ओल्या मातीच्या कुशीत

पा

वसाच्या सरी येऊन जमिनीला भिडल्या, की बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी सरींसारख्या बरसू लागतात. पाऊस आणि माझं एक जिव्हाळ्याचं नातं आहे.

मी शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. माझे आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. शेतकरी आणि पावसाचं एक जिवाभावाचं नातं असतं. मे महिना आला की शेतकरी वाट पाहू लागतात ते काळ्या ढगांची, गार गार वार्‍याची, मातीला सुगंध देणार्‍या, बी-बियाणांचे मातृत्व स्वीकारणार्‍या पहिल्या सरीची.

पावसाचे आगमन आपल्या शेतांमध्ये होणार म्हणून आम्ही मे महिन्यापासूनच वर्षाऋतूच्या स्वागताच्या तयारीला लागायचो. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतिक्षेत असतात. आमच्या शेतात तांदूळ पिकवला जायचा. पाच-सहा शेतांपैकी एक शेत खास म्हणजे बी पेरणीसाठी असे. त्याला आम्ही 'राबाचे शेत' म्हणत असू. राब म्हणजे महिनाभर आधीपासून जमलेला पालापाचोळा ह्या शेतात टाकायचा आणि तो जाळायचा. त्यामुळे शेतातील तणाचे (गवत) बी जळून मातीही भुसभुशीत होते. हा राब जाळताना, जाळलेल्या पाल्याच्या धुराचा एक वेगळाच गंध येतो. रस्त्याने जाताना आजही कुठे तो वास आला की मला पूर्वीची जुनी मैत्रीण भेटल्याप्रमाणे आनंद होतो. राब करताना आम्हा बच्चेकंपनीची त्यात लुडबुड असायचीच. राब लावला की सुकलेलं गवत वगैरे ताडताड आवाज करत पेटायचं, तेव्हा दिवाळीतील फटाके वाजल्याचा आनंद होत असे. ह्या आवाजाने छोटे पक्षीही आवाज करत इकडे तिकडे सैरभैर फिरत असत. मे महिना असल्याने वाडीत जिकडे तिकडे आंब्याचे बाठे पडलेले असत. मग आम्ही बच्चेकंपनी हे बाठे गोळा करायचो आणि त्या आगीमध्ये भाजून ते फोडून त्यातली कोय खायचो. कोय कडवट लागते पण त्याच्यावर पाणी प्यायले की आवळ्याप्रमाणे गोड चव येते. तो कडू रानमेवाही आम्ही चवी‌-चवीने खायचो.

राब हा मे महिन्याच्या दाहक उन्हात केला जाई. राबासकट सगळ्या शेतांची नांगरणी होत असे. मग प्रतीक्षा असे ती गार गार, हिरवे स्वप्न साकार करणार्‍या पावसाच्या सरींची. पण तेव्हा पाऊस फसवा नव्हता, वचन दिल्याप्रमाणे अगदी ७ जूनला बरोबर स्टेशनवर उतरायचा. ७ जूनची मी वाढदिवसासारखी वाट बघायचे. कारण पहिल्या सरीत चिंब भिजायला मिळायचे. पहिल्या पावसात भिजल्यावर त्वचेची रोगराई निघून जाते म्हणून आई स्वतः ह्या पहिल्या पावसात मला भिजायला सांगायची. पहिला पाऊस मातीला येऊन भिडला की जो अनोखा सुगंध दरवळतो तो माझ्या मनाला अजून भिडतो. त्या पहिल्या सरी, तो मातीचा सुगंध आणि ते पावसात-

OliMati-7.gif

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा
ये गं ये गं सरी, माझे मडके भरी
सर आली धावून, मडके गेले वाहून

हे गाणं गुणगुणत, गुणगुणत कसलं, मोठ्याने ओरडतच मनसोक्त भिजायचे. त्या गार गार सरींनी कधी कधी थंडी पण वाजायची. पण त्या कुडकुडण्याचा आनंद विलक्षण होता.

