ठिकाण: अॅडलेड (साउथ ऑस्ट्रेलिया)
दुपारी ऑफिसमधून साहिल बाहेर पडला तेव्हा धोधो पाऊस पडत होता. लवकरच काळोख पडेल, त्या आधी घरी पोचलं पाहिजे, या विचारांनी तो झपाझप पावले टाकत होता. साहिलने मनाशी विचार केला, 'ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर बाहेर पडलो आहे, तेव्हा ४:१७ची बस मिळाली तर बरे होईल.' म्हणजे त्याला त्याच्या सहा वर्षांच्या मुलीला (राधाला) वेळेत शाळेतून आणता आले असते. बसस्टॉप आता जवळ दिसू लागला आणि लांबून येणारी बस दिसली तेव्हा ती बस चुकू नये म्हणून साहिल अक्षरशः पळत सुटला. आता रस्ता क्रॉस केला की झाले! चालणाऱ्या लोकांकरिता ग्रीन सिग्नल लवकर मिळाला तर बरे होईल, म्हणजे ही बस चुकणार नाही, अशी इच्छा साहिलने मनात धरली. पण मनातील इच्छेची जर लगेच पूर्तता व्हायला लागली, तर मग नशीब या कल्पनेचे अस्तित्व कसे जाणवणार?
गाड्या भराभर वेगाने पुढे जात होत्या. बस साहिलच्या डोळ्यांदेखत निघून गेली.
साहिल : काय नशीब आहे माझं!
साहिलने एक टिपिकल मध्यमवर्गीय, असहाय उसासा टाकला.
पायी चालणार्यांना एकदाचा ग्रीन सिग्नल मिळाला तसे समोरासमोरून येणारे लोक एकमेकांना चुकवत रस्ता ओलांडू लागले. आता बस तर चुकली होती. त्यामुळे साहिलने निवांतपणे झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडला. पुढील बस पंधरा मिनिटांनंतर होती. बसस्टॉपकडे बघितलं तेव्हा बसशेडखालचा बाक पूर्णपणे ओला झाला होता. दोनच जागा शिल्लक होत्या. साउथ-ईस्ट एशियन वाटाव्या अशा एक आजीबाई काही रंगीत कागदांच्या घड्या घालीत बसची वाट पाहत बसल्या होत्या. साहिल अंग चोरून बसशेडखाली उभा होता आणि पावसात भिजत असल्यामुळे त्रासला होता. त्याची नजर परत आजीबाईंकडे गेली. परंतु आजीबाई जगाचा विसर पडला असावा अशा स्थितीत, साधारण दोन माणसांना बसायला पुरेल इतपत जागा अडवून, स्वतः आणि एक भरलेली पिशवी एवढा लवाजमा घेऊन बसल्या होत्या. दोन लोकांची जागा अडवून बसल्यामुळे साहिलची अर्थातच चिडचिड झाली. कारण त्यांनी पिशवी उचलली असती तर साहिलला बसता आले असते.
साहिलने उगीच फोन बाहेर काढला आणि चाळा म्हणून दोन गाणी ऐकली, काही इमेल आली आहे का ते बघितले. पूर्वी तो गाणी ऐकत असे, तेव्हा रीतसर एक गाणे पूर्ण ऐकून त्याचा पुरेपूर आनंद लुटत असे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अधीन झाल्यामुळे आता मात्र एखादी गोष्ट बैठक मारून तासन्तास करण्याची त्याची सवय केव्हाच रीसायकल बिनमध्ये गेली होती.
'आत्ता कशाला पाऊस पडतोय', असे कमीतकमी चारवेळातरी साहिल तोंडातल्या तोंडात पुटपुटला. आजीबाईंकडे पाहिले, तर आता त्यांना जगाचा विसर पडला होता. म्हणजे त्यांच्या कागदांच्या घड्या करण्यात त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या, की क्षणभर का होईना साहिलला त्याचं अप्रूप वाटले.
