काळाच्या पडद्याआड...
साल १९७५.
स्थळ - ऑस्ट्रेलियामधील कियामा गावाचा शांत समुद्रकिनारा
एक स्त्री दोन छोट्या मुलींबरोबर वाळूची घरे बनविण्यामध्ये गर्क झालेली दिसत होती. शेजारच्याच एका खडकावर सुमारे पस्तीस वर्षांचा उंचपुरा गोरा माणूस बसलेला दिसत होता. त्याच्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये गोगलगायीच्या पाठीवर असणारा एक छोटा शंख होता आणि उजव्या हातामध्ये होते लव्हाळ्याचे एक पान. तो ते लवचिक पान त्या चक्रवर्तुळाकृती शंखाच्या पोकळीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करीत होता. ती हिरवी काडी तो पुन्हा बाहेर काढून पुन्हा आत घुसवत होता आणि कितीतरी वेळ तो त्या शंखामध्ये घुसलेल्या गवताच्या काडीकडे स्वप्नाळू आणि अनिमिष नेत्राने पाहत होता. अचानकपणे अंगामध्ये काही संचार व्हावा तसे तो उठला आणि आनंदातिशयाने धावत पलीकडे वाळूमध्ये खेळणाऱ्या स्त्रीला, म्हणजेच आपल्या पत्नीला उचलून नाचू लागला, म्हणू लागला, "युरेका! युरेका!! युरेका!!!"
काळाच्या पडद्याआड...
साल १९७५.
स्थळ - पुणे
मी नुकताच एमडीची परीक्षा झाल्याने घरी राहण्यास आलो होतो. बर्याच दिवसांनी आईच्या हातचे ताजे जेवण मिळण्याचा योग होता. मी घरी आहे हे कळताच शेजारच्या एक काकूदेखील माझ्यासाठी केलेले खास पदार्थ घेऊन आल्या होत्या. जेवताजेवता या काकूंनी हळूच त्यांच्या नातवाविषयी सांगायला सुरू केले. काकू नगरकडील एका खेड्यात राहत असत. त्यांचे यजमान निवर्तल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी पुण्याला बिऱ्हाड केले. तीन छोट्या नातवंडांना घेऊन त्या एकट्याच आमच्या घराशेजारी राहत असत. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे आमच्या कुटुंबाशी अगदी घरोब्याचे संबंध तयार झाले होते. त्यांचा सर्वांत लहान नातू अडीच वर्षांचा झाला होता, पण अजून बोलत नव्हता. एक वर्षाचा असताना त्याला एकदा खूप ताप आला होता आणि तेव्हापासून त्याला कमी ऐकायला येत असावे, अशी शंका काकूंना आणि घरातील इतरांना येत होती. जवळच असलेल्या नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याला नेलेही. त्यांनी या मुलाची तापामुळे अथवा औषधांमुळे कानाची संवेदना कमी झाल्याचे सांगितले. तो अगदी ठार बहिरा असल्याने त्यावर काहीही उपचार होणार नाहीत, असेही ठामपणे सांगितले. आपला लाडका नातू 'मूकबधिर' आहे हे समजल्यामुळे काकूंवरतर आकाशच कोसळले. त्यांना जेवण गोड लागेना आणि डोळ्यांतील पाणीही थांबेना.
केविलवाण्या स्वरात त्यांनी डॉक्टरांना सुचवले, "डॉक्टरसाहेब, तुमचे सर्व खरे आहे. पण याला थोडेथोडे ऐकू येत असावे, असे मला वाटते. त्याला विमानाचा आवाज, प्रेशर कुकरची शिट्टी ऐकू येते."
"बाई, तुम्ही म्हणता ते कदाचित खरे असेलही. मोठ्या माणसाप्रमाणे या मुलाच्या कानाचा ग्राफ काढता येणे कठीण आहे. याच्या कानातील काही विशिष्ट शिरा कदाचित काम करीत असतीलही, पण त्या संभाषण ऐकण्याच्या अथवा बोलण्याच्या कामाच्या नाहीत. त्याला ऐकू येत नसल्यामुळे त्याच्या मेंदूमधील संभाषण केंद्र विकसित होणार नाही. अशा मुलांना खुणांच्या भाषेनेच इतरांशी संभाषण करावे लागेल."
