निरोगी डोळे, निरोगी बालक

HDA2014_orangeheader.jpg



लायन्स नॅब नेत्ररुग्णालय ही पश्चिम महाराष्ट्रातील मिरज या लहान तालुक्याच्या ठिकाणी १९९२-९३ पासून कार्यरत असलेली एक सामाजिक सेवाभावी संस्था आहे. समाजाच्या लहानमोठ्या आर्थिक मदतीवर व सहकार्यावर संस्थेचे काम अवलंबून आहे. दोनशे बेड क्षमतेचे डोळ्यांचे फार मोठे, अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय असून तेथे सर्व प्रकारच्या नेत्रविकारांवर उपचार केले जातात. नेत्रविज्ञान शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणाचे केंद्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. संस्थेचे पन्नास टक्के काम धर्मादाय स्वरूपाचे आहे, म्हणजेच सुमारे पन्नास टक्के शस्त्रक्रिया गरीब व गरजू रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत केल्या जातात आणि इतरांसाठीही दर अतिशय माफक आहेत. आत्तापर्यंत १,७०,००० पेक्षा जास्त नेत्रशस्त्रक्रिया झाल्या आहेत. यावरून एकूण कामाच्या व्याप्तीची कल्पना यावी. हे रुग्णालय स्थापन करणार्‍या दोन सहभागी सामाजिक संस्थांपैकी 'नॅब, मिरज' (नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड, जिल्हा शाखा सांगली-मिरज) या संस्थेचा सेक्रेटरी आणि नेत्ररुग्णालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचा सदस्य या नात्याने या हॉस्पिटलच्या कामाशी मी अगदी सुरुवातीपासून जवळून संबंधित आहे. संस्थेचे काम हा स्वतंत्र प्रदीर्घ लिखाणाचा विषय आहे, परंतु प्रस्तुत सदराचे स्वरूप विचारात घेऊन संस्थेमार्फत चालविल्या गेलेल्या बाल-नेत्रोपचार प्रकल्पापुरतेच प्रस्तुत लेखातील निवेदन मर्यादित ठेवले आहे.

संस्थेशी संबंधित असल्याने ‘बाल-नेत्रविकार चिकित्सा व उपचार’ हा एक स्वतंत्र विभाग आहे याची मला माहिती होती, परंतु ती एक चळवळ असू शकते याची कल्पना नव्हती. वास्तविक माझा पेशा पूर्णपणे वेगळा. नेत्र-आरोग्यसेवा पुरविणे (सर्व्हिस डिलिव्हरी) या क्षेत्राशी माझा थेट असा संबंध नाही. असे असूनही संस्थेच्या एका प्रोजेक्टद्वारे या क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली, ती केवळ संस्थेमधील माझ्या इतर अधिक अनुभवी सहकार्‍यांमुळे! याचे श्रेय अनेकांना असल्याने आणि काम करताना असंख्य लोकांचे सहकार्य आणि सहभाग लाभला असल्याने कोणाचाच विशेष नामोल्लेख येथे केलेला नाही, परंतु सर्वांच्याचबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

चाळिशीनंतर नेत्रदोषाचे प्रमाण बरेच वाढते. सहाजिकच सर्वच नेत्ररुग्णालयांमध्ये प्रौढ रुग्णसंख्येच्या तुलनेत लहान मुलांची संख्या खूपच कमी असते. मोतीबिंदू हा साठीनंतरचा अंधत्वाला कारणीभूत होणारा फार मोठा गंभीर नेत्रविकार आहे, हे वास्तव सर्वज्ञात आहे. त्यामुळे सामाजिक समस्या म्हणून प्रौढांच्या मोतीबिंदू निवारणाकडे पाहिले जाते. लहान मुलांचे नेत्रविकार आणि उपचार हा मात्र तुलनेने बराच दुर्लक्षित विषय! याची कारणे पुढे ओघाने येतीलच. ऑर्बिस इन्टरनॅशनल, यु.एस. ए., या ‘एनजीओ’ने लहान मुलांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यासाठी आमच्या संस्थेला अर्थसहाय्य देऊ केले. सन २००४-२००५ पासून पुढील चार वर्षांच्या काळासाठी त्यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला होता आणि तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची अटही होती. चाळीस टक्के खर्चाची जबाबदारीही आमची होती. तो प्रकल्प आम्ही स्वीकारला आणि त्याचा प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी मी घेतली. सामान्यपणे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची असते आणि ते ती पार पाडतात अशी आपली समजूत असते. पण लहान मुलांच्या नेत्र-आरोग्याबाबत अगदी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबांतही तसे घडत नाही आणि तेही केवळ अज्ञान आणि गैरसमजुतींमुळे. या प्रकल्पाअंतर्गत 'प्रकल्प व्यवस्थापनाचे' पहिले प्रशिक्षण दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या मान्यवर संस्थेत मी घेतले. तेथे मला मिळालेले हे धक्कादायक प्राथमिक ज्ञान! माझ्या स्वतःच्या कुटुंबाबरोबरच माझ्या सभोवतीची आणि संबंधांतली अनेक कुटुंबे यात आली! ज्या बालकाचे डोळ्यांचे आरोग्य चांगले असेल त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही चांगले राहते आणि त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, हे एक मान्यताप्राप्त सत्य परंतु दुर्लक्षित वास्तव आहे, म्हणून 'निरोगी डोळे - निरोगी बालक' हे प्रकल्पाचे घोषवाक्य घेऊन लोकांपर्यंत जाण्याचे आम्ही ठरविले.