मी शाळेतून एकदा घरी आले की लगेच शेतात धाव घेत असे. पावसाच्या सरींना सुरुवात झाली, जमीन भिजली की राबाच्या शेतात भात (तांदळाचे बियाणे) पेरला जाई. भात पेरायला मी पण मध्ये मध्ये लुडबुड करत असे. तो मुठीत धरून फेकायला मौज वाटत असे. त्या भातकणांची टोके मुठीत हलकेच आवळून त्यांच्या खुणांची तळहातावर झालेली डिझाइन पाहणे हा तेव्हा छंदच होता. ते भातकणांचे टोचणेही तेव्हा सुखद वाटे.

काही दिवसांतच पेरलेल्या बियांतून कोवळे अंकुर निघत. जर जोरदार पाऊस पडला तर अंकुर पाणी साठल्यामुळे दिसायचे नाहीत. पण हलक्या सरी पडल्या तर अंकुर फुटलेले व हळूहळू नवीन जन्माला आलेली बाळरोपं बाळसं धरताना पाहून फार आनंद होत असे. अनेकदा ह्या कोवळ्या ओल्या रोपांवरून मी अलगद हात फिरवत असे. बाळसं धरलेल्या रोपांच्या शेताचा अगदी हिरवा गालिचाच तयार होत असे. ह्या गालिच्याला म्हणजेच त्या रोपांना आमच्याकडे 'आवण' म्हणतात. हे आवण तयार होईपर्यंत पाऊस चांगलाच जोर धरत असे. आवणाच्या शेतात बांध बांधला जाई त्यामुळे त्या शेतात पाणी साठून रोप चांगले वाढत असे.
OliMati-5.gif

एकदा का हे आवण तयार होत आले म्हणजे, ते इतर शेतांमध्ये रुजण्याएवढे वाढले, की इतर नांगरलेल्या शेतांमध्ये आळी फिरविली जात. आळी म्हणजे नांगराला फळी बांधून त्याने नांगरलेले शेत सपाट म्हणजे ढेपळे सारखी केली जात. फळी नसेल तर मोठ्या झाडाची एखादी मजबूत फांदी तोडून ती लावली जात असे. ह्या आळीवरती वजन ठेवणे आवश्यक असे. मग त्यावर एखादा मोठा दगड बांधला जाई किंवा घरातील लहान मुलांना बसविले जाई. आमच्या शेतांमध्ये आळी कधी फिरवायची ह्याची मी वाटच पाहत असे आळीवर बसण्यासाठी. मस्त गाडी गाडी खेळल्याची मजा यायची. सोबत ढवळ्या-पवळ्या व त्यांचा मालक कधी त्यांना ओरडत तर कधी मायेने गोड बोलून त्यांच्याकडून आळी फिरवून घेत. आळी फिरवताना पाऊसही यायचा. नाहीच आला तरी शेतातील चिखलयुक्त पाणी भिजवायचेच मला. पण तेव्हा कुठे त्याची तमा असे?