"डॉक्टरसाहेब, आमच्या परिचयातील एका वृद्ध गृहस्थांच्या कानाला कसलेसे मशीन लावल्यामुळे त्यांना आता ऐकू येऊ लागले आहे. आमच्या धनूला तसे मशीन लावून नाही का चालणार?"
"आजी, असे श्रवणयंत्र ज्यांची ऐकण्याची नस, म्हणजे नर्व्ह चांगली असते त्यांना उपयोगी पडते. ज्यांना कानाशी अथवा मोठ्याने बोलल्यानंतर ऐकू येते त्यांच्यासाठी असे यंत्र उपयोगी असते. पण आपल्या बाळाची ही नस खराब असल्यामुळे त्याला या यंत्राचा उपयोग होणार नाही. "
"डॉक्टर, माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे. केवळ माझ्या समाधानासाठी, आपण या बाळाला फक्त दोन दिवस ते मशीन लावा. नाही म्हणू नका", असे म्हणून काकू डॉक्टरांचे पाय धरण्यासाठी खाली वाकल्या. डॉक्टर पटकन मागे सरकले आणि त्यांना उठवत म्हणाले, "अहो आजी, माझी खात्री आहे त्याचा काही उपयोग होणार नाही." पण आजींनी अजीजीने त्यांचे हात घट्ट धरून ठेवले.
"ठीक आहे. तुमचा हट्टच असेल तर मी ते यंत्र जोडून देतो. पण माझी खात्री आहे काही उपयोग होणार नाही याची."
काकू धनूच्या एका कानाला ते मशीन लावूनच घरी आल्या. दोन दिवस त्यांचे अविरत प्रयत्न चालू होते धनूला शिकवण्याचे! काकूंची चिकाटी म्हणा किंवा परमेश्वराची कृपा म्हणा, पण तिसर्या दिवशी धनूने काकूंना साद दिली आणि त्याने एक पहिला शब्द उच्चारला, "आई!"
याचा अर्थ असा होता की, धनूची श्रवणक्षमता कामचलाऊ प्रमाणात शिल्लक होती!
धनूची ही प्रगती पाहून डॉक्टरदेखील चकित, खरे म्हणजे, खजीलच झाले. आजींच्या मदतीने धनूच्या ऐकण्यात आणि बोलण्यात हळूहळू चांगलीच सुधारणा झाली. धनू कान देऊन ऐकू लागला व थोडेसे अडखळत का होईना, पण बोलू लागला. थोडा मोठा झाल्यानंतर काकू त्याला पुणे येथील रुईया मूकबधिर विद्यालयात घेऊन गेल्या.
धनूची तपासणी केल्यानंतर तेथील प्राचार्या म्हणाल्या, "आमच्या शाळेमध्ये ज्यांना अगदीच ऐकू येत नाही, अशी मुले असतात. तुमच्या धनूला थोडेसे ऐकू आणि थोडे बोलताही येते आहे. त्याला नेहमीच्याच शाळेत पाठवा." त्यांनी सदाशिव पेठेमधील भावे प्राथमिक शाळेची शिफारसही केली. त्यांच्या सल्ल्यानुसार काकूंनी धनूला भावे प्राथमिक शाळेत घातले. तेथे त्याच्या वर्गामध्ये धनूसारखेच कमी ऐकू येणारे व मशीन वापरणारे आणखी चारजण होते. या विद्यार्थ्यांवर या शाळेमध्ये जास्त लक्ष देऊन शिकवण्याची व्यवस्थादेखील होती.
हां हां म्हणता दिवस निघून गेले. धनू पुढे शेतीशास्त्र विषयामध्ये पदवीधर झाला आणि आज तो एक प्रगतिशील शेतकरी आहे. अजूनही तो दोन्ही कानांत 'डिजिटल' श्रवणयंत्र वापरतो. काकू मात्र केव्हाच काळाच्या पडद्याआड निघून गेल्या, पण त्यांच्या वात्सल्याचा गंध धनूच्या घरामध्ये आणि आम्हां सर्वांच्या मनात अजूनही दरवळतो आहे !
