हीलिंग हार्मनी

Dr. Shekhar Kulkarni.jpg

ब्रेस्ट कॅन्सर जगभरात चांगलाच फोफावला आहे. या रोगाचं प्रमाण सध्या अमेरिकेत आठ बायकांमध्ये एक इतकं आहे. भारतात शहरांमध्ये ते बावीस बायकांमध्ये एक इतकं आहे. म्हणजे अमेरिकेपेक्षा कमी असलं, तरी आपल्याकडे हे प्रमाण चिंता करण्यासारखं आहे. आणि वाईट म्हणजे ते दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणजे एक आपली जीवनशैली बदलणं आणि कॅन्सर होणारच असेल, तर तो लवकरात लवकर हुडकून काढून उपचार करणं.

कॅन्सरच्या बाबतीतली या दोन वाक्यांतली माहिती एवढीच पुरी आहे. एवढी जरी लोकांपर्यंत पोचली तरी खूप झालं. खरा प्रश्न इथेच आहे. ही माहिती जस्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची कशी ?

गेली अनेक वर्षं मी ब्रेस्ट सर्जन म्हणून काम करतो आहे. जनजागृती हा त्या कामाचाच एक भाग आहे. आमचा आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रूप हा स्वमदत गटदेखील या कामासाठी कटिबद्द आहे. तरीही ही जनजागृती होत नाही आहे. ब्रेस्ट स्क्रीनिंगचे कॅंप अपयशी ठरतात. मॅमोग्राफीबद्दल लोकांच्या मनात अनास्था आहे. कॅन्सरबद्दलचे पेपरामासिकातले लेख लोक वाचत नाहीत. व्याख्यानं, चर्चासत्रं, कार्यशाळा या तेवढ्यापुरत्या चांगल्या चालतात. पण व्यापक प्रमाणावर जी जागृती व्हायला हवी, ती दिसत नाही.

मी एक नाटक लिहिलं. ’यमाच्या बैलाला’ या नावाचं. त्यात प्रशांत दामले हा सुपरस्टार काम करीत असे. धमाल विनोदी पद्धतीनं कॅन्सरबद्दलची माहिती या नाटकातून लोकांसमोर येत असे आणि लोक हसूनहसून बेजार होत. नाहीतरी नाटकांतून समाजप्रबोधन करण्याची मराठीमध्ये जुनी परंपरा आहे. 'संगीत शारदा' असो किंवा 'एकच प्याला'. हे नाटक खूप लोकप्रिय झालं, पण ते आम्ही तिकीट न लावता करत असू. त्यामुळे सतत पैसे जमवत बसण्याचा ताण असे. शिवाय प्रशांत दामले आणि त्यांचा संच नाटकं, सिरिअल यांमध्ये इतका गर्क झाला, की या नाटकासाठी वेळ काढता येईना. कॅन्सरबद्दलच्या जनजागृतीसाठी दुसरा काहीतरी उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली. काय करता येईल?

मध्यंतरी आम्ही काहीजणांनी म्यूझिक थेरपीवर बरेच प्रयोग केले. ते अजूनही चालू आहेत. ते करत असताना असं लक्षात आलं की, थेरपी म्हणून संगीत उपयोगी पडू शकतं. तर मग ते या कॅन्सरबद्दलच्या काउन्सेलिंगसाठी, जनजागृतीसाठीही वापरता येईल का? पण म्हणजे काय करायचं?

विचार करताकरता असं डोक्यात आलं की, आपण कीर्तन हा फॉर्म निवडला, तर लोकांपर्यंत पोहोचायला सोपं जाईल. कारण त्यात सगळं येईल. संगीत येईल, अभिनय येईल, कथाकथन येईल, आणि मुख्य म्हणजे जनजागृतीची संधीही निर्माण होईल. पारंपरिक कलांचं आपल्याकडे आकर्षण आहे. त्यातून एक सर्जन हे सगळं करतोय म्हटल्यावर लोकांना गंमत वाटेल आणि निदान त्यामुळे तरी काही लोक आपल्याला जे म्हणायचं आहे ते ऐकायला येतील. शिवाय प्रशांत दामलेच्या अनुभवावरून लक्षात आलं होतं, की जेवढं आपण अनेकांवर अवलंबून राहू, तेवढ्या भविष्यात अडचणी येणार. तेव्हा एकट्यानंच जे काही करायचं ते करायचं. म्हणून मग मी एक कीर्तन रचायला घेतलं. कॅन्सरचं कीर्तन !

