तुम्ही निकलोडियन वाहिनीवर 'निन्जा हात्तोरी'ला हिंदी बोलताना ऐकलं आहे का? तुम्हांला कार्टून नेटवर्कवर किंवा पोगो वाहिनीवर हिंदी बोलणारा 'नॉडी' गोड वाटतो का? क्रेयोन शिन-चान, शिबी मारुको चान, पारमेन ही सगळी जपानी पात्रं हिंदी कसं बोलतात, असा तुम्हांला प्रश्न पडतो का?
तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. आपली मराठमोळी, आघाडीची डबिंग कलाकार मेघना एरंडे हीच या सर्व पात्रांना हिंदी भाषेमध्ये आवाज देते. हो, हीच ती मेघना जी आपल्याला कधी 'फू बाई फू'मध्ये आणि 'कॉमेडी एक्सप्रेस'मध्ये दिसते, तर कधी 'सनई चौघडे', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' आणि नुकत्याच आलेल्या 'टाइमपास' अशा चित्रपटांमधून आपल्या भेटीला येते.
तिचं कार्यक्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. ती एक उत्तम निवेदिका आहे. भारतात आणि परदेशात होणार्या मराठी कलाकारांच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासाठी तिलाच पसंती मिळते. अगदी एखादा राजकीय कार्यक्रम असू दे, नाहीतर देशी-विदेशी वित्तीय संस्थांचे रंगमंचीय कार्यक्रम (कॉर्पोरेट इव्हेन्ट्स्), दहीहंडीसारखा किंवा गणेशोत्सवासारखा एखादा छोटा कार्यक्रम असू दे, नाहीतर 'श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी'सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता अनेक राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता केलेला माहितीप्रद कार्यक्रम, मेघनाला हे सर्व जमतं. आज मेघना आपल्याशी तिच्या 'डबिंग' या वेगळ्याच कार्यक्षेत्राबद्दल बोलणार आहे.
मेघना, सर्वप्रथम तुझं अभिनंदन!! वाचकहो, या वर्षी मेघनाच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली आहेत.
मेघना, वयाच्या तिशीतच कारकिर्दीची पंचविशी पूर्ण करणार्या मोजक्या कलाकारांपैकी तू एक असशील. आम्हांला सांग, तू व्हॉइसिंग किंवा डबिंग या क्षेत्राकडे कशी वळलीस? या क्षेत्रात येण्याचं पूर्वीच ठरवलं होतंस का?
माझा या क्षेत्रामध्ये प्रवेश तसा अचानक झाला, असंच मी म्हणेन. मी मुंबईतल्या दादरच्या बालमोहन विद्यामंदिरची विद्यार्थिनी. शाळेत लहानपणापासून वक्तृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन, नाटक यांत सहभागी होत असे, पण या क्षेत्रामध्ये करिअर करेन, असं काही कधी वाटलं नव्हतं. आमच्या शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांनी माझी दूरदर्शनच्या 'संस्कार' या गाजलेल्या मालिकेसाठी निवड केली. तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. छंद म्हणूनच मी या गोष्टीकडे पाहत होते. आज ते माझं कार्यक्षेत्र झालं आहे. सुरुवात खरंतर अभिनयापासून झाली. त्याचबरोबर थोडंफार व्हॉइसिंग किंवा डबिंग चालू होतं. पुढे मी जरा मोठी झाल्यावर अभिनय आणि व्हॉइसिंग यांपैकी एक निवडायची वेळ आली तेव्हा मी व्हॉइसिंगला पसंती दिली.
तुला वेगवेगळे आवाज काढता येतात याची जाणीव कशी झाली? हे गुण कोणी हेरले? व्हॉइसिंगची सुरुवात कशी झाली?
तशा थोड्याफार नकला करणं वगैरे चालूच असे. त्यामुळे आईवडील, शाळेतल्या बाई यांना बहुधा थोडी कल्पना असावी. मी शाळेत असताना नाटकात काम करत होते. सत्यदेव दुबेंकडे काम करत होते. आमचे प्रयोग पृथ्वी थिएटरला होत असत. एन.सी.वाय. पी. (नॅशनल सेंटर ऑफ फिल्मस् फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपल), एन.एफ.डी. सी.च्या (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या) काही चित्रपटांमध्ये मी बालकलाकार म्हणून काम करत होते. त्यामुळे मला स्वत:ला डब करण्याची सवय होती. मी अभिनय केलेले 'कसम तेरी कसम' ,'इंग्लिश बाबू देसी मेम' हे हिंदी चित्रपट त्याच काळामधले आहेत. 'तारा' या झी टीव्हीच्या पहिल्या दैनंदिन मालिकेत मी लहानग्या ताराचं काम केलं होतं. किरण जुनेजा आणि राजा बुंदेलांबरोबर 'निर्दोष' नावाच्या चित्रपटामध्येदेखील मी अभिनय केला होता. मी प्रकाश झांच्या 'दीदी' नावाच्या चित्रपटामध्ये शिल्पा शिरोडकरबरोबर काम केले होतं. तो चित्रपट खूप सुंदर आहे आणि त्याला पारितोषिकसुद्धा मिळालं होतं. अजून एक म्हणजे माझा हिंदी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार अमरीश पुरी यांच्याबरोबर 'एक अजूबा' म्हणून चित्रपट आहे. या सगळ्या चित्रपटांमध्ये मी अभिनय केला आणि डबिंगपण केलं होतं. तेव्हा मी हेडफोन्स न घेता किंवा पायलट ट्रॅक (ध्वनिमुद्रित केलेले मूळ संवाद) न ऐकता नुसत्या पडद्यावर ओठांच्या हालचाली बघून डब करत असे. माझा पहिलाच प्रयत्न (टेक) ओके होत असे. तेव्हा मी इतकी लहान होते की, मला माईकसमोर खुर्चीवर उभं राहून मग डबिंग करावे लागे. या सगळ्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. त्यामुळे जेव्हा मला कार्टूनसाठी डब करण्याची वेळ आली, तेव्हा मी खूपच खूश झाले.