आजीबाई बारीक डोळ्यांच्या होत्या. साहिल विचार करू लागला. पूर्वी लहानपणी पुण्यात मिचमिच्या किंवा बारीक डोळ्यांचे पुरुष, म्हणजे नेपाळी गुरखे गस्त घालताना साहिलने पाहिलेले होते आणि बायका म्हणजे स्वेटर विकणाऱ्या नेपाळी बायका. त्यामुळे कुठलाही बारीक डोळ्याचा माणूस हा नेपाळी असतो, असा त्याने समज करून घेतला होता. रात्री झोपेची आणि साखरझोपेची काळजी हे गुरखे घ्यायचे आणि पुण्याची गुलाबी थंडी सोसण्याचे बळ या नेपाळी स्त्रियांनी विणलेले स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे द्यायचे. साहिल जेव्हा फर्गसन कॉलेजला शिकू लागला, तेव्हा बरीचशी बारीक डोळ्यांची मुले आसाम - मिझोराममधून आलेली होती. त्यामुळे तोपर्यंत नेपाळच्या अलीकडे म्हणजे आपल्याही सुजलाम् सुफलाम् देशात मिचमिच्या किंवा बारीक डोळ्यांचे असंख्य लोक राहतां, असे त्याला कळू लागले होते.
ऑस्ट्रेलियाला आल्यावर मात्र सिंगापूर, मलय, जपानी, कोरियन, चिनी, व्हिएतनामी अशा कितीतरी वंशांचे आणि वेगवेगळ्या रंगांचे, ढंगांचे लोक पाहायला मिळाले. हळूहळू लक्षात येऊ लागले की, एखाद्या माणसाचे बाह्यरूप किंवा नुसतेच वर्ण नव्हे, तर त्याचा वेश, त्याचे खाणे आणि मुख्यत्वे त्याच्या बोलण्याची पद्धत त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते.
ऑस्ट्रेलिया म्हटले की लोकांच्या नजरेसमोर सिडनी, मेलबर्न अशी शहरे येतात. तसे बघितले तर अॅडलेड अगदी छोटे आणि त्यामुळे तसे अपरिचित गाव. भारतात असताना साहिलने अॅडलेड हे फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचे गाव आणि अॅडलेड ओव्हल क्रिकेटचे ग्राउंड म्हणून ऐकले होते. इथे आल्यावर कळले की, सर डोनाल्ड ब्रॅडमन आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यावर रिटायर होऊन शांत जीवन कंठायला म्हणून अॅडलेड येथे आले.
अचानक साहिल भानावर आला. शेजारी बघतो तर घड्या करताकरता आजींनी पर्समध्ये हात घातला आणि वासाबीचे चार दाणे तोंडात टाकले. वासाबीचे चार दाणे एकदम चघळू शकतात, म्हणजे या आजीबाई नक्की जपानी असणार, असे साहिलला वाटले.
वासाबी! साहिलला वर्षभरापूर्वीचा प्रसंग आठवला...
अकियो (साहिलचा मित्र) : अरे, तुला हे वासाबीचे दाणे टेस्टला द्यायचे होते. फक्त एकेक चघळ. हे दाणे तिखट नसतात, पण दोन-तीन एकदम खाल्लेस तर मात्र नाकातून झिणझिण्या येतील.
साहिल : कमऑन, तू मिरच्या खाणाऱ्याला तिखट जपून खा काय सांगतोयस?(साहिलचा मराठी बाणा जागा झाला.)
साहिलने पटकन चार दाणे तोंडात टाकले आणि दोन सेकंदात त्याच्या नाकातून धूर बाहेर पडतो आहे, असे त्याला वाटून गेले. त्याच्या डोळ्यांतून पाणी यायला सुरुवात झाली. अत्यंत केविलवाण्या नजरेने अकियोकडे साहिलने प्यायला पाणी मागितले.
इगो हा एक इतका भयंकर प्रकार आहे की, तो सतत 'मी मोडेन पण वाकणार नाही' असे काहीसे शिकवत असतो. आपणही दुसऱ्याचा सल्ला न ऐकता माझेच खरे असे इतरांना दाखवत असतो. या प्रसंगीही असेच काही घडले होते आणि साहिलच्या डोळ्यांतले पाणी त्याच्या जपानी मित्राला सर्व काही सांगून गेले.