एवढ्यात माझी गाठ योगायोगानं एका व्यावसायिक गायिकेशी पडली. तिला मी बोलताबोलता म्हटलं की, मी असा असा प्रयोग करतो आहे, तर ती उत्साहात म्हणाली की, तिलाही यात भाग घ्यायला आवडेल. मी म्हणालो की, हा सामाजिक प्रकल्प आहे, त्यात पैसे वगैरे मिळणार नाहीत. तरीही ती आनंदानं ’चालेल’ म्हणाली. मग आम्ही एक छान स्क्रिप्ट तयार केलं. रूढार्थानं ज्याला कीर्तन म्हणता येईल असा फॉर्म सोडून दिला आणि एका रंगमंचीय कार्यक्रमाची आखणी केली.

मी गेली अनेक वर्षं कार्यक्रमांतून गाणी म्हणतो आहे. आमचा एक पुण्यातल्या डॉक्टरांचा वाद्यवृंद आहे. त्याचे गेल्या दहा वर्षांत दीडशेहून अधिक प्रयोग झालेले आहेत. माझ्या काही चित्रपटांतली गाणी मीच म्हटलेली आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा मला थोडाफार अनुभव होताच. पण माझ्यासोबत येऊ घातलेली व्यावसायिक गायिका या क्षेत्रात खूपच पुढे होती. तिच्या बरोबर स्टेजवर उभं राहून गायचं म्हणजे कठीण परिस्थिती असणार होती. पण तरीही नेटानं तालमी सुरू केल्या.

हळूहळू कार्यक्रम आकार घेऊ लागला. गाणी निवडली. त्यात काही सोलो, काही द्वंद्वगीतं निवडली. जुन्यानव्या चित्रपटांतलीच गाणी घ्यावीत, असं ठरलं. कारण कॅन्सरसारख्या विषयावर बोलताना अधूनमधून लोकप्रिय गाणी ऐकली तर जरा बरं वाटेल, असं ठरलं. गायिका फारच सुरेल होती. एकदा गायला लागली की ऐकणारे मंत्रमुग्ध होत. डोळे मिटून ऐकलं तर कित्येकदा आशा भोसले गाताहेत, असा भास होई. पण स्टेजवर उभं राहून बोलण्याचा तिला अजिबात अनुभव नव्हता. आपल्याला चार वाक्यंदेखील बोलून प्रेक्षकांशी संवाद साधता येणार नाही, अशी तिला सतत धास्ती वाटे. पण कार्यक्रमाचं स्वरूपच असं आकार घेत होतं, की दोघांनी स्टेजवरून प्रेक्षकांशी बोलणं आणि गाणं आवश्यक होतं. मग तिचं स्क्रिप्ट लिहून त्याची निराळी प्रॅक्टिस सुरू केली. वादकांबरोबर तालमी सुरू झाल्या. दृक्श्राव्य माध्यमासाठी म्हणून स्लाइड तयार केल्या. त्यासाठीही ठिकठिकाणहून फोटो मिळवणं, माहितीच्या स्लाइड तयार करणं, त्यांचा गाणी आणि बोलणं यांसोबत मेळ घालणं, हे काम मोठं जिकिरीचं होतं शिवाय स्टेजवर आम्हां दोघांशिवाय कोणी असणार नव्हतं. त्यामुळे बोलताबोलता रिमोट माऊसनं स्लाइड बदलणं, याचीही वेगळी प्रॅक्टिस करावी लागली.

हा कार्यक्रम लावायचा म्हणजे पैशांची जुळवणी आली. एक स्टेज शो म्हणजे तीसएक हजार रुपयांचा खर्च. हव्या त्या तारखेला हॉल मिळण्यापासून मारामार. हॉलची प्रचंड भाडी, साउंड सिस्टीम, लाईट यांचे वाढलेले ख्रर्च आणि जाहिराती. मग मी अनेक ठिकाणी शब्द टाकून प्रायोजक मिळवले. त्यांतले सर्वात भक्कमपणे पाठीशी उभे राहिले ते म्हणजे रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल. शिवाय अनेक औषध कंपन्यांनी जमेल तशी मदत केली आणि निदान काही प्रयोग होऊ शकतील इतकी रक्कम तयार झाली.

