रहस्य एका विमान अपहरणाचे...

हे एक असे अपहरणनाट्य ज्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अमेरिकन तपासयंत्रणा गेल्या ४२ वर्षांपासून करीत आहेत. अमेरिकेत आजपर्यंत झालेल्या विमान अपहरणांपैकी हे असे एकमेव अपहरण आहे, की ज्याचे रहस्य अद्यापही गुलदस्त्यात आहे. २४ नोव्हेंबर, १९७१ या दिवशी घडलेल्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. काय झाले होते त्या दिवशी?

२४ नोव्हेंबर, १९७१च्या थंडीने गोठवणार्‍या दुपारी नॉर्थवेस्ट ओरीएंटच्या पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तिकीटखिडकीवरून सियाटल टोकोमाला जाणार्‍या विमानाच्या एकेरी प्रवासाचे तिकीट २० डॉलर रोख रक्कम देऊन आपले नाव डॅन कूपर असल्याचे सांगणार्‍या व्यक्तीने खरेदी केले. त्याचे वय अंदाजे ४०-४५ असावे.

नॉर्थवेस्ट एअरलाईनचे उड्डाण क्र. ३०५ हे बोईंग ७२७-११० प्रकारचे, ९४ प्रवासी क्षमता असणारे लहान विमान होते. विमानाने दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी नियोजित कार्यक्रमानुसार ओरिगॉनच्या पोर्टलँडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सियाटल, वॉशिंग्टनकडे ३० मिनिटांच्या प्रवासासाठी उड्डाण केले. विमानात डॅन कूपरव्यतिरिक्त ३६ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. विमानाने उड्डाण करताच १८ सी या आसनावरील डॅन कूपरने शांतपणे सिगारेट पेटवली. त्याने गडद रंगाचे आधुनिक पद्धतीचे कपडे परिधान केले होते. काही मिनिटातच त्याने त्याच्या जवळच असलेल्या महिला कर्मचारी फ्लोरेन्स श्चेफनरच्या दिशेने एक कागद फेकला. तिने तो कागद उचलला, परंतु अनेकदा एकट्याने प्रवास करणारे प्रवासी तरुण आणि आकर्षक दिसणार्‍या हवाईसेविकांकडे आपला दूरध्वनी क्रमांक किंवा हॉटेलच्या खोलीचा क्रमांक लिहिलेला कागद फेकत असत. त्यावेळी हवाई सेविकांसाठी ही नेहमीची घटना असल्यामुळे नेहमीप्रमाणे तो उघडून न पाहताच आपल्या गणवेशाच्या खिशात सरकवला. त्याच्या समोरून फ्लोरेन्स पुन्हा जात असताना डी बी. कूपर तिच्याकडे झुकला आणि तिच्या कानात कुजबुजला, 'मिस, ती चिठ्ठी वाचून पाहिलीत तर बरे होईल, माझ्याकडे बाँब आहे'. फ्लोरेन्सने घाईघाईत बाजूला जाऊन तो मजकूर वाचला. सुवाच्य इंग्रजी कॅपिटल अक्षरात लिहिलेल्या मजकुराचा सारांश होता की, 'माझ्या ब्रीफकेसमध्ये बाँब आहे. गरज भासल्यास मी त्याचा उपयोग करीन. माझ्या मदतीसाठी माझ्या जवळच्या आसनावर बस. या विमानाचे अपहरण झाले आहे. फ्लोरेन्सने तिची सहकारी मेक्लोव्हला तो कागद दाखवला आणि त्या दोघीही कॉकपिटच्या दिशेने गेल्या. वैमानिकाला ही परिस्थिती कळवून फ्लोरेन्स परत कूपरकडे आली आणि तिने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. मात्र त्याच्या शेजारी बसताक्षणीच तिने बाँब दाखवायची विनंती केली. त्याने आपली ब्रीफकेस अर्धवट उघडून दाखवली. त्यात लालपिवळ्या वायरने जोडलेल्या स्थितीत असलेले आठ सिलेंडर, बॅटरी तिने पाहिले. आपली बॅग बंद करताच त्याने आपल्या मागण्या योग्य त्या व्यक्तींकडे पोहोचवण्यासाठी तिच्या समोर ठेवल्या. दोन लाख अमेरिकन डॉलर वीस डॉलरच्या क्रमवार नसलेल्या नोटांच्या स्वरूपात, चार पॅराशूट (दोन मुख्य आणि दोन राखीव), सियाटल विमानतळावर उतरताच विमानात इंधन भरण्याची व्यवस्था. फ्लोरेन्सने या मागण्या कॉकपिटमध्ये पोहोचवल्या. वैमानिक विल्यम स्कॉट याने सियाटलच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून ही सर्व हकीकत कळवली. नियंत्रण केंद्रावरुन स्थानिक आणि केंद्रीय सुरक्षायंत्रणांना झाला प्रकार कळवण्यात आला. विमानातील प्रवाशांसाठी मात्र 'विमानातील किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे सियाटल विमानतळावर उतरण्यास विलंब होणार आहे' अशी उद्घोषणा करण्यात आली. नॉर्थवेस्ट एअरलाईनचे अध्यक्ष डोनाल्ड नायरोप यांनी खंडणीची रक्कम देण्याची मागणी मान्य करून अपहरणकर्त्याशी पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश आपल्या कर्मचार्‍यांना दिले. खंडणीची रक्कम तयार करणे, मागणीप्रमाणे पॅराशूटची व्यवस्था करणे, सुरक्षायंत्रणांना तयारी करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हे विमान वॉशिंग्टनच्या 'पुगेट साउंड' भागातील आकाशात सुमारे दोन तास घिरट्या घालीत होते. कोणताही पुरावा मागे राहू नये, म्हणून कूपरने लेखी मागणी केलेला कागद फ्लोरेंस कडून परत घेतला.