'डिस्ने'च्या विश्वात पाऊल कसं पडलं ? त्यासाठी कशा स्वरूपाची ऑडिशन दिली होतीस?
त्याकाळात व्हॉइसिंगची सुरुवात होत होती. नुकतंच 'डिस्ने'चं कार्टून भारतात प्रथमच आलं होतं. तेव्हा लेस्ली लुईसच्या बहिणी एली लुईस, ग्रेटा लुईस या 'यूटिव्ही'तर्फे 'डिस्ने'साठी व्हॉइसिंगच्या ऑडिशन्स् घेत होत्या. त्यासाठी सुरुवातीला ज्या मोजक्या सात-आठ लहान मुलांनी ऑडिशन्स् दिल्या, त्यांपैकी मी एक होते. त्यावेळी मी `ह्यूई', `ड्यूई', `लुई'मध्ये जे वेबीगेलचं पात्रं आहे, त्यासाठी ऑडिशन दिली. ती माझी पहिली ऑडिशन! त्यावेळी माझा आवाज लहान मुलीसारखा एकदम गोडगोड होता. मी तशीच बोलले होते. माझं जे पात्रं होतं वेबीगेल, तेही तसंच एका गोड मुलीचं होतं. त्यामुळे ते मला फार छान जमून गेलं. त्यानंतर 'डिस्ने'च्या भारतात आलेल्या 'नेपोलियन अँड समॅन्था', 'द क्रिसमस स्टार', 'द अॅपल डंपलिंग गँग' या पहिल्या तीनही चित्रपटांच्या डबिंगसाठी माझी निवड झाली होती.
'डिस्ने'ची कामं केल्यावर माझ्यासमोर एक मोठ्ठं दालनच उघडल्यासारखं झालं. त्यानंतर मला 'बिविच्ड'मध्ये समॅन्थाची भूमिका डबिंगसाठी मिळाली, तसंच `हू'ज द बॉस'मध्ये मी जॉनॅथनचे संवाद म्हटले. 'सिल्व्हरस्पून', 'डिफरंट स्ट्रोक्स्', 'यंग अँड रेस्टलेस' आणि सर्वांत आवडती व्यक्तिरेखा म्हणजे 'डेक्स्टर्स लॅब'मधील डीडी, अशी भरपूर कामं केली. (या सर्व अमेरिकन मालिका आहेत). त्यानंतर 'कार्टून नेटवर्क'ची खूप कार्टून्स् आली. आज पाच हजार डबिंग आर्टिस्ट आहेत, पण तेव्हा आम्ही काही मोजकीच मुलं सगळी कामं करत असू. आम्ही या क्षेत्राचा अगदी सुवर्णकाळ बघितला आहे, असं म्हटलं तरी चालेल. अगदी पूर्वी 'झी टीव्ही'ला 'निकलोडियन'चं दोन तासांचं प्रक्षेपण मिळालं होतं. त्यांतल्या पहिल्या मालिकेत, 'गला गला आयलंड'मध्ये मी निक ज्युनियर आणि वेनिसाचं काम केलं होतं. मग रगरॅट्स् आलं. असं करत करत आज मी 'निन्जा हात्तोरी'साठी डब करत आहे.
तू डबिंगसाठी काही प्रशिक्षण घेतलंस का?
डबिंगसाठी लागणारा सगळ्यांत मोठा गुण म्हणजे निरीक्षणशक्ती! लहानपणी माझी निरीक्षणशक्ती अतिशय दांडगी होती. समोरच्याच्या बोलण्याची मी अगदी हुबेहूब नक्कल करू शकत असे. त्यातून मी माझी एक शैली शोधून काढली. समोरच्याच्या बोलण्याची ढब, माझा आवाज आणि माझी शैली असं एक समीकरण मी वापरायला लागले. ते जमून गेलं.