असो. पंधरा मिनिटांनी साहिलला पुढली बस मिळाली. बसमध्ये चढल्यावर साहिलला लगेचच बसायला जागा मिळाली आणि समोरच्या सीटवर आजीबाई बसल्या. थोडेसे सेटल झाल्यावर लक्षात आले की, बसमधील प्रत्येक माणूस हा कमीअधिक फरकाने त्रासलेला होता. मग कोणाचा तक्रारीचा सूर हा ऑफिसमध्ये खूप काम होते असा होता, तर कोणी पाऊस अवेळी आल्याने त्रासला होता. आजीबाई मात्र बसमध्ये जागा मिळाल्यावर लगबगीने आपल्या पर्समधून कागद काढून उरलेल्या कागदी घड्या घालू लागल्या. हळूहळू कागदी घड्या आता विविध आकार घेऊ लागल्या आणि लक्षात आले की आजीबाई ओरिगामी करत होत्या. आता मात्र त्या नक्की जपानी आहेत अशी खात्री साहिलला पटली.
शाळेजवळचा स्टॉप आल्यावर बसमधून उतरल्यानंतर साहिल तडक शाळेकडे चालू लागला. साहिलने राधाला शाळेतून घेतले आणि मग दोघे नेहमीप्रमाणे रमतगमत घरी चालत निघाले. साहिलला एका गोष्टीची नेहमी मजा वाटे, राधाचे जगणे किती साधे आणि मस्त आहे! एकतर ती नेहमी खूश असते, कायम उत्साही असते आणि कुठल्याही छोट्या गोष्टींमध्ये तिला भरपूर आनंद मिळतो. पाऊस पडू लागला की राधा कुठे झाडाचे पान किंवा कागदी होडी रस्त्याच्या कडेने वाहत आहे का हे बघत असते. कुठे मध्ये चालताना पाण्याचे वीतभर तळे मिळाले की मुद्दाम त्यात उडी मारायला बघते.
आत्ताच्या पावसातही तेच चालले होते. म्हणजे राधा खाली मान घालून शेजारच्या वाहणाऱ्या पाण्यात कुठे झाडाचे पान किंवा छोटे देठ वाहत आहेत का हे बघत होती. अचानक राधाने, "तुला ओरिगामी म्हणजे काय माहीत आहे का रे बाबा?" असा प्रश्न साहिलला विचारला.
साहिल : हो, पण असं अचानक का विचारते आहेस?
राधा : अरे बाबा, तुला आज एक गंमत सांगायची होती.
साहिल : कुठली? आज काय नवीन? (राधाकडे रोज नवीन गंमत असते.)
राधा : थांब सांगते, तुला येत्या शनिवारी ऑफिस आहे बाबा?
साहिल : नाही. शनिवारी मला तर सुट्टी आहे, पण का गं?
राधा : (एकदम खूश होऊन) येस! मी सियेनाला सांगितलं की, माझ्या बाबाला ओरिगामी नक्की माहीत असणार आणि त्याला ओरिगामी करताही येत असणार. (राधाला वाटते की तिच्या बाबाला सगळे काही येते. साहिलने तिचा समज अजून तसाच ठेवला आहे)
साहिल : अगं, लहानपणी मी हस्तकला खूप करायचो. शिंकाळं, हलव्याचा डबा, होडी, विमान आणि तेही दोन मिनिटांत. (साहिलला एकदम आठवले, किती आवडायचे आपल्याला रंगीत कागदांशी खेळायला! पण परीक्षार्थी अभ्यास चालू झाला आणि मग छंद कधी मागे पडला ते कळलेही नाही.)
राधा : बाबा, आपल्याला शनिवारी माझ्या शाळेत जायचं आहे.
साहिल : म्हणजे काय? तुला या शनिवारी शाळा आहे?
राधा : अरे बाबा, तेच तर तुला सांगायचं आहे, आज आमच्या शाळेत कोणीतरी मानसी नावाची गेस्ट टीचर आली होती आणि यू नो व्हॉट, तिने आम्हांला कागदी बेडूक शिकवला, बर्डी शिकवला आणि छोटे छोटे पपेट्स शिकवले.
तुला माहितीये, आय अॅम सो हॅपी, कारण सियेनाचे बाबा शनिवारी येणार आहेत ओरिगामी शिकायला आणि मी सियेनाला प्रॉमिस केलं आहे की माझा बाबापण येणार आहे.
साहिल : ओके, मी नक्की येईन आणि तुला ओरिगामीसुद्धा करून दाखवीन.
यानंतर ते घरी पोहोचले आणि नंतर पुढल्या दिवशी कामाचे रुटिन चालू झाले. बघताबघता शनिवार कधी आला हेच कळले नाही.