Dbc.jpg
१९७२ मध्ये F.B.I. ने तयार केलेले कूपरचे चित्र आणि नंतर वयोपरत्वे झालेले बदल दर्शविणारे चित्र

या दरम्यान कूपरबरोबर बसलेल्या फ्लोरेन्सला स्पष्टपणे जाणवले, की आकाशातून दिसणार्‍या स्थानिक भूभागाशी कूपर अगदी व्यवस्थित परिचित होता. 'आपण आता बहुतेक टोकोमावरून जात आहोत', अशी भूभगाविषयीची सुयोग्य टिप्पणी त्याने तेथून जाताना केल्याचे, तसेच 'मेककॉर्ड एअर फोर्स तळापासून सियाटल टोकोमा विमानतळ २० मिनिटांच्या अंतरावर आहे', असे वस्तुस्थितीशी सुसंगत मतही व्यक्त केले. फ्लोरेन्सच्या मते कूपर अतिशय शांत, आदबशीर आणि सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलत होता. या पूर्ण काळात त्याने कधीही आक्रस्ताळेपणा केला नाही. कधीही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे क्रूर वर्तन केले नाही किंवा त्यावेळी विमान अपहरणकर्त्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे 'मला तत्काळ क्युबाच्या दिशेने घेऊन चला' अशा प्रकारची मागणीही केली नाही. दुसर्‍या एक महिला कर्मचारी मेक्लोव्हने नंतर तपास अधिकार्‍यांसमोर दिलेल्या जबाबाप्रमाणे 'तो कधीही तणावाखाली आला आहे असे वाटले नाही, पूर्ण अपहरणनाट्यात तो विचारपूर्वक वागत होता, तो एक चांगला माणूस होता'. त्याने पुन्हा एकदा काही पेये मागवली. फ्लोरेंसला त्याचे बिलही अदा करून 'कीप द चेंज' असेही सांगितले. सियाटलला उतरल्यावर विमानातील कर्मचार्‍यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्याचीदेखील त्याने मागणी केली.

या अपहरणनाट्यात जमिनीवरही वेगाने घटना घडत होत्या. तपासयंत्रणा आणि हवाई वाहतूक व्यवस्थापनापुढे केवळ तीस मिनिटांत डॅन कूपरच्या अटींप्रमाणे रक्कम जमा करून त्यांची योग्य पद्धतीने नोंद करून, तसेच चार पॅराशूटचीही व्यवस्था करून डॅन कूपर पर्यंत पोहचवण्याचे आव्हान होते. अमेरिकन गुप्तचर संस्था 'एफ.बी.आय'ने सियाटलच्या विविध बँकांमधून २० डॉलरच्या १०,००० कोणत्याही खुणा नसलेल्या नोटा गोळा करून त्यांच्या क्रमांकाच्या नोंदी केल्या आणि 'मायक्रो फिल्मिंग' तंत्राचा वापर करून त्यांचे फोटोही काढण्याची जबाबदारी पार पाडली. सुयोग्य पॅराशूट शोधण्याचे काम सियाटल पोलिसांनी स्वीकारले. मात्र नोटा जमा करण्यापेक्षाही पॅराशूट मिळवणे अधिक अवघड झाले. सुरुवातीला अतिशय सोपे वाटणारे काम तेवढेच जिकिरीचे ठरले. टोकामा येथील हवाई दलाच्या तळावरील अधिकारी त्यांच्याकडील पॅराशूट द्यायला राजी झाले होते. परंतु ही देऊ करण्यात आलेली लष्कराच्या वापरात असणारी स्वयंचलित पॅराशूट स्वीकारण्यास कूपरने ठामपणे नकार दिला आणि नागरी वापरातील आणि मानवी हाताळणी करण्यास सुयोग्य अशी पॅराशूट देण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी चौकशी करून, तातडीचे दूरध्वनी करून अखेरीस सुरक्षा यंत्रणांनी स्थानिक 'स्काय डायव्हिंग' प्रशिक्षणसंस्थेत अशा प्रकारची पॅराशूट उपलब्ध होती .परंतु ही संस्था बंद होती. तिच्या मालकाला शोधून त्याच्याकडून ही पॅराशूट हस्तगत करून सुटकेचा नि:श्वास टाकला.

दरम्यान ही तयारी चालली असतांना दोन तास आकाशातच घिरट्या घालत असलेल्या विमानातील अपहरणकर्ता कूपरला सायंकाळी ०५.२४ वाजता त्याच्या अटींची पूर्तता झाल्याचे कळवण्यात आल्यानंतर ५ वाजून ३८ मिनिटांनी हे विमान सियाटल टोकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विमान उतरताच धावपट्टीच्या वर्दळ नसलेल्या आणि चांगला उजेड असेल, अशा जागी उभे करावे असे फर्मावले. विमानातील सर्व दिवे प्रज्ज्वलित करण्यास सांगितले. 'नॉर्थवेस्ट एअरलाईन'चे वरिष्ठ व्यवस्थापक, अल ली यांनी नेहमीचा गणवेश परिधान करून गेल्यास ते सुरक्षा यंत्रणेचे सदस्य आहेत, असा समज होऊ नये म्हणून साध्या वेषात नॉर्थवेस्टच्या वाहनातून विमानाजवळ गेले. कूपरने मेक्लोव्हला विमानाची शिडी उतरवून खाली जाण्यास फर्मावले. एक कर्मचारी पॅराशूट ठेवलेली बॅग शिडीवर ठेवून आला. खंडणीची रक्कम बँकेच्या जाड कॅन्व्हासच्या पिशवीत ठेवली होती. अटीची पूर्तता होताच सर्व प्रवासी, फ्लोरेंस आणि आणखी एक वरिष्ठ महिला कर्मचारी यांना मुक्त केले.