सांगली-मिरज जोडशहर आणि सभोवतालची खेडी मिळून मिरज तालुका असे आमच्या प्रकल्पासाठीचे कार्यक्षेत्र ठरविले होते. लोकसंख्या सुमारे दहा लाख. पैकी चाळीस टक्के शहरी आणि साठ टक्के ग्रामीण. आमच्या हॉस्पिटलपासून सुमारे २५-३० कि.मी. त्रिज्येतील हा भाग आहे. एक बाल-नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर, दोन नर्सेस (याच आळीपाळीने ओ.पी.डी., आय.पी.डी. आणि ऑपरेशन थिएटर साहाय्यक म्हणूनही काम करत), दोन ऑप्टोमेट्रिस्ट जे प्रामुख्याने प्राथमिक नेत्र तपासणी करत, एक काउन्सिलर, असा मूळचा आमचाच पण विशेष प्रशिक्षित स्टाफ, तसेच एक कॉम्प्युटर ऑपरेटर कम् क्लार्क, एक आया, एक ड्रायव्हर असा इतर स्टाफ - आणि या सर्वांना घेऊन काम करणारा मी अशी एकूण टीम होती. मी स्वतः एक ट्रस्टी असल्याने नियोजन आणि अंमलबजावणी यांमध्ये मला पूर्ण स्वातंत्र्य होते. अर्थात तज्ज्ञांचे मार्गदर्शनही होतेच. ठरलेल्या कार्यक्षेत्रातील ० ते १५ या वयोगटातील सर्व बालके हा आमचा टार्गेट ग्रूप होता आणि त्यांचे 'सर्वसमावेशक नेत्र-आरोग्य' (कॉम्प्रिहेन्सिव्ह आय केअर) हे आमचे ध्येय होते. असा हा छोटासा प्रयत्न आणि त्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला आलेल्या अनुभवांचे हे सर्व टीमच्या आणि संस्थेच्या वतीने केलेले नम्र निवेदन. लेखाच्या सदराचे स्वरूप विचारात घेऊन येथे कार्यपद्धती आणि तत्सम बाबींची सर्वसामान्य माहिती दिली आहे, ती तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही याची कृपया नोंद घ्यावी.

HDA2014_Nirogee5.jpg

या ठिकाणी थोडीशी या विषयाची व्याप्ती, स्वरूप आणि वास्तव (ग्राउंड रिअ‍ॅलिटी) समजून घेणे उपयुक्त ठरेल. आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल की लहान मुलाचा डोळा म्हणजे मोठ्या माणसाच्या डोळ्याची लहान आवृत्ती नव्हे. ‘पीडिआट्रिक आय इज नॉट स्मॉल अ‍ॅडल्ट आय!' (हातापायांसारख्या अवयवांबाबत मोठ्या अवयवांची लहान आवृत्ती असे म्हणता येऊ शकेल). जन्म झाल्यापासून पुढे काही काळापर्यंत डोळ्याचा विकास होत असतो. यावरून उपचारपद्धतीतील वेगळेपणाची कल्पना यावी.

सामान्यांना माहीत नसलेल्या काही अन्य बाबी: मुलांना जन्मतः मोतीबिंदू (कॅटरॅक्ट), काचबिंदू (ग्लाकोमा) असे गंभीर नेत्रविकार असू शकतात, ज्यांमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव इलाज असून, तो मूल अगदी काही महिन्यांचे असताना करता येतो. इतकेच नव्हे तर उशिरा केल्यास उपयोग होत नाही. तिरळेपणा शस्त्रक्रियेने घालवता येतो व तो वेळीच न घालविल्यास बाधित डोळ्याची दृष्टी कायमची जाऊ शकते. अकाली प्रसूती अथवा अन्य कारणांमुळे ज्या नवजात अर्भकांना इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागते त्यांच्या डोळ्यांच्या पडद्यांवर (रेटिनावर) कायमस्वरुपी गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो व रेटिना तज्ज्ञांकरवी त्याच वेळी अशा बालकांवर उपचार करून धोका टाळता येतो. अनेक गंभीर दृष्टिदोष असे असतात की त्यांमध्ये दुखणे, खुपणे, वेदना होणे असे काही घडत नसल्याने ते लक्षातच येत नाहीत. रंगपंचमीतील घातक रंग, दिवाळीतील असुरक्षित आतिषबाजी, खेळातील धनुष्यबाण अशा गोष्टींमुळे दरवर्षी अनेक बालके दृष्टी गमावतात. या सार्‍यांमुळे येणार्‍या अंधत्वाचे प्रमाण जरी ‘काही हजारांत एक’ असे असले तरी ज्याच्या वाट्याला ते येते त्याच्यासाठी ते ‘माणशी एक’ म्हणजे शंभर टक्केच असते हे विसरता येणार नाही. विशेष म्हणजे गरीबी-श्रीमंती, शिक्षण, स्वच्छता, राहणीमान अशा घटकांचा यात सहसा संबंध असत नाही. हे धोके कोणालाही संभवतात. ६ ते १५ वयोगटात र्‍हस्वदृष्टिदोषाचे (लांबचे कमी दिसणे) प्रमाणतर पाच टक्क्यांपर्यंत आढळते. उपचारांअभावी मुलाच्या विकासावर याचे दूरगामी परिणाम होतात. साध्या चष्म्याच्या साहाय्याने हे टाळता येऊ शकते. वारंवार डोळे येणे, लाली येणे अशा दोषांवरसुद्धा वेळीच उपचार न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. यादी खूप मोठी होईल.

