक असा आहार आहे. खूप जड अन्न पोटात गेले असेल त्या दिवशी आठवणीने एक वेळच्या जेवणात खिचडी अथवा तत्सम हलका आहार घ्यावा. एरवीसुद्धा शक्य झाल्यास महिन्यातून एकदातरी हलका आहार घेऊन अथवा उपवास करून पचनसंस्थेस आराम देण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आमच्या सेंटरमध्ये येणार्‍या प्रत्येक क्लायंटला ही खिचडी आणि हर्बल टी देतो. आमची खिचडी एवढी लोकप्रिय झाली आहे की केवळ खिचडी खाण्यासाठी म्हणून येणारे सुद्धा लोकं आहेत.

3o3kdyh.jpg

आता तुम्ही स्वतःच्या नवीन जागेत सेंटर थाटलं आहे. या वळणावर आजवर केलेल्या प्रवासाविषयी तुझ्या काय भावना आहेत? ध्येय गाठलं असे वाटते का?

यंदा दसर्‍याच्या मुहुर्तावर आम्ही आमच्या स्वतःच्या जागेत आमचं नवीन सेंटर सुरू केलं आहे. या नवीन ठिकाणी आम्हाला योगा क्लासेस, कुकिंग क्लासेस आणि पंचकर्म एकाच ठिकाणी करण्याची सुविधा मिळाली आहे. त्यामुळे अगदी उत्सुकतेनं आम्ही दसरा आणि दिवाळीची वाट बघत आहोत. एक टप्पा पार केल्याचे समाधान आहेच. पण अजून खूप काम बाकी आहे. वाटचाल सुरूच राहील. मेडिकल कम्युनिटीमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. प्रत्यक्ष जीवनात वापरल्याने, त्याचा उपयोग होत असल्यानेच आजपर्यंत आयुर्वेद जिवंत आहे.
Woods are lovely dark and deep, I have miles to go before I sleep, miles to go before I sleep!

पाठ्यपुस्तकांतून किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमातून मिळवलेल्या ज्ञानाखेरीज आणखी कशाचा उपयोग तुला या वाटचालीत झाला? कुणाचे खास मार्गदर्शन किंवा साहाय्य मिळाले का?

आयुर्वेद हे आयुष्याचे विज्ञान आहे. प्रत्यक्ष जीवनातूनच त्यातील सिद्धांतांची उकल होत जाते. जगताजगता आपण शिकत जातो. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून शिकलेल्या पायावरच ही विचारांची इमारत उभी आहे. अनेक शिक्षकांचा यात मोलाचा वाटा आहे. धन्वंतरीच्या कृपेनं हाताला गूण आहे. नर्सिंगचाही खूप उपयोग होतो आहे. मागं वळून बघितल्यास जाणवतं की नर्सिंगच्या ज्ञानानं माझं व्यक्तिमत्त्व अमेरिकेत आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्यात घडवलं. अगदी नावंच घ्यायची झाली तर पुण्यातले य. गो. जोशी, समीर जमदग्नी आणि नाशिकचे दिनकर केळकर सर यांच्या मार्गदर्शनाने विचारांची दिशा ठरत गेली.

याव्यतिरिक्त अर्थातच माझे वडील, श्री. विनायक आंबेकर. बाबा खूप उत्साही, उद्योगी तरी शिस्तप्रिय आहेत. वेळ काटेकोर पाळणं, सतत उद्योगमग्न राहणं हे गूण मी त्यांच्याकडूनच घेतलेत. आता या वयातसुद्धा ते सतत काहीतरी करत असतात. माझ्यासाठी बाबा म्हणजे 'इन्स्पिरेशन' आहेत कायमच.

मी आधी म्हटलं तसं, कॉलनीतल्या लहानमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन-संयोजन करणं, विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम बसवणं अशा कामांमध्ये तुझा भरपूर सहभाग असायचा. त्या सगळ्या अनुभवांचा काही सकारात्मक परिणाम तुझ्या व्यक्तिमत्त्वावर किंवा पुढील आयुष्यावर झाला असं तुला वाटतं का?