स्थळ : घर
वेळ : सकाळ
शनिवार सकाळ म्हणजे साहिलचा तसा आराम करायचा दिवस. थोडे नेहमीपेक्षा उशिरा उठायचे. बाहेर थंडी असेल तर छानपैकी आल्याचा चहा करायचा आणि मग निवांतपणे राधाला उठवायचे. पण आजची शनिवार सकाळ नेहमीपेक्षा वेगळी वाटत होती. बाहेर दिवाणखान्यात येऊन बघतो तर राधा अगदी बाहेर जाण्याच्या कपड्यांत तयार होती. साहिलला नवलच वाटले, 'अरे! राधा रेडी होऊन कुठे चालल्ये?'
पण भिंतीवरी कालनिर्णय पाहिले आणि खरेच आज शनिवार आहे याची खात्री झाल्यावर त्याने पहिल्या चहाचा घुटका घेतला.
साहिल : अरे वाह! राधा, आज काय विशेष? एवढी रेडी होऊन कुठे निघालीस?
राधा : बघ आई, मी म्हणाले होते की नाही, बाबा नक्की विसरला असेल. आज आपला ओरिगामी वर्ग आहे नं बाबा. आणि तू मला प्रॉमिस केलं आहेस की, तू माझ्या बरोबर येणार आहेस. सो हरी अप, प्लीज.
साहिल : अरे खरंच की! मी विसरून गेलो होतो. ओके, मी तयार होतो आणि मग निघूया.
शीतल (राधाची आई) : अरे, तुला ओरिगामी येते असं तू राधाला सांगितलं आहेस म्हणे. मलाही हे नवीनच आहे.
साहिल : अगं हो, तुला कधी सांगितलंच नाही मी. आता सवय उरली नाहीये मला. पण खात्री आहे की मी नक्की करीन.
शीतल : पण इतकी वर्षं झाली आपल्या लग्नाला, मी तुला कधीच ओरिगामी करताना पाहिलं नाहीये.
साहिल : अगं, त्यात काय आहे. एक कागद असतो त्याच्या घड्या घातल्या की झाली ओरिगामी! आहे काय त्यात? टू ईझी!
शीतल : ऑल द बेस्ट राधा. बाबाकडे लक्ष ठेव. (शीतलचा टोमणा साहिलच्या लगेचच लक्षात आला)
थोड्याच वेळात साहिल तयार झाला आणि राधाबरोबर तिच्या शाळेत गेला. पाहिले तर तसे तुरळक लोक दिसत होते. तेवढ्यात त्यांना सियेना आणि तिचे बाबा दिसले.
साहिल : (हस्तांदोलन झाल्यावर) हाय व्हिक्टर, हाऊ आर यू? गुड वेदर टुडे? पण खूप लोक दिसत नाहीयेत.
व्हिक्टर : बरोबर आहे. शनिवारी सकाळी आपल्या छोट्या मुलांकरता कोण वेळ काढणार, परत इथे येऊन आपला वेळ, श्रम खर्च करावा लागणार आणि परत डॉलर्सची कमाई शून्य. जगात कुठेही जा माणूस हा पोटार्थी शिक्षण घ्यायला तयार असतो, पण छंद म्हणून कुठली गोष्ट शिकायला फुकट असेल तरी पटकन तयार होत नाही. बाय द वे, तुला येते ओरिगामी?
साहिल : खूप नाही, पण मला वाटतंय मी करू शकतो.
हॉलमध्ये एक गोल टेबल मांडून ठेवले होते आणि काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. काही खुर्च्यांवर जपानमधून आलेल्या आणि आता इथे स्थायिक झालेल्या अशा दोनतीन बायका निमूटपणे कागदांच्या घड्या घालत बसल्या होत्या, तसेच चारपाच ऑस्ट्रेलिअन लोकही ओरिगामीच्या घड्या करताना दिसत होते. साहिल त्या हॉलमधल्या एकूण लोंकाची संख्या पाहून थोडासा खट्टू झाला खरा, पण राधाकडे पाहिले तर ती काहीतरी नवीन शिकायला मिळणार या कल्पनेने खूश दिसत होती.