आपले कान ही एक मोठी परमेश्वरी देणगीच आहे. कान हे अतिशय गुंतागुंतीचे, पण नाजूक यंत्र आहे. लौकिकार्थाने ज्याला आपण कान म्हणतो, त्याचे काम ध्वनिलहरी गोळा करून आतील कर्णनलिकेकडे पाठविणे इतकेच असते.
सुमारे एक इंच लांबीच्या कर्णनलिकेच्या दुसऱ्या टोकाला एक पडदा असतो, त्याला 'ढोल' असे म्हणतात. या कर्णनलिकेमध्ये मेणासारखा घट्ट पदार्थ साचल्यामुळे तात्कालिक बहिरेपणा येऊ शकतो. कानाच्या पडद्याला छिद्र पडल्यानेदेखील ऐकण्यावर परिणाम होऊ शकतो. या पडद्याच्या पलीकडे मध्य-कर्ण पोकळी असते व त्यापलीकडे असतो अंतर-कर्ण. ढोल व अंतर-कर्ण हे तीन चिमुकल्या हाडांच्या साखळीने जोडलेले असतात. आपल्या कानावर पडलेल्या ध्वनिलहरींमुळे ढोल हलतो व त्यामुळे हाडांची साखळी हलते व ही हालचाल सुमारे वीस पटीने वाढवून अंतर-कर्णापर्यंत पोहोचवली जाते. आपला अंतर-कर्ण हा अतिशय प्रगत नैसर्गिक तंत्र असलेला जणू एक चमत्कारच आहे. याला कॉक्लिया (स्क्रू अथवा स्नेल,गोगलगाय ) असे नाव आहे. याचा आकार एखाद्या शंकूप्रमाणे असून त्याला सुमारे अडीच चक्राकार वेढे असतात. एखाद्या आईस्क्रीम कोनवर निमुळते होणारे वेढे असावेत तसे! एखाद्या गोगलगायीच्या पाठीवर असणाऱ्या शंखासारख्या आकाराचा हा अंतर-कर्ण सुमारे एक सेंमी. रुंद व तेवढाच उंच असतो. समजा, ही अडीच वेढ्यांची सुरळी ताणून सरळ केली, तर सुमारे तीन सेंमी. एवढी लांब असते. या नळीच्या आत एक आडवा असा दुभाजक पडदा असतो. याची रुंदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळूहळू मोठी होत जाते. या पडद्यामध्ये सूक्ष्म केस असलेल्या पेशी ध्वनिलहरींचे विद्युतसंदेशामध्ये रूपांतर करतात. या पडद्याला सुमारे दहा हजार नसतंतू जोडलेले असतात. जेव्हा ध्वनिलहरी अंतर-कर्णावर आदळतात, तेव्हा त्या कॉक्लियामधील पडद्यामध्ये कंप निर्माण करतात. ध्वनीमधील कंपनसंख्येनुसार ठरावीक भागातील केशपेशी हलतात व ते ठरावीक नसतंतू ती संवेदना मेंदूमधील श्रवणकेंद्रापर्यंत पोहोचवतात व आपल्याला ऐकू येते.
भाषा समजणे आणि बोलणे हे शिकावे लागते आणि फक्त मानवच बोलू आणि लिहू शकतो. 'जंगल बुक'मधील लांडग्यांनी वाढवलेल्या बाळाला आपली भाषा बोलता येणार नाही व समजणारही नाही. ती शिकावी लागेल.
