डमरूची गोष्ट

dhamaal_border1.jpg

HDA2014_damaru.jpg
आई म्हणते, मुलं मोठी होतात तसे त्यांचे प्रॉब्लेम्सही मोठे होत जातात. काही लोकांच्या बाबतीत मात्र हे गणित उलटं असतं. मोठे प्रॉब्लेम्स आल्याशिवाय ही मंडळी मॅच्युअर होण्याचे नाव घेत नाहीत. डमरू - माझी मैत्रीण - त्यातलीच एक. 'डमरूचं व्यक्तिचित्र लिहा' असं सांगितलं तर, 'डमरूचा रंग गोरा आहे, डमरूला आखूड केस आहेत, डमरू स्टुलाशिवाय कपाटातील डबे काढू शकत नाही. डमरूला दोन कान आणि चार कानातले आहेत. अशी ही डमरू मला फार आवडते.' - या पाच शाश्वत वाक्यांपलीकडे मी काहीच लिहू शकणार नाही असं वाटतंय. डमरूचं खरं नाव ‘नयना अवधूत डमरगावकर’. शाळेत मैत्रिणी बहुधा तिला नयना म्हणत असाव्यात. कॉलेजात मात्र तिच्या आडनावाचा अपभ्रंश झाला. सगळे तिला ‘डमरू’ म्हणायचे आणि तिच्या बडबडीला ते नाव शोभून दिसायचं. डमरूनंही ते इतकं सहज स्वीकारलं की बसस्टॉपवर मी तिला सभ्यपणे 'नयना' हाक मारली तर ती मला म्हणायची, “इथे डमरू म्हणायला काय लाजायचं? ते काय ‘भ’ पासून सुरू होतं काय? मी कन्फ्यूज होते नं!” डमरूइतकी विचित्र डमरूच!

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

डमरूला (आणि मलाही) अभ्यास आवडायचा. पण कॅन्टीनमध्ये एक कॉफी आणि पॅटीस मागवून गप्पा टाकण्यात आम्ही पटाईत होतो. डमरू माझी 'बेस्टी' ऊर्फ सख्खी मैत्रीण झाली होती कारण तिच्याकडे कुठलंही सिक्रेट सिक्रेटच राहायचं. मुलं डमरूशी 'मैत्री' करू बघायची, पण डमरूला कसा परफेक्ट बॉयफ्रेन्ड हवा होता. “बॉयफ्रेन्ड कसा गं परफेक्ट हवा. नाहीतर या कॉलेजात काही कमी नाही.”

“राहुल काय परफेक्ट नाहीये का? अभ्यासू आहे, हुशार आहे आणि तुझ्या मागेपुढेपण करत असतो. तूच त्याला हिडीसफिडीस करतेस."

“शाळेत ते शाहरुखचे सिनेमे बघून तू गंडली आहेस. विचार कर, त्याचं नाव तुकाराम असतं तरी तू त्याच्याबरोबर कुठे गेली असतीस का?”

“चल, कुछ भी क्या!!” मी खिदळत म्हणाले.

नाटकीपणे त्यावर डमरू म्हणाली, “बरं, तू म्हणतेस म्हणून उसके साथ इज्जतसे बात करेंगे.”

तिच्या आणि राहुलच्या मैत्रीला बहुधा राहुलचा इन्टरेस्ट जास्त कारणीभूत होता. ही त्याच्या प्रेमात पडली तर गणपतीला मेलडीची माळ वाहीन असा मनोमन मी नवसपण बोलले. फोर्थ ईयरला असताना आमचा ट्रेक भीमाशंकरला जाणार होता. उत्साहानं आम्ही दोघींनी एकत्र शॉपिंग केलं. डमरूनं नवा कॅमेरापण घेतला.

ट्रेकचा पहिला दिवस धम्माल झाला. निसरडा होता ट्रेक - तरी पूर्ण केला. लोक धडपडताना फोटो घ्यायला डमरूला मजा येत होती. इतके दमलो की आश्चर्य म्हणजे कॅम्पफायर न करताच सगळे झोपून गेलो. मध्यरात्री मी घाबरून जागी झाले तर डमरू माझ्या तोंडावर हात ठेवून कुजबुजत होती.

“ओरडू नकोस, मीच आहे. मी तासाभरात नाही आले तर सरांना घेऊन मला शोधायला ये.”