त्या काळातल्या गोयल अंकल, लीला घोष वगैरे डबिंग सुपरवायझरनी खूप मेहतन घेतली. ते आमच्याकडून उर्दू शब्दांच्या उच्चारांचा अभ्यास करून घेत. वाक्य म्हणताना कुठे थांबायचं, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा हे सगळं मी तेव्हा शिकले. खूप लहान वयातच हे भाषेचे संस्कार झाल्यामुळे ते अंगवळणी पडले. त्यामुळे मी हिंदी बोलताना कुठेही शब्दांचे उच्चार मराठी वाटणार नाहीत, तसंच इंग्रजी बोलताना माझं मराठीपण जाणवणार नाही. जेव्हा आपण डबिंग करतो तेव्हा फक्त विचार मातृभाषेत करायचा, पण उच्चार मात्र त्या त्या भाषेतच व्हायला हवा, ही महत्त्वाची गोष्ट मी शिकले. माझ्याबरोबर काम करणारे सिनियर, ज्युनियर असे कोणी कलाकार होते. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या सगळ्या गोष्टी आत्मसात करत गेले. तू मघाशी मला विचारलंस की, या क्षेत्रात मी कशी आले, तर डबिंग करत असताना मी अभिनयदेखील करतच होते. खरंतर आधी अभिनय आणि मग डबिंग असं म्हणावं लागेल. पण डबिंग मला खूप छान जमतंय, माझं कौतुक होतंय, हे लक्षात आल्यावर माझा हुरूप आणि आत्मविश्वास वाढले. त्यामुळे अभिनय आणि डबिंग यांतून मी डबिंगचा पर्याय निवडला.
तू एक उत्तम निवेदिका आणि सूत्रसंचालिका आहेस. त्याबद्दल थोडं सांगशील का ?
माझ्याकडे आवाजाची देणगी असल्याने मी कॉलेजमध्ये असताना सूत्रसंचालन चालू केलं. 'मी आणि आई सॉल्लीड टीम', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'आपण ह्यांना हसलात का?', 'लोभ असावा' अशी बरीच कामं त्या काळात केली. तेव्हा लोक मला माझ्या नावानं ओळखायला लागले. तोवर मी पडद्यामागेच असल्यानं माझा प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संबंध येत नसे.
'नूपुर' हा नृत्यासंबंधी कार्यक्रम केला. 'स्टार माझा' वाहिनीवर 'खमंग' या कार्यक्रमात मी प्रसिद्ध लोकांबरोबर स्वयंपाक करत असे. 'मी मराठी' या वाहिनीच्या 'मोगरा फुलला' या सकाळच्या कार्यक्रमाचे जवळपास पाचशेच्या वर भाग मी केले. त्याच वाहिनीवरच्या 'पाकसिद्धी', 'पिकनिक रंगे तार्यांसंगे', 'ई टीव्ही'वर 'टॅक्स फ्री' हा चित्रपटविषयी कार्यक्रम, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्याबरोबर 'साम मराठी'वर 'आयुर्वेद' हा कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम मी केले. 'सचिन - हॅलो प्रवासी' हा पर्यटनाचा कार्यक्रम मी सादर करत असे. त्या कार्यक्रमामध्ये एकदा आम्ही प्रवाशांबरोबर दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. तिथल्या मसाईमाराच्या जंगलात राहण्याचा अनुभव खूपच रोमांचकारी होता. त्याच दरम्यान आम्ही विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली तिथे 'आयपीएल'चा सामना कव्हर केला.
या वेगवेगळ्या विषयांवरच्या कार्यक्रमांचा अनुभव खूप शिकवून गेला, कारण यात मी नुसतं सादरीकरणच केलं नाही, तर प्रत्येक कार्यक्रमाच्या विषयाप्रमाणे अभ्यासदेखील केला होता. हे सगळं करत असताना एक गोष्ट छान अशी झाली की, मी डबिंग करत होते तेव्हाच हे कार्यक्रम चालू होते. त्याचबरोबर एकीकडे नाटक-चित्रपट-मालिकांमध्ये पण काम करत होते. यामुळे मला कधी एकच एक गोष्ट करण्याचा जो कंटाळा येतो तो आला नाही. तशी ही सगळीच क्षेत्रं एकमेकांना पूरक आहेत. मी डबिंग करू शकते कारण अभिनय करू शकते. अभिनयामध्येसुद्धा आवाजामधल्या बदलांचा, चढउतारांचा फायदा होतो. त्याचा सराव डबिंगमध्ये होत असतो.
हे सगळं तू करत असताना एका बाजूला तुझं शिक्षणदेखील चालू होतं. शिक्षण आणि व्यावसायिक काम यांचा समतोल कसा राखलास? आईवडिलांची भूमिका काय होती?