बहिरेपणा मुख्यत्वे दोन कारणांमुळे येतो. अंतर-कर्णापर्यंत ध्वनिलहरी पोहोचण्यामध्ये अडथळा आल्यास जो बहिरेपणा येतो, तो आवाज मोठा करणाऱ्या साध्या कर्णयंत्राचा उपयोग करून दूर करता येतो. पण अंतर-कर्णामधील केशपेशी काम करेनाशा झाल्यास मात्र या अशा केवळ आवाज मोठा करणाऱ्या कर्णयंत्राचा उपयोग होत नाही व अशा व्यक्तींचा बहिरेपणा दूर करता येत नाही. असा नस-बहिरेपणा येण्याची अनेक कारणे आहेत. विषाणू संसर्ग, अतिज्वर, ध्वनिप्रदूषण, कर्ण-विषारी (Ototoxic) औषधे, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ताप किंवा गोवर येणे अथवा वयोवृद्धत्व ही मुख्य कारणे आहेत. पण अनुवांशिकतेमुळे येणारी कर्णबधिरता हे मूकबधिरतेचे एक मुख्य कारण आहे. पण म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे.
अशा असाध्य बहिरेपणावर उपाय शोधण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक शास्त्रज्ञांनी सतत प्रयत्न केले. कल्पना अशी होती की, नस काम करत नसेल तर त्या नसेला बाहेरून इलेक्ट्रिक शॉक देऊन ऐकू येते का पाहावे. १७९० साली, व्होल्टा यांनी, तर १८६८ साली ब्रेनर यांनी, स्वतःच्या कानाला शॉक देऊन पाहिले. धातूची वस्तू पडल्यासारखा आवाज कानात आला इतकेच. पण या धक्कादायक अनुभवामुळे पुढील पन्नास वर्षे पुन्हा कोणी हा प्रयोग करण्यास धजावले नाही.
१९५७ साली, जोर्नो नावाच्या एका फ्रेंच सर्जनकडे एक बहिरा रुग्ण आला. त्याच्या चेहऱ्याच्या स्नायूंना चेतना देणाऱ्या दोन्ही बाजूंच्या नसा काम करीत नव्हत्या, लुळ्या पडल्या होत्या. ही चेहर्याची नस अंतर-कर्णाजवळून जात असताना तिच्यावर दाब येऊन ती निकामी झाली होती. या सर्जनने कानाचे ऑपरेशन करून त्या नसेला शॉक देणारे एक छोटे यंत्र बसवले. त्यामुळे चेहर्याचे स्नायू काही हलले नाहीत, पण त्या माणसाला त्या कानाने थोडेफार ऐकू मात्र येऊ लागले. दुर्दैवाने ते यंत्र फक्त एक महिनाभरच चालले, परंतु सुदैवाने त्या फ्रेंच डॉक्टरांनी ही केस शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केली. तीन वर्षांनी डॉ. हाऊस या बहिरेपणावर संशोधन करणार्या अमेरिकन सर्जनला, त्यांच्या एका रुग्णाने हे कात्रण दाखवले. डॉ. हाउस यांनी त्याचे महत्त्व ओळखून असे शॉक देणारे एक यंत्र तयार केले. त्याची एक तार त्यांनी कॉक्लियाच्या सुरळीमध्ये घातली. त्यातून आवाजाचे बदलत्या ध्वनिकंपनांमध्ये रूपांतर करून विजेचे धक्के दिले व बहिर्यांना थोडेफार आवाज येऊ लागले. अशा रीतीने तयार झाला जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कान! हे एक-तारी यंत्र अनेक रुग्णांना बसवण्यात आले. याचा एक तोटा असा होता की याने एकाच वेळी सर्व नसतंतूना, चेतना, म्हणजे शॉक दिला जात असे व त्यामुळे फक्त आवाजाचा ऱ्हिदम, म्हणजे ताल ऐकू येत असे, पण संभाषण समजत नसे. पण डॉ. हाउस यांच्या प्रयोगामुळे पुढील संशोधनाला दिशा मिळाली आणि जगामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी आणखी चांगल्या तंत्राचा शोध चालूच राहिला.
काळाच्या पडद्याआड …
स्थळ - ऑस्ट्रेलिया
डॉ ग्रेयम क्लार्क हे ऑस्ट्रेलियन डॉक्टर १९६५ साली लंडनमध्ये नाक-कान-घसा या विषयातील उच्चशिक्षण घेऊन परतले. स्वतःचे वडील बहिरे असल्यामुळे या आजारावर संशोधन करण्यामध्ये त्यांना विशेष रस होता.