परंतु ‘दिसणे’ ही व्यक्तिगत अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे दृष्टिदोष किंवा कमी दिसणे हे अगदी लहान मुलाच्याच काय पण शाळेत जाणार्‍या मुलाच्याही सहज आणि लवकर लक्षात येत नाही. आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा कधीकधी फार उशीर झालेला असतो. पालकांनाही मूल जेवते किती, खेळते किती, धावते कसे, वजन किती आहे हे सर्व दिसू शकते पण त्याला 'दिसते' किती व कसे हे 'दिसू' शकत नाही. वेळीच बाल-नेत्रतज्ज्ञाकडून तपासणी आणि जरूर तर उपचार यांच्या साहाय्याने हे टाळता येते. अंधत्व ही सर्वांत दुःखद आणि टोकाची स्थिती आहे आणि त्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस, ट्रीटमेन्ट ऑफ क्युअरेबल ब्लाइंडनेस, रीहॅबिलिटेशन ऑफ इन्क्युअरेबल ब्लाइंड या तीन स्तरांवर काम अपेक्षित आहे.

HDA2014_Nirogee1.JPG

यापैकी अंध-पुनर्वसन या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. पण त्याचबरोबर सर्वांच्याच आयुष्याचा दर्जा (क्वालिटी ऑफ लाइफ) चांगला असण्यासाठी लहानपणापासून चांगली आणि निर्दोष नजर असणे आवश्यक आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी तपासणीची आणि उपचारांची सुसज्ज यंत्रणा उभी करणे आणि तिची माहिती लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असते. विशेष म्हणजे लहान मूल निर्णयक्षम (डिसिजन मेकर) नसल्याने, "आम्ही तुमच्या दारात सेवा-सुविधा घेऊन आलो आहोत, तुमच्या मुलाला काहीही होत नसेल, मूल काहीही तक्रार करत नसेल तरी त्याच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या" हे पालकांना समजावून सांगून त्यांना तयार करणे हेच अधिक कठीण असते. यासाठी एका मर्यादित कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करून आखणी केलेला हा आमचा छोटासा प्रकल्प आणि प्रयत्न.

आम्ही प्रथम ग्रामीण भागापासून सुरुवात केली. ० ते १५ या टार्गेट ग्रूपचे चार मुख्य भाग पडतात. वयोगटानुसार ६ ते १० प्राथमिक शाळा, ११ ते १५ माध्यमिक शाळा (प्रत्यक्षात हा वयोगट १६-१७ पर्यंतचा असतो) हे दोन गट. सर्वशिक्षा अभियानामुळे शाळेत जाणार्‍या मुलांचे प्रमाण ऐंशीनव्वद टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे त्या मुलांपर्यंत पोहोचणे तसे शक्यतेतले होते. प्रश्न होता सहा वर्षांखालच्या मुलांचा. शहरांत ३ ते ५ वयाची मुले मॉन्टेसरी, प्ले ग्रूप्स अशा ठिकाणी सापडू शकतात. खेड्यात बालवाड्या व तत्सम सोयी फारश्या नाहीत. ० ते ३ वयोगटाच्या मुलांचा प्रश्न तर सगळीकडेच फारच बिकट. त्यामुळे ० ते ६ हे ग्रामीण भागासाठी मोठेच आव्हान होते.

एक प्रयत्न म्हणून तालुका पंचायत समितीच्या माता-बाल-संगोपन विभागाच्या प्रमुखांना भेटलो आणि अंगणवाडी सेविकांची मदत मिळेल का हे विचारले. त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सेविकांच्या मासिक सभेमध्ये हा विषय मांडण्याची संधी त्यांनी दिली. त्यांना एकूण विषय, त्याचे महत्त्व आणि त्या काय मदत करू शकतात हे समजावून सांगितले. विषय त्यांनी उचलूनच धरला, म्हणाल्या "आमच्या मुलांसाठी तुम्ही इतके करताय, तर आम्हीही त्यात सहभागी झालेच पाहिजे."