“अगं, एकटी कुठे जातेस या वेळेला?”

“एकटी नाही, राहुल आहे.”

“त्याला कशाला पिडतेस? मी येते.”

“झम्पक!” म्हणून ती पळून गेली. ही आणि राहुल, आणि तिथे मी नको - आता माझी ट्यूब पेटली, पण ती पेटवायला हिनं ही वेळ निवडावी याचा मला राग आला होता. सकाळी ब्रेकफास्टला मी तिला फैलावरच घेतलं.

“आधी नाही सांगायचं? आणि तिकडे कॉलेजात काय तो गोंधळ घाल नं. इथे सरांना कळलं असतं तर मला लटकवलं असतं त्यांनी आधी.”

“श्शश्श!! गोंधळ काय. आम्ही फक्त ग्लोइंग लायकेनचे फोटो काढले. दाखवेन तुला.”

“बरं बाई. इतके दिवस वाया घालवल्यावर आता फोर्थ ईयरला सुचतंय हे तुला. परीक्षा ४-५ महिन्यांवर आहेत.”

“शप्पथ कुणाला सांगणार नाहीस? तर सांगते.”

“नाही. काय झालं?”

“त्याचं लग्न ठरलंय.”

“आँ!!”

“अगदी फिल्मी झालंय गं सगळं. लग्न आजोबांनी ठरवलं लहानपणी. तिच्यावर प्रेम आहे त्याचं. पण मला पाहिलं की कंपनी हवीहवीशी वाटते म्हणतो. मीपण तो असला की हेल्पलेस होऊन जाते हल्ली.” तिच्या स्वरातल्या हताशपणानं मलाच वाईट वाटलं. मेलडीची माळ गणपतीला घालावी लागेल पण त्यात काही गोडवा वाटेना.

“डमरू, अजून लाइफ पडली आहे. अशी हेल्पलेस नको होऊस.”

दुसरा दिवस डमरू राहुलसोबतच होती. तसे पुढचे ४-५ महिने डमरू राहुलबरोबरच जास्त होती म्हणा. नकळत कुठेतरी अभ्यासावर परिणाम झाला असावा किंवा नशीब म्हणा. माझ्यासकट ४०% वर्ग कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला. डमरू ६०% मध्ये होती. डमरूला डिस्टिन्क्शन होतं त्यामुळे काही ना काही पुढे होईल अशी आशा तिला दाखवत मी नोकरीला लागले. डमरूला वीकेन्डला भेटणंपण कठीण व्हायला लागलं होते.

एक दिवस अचानक डमरू लंच अवरला आली.
“ढमे, जरा मदत कर. आई-बाबा वडाची साल पिंपळाला लावतायत. राहुल प्रकरणानं माझं लोकांबद्दलचं (म्हणजे मुलांबद्दलचं) जजमेन्ट आणि टेस्ट पुअर आहे असं त्यांना वाटतंय.”

“तू वेळीच त्याला दूर करायला हवं होतंस.”

“त्याला नाही कशी म्हणणार होते? तो इतका प्रामाणिक आणि बस्स्… ही वॉज फनी. आई-बाबा असले निष्कर्ष काढतील हे काय माहीत होतं?”

“डमरू, आई-बाबांच्या जागी तू असतीस तर तू काय वेगळं म्हणाली असतीस?”

“आता मला ऑस्ट्रेलियाला फेलोशिप मिळाली आहे पण आई-बाबा लग्न करून जा म्हणतायत. एअर तिकिट काढायला पैसे हवेत. बँकेत माझी गॅरेन्टर होतेस?”

“एवढ्या लगेच मुलगा बघितला?”

“नाही, ते अजून दूरच. मात्र त्या गोंधळात ही फेलोशिप जाईल बघ.”

“पण अशी परस्पर गेलीस तर आई बाबा चिडतील की...”

“मग काय करू म्हणतेस? मिळालेली फेलोशिप सोडू? इथे कधी लग्न ठरेल ह्याची वाट बघत दिवस काढू?”

“थांब. तुझ्या ताईला आधी पटवू, मग होईल काहीतरी. अगदी काही नाही जमलं तर मी आहेच.”