संशोधन करता यावे म्हणून त्यांनी मेलबर्न विद्यापीठामध्ये प्रोफेसरची नोकरी पत्करली. रात्रंदिवस त्यांनी मांजरीसारख्या प्राण्यांच्या कानावर अनेक प्रयोग केले. त्यासाठी मेलबर्न विद्यापीठामध्ये जैववैद्यकीय अभियांत्रिकी हा विषय सुरू केला, माणसे जमवली, तयार केली. पण हे सर्व करण्यासाठी पैशांची गरज होती. टीका करणारे खूप, पण मदत करणारे थोडे असे निराशाजनक चित्र होते. मदतीला धावून आला एक टीव्ही चॅनेल, ज्याने लोकांना मोफत आवाहन केले आणि मग पैशांचा ओघ सुरू झाला. अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून पैसे जमा झाले, संशोधन चालू राहिले. ऐकण्याच्या नैसर्गिक क्रियेचा खूप सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ. क्लार्क यांनी लंडनला परत जाऊन मेंदू आणि भाषा विकास या विषयाचे तीन महिने शिक्षण घेतले आणि आपल्या नवीन कल्पनांनी तेथील तज्ज्ञांनाही थक्क केले.
त्यांनी कॉक्लियाच्या सुरळीत घातल्या जाणाऱ्या एका तारेऐवजी चोवीस अतिसूक्ष्म तारांची एकच मोठी तार तयार केली व त्यातून कॉक्लियामधील पडद्याला बारा ठिकाणी शॉक देण्याची पद्धत विकसित केली. या तंत्रामुळे निरनिराळ्या कंपनसंख्या वाहून नेणारे निरनिराळे नसतंतू येणाऱ्या आवाजाच्या कंपन संख्येप्रमाणे उत्तेजित करता येत होते. अर्थात दहा हजार तंतूंचे काम केवळ बारा तारा करणार होत्या. शिवाय कॉक्लियामध्ये ही चेता-तार सुमारे १५ मिलिमीटरपर्यंतच घुसवता येत होती. अगदी टोकाकडील व कमी कंपनसंख्या असणारे नसतंतू चेतविता येत नव्हते. ही तार आत सरकवित असताना अनेक अडचणी येत होत्या. क्लार्क यांचे सतत चिंतन आणि चर्चा चालूच असे. आपल्या कुटुंबासमवेत सुट्टीवर गेल्यावरदेखील हाच विचार सतत त्यांना व्यथित करीत असे. एके दिवशी समुद्रकिनारी शंख पाहताना, त्यांना लक्षात आले की, कॉक्लियामधे वापरण्याची चेता-तार ही पुढील टोकाला लवचिक तर मागे मात्र ताठ असली पाहिजे. बस्स, त्यातूनच तयार झाला नवा दुसऱ्या पिढीचा संभाषण ऐकवणारा यांत्रिक कान!
ऑस्ट्रेलियामध्ये साठ हजारांपेक्षाही जास्त बहिरे असूनही त्यांना त्या प्रयोगासाठी माणूस मिळेना. कारण यांत्रिक कानाविषयी अपप्रचार करणारे बरेच होते. शेवटी रॉड नावाचा एक रुग्ण या प्रयोगाला तयार झाला. ती तारीख होती एक ऑगस्ट १९७८! ऐन ऑपरेशनच्या दिवशी तर अनेक सहाद्ध्यायी डॉक्टरांनी त्यांना घाबरवले होते, "तू हा रुग्ण बहुतेक खलास करणार आज!"
डॉ. क्लार्कनादेखील खूपच तणाव जाणवत होता. सर्जरीविषयी जरी त्यांना विश्वास तर वाटत असला, तरी जर हा प्रयोग फसला तर काय, ही भीतीदेखील वाटत होती. आतापर्यंतचे कष्ट, सर्वांचे अथक परिश्रम, देणगीदारांचा विश्वास, स्वतःचे आणि कुटुंबाचे भवितव्य असे सारेच जणू पणाला लागले होते. क्लार्क आणि त्यांचे सहकारी पायमन यांनी रुग्णाला आधार देऊन आपण प्रामाणिकपणे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सांगितले. "सिस्टर मार्टिन, मला स्कालपेल द्या, मी आता ऑपरेशन सुरू करतो आहे." देवाचे नाव घेऊन त्यांनी रॉडच्या कानाच्या मागे छेद घेतला आणि मग पुढील नऊ तासात, सर्व टीमने मिळून, ऑपरेशन संपवले.