आईवडिलांनी मला खूपच पाठिंबा दिला. त्याशिवाय हे सगळं शक्य झालंच नसतं. ते नेहमी माझ्याबरोबर स्टुडियोमध्ये येत. माझं काम होईपर्यंत बाहेर थांबून रहात. शाळेनं मला खूपच सांभाळून घेतलं. जेव्हा माझी काही महत्त्वाची चित्रिकरणं असत, तेव्हा माझी परीक्षा आधी घेतली जात असे किंवा मी पटकन मध्ये जाऊन पेपर देऊन येत असे. प्रवासात आणि कार्यक्रमाच्या मधल्या मोकळ्या वेळांमध्ये केलेला अभ्यास छान होत असे, कारण तेवढ्याच वेळात अभ्यास पूर्ण करण्याचं लक्ष्य असे. डबिंग आणि अभिनय या दोन्हींमुळे पाठांतरही चांगलं होतं. अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे, मला सुरुवातीलाच आईबाबांनी सांगून ठेवलं होतं की, अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर डबिंग वगैरे सगळं बंद!! त्यामुळे मला सतत अभ्यासावर लक्ष ठेवावं लागे. आपल्या चुकीमुळे आपली आवडती गोष्ट, आपला छंद, जो आपलं करियर होऊ शकतो, निसटून जाऊ नये, म्हणून मी सतत काळजी घेई.
मी आणि आईबाबा, आमच्यामध्ये एक छान अंडरस्टँडिंग होतं. ते असं की, माझी आबाळ होऊ नये म्हणून आईने तिची नोकरी सोडली, जेणेकरुन मला माझ्या वेळांना स्टुडियोला नेणं, माझ्यासाठी घरच्या जेवणाचा डबा देणं अश्या गोष्टी तिला करता येतील. बाबा त्यांच्या ऑफिसनंतर मला न्यायला येत. ते दोघं माझ्या आवडीखातर एवढं करत असताना माझ्यावर माझं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करण्याची जबाबदारी होती. त्याच जिद्दीमुळे माझं `एम ए'पर्यंत शिक्षण पूर्ण झालं. (वाचकांच्या माहितीसाठी - मेघना `एम ए'ला 'लोकसाहित्य' या विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम आली आहे. विद्यापीठाने तिला 'व्हॉइसओव्हर अँड कम्युनिकेशन' या विषयात पीएच.डी.साठी निमंत्रण दिलं होतं. तसंच आज ती मुंबई विद्यापीठामध्ये 'अतिथी व्याख्याती' (गेस्ट लेक्चरर) म्हणून काम करते. )
त्याकाळात मी मुख्यत: डबिंग करत होते. डबिंगचं वेळापत्रक अभिनयापेक्षा वेगळं असतं. आपल्याला आपल्या वेळेप्रमाणे ते पुढेमागे करता येतं. त्यामुळे मला माझ्या परीक्षेच्या काळात अभ्यास आणि काम बरोबर सांभाळून घेता येत असे. फक्त या काळात मला अभिनयाला पुरेसा वेळ देता येत नसे. ती उणीव मी पुढे कॉलेजमध्ये असताना निवेदन आणि सूत्रसंचलनाने भरून काढली.
डबिंग कसं केलं जातं? वेगवेगळ्या पात्रांसाठी डबिंग करण्याचा अभ्यास कसा करतेस?
डबिंगसाठी मी आधी म्हणाले तसं जबरदस्त निरीक्षणशक्ती लागते. त्या त्या भाषेचा 'लहेजा' समजून घ्यावा लागतो, भाषांतराचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. डबिंग करताना कानात मूळ भाषेतला संवाद ऐकू येत असतो. समोर दृश्य दिसत असतं आणि हातात नवीन भाषेमधला संवाद असतो. मुळात अभ्यास चांगला झाला असेल तर हे सोपं होतं. अभ्यास म्हणजे ज्या भाषेमध्ये संवाद डब करायचा आहे, ती भाषा ऐकणं, वाचन करणं वगैरे. मी अवघड संवाद साधारण तीन प्रकारे म्हणते. प्रत्येक प्रयत्न हा उत्तमच झाला पाहिजे असा अट्टहास ठेवला की अभ्यास चांगला होतो. मग तीनही संवाद ऐकून त्यांपैकी एक नक्की करते.
डबिंग करत असताना आवाजाची काळजी कशी घेतेस? जसा गाण्याचा रियाज करावा लागतो तसा तुझ्या आवाजाच्या कलेसाठी रियाज करावा लागतो का?
बरेचदा पूर्ण दिवसभर डबिंग असतं. मध्येमध्ये थोडी विश्रांती घेते. दमले तर चहा घेते. ताण येतो तेव्हा कोणाशीही न बोलता शांत बसते. गाणी ऐकणं, रेडियो ऐकणं अशा गोष्टी करते. मला देवळात जाऊन बसायला आवडतं. तिथे मन प्रसन्न होतं. अंगात पुन्हा शक्ती येते. रियाजाबद्दल विचारशील तर रोजचा रियाज हवाच. माझ्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आवाजात बोलणं हाच रियाज! डबिंगमध्ये काही कारणानं खंड पडला तर मला परत माझ्या भूमिकेत शिरायला वेळ लागतो. थंड पाणी किंवा पेय प्यायचं नाही अशी थोडी बंधनं पाळावी लागतात.
बॉलिवुडमधल्या तुझ्या कामाबद्दल आम्हांला थोडं सांगशील का?