दरम्यानच्या काळात मेक्लोव्हच्या मदतीने विमानाची शिडी उतरवण्यासंबंधीच्या सूचना कूपरने काळजीपूर्वक वाचल्या. आणीबाणीच्या प्रसंगी उड्डाणादरम्यान शिडी उतरवणे अशक्य असल्याचे मेक्लोव्हने सांगताच 'तिचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे' हे त्याने आत्मविश्वासपूर्वक परंतु शांतपणे तिला सांगितले. विमानात इंधन भरले जात असताना वैमानिक आणि विमानातील इतर तांत्रिक कर्मचार्‍यांना पुढील प्रवासासाठी कार्यक्रम सांगितला. विमानोड्डाणासाठी आवश्यक किमान वेग १०० नॉट वेगाने, १०,००० फूट उंचीवरुन दक्षिण-पूर्वेला मेस्किको सिटीच्या दिशेने उड्डाण करायचे होते. त्याशिवाय विमानाचे लँडिंग गियर विमान उतरताना असतात त्या स्थितीत ठेवणे, विमानात हवेचा दबाव कृत्रिमपणे कायम ठेवलेला असतो. त्यामुळे अतिशय उंचीवरून उडतानादेखील प्रवाशांवर बाह्य वातावरणाचा प्रभाव पडत नाही. मात्र वैमानिक स्वत:हून अधिक उंचीवर जाऊ नये, म्हणून अशाप्रकारे कृत्रिम दबाव निर्माण करू नये. डाव्या बाजूच्या विंग फ्लेप १५ अंशांपर्यंत झुकवणे, अशा तांत्रिकदृष्टीने अचूक सूचना त्याने दिल्या. सहवैमानिक विल्यम याने त्याला 'या सर्व व्यवस्थेमुळे १६०० कि.मी. प्रवासानंतर मेक्सिको सिटीला पोहोचण्यापूर्वी पुन्हा एकदा इंधन भरण्याची गरज भासेल' असे सांगितल्यावर कूपरने विल्यमशी सल्लामसलत करून रेनो, नेवाडा येथे पुन्हा एकदा इंधन भरण्यासाठी उतरण्याची तयारी ठेवण्यास सांगितले. ही चर्चा विमानातील अंतर्गत दूरध्वनीव्यवस्थॆचा वापर करून कूपरने आपल्या आसनावर बसूनच कॉकपिटमधील सहवैमानिकाशी केली. दरम्यान 'फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन'च्या अधिकार्‍यांनी केलेली विमानात समोरासमोर भेटण्याची विनंती मात्र त्याने स्पष्टपणे फेटाळून लावली. इंधन भरणार्‍या ट्रकमध्ये काही बिघाड निर्माण झाल्यामुळे इंधन भरण्यास विलंब होऊ लागला तसा कूपर अस्वस्थ झाला.

अखेरीस संध्याकाळी ७.४६ वाजता विमानतळावर उतरल्यानंतर दोन तास सहा मिनिटांनंतर विमान पुन्हा एकदा मेक्सिको सिटीच्या दिशेने आकाशात झेपावले. त्याने मागच्या बाजूचा दरवाजा उघडा ठेवून विमानाची शिडी तशीच बाहेर ठेऊन उड्डाण करण्याची मागणी मात्र सुरक्षेच्या कारणावरुन 'नॉर्थवेस्ट'ने फेटाळली. कूपरच्या मते त्यामध्ये काहीच धोका नव्हता, मात्र यावरून वाद न घालता गप्प राहणेच त्याने पसंत केले. आता विमानात कूपरव्यतिरिक्त फक्त वैमानिक स्कॉट, सहवैमानिक रताझाक, उड्डाण अभियंता अँडरसन आणि हवाई सेविका मेक्लोव्ह एवढेच उपस्थित होते. अमेरिकन हवाईदलाची दोन लढाऊ विमाने काही अंतर राखून या विमानाच्या मागावर होती.

उड्डाणानंतर लगेचच कूपरने हवाईसेविका मेक्लोव्हला इतर सहकार्‍यांबरोबर कॉकपिटमध्ये जायला सांगितले. जाताना दरवाजाही बंद करून जाण्याची सूचना त्याने दिली. जाताना तो कमरेला काहीतरी बांधत असल्याचे तिने पाहिले. या विमानांत कॉकपिटमधून प्रवाशांच्या कक्षात पाहण्यासाठी काहीच व्यवस्था नव्हती. त्यावेळच्या काही विमानांत दरवाज्याला असलेल्या छिद्रातून प्रवासी कक्षात लक्ष ठेवता येत असे. हल्लीच्या अनेक विमानात लावलेल्या कॅमेर्‍यातूनदेखील लक्ष ठेवता येते. मात्र अशी कोणतीही सुविधा या विमानात उपलब्ध नव्हती. वीस मिनिटांनंतर साधारणत: आठ वाजण्याच्या सुमारास कॉकपिटमध्ये 'हवाई शिडी' जवळचा दरवाजा उघडला गेल्याचा संदेश देणारा लाल दिवा प्रकाशित झाला. विमानातील कप्तान स्कॉटने अंतर्गत दूरध्वनीवरून 'काही मदत पाहिजे आहे का, अशी विचारणा करताच 'नको, धन्यवाद' असे उत्तर मिळाले. काही वेळातच कॉकपिटमधील कर्मचार्‍यांना विमानातील हवेच्या दाबात मोठा फरक जाणवला. विमानाचा मागच्या बाजूचा दरवाजा उघडला गेल्याचे कॉकपिटमधील सर्वांना जाणवले. ८.१३ वाजता विमानाच्या मागच्या भागात अचानक मोठी हालचाल झाल्यामुळे विमानाला हेलकावे बसले आणि त्यानंतर सर्व काही शांत झाले. दोन तासांनंतर रात्री १०.१५ वाजता नियोजित कार्यक्रमानुसार विमान रेनो, नेवाडा येथे शिडी बाहेरच्या बाजूला उतरवलेल्या अवस्थेत असतानाच उतरले. पाच मिनिटांपर्यंत कॉकपिटमधील कर्मचारी अधीरपणे पुढील सूचनांची वाट पाहत होते. कप्तान स्कॉटने पुन्हा एकदा अंतर्गत दूरध्वनीवरून विचारणा केली, मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून काळजीपूर्वक कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात आला. प्रवासी कक्ष पूर्णत: रिकामा होता!! त्याला पुरविण्यात आलेल्या पॅराशूटपैकी दोन पॅराशूट, खंडणीची रक्कम, बाँब असलेली बॅग, कोट, हॅटसह कूपर गायब झाला होता.