OliMati-1.gif

शेतांना आळी फिरवून झाली की लावणीची लगबग चालू होत असे. लावणी चालू झाली म्हणजे घरात काहीतरी सणवाराची लगबग आहे असे वाटे. लावणीच्या हंगामात आई शाळेला सुट्टी घ्यायची आठवडाभर. कारण शेतावर लावणीसाठी मजूर बायका-माणसे येत. घरातही आई-आजीची कामे उरकण्याची घाई होत असे. त्यांच्या चहा-पाण्याची सोय करावी लागे. आम्ही घरातील सगळेच ह्या माणसांबरोबर शेतात उतरायचो. कोणतेही शेताचे काम चालू करताना पहिला नारळ फोडून 'शेत चांगलं पिकू दे,' म्हणून देवाला प्रार्थना केली जात असे व गोड प्रसाद वाटला जात असे. पहिला आवण खणण्याचा म्हणजे रोपे उपटण्याचा कार्यक्रम असे. आवणाच्या शेतात उतरण्या आधी वडील नारळ फोडत व सगळ्यांना जिलबी किंवा म्हैसूर वाटत. सगळ्यांचे तोंड गोड झाले की आवण उपटून त्यांची हातात मावेल इतकी जुडी बांधली जायची. त्याला आम्ही गुंडी किंवा मूठ म्हणायचो. शेतांमध्ये ढोपरापर्यंत पाणी असे. ह्या गुंड्या बांधून त्याच शेतात टाकायच्या व पुढे आवण उपटत जायचे. मागे राहणार्‍या गुंड्या पाण्यावर तरंगत असतात. आवण खणताना एक वेगळाच सुगंध येतो भाताच्या रोपाचा. तेव्हा तो नेहमीचा वाटे पण आता कुठे आला तर जुन्या आठवणींनी मन गलबलून जाते. एकदा का आवण खणून झाले की मुठी मोठ्या टोपलीत गोळा केल्या जात व इतर शेतांमध्ये अंतरा-अंतरावर फेकल्या जात. हे फेकाफेकीचे काम करण्यातही मजा यायची. कधी कधी सैल बांधलेली मूठ फेकताना सुटून पसरत असे. मग ती तुझी, ती अमकीने बांधलेली असेल असा बायकांचा आरडाओरडा चालत असे. कोण काम जलद करतं, कोण हळू करतं ह्यावरही कुजबुज होत असे. ह्या दिवसांमध्ये पाऊस दिवसरात्र पडायचाच. मजूर मेणकापडाचे डोक्यावर टोक (टोपीसारखे बांधून) बांधून अंगभर झग्यासारखे सोडायचे. आई-वडील रेनकोट घालायचे. मलाही रेनकोट होता पण मला त्या मजुरांसारखा पोषाख आवडायचा म्हणून मी मिळेल ते प्लॅस्टिकचे कापड घेऊन त्यांच्यासारखे हट्टाने बांधून घ्यायचे. जोराचाच पाऊस आला की आई घरी जायला सांगायची पण मी कुठल्यातरी झाडाखाली जाऊन बसत असे.

OliMati-6.gif
मुठी फेकून झाल्या की लावणीला सुरुवात व्हायची. लावणी करायला मला खूप आवडायची. मला लावणी ताला-सुरात केल्या सारखी वाटे. मनोरंजनासाठी बायका गाणी गात तर कुठल्या गोष्टी सांगत, नाहीतर कोणाला भूत दिसले, कोणी कोणाला मारले, कोणाची सासू छळते, कोणाची सून भांडखोर आहे, अशा खबरांची बरसात चालू असे. पण माझे विश्व वेगळेच असे. मी कधी कलात्मक रोपे खोचत असे. मग घरातील, मजूर लोक माझे कोडकौतुक करत की किती भराभर लावते, किती छान लावते, हिनेच अर्धे शेत लावले. तेव्हा मला ते खरेच वाटायचे. ही रोपे जमिनीत रोवताना कधी कधी टणक मातीमुळे बोटे दुखायची. पण कोणाला सांगायचे नाही, नाहीतर ही मौज करायला मिळणार नाही, आपले कौतुक होणार नाही! रोपे लावून कंटाळा आला की शेताच्या बांधावरच्या मातीने भातुकलीची खेळणी बनवायची, तसेच शेतातल्या चिखलात मनसोक्त खेळायचे. कधी त्यात उड्या मारायचे तर कधी थेट शेतात बसून पोहण्याची नक्कलही करायचे. हे पाहून मात्र घरच्यांचा ओरडा मिळायचा. मग तात्पुरते बंद करायचे. त्यांचे लक्ष नसले की परत चालू करायचे. शिवाय शेतात माखून झाल्यावर आमच्या विहिरीला जो थाळा होता त्या थाळ्याच्या स्वच्छ व गार पाण्यात चिखल काढण्यासाठी डुंबायला मिळायचे.