सहज घड्याळात पाहिले, सकाळचे नऊ वाजले होते आणि बरोबर नवाच्या ठोक्याला मानसीने, म्हणजे राधाला त्यादिवशी शाळेत ओरिगामी शिकवणाऱ्या टीचरने एन्ट्री घेतली. 'अरे! ही तर आपल्याच वयाची दिसते आहे' असे साहिल मनाशी पुटपुटला. सुरुवातीला औपचारिक ओळख झाली आणि एक जपानी कला शिकवणारी भारतीय टीचर या गोष्टीचे साहिलला कौतुक वाटले.
उपस्थित असलेल्या लोकांना मानसीने नम्र अभिवादन केले. त्यानंतर मानसी एक-एक करत प्रत्येक टेबलपाशी जात होती. काही लोक तिला बरेच आधीपासून ओळखत असावेत, असे त्यांच्या आणि तिच्या देहबोलीवरून वाटत होते. थोड्या वेळाने मानसी राधा-साहिलच्या टेबलपाशी आली आणि 'तुला काय बनवायला आवडेल', असे तिने राधाला मराठीत विचारले.
राधाने तिला हंस आणि बेडूक बनवायला सांगितले. एकीकडे मानसीचे हात कागदांच्या घड्या घालण्यात गुंतले होते. राधाही तिला मदत करत होती.
साहिलला मात्र सुरुवातीला वाटत होते की, आपल्याला ओरिगामी जमेल, जेणेकरून इतरांसमोर थोडी कॉलर ताठ करता येईल, पण मानसीचा ओरिगामीचा वेग बघता त्याने तिच्यापुढे गप्पच राहणे पसंत केले.
साहिल : मानसी, एक प्रश्न विचारू का?
मानसी : तुला नक्की हा प्रश्न विचारायचा असेल ना, की मी मराठी असून इथे ओरिगामी कशी शिकवते आहे? तेही या देशात आणि इथल्या स्थानिक लोकांना?
साहिल : अरे! तू कसं काय ओळखलंस?
मानसी : कारण हा प्रश्न मला यापूर्वी अनेकजणांनी विचारला आहे. मी मूळची पुण्याची. पण ओरिगामी मात्र मी इथे ऑस्ट्रेलियाला आल्यावर शिकायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही महिने मी फक्त ओरिगामीच्या बेसिक घड्या करायचे. माझे गुरू सांगत, 'जोपर्यंत तुमच्या चौरस कागदाची टोकं नीट जुळत नाहीत तोपर्यंत पुढे घडणारी वस्तू चांगली दिसणार नाही'.
साहिल : (मनातल्या मनात) देवा, बरं झालं मी उगाच आल्याआल्या माझी ओरिगामी हिला दाखवली नाही.
मानसी : मला नेहमी असं वाटतं की, एखादी कला मला येते असा दावा करणं म्हणजे आपण एका ठिकाणी स्थिर राहून, हे जग क्षितीजापर्यंतच आहे असा समज करून घेण्यासारखं आहे. पण जेव्हा आपण क्षितिजापर्यंत येऊन पोचतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अरे, आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. यापलीकडे अजून कितीतरी मोठं जग आहे.
साहिल : (ओशाळून) तू ओरिगामी केव्हापासून शिकायला लागलीस?
मानसी : मला फक्त चार वर्षं झाली आहेत.
साहिल : (स्वगत) हिला ४ वर्षं कमी वाटतायत. कमाल आहे!
(साहिलला बोलताना एकदम लक्षात आले की राधाने कागदी पियानो बनवला. त्याला खूपच आनंद झाला आणि त्याने राधाला शाबासकी दिली.)
साहिल : पण मला जमेल का ओरिगामी शिकायला या वयात? (साहिल आता पुरता खजील झाला होता. कारण गेली कित्येक वर्षे त्याने ओरिगामीच काय, साधी कागदाची होडीही केली नव्हती.)
मानसी : हो, जमेल की! कारण कला ही एक अशी गोष्ट आहे, जिचा वयाशी तसा खरा काही संबंध नसतो. एवढं नक्की की, तुला यातून आनंद नक्की मिळेल. माझ्या गुरू तर म्हणतात की, कुठल्याही कलेचा रियाज इतका करावा की ती जोपासताना तुम्हांला जगाचा विसर पडावा, तुमच्या आयुष्यातल्या छोट्या कुरबुरींचा तुम्हांला विसर पडावा.