HDA2014_Nirogee3.jpg

असाच प्रतिसाद जिल्हापरिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडून आणि शिक्षकांकडूनही मिळाला. त्यांच्यासाठी सोप्या मराठीतील छापील माहितीपुस्तिका बनविल्या, पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन्ससह लेक्चर्स तयार केली. त्यानंतर गावांचे सोईस्कर गट तयार करून पंधरावीस जणांच्या गटांचे एकेक दिवसाचे अभ्यासवर्ग घेतले. त्याद्वारे त्यांना मुलांची प्राथमिक तपासणी कशी करायची हे शिकवले. डोळ्याच्या डॉक्टरांकडे जो तपासणीचा तक्ता असतो त्यातील अक्षरांच्या व टिंबांच्या ओळींची खालून दुसरी ओळ ही कट-ऑफ लाईन घेऊन फक्त या ओळीच्या कॉपीजच्या पट्या आणि वीस फूट लांबीची दोरी शालेय शिक्षकांना दिली. या ओळीतील अक्षरे ज्यांना वीस फूटावरून सहज वाचता येणार नाहीत किंवा टिंबे मोजता येणार नाहीत अशा सर्व मुलांची यादी करायला सांगितली. साध्या नजरेला दिसून येणारे दृष्टिदोष कसे बघायचे त्याची माहिती दिली. ज्यांचे डोळे नेहमी येतात किंवा लाली येते अशी मुलेही निवडून ठेवायची होती. अशा त‌‍र्‍हेने शालेय शिक्षक प्राथमिक तपासणी करू शकतात. त्यांना ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ पद्धतीने तपासणी करायला शिकविले असल्याने सदोष बालक प्राथमिक तपासणीतून सुटण्याची शक्यता टाळलेली होती. संपूर्ण कार्यक्रम तज्ज्ञांच्या मदतीने बनविलेला होता. अशा प्राथमिक तपासणीतून सुमारे दहा टक्के मुले निघावीत अशी तांत्रिक अभ्यासाआधारे अपेक्षा होती. शिक्षकांच्या ट्रेनिंगच्या टाईम-टेबलला जोडून त्याच रोटेशनने आमच्या तपासणी टीमचे टाईम-टेबल तयार केले होते. हे पाठोपाठ आणि सातत्याने चालणारे क्रमशः करण्याचे काम होते.

HDA2014_Nirogee7.jpg

अशा तर्‍हेने शालेय तपासणीतून स्क्रीन केलेल्या मुलांची तपासणी आमची टीम करत असे. आमच्या टीममध्ये प्रशिक्षित ऑप्टोमेट्रिस्ट असे. तो सखोल तपासणी करून ज्या मुलांना चष्म्याचा नंबर असेल त्यांचा नंबर काढत असे. आम्ही जाताना चष्याच्या फ्रेम्सचा पुरेसा स्टॉक नेलेला असे. त्याच ठिकाणी त्या मुलाच्या मापाची फ्रेम मुलाच्या पसंतीने निवडली जात असे. सात दिवसांत आमच्या हॉस्पिटलच्याच फॅक्टरीत तयार केलेले चष्मे शाळेत पोचते केले जात. नीट बसणारा आणि पसंतीचा चष्मा मिळाल्याने मुले तो हौसेने वापरत. ज्यांना आवश्यक असेल त्यांना सामान्य तक्रारींसाठी औषधे, ड्रॉप्स दिले जात. ज्यांची अधिक तपासणी आवश्यक आहे असे दिसून येई त्यांना नंतर ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आमच्या गाडीतून मुख्य दवाखान्यात आणून त्यांची सखोल तपासणी आमचे डॉक्टर करत. तपासणीनंतर त्यांना परत गावात पोचविले जाई. जी मुले शाळा सोडून गेलेली असत किंवा गैरहजर असत त्यांना तपासणीच्या दिवशी इतर मुले शोधून आणत. शाळागळती (‘स्कूल ड्रॉप आउट्’) होण्यामागेही कमी दिसण्यामुळे अभ्यासात लक्ष न लागणे हे एक मुख्य कारण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ऊसतोडणी मजूर व अन्य भटकंती करणार्‍या लोकांच्या वस्त्यांमधूनही मुलांना आणले जाई. शालेय तपासणी आणि उपचार घेणे यात मुलींचा सहभाग चांगला, समजूतदारपणाचा आणि उत्स्फूर्त असे.