बॉलिवुडमध्ये मी सतत काहीतरी करत असते. ऐश्वर्या राय आणि रजनीकांत यांचा चित्रपट 'रोबोट' मी तमिळमधून हिंदीमध्ये डब केला. मग माझा ट्रॅक वापरून पुढे ऐश्वर्यानं पुन्हा डब केला. बरेचदा हिरोइनला वेळ नसेल तर अर्धवट राहिलेले डबिंग आम्ही पूर्ण करतो. मध्यंतरी 'टॉम, डिक अँड हॅरी' नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यामध्ये किम शर्मा नावाच्या अभिनेत्रीच्या तोंडी काही मराठी संवाद होते. ते तिला काही केल्या म्हणता येत नव्हते. ते नंतर मी तिच्यासाठी डब केले. याव्यतिरिक्त अजूनही वेगळी कामं मी केली आहेत. राम गोपाल वर्मांच्या 'जंगल' सिनेमात 'सीन इंप्रोव्हायजेशन' केले आहेत. त्यासाठी मी, फरदीन खान आणि राम गोपाल वर्मा भेटत असू. तेव्हा एखाद्या सीनवर चर्चा करून मी आणि फरदीन एक स्किट (नाटिका) बसवत असू. ते बघून सीन लिहिला जाई किंवा इंप्रोव्हाइज केला जाई. मग प्रत्यक्ष पडद्यावर फरदीन आणि उर्मिला तसाच सीन करत. असं सर्जनशील आणि हटके काम करायला मला आवडतं.
तुझं एखादं आव्हानात्मक काम कोणतं
एक म्हणजे 'हॅरी पॉटर'मध्ये एक व्यक्तिरेखा होती 'मायूस मीना' (मोनिंग मर्टल) नावाची, ती बाथरूममधलं भूत असते. तिचा आवाज काढणं खरंच कठीण होतं, कारण ती जेव्हा बोलत असे तेव्हा त्यात दोन-तीन वेगवेगळ्या छ्टा असत. ते अवघड होतं, पण जमलं शेवटी. अजून एक म्हणजे नुकताच आलेला 'यलो' चित्रपट! त्यामध्ये मी गौरी गाडगीळसाठी ट्रॅक दिला आहे. तिच्या आवाजात तिच्यासारखं बोलणं (स्पेशल चाइल्ड) खरंच थोडं वेदनादायी होतं. तिच्यासारखं बोलताना मी तिला होणारा त्रास अनुभवला. आता मी स्वत: एक आई असल्यामुळे मला त्या मुलीची व्यथा, तिच्या आईची व्यथा जाणवली. तेव्हा मी थोडी अस्वस्थ झाले होते. त्यामुळे 'यलो' डब करताना माझी कसोटी लागली होती.
रिलायन्स कंपनीचा जो श्रीकृष्णावर अॅनिमेशन चित्रपट आला होता, त्यामध्ये मी 'बाळकृष्ण' होते. म्हणजे बाळकृष्णाला आवाज दिला होता. मी जेव्हा चित्रपट केला तेव्हा माझ्यासमोर कोणताही व्हिडियो नव्हता, कारण माझ्या आवाजावर तो नंतर तयार होणार होता. बाळकृष्णाच्या बाळलीला, त्याचं वागणं, बोलणं, यशोदामातेशी तो कसं बोलत असेल, मित्रांबरोबर खोड्या करताना कसं बोलत असे, त्यानं पूतना राक्षसिणीला धडा शिकवला तो प्रसंग, यशोदामाता त्याला उखळाला बांधून ठेवते तो प्रसंग, हे सगळं कल्पना करून डब करावं लागलं. बाकीच्या लहान बाळांच्या किंवा मुलांच्या डबिंगपेक्षा यात जास्त आव्हान होतं. मला एका देवाला डोळ्यासमोर आणून तो मनुष्यरूपात कसा बोलेल, कसा वागेल, हे साकारायचं होतं. त्याचं अस्तित्व बाकीच्यांपेक्षा वेगळं दाखवणं, त्याचवेळी त्याचं रूप कानांना मधुर वाटेल हे भान ठेवणं खरंच अवघड होतं.
तुझ्या कामामधला एखादा मजेशीर किस्सा सांगशील का?
हो!! खूप किस्से घडत असतात. एक लहानपणीचा सांगते. मी माझ्या वडिलांना एकदा खूप फुशारक्या मारून सांगितलं, "तुम्हांला माहीत आहे का, आज मी हेलेन हंटचा 'ट्विस्टर' हा चित्रपट डब करायला जाणार आहे." आता चित्रपटाचं डबिंग छोट्या पडद्यावरसुद्धा करता येतं, पण तेव्हा मात्र चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणारा (थिएटर रीलीज) असेल, तर मोठ्या पडद्यावर चित्रपट बघून डबिंग होत असे. मोठ्या पडद्यावर चित्रपट, समोर मी आणि माझ्यासमोर माईक इतकंच असतं. त्यामुळे त्या मोठ्या पडद्यावर जेव्हा मी ते मोठ्ठं वादळ येताना बघितलं तेव्हा माझी पार घाबरगुंडी उडाली. दुसर्या वेळी मला 'लॉस्ट वर्ल्ड'साठी बोलावलं होतं. तेव्हा मी घाबरून आधीच बाबांना आत घेऊन गेले होते. जेव्हा पहिला सीन सुरू झाला तेव्हा मी पूर्ण तयारीत होते, आता मोठे डायनोसोर येणार, पण आपण घाबरायचं नाही. प्रत्यक्षात त्या सीनमध्ये खूप गोंडस लहानलहान डायनोसोर समोर आले.