शेतावर काम करणार्‍या मजुरांसाठी सकाळी व दुपारी चहा व नाश्ता म्हणून टोस्ट किंवा बटर आणायची आई. हा चहा आणि खाऊ पावसापासून बचाव करत शेतावर आणावा लागे. मग एका झाडाखाली बसून सगळ्यांना चहा आणि टोस्ट किंवा बटर वाटले जात. हे वाटताना तसेच खाताना झाडाचे टपोरे थेंब मात्र चहा तसेच टोस्ट बटरांवर पडत. चहात टाकण्याआधीच ते थोडे नरम होत. त्याची एक वेगळीच मजा आणि चव लागायची. मला ती आवडायची.

ही अशी वर्षाऋतूतील लावणी आठवडाभर चाले. पावसातली शेतावरची मौज त्या ८-१० दिवसांत मी अगदी पुरेपूर करून घेत असे. ह्या दिवसांत रात्री जास्त अभ्यास करावा लागे.

शेतीची लावणी झाली तरी वर्षाऋतूचा आनंद त्याच्या समाप्तीपर्यंत मी लुटत असे. आमच्या घरासमोरच मुख्य रस्त्याला लागून विरा (समुद्राला मिळणारा मोठा नाला) आहे. हा विरा धोधो पावसात तुडुंब भरून वाहत असे व त्याचे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असे. हा वाहणारा विरा माझ्या मौजेसाठी वरदानच असे. ह्या तुडुंब वाहणार्‍या विर्‍यामुळे शाळेत जाताना त्या डोफाभर पाण्यात डुबुक डुबुक करत चालण्याचा आनंद मिळायचाच शिवाय भिजल्यामुळे शाळेतून शिक्षकही घरी लवकर सोडायचे. कधी कधी तर पावसाने जास्तच जोर धरला तर घरातूनच मला शाळेला सुट्टी मिळे, कारण विर्‍याच्या पाण्याला लोट येत असे. माणसे विर्‍याच्या दिशेने खेचली जायची म्हणून आई-वडील मला शाळेत पाठवायचेच नाहीत. मग काय दिवसभर पावसाची मजा अनुभवायची. अंगणासमोरच्या जमलेल्या पाण्यात होड्या सोडायच्या, शेवंती, अबोली, जास्वंदी, मोगरा ह्या सारख्या झाडांची बोखे, फांद्या तोडून पावसात लागवड करायची. आईला सुट्टी असेल तर आई अशा गारेगार वातावरणात गरम गरम बटाटेवडे, कांदाभजी बनवायची. ते खाण्याच्या मजेचे काही वर्णन करायलाच नको.

पाऊस सुरू झाला म्हणजे पावसाची मोठी आठवण म्हणजे बाहेर तसेच घरात फिरणारी जनावरे. आमच्या घरात दरवर्षी न चुकता सूर्यकांडार येत असे. कधी कधी वडील, भाऊ आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्यांना मारत असत तर कधी त्यांना जीवनदान देत असत. लहान असताना पावसाळ्यातल्या ह्या सूर्यकांडारींची मात्र मला भीती वाटायची. कारण ही चावली तर सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो, हे मनावर बिंबले होते. तसे इतर सापही असायचे फिरत आजूबाजूला. अजूनही असतात. त्यात नाग, अजगर, फुरशा, धामण, पाणशिरडा, नानेड्या ह्यांचा समावेश असायचा. ह्यांची कधी जास्त भीती वाटली नाही. त्यातले पाणशिरडा आणि नानेड्या हे तर निरुपद्रवीच.
OliMati-8.gif