प्रयोगाचं नाव ठरलं - 'मेलडी टू बीट मॅलडी'. आजारावर मात करण्यासाठी संगीत !
मी हे नाव जाहीर करणार तेवढ्यात गायिकेचा नवरा घाईघाईनं आला.
“डॉक्टर, हे नाव बदलावं लागेल.”
“का बरं ? मला तर हे नाव खूप छान वाटतंय.”
“छान वगैरे ठीक आहे. पण बदलावं लागेल.”
“अरे पण कशासाठी?”
“माझ्या काही मित्रांशी मी बोललो. तर त्यांना मॅलडी म्हणजे काय, हेच माहीत नाही. मलाही तुम्ही सांगेपर्यंत त्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता.”
“मग चांगलंच आहे की. पुन्हापुन्हा वाचून लोकांना अर्थ माहीत होईल. तेही लोकशिक्षणच की!”
“नको डॉक्टर. दुसरं काहीतरी नाव बघा. पण हे नको.”
मला काही कळेना. याने काही अंकशास्त्र वगैरे बघून हे नाव अशुभ आहे, असलं काहीतरी शोधून काढलंय की काय. मी तरीही नेटानं म्हटलं, “तूच काहीतरी सुचव.”
“मला नाही सुचत. तुम्हीच बघा. पण हे नाव कुठल्याही परिस्थितीत असता कामा नये.” आता त्याचा सूर जरा जास्त कडक झाला होता.

मी जरा वैतागलो. मला 'मेलडी टू बीट मॅलडी' हे नाव सुचल्यापासून आवडलं होतं. ते याच्या हेकेखोरपणामुळे सोडून द्यावं लागणार, हे मनाला पटेचना. पण आता कार्यक्रम तयार झाला होता. या टप्प्यावर गायिकेच्या नवर्याचं मन राखणं आवश्यक होतं. पण तरी मी निर्वाणीचं म्हणालो, “हे बघ, मला तू पटेल असं कारण दिलंस तर मी हे नाव बदलेन.”
मग तो बोलू की नाही, असा चाचरत म्हणाला, “काय आहे डॉक्टर, आपल्याकडे माला डी नावाच्या गर्भनिरोधक गोळ्या मिळायच्या. माझ्या कित्येक मित्रांना मॅलडी हे माला डी वाटलं आणि ते हसायला लागले. माझी बायको ज्या कार्यक्रमात गाणार त्याला लोकांना माला डीचा कार्यक्रम म्हणून हिणवायला नको.”
मला हसू आवरेना, पण तो अजूनच गंभीर झाला. “तुम्हांला माहीत नाही डॉक्टर, आमच्या कलाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार अडाणी आहेत. आणि शो नसेल त्या वेळात इतरांच्या टिंगली करत बसतात. आपला शो तुम्ही आणि माझी बायको असे दोघंच करणार. म्हणजे मग लोकांना गॉसिप करायला चान्सच मिळणार. त्यातून हे नाव असेल तर विचारायलाच नको.”

मला काय बोलावं कळेना. नवरा इतका चिरडीला आला होता, की नाव बदलण्यावाचून पर्याय नाही, हे माझ्या लक्षात आलं होतं.
“'हीलिंग हार्मनी' हे नाव कसं वाटतं?” मी म्हटलं.
“डॉक्टर , दुसरं काहीही चालेल पण माला डी नको.”
“हे चालेल का?”
“चालेल!”
शीर्षकाचा विषय मिटला. वादकांची मानधनं ठरली. आता कार्यक्रम लावायचा.
तेवढ्यात रॉनी भर्दा नावाच्या एका माणसाचा फोन आला.
“डॉक्टर, ओळखलं का ? मी पूर्वी तुमचा एक कार्यक्रम रोटरी क्लबच्या सीनियर सिटिझन्स क्लबसाठी ठेवला होता. बंड गार्डन जॉगिंग पार्कमध्ये."
मी त्याला ओळखलं.
“आता मी पूना क्लबच्या मागे लेडिज क्लब आहे, तिथे मॅनेजर आहे. तिथल्या लोकांना एक गाण्याचा कार्यक्रम हवा आहे. मला तुमची आठवण आली. तुम्ही कराल का?”
मी शो मिळवण्याच्या प्रयत्नातच होतो.
“जरूर करीन. माझ्याकडे सध्या 'हीलिंग हार्मनी' नावाचा एक नवाकोरा शो आहे.“
“वा वा डॉक्टर. आम्हांला अगदी आवडेल. पण एक आहे. आमचं बजेट फार नाही.“
मनात म्हटलं, झाली सुरुवात. पण वरवर तसं न दाखवता म्हटलं, ”चालेल हो. मला कुठं पैसे मिळवायचेत या कार्यक्रमातून? तुमचं बजेट असेल तेवढं द्या. बाकी मी रोटरीच्या स्पॉन्सरशिपमधून घालीन. “
“थॅंक्यू डॉक्टर. मला माहितीच होतं, तुम्ही असं म्हणणार. “
भर्दाचा कार्यक्रम ठरला. पण एक मोठीच अडचण उभी राहिली.
“डॉक्टर, आमचं सगळं पब्लिक इंग्लिश बोलणारं आहे. तेव्हा निवेदन सगळं इंग्लिशमध्येच लागेल. पण त्याचा अर्थात तुम्हांला प्रॉब्लेम येणार नाही, कारण मागचा रोटरीचा कार्यक्रम तुम्ही इंग्रजीतूनच केला होता, हे मला आठवतंय “
मी इंग्रजीत निवेदन करेन ( म्हणजे जमेल तसं ठोकेन), पण गायिकेचं काय?
“मी एक शब्दही बोलणार नाही “, तिनं जाहीर करून टाकलं. “मराठीत मी निदान थोडा प्रयत्नतरी केला असता. पण इंग्रजी? शक्य नाही.”
“अगं, मी तुला लिहून देईन, तू फक्त थोडं पाठ कर. अगदीच नाही जमलं तर लिहिलेले कागद समोर ठेव.”
“जमणार नाही”, तिनं निक्षून सांगितलं.