हो-नाही करता करता डमरू ताईच्या मध्यस्थीनं आई-बाबांच्याच मदतीनं ऑस्ट्रेलियाला गेली. डमरू अभ्यासावर फोकस्ड होती. फेलोशिपनंतर एका चांगल्या रिसर्च संस्थेत तिला नोकरीही लागली. डमरू आणि मी आता फेसबुक फ्रेन्ड्स् झालो होतो.

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

सगळं चांगलं चाललेलं असताना एक दिवस मीराकडून कळलं की डमरूचं लाईफ पुन्हा गटांगळ्या खातं आहे. मीरा आमचीच वर्गमैत्रीण. मीरापण सिडनीमध्येच होती त्यामुळे तिची आणि डमरूची भेट व्हायची कधीकधी. डमरूला तिच्या नोकरीत वांशिक भेदभावाचा अनुभव येत होता. काम चोख केलं तरी अनेक वेळा मीटिंगमध्ये तिच्याशी कुणी बोलत नसे. डिपार्टमेन्टची पार्टी असेल तर तिला त्याचा ई-मेल पार्टीनंतर एक दिवस मिळे. सुरुवातीला ती गोंधळून गेली. अलिखित अबोला, अलिखित बहिष्कार! आपलं काय चुकतं, लोकांना कसं आपल्या बाजूला प्रेमानं वळवता येईल ह्याचा विचार करण्यात ती पार डिप्रेस होऊन गेली.

एके दिवशी रेस्टरूममध्ये तिची सुपरवायझर तिला सरळ म्हणाली, “कितीही लिपस्टिक फासलीस तरी तुम्ही ब्राउनी लोक आमच्या मुलांना फशी पाडू शकणार नाही.”, तेव्हा तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की हे सगळं आपला रंग-वंश ह्यावरून चालू आहे. मला ऐकूनच वाईट वाटलं. एक-दोन वेळा आमचा एकमेकींना फोन करायचा प्रयत्न झाला पण वेळा वेगळ्या असल्यानं बोलणं घडलं नाही. शेवटी मी तिला ईमेल लिहिली आणि 'एकटीनं सोसत बसायची गरज नाही, सरळ घरी परत ये' अशा आशयाचं काहीतरी लिहिलं. तिनं उत्तर दिलं, 'मेघा, राहुलच्या बाबतीत, पुढे ऑस्ट्रेलियाला यायच्या बाबतीत मी सोपे दिसतील ते मार्ग स्वीकारले. तू वेळीच भानावर आणायला होतीस म्हणून परिस्थिती हॅन्डल झाली. ह्यावेळी मी शॉर्टकट मारणार नाही.' मी थोडीशी काळजीत पडले. पण त्यापेक्षा जास्त मी काय करू शकणार होते? डमरूच्या आणि माझ्या फोनवर गप्पा नाही झाल्या तरी मीराकडून बातम्या कळत होत्या.

आपल्याविरुद्धच्या भेदभावाची डमरूनं डिटेल्ड फाईल तयार केली होती. रिसर्च संस्थेचे मॅन्युअल, एच.आर.च्या पॉलिसीज् - सगळ्याचा अभ्यास केला आणि एक दिवस सरळ एच.आर.कडे तक्रार केली. एच.आर.मधली एमिली पोक्त स्त्री होती आणि ह्या क्षेत्रात तिनं अनेक वर्षं काढलेली होती. डमरूच्या कामाबद्दल आणि पुढील यशाबद्दल तिला खात्री होती. तिनं तक्रार नोंदवून घेतली आणि आस्थेनं डमरूला काही गोष्टी सुचवल्या. “ह्यापुढे जरी मी तुला फार मदत करू शकले नाही तरी अनऑफिशियली तुला सांगते - अशा केसमध्ये झालेला मनस्ताप दूर करण्यासाठी एकीकडे काउन्सिलिंगची मदत होऊ शकते, त्याचबरोबर एखादा सपोर्ट ग्रूप किंवा मैत्रिणी असणेही महत्त्वाचं. चांगला वकील असला तरी केस लांबली तर आर्थिक आधार देणारे लोक हवेत.”

