झोपेचं खोबरं!

"काय मग! झोप लागली का नीट?" - कुणालाही हा प्रश्न विचारून बघा. बहुतेक लोकांकडून उत्तर मिळेल, " छ्या! का माहिती नाही, पण अधूनमधून सारखी जाग येत होती." पण त्याच माणसाच्या कुटुंबातील इतर लोक, विशेषत: 'बेटर हाफ', म्हणतील, "काय झोप लागली नाही म्हणतोय! रात्रभर चांगला घोरत होता. याच्या घोरण्यानं उलट माझीच झोप नीट झाली नाही!!"

HDA-Sleep.JPG

तर मग ही झोपेची नक्की काय भानगड आहे? शिवाय त्यात घोरण्याचं महत्त्व काय? खरंतर 'न' घोरण्याचं महत्त्व काय? स्वानुभवातून आलेलं शहाणपण जमेल तितक्या लोकांबरोबर वाटावं, हे या लेखाचं प्रयोजन. लेख वाचल्यावर शांत झोपेचं महत्त्व पटून जर स्वत:च्या झोपेविषयी कुणाचे ‘डोळे उघडले’ आणि त्यांनी शांत झोपेसाठी प्रयत्न सुरू केले, तर तेच या लेखाचं फलित!

अत्यंत महत्त्वाचा डिस्क्लेमर - मी वैद्यकशास्त्राचा जाणकार नाही! या लेखाचा उपयोग फक्त सामान्यज्ञानापुरता ठेवावा. आपल्या झोपेविषयी कृपया स्वत:च्या डॉक्टराशी चर्चा करावी! 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे झोपेच्या बाबतीतही खरं आहे. बाकी मग झोप, स्लीप अ‍ॅप्निआ, सी-पॅप मशिन / मास्क या विषयांबद्दल जनरल बोलायला, प्रोत्साहनासाठी एक मित्र म्हणून मेरा दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है!

अगदी दीडेक वर्षांपूर्वीपर्यंत मी झोपलो, की एखाद्या प्रोफेशनल स्विमरसारखा श्वास घ्यायचो! थोडक्यात म्हणजे स्विमर जसा ठरावीक वेळानं श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर डोकं काढतो, तसा मी जवळपास दर मिनिटाआड जागा व्हायचो. पण मला ते कळायचंच नाही. फक्त इतकंच समजायचं, की रात्री आपली झोप नीट झाली नाहीये, सकाळी उठवत नाहीये, दिवसभर आळसावल्यासारखं वाटतंय आणि दुपारी साधारण तीनच्या सुमारास कॉफी किंवा चहा नाही घेतला, तर राहिलेला दिवस कठीण आहे. एखाद्या गोष्टीत मन एकाग्र होण्याचे बारा वाजले होते आणि ऐन संध्याकाळी सहा - साडेसहा वाजताही कार चालवताना झोप यायची. बायकोमुलानंच काय, पण मित्रमंडळींनीही माझ्या घोरण्याचा धसका घेतला होता. छोट्याछोट्या कारणांनीही चिडचीड व्हायची आणि ब्लड प्रेशर कायम वरच्या बाजूला उडी मारायचं! हे सगळं का व्हायचं, ते कळण्यासाठी आधी आपण झोपतो तेव्हा नक्की काय होतं, ते जरा समजून घेऊ.

झोपेमुळे सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट काय होते, तर शरीराला छान विश्रांती मिळते आणि दिवसभरात शरीराची झालेली मोडतोड भरून निघते. त्यामुळे दुसर्‍या दिवसासाठी ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे म्हणतात ते वाटतं. लहान मुलांना जवळपास ९-१० तास झोपेची गरज असते, तर तरूण / प्रौढ लोकांना साधारण ७-८ तासांची शांत झोप आवश्यक असते. ती झोप जर नीट झाली नाही, तर दुसर्‍या दिवशी चिडचिड होणार, हे ठरलेलं! आपण झोपतो तेव्हा आपल्या झोपेच्या काही सायकल होतात. एक स्लीप सायकल साधारण दोन-तीन तासांची असते, म्हणजे रात्री आपण जर सात-आठ तास झोपतो, असं मानलं, तर त्यामध्ये आपल्या साधारण तीन स्लीप सायकल होतात. या स्लीप सायकलमध्ये झोपेचे काही टप्पे असतात. ते टप्पे पाहिले की आपल्याला झोपेचा जरा अंदाज येईल.