तुझ्या हॉलिवुडमधल्या कामाबद्दल सांग ना.
लहानपणापासून कार्टूनच्या डबिंगची सुरुवात झाली, तशी इंग्रजी चित्रपट आणि मालिका यांचं डबिंगपण चालू झालं. 'बे वॉच'मधलं पॅमेला अॅन्डरसनचं पात्र डब करताना थोडीशी जुही चावलाची बोलण्याची शैली वापरली. त्यानंतर 'द बोन कलेक्टर' या चित्रपटासाठी मी अँजलिना जोलीला डब केलं. चित्रपट भीतीदायक होता, पण अँजलिनासारखे संवाद म्हणण्याचं आव्हान होतं. यूटिव्हीचे बरेच इंग्रजी चित्रपट दरवर्षी डब करत असते. लीन नावाच्या एका चिनी अभिनेत्रीसाठी आवाज दिला आहे.
व्हॉइसओव्हरच्या क्षेत्रामध्ये काम करताना तुला तुझ्या मनासारखी ओळख मिळाली आहे, कामाचं श्रेय मिळालं आहे, असं वाटतं का?
मी जेव्हा परदेशात जाते आणि सांगते की, मी 'व्हॉइस आर्टिस्ट' किंवा 'व्हॉइस अॅक्टर' आहे तेव्हा लोक खूप आदरानं बघतात. अमेरिकेत किंवा जपानमध्ये 'व्हॉइस अॅक्टर'ला एक पत आहे. जपानी भाषेत 'व्हॉइस अॅक्टर'ला 'सेयु' म्हणतात. ते ब्रँड अॅम्बेसिडरसारखे असतात. त्या तुलनेत भारतात तो मान कमी मिळतो, हे मला मान्य करावं लागेल. एक उदाहरण म्हणजे किशोरीताई आमोणकरांवर 'भिन्न षड्ज' नावाचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये किशोरीताईंच्या संवादांचं डबिंग मी केलं आहे किंवा शर्मिला टागोर आणि अमोल पालेकरांचा चित्रपट 'समांतर'; यामध्येसुद्धा शर्मिला टागोरांचे संवाद मी म्हटले आहेत, असं मी तुला सांगितलं तर कळेल, अन्यथा हे कोणाच्या लक्षातसुद्धा येत नाही. आता कुठे डबिंग आर्टिस्टची नावं श्रेयनामावालीमध्ये येत आहेत.
व्हॉइसिंगच्या क्षेत्रातली तू आघाडीची आणि सर्वांत जास्त मानधन मिळणारी कलाकार आहेस. इथपर्यंत कशी पोचलीस? तुझ्या क्षेत्रामध्ये अपडेटेड राहण्यासाठी काय करतेस?
माझ्याकडे असलेल्या अनुभवानं आणि कामावरच्या प्रभुत्वानं मला हे स्थान मिळवून दिलं आहे. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आता या स्थानावर टिकून राहणं ही आहे. त्यासाठी मी व्हॉइसिंगचे बरेच वेगवेगळे प्रकार करून बघत असते. उदाहरणार्थ, इंटरअॅक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सर्विस (दूरसंचार क्षेत्रामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान), टिव्हीचे प्रोमो (वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या जाहिराती), रेडियोवरचे स्पॉट (जाहिराती,कार्यक्रम). कामाच्या वैविध्यामुळे मला इथे टिकून रहायला मदत होते.
या क्षेत्रात अद्ययावत राहावंच लागतं. अभ्यास म्हणून 'डिस्ने'चे नवीन सिनेमे आले की आवर्जून बघते. डबिंग कसं केलं आहे, कोणी डब केलं आहे, हे बघते. त्या कलाकारांच्या मुलाखती ऐकते. नवीन तंत्रज्ञानाबद्दल काही ऐकिवात आलं की, लगेच त्याची माहिती वाचून समजून घेते. माझे यजमान श्री. विक्रम जोशी याच क्षेत्राशी संबंधित काम करतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'निशाणी डावा अंगठा' या मराठी चित्रपटाचे ते निर्माते आहेत. त्यांचं वाचन खूप दांडगं आहे. कार्टून, अॅनिमेशन त्यांचे आवडते विषय आहेत. त्यांवर आमची खूप चर्चा होते.
या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये किती स्त्रिया आहेत? त्यांना मिळणारी वागणूक, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?