पहिलाच कार्यक्रम. तोही आपणहून चालत आलेला. नाही म्हणणं शक्य नव्हतं. मग थोडं स्क्रिप्ट बदललं. तिला फक्त ’हॅलो’ वगैरे शब्द ठेवले आणि सबंध कार्यक्रम इंग्रजीत लिहून काढला. एका संध्याकाळी कार्यक्रम होता. मोठा मांडव होता. एक स्टेज उभारलेलं होतं, प्रेक्षकांची बसायची व्यवस्था मात्र रेस्तराँसारखी होती. म्हणजे टेबल आणि बाजूला पाचसात खुर्च्या. अशी अनेक टेबलं. आणि मधूनमधून फिरणारे वेटर.

कार्यक्रम उत्तम झाला. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम मिळाला. हा कॅन्सरबद्दल काही कार्यक्रम आहे, अशी त्यांना प्रथम पुरेशी कल्पना नव्हती. एक डॉक्टर गाण्यांचा शो करणार आहे, इतपतच त्यांना माहीत होतं. प्रत्यक्षात जेव्हा मी कॅन्सरबद्दल बोलायला सुरू केलं, तेव्हा लोकांनी आवडीनं ऐकलं. महितीचा जरा जास्त डोस होतो आहे, असं वाटलं की मी गाणं टाकायचो. गायिकेनं गाणी चांगली म्हटली. माझीही गाणी आणि बोलणं चांगलं झालं असावं, कारण कार्यक्रम संपेपर्यंत तो लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतला.

या कार्यक्रमाच्या यशानंतर पुढचा कार्यक्रम एका हाउसिंग सोसायटीत झाला. तो खरं म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीनंच त्यांच्या सोसायटीत आयोजित केला होता. हा मात्र मराठीत होता आणि इथे गायिकेनं फरसे आढेवेढे न घेता लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचलं आणि लोकांशी थोडाफार संवाद साधायचा प्रयत्न केला. हाही कार्यक्रम खूप रंगला.

या कार्यक्रमानंतर एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे वादकांचा सबंध संच घेऊन कार्यक्रम केला तर तो रंगतो, हे जरी खरं असलं, तरी या पसार्याचा खर्च फार वाढतो. अनेक लोकांवर तालमीसाठी किंवा शोसाठी अवलंबून राहावं लागतं. काही कलावंत निष्कारण तोरा मिरवतात. त्यापेक्षा फक्त अगोदर ध्वनिमुद्रित केलेले ट्रॅक वापरले, तर खूप सोपं पडेल. कार्यक्रमातला जिवंतपणा काही अंशी निघून जाईल, हे मान्य करूनसुद्धा खर्चाच्या आणि त्रासाच्या दृष्टीनं यापुढे ट्रॅक वापरून शो करायचं ठरलं.

पुढचा शो 'इंद्रधनुष्य' या महानगरपालिकेच्या हॉलमध्ये ठेवला. पालिकेनं हा हॉल पर्यावरणचळवळीच्या कार्यक्रमांसाठी निर्माण केलेला आहे. अशा कार्यक्रमांसाठी तो फुकट वापरता येतो. आमचा कार्यक्रम हा कॅन्सरबरोबरच जीवनशैलीवर आणि पर्यायानं पर्यावरणावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे तो करण्याची परवानगी तिथले अधिकारी श्री. दिघे यांनी दिली. मात्र पहिला कार्यक्रम बघण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यांच्या उद्दिष्टांना सोडून आम्ही काही करत नाही ना, याची त्यांना खातरजमा करून घ्यायची असावी. कार्यक्रम पाहून तेही खूष झाले आणि हव्या तितक्या वेळा हा शो तिथे लावा, असं त्यांनी सांगून टाकलं. एक एक कार्यक्रम होऊ लागले. मूळ कीर्तनाचा फॉर्म मागे पडला आणि हा वेगळाच शो समोर आला. कीर्तनाप्रमाणे यात गाणी होती, किस्से होते, बोलणं होतं, थोडा अभिनय होता आणि मुख्य म्हणजे समाजप्रबोधनाचा धागा होता.