(साहिलला अचानक कालच्या बसमधील आजीबाई आठवल्या. 'खरंच! मी केवढी कुरकुर करत होतो आणि आजीबाई मात्र बसमध्येही ओरिगामी करत बसल्या होत्या!'
मानसी : मी जेव्हा ओरिगामीला सुरुवात केली, तेव्हा मला शिकवणाऱ्या जपानी बाईंनी मला खूप प्रोत्साहन दिलं. दोन वर्षांतच अशी वेळ आली की, मला पुस्तकातल्या बऱ्यापैकी गोष्टी तयार करता यायला लागल्या. मला वाटू लागलं, आता मला सर्व काही येतंय! मग मात्र बाईंनी मला समजवलं, 'आता यापुढचा तुझा प्रवास खडतर असणार आहे. कारण आत्तापर्यंत तू पुस्तक बघून सगळ्या वस्तू तयार करत होतीस. यापुढे तुला तुझी कल्पनाशक्ती लढवून वस्तूंची निर्मिती करायची आहे'.
साहिल : तुला ओरिगामी का शिकाविशी वाटली?
मानसी : माझ्याकडे खरंच याचं उत्तर नाहीये. मध्यंतरी माझ्या गुरूंनी मला एक वॉटर लिली, म्हणजे कागदी कमळ शिकवलं. मी ते तयार केल्यावर दिवाळीचे दिवस होते म्हणून सहज त्यात एक टी कँडल ठेवली. नंतर टी कोस्टरला ते कमळ चिकटवलं. खरंतर ही एक ठरवून झालेली कलाकृती नव्हती. परंतु माझ्या टीचर म्हणाल्या की, त्यांनी पाकळी असलेल्या एखाद्या फुलामध्ये टी कॅण्डल ठेवता येऊ शकते, असा विचारच केला नव्हता. त्यांना त्याचं फारच अप्रूप वाटलं. पण मग माझ्या लक्षात आलं की एखादी, आपल्याला क्षुल्लक वाटणारी गोष्ट दुसऱ्याला खूप मौल्यवान वाटू शकते. असं अजिबात नाही की मला जास्त कळतं! त्या वेळी त्या प्रसंगी मी वेगळा विचार केला, एवढंच म्हणू शकते. एखादी कला जर विविध लोकांपर्यंत पोचली तर ती तिथली स्थानिक कला बनते आणि मग स्थानिक लोक त्या कलेत भर घालू शकतात.
साहिल : मला कळत नाहीये तुला काय म्हणायचंय ते.
मानसी : जेव्हा मी इथे ओरिगामी करायला लागले, उत्सुकतेपोटी हळूहळू आपल्या महाराष्ट्रात ओरिगामी कितपत आहे याचा शोध घेऊ लागले, तेव्हा माहिती मिळाली की पुण्यामुंबईतल्या काही लोकांनी अतिशय तन्मयतेनं ही कला जोपासली आहे. माझ्याच मैत्रिणीनं मला सांगितल की, पुण्यात आणि मुंबईत ओरिगामी मित्र क्लब आहे. हा क्लब दरवर्षी एकदा पुण्यात आणि एकदा मुंबईत ओरिगामीचं प्रदर्शन भरवतो. किंबहुना तिथले लोक दीपमाळ, गणपती किंवा शंकराची पिंड अशा काही गोष्टी अतिशय सुंदर बनवतात. गणेशोत्सवाच्या काळात काही लोक बाप्पांकरता ओरिगामीची आरास करतात. मी पाहिलेले काही फोटो इतके अप्रतिम आहेत की विचारू नकोस. अशावेळी वाटतं, ही कला महाराष्ट्रात पोहोचली. त्यामुळे तिथल्या लोकांनी आपले गणपतीसारखे सण साजरे करताना ओरिगामीचा कसा बरोबर उपयोग केला बघ! हे आपल्या मराठी लोकांनी दिलेलं, एक प्रकारचं योगदानच आहे, नाही का? यावरून मी असं म्हणाले की, एखाद्या कलेचं मूळ शोधत बसण्यापेक्षा ती कला आपल्याला आवडली असेल, तर त्यामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही प्रयत्न करता येईल का?
साहिल : हं, बरोबर आहे तुझं. पण केवळ उत्सुकता म्हणून विचारतोय की, ही कला मूळची जपानी आहे नं?