हे क्षेत्र पुरुषप्रधान की स्त्रीप्रधान असं सांगता येणं अवघड आहे. साधारणपणे स्त्रीपात्रं जास्त असतात, त्यामुळे कदाचित स्त्रिया जास्त असतीलही, पण मानधन मात्र दोघांना सारखंच मिळतं. हिंदी चित्रपटसृष्टीसारखं पुरुषांना जास्त, बायकांना कमी असं होत नाही. अनुभव जास्त असेल तर जास्त मानधन, कमी असेल तर कमी अशी साधारण सगळीकडे आढळणारी गोष्ट इथेसुद्धा आहे.
स्त्रीत्व किंवा स्त्रीवाद यांचा तुझ्या दृष्टीनं अर्थ काय?
स्त्री-पुरुष हा फरक मुळात आपल्या मनातच कधी येऊ द्यायचा नाही. तुमच्या अंगात जर धमक असेल आणि तुम्ही तुमच्या कष्टांच्या बळावर पुढे जात असाल किंवा यशस्वी होत असाल, तर कोणत्याही पुरुषाचा अहंकार तुम्हांला रोखू शकत नाही. जर कधी कुठल्या स्त्रीवर अन्याय होताना मला दिसला, तर मी गप्प बसणार नाही. त्याविरुद्ध आवाज उठवला गेलाच पाहिजे.
'डिस्ने'सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनी बरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? त्या तुलनेत भारतीय कंपनीबरोबर काम करणं कसं वाटतं?
मला दोन्हीकडे चांगला अनुभव मिळतो. अमेरिकी कंपन्या जास्त प्रगत आहेत. भारतातसुद्धा आता ते तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे, पण जे तंत्रज्ञान अमेरिकेत ८०-९०च्या दशकात होतं ते आपल्याकडे आता आलं आहे. त्यामुळे आपण थोडे मागे आहोत. पण प्रयत्न नक्की चालू आहेत. आपल्याकडेपण 'छोटा भीम'सारखे अॅनिमेशनपट तयार होत आहेत. परदेशी कंपन्यांच्या गुणवत्तेचा दर्जा खूप उच्च असतो. 'डिस्ने'सारख्या कंपनीकडून आपल्याला खूप शिकायला मिळत आहे. त्याचा वापर आपण करत आहोत. त्यामुळे मला दोन्हीकडे काम करायला मजा येते.
व्यवसाय आणि घर यांचा समतोल कसा राखतेस? तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे? त्यांचा तुला कसा आधार मिळतो?
आमच्या घरात मी, माझे पती, आमची अडीच वर्षांची मुलगी, सासूसासरे असे आम्ही राहतो. मला या सगळ्यांची नेहमीच मदत होत असते. माझी मुलगी लहान असल्यानं सध्या मी तिलाच प्राधान्य देते आहे. पण माझ्या कामाच्या वेळी माझी आई किंवा सासूबाई तिला सांभाळतात. त्यामुळे माझं काम सुकर होतं. कुटुंब खंबीरपणे पाठीशी उभं असलं की मुलींना करिअरमध्ये झोकून देता येतं.
तू हे क्षेत्र निवडलं नसतंस तर आणखी कोणतं क्षेत्र निवडलं असतंस?
हा प्रश्न खूप अवघड आहे. मी लहानपणापासून हेच केलं आहे. मला जी गोष्ट आवडते आणि जमते त्याच गोष्टीत माझं करिअर आहे. खूप कमी लोकांच्या नशिबात हा योग असतो. याव्यतिरिक्त मी काही केलं असतं असं मला नाही वाटत.
फावल्या वेळात काय करायला आवडतं?
मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी खूप सिनेमे बघते, पुस्तकं वाचते. मला लहान मुलांशी खेळायला आवडतं. गप्पा मारायला तर प्रचंड आवडतं. जमेल तेव्हा वृद्धाश्रमांना, अनाथाश्रमांना भेटी देते. तिथे मला वृद्धांशी गप्पा मारायला आवडतं. मला प्रवास करायला आवडतो. कामाच्या निमित्ताने माझा बराच जगप्रवास झाला आहे.
सध्या काय करते आहेस? भविष्यात काय योजना आहेत ?
नुकतीच मी 'माधुरी मिडलक्लास' ही 'स्टार प्रवाह'ची मालिका पूर्ण केली. 'झी कॉमेडी अवॉर्डस्'मध्ये एकदोन नाटिका आहेत. 'वंदेमातरम्' नावाचा एक प्रयोग करते आहे. हा प्रयोग `जाणता राजा' सारखा असणार आहे. सन १८५७ पासून ते १५ ऑगस्ट, १९४७पर्यंतचा इतिहास यामध्ये दाखवला जाणार आहे. त्यामध्ये १६० कलाकार आहेत. त्यामध्ये मी 'व्हॉइस कास्टिंग' करते आहे. 'व्हॉइस कास्टिंग आणि डिझायनिंग' म्हणजे कथेप्रमाणे योग्य आवाज शोधणं, त्यांचे उच्चार, भाषाशैली सगळं बघणं. हे माझं होम प्रॉडक्शन असल्यामुळे काम उत्तम होण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. त्याबरोबर मी देशात किंवा बाहेर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करते. माझे सासरे आणि यजमान हॉस्पिटॅलिटी (आदरातिथ्य) या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतात. मुंबईमध्ये आमची रेस्टॉरंट्स् आणि तारांकित हॉटेल्स् आहेत. या नवीन क्षेत्राची सध्या माहिती करून घेते आहे.