अचानक एके दिवशी गायिकेच्या नवर्यानं बॉंबगोळा टाकला.
“आम्ही आता इथून पुढचे शो करू शकत नाही.“
माझा कानांवर विश्वासच बसेना. पुढचे तीन कार्यक्रम ठरले होते. मीच उन्हातान्हात जाऊन निरनिराळी थिएटर बुक केली होती. साउंडवाला, लाईटवाला यांची बुकिंग झाली होती, प्रायोजकांपैकी काही निमंत्रित या शोंना येणार होते. एक शो तर आस्था सपोर्ट ग्रूपच्या एका महत्त्वाच्या कॉन्फरन्सचा शो होता. यातला एकही रद्द होणं म्हणजे नामुष्की असणार होती.

गायिका नवर्याच्या शेजारीच बसली होती. ती एक शब्दही बोलेना.
“अरे, पण ठरलेले शोतरी करायला हवेत ना. शिवाय या तारखा तुम्हांला विचारूनच मी नक्की केल्या होत्या.”
“ते आम्हांला काही माहीत नाही. आम्ही हा शो करणार नाही, तुम्हांला काय हवं ते करा.”
वास्तविक गायिका व्यावसायिक असल्यामुळे तिचे सतत इकडेतिकडे हिंदी सिनेमांच्या गाण्यांचे ऑर्केस्ट्राचे शो चालत. त्यामुळे 'हीलिंग हार्मनी'साठी तिची तारीख मिळणं अवघड असे. 'हीलिंग हार्मनी'मधून तिला पैसेही मिळत असत आणि प्रसिद्धीही. शिवाय समाजिक काम केल्याचं श्रेय. इतकं असूनही तिनं 'हीलिंग हार्मनी'ला शेवटचं प्राधान्य दिलं होतं. एखादा शो ठरवणं म्हणजे माझी तारेवरची कसरत असे. हॉल मिळत असेल तर गायिकेची तारीख नसे. गायिकेच्या उपलब्ध वेळात हॉल नसे. मग गावभर वणवण फिरायला लागे. जाहिराती, इतर लोक या सगळ्यांची व्यवस्था झाल्यावर मग कुठे एखादा शो लागत असे. असे एकदम ठरलेले कार्यक्रम रद्द करण्याची कृती म्हणजे सर्दच करणारी होती.
“आम्ही चौदा दिवस आधी सांगतो आहोत हेच उपकार समजा. तुमच्या जागी आम्ही असतो तर कुणालाही घेऊन आम्ही कार्यक्रम केला असता“, असं म्हणून मंडळी कुठलंही सहकार्य न करण्याचं ठरवून चालती झाली.

Dr. Shekhar Kulkarni - 1.jpg

हा आता मोठाच प्रश्न निर्माण झाला. दोन आठवड्यांत आता नवी गायिका उभी करायची. त्यातला गाण्याचा भाग फारसा अवघड नाही, पण प्रेक्षकांशी संवाद साधण्याचं जर तिला जमलं नाही तर कार्यक्रमाचा आत्माच हरवून जाईल. शिवाय बर्याच व्यावसायिक गायकांच्या तारखा आधीच गेलेल्या असतात, त्यामुळे ऐन वेळेस कोणी उपलब्ध होईल, याची शक्यता जरा कमी असते. मूळ गायिकेनं ऐन वेळेस जरी दगा दिला असला, तरी ती गायिका म्हणून उत्तम होती आणि तिनं कार्यक्रमाच्या प्राथमिक उभारणीत महत्त्वाचं योगदान दिलं होतं. पण आता काय?