तत्काळ एफ.बी.आयचे एजंट, स्थानिक सुरक्षा यंत्रणा, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, याशिवाय विविध सुरक्षा यंत्रणांच्या कर्मचार्‍यांनी विमानाला घेराव घातला, कारण त्यावेळेपर्यंत कूपरने पलायन केल्याचे या यंत्रणांना ठाऊक नव्हते. सशस्त्र दलाच्या सैनिकांनी विमानाची कसून तपासणी केली तेव्हाच कूपरने सर्वांच्या हातावर तुरी दिल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट झाले. त्याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांवर येऊन पडले होते. देशाचे कायदे धाब्यावर बसवत, आपल्या मर्जीप्रमाणे सर्व घटनाक्रम घडवून आणत एक प्रकारे सर्वच यंत्रणांची त्याने चेष्टाच केली होती. सामान्य माणसांना त्याच्या अचाट साहसाचे काहीसे कौतुकच वाटत होते. त्याने कोणालाही इजा पोहोचवली नसल्याने तो एका रात्रीत हिरो झाला होता. पण त्याच्या तपासाचे काम जवळपास आठ वर्षे पहाणार्‍या एफ.बी.आय एजंट राल्फ हिमेल्सबेच यांच्या मते तो एक अट्टल गुन्हेगार होता, त्याने आपल्या स्वार्थासाठी जवळपास ४० जणांचे जीव पणाला लावले होते, तो एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि देशाच्या कायद्यांचा मान न ठेवणारा अपराधी होता. त्याचे कृत्य जराही कौतुक करण्यासारखे नव्हते.

स्थानिक पोलिस आणि एफ.बी.आय. एजंट यांनी तत्काळ मोठी शोधमोहीम हाती घेतली. संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. किरकोळ गुन्ह्यांची नोंद असणार्‍या आणि अपहरणकर्ता डॅन कूपरच्या नावाशी साम्य असणार्‍या ओरिगॉनच्या डी.बी. कूपर याचीही पोर्टलँड पोलिसांनी तो स्वत: किंवा त्याचे नाव वापरून त्याच्या परिचितांपैकी इतर कोणी या अपहरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याचीही कसून चौकशी करण्यात आली. मात्र ही शक्यता लगेचच पुराव्यानिशी निकालात निघाली. परंतु एका अननुभवी पत्रकाराने सनसनाटी बातमी लवकरात लवकर पाठवण्याच्या घाईगडबडीत अपहरणकर्त्याचे नाव 'डॅन कूपर' असे लिहिण्याऐवजी संशयावरुन ज्याची चौकशी करण्यात आली त्या डी.बी. कूपरचेच नाव बातमी पाठवताना लिहिले. तेच नाव वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आणि गेली ४२ वर्षं तपासात आणि जनमानसात कायम आहे.

तपासयंत्रणांवर कूपरचा शोध घेण्याची अतिशय आव्हानात्मक परिस्थिती उभी ठाकली होती. विमानाच्या वेगाचा, त्यावेळच्या विमानाच्या हवाईमार्गातील हवामानाच्या स्थितीचा अंदाज जरादेखील चुकल्यास कूपरच्या जमिनीवर पोहोचण्याच्या संभाव्य ठिकाणामध्ये मोठा फरक पडणार होता.

विमानातून उडी मारल्यानंतर किती वेळ जमिनीच्या दिशेने कोसळत राहिल्यानंतर त्याने पॅराशूट उघडली असावी, हा सर्वांत जास्त विचार करण्याचा मुद्दा होता. कारण उंची आणि वेळेत पडणारा थोडासा फरकदेखील त्याच्या जमिनीवर पोहोचण्याच्या संभाव्य ठिकाणात फार मोठा फरक पाडणार होता. अपहृत विमानावर नजर ठेवणार्‍या हवाईदलाच्या विमानातील वैमानिक अथवा रडारवर अपहृत विमानातून कोणी उडी मारताना, पॅराशूट उघडताना दिसले नव्हते. अर्थात, एकतर हवाई दलाची दोन्ही विमाने सुरक्षित अंतर राखून होती म्हणून अपहृत विमान त्यांच्या नजरेच्या टप्प्यात कधीच नव्हते आणि १९७१मध्ये उपलब्ध असणार्‍या लक्ष ठेवणार्‍या उपकरणांच्या मर्यादित कार्यक्षमतेमध्ये वादळी पाऊस, अंधारी रात्र अशा वातावरणात संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान करून मारलेली उडी नजरेतून सुटणे सहज शक्य होते, तेच या घटनेत घडले.

अपहरणाच्या रात्रीचा नक्की घटनाक्रम कसा असावा, याचा अभ्यास करण्यासाठी तशाच प्रकारच्या उड्डाणाची, त्याच विमानातून, त्याच तांत्रिक तपशील आणि त्याच वैमानिकासह पुनरावृत्ती करण्यात आली. विमानातून ९१ किलो वजनाची गोणी खाली टाकण्यात आली, त्यावेळी विमानाच्या मागच्या भागात अगदी तशीच हालचाल जाणवली जशी अपहरणाच्या दिवशी रात्री ८.१३ला झाली होती. त्यावेळी अपहृत विमान दक्षिण पश्चिम वॉशिंग्टन प्रांतातील लेविस नदीवरून जात असावे आणि त्यावेळी तेथे होत असलेल्या वादळी पावसातून जात असावे, अशा निष्कर्षापर्यंत एफ.बी.आय. पोहोचली. यावरून कूपरच्या जमिनीवर पोहोचण्याच्या संभाव्य ठिकाणांचा अंदाज काढला. माउंट सेंट हेलेन, मार्विन धरणाचा भाग या भागांसह लेविस नदीच्या पात्रालगतच्या क्लार्क आणि कौलीझ प्रांतांवर तपासाचे लक्ष केंद्रित केले गेले. एफ.बी.आयचे एजंट आणि शेरीफच्या कर्मचार्‍यांनी पायी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने डोंगराळ भाग, त्या भागातील प्रत्येक घर, फार्म हाऊस या ठिकाणी जाऊन करून तपास केला, चौकशी केली. इतर शोधपथकांनी मार्विन धरण आणि त्याच्या लगतच पूर्वेला असलेल्या याले धरणाच्या पात्रात बोटीच्या साहाय्याने पिंजून काढले. मात्र एवढे करूनही कूपरचा काहीच मागमूस लागला नाही किंवा तो त्या ठिकाणी उतरला असावा, असे दर्शवणारा काहीही पुरावा आढळला नाही किंवा पॅराशूट किंवा तत्सम उपकरणांचाही काही अंश मिळाला नाही.