पहिल्या टप्प्यात डोळे पेंगुळायला वगैरे लागतात. हलकीहलकी पेंग यायला लागते. दरवाज्यावर कुणी टकटक केलं, तरी जाग येते. बायको आपल्याला उत्साहानं काहीतरी सांगत असते आणि आपण नुसतं 'हं… हं' करत असतो. "आता झोपतो, आपण उद्या बोलू!" हे वाक्य आपण मनातल्या मनात म्हणत असतो. हीच ती बेसावध वेळ असते, जेव्हा मध्येच कधीतरी आपला आवाज बंद होतो आणि दुसर्‍या दिवशी बायकोचा सुरू होतो!

दुसर्‍या टप्प्यात शरीराचे स्नायू छान सैल पडायला लागतात. हात-पाय वगैरे हलवायची शक्यता कमी होत जाते. 'मेंदू' नावाची आपल्या शरीरातील भन्नाट चीज जागी राहते आणि आपल्याला विश्रांती देऊ लागते. निद्राराणी आपल्याला कुशीत वगैरे घ्यायला लागते. हलक्याशा स्वप्नांत सुंदर चेहर्‍यांची झलक मिळायला लागते.

तिसर्‍या टप्प्यात आपण गाढ झोपेत जायला लागतो. गाढ म्हणजे एकदम गाढ झोप! काहीजण आपल्याला 'घोडे बेच के सो गया' म्हणतात, पण आपण लक्ष द्यायला जागेच नसतो. या झोपेतून माणसाला जागं करणं अवघड जातं. कुंभकर्ण त्याच्या झोपेचा बराच वेळ या टप्प्यात घालवत असावा! या झोपेतून माणूस एकदम दचकून जागा होतो. 'मै कहां हूं?' प्रश्न विचारणारा माणूस याच झोपेतून जागा झालेला असतो. या टप्प्यात स्नायू आणि हाडांची डागडुजी सुरू असते. त्यामुळेच म्हणतात की शरीरातील अतिरिक्त चरबी हटवायची असेल, म्हणजे fat burning, तर दिवसातल्या व्यायामप्रकारांत स्नायू कणखर करणारे (strength training) व्यायामही करावेत. या टप्प्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायचं कामदेखील चालू असतं.

त्यानंतरचा झोपेचा टप्पा म्हणजे 'रेम' -- REM (Rapid Eye Movement) sleep. ही झोप फारच महत्त्वाची असते. यात नक्की काय होतं महाराजा? तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे भन्नाट स्वप्नं पडतात. भन्नाट म्हणजे भ-न्ना-ट! आपण झोपेतच डोळे गरागरा फिरवत असतो जणू काही झपाझप हलणार्‍या चित्रांना डोळ्यांत साठवायला बघतोय. म्हणून तर नाव आहे Rapid Eye Movement! उदाहरणच द्यायचं तर, आपण 'स्पायडर मॅन' आहोत आणि 'जेन'ला वाचवायला न्यूयॉर्कच्या जंगलात इमारतींवरून उड्या मारतोय! भन्नाट स्वप्न आहे म्हणजे 'जेन' काय 'टारझन'बरोबरच असायला पाहिजे का? बरं, आता लक्षात आलं का मेंदू शरीराला का सैलावून ठेवतो ते? नाहीतर तुम्ही काय हो, खरंच पलंगावरून उड्या मारायला जायचात! दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही होते, की मेंदूतल्या स्मरणशक्तीच्या कप्प्याची साफसफाई सुरू होते. दिवसभरात आपण अनेक गोष्टी डोक्यात साठवतो. त्यातल्या अनावश्यक गोष्टींवर 'डिलिट' बटण दाबले जातं! जर REM नीट झाली नाही तर स्मरणशक्तीच्या कप्प्यात सावळा गोंधळ व्हायला लागतो. अर्थात हे काही एक दोन रात्रीत होत नाही पण काही वर्षांनंतर स्मरणशक्तीच्या तक्रारी सुरू होतात. 'अल्झायमर'सारख्या गंभीर रोगाच्या दिशेनं पावलं पडण्याची सुरुवात होऊ शकते!

मघाशी लिहिल्याप्रमाणे स्लीप सायकल्स असतात आणि पहिल्या सायकलमधली REM झोपल्यापासून साधारण दीड तासानंतर सुरू होते. पण ती जेमतेम दहा मिनिटांची असते. गंमत म्हणजे दोनतीन स्लीप सायकसमध्ये दुसर्‍या, तिसर्‍या टप्प्यातील झोप रिपीट होत असते आणि पहाटे रात्री चारच्या सुमाराची REM साधारण चांगली तासभर टिकते. रात्रीच्या अंधारात चोर्‍या करणार्‍यांनाही हे गणित माहिती असतं. का ते नक्की ठाऊक नाही पण बघा बहुतेकशा चोर्‍या पहाटे तीनचारच्या सुमारास होतात. त्यावेळेला आपल्यासारखे बरेचजण 'घोडे बेच के सो गये' असतात किंवा मग 'स्पायडर मॅन'सारख्या भन्नाट स्वप्नांत हरवलेले असतात!

