परिहार सेवा - काळाची गरज

माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू ठरलेलाच असतो. कधी, कुठे, कसा मृत्यू येणार ह्या तपशीलांमधे फरक पडला तरी कधी ना कधी हे घडणार हे आपल्या सगळ्यांना माहित असतं, पण आपण तो विचार कानाआड टाकून जमेल तेवढ्या उत्साहानं, आशेनं जीवनाचा उपभोग घेत असतो.

एक व्यक्ती म्हणून हे बरोबरच आहे. शेवटाच्या, भविष्याच्या विचारानं वर्तमानकाळ का खराब करायचा?
पण समाज म्हणून, समाज चालवणार्‍या संस्थांना याचा विचार करावा लागतो, तरतूद करावी लागते. त्यातूनच परिहार सेवेचा जन्म झाला.

इंग्रजीत ज्याला ’पॆलिएटिव्ह केअर’ म्हणतात त्याला मराठीत ’आधिव्याधि परिहार’ म्हणता येईल. ह्याचेच सुटसुटीत रूप - परिहार सेवा.

हा विचार प्रथम केला गेला कर्करोगाच्या रुग्णांच्या बाबतीत. खूप पुढच्या अवस्थेतला कर्करोग कशालाच दाद देत नाही, पुन:पुन्हा उद्भवत राहतो नि रुग्ण हाल हाल होऊन मरतो. असह्य वेदना, रोज नव्यानं उद्भवणारे नि वाढणारे त्रास यामुळे आसपासच्या लोकांनाही मानसिक त्रास होते, ’मृत्यूने सुटका केली, जगण्याने छ्ळले होते’ अशी ही अवस्था.

कर्करोगात शेवटी हे घडणार असं वैद्यकशास्त्रानं गृहीतच धरलं होतं, पण डेम सिसिली साँडर्स या ब्रिटिश बाईनं हे चित्र बदललं. वेदना पूर्ण थांबवणं, त्रास कमी करून आरामदायी मृत्यू येणं शक्य आहे हे तिनं सिद्ध केलं. ती नर्स असल्यानं डॉक्टर तिचं ऐकेनात, तेव्हा खटून अभ्यास करून ती डॉक्टर झाली नि स्वत:चं ’हॉस्पिस’ म्हणजे परिहार सेवा केंद्र काढलं. लंडनच्या या गंगोत्रीतून निघालेली विचारगंगा आता जगभर पसरलेली आहे. अनेकांचा दुवा घेते आहे.

आग लागली तर धोक्याची सूचना म्हणून घणघण घंटा वाजते. त्यामुळे सावध होऊन लोक धावत येतात, आग विझवतात. शेवटी होणारे त्रास ही अशीच घंटा असते, पण दुर्धर रोग असेल तर जालीम उपचारांनी मदतीऐवजी हालअपेष्टांमधे भरच पडते. अशा वेळी ही घंटा बंद करून कर्णकटू ध्वनीप्रदूषण थांबवता येतं. तसंच शेवटच्या टप्प्यावरच्या रुग्णाला रोग बरा होणारा नसला तरी प्रत्येक लक्षणानुसार उपचार करून आयुष्याचा उरलेला काळ सुखाचा करता येतो. वेदना असतील तर वेदनाशामकं, उलट्या, जुलाब, खोकला वगैरे असेल तर ते थांबवायची औषधं असं प्रत्येक लक्षणाबाबत करता येतं. अफ़ूपासून बनणारं मॉर्फिन हे एक स्वस्त, अत्यंत गुणकारी औषध यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.

रुग्णाची नि कुटुंबियांची मन:स्थिती फ़ार नाजूक झालेली असते. भीती, निराशा, हतबलता, दमणूक अशा भावनांचे झाकोळ आयुष्याला ग्रहण लावतं. या सर्वांनाच मानसिक आधार लागतो, अनेक तर्‍हांची व्यावहारिक मदत लागते, उत्तेजन लागते, शेवट सुखाचा होईल ही हमी लागते.