एफ.बी. आयने सियाटल ते रेनो या संपूर्ण मार्गाचे (हवाई उड्डाणाच्या संदर्भात जव़ळपास ५००० फूट इतक्या कमी उंचीवरुन उड्डाण करता येईल अशा प्रवास नियोजनाला व्हिक्टर २३ हे सांकेतिक नाव आहे.) ओरिगॉन आर्मी नॅशनल गार्डच्या मदतीने विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे सर्वेक्षण केले. यावेळी अनेक झाडांचे तुटलेले शेंडे, हवाई मार्गातून जमिनीवर पडलेल्या पॅराशूटचे भाग, प्लास्टिकच्या अनेक वस्तू यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. मात्र त्यापैकी कोणतीच वस्तू कूपरशी निगडित नव्हती.

अपहरणाच्या घटनेला जवळपास चार महिने होत आले होते. हाती अजूनही काहीच लागले नव्हते.
हिवाळा संपताच मार्च, १९७२मध्ये पुन्हा एक मोठी शोध मोहीम एफ.बी.आयने हाती घेतली. एफ.बी.आयचे एजंट, सैन्यदलाचे २०० जवान, हवाईदल, नॅशनल गार्ड ट्रूपच्या तुकड्या, सामान्य स्वयंसेवक यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यांत मिळून ३६ दिवस क्लार्क आणि कौलीझ प्रांतात कसून तपास केला. २०० फूट खोल मार्विन धरणाच्या पात्रात शोध घेण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक एक्स्प्लोरेशन कंपनी' या खोल पाण्यात शोध घेणार्‍या आस्थापनेच्या पाणबुडीच्या मदतीने इंचन्‌इंच शोध घेतला. क्लार्क प्रांतातील दोन महिलांना एक मानवी सांगाडा आढळला, मात्र तपासाअंती तो काही महिन्यांपूर्वी खून झालेल्या एक किशोरवयीन मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. अखेरीस अमेरिकेच्या इतिहासातील एका मोठ्या शोधमोहिमेची काहीच हाती न लागता इतिश्री झाली.

१९७१ वर्षाच्या शेवटी एफ.बीआयने कूपरला दिलेल्या नोटांचे क्रमांक वित्तीय संस्था, कॅसिनो चालक, रेसकोर्स, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणार्‍या इतर संस्थांना कळवले. नॉर्थवेस्ट एअरलाईनसह इतरांनीही ही रक्कम अथवा या रकमेचा काही भाग परत करणार्‍यांना बक्षिसे जाहीर केली, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेरीस १९७५मध्ये मिनिसोटा सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून नॉर्थवेस्टला विमा सेवा पुरवणार्‍या कंपनीने खंडणीपोटी दिलेल्या रकमेची भरपाई केली.

वेळोवेळी या अपहरणाशी संबंधित असणार्‍या किंवा या घटनेशी निगडित आहेत असे वाटणार्‍या वस्तू सापडत गेल्या. अपहृत विमानाच्या शिडीवर ती खाली उतरवण्यासंबधीचे सूचनापत्रक १९७८मध्ये वॉशिंग्टन प्रांतातील कॅसल रॉकपासून २१ किमी.वरील जंगलात एका शिकार्‍याला मिळाले. ही जागा मार्विन धरणाच्या बर्‍याच उत्तरेला, परंतु फ्लाईट ३०५च्या नियोजित प्रवास मार्गाच्या दरम्यान होती.

फेब्रुवारी १९८०मध्ये ब्रायन इनग्राम नावाच्या आठ वर्षाच्या मुलाला कोलंबिया नदीपात्रालगतच्या भागात शेकोटीसाठी खड्डा खणत असताना कूपरला दिलेल्या रकमेपैकी नोटांच्या तीन गड्ड्या सापडल्या. ही जागा व्हँकव्होवर, वॉशिंग्टनपासून ९ किमी अंतरावर होती. यापैकी दोन गड्ड्यांमध्ये प्रत्येकी १०० आणि एका गड्डीत ९० नोटा होत्या. त्या रबरबँड्ने जशा बांधलेल्या होत्या त्याच अवस्थेत होत्या. एफ.बी.आयने या नोटा कूपरला दिलेल्या रकमेचाच भाग असून त्या ज्या क्रमाने ठेवण्यात आल्या होत्या त्याच क्रमाने आहेत, असा निर्वाळा दिला.