HDA2014_Nirogee6.jpg

० ते ६ वयोगटासाठी अंगणवाडी सेविका (यांना आम्ही ताई म्हणायचो) मोठ्या उमेदीने काम करायच्या. स्वतःचे तुटपुंजे मानधनही वेळेवर न मिळणार्‍या या सेविका गावातील दुकानांतून स्वखर्चाने धान्य आणून मुलांना न्याहारी तयार करून वाढत हे पाहून मी थक्क झालो. प्रत्येक ताईच्या कार्यक्षेत्रात सुमारे शंभर ते दीडशे कुटुंबे असतात. त्या नेहमीच्या पटावरील सर्व मुलांना तपासणीसाठी हजर ठेवतच, शिवाय पटावर नसलेल्या आणि अगदी लहान बाळांनाही त्यांच्या आयांसह हजर ठेवत. त्यांचे सर्वांशी, विशेषतः महिला आणि वृद्धांशी अतिशय विश्वासाचे संबंध असत. एका ताईंनी तर फक्त नऊ दिवसाच्या लहान बाळाला आईसह हजर ठेवण्याचा विक्रम केला. वय वर्षे ० ते ६ या वयोगटात मात्र आमचे डॉक्टरच प्रत्येक मूल स्वतः तपासत. गंभीर नेत्रदोष असलेली मुले शाळेतून मिळालीच पण अंगणवाड्यांतूनही मिळाली. `सतत रडतं' अशी एका बाळाची तक्रार होती. ताईंनी सांगितल म्हणून ते फक्त तीन महिन्यांचं बाळ आई शिबिरात घेऊन आली. त्याला जन्मतः काचबिंदू होता आणि त्या वेदनेमुळे ते सतत रडत होतं. आईकडे बघूही शकत नव्हतं. अशिक्षित गरीब कुटुंब. पण त्यांना ताईंच्या मदतीने मुलाच्या डोळ्याचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे हे समजावून सांगितले. ते तयार झाले आणि लगेच ऑपरेशन केलेही. ते यशस्वीही झाले. मूल रडायचे तर थांबलेच पण ते आईच्या मांडीवर पडून दूध पिताना आता तिला ओळखूही लागले आहे, हे त्याच्या नजरेतून दिसत होते आणि आईही त्याच्याकडे मोठ्या कौतुकाने बघत होती. आम्हां सर्वांच्यासाठी फार मोठा आनंदाचा क्षण होता तो! भविष्यात अंध होऊ घातलेले एक बालक अंधत्वापासून वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. पुढे ‘फॉलो-अप’साठीही तो मुलगा आईबरोबर वारंवार येऊ लागला आणि मग तो आमचा ‘ब्रँड अँबॅसिडरच’ झाला. पुढेही असे कृतार्थतेचे प्रसंग अनेक आले. क्वचित प्रसंगी अपयशही आले, कारण पालकांचा ऑपरेशनला होकार मिळवण्यात आम्ही कमी पडलो. कारणे अनेक होती.

HDA2014_Nirogee8.jpg

पण जसजसे ‘सक्सेस स्टोरीज’चे प्रमाण वाढत गेले तसतसे पालकांचा प्रतिसाद मिळवण्यातल्या अपयशाचे प्रमाण कमी होत गेले. अशाच एका तपासणीत डोंबार्‍याचे खेळ करणार्‍या भटक्या जमातीच्या वस्तीमधील एक जन्मतः मोतीबिंदू असलेला छोटा मुलगा सापडला. त्यालाही ऑपरेशन नंतर छान दिसू लागले. त्याच्या आजोबांनी आम्हाला तो क्रिकेट कसे खेळतो हे स्वतः त्याच्याबरोबर खेळून दाखवले. शेजारच्या जिल्ह्यातच वीटभट्टीवर काम करणार्‍या एका मजुराच्या मुलाला जन्मतः मोतीबिंदू आहे हे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगतले होते, पण उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जाणे आणि पैसे खर्च करणे, दोन्हीही शक्य नसल्याने त्याने नाद सोडून दिला होता. आठवड्याच्या बाजारासाठी गेला असताना त्याने मुलांसाठी एक रुपयाचे फुटाणे घेतले. घरी आल्यावर त्या पुडीच्या कागदावरचा मजकूर त्याच्या शाळेत जाणार्‍या दुसर्‍या मुलाने वाचला. ती योगायोगाने आमची जाहिरात होती. ती पाहून मुलाला घेऊन तो आमच्या हॉस्पिटलमध्ये आला. आम्ही लवकरच त्याचे ऑपरेशन केले आणि आणखी एका बालकाच्या भविष्यातील अंधःकार टाळता आला. एका चार वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आजी आली. मुलाचे आईबाप दोघेही भुरट्या चोर्‍या करणारे, दोधेही जेलमधे. मुलाच्या डोळ्याला गाईच्या शेपटाचा फटका बसल्यामुळे मोतीबिंदू झाला होता. ऑपरेशन करणे गरजेचे होते. आजी संमती देईना. शेवटी ओळखीच्या पोलिसाला बोलावून आणले आणि त्याच्याकडून तिलाच अटक करतो असा दम दिला. कशीबशी तिची संमती मिळवली आणि ऑपरेशन केले, यशस्वीही झाले. असे अनेक प्रसंग सांगता येतील. पंचवीस-तीस कि. मी. त्रिज्येच्या परिसरातील प्रत्येक गावात आणि वाड्यावस्त्यांवर आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करून ० ते १५ वयोगटातील प्रत्येक मूल तपासण्याचे उद्दिष्ट ठेवून पोहोचलो आणि बर्‍याच अंशी त्यात यशस्वी झालो.