पुढची पायरी ‘फेअर वर्क’ बोर्डापुढे केस दाखल करण्याची. डमरूच्या एका ऑस्ट्रेलियन मैत्रिणीनं लोकल रेडियोवर डमरूची छोटीशी मुलाखत घेतली. लोकल
मीडियाला जेव्हा खबर लागली तेव्हा अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी मदत केली. काहींनी बाहेरची म्हणून हेटाळणी केली तर काहींनी अगदी वैयक्तिक ताशेरे झाडले. केस चालू होती तेव्हाचं एक वर्ष फार ताण पडला तिला. 'हेट ई-मेल्स' आल्या की ती पार कोलमडून जायची पण तरी नेटानं उठून दुसर्‍या दिवशी ऑफिसला जायची. तिचे आई-बाबा दोन आठवड्यासाठी भेटून आले पण शेवटी लढाई तिची एकटीची होती आणि म्हटलं तर एकाकी होती. दुःखात सुख एवढंच की सहा महिन्यांनंतर एच.आर.नं तिच्या कामाचे स्वरूप बदललं त्यामुळे आता जुन्या सुपरवायझरबरोबर दुरूनही संपर्क येत नव्हता. शिवाय बोर्डाची केस बंद करून वकील व मीडिएशनद्वारे केस सोडवू असं तिच्या संस्थेनं सांगितलं. मी प्रयत्नपूर्वक तिला दर महिन्याला फोन करत होते. कधी गप्पा रंगत, कधी रडण्यात भिजून जात. माझ्या लग्नालापण ती येऊ शकली नाही. तिनं परत यावं आणि कॉफी-पॅटीस खात परत गप्पा व्हाव्यात असं तीव्रतेनं वाटायला लागलं.

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

सहा-आठ महिन्यांनंतर एक दिवस मी ऑफिसमध्ये असतानाच तिचा फोन आला. निकाल डमरूच्या बाजूनं लागला होता. मीडिएशनमध्ये तिला भरपाई म्हणून थोडेफार पैसे आणि कायमस्वरुपी नोकरी ऑफर झाली होती. पण तिनं त्याच संस्थेत कायमची नोकरी स्वीकारायच्या ऐवजी फक्त पैसे घेऊन परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. तिच्या भेटीची मी वाट बघू लागले. त्यादिवशी ती आली आणि जरा वेगळ्या हेअरकटपेक्षा तिच्यात इतर काही काही बदल नाही हे पाहून मी सुखावले.

कॉफी-पॅटीसबरोबर जरा गप्पा झाल्यावर डमरू म्हणाली, “कधीकधी एमिली, मीरा आणि एकूणच सिडनीची फार आठवण येते. पण इथे बरं वाटतंय. आता शोधतीये नोकरी पण अजून काही प्रोग्रेस नाही.”

मी आशा दाखवली, “मिळेल गं!”

ती हलकेच म्हणाली, “काल राहुलला भेटले.”

आश्चर्य लपवण्याच्या वायफळ प्रयत्नांत मी विचारलं, “बरे चाललेय त्याचे?”

“त्यानं त्याच्या फियॉन्सेबरोबर लग्न नाही केलं अजून. मी भारतात परत यायचा निर्णय घेतल्यावर एक दिवस 'आलीस की भेट' म्हणून त्यानं फोन केला.”

“मग?”

“त्यानं मला प्रपोज केलं. एच.आर.च्या केसमध्ये जे घडलं ते त्याला इथूनतिथून कळतच होतं. तो फारच इम्प्रेस झालाय. मी पार्टनर म्हणून हवी ही उपरती त्याला झाली एकदाची.”

“अरे वा! मस्तच की. कॉन्ग्रॅट्स!! बघ उशीर होतो गोष्टींना कधीकधी, पण सेट होशील, तुझ्या मनासारखं घडेल.”

“मेघा, निदान तू तरी हे म्हणू नकोस. गेली दोन वर्षं कशी गेली तुला माहीत आहे. अगं, मागच्या चार-पाच वर्षांत जे अनुभव मी घेतले त्यानंतर माझ्या इच्छा, आवडी-निवडी सगळं बदलून गेलंय. आता त्या तीन वर्षांपूर्वीच्या मनासारखं घडून कसं चालेल?”

मी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. “कुणी दुसरा मनात आहे का?”

“आता दुसरा कशाला काढतेस?”

“मी पार कन्फ्यूज झाले आहे. काय करणार आहेस?”