मानसी : हो मूळची जपानी कला आहे. तसा कागद हा पहिल्यांदा चीनमध्ये तयार झाला. पण जपानी लोकांनी ही कला नावारूपाला आणली. ओरि म्हणजे घड्या घालणे आणि कामी म्हणजे कागद. हळूहळू ही पद्धत जपानमध्ये विकसित होत गेली. आणि एकशेसाठ वर्षांपूर्वी, म्हणजे १८७३मध्ये व्हिएनात, म्हणजे युरोपमध्ये ही कला सादर केली गेली. पुढे मग ही कला जगभर पसरली.
या कलेमध्ये सर्व खेळ हा १५ x १५ सेमी चौरस कागदाचा असतो. यातून तुम्ही प्राणी, पक्षी, फुलं, डबे, कुसुदामा, त्रिमितीय रचना अशा अनेक गोष्टींची निर्मिती करू शकता. हे प्रकार मला कळले आहेत. परंतु यांव्यतिरिक्त अनेक प्रकार अस्तित्वात आहेत, ज्यांच्याशी माझी ओळख झालेली नाही. नुसते पक्षी म्हटलं तरी त्यात क्रेन, स्वान, कबुतर असे विविध पक्षी तयार करता येतात. शिवाय फुलपाखरू, मासे असे खूप प्रकार आहेत.
एकीकडे साहिलशी बोलताबोलता मानसीने आणि राधाने चार-पाच बाहुल्या तयार केल्या.
मानसी : चल, तुझी ओळख करून देते माझ्या गुरूंशी. फक्त एक सांगते, प्लीज त्यांच्याशी हस्तांदोलन करू नकोस.
साहिल : (स्वगत) (बहुतेक जपानी पद्धत असावी पहिल्या भेटीत हस्तांदोलन न करण्याची!)
साहिल, राधा आणि मानसी एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी गेले तेव्हा तिच्या गुरू पाठमोऱ्या घड्या करत बसल्या होत्या. मानसीने तिच्या गुरूंच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांच्या कानापाशी काहीतरी कुजबुजली. तिच्या गुरू खुर्चीवरून उठल्या, वळल्या आणि साहिलला अचानक आश्चर्याचा अजून एक धक्का बसला. तिच्या गुरू या दुसर्या कोणी नसून काल बसमध्ये भेटलेल्या, सतत हसतमुख दिसणाऱ्या आजीबाई होत्या. साहिलला कालचे सगळे प्रसंग आठवले.
मानसी : या माझ्या गुरू माचिको. यांनी मला ओरिगामी शिकवली. मला अनेक प्रसंगी प्रोत्साहित केलं. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जगावं कसं हे शिकवलं. मगाशी मी तुला हस्तांदोलन न करण्याबाबत सांगितलं होतं त्याचा खुलासा करते. दुसऱ्या महायुद्धानंतर नागासाकी, हिरोशिमा अणुस्फोटानंतर अनेक जपानी पिढ्यांवर किरणोत्सर्गाचा गंभीर परिणाम झाला. त्यातली एक व्यक्ती म्हणजे या माझ्या गुरू. पंचेंद्रियांपैकी दोन महत्त्वाची इंद्रियं आता जवळ जवळ निकामी झाली आहेत. वयोपरत्वे हातातही अधूनमधून कंप जाणवतो. परंतु त्यांच्यात जिद्द इतकी आहे की, या सगळ्या गोष्टींवर मात करून, कुठल्याही वस्तूला केवळ स्पर्श करून, त्या तशीच्या तशी वस्तू तयार करू शकतात.
मी एकदा माचिकोंना विचारलं, 'तुम्ही ओरिगामी सुंदर बनवता याबद्दल तर मला कायमच अप्रूप आहे, पण तुम्ही नेहमी हसतमुख आणि एवढ्या आनंदी कशा राहता? कधी कुरबुर केली नाही, कधी कोणाशी आवाज चढवून बोलत नाही.' तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, 'अगं, मला उजव्या कानानं कमी ऐकू येतं, मला आता व वयोपरत्वे थोडं कमीही दिसतं. पण त्यामुळे जगात जे काही विपरित किंवा वाईट चालू आहे ते मला दिसत नाही. कानांनी नीट ऐकू येत नाही, त्यामुळे वाईट गोष्टी कानांवर पडत नाहीत. ही दोन्ही इंद्रियं असमर्थ असल्यामुळे माझ्या तोंडातून कधी वायफळ चर्चा होत नाही.'