तुझी स्फूर्तिस्थानं कोणती?
माझी आई!! मला तिच्यासारखं व्हावंसं वाटतं. तिनं आम्हांला जसं वाढवलं, संस्कार दिले आहेत, गोष्टी सांभाळून घेतल्या आहेत त्यातून मी नेहमीच शिकत असते. ती आमच्याकडे काम करणार्या बायकांच्या मुलांची शिक्षणं करत असे. तिच्याकडून आमच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले आहेत.
या क्षेत्रात येताना नवोदितांना काय सल्ला देशील?
'व्हॉइसओव्हर' हे एक छान क्षेत्र आहे. स्वत:चे गुणदोष, मर्यादा लक्षात घेऊन निर्णय घ्या. योग्य व्यक्तींकडे काम करा. यश मिळण्यास उशीर लागू शकतो, प्रयत्न करत राहा. नवीन नवीन गोष्टी करत राहा. हताश होऊ नका.
मेघना, वेळ दिल्याबद्दल मायबोली.कॉम परिवारातर्फे तुझे आभार आणि पुढल्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा!!
~संयुक्तातर्फे
मुलाखतकार - पूर्वा वैद्य
विशेष आभार - मंजूडी, अरुंधती कुलकर्णी
प्रकाशचित्रे - मेघना एरंडे यांच्या संग्रहातून साभार
प्रतिसाद
मेघना तुफान टॅलेंटेड आहेत! या
मेघना तुफान टॅलेंटेड आहेत! या मुलाखतीतून त्यांची ओळख करून दिल्याबद्दल थँक्यू पूर्वा!
बाळापासून आजीपर्यंतच्या पिढीतल्या चारही व्यक्तींच्या आवाजातल्या दिवाळीशुभेच्छा फारच मस्तं! :)
मस्त मुलाखत पूर्वा.. आता अजुन
मस्त मुलाखत पूर्वा.. आता अजुन लिहायला लाग. :)
मेघना एरंडेचा आवाज इतक्या ठिकाणी वापरला आहे हे माहित नव्हतं!
शुभेच्छांची क्लिप भारी! :)
शुभेच्छांची क्लिप भारी! :)
यांची ओळख करून दिल्याबद्दल पूर्वाचे अनेक आभार. :)
दिलखुलास मुलाखत ! आवडली.
दिलखुलास मुलाखत ! आवडली. नेमके प्रश्न आणि नेटकी उत्तरे यामुळे वाचताना मजा आली. मेघना एरंडेविषयी माहीत होतं. पण इतक्या सविस्तररीत्या पहिल्यांदाच वाचल.
मस्त मुलाखत!
मस्त मुलाखत!
शुभेच्छांची क्लिप सहीयं!
मेघनाची मुलाखत खूप आवडली.
मेघनाची मुलाखत खूप आवडली. वेगवेगळ्या आवाजात शुभेच्छा फारच जबरदस्त !!अमेझिंग टॅलेन्ट आहे!!
छानच झाली मुलाखत. एकदम
छानच झाली मुलाखत. एकदम टॅलेन्टेड आहेत मेघना.
मेघना यांची सविस्तर मुलाखत
मेघना यांची सविस्तर मुलाखत खुप आवडली. त्यांचं अभिनेत्री, सूत्रसंचालिका म्हणुन काम कायम आवडते.व्हॉइसओव्हर क्षेत्रातील त्यांच्याकामाविषयी अधिक माहीती मिळाली.त्या बद्दल धन्यवाद.
मुलाखत खूप आवडली. मेघनाजींना
मुलाखत खूप आवडली. मेघनाजींना अनेक हार्दिक शुभेच्छा. :)
मुलाखत खूप आवडली :-)
मुलाखत खूप आवडली :-)
मेघना एरंडे आणि डबिंग
मेघना एरंडे आणि डबिंग कलाकारांबद्दल यापूर्वी वाचलं होतं. तरीही बरीच नवीन माहिती मिळाली. कृष्णावरच्या अॅनिमेशनपटात मेघनांच्या आवाजानुरूप व्हिडियो बनला !! लोकसाहित्यात एम ए!!! वॉव.
पुरुषप्रधान क्षेत्र, स्त्रीवाद यांसंबंधींचे व काही नेहमीचे (प्रेरणास्थान, फावला वेळ) नसते तरी चालले असते असे वाटले.
मेघनांच्या आवाजातली शुभेच्छांची क्लिप सगळ्यात भारी.
मेघना एरंडेचा आवाज इतक्या
मेघना एरंडेचा आवाज इतक्या ठिकाणी वापरला आहे हे माहित नव्हतं!
अमेझिंग टॅलेन्ट आहे!!
मुलाखत खूप आवडली :-)
नेमके प्रश्न आणि नेटकी उत्तरे यामुळे वाचताना मजा आली.
>>>+११११११११११११११११११११