नक्कीच फायदा झाला. वेगवेगळ्या वयाच्या मुलींना अनेक गोष्टी शिकवल्या होत्या, त्याचा जणू विसरच पडला होता. तू आठवण करून दिलीस तेव्हा त्याचा उगम लक्षात येतोय. आतासुद्धा आमच्या सेंटरमध्ये ८८ वर्षांच्या वृद्धांपासून काही दिवसांच्या बाळांपर्यंत क्लायंट्स येत असतात. स्टाफ म्हणूनसुद्धा २० वर्षांपासून ६५-७० वर्षांपर्यंत काम करणारे लोक आहेत. या सगळ्यांशी जुळवून घेणं, आपल्या ध्येयात सामील करून घेणं, प्रसंगी माघार घेणं या सगळ्या गोष्टी पूर्वी केल्यामुळेच की काय आता सुकर झाल्या आहेत. We are product of our past, isn't it?

b2e4bg4.jpg

आयुर्वेदाकडे लोकांनी का वळावं असं तुला वाटतं? आयुर्वेदाविषयी शंका घेणार्‍या लोकांना काय प्रत्युत्तर देशील?

आयुर्वेदात आहार-विहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंटवर खूप भर आहे. आजारी पडून मग तात्पुरते उपचार घेण्यापेक्षा आरोग्यदायी सवयी जोपासून अनारोग्य टाळणं हा आयुर्वेदाचा पाया आहे. आयुर्वेद म्हणजे जणू जन्मलेल्या प्रत्येक जीवासाठी 'यूजर्स मॅनुअल' किंवा 'How to lead a healthy life on planet earth' गाइड आहे. आयुर्वेद म्हणजे आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे जेणेकरून पुढे जाऊन आजारपणावर वेळ, शक्ती आणि संपत्ती खर्च होऊ नये. आयुर्वेदीय उपचारांची योजना अशी असते की केवळ रोगाची बाह्यलक्षणं नाहीशी न होता रोगाचं समूळ उच्चाटन व्हावं. आयुर्वेदिक औषधं ही सहसा नैसर्गिक घटकांपासून बनवलेली असतात. कित्येक घटक (उदा., सुंठ) हे आपल्या रोजच्या आहारात असल्याने शरीरास त्याची ओळख असते. नैसर्गिक घटक आणि कमीत कमी प्रक्रिया केल्याने त्यांचे साइड इफेक्ट्स कमी होतात तर इफेक्टिव्हनेस वाढतो.

आयुर्वेदाला भारतातच काय पण अमेरिकेतसुद्धा उज्ज्वल भविष्य आहे यात शंकाच नाही. It's like coming full circle. सगळ्या गोष्टी चाखल्यावर, अनुभवल्यावर, अती झाल्यावर आपल्याला वरण-भाताची गोडी काही औरच असते, नाही का? त्याची सात्त्विकता, संपूर्णता, समाधान शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे. हे वैदिक ज्ञान गंगेसारखं पवित्र आहे. ५००० वर्ष जिवंत असणं आणि २१व्या शतकातसुद्धा वापरलं जाणं यापेक्षा आणखी पुरावा काय हवा? नवीन वैद्यांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवावा. धरसोड करू नये. सतत विचारमंथन सुरू ठेवावं. व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता विचारांच्याच बैठकीतून येते. नवीन पिढीला सप्रेम शुभेच्छा!!

सुनीता, तुझ्याशी संवाद साधायला खूप आवडलं. तुझ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! मायबोली परिवारातर्फे तुला पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!!!

- तृप्ती आवटी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

सुंदर झाली आहे मुलाखत. नेमके प्रश्न विचारले आहेत आणि उत्तरंही मनमोकळी आणि माहितीपूर्ण आहेत.

तृप्ती आवटी, मुलाखत चांगली झालीये. अमेरिकेत आयुर्वेदाची पताका फडकविल्याबद्दल वैद्या सुनीता यांचे अभिनंदन. ही पताका अशीच फडकती राहो आणि सेवाकार्य उत्तरोत्तर वाढत जावो.
आ.न.,
-गा.पै.

खूप छान घेतलीय मुलाखत. अमेरिकेत आयुर्वेदाचा प्रसार सुनिता करतायेत. त्यांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. ( आता वाटते श्रीरामपूरला असताना सरस्वती कॉलनीला भेट द्यायला हवी होती, ऐकून होते पण जायचे राह्यले.)

छान मुलाखत.

छान मुलाखत आणि शुभेच्छा.

योगा क्लासेस, कुकिंग क्लासेस, पंचकर्म एकाच ठिकाणी.
... वा! मस्तच.
मुलाखत आवडली.
खिचडी आणि हर्बल टी देण्याची कल्पना भारी आहे.

मुलाखत सुंदरच आहे.

पण, <<<< आयुर्वेदाला योगासारखी मान्यता अजून मिळालेली नाही. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. >>>> ही मान्यता कोणाची ? - जनसामान्यांची का अमेरिकन आरोग्य प्रशासनाची ? - हे कळले नाही.

जनसामान्यांची का अमेरिकन आरोग्य प्रशासनाची >>> दोन्हींची अभिप्रेत आहे :)

मुलाखत आवडल्याचं आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद :) मुलाखतीसाठी काढलेल्या प्रश्नांमध्ये सुधारणा, माझ्याकडून राहून गेलेले पण महत्त्वाचे प्रश्न सुचवणे, पहिल्या ड्राफ्टचं मुशो, त्यात सुधारणा यांत मृणची खूप मदत झाली. नागपुरी तडका मिळेल या भितीने तिला धन्यवाद देत नाही. पण तिची मदत acknowledge केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणून ही पोस्ट :)

खूप छान झाली आहे मुलाखत. आवडली.
प्रश्न छान विचारले आहेत, सुनिताने उत्तरम्ही मनमोकळी दिली आहेत. आपल्या यशाचं श्रेयही व्यवस्थित नमूद केलं आहे, हे खूपच भावलं.
आयुर्वेद विद्यालय-आयुर्वेद सेंटर-योगा स्टुडिओ ही संकल्पना खूप आवडली.

छान मुलाखत आणि शुभेच्छा.

आयुर्वेद विद्यालय-आयुर्वेद सेंटर-योगा स्टुडिओ ही संकल्पना खूप आवडली.
>>+1

मुलाखत आवडली. मोकळी आणि सुटसुटीत झाली आहे.

अभिनंदन !

मस्त मुलाखत ..... ह्युस्टन ला गेले की नक्की भेट देणार ......

धन्यवाद पुन्हा एकदा :)

डॉ. अशोक, अभिनंदन कुणाचं ? मुलाखत चांगली घेतल्याबद्दल माझं की शुन्यातून सुरुवात करून एवढी प्रगती केल्याबद्दल सुनिताचं ? :)

छान मुलाखत .. चांगले प्रश्न आणि वैद्य सुनीतांनीं उत्तरंही छान दिली आहेत .. त्यांची आयुर्वेदाबद्दलची पॅशन दिसून येते .. आयुर्वेदाची योगाशी सांगड घालून त्यांनीं वाईज् मॉडेल अ‍ॅडॉप्ट केलं आहे .. :)

Namaskar Mandali,
Thank you for all your feedbacks and best wishes.
As you can imagine, I am learning to type in Marathi. I wish I could write in Marathi here. I am not that computer literate either. It will take long time for me to get there. Might as well write in English and convey my thanks before it's too late.
Real 'thank you' goes to Trupti. She is the one who took initiative and typed my hand written (you can imagine hand writing of a medical professional) document for Maayaboli & I could reach to you all. Big thanks to Maayboli team who is doing a wonderful job of keeping Marathi culture alive through this medium. And most important- thanks to you - all readers. I am thrilled to see the responses and how people are keeping themselves connected. "Bharghos pratisadabaddal anant aabhar".

सुनिता, मायबोली.कॉमवर तुझं स्वागत आहे :-)