Money_stolen_by_D._B._Cooper.jpg
सापडलेल्या नोटा

या नोटा सापडल्यामुळे तपासाला नवी दिशा तर मिळालीच, परंतु त्याबरोबर अनेक नवे प्रश्न निर्माण केले. तपासयंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार या नोटा कोलंबिया नदीला येऊन मिळणार्‍या अनेक प्रवाहांपैकी एखाद्या प्रवाहातून वाहतवाहत कोलंबिया नदीला येऊन मिळाल्या असाव्यात. या नोटा नष्ट होऊ लागल्या होत्या. या विषयातील अभ्यासकांच्या मते त्या ज्या पद्धतीने नष्ट होऊ लागल्या होत्या त्यावरून आणि त्या ज्या पद्धतीने एकमेकांना चिकटल्या होत्या, त्यावरून हे स्पष्ट होते, की त्यांना कोणी जाणूनबुजून पुरले नव्हते, तर नदीच्या प्रवाहाच्या परिणामस्वरूप त्या आपोआप जमिनीत गाडल्या गेल्या असाव्यात. मात्र यावरून हेही स्पष्ट होते, की कूपरची जमिनीवर पोहोचण्याची संभाव्य जागा मार्विन धरण अथवा लेविस नदी नसावी कारण नोटा सापडलेली जागा लेविस नदी कोलंबिया नदीला मिळते त्या ठिकाणापासून आणि मार्विन धरणापासून बरीच अलीकडे होती. परंतु 'नोटा वाहत आल्या असाव्यात या विचारसरणीला मान्यता देण्यात काही अडचणी होत्या. एका गड्डीतल्या दहा नोटा कोठे गेल्या याचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नाही. दिलेल्या एकूण रकमेतून नोटांच्या तीनच गड्ड्या कशा वेगळ्या झाल्या, या प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मिळत नाही. पाण्यात पडलेल्या नोटा साधारणत: दोन वर्षातच नष्ट होतात. म्हणजेच १९७४च्या आसपास या नोटा नष्ट व्हायला पाहिजे होत्या. त्या १९८०पर्यंत कशा काय टिकून राहिल्या, हे स्पष्ट होत नाही. १९७४मध्ये नोटा ज्या भागात सापडल्या त्या भागात काही संशोधकांनी उत्खनन केले होते. त्यावेळी तेथील वाळूमध्ये मातीच्या काही थरांचे आवरण मिळाले होते. त्यांचा अभ्यास करून या नोटा १९७४नंतर बर्‍याच काळाने या भागात पोहोचल्या असाव्यात, असा निष्कर्ष निघतो.

या नोटा तेथे कशा पोहोचल्या असाव्यात, याबाबत अनेक अंदाज बांधले गेले. काहींच्या मते त्या इतरत्र कोठेतरी एखाद्या व्यक्तीला अथवा वन्य प्राण्यांना सापडल्या असाव्यात आणि येथे पुरल्या असाव्यात. कौलीझ प्रांताच्या शेरीफच्या मते विमानातून उडी मारतानाच कूपरकडून या नोटा चुकून पडल्या असाव्यात, या नोटा वापरता येणार नाहीत, हे लक्षात आल्यामुळे कूपरनेच या नोटा नदीत फेकल्या असाव्यात किंवा इथे आणि इतरत्र पुरल्या असाव्यात, असे मत स्थानिक वर्तमानपत्राने व्यक्त केले. मात्र नोटा येथे कशा आल्या, या प्रश्नाचे कोणतेही उत्तर समाधानकारकपणे मिळत नाही. १९८६मध्ये या नोटांपैकी एफ.बी.आयने १४ नोटा नमुने आणि पुराव्यासाठी आपल्याकडे ठेऊन उरलेल्या नोटा समप्रमाणात ब्रायन इनग्राम आणि नॉर्थवेस्टला विमा सेवा पुरवणारी कंपनी यांना देण्यात आल्या. २००७मध्ये इनग्रामने त्याच्या वाट्याच्या नोटांपैकी १५ नोटा लिलावात विकून ३७,००० डॉलरची कमाई केली. या २९० नोटांव्यतिरीक्त ९७१० नोटांचा अद्यापही काहीच मागमूस लागलेला नाही.

या नोटा मिळाल्यानंतर नदीच्या पात्रात शोध घेताना एक मानवी कवटी सापडली. अधिक तपासात ती एका स्थानिक वंशाच्या महिलेची असल्याचे कळून आले.

१९८८मध्ये कोलंबिया नदीच्या याच भागातील पात्रातून एक पॅराशूट पृष्ठ भागावर तरंगताना आढळले.एफ.बी.आयने केलेल्या तपासात ते कूपरशी संबंधित नसल्याचे आढळून आले. २००८मध्येही मार्विन धरणाच्या दक्षिणेला १० कि.मी अंतरावर एक पॅराशूट सापडले. मात्र ते दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील सैन्यदलाच्या वापरातले असल्याचे निष्पन्न झाले.

थोडक्यात गेल्या ४२ वर्षात संभाव्य जागेच्या आसपास सापडलेल्या अनेक वस्तू, मानवी अवशेष यांपैकी केवळ २९० नोटा आणि विमानाच्या शिडीचे सूचनापत्रक या दोनच वस्तू कूपरच्या घटनेशी संबंधित असल्याचे पुराव्याने शाबीत झाले आहे.

कूपरने अपहरणाच्या दिवशी विमानात सोडलेल्या टायवर सापडलेल्या जैविक नमुन्यांवरुन त्याचा अंशत: डी.एन.ए. तयार केला आहे, तसेच त्याच्या टायवर टिटॅनियमचे अंश सापडले होते. १९७१च्या सुमारास अमेरिकेत टिटॅनियम सहजी उपलब्ध नव्हते. रासायनिक प्रक्रीया करणार्‍या, अथवा धातूंवर प्रक्रीया करणार्‍या आस्थापनांमध्येच उपलब्ध होते. त्यावरून तो यांपैकी एखाद्या आस्थापनात काम करत असावा असा संशय एफ.बी.आयला आहे.

एफ.बी.आयने त्या दिवशी काय घडले असावे हे वेळोवेळी सापडलेल्या पुराव्यांवरुन यासंबंधी अंदाज व्यक्त केले आहेत.