शांत स्वरात डमरू म्हणाली, “केसच्या काळात त्याचा आणि माझा फारसा संपर्क नव्हता. हुशार, फनी किंवा इन्टरेस्टेड व्यक्तीपेक्षा सपोर्ट करणारी व्यक्ती आयुष्यात हवी हे केसदरम्यान जास्तच जाणवलं. शिवाय तीन वर्षांत मी बदलले तसा राहुलही बदलला असणार. आता आमचे सूर जुळतात का नाही हे तपासल्याशिवाय मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. आई-बाबापण बघणार आहेत. तेव्हा मी त्याला ‘आप कतार में है’ सांगून आले आहे”.

मी नुसतीच तिच्याकडे बघत राहिले. आता डमरू जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल ही जाणीव मला सुखावून गेली.

dhamaal_border1.jpg
related1: 

HDA2014_morapeese_separator_blue.jpg
HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

HDA2014_morapeese_separator_blue.jpg


सीमंतिनी
HDA2014_silhouette_girl

सीमंतिनी गेल्या तीन वर्षापासून हौशी लेखिका आहेत. सामाजिक आशयाच्या कथा लिहण्यात त्या अधिक रमतात. एकता, बृहन महाराष्ट्र वृत्त, मंथन ह्या सारख्या नियतकालिकात त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. वाचकांशी होणाऱ्या थेट संवादामुळे सीमंतिनी यांना मायबोली.कॉम आवडते.

HDA2014_morapeese_separator_blue.jpg
भाऊ मेट्रो सर्विसेस
घरात पाणी, दारात पाणी, हापिसात कशी जाऊ मी झणी ।

दादांची मेट्रो बोलव तू राणी, पाण्यातून धावते विमानावाणी ।।


भाऊ मेट्रो सर्विसेस : खात्रीशीर भूमीजलवायू सेवेसाठी एकमात्र ठिकाण. आमची मेट्रो विमाने पाण्यातून, हवेतून, शेतातून, खड्डयांतून विनाव्यत्यय धावतात. खास आयात केलेले 'चुकलोरेभाऊ' तंत्रज्ञान. सोबत माफक शुल्कात हाडवैद्यांची सेवा. आम्ही वाजवी किमतीत आपला जीवनविमाही उतरवितो.

आजच नोंदणी करा: भाऊ मेट्रो!

HDA2014_morapeese_separator_blue.jpg

प्रतिसाद

आवडली.

आवडली. डमरू नाव मस्त, कस काय सुचले असेल?

छान आहे आवडली. जरा वेगळा विषय आहे. मस्त एकदम ओघवती शैली. अधून मधून विनोदी मेटॅफोर्स पण मस्त आहेत एकदम सिमंतिनी स्टाईल. :)

शॉर्ट अँड स्वीट.

मस्त. आवडली. तुमची शैली इतकी आवडते की खर तर तुमच्याकडून दीर्घकथा यायला हवी असे वाटत होते पण तुम्ही एकदम पिटुकली कथा लिहीलीत.

आपले लिखाण आवडतेच. हे देखील छान लिहिलेय, पण येस्स कथा लवकर संपली असे वाटले खरे..

सिरिअसली... सिमंतीनी... शब्दांचं बंधन असल्यागत का लिहिलयस? कथा जाम आवडलीये पण... किती लवकर संपली?

छानच ! पु ले शु

छान आहे

छान. वेगळीच आहे कथा.

मस्त !

मस्त आहे कथा. आवडली. :)

फार आवडली :)

तुझी लेखनाची शैली मला खूपच आवडते .. त्यात नेहेमी विविध विषयांचं ज्ञान, वेगवेगळे लाईफ एक्स्पिरिअन्सेस् रिफ्लेक्ट होतात असं वाटतं .. त्या दृष्टीने हे ही वाचायला आवडलं .. पण कथा म्हणून रुचली नाही .. म्हणजे डमरू चं व्यक्तीचित्रण म्हणून आवडलं पण खूप वेगवेगळ्या थीम्स् ची सरमिसळ झाली आहे असं वाटलं .. :)

जबरी आवडली कथा. अनेक दिवसांपासून वाचायची होती. डमरूचे कॅरेक्टर खूप आवडले. सुंदर लेखन!

खूप आवडली कथा.

ही कथा नाही आवडली. लेखिकेचं नाव वाचून अपेक्षा वाढल्या होत्या, कदाचित तिची अशी वेगळ्या धाटणीची कथा मला अपेक्षित नसावी.

आवडलीच. छान प्रगल्भ दृष्टिकोन दाखवला आहे.