रॉडची तब्येत हळूहळू सुधारत होती. चार दिवसांनंतर एकदा रॉड ज्या मजल्यावर होता, तेथील इमर्जन्सी घंटा वाजली आणि डॉ. क्लार्क यांच्या हृदयाचा ठोका चुकला, "ही घंटा रॉडसाठी तर नसेल?" त्यांना त्या नतद्रष्ट मित्राचे वाक्य आठवले, "तू हा रुग्ण बहुतेक खलास करणार आज!" त्यांना धावत जिना चढत असताना आपल्या शरीरामध्ये किती घर्मग्रंथी आहेत त्याची जाणीव झाली. खरोखरच रॉडच्या जखमेचे ड्रेसिंग बदलत असतांना तो चक्कर येऊन पडला होता. सुदैवाने ती साधी चक्कर होती आणि रॉड सुखरूप होता. ऑपरेशननंतर एका महिन्याने रॉडला बसवलेल्या कर्णयंत्राच्या चाचणीचा आणि क्लार्क यांच्या परिश्रमाचा परिणाम दिसून येण्याचा दिवस उजाडला. रॉडला आवाज ऐकविण्यात आले, पण उफ्! रॉडला कणभरदेखील आवाज ऐकू येत नव्हता. सर्वजण खिन्न होऊन घरी गेले. पण दुसऱ्याच दिवशी ज्या बाह्ययंत्राने टेस्ट केली, त्यात बिघाड असल्याचे कळले. मग पुन्हा टेस्ट ठरली. रॉडला चाचणीसाठी ऐकवले ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत,"गॉड सेव्ह द क्वीन!" आणि काय आश्चर्य… रॉड त्याच्या शरीराला जोडलेल्या तारांसकट खाडकन उठून उभा राहिला! त्याला राष्ट्रगीत ऐकू गेले होते! सर्वाच्यासाठी आनंदाचा क्षण होता तो! डॉ. क्लार्क शेजारच्या खोलीमध्ये जाऊन आनंदातिशयाने चक्क रडले!
आतापर्यंत या कर्णयंत्राला चेता देण्यासाठी मोठा, टेबलावरील संगणक वापरीत होते, त्याऐवजी रॉडला बरोबर अंगावर घेऊन फिरता येईल असा छोटा संगणक तयार करणे आवश्यक होते. साठ हजार ट्रान्झिस्टर्स वापरून, एखाद्या शब्दकोशाच्या आकाराचा बाह्यसंगणक तयार झाला. मेलबर्न विद्यापीठाने आणि ऑस्ट्रेलियन सरकारने या शोधाची दखल घेऊन भरभर पावले उचलली. त्याच सुमाराला सिलिकॉन चिपचा शोध लागला होता. हृदयासाठी लागणारे 'पेसमेकर' तयार करणाऱ्या टेलेट्रोनिक्स या कंपनीने, कानामागे बसेल असे मशीन तयार केले. आता या कॉक्लियर इंप्लांटचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन सुरू आहे.
साल २०१४…
पुढे या संपूर्ण संचामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. आज वापरात असलेले मशीन दोन भागात असते. एक भाग ऑपरेशनद्वारे कानामागे त्वचेखाली बसवतात. त्यात एक लोहचुंबकदेखील असतो. दुसरा भाग हा सुटा असून तो कानामागे बसवता येतो. त्याचा एक भाग त्वचेखालील भागावर लोहचुंबकामुळे घट्ट चिकटतो.