आता बघूया या सगळ्यामध्ये 'घोरणं' ही भानगड कुठे येते? आपण झोपलो तरी श्वसनमार्गातून श्वासोच्छ्वास चालू असतो. म्हणजे काय? असणारच ना! तर, आठवतंय ना -- झोपेत शरीरातील सगळे स्नायू सैलावलेले असतात? श्वास घ्यायच्या मार्गातील वरच्या बाजूचे स्नायूही असेच सैलावल्यानं श्वासाचा मार्ग अरुंद होतो. त्यामुळे श्वास आत घेताना अडथळा होऊन झेंडा फडफडल्यासारखा आवाज होतो. हा आवाज म्हणजेच घोरणं! यात होतं काय, की जर हा अडथळा खूप वाढला तर घोरण्याचा आवाजही खूप वाढतो. अशा वेळेस माणसाला स्लीप अ‍ॅप्निआ असण्याची शक्यता असते. विशेषत: स्थूलपणा, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर डॉक्टरशी बोलणं चांगलं!

या सगळ्या भानगडीत एक गोष्ट लक्षात आली असेल, की श्वासोच्छ्वास नीट झाला नसल्यानं आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मेंदूला सिग्नल जायला लागतात की, तुझं काय खरं नाही आता… मरतोय बघ! मेंदू सावध असतोच, त्यामुळे तो माणसाला जिवंत ठेवायची धडपड सुरू करतो आणि तेही अगदी पद्धतीत! तुम्ही श्वास घायचा खात्रीशीर मार्ग म्हणजे तुम्ही जागं होणं आणि मेंदू तेच करायला सुरुवात करतो! पैलेछूट काय होतं तर आपली चुळबूळ सुरू होते. कुशी बदलणं वगैरे प्रकार सुरू होतात. 'करवटें बदलते रहें, सारी रात हम' हे काय फक्त प्रेयसीच्या आठवणीनंच होतं असं काय नाय! तरी जाग आली नाही, तर मग तहान लागते! आता काय, पाणी प्यायला तरी उठशील की नाही? तरीसुद्धा जाग आली नाही तर मग मेंदू अजून जोरात प्रयत्न करतो आणि चक्क बाथरूमला जावंसं वाटायला लागतं. जणू मेंदू म्हणतो, 'ऊठ लेका ऊठ, मरशील नाहीतर!' पाणी प्यायला किंवा बाथरूमसाठी उठल्यावर आपोआप थोडा नीट श्वास घेतला जातो. पण काहीवेळा असंही होऊ शकतं, की हे सगळे प्रयत्न वाया जातात. मग मात्र मेंदू त्याच्या भात्यातलं ब्रम्हास्त्र काढतो! आपल्या मनाच्या तळाशी दडून बसलेली भीती डोकं वर काढते. मग कुणाला असं वाटतं, की आपण खूप उंचावरून अचानक खोल खड्यात पडलोय तर कुणाला वाटतं आपल्यामागे साप लागलाय! त्यामुळे आपण दचकून जागे होतो. या सगळ्याचं साध्य एकच असतं - आपल्याला श्वास घ्यायला भाग पाडणं!!

स्लीप अ‍ॅप्निआतल्या ‘अ‍ॅप्निआ’ शब्दाचा अर्थ आहे झोपेत किंचितसा वेळ श्वास थांबणं! प्रत्येक माणसाला कसं ब्लड प्रेशर असतंच, फक्त ते प्रमाणाबाहेर जात राहिलं, की आपण म्हणतो की अमक्यातमक्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तसंच प्रत्येकाला हा अ‍ॅप्निआ असतो. पण श्वास थांबण्याचं प्रमाण वाढायला लागलं किंवा श्वास थांबण्याचा वेळ वाढायला लागला असं दिसलं, की डॉक्टर म्हणतो - तुला स्लीप अ‍ॅप्निआ आहे रे बाबा! दुर्दैवानं एकंदर भारतीय समाजात या प्रकाराबद्दल फारशी जागरूकता नाही. उलट आपण म्हणायला मोकळे, की च्यायला, ही नसती अमेरिकन थेरं आहेत! म्हणे घोरणं एखाद्याच्या जिवावर बेतू शकतं!!