याच पद्धतीत थोडे आवश्यक फेरफार करून आम्ही शहरी भागात कार्यक्रम राबविला. यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, सर्वशिक्षा अभियान, सर्व शिक्षक, शहरी अंगणवाडी सेविका या सर्वांचे खूप चांगले सहकार्य मिळाले. अगदी माझ्या पुतण्याच्या मुलालासुद्धा चष्म्याचा नंबर आहे हे आमच्या स्कूल स्क्रीनिंगमध्येच सापडले. आमच्या शेजार्‍यांची मुलगी सारखी धडपडायची, खेळताना पडायची. याचे कारण कमी दिसणे आहे हे लक्षातच आले नव्हते. तिलाही शालेय तपासणीतच खूपच कमी दिसण्याचा गंभीर नेत्रदोष (लो व्हिजन) आढळून आला. कमाल म्हणजे आमच्याच दवाखान्यातल्या जनरल ऑप्थॅल्मॉलॉजी विभागातल्या एम. एस. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टरांची मुलगी आमच्या लहान मुलांच्या विभागात आलेली असताना तिला आमच्या नेत्रचिकित्सा साहाय्यकाने (टेक्निशियनने) तपासले आणि तिला चांगल्यापैकी मोठा नंबर होता असे आढळले.

मुलांच्या नेत्र-आरोग्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत पण त्या बर्‍याचदा केवळ कागदावरच राहतात. आम्हांला विशेष म्हणजे शासकीय स्तरावरच्या निम्न व मध्यम स्तरावरील अधिकार्‍यांकडूनच जास्त चांगली मदत मिळाली. ज्यांच्या हातात अधिक अधिकार होते असे उच्चपदस्थ कलेक्टर, सिव्हिल सर्जन वगैरे अधिकारी एकतर उदासीन किंवा राजकीय पुढार्‍यांच्या दबावाखाली काम करणारे होते. अर्थात अपवाद जे होते त्यांनी मदतही खूप केली. ‘सर्वशिक्षा अभियान’ या योजनेखाली खूप करण्यासारखे आहे. त्याखाली काम करणार्‍या निम्नस्तरावरच्या कर्मचार्‍यांनी खूप मदत केली. शासकीय उच्चाधिकार्‍यांनी मनात आणले तर शासनामार्फत किंवा आमच्यासारख्या सामाजिक संस्था, हॉस्पिटल्सच्या मदतीने असा उपक्रम सर्व ठिकाणी राबविता येईल, किंवा एखादी संस्था आपल्या परिसरात असा प्रकल्प राबवू इच्छित असेल तर तिला आमच्या अनुभवाचा उपयोग होऊ शकेल व मदत मिळू शकेल.

या उपक्रमात सर्वसामान्य शाळांनी चांगला सहभाग घेतला पण बड्या शाळा, कॉन्व्हेंट शाळा यांच्याकडून प्रतिसाद कमी मिळाला. त्यांना यात सहभागी होण्यात कमीपणा वाटत होता. पुढे आमचे नांव झाल्यावर तिथल्या मुलांचे पालक आमच्या दवाखान्यात परस्परच मुलांना घेऊन येऊ लागले. आम्ही झोपडपट्ट्या, अनाथालये, एच.आय.व्ही.बाधित मुलांची वसतीगृहे, वेश्यावस्त्या अशा सर्व ठिकाणी तपासणी शिबिरे घेतली आणि आवश्यक उपचार केले. लोकजागृतीसाठी आम्ही ‘बालकाचा पहिला वाढदिवस त्याच्या डोळे तपासणीने साजरा करा’ हे घोषवाक्य दिले. जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स, लहान मुलांचे डॉक्टर्स, अर्भक चिकित्सातज्ञ (निओनॅट्स) अशा सर्वांपर्यंत पेडिअ‍ॅट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी क्षेत्रात आलेले नवीन तंत्रज्ञान आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सेवासु्विधा यांची माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मूल आठदहा वर्षाचे होईपर्यंत त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करता येत नाही, हा अगदी सार्वत्रिक गैरसमज होता. खेड्यांतल्या मुलांचे डोळे चांगलेच असतात हा असाच तिथल्या शिक्षकांमधील गैरसमज, ते जेव्हा स्वतः तपासणीत सहभागी झाले तेव्हा दूर झाला. झाडपाल्याचा रस डोळ्यात घालणे खेड्यापाड्यांत आणि काजळ घालणे शहरांत, सगळीकडे कथा तीच! अनेक ‘पॉप्युलर मिसकन्सेप्शन्स’ आढळून आल्या. पण खेड्यातील तथाकथित अशिक्षित आणि अडाणी लोकांमध्ये एक उपजत शहाणपण आणि समजूतदारपणा असतो आणि ते चांगला सकारात्मक प्रतिसाद देतात असे अनपेक्षितपणे दिसून आले. तरीही खूप मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षणाची आवश्यकता अजूनही आहे.