सुदैवानं ही ज्ञानगंगा भारतात पोचली आहे नि ठिकठिकाणी परिहारसेवा केंद्रं सुरू झाली आहेत. केरळमध्ये तर छोट्याछोट्या खेड्यातही या सेवांचं जाळं उभारण्यात आलेलं आहे.

फ़क्त कर्करोगासाठी सुरू झालेल्या या सेवांचा हळूहळू इतरही क्षेत्रात विस्तार होतो आहे. हृदयविकार, किडनीचं काम मंदावणे, वार्धक्य, मेंदूचे विकार अशा अनेक कारणांनी व्यक्ती विकलांग होते, हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करायला लागते. प्रचलित उपचारांनी व्यक्ती बरी होणं शक्य नाही हे सिद्ध झालं की अशा व्यक्तींनाही परिहार सेवेचा अपरिमित फायदा होऊ शकतो.

हे शास्त्र नवीन असल्यानं त्यात तरबेज असे वैद्यकीय व्यावसायिक (डॉक्टर, नर्स, सोशल वर्कर, फिजिओथेरपिस्ट) यांची भारतात टंचाई आहे, पण हेही चित्रं बदलतं आहे. ही सेवा उपलब्ध असणं ही काळाची निकड आहे, ती पुरी करायला सरकारी पातळीवर जाण निर्माण होणं नि मदत मिळणं जरूरीचं आहे.

वेदनारहित, शांत मृत्यूची हमी असेल तर कुणालाही मृत्यूची भीती वाटणार नाही!

- डॉ. अनुराधा सोवनी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

खूप महत्वाच्या विषयावर लेख आहे पण फार त्रोटक वाटला. अजून डिटेलमध्ये माहिती आवडली असती.
नुकतच पुण्याच्या सिपला पॅलिअटिव्ह केंद्रामध्ये माझी जवळची स्त्री नातेवाइक अ‍ॅडमिट होती तेव्हा ह्या केंद्रांचा आवश्यकता समजून आली.

>> खूप महत्वाच्या विषयावर लेख आहे पण फार त्रोटक वाटला.
+१

>> मृत्यूने सुटका केली, जगण्याने छ्ळले होते
ही मूळ ओळ 'मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते' अशी काहीशी निराळी आहे.

डॉक्टर, शक्य असल्यास आमच्या मायबोलीवर सविस्तर लिहा. विषयाचीच गरज आहे ती.

खूपच त्रोटक लेख.

खूप लहान लेख झालाय, अजून सविस्तर माहिती यायला हवी होती.

डॉक्टर, शक्य असल्यास आमच्या मायबोलीवर सविस्तर लिहा.

खूप महत्वाच्या विषयावरचा लेख .....

पण अजून सविस्तर वाचायला आवडेलच ....

या विषयाची ओळख करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

आणखी सविस्तर लेख जास्त आवड्ला असता पण लेखिका अत्यंत व्यस्त, मोठ्या कर्करोगतज्ञ आहेत त्यामुळे त्यांना किती वेळ देउन हे करता येईल याची कल्पना आहे.

सोवनीमॅडम, (तुम्ही केव्हातरी प्रतिक्रिया वाचाल या आशेने लिहीते) तुम्ही आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहात, या भावनेने आम्हा सर्व अहिल्याकन्यांना प्रचंड अभिमान आहे. तुमच्या बहुमोल कार्याला आमच्या अनंत शुभेच्छा!!!

लेख सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर, अधिकारी व्यक्तीकडून. कधीतरी विस्ताराने लिहा डॉ.सोवनी ..

<<<<ही सेवा उपलब्ध असणं ही काळाची निकड आहे>>>>> हे जर खर आहे, तर अजुन सविस्तर माहीती हवी ....
नक्की काही तरी करु शकतो ह्याची खात्री आहे .... सम्पादक मन्डळाने ह्याचि नोन्द घ्यावी ....

खूप महत्वाच्या विषयावर लेख आहे पण फार त्रोटक वाटला >>> +१

लेख त्रोटक वाटला तरी खूप छान आहे .. अजून वाचायला नक्कीच आवडेल ..

खूप लहान लेख झालाय, अजून सविस्तर माहिती यायला हवी होती.अजून सविस्तर वाचायला आवडेलच ....