आता कुणाला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का, ते कळणार कसं? उत्तर सोपं आहे - स्लीप स्टडी! स्लीप स्टडी सेंटरमध्ये एका रात्रीसाठी आपल्याला जावं लागतं किंवा एक यंत्र एका रात्रीसाठी डॉक्टर आपल्याला घरी वापरायला देतात. रात्रभरात त्या यंत्रात जमा झालेल्या माहितीतून हे पाहिलं जातं, की एखाद्याला स्लीप अ‍ॅप्निआ आहे का, असल्यास किती प्रमाणात आहे आणि उपाययोजनेसाठी सी-पॅप मशीनचा उपयोग करताना हवेच्या झोताचं प्रमाण किती ठेवायला हवं.

मग आता स्लीप अ‍ॅप्निआवर उपाय काय? वजन कमी करणं, विशेषत: गळ्याभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करणं उत्तम. त्यासाठी मग ते नियमित व्यायाम करणं, हिरव्या भाज्या खाणं वगैरे सगळं आलंच! शिवाय एका विशिष्ट प्रकाराच्या प्राणायामानं फायदा होतो असं ऐकलं आहे, पण स्वानुभव नाही. मी घेत असलेला उपचार इथे सांगतोय आणि याचा नक्की फायदा होत असलेला अनुभवतोय! तर सी-पॅप मशिन वापरायचं. CPAP म्हणजे continuous positive airway pressure. 'गूगल'बाबाला CPAP असं विचारलं, तर बरीच माहिती मिळेल. यामध्ये आपल्या नाकावर लावायला एक मास्क असतो आणि मास्कचं दुसरं टोक एका नळीनं मशिनला जोडलेलं असतं. मशिनमधून ठरावीक प्रमाणात हवेचा झोत नाकातून सतत सोडला जातो. त्यामुळे श्वसनमार्ग व्यवस्थित उघडा राहतो आणि झोपेतही ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत राहतो. मास्कने तोंड बंद असतं त्यामुळे तोंडाने श्वास घेतलाच जात नाही आणि घोरणंही बंद होतं! है शाब्बास …आपलं घोरणं बंद झाल्यानं आसपासचे लोकही सुखानं झोपू शकतात! व्यवस्थित ऑक्सिजन मिळाल्यानं झोपमोड व्हायचा प्रश्नच येत नाही आणि मेंदू आपली सगळी अस्त्रं भात्यात ठेवून देतो. सकाळी उठल्यावर ताजंतवानं वगैरे काय म्हणतात ते वाटतं. सगळ्यांत मोठा फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते. मी साधारण गेले दीड वर्षं सी-पॅप मशिन वापरतोय आणि नक्की फायदा झालेला अनुभवतोय. बरं, हे मशिन प्रवासात वापरायलाही सुटसुटीत असतं. त्यामुळे अगदी एका रात्रीसाठीही कुठे जाताना मशिन सहज बरोबर नेता येतं. फक्त झोपण्याच्या जागेजवळ विजेचा पॉईंट असायला हवा. सुट्टीसाठी भारतात आलो होतो तेव्हा मला पुणे, गोवा अशा ठिकाणी घरी, हॉटेलमध्ये सगळीकडे मशिन व्यवस्थित वापरता आलं.

अर्थात कुठलीही नवीन गोष्ट वापरायला शिकताना सुरुवातीला जरा त्रास होतो तसाच हे मशिन वापरतानाही होऊ शकतो. पण नेटानं प्रयत्न चालू ठेवले आणि मशिनची सवय झाली की मग झोपेसारखं सुख नाही! मगाशी म्हणालो तसं काही मदत / प्रोत्साहन हवं असल्यास आपुनका दरवाजा, फोन, इमेल हमेशा खुला है! खोटं नाही सांगत, पण आता रात्र जवळ आली की मनापासून आनंद होतो, की चला आता छानपैकी झोपायचं! मग दुसर्‍या दिवशी सकाळी गजर व्हायच्या आधीच जाग येताना मनात 'भटियार'चे प्रसन्न सूर गुंजायला लागतात -- 'पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा…. जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा!'

- संदीप चित्रे

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

चांगला माहितीपूर्ण लेख आहे. मेंदू आपलं ब्रम्हास्त्र काढतो हा पॅरा मला भयंकर आवडला.

संदीप, छान माहितीपूर्ण लेख! मिनोती, चित्र छान आहे! :-)

माहीतीपूर्ण व खुशखुशीत लेख आहे! खूप आवडला! :) मिनोतीचे चित्रही मस्त!

साध्या सोप्या भाषेत मस्त लेख. आवडला.