कार्यक्रम बंद पडणे, ही मोठीच नामुष्की झाली असती. हे मी होऊ देणार नव्हतो. खूप विचार करून ठरवलं - हा कार्यक्रम दोन गायकांचा असा न ठेवता डॉक्टर आणि पेशंट यांनी केलेला असा केला, तर ते अभूतपूर्व होईल.
ब्रेस्ट कॅन्सरच्या अशा दोन रुग्ण – खरं म्हणजे सरव्हायव्हर, कॅन्सरवर मात केलेल्या - मला माहीत होत्या की ज्या उत्तम गायिका होत्या. त्यांनी जर हो म्हटलं तर त्यांच्यासह हा कार्यक्रम करायला मजा येईल. शिवाय कॅन्सरबद्दल एखाद्या स्थानिक, व्यावसायिक गायिकेनं काही सांगण्यापेक्षा रुग्णांनी आणि डॉक्टरांनी काही सांगितलं तर जास्त ऑथेंटिक होईल.

सौ. प्रतिभा कर्णिक या मला एका स्पर्धेच्या निमित्तानं माहीत होत्या. त्या स्पर्धेत त्यांना महिला विभागात प्रथम पारितोषिक मिळालं होतं. त्यांचं गाणं मी ऐकलं होतं. त्या खरोख्रच उत्तम गातात. गेली वीसबावीस वर्षं त्यांचा शास्त्रीय संगीताचा रियाज चालू आहे. त्यांना फोन केला. माझी आत्ताची परिस्थिती सांगितली. कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं. त्या ’विचार करून कळवते’ म्हणाल्या. एकदोन दिवसांत त्यांचा होकार आला.

सौ. स्वाती देव या दुसर्या सर्व्हायव्हर. त्यांचंही गाणं मी ऐकलेलं होतं. अगदी व्यावसायिक म्हणावं अशा दर्जाचं त्या गाऊ शकत होत्या. त्यांनाही फोन केला. त्या उत्साहानं लगेच हो म्हणाल्या. आधीचा कार्यक्रम मी आणि व्यावसायिक गायिका एका फर्मच्या नावे करत असू. आता हा कार्यक्रम आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रूपच्या बॅनरखाली करायचं ठरलं. आणि या निर्णयानंतर जादू व्हावी तशी परिस्थिती बदलली.

तालमी सुरू झाल्या. आता स्क्रिप्टही थोडं बदलणं भाग होतं. नव्या संवादाच्या तालमी सुरू झाल्या आणि लक्षात आलं की, मिसेस कर्णिक काय किंवा देव काय, मध्यमवर्गीय गृहिणी आहेत. संसाराच्या जबाबदार्या पार पाडतापाडता त्या या शोमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे एखाद्या शोमध्ये सहभागी होणं त्यांना जमलं नाही, असंही होण्याची शक्यता आहे. अशावेळेस प्रयोग थांबवून चालणार नाही. अजून एखाद्या गायिकेला सहभागी करून घेणं आवश्यक आहे आणि तीही अशी, की पूर्णवेळ व्यावसायिक नाही पण कामाच्या दृष्टीनं व्यावसायिक. म्हणजे ऐन वेळेस झालेले बदल आत्मसात करून कुठलंही गाणं कधीही म्हणू शकेल, अशी. सौ. वृषाली मावळंकर यांच्याशी माझा थोडा परिचय होता. त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग मी पाहिलेलं होतं. त्यांना संगीतक्षेत्रात काम करण्याचा उत्साह आहे, हे त्यांच्याच बोलण्यातून मला समजलं होतं. मग कुठूनतरी त्यांचा नंबर मिळवला. त्यांनीही लगेच हो म्हटलं. त्यांनी आधीचा आमचा शो पाहिलेलाच होता.
नव्या टीमसह तालमी सुरू झाल्या. कर्णिक, देव, मावळंकर यांनी कमालीच्या उत्साहात परफॉर्म करायला सुरुवात केली.

आमच्या आस्था सपोर्ट ग्रूपचा नेहमी गाण्याचा असा एक 'फटका' होता. डॉ अनिल अवचटांनी लिहून दिलेल्या या फटक्याला एक पारंपरिक चाल लावून रुग्ण तो त्यांच्या अवेअरनेस कार्यक्रमात नेहमी म्हणत. रुग्णाच्या जीवनाचं आणि फायटिंग स्पिरिटचं सार त्या फटक्याचा शब्दाशब्दामध्ये जाणवे. तो म्हणण्यातला त्यांचा आवेश, जोश, देहबोली अगदी भारावून टाकणारे होते. तो फटका 'हीलिंग हार्मनी'च्या शोमध्ये घ्यावा, असं मनात आलं. लागलीच आस्थाची मंडळी कामाला लागली.

