मैत्र

'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' या विषयावर चर्चा होईलच. पण मला आधी मैत्री म्हणजे काय ते तपासून पाहायचे आहे. का लागतो 'मित्र'? (यापुढे हा शब्द मी लिंगनिरपेक्ष अर्थाने वापरणार आहे.)

पहिले कारण म्हणजे त्याची सोबत आवडते. सोबत म्हणजे एकत्र असणे, फिरणेच नव्हे, तर निव्वळ गप्पा मारणेदेखील. आता या गप्पा सुखदु:खाच्याच पाहिजेत, असे काही नसते. अगदी आपल्याला आलेला एखादा भलाबुरा अनुभव, एखाद्या घटनेबद्दल आपले मत, आपली प्रतिक्रिया, आपल्याला मिळालेले यश, अपयश अगदी काहीही कुणालातरी सांगावेसे वाटते.

दुसरे कारण म्हणजे, एक श्रोता हवा असतो. आता ही बाब तर वरच्या कारणांत आहेच. पण मी जे सांगतोय ते मन लावून, लक्ष देऊन ऐकणारा कुणीतरी हवा असतो. म्हणजे मी मनापासून काही सांगतोय आणि ऐकणारा तिकडे काणाडोळा करतोय, हे काही मैत्रीत शक्य नसते बॉ.

तिसरे कारण, माझ्या सांगण्यावर त्याची प्रतिक्रिया. म्हणजे मी काही सांगेन त्यावर त्याने प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. ती नुसती हं हं, अशीही असेल किंवा थेट मतभेदाची असेल. सहमतीची असेल किंवा असहमतीची असेल. पण ती हवी असते.

चौथे कारण हे सल्ला देणे. माझ्या सांगण्यावर, अनुभवावर त्याने सल्ला देणे अपेक्षित असते. तो मी मागितलेला असेल वा नसेलही. तो सल्ला अगदी प्रामाणिकपणे दिलेला असेल, अशी मला खात्री हवी. मग भलेही तो सल्ला मला मान्य नसेल.

पाचवे कारण अर्थातच मदत. अनेकदा मदत करणे प्रत्येकवेळी शक्य असतेच असे नाही. पण ती मागण्याचा विश्वास आणि न मिळाल्यानंतरही ती का मिळाली नाही, याच्या कारणांवरचा विश्वास महत्वाचा. कधीकधी मदत कुवतीबाहेरची असेल तर ती आणखी कुठून मिळू शकेल, त्याबद्दल सल्ला किंवा ती मिळवण्यासाठी संयुक्त
प्रयत्न.

(आणि ही सगळी कारणे, दोन्ही बाजूंनी !!)

या सगळ्या घटना, सतत काही काळ घडत राहिल्या तर एक जिवाचे मैत्र निर्माण होते आणि मग थेट संवादाची गरज रहात नाही. न सांगता, केवळ देहबोलीतून, शब्दोच्चारातून भावना पोहोचवल्या जातात. पुढच्या प्रतिक्रिया या आपसूक घडत जातात. या सर्व प्रक्रियेत एकमेकांना जोखणे चालूच असते. गैरसमजाचे प्रसंग येतात, त्याचे निराकरणही होते. निराकरण झाले तर मैत्री दृढ होते. ते नाही झाले तर कधीकधी दुरावा येतो. कधीकधी तो कायम राहतो तर कधीकधी एकाच्या पुढाकाराने तो मिटतोदेखील.

असे करताकरता मैत्रीचे एक दृढ नाते रुजते. हे नाते नेमके काय असते, याची नेमकी व्याख्या व्यक्तीनुसार बदलेलही. पण एका वाक्यात माझे मत सांगायचे तर, प्लीज मला एकट्याला सोड, असे निक्षून सांगितल्यावरही, जो माझा हात अधिकच घट्ट धरुन ठेवतो, तो मित्र. एकमेकांबाबत मालकी हक्क निर्माण होणे, हेदेखील घडू शकते. पण माझ्या मते ती भावना असुरक्षिततेतून येते आणि त्यातून काही वेगळे प्रश्न निर्माण होतात.