हा लेख वाचताना अजय यांचा http://www.maayboli.com/node/30631 हा लेख आठवत राहिला मला.

बस्के +१००

छान आहे लेख!आवडला.

एकदम मस्तं झालाय लेख!

खरं तर मी तुला म्हटलं की उद्या वाचेन , पण राहावलच नाही मग वाचूनच काढला एकदाचा , नाहीतर झोप लागलीच नसती. आणि आता वाचून झोप उडाली. कारण मला लवकर झोपायची अजिबात सवय नाही आणि सकाळी लवकर उठायलाच लागतं , त्यामुळे झोप पूर्ण होतच नसणार. तु लिहीलेल्या सगळ्या गोष्टी अगदी पटण्याऱ्या आहेत. आता मलाही लवकर झोपून मेंदूला आणि शरीराला त्यांचे काम करायला वेळ द्यायला हवा. छान आहे लेख . माहितीबद्दल धन्स

मस्त आहे लेख

आवडला

मस्त लेख. अगदी माहितीपूर्ण आणि सोप्या भाषेत सांगितल्यामुळे एकदम आवडला.
लेखातल्या माहितीमुळे नवीन गोष्टी कळाल्या. माझ्या घोरण्याबद्दल आता बराच "कॉन्शस" झालोय!!

लेख आवडला. बरीच माहिती मिळाली.

झोप अत्यंत प्रिय त्यामुळे खुपच आवडला लेख. बाकी ते उपकरण महाग असेल, नाही ?

लेख आवडला.
खुसखुशीत आणि सोप्या भाषेतला चांगला माहितीपूर्ण लेख. :)

बस्के +१. मिनोतीची मनीमाऊ काय भारी आहे :)

मला पण अजय यांचा लेख आठवत होता.

अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर किती कमी जाणतो आपण आणि झोप हे तर नेणिवेचं संपर्कक्षेत्र. खूप माहितीपूर्ण, छान लिहिलं आहे.

मस्त जमला आहे लेख! माहितीपूर्ण तर आहेच.
मिनोती, चित्र फार आवडले.

माहितीपूर्ण व खुशखुशीत लेख आहे! खूप आवडला! >>> +१००...

लेखनशैली सुंदरच ....

मस्त .....झोपे बद्दल इतक छान कळालय की आज झोपेत हेच विचार आणी स्वप्न बहुदा ...:)

संदीप, चांगला लेख. माहितीपूर्ण आणि तरीही चुरचुरीत. आवडला. अजयचा लेख मलाही आठवला.

मिनोतीच्या चित्रातली सगळीच पात्रं झकास जमलीत!

लेख आवडला. बरीच माहिती मिळाली.
मिनोतीच्या चित्रातली सगळीच पात्रं झकास जमलीत!>>+१

प्रतिक्रियांबद्द सर्वांना मनापासून धन्यवाद!
काही दिवसांपासून माझ्या कंप्युटरवरून मायबोलीत लॉग-इन करायला अडचण येत होती त्यामुळे सगळ्यांचे आभार मानायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व!

अजयने जेव्हा त्याचा लेख लिहिला साधारण त्याच सुमारास माझं झोपेचं रामायण, स्लीप स्टडी प्रकार वगैरे सुरू होते. त्याच्याशी ह्या विषयावर फोनवरून गप्पा व्हायच्या आणि मी त्याला म्हणालो होतो की ह्या विषयावर लेख लिहीन. शेवटी ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने मुहूर्त लागला :)

@विजय देशमुख इथे हेल्थ केअर इन्शुरन्समुळे स्लीप स्टडी, सी-पॅप मशीन वगैरे गोष्टी बर्‍याच प्रमाणात सुकर झाल्या. नुसते मशीन घ्यायचे तर नक्की किंमत गूगलवर समजेल पण महत्वाचे म्हणजे त्या मशिनमधून येणारर्‍या हवेच्या झोताचे प्रमाण योग्य त्या डॉक्टरने (झोप विषयातील तज्ज्ञ) ठरवून देणे आवश्यक असते.

@मिनोती ह्या लेखासाठी अत्यंत समर्पक चित्र दिल्याबद्दल आभार!

आता ह्या दिवाळी अंकातले बाकीचेही लेख वाचता येतील!!

खुसखुशीत शैलीतला लेख आवडला. :)
मास्तरांचा एक लेख आठवलाच वाचताना.

मस्त लेख.
झोप नीट न होण्याविषयीच्या इतर कारणांवरही आपण लेख लिहावा.

गजानन +१

छान लेख .. चित्रही मस्त .. :)