तेजस श्रावगे या आमच्या मित्राला त्या फटक्याचा ट्रॅक बनवायला सांगितलं. रेकॉर्डिंग स्टुडिओत जाऊन तो फटका ध्वनिमुद्रित केला. त्याचा एक मायनस वन म्हणजे गायकांचा आवाज काढून टाकलेला, पण वाद्यांचा ठेवलेला, असा ट्रॅक तयार केला आणि तो 'हीलिंग'मध्ये सामिल केला. अपर्णा अंबिके या 'आस्था'च्या सेक्रेटरी. हा फटका त्या इतक्या तल्लिन होऊन गातात की ऐकत राहावं. त्यांच्यासोबत सौ. माधवी फडणीस या एक उत्साही सर्व्हायव्हर. त्याही इतक्या सुरात आणि लोकगीतास शोभेलशा छान आवाजात गातात की फटक्यात वेगळाच रंग भरतो. ’असू दे आजार, तेला नाही हो भेनार… तेला समजून घेऊन छान जगायचं हाय…’ अशा शब्दांनी सुरू होणारा हा फटका ’मन करून आभाळ खुशी वाटनार हाय’ या ओळींपाशी येतो तेव्हा ऐकणारे अक्षरश: भारावून जातात.

ट्रॅक तयार झाला आणि फटक्याच्या तालमी सुरू झाल्या. 'आस्था'च्या इतर सभासद महिलादेखील फटक्याच्या कोरसला यायला लागल्या. आणि 'आस्था'च्या टीमसोबतचा पहिल्या शोचा दिवस उजाडला. डॉक्टर आणि पेशंट यांनी सादर केलेला अभूतपूर्व संगीतमय कार्यक्रम, अशी त्याची जाहिरात झाली होती. मित्रमंडळी, आस्थाचे इतर सभासद, शुभचिंतक अशा सगळ्यांच्याच मनात एक उत्सुकता आणि छोटीशी धास्ती होती. संध्याकाळी सहाचा शो होता. ५ जानेवारी, २०१३ हा तो दिवस. योगायोगाने हा 'आस्था'चा वाढदिवस होता. पत्रकार भवनाचा हॉल. प्रमुख प्रायोजक रोटरी क्लब असल्यानं हॉलचं बुकिंग त्यांच्या नावानं होतं. त्यामुळे प्रवेशद्वारावरील फलकावर रोटरीचा कार्यक्रम असं लिहिलेलं होतं. 'हीलिंग हार्मनी'ऐवजी हे नाव बघून अनेक प्रेक्षकांचा घोटाळा होऊ लागला आणि ते परत जाऊ लागले. हे लक्षात येताच एकाला खाली उभं केलं आणि येणार्यांना वरच्या मजल्यावरच्या हॉलमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रम सुंदरच झाला. थोड्याफार चुका, विसराविसरी झाली पण ती प्रेक्षकांच्या प्रतिसादात लक्षातही आली नाही. गाणार्या रुग्णांचं , त्यांच्या फायटिंग स्पिरिटचं इतकं कौतुक झालं की बास. त्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढला.

या पहिल्या शोपासून 'हीलिंग हार्मनी'ची जी घोडदौड सुरू आहे, ती आजतागायत. लोकांना हा शो आवडतो. काय आहे या शोमध्ये? एकतर डॉक्टर आणि पेशंट एकाच व्यासपीठावर येऊन एकदिलानं गातात, याचं कौतुक. कॅन्सरबद्दल माहिती यात दिली जाते. पण ती कुठेही बोजड, क्लिष्ट न होऊ देता. संभाषणाचा बराचसा भाग हसतखेळत, जणूकाही एखादा विनोदी विषय बोलला जातो आहे, अशा थाटात. त्यामुळे भयावह माहिती ऐकत असतानाही प्रेक्षकांच्या मनावर ताण येत नाही. ज्या क्षणी तो येईल असं वाटतं, तिथे गाणं सुरू होतं. विनोदी स्लाइड दिसतात.

कॅन्सर हा बराचसा जीवनशैलीशी निगडित असा रोग आहे. 'हीलिंग हार्मनी'मध्ये बराच वेळ जीवनशैलीविषयीच कोपरखळ्या मारतमारत भाष्य केलं जातं. त्यात रोजचं खाणंपिणं आलं, व्यायाम आला, प्रदूषण आलं, रोजच्या जीवनातले विरोधाभास आले, मानवाचा आगाऊपणा आला. हे सारं ऐकत असताना प्रेक्षक स्वत:लाच पाहत असतात आणि स्वत:वरच हसत असतात. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ते कॅन्सर झालेल्या रुग्णांना स्टेजवर उभं राहून चक्क गाताना पाहतात. कॅन्सररुग्णाची त्याच्या मनातली प्रतिमा निराळी असते. इथे अगदी वेगळं चित्र दिसतं आणि एकदम मनोमन हायसं वाटतं. म्हणजे कॅन्सर झाला तरी असं जीवन जगता येतं तर, हा एक आशावाद पल्लवित होतो.