पावसात एक खेळ असायचा तो म्हणजे अंगणात येणार्‍या खेकड्यांना कोणाकडून तरी पकडून घेऊन त्यांना दोरा लावायचा आणि आपल्याला हवे तिथे फिरवायचा. पाणी डबक्यात, शेतात साठले की बेडकांची डराव-डराव रात्री चालू होत असे. पावसाळ्यात दिवे लागले की पंखवाल्या माश्या घराचा ताबा घेत. ह्या खूप सतावायच्या. ह्यांच्या बंदोबस्तासाठी आई बल्ब/ट्यूब खाली परातीत पाणी ठेवत असे. मग बल्ब/ट्यूबचे प्रतिबिंब पाण्यात पाहून माशा त्या पाण्यात पडून मरायच्या. डासांसाठी धुरी केली जायची. ह्या धुरीत धूर होण्यासाठी ओले गवत टाकले जायचे. त्याचा एक विशिष्ट वास यायचा.

पावसात येणारे सुखद कीटक म्हणजे काजवे. हे काजवे रात्री झाडावर दिवाळीच्या लाइटिंग प्रमाणे झगमगत. त्यांचा तो हिरवा कंदील मला अजून मोहक वाटतो. पूर्वी त्या बिचार्‍या काजव्यांना पकडून मी काचेच्या छोट्या डबीत ठेवत असे तर कधी त्यांचा प्रकाश पाहण्यासाठी पूर्ण काळोख करत असे.

असा हा वर्षाऋतू. अजूनही आठवणी थांबवायला मन तयार होत नाही. खूप काही लिहावंस वाटतं. पावसाळ्यातला हिरवागार होणारा निसर्ग, चिखलात उगवणारी कमळे, विर्‍यांतून शेतात येणारे मासे, पावसात हाताने पाणी काढता येईल इथवर भरणारी विहीर, उगवणारी रानफुले व ती गोळा करण्याचा माझा छंद, पावसाळी भाज्यांची लागवड, करांदे, हळदी अशी कंदमुळे खणणे, पावसाळी रानभाज्या, पावसातली ओली प्राजक्ताची फुले, मला घाबरवणारा विजांचा गडगडाट, सोसाट्याचा वादळी वारा, टप टप पडलेल्या गारा, पावसातले सणवार आणि अजून कितीतरी गोष्टी वर्षाऋतूने माझ्या सुखद आठवणींच्या गाठोड्यात जोपासून ठेवल्या आहेत.

- सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे (जागू)

प्रतिसाद

सुंदर... अगदी त्या शेतात नेवून ठेवलत...
सूर्यकांडार हा काय प्रकार आहे...?

सुंदर लेख जागूबाय! हा बघून तुमचा जीवनप्रवास वाचावासा वाटतो. आवडेल! अगोदर लिहिलाय का कुठे?
आ.न.,
-गा.पै.

जागू, किती सुंदर लिहिलं आहेस :) साधंसोपं, मनाला स्पर्शून जाणारं. वेगळ्याच जगात फिरवून आणलंस.
'सूर्यकांडार' ह्या प्राण्याबद्दल पहिल्यांदाच वाचलं. अजून काही दुसरा शब्द आहे का त्याला ?

योग, अगो धन्यवाद. सूर्यकांडार हा एक सापाचा प्रकार आहे. रात्री चावली तर सुर्य उगवायच्या आत माणुस मरतो तसेच सकाळी चावली तर सूर्य मावळायच्या आत माणूस मरतो अशी ख्याती आहे म्हणून त्याला सूर्यकांडार म्हणतात. तसे कांडारच म्हणतात. ही दिसायला काळी बारीक व साधारण दोन अडीच फुट असते.

गामाजी धन्स तुम्हाला असे वाटले त्याबद्दल. माझ्या लेखांमध्ये माझे बालपण येतच असते. मायबोलीवर असे काही लेख आहेत.

खूप सुंदर लिहिलय !! फार आवडलं वाचून अगदी शांत, थंड वाटलं. :)

फार अप्रतिम लेख लिहिलाय जागु. बरीच माहिती मिळाली, नविन शब्द कळले आणि चित्रपट बघत असल्या सारखे सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.

:) गजानन+१. सिंड्रेला+१.

वास पावसाचा आला ह्या गाण्याबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे