गोंदण

HDA2014_gondan.JPG

मनभर उमटते थेंबाथेंबांचे गोंदण
असे अनावर होती जुन्या आठवांचे घन...


ओल्या रानातून येते गोड पावसाळी हाक
आणि भिजत राहते वेडे काळीज नाहक
वारा वाहतो भरारा तशी देहात झिम्मड
गाणे पावसाचे ओठी पायी भिंगोऱ्यांचे वेड


फेर धरल्या हातांचा स्पर्श अजाणता तान्हा
स्मरे बाहुली वेल्हाळ इंद्रधनू मागताना
होडया अनोळखी येती अंगणात तरंगत
त्यात बसुनी वाहावे वाटे हेलकावे घेत


मन डोहात चहाच्या मातीमाखलेले तृण
असे अनावर होती जुन्या आठवांचे घन....


जुन्या पोत्याचा घोंगता आत नवी थरथर
रंग पिऊन दिशांचा होई हिरवी नजर
खोप्यावर लावलेली तिच्या बांगडीची काच
क्षण निसटून गेला त्याचा जन्मभर जाच


लख्ख वीज उजाळते काळ्या आभाळाची पाटी
सय माऊलीची येई कशी धरायची पोटी
सान पावलाचे पाट ओलांडून झडे सर
जीव भारला कळेना पूर आत की बाहेर


कण सोनेरी दिसांचे येती पुन्हा दर्वळून
असे अनावर होती जुन्या आठवांचे घन....

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_blackseparator.jpg

शाम
HDA_14_Shaam.jpg
शाम हे अहमदनगर जिल्ह्यातील खडकवाडी येथे शिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एम.ए., बी.एड शिक्षण पूर्ण केले असून संगम साहित्य संस्कृती दिवाळी अंक, लोकमत दिवाळी अंक यांबरोबरच कुसुमाकर, गझल सुरेशभटांनंतर, काव्यदीप, आदी पुस्तकांतून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महिमा कानिफनाथाचा, इपितर, होरा या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

शाम, असाच एखादा आसमंत आठवणींची तंद्री लावून जातो. छान कविता.

क्या बात है ....
फारच सुंदर रचना ...

आहा, मस्त

वा ! सुरेख रचना.

अप्रतिम ताज्या प्रतिमांची पाऊसझड .. अनेक ओळी मनात रेंगाळत रहातात.
''जीव भारला कळेना पूर आत की बाहेर'' असा परिणाम कवितेचा.

जीव भारला कळेना पूर आत की बाहेर.... आहा.. शाम... पहिल्याच घासाला इतकी अप्रतिम कविता... सुरेख

कण सोनेरी क्षणांचे .....अहाहा !! शब्द दरवळून गेलेत ओलस मातीगंधान . ..

आठवांचे घन छान बरसलेत.

अप्रतिम कविता!

कवीचे नावही न बघता कळेल इतकी 'तुझ्या' शैलीतली कविता!
वाह! सुंदरच

छान..! काही कल्पना विशेष उल्लेखनीय:
होडया अनोळखी येती अंगणात तरंगत
त्यात बसुनी वाहावे वाटे हेलकावे घेत