ज्यांना ‘साइट थ्रेटनिंग आय डिसीजेस’ आणि ‘क्युअरेबल ब्लाइंडनेस’ म्हणतात अशा दोन्ही प्रकारच्या अनेक केसेसमध्ये अंधत्व निवारण आणि ‘साईट रिस्टोरेशन’ करण्यात तसेच आमच्या प्रोजेक्ट काळात, प्रोजेक्ट एरियात एकंदर मुलांची सर्वसामान्य तपासणी करणे आणि डोळ्यांचे आरोग्य राखणे यात आम्ही बर्‍याच प्रमाणात यशस्वी झालो. प्रकल्पाची एक महत्त्वाची उपलब्धी म्हणजे आम्ही कायमस्वरूपी सुसज्ज असा एक बाल-नेत्रोपचार विभाग स्थापन केला. चाईल्ड फ्रेंडली वातावरण असलेला बाह्य-रुग्ण विभाग, सुसज्ज आणि अद्ययावत साधनांनी समृद्ध असे ऑपरेशन थिएटर, विशेष प्रशिक्षित नेत्रतज्ज्ञ व इतर स्टाफ असे या विभागाचे स्वरूप आहे. या विभागाद्वारे कायमस्वरूपी सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

HDA2014_Nirogee2.JPG

अखेर आम्ही या प्रोजेक्टद्वारे काय साधले याचा आढावा घेऊन हे निवेदन पुरे करतो. चार वर्षांच्या प्रोजेक्टच्या मुदतीत आमच्या संपूर्ण टीमने अथक काम केले. तपासणी शिबिरांचे संयोजन, नियोजन, अंमलबजावणी, नंतरच्या उपचारांचे नियोजन, प्रत्यक्ष उपचार, पाठपुरावा या सर्व अतिशय गुंतागुंतीच्या बाबी होत्या. शिवाय रिपोर्टिंग, हिशोब ठेवणे, आकडेवारीचे संकलन, छाननी आणि त्याचे माहितीत रूपांतरण, प्रसिद्धी अशी इतर कार्यालयीन कामे होती. मिरज तालुका या नियोजित कार्यक्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सत्तर गावांतील ० ते १५ या वयोगटातील प्रत्येक बालक हा टार्गेट ग्रूप होता. ही संख्या दोन लाखांहून थोडी अधिक होती. प्रकल्प काळात दोन लाखांपेक्षा अधिक मुलांची नेत्र तपासणी, अकराशे मोठ्या (मेजर- साईट सेव्हिंग व रिस्टोरेटिव्ह) नेत्र-शस्त्रक्रिया, आवश्यक त्या सर्वांना हजारो चष्म्यांचे वाटप व औषधोपचार अशी मुख्य उद्दिष्टे साध्य झाली. शस्त्रक्रियांसाठी शेजारच्या जिल्ह्यातील मुलेही आली. ही आकडेवारी कदाचित फारशी आकर्षक वाटणार नाही. परंतु प्रौढांना सामान्यपणे अंधत्व येते ते मोतीबिंदूमुळे आणि ऑपरेशन करण्यास काहीसा उशीर झाला तरी ते अंधत्व ऑपरेशनने दूर होण्याचे प्रमाण जवळजवळ शंभर टक्के असते. परंतु लहान मुलांमध्ये येणारे उपचाराने दूर होऊ शकण्याजोगे अंधत्व हे वेळीच उपचार न केल्यास कधीही बरे न होणारे (इन्क्युअरेबल) असते. आपण आज समाजात जे तरूण अंध बघतो त्यांपैकी बहुसंख्य हे असे वेळीच उपचार न झाल्यामुळे अंध झालेले व राहिलेले असतात. एखाद्या व्यक्तीचे सुंदर बालपण, उमेदीचे व उपयुक्त तारुण्य आणि अखेर वृद्धत्व हे असे अंधावस्थेत जाऊ देणे हे भयानक आहेच, पण असे बरे करण्यासारखे (ट्रीटेबल, क्युअरेबल) अंधत्व उपचाराने दूर न करणे हा समाजाने त्या बालकाच्या बाबतीत केलेला एक अक्षम्य अपराधच आहे. असे अंध होऊ किंवा राहू न देणे, एकेका बालकाचे होऊ घातलेले अंधत्व रोखणे याचे महत्त्व, तसेच साध्या चष्म्यामुळे बालकाच्या आयुष्यात फार मोठा फरक पडू शकतो, या बाबी समजून घेतल्या तर ही आकडेवारी पुरेशी लक्षणीय आहे असे नम्रपणे म्हणावेसे वाटते. याशिवाय काही हजार पालक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक यांचे सजगीकरण (सेन्सेटायझेशन) आणि प्रशिक्षण, आमच्या कर्मचारीवर्गाचे व डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि काही जणांचे इन-हाउस ट्रेनिंग, परिसरातील जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स, बालरोगतज्ज्ञ, अर्भक चिकित्सातज्ज्ञ (निओनॅट्स), डोळ्यांचे डॉक्टर्स, सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स अशा मंडळींना राजी करून त्यांचे सजगीकरण अशी इतर कामेही आम्ही करू शकलो. प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही शालेय नेत्रतपासणी व इतर सर्व तपासणी शिबिरे यांचे आयोजन व संयोजन मोफत केले. गरजूंकरिता सर्व ऑपरेशन्स आणि उपचार पूर्णपणे मोफत केले हा या प्रकल्पाचा अजून एक विशेष. अनेकांची नजर वाचली आणि अनेकांना नजर मिळाली. अनेकांच्या भविष्यात नियती लिहू पाहत असलेली अंधत्वाची अगतिकता पुसून नियतीवर काही अंशी मात करता आली. प्रकल्पाअखेरीस एकंदर कामाचा आढावा त्रयस्थ तज्ज्ञांनी घेऊन मूल्यमापन केले आणि प्रकल्प पूर्णतः यशस्वी झाल्याचे मत व्यक्त केले.