कानावर बसवलेल्या भागात एक मायक्रोफोन असतो, जो आवाज पकडून त्याचे डिजिटल रूपांतर करतो व त्या ध्वनिलहरी वायरलेस तंत्राने, त्वचेखालील यंत्राला दिल्या जातात. तेथे त्यांचे विद्युतलहरींमध्ये रूपांतर करून कॉक्लियामधील चेता-तारेस दिल्या जातात. तेथून स्वर आणि व्यंजने योग्य त्या नसतंतूपर्यंत जातात व पुढे मेंदूपर्यंत जाऊन आवाज ऐकू येतो.
जन्मतः कर्णबधिर असलेल्यांना लवकर म्हणजे वयाच्या दोन वर्षांच्या आत हे यंत्र बसवले तरच या तंत्राचा चांगला उपयोग होतो. नऊ वर्षानंतर फारसा उपयोग होत नाही. जन्मतः कर्णबधिरता ओळखण्यासाठी ओएई (OAE) ही चाचणी बाळाच्या जन्मानंतर लगेचच करता येते व ही चाचणी भारतामधील बर्याच शहरांत उपलब्ध आहे. भाषाकेंद्र तयार झाल्यानंतर काही कारणांमुळे बधिरता आली असल्यास या तंत्राचा खूप चांगला फायदा होतो. मोठ्या व्यक्तींनादेखील उत्तर आयुष्यात आलेल्या नसबधीरतेसाठी या तंत्राचा उपयोग होतो. काही मुलांना दोन्ही कानांना इंप्लांट बसवल्यास जास्त फायदा होतो.
आत्तापर्यंत संपूर्ण जगभर सव्वातीन लाख रुग्णांना या यंत्राचा लाभ झाला आहे. तीन वेगवेगळ्या कंपन्यांची यंत्रे उपलब्ध आहेत. भारतामध्ये जवळजवळ तीस लाख कर्णबधिर रुग्ण आहेत. हे तंत्र बऱ्याच मोठ्या शहरांत उपलब्ध आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटलने गेल्या सात वर्षांत एका वर्षाच्या बाळापासून ते सत्तरीच्या वृद्धांपर्यंत अशा सव्वाशे रुग्णांना हे यंत्र बसवले आहे. तेथे साधारणतः सात ते आठ लाखांपर्यंत खर्च येतो.
डॉ. क्लार्क यांचे संशोधनकार्य अजूनही अव्याहतपणे आणि नवनवीन सहकार्यांच्या मदतीने चालूच आहे. त्यांच्या या अलौकिक कार्याला आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार वंदन आणि शुभेच्छा!
संदर्भसूची -
[१] http://graemeclarkfoundation.org/
[२] http://en.wikipedia.org/wiki/Graeme_Clark_(doctor)
[३] http://books.google.co.in/books?hl=en&id=qeuUoRlvJOYC&dq=sounds+from+sil...
[४] http://www.bionicsinstitute.org/news/enews/Pages/eNews-August-2014-Found...'s-message.aspx
चित्रांचे तपशील -
चित्र क्र. १ -. By User:Dan Pickard [Public domain], via Wikimedia Commons, http://commons.wikimedia.org/wiki/File:HumanEar.jpg By User:Dan Pickard [Public domain], via Wikimedia Commons
चित्र क्र. २ - http://en.wikipedia.org/wiki/File:Cochlear_implant.jpg This image is a work of the National Institutes of Health, part of the United States Department of Health and Human Services. As a work of the U.S. federal government, the image is in the public domain.
प्रतिसाद
किती सुरेख लिहिलंय डॉ.साहेब
किती सुरेख लिहिलंय डॉ.साहेब तुम्ही - लेखनशैली नितांतसुंदर आणि खिळवून ठेवणारी.
मनापासून धन्यवाद .
डॉ ग्रेयम क्लार्क यांना त्रिवार सलाम.
खूप छान लेख. माहितीपूर्ण.
खूप छान लेख. माहितीपूर्ण. धन्यवाद.
वा! सुंदर लेख.
वा! सुंदर लेख.
अप्रतिम लेख डॉक्टरसाहेब.
अप्रतिम लेख डॉक्टरसाहेब. ध्वनी हा आकाशाचा गुण मानला जातो. आकाशाशी जोडले चित्त कितीकांचे, असं लेख वाचून म्हणावंसं वाटतं. :-)
आ.न.,
-गा.पै.