या वाटचालीत सर्वांनाच खूप काही शिकता आलं. पुण्याबाहेर प्रयोग झाले. लातूर, नाशिक अशा लांबच्या ठिकाणी शो झाले. मग प्रवास आला, राहणं आलं, अडचणी आल्या. त्यातही मजा आली. कारण सपोर्ट ग्रूप हा एक कॉम्रेडशिप इन् डिस्ट्रेस आहे. ती कॉम्रेडशिप पदोपदी अनुभवायला मिळाली.

नसिरूद्दिन शाह, विक्रम गोखले यांनी त्यांच्या शुभेच्छांच्या चित्रफिती दिल्या. अजून अनेक नामवंत मंडळींनी उत्साहानं होकार कळवला आहे. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. लोकांनी आपणहून येऊन मदती देऊ केल्या.
अजून प्रवास चालूच आहे. कार्यक्रम हिंदीत झाला. इंग्रजीत झाला. कॉलेजात झाला. टेक्नो पार्कमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाला. मोठ्या उत्सवाचा एक भाग, किंवा पुष्प म्हणून झाला. अजून आमंत्रणं येत आहेत. नवीनवी गाणी, नवी माहिती जमा होते. कधी भर पडते. कधी वेळेअभावी काटछाट करावी लागते. नवी गाणी तयार होताहेत, नवीन चाल लावून, संगीत देऊन चांगलीचांगली गाणी, कविता सादर करणं सुरू झालेलं आहे. या सगळ्यांत काहीएक नवीन करून पाहण्याची नशा आहे. जुन्याला वंदन करण्याची नम्रता आहे.

Dr. Shekhar Kulkarni - 2.jpg

आस्था सपोर्ट ग्रूप लवकरच या शोचा शंभरावा प्रयोग करेल, याची खात्री आहे , परदेशातदेखील हा कार्यक्रम व्हावा, यासाठी बोलणी चालू आहेत. कॅन्सरसारख्या रुक्ष आणि नकोशा विषयावरचा कार्यक्रम इतका लोकप्रिय होतो आहे, हे नक्कीच समाजबदलाचं लक्षण आहे. लोकांना आता तीचतीच चंद्राची , प्रेमाची गोडगोड गाणी नको आहेत, काही नवीन दिलं, तर ते स्वीकारायची त्यांची तयारी आहे.

आमच्या रुग्णांचा कॅन्सर तर गेलेलाच आहे, पण समाजाच्या मनावरचा अज्ञानाचा आणि आळसाचा, बेफिकिरीचा कॅन्सर हळूहळू दूर होतो आहे.

- डॉ. शेखर कुलकर्णी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

शेखर तुझी ओळख होतीच. तीत आणखी मोलाची भर पडली !
Dr A.P. Kulkarni

उत्तम लेख. तुमच्यात लेखक, डॉक्टर ,कलाकार आणि मुख्य महणजे माणुस असे गुण आहेत ते अतिशय भावले.

लेख छान आहे. हा कार्यक्रम बघायला हवा असं फार वाटतय.

इन्टरेस्टिंग उपक्रम. माहितीसाठी धन्यवाद.

मस्त उपक्रम. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा. :)

फारच अप्रतिम उपक्रम.

छान उपक्रम. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी शुभेच्छा.

मस्त उपक्रम....
तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा!!!

स्तुत्य उपक्रम. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

लेख छान आहे. हा कार्यक्रम बघायला हवा असं फार वाटतय.

>>+1

लेख छान आहे. तुमचा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला हवा. मला तुमची कार्यक्रमाची संकल्पना आणि त्यामागची तळमळ जाणवली.

छान लेख. कार्यक्रम बघायला हवा.

तुमचा कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला हवा. मला तुमची कार्यक्रमाची संकल्पना आणि त्यामागची तळमळ जाणवली.>>> +१००..

लेख खूपच सुंदर, हा कार्यक्रम बघणारच आता .....

खूप शुभेच्छा हिलिंग हार्मनीसाठी..

खूप शुभेच्छा हिलिंग हार्मनीसाठी..

हॅट्स ऑफ :)

उपक्रम छान आहेच. लेख पण आवडला. आधीची गायिका सोडून गेली ती हकिकत कटुता येऊ न येता सांगितली हे फारच कौतुकास्पद.

लेख छान आहे .. सिंडरेला +१ .. :)