कूपरचे वर्णन त्या दिवशी त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींकडून मिळवण्यात आले. त्या दिवशी त्याच्या संपर्कात सर्वांत जास्त काळ राहिलेल्या दोन हवाईसेविका फ्लोरेंस आणि मेक्लोव्ह यांचा जबाब त्याच रात्री सियाटल आणि रेनोमध्ये नोंदवण्यात आला. प्रवाशांचेही जबाब नोंदवण्यात आले. त्यांनी सर्वांनी केलेले वर्णन सुसंगत होते. तपासणी अधिकार्‍यांच्या मते कूपरने सियाटलवर विमान घिरट्या घालत असताना शहराचे अचूक वर्णन केले होते. त्यावरून तो सियाटल शहराशी चांगला परिचित असावा. त्याची आर्थिक परिस्थती फारच वाईट असावी, म्हणूनच त्याने झटपट पैसे मिळवून देणारा, परंतु अतिशय धोकादायक मार्ग अवलंबला असावा.(काहींच्या मते मात्र कूपर धाडसी प्रयोग करण्याचा शौकीन असावा आणि 'मी काहीतरी अचाट करू शकतो' हे सिद्ध करण्यासाठी त्याने हे धाडस केले असावे.)

काही तपास अधिकार्‍यांच्या मते, कूपरने बेल्जियन कॉमिक हिरो डॅन कूपरच्या साहस मालिकांवरुन प्रेरणा घेतली असावी. त्या कथांमध्ये अशा प्रकारे विमानातून उडी मारण्याचे प्रसंग आहेत. मात्र १९७०च्या दशकात या मालिका इंग्रजीत भाषांतरीत झाल्या नव्हत्या आणि त्यांचे अमेरीकेत वितरणही झाले नव्हते. कदाचित युरोपच्या व्यावसायिक प्रवासादरम्यान त्याला यासंबंधी माहिती मिळाली असावी किंवा तो कॅनडाचा रहिवासी असावा आणि तेथेच त्याला डॅन कूपरच्या साहसांबद्द्ल माहिती मिळाली असावी. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या मते त्याच्या बोलण्यात इंग्रजी बोलण्याची विशिष्ट वेगळी लकब नव्हती, त्यामुळेच तो अमेरिकनच असावा. खंडणी रक्कमेची मागणी करताना 'निगोशिएबल अमेरिकन करन्सी' असा उल्लेख अमेरिकन व्यक्तींप्रमाणे त्याने केला होता आणि जर तो अमेरिकन नसेल, तर तो कॅनेडियन असण्याची शक्यताच जास्त होती, कारण त्यांचे इंग्रजी उच्चारही अमेरिकन लोकांप्रमाणेच असतात.

एफ.बी.आयच्या शोधपथकांच्या मते, कूपर योजना बनवण्यात आणि त्या ठामपणे राबवण्यात निष्णात असावा. त्याने चार पॅराशूटची मागणी फारच चातुर्याने केली होती. त्यामुळे तपास यंत्रणा बुचकळ्यात पडल्या. तो त्याच्याबरोबर विमानातील कर्मचारी अथवा ओलिस ठेवलेले प्रवासी यांपैकी कोणालातरी आपल्याबरोबर उडी मारायला भाग पाडेल, त्यामुळे जाणूनबुजून उडी मारण्यास योग्य नसलेले पॅराशूट तपास यंत्रणा देणार नाहीत, याची त्याला खात्री होती. त्याने जाणीवपूर्वक अपहरणासाठी बोईंग ७२७ -१०० प्रकारच्या विमानाची निवड केली. या प्रकारच्या इंजिनांची रचना अशाप्रकारे असते, की ज्यामुळे विमानाच्या मागच्या बाजूची शिडी इंजिन अथवा इतर कोणताही अडथळा न येता खाली येऊ शकते, ती दरवाज्याच्या जवळच असणार्‍या एका नियंत्रकाद्वारे नियंत्रित करता येते. त्याला कदाचित व्हिएतनाम युद्धात अशाच प्रकारची विमाने शत्रूराष्ट्रात सैनिक आणि इतर सामान विमानातून खाली सोडण्यासाठी वापरली गेली होती, याचीदेखील माहिती असावी. तसेच इंजिन दरवाज्यापासून बरीच दूर आणि वरच्या बाजूला असल्यामुळे या प्रकारच्या विमानातून उडी मारण्यात तुलनेने खूपच कमी धोका होता. त्याला या विमानाच्या काही खास वैशिष्ट्यांचीदेखील जाणीव होती. या प्रकारच्या विमानाला हवेत उडत राहण्यासाठी आवश्यक किमान वेग किती असावा, याची त्याला बरोबर कल्पना होती. इतर आकाराने मोठी विमाने १५० नॉट या वेगाने उडू शकत नाहीत. डाव्या बाजूच्या विंग फ्लेप '१५ अंशांपर्यंत झुकवणे' यांसारखी वैशिष्ट्ये केवळ ७२७-१०० याच विमानात उपलब्ध होती. त्याला या विमानात इंधन भरण्यास किती वेळ लागतो, हे निश्चित माहीत होते. सियाटलला इंधन भरणार्‍या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नियमित वेळापेक्षा जास्त वेळ लागल्यावर त्याने होणार्‍या उशिराबद्दल स्पष्टीकरण मागितले होते.

त्याच्या नियोजनाचे कौशल्य एकीकडे स्वीकारतानाच एफ.बी.आय लगेचच त्याच्या विमानातून जमिनीवर झेप घेण्याच्या अनुभवाबाबत आणि कौशल्याबाबत मात्र गंभीर शंका उपस्थित करते. एजंट कारच्या मते 'सुरुवातीला आम्ही त्याला एक अनुभवी स्काय डायव्हर किंवा प्रशिक्षित हवाई सैनिक मानत होतो. मात्र काही महिन्यांच्या अभ्यासानंतर मात्र हे मत बदलले. कोणताही अनुभवी स्काय डायव्हर काळोख्या रात्री, जोरदार पावसात, ताशी ३५० कि.मी, वाहणार्‍या वार्‍यात, -७ अंश तापमानात केवळ रेनकोट परिधान करून विमानातून बाहेर उडी मारण्याचा धोका पत्करणार नाही. अशा वातावरणात उडी मारणे फारच धोकादायक होते. शिवाय त्याने वापरलेले दुसरे पॅराशूट केवळ प्रात्यक्षिक दाखवणारी प्रतिकृती होती, वापरलेले पॅराशूट त्याला पुरवण्यात आलेल्या दुसर्‍या पॅराशूटपेक्षा जुने आणि कमी गुणवत्तेचे होते. यावरून तो स्काय डायव्हिंगबाबत अननुभवी होता हेच दिसून येते. कूपर प्रत्यक्षात हवाई दलातील अनुभवी सैनिक असावा ही शक्यता फेटाळून लावत कार म्हणतो की, प्रत्यक्षात तो मालवाहू विमानात सामानाची चढउतार करणारा कर्मचारी असावा. कारण त्यांना विमानातून सामान जमिनीवर टाकण्याचे, आणीबाणीच्या प्रसंगी पॅराशूट वापरण्याचे आणि विमानातून बाहेर उडी मारण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. मात्र हे अगदीच जुजबी असते. ज्या परिस्थितीत कूपरने उडी मारली, त्या परिस्थितीत अशा उडीतून सहीसलामत वाचण्याएवढे कौशल्य अशा प्रशिक्षणातून मिळत नाही.