नेहमीप्रमाणे अतिशय
नेहमीप्रमाणे अतिशय माहीतीपूर्ण लेख.
धन्यवाद, डॉक्टर साहेब!
अतिअति अवांतर: ऑस्ट्रलियन राष्ट्रगीत 'Advance Australia fair' आहे.
@वत्सला, 'Advance Australia
@वत्सला, 'Advance Australia fair' हे राष्ट्रगीत १९८४ पासून वापरात आले.
१९७४ पर्यंत गॉड सेव्ह द क्वीन हेच ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत होते.
डॉ. क्लार्क यांच्या
डॉ. क्लार्क यांच्या संशोधनाबद्दल अजिबातच कल्पना नव्हती. मेलबर्न मध्ये कर्णबधिर लोकांसाठी खुप चांगले उपचार उपलब्ध आहेत हे 'माओ'ज लास्ट डांसर' या पुस्तकातून वाचले होते.
डॉ. क्लार्क यांना सलाम!
धन्यवाद ट्ण्या.
धन्यवाद ट्ण्या.
@वत्सला<<अतिअति अवांतर:
@वत्सला<<अतिअति अवांतर: ऑस्ट्रलियन राष्ट्रगीत 'Advance Australia fair' आहे.>>प्रथमतः आपले आभार ! "GOD SAVE … " हे अजूनही ऑस्ट्रेलियाचे royal anthem आहे. आपण म्हणाल्याप्रमाणे अधिकृत ऑस्ट्रलियन राष्ट्रगीत 'Advance Australia fair' हेच आहे हे सत्य आहे. पण हि गोष्ट घडली तेंव्हा कदाचित तसे नव्हते. हा दुवा पहा, "http://www.dfat.gov.au/facts/nat_anthem.html" येथील काही भाग उद्धृत करू इच्छितो,
It was not until April 1984 that the Governor-General issued a proclamation that ‘God Save the Queen’ was designated the Royal Anthem, to be played at public engagements in Australia attended by the members of the Royal family. ‘Advance Australia Fair’ was finally declared to be the Australian national anthem.
Usually ‘God Save the Queen’ is played at the start of Royal functions and ‘Advance Australia Fair’ at the end, unless it is more appropriate to play both anthems at the start. ‘Advance Australia Fair’ is played at all other official functions.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आभार !
ता. क.: मागे एकदा आपल्याशी खूप वेळ फोनवर बोलल्याची आठवण झाली.
नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख
नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण लेख.
अगदी बरोबर. तुम्ही आणि
अगदी बरोबर. तुम्ही आणि टण्याने दिलेला संदर्भ मी विसरून गेले होते.
हो, एकदा आपल्या बर्याच गप्पा झाल्या होत्या. तुमच्या लेखांची मी नेहमीच वाट बघत असते.
तूमचा लेख कधी येतोय याची वाट
तूमचा लेख कधी येतोय याची वाट बघतच असतो आम्ही. अगदी सहज सोप्या भाषेत तूम्ही एरवी क्लीष्ट वाटेल असा विषयही सोपा करून टाकता !
अतिषय माहितीपूर्ण लेख
अतिषय माहितीपूर्ण लेख
डॉक्टर, तुम्हालाही 'त्रिवार
डॉक्टर, तुम्हालाही 'त्रिवार वंदन' नेहमीच उत्तम माहिती अगदी सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोचवता.
डॉक्टर, आपला लेख म्हणजे
डॉक्टर, आपला लेख म्हणजे उत्तमच असणार आणि आहेही. मोबाईलवरून आधीच वाचला होता. आता प्रतिक्रिया देत आहे.
डॉक्टर तुमचा लेख म्हणजे
डॉक्टर तुमचा लेख म्हणजे क्लिष्ट वैद्यकीय माहिती साधी करून सांगणारा असतो. अनेक धन्यवाद.
नेहमी प्रमाणेच खूप चांगला लेख
नेहमी प्रमाणेच खूप चांगला लेख. तुमचे लेख नेहमी पॉझीटीव्ह असतात त्यामुळे वाचून खूप छान वाटते.