या संपूर्ण काळात मला भारतातील अनेक ठिकाणी वर्कशॉप्स, कॉन्फरन्सेस वगैरे कार्यक्रमांना हजर राहण्याची, अभ्यास करण्याची, तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. असेच प्रकल्प इतरत्र सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व मदतही करता आली. एक कार्यकर्ता म्हणून मला मिळालेला अनुभव आणि मानसिक समाधान यांचे मोल शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मर्यादित क्षेत्रात राबवलेल्या या प्रकल्पाप्रमाणे संपूर्ण देशात 'बाल नेत्र-आरोग्य' चळवळ राबविण्याची गरज आहे असे मात्र जरूर वाटते.

HDA2014_separator_small.jpg

सर्व प्रकाशचित्रे, © लायन्स नॅब नेत्ररुग्णालय, मिरज

लायन्स नॅब नेत्ररुग्णालय, मिरज
http://www.lneh.org/
ईमेल - lionsnabeyehospital@rediffmail.com
दूरध्वनी क्रमांक - +९१ (०२३३) २६४४४९९, २६४५३८८, २६४४०५१

HDA2014_saamarthya.jpg
related1: 


HDA2014_kandil1.jpg

अ‍ॅड. अनंत यशवंत बेडेकर
HDA_14_Nirogee_Anant_Bedekar.jpg
अ‍ॅडव्होकेट अनंत बेडेकर हे मिरज व सांगली येथे गेल्या ३६ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. सामाजिक नेत्रोपचार, अंधत्व प्रतिबंध (नियंत्रण) व निवारण (उपचार), अंधांचे शिक्षण व पुनर्वसन या क्षेत्रांशी गेली २२ वर्षे त्यांचा संबंध असून त्या क्षेत्रांत ते काम करत आहेत.


HDA2014_bihar.png

प्रतिसाद

वा, वकीलसाहेब - खूपच मोलाचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून केलंय - मनापासून अभिनंदन आणि तुम्हा सर्व टीमला सलामच..

सहजसुंदर लेखनशैली व सर्व अनुभव अगदी "डोळे" उघडायला लावणारे ...

रच्याकने, तुम्ही "वान्या"चे बाबाच ना ? - तुमच्या सौ.नी लिहिलेले वान्याचे सर्व लिखाण वाचल्यावर तुमचे पुत्रवत श्वानप्रेम वाचून अगदी भरुन आले होते.

मनापासून धन्यवाद.

खूप प्रेरणादायी लेख आहे! गायीच्या शेपटाचा फटका बसलेल्या मुलाची गोष्ट वाचून तर अज्ञानापासून लोकांना वाचवण्याची अजूनही किती गरज आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. खूपच मोलाचे कार्य आपण करत आहात, ह्याबद्दल अभिनंदन!

अभिनंदन. या कामाबद्दल तुमच्या पूर्ण टीमच कौतुक वाटले खूप

खुप मोलाचे कार्य,
या बाबतीत लोकांचे अज्ञान बघता, असे कार्य प्रत्येक गावात सतत चालू राहिले पाहिजे. तूमचे कार्य पथदर्शक ठरावे

शशांक, आभारी आहे प्रतिसादाबद्द्ल. वान्याची आठवण तुम्ही `रच्याक'ने नाही, अगदी `रच्यामम' (रस्त्याच्या मधोमध) काढली त्याबद्दल विशेष आभार. आम्हाला नेहमीच आणि विशेषतः दिवाळीत फटाके उडू लागले की त्याची आठवण येतेच. त्याची जाम घाबरगुंडी उडयची. नेमका तुम्हीही आत्ताच उल्लेख केलात. रच्याकने, मागच्याच आठवड्यात पाळीव कुत्र्यांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो त्या काळात त्यांची कशी काळजी घ्यावी याबद्दल वाचले आणि हे आधी वाचनात आले नव्हते याचे अधिकंच वाईट वाटले. असो.
सर्वच प्रतिसाददात्यांचे आभार. कोणीही जिथे असेल तिथून हे काम करू शकतो, अगदी आपल्या घरापासून.

लेखातलाच शब्द वापरून सांगायचे तर थक्क करणारा प्रवास, अनुभव आणि कथन. छायाचित्रेही भारी आहेत. एन्जीओ टाइप कामाच्या जागाही प्रसन्न, व्यवस्थित मेंटेन केलेल्या पाहायची सवय नाही.
वाचून खूप आशादायी वाटले, की ठरवले की कठीण कामही होऊच शकते, तेही रडतखडत नाही, जिवाच्या रामरामाला नाही.
अभिनंदन आणि धन्यवाद.

खुप उपयुक्त अणि मोलाचे कार्य करत आहात.इछ्या आणि तळमळ असली की मार्ग सुचतात.ते अमलात आणले जातात.तुमच्या कामाचा झपाटा मोठ दिसतो.तुमची 'बाल नेत्र-आरोग्य' चळवळ विस्तृतत क्षेत्रात पसरण्यासाठी शुभेच्छ्या!