एफ.बी.आयचे अगदी सुरुवातीपासूनचे मत आहे, की या उडीतून कूपर जिवंत जमिनीवर पोहोचला नसावा. अशा प्रतिकूल आणि वादळी हवामानात कोणत्याही स्वरूपाचे नियोजन नसताना, बरोबर आवश्यक उपकरणे नसताना, आंधळी उडी मारल्यानंतर त्याला कदाचित पॅराशूट उघडण्याची संधीही मिळाली नसेल आणि यदाकदाचित तो जिवंत जमिनीवर पोहोचला असता, तरी त्या वातावरणात डोंगराळ भागात जिवंत राहणे केवळ अशक्य होते. उडी मारण्याचे ठिकाण निश्चित करून त्यानुसार उडी मारल्यासच त्याला वाचण्याची थोडीफार संधी होती. मात्र त्यासाठी त्याला विमानातील कर्मचार्‍यांशी संगनमत करणे आवश्यक होते. मात्र तशी शक्यता दाखवणारे कोणतेच पुरावे नाहीत. तसेच त्याच्या उडीचे निश्चित ठिकाणही ज्ञात नाही. अशा पद्धतीने काही महिन्यांनंतर विमान अपहरण करणार्‍या व्यक्तीला विमानातून उडी मारून जिवंतपणे जमिनीवर पोहोचण्यात यश मिळाले होते, मात्र काही दिवसांत त्याला अटक करण्यात आली होती.

तपास अधिकारी हिमेल्सबेच्या म्हणण्याप्रमाणे, ही उडी घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला असावा. मात्र असे असेल तर त्याचा मृतदेह, अथवा अवशेष, नोटा, पॅराशूट यांचा अद्यापपर्यंत काहीच मागमूस कसा लागला नाही, या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर अनेकांना पटणारे नाही. त्याच्या मते सर्वच तपास चुकीच्या ठिकाणी केला गेला आहे.

या अपहरणासंदर्भात अनेक व्यक्तींवर संशय व्यक्त केले गेले. त्यांचा एफ.बी.आय.ने कसून शोधही घेतला. मात्र यांपैकी डी.बी. कूपर असावा, असे ठामपणे म्हणता येईल, अशी एकही व्यक्ती सापडली नाही.

या अपहरणनाट्यात तो पलायन करण्यात यशस्वी झाला असावा, असे ज्याप्रमाणे १०० टक्के सिद्ध होत नाही त्याच प्रमाणे त्याचा दुर्दैवी अंत झाला असावा, हेही नि:संदिग्धपणे सिद्ध होत नाही, हेही खरेच. त्यामुळे जर त्याचा अंत झाला नसेल, तर अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे तो मानवी इतिहासातील सर्वांत भाग्यवान माणूस असावा.

संदर्भ:

  1. विकिपीडियामधील लेख http://en.wikipedia.org/wiki/D._B._Cooper
  2. क्राईम लायब्ररीमधील लेख http://www.trutv.com/library/crime/criminal_mind/scams/DB_Cooper/index.html
  3. 'टाइम' नियतकालिकातील लेख http://content.time.com/time/specials/packages/article/0,28804,1846670_1...
  4. 'न्यूज ट्रिब्युन'मधील मुलाखत http://www.thenewstribune.com/2013/08/19/2738107/hunting-db-cooper.html

सर्व प्रकाशचित्रे विकिपीडियावरून साभार (Public Domain)

- लाल टोपी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

खूप इन्टरेस्टिंग वाटला हा लेख!

छान. थरारक आहे लेख.

थरारक !

मस्त लेख!

सुंदर लेख आणि मांडणी!!

नविन माहिती मिळाली. धन्यवाद.

interesting.

इन्टरेस्टिंग! वेगळा लेख. आवडला.

लेख इन्टरेस्टिंग आहे. मस्त. :)

रोचक लेख

मस्त !!

खुप आवडला. थरारक...

थरारक....

छान आहे लेख.

मस्त लेख. :)

खरंच एकदम चित्तथरारक!

नविन माहिती मिळाली. एकदम इन्टरेस्टिंग लेख.

इंटरेस्टिंग लेख.

मस्त लेख. सिनेमाची कथाच वाचत असल्यासारखे वाटले. धन्यवाद.

इंटरेस्टिंग

इंटरेस्टिंग.

खूप इन्टरेस्टिंग वाटला हा लेख!

मस्त लेख. आवडला/

मस्त लेख .. माहिती उत्तम प्रकारे संकलीत केली आहे .. :)

मस्त लेख. धन्यवाद एका सुरस गुन्हेगारी कथेची ओळख करून दिल्याबद्दल.
'प्रिझन ब्रेक' ह्या अमेरिकन टीव्ही सिरीजमध्ये डी बी कूपर जेलमध्ये असतो पण कुणालाही तो डीबीकूपर आहे हे माहिती नसते असे दाखवले आहे. तेव्हा ही कथा मला माहिती नव्हती.

इन्टेरेस्टिन्ग :)

खूप इन्टरेस्टिंग

खूप इन्टरेस्टिंग वाटला हा लेख!

अद्भुत

आज या घटनेला ५० वर्षे झाली