साहिल : तुला या फारच छान गुरू लाभल्या आहेत. तू खरंच कुठलीही गोष्ट तयार करू शकत असशील नं?
मानसी : असं म्हणता येणार नाही. कारण नुकतीच माझी एका पोलिश माणसाशी ओळख झाली. त्याचं नाव मायकेल दाब्रोव्स्की. आता हा खरंतर पोलंडहून आलेला आहे, पण हाही उत्तम ओरिगामी करतो. मायकेलची स्पेशालिटी ही इंजिनीरिंग किंवा स्थापत्याशास्त्राशी मिळतीजुळती आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचं गणित चांगलं आहे, ज्याचा त्याला ओरिगामीमध्ये उपयोग होतो. त्यालाही लहानपणी क्राफ्टची आवड होती. परंतु पुढे करिअर घडवताना ही कला मागे पडली. त्याच्या मुलाला शाळेत ओरिगामी या विषयावर नुकतंच एक छोटं प्रोजेक्ट करायचं होतं. म्हणून मायकेलनं मुलाला मदत केली. त्याला एकदम आठवलं, अरे, आपण हे पूर्वी करायचो! त्यामुळे गेलं एक वर्ष दर शनिवारी तो इथे येतो. त्याला त्याच्या 'स्व'त्वाची परत एकदा जाणीव झाली आहे, असे तो म्हणतो आणि आता तो कधी एकदा शनिवार येतोय अशी आवर्जून वाट पाहत असतो.
साहिल : पण यात गणिताचा काय संबंध?
मानसी : एखादी कला लांबून सोपी वाटते. पण जसजसे आपण खोलात शिरतो तसं लक्षात येतं की, ही एक खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. गणित म्हणशील तर आपल्या भारतीय संगीतामध्येही गणित आहेच की. तबला शिकताना समेवर येण्याकरता मात्रा मोजाव्याच लागतात. ओरिगामीबद्दल बोलायचं झालं तर यातही नुसतंच गणित आहे असे नाही, तर भूमिती आहे, त्रिमितीय आकार आहेत.
बोलण्याच्या नादात अकराचे ठोके वाजू लागले. दोन तास कसे गेले, हे साहिलच्या लक्षातही आले नाही. त्याने मानसीचे मनापासून खूप आभार मानले आणि 'पुढच्या सेशनला परत नक्की येईन' अशी तिला ग्वाही दिली.
वर्कशॉपमधून साहिल आणि राधा बाहेर पडले आणि घराकडे चालत निघाले. साहिलने आकाशात बघितले तर काळे ढग गोळा होऊ पाहत होते. पण त्याच्या मनात एक प्रकारचा उत्साह संचारला होता. साहिल चालताचालता राधाला म्हणाला, " राधा, आता घरी गेल्यावर मला होडी करायला शिकवशील का?"
राधा : (आश्चर्यचकित होऊन) हो शिकवीन. पण बाबा, तुला ओरिगामी येते ना?
साहिल : तुला एक सिक्रेट सांगतो. मला वाटायचं इतके दिवस की मला ओरिगामी येते म्हणून! पण आज तुझी आणि तुझ्या टिचरची ओरिगामी पाहिली आणि वाटलं, तू ओरिगामीच्या पाचव्या वर्गात असशील तर मी पहिलीत आहे. करशील ना मदत बाबाला? थोड्या वेळानं पाऊस पडणार आहे, तेव्हा थोड्या होड्या बनवू आणि नंतर पावसातल्या पाण्यात मनसोक्त होड्या खेळू.
सर्व प्रकाशचित्रे, © समीर परांजपे
प्रतिसाद
मस्त लेख !! आणि पहिल्या
मस्त लेख !! आणि पहिल्या फोटोतला कुसाडमा भारी आहे
मस्त ....ऑडीओ एकदम झक्कास...
मस्त ....ऑडीओ एकदम झक्कास...
छान
छान
फार फार आवडलंय हे
फार फार आवडलंय हे
मी एकदम मन लावून वगैरे वाचला हा लेख (?)
खूपच सुंदर लेख. अगदी मनापासून
खूपच सुंदर लेख. अगदी मनापासून आवडला. वाचायला मजा आली.