असे मैत्र कुणाशी जूळते ? तर कुणाशीही. पण त्यातली पहिली पायरी ही बाह्य आकर्षणाची. दुसर्‍याच्या व्यक्तीमत्त्वातले काही गुण तरी मला आकर्षित करणारे हवेत. हे आकर्षण बाह्यरूपाचे असेलच असे नाही, पण ते हवेच. मला अनाकर्षक वाटणार्‍या व्यक्तीशी किंवा ज्याला माझ्या दृष्टीने वाईट असणार्‍या सवयी आहेत, त्याच्याही माझे मैत्र जुळणे कठीण आहे. पुढे परिचयातून आणखी गुण कळले तर उत्तमच. काही दुर्गुण कळले तर त्याचा परिणाम काय होईल ते नेमके सांगता येणार नाही. जर ते दुर्गुण सहन करण्यासारखे असतील तर सहन केले जातीलही.

आता या एवढ्या चर्चेनंतर जर मी विचारले की यात स्त्री आणि पुरुष हा भेद येतोच कुठे ?

गेल्या काही वर्षांपासून मी असे अनुभवतोय की, पहिला संवाद होताना तर स्त्री की पुरुष असा भेद केला जात नाही. नेमके सांगायचे झाले तर साधारण २५ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये, मुलेमुली तितक्या सहजपणे एकमेकांशी बोलत नसत. आता हा संवाद सहज घडतो. पण माझे हेही निरीक्षण आहे की, स्त्रीपुरुषांची मैत्री, ही बाकीच्या लोकांना सहन होत नाही. याची नेमकी कारणे काय असावीत हे मला सांगता येत नाही. पण अशी मैत्री शारीरिक पातळीवरच असू शकते, असा काहीसा ग्रह बाकिच्यांच्या नजरेत दिसतो. अशी मैत्री निखळ असू शकते, हे काही थोर लेखिकांनी मुद्दाम नोंदवून ठेवले आहे ( उदा., जी ए आणि सुनीताबाई, किंवा निर्मला देशपांडे आणि ग्रेस ) पण तरीही ते समाजमान्य झालेले दिसत नाही.

महाभारतात द्रौपदी आणि कृष्ण असे मनोहर उदाहरण आढळले तरी पुढे नाटकांतून, चित्रपटांतून अशी उदाहरणे अगदी मोजकीच दिसतात. (ठळक उदाहरण आठवतेय ते 'साहब बिबी और गुलाम'मधली छोटी बहू आणि भूतनाथ. )

या विचित्र समाजधारणेतून अशी मैत्री घडण्यात खूपच अडचणी येतात असे मला वाटते. एकमेकांचा सहवास आवडतो म्हणून जर एखादी स्त्री व पुरुष हे एकत्र सहलीला गेले, एखाद्या प्रदर्शनाला गेले किंवा अगदी समोरासमोर किंवा फोनवरही बोलत राहिले तर अगदी लगेचच त्यांच्याबद्दलच्या चर्चेला अगदी उधाण येते.
या असल्या विचित्र मानसिकतेमुळे, मैत्रीतला सहजस्पर्श देखील मित्रांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करु शकतो. टाळी देणे, खांद्यावर हात ठेवणे, अतिशय आनंदाच्या प्रसंगी मिठीत घेणे, मायेपोटी केसावरुन हात फिरवणे हे सगळे दोन समान लिंग असलेल्या व्यक्तींबाबत सहज घडू शकते. पण मुळात मैत्रीची भावना, तेवढीच तीव्र असले तरी, भिन्न लिंग असलेल्या मित्रांबाबत हे घडणे आपल्याकडे शक्य आहे का ?

त्यामुळे मला असे वाटते की, इथे समाजाचा दृष्टिकोन निर्मळ होणे अत्यावश्यक आहे. मुळात मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते, हे माझे ठाम मत आहे.

- दिनेशदा

प्रतिसाद

सहमत, दिनेशदा!

इथे समाजाचा दृष्टिकोन निर्मळ होणे अत्यावश्यक आहे. मुळात मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते >>> असायला हवी. पण दरवेळी असतेच का? याचं उत्तरही व्यक्तीसापेक्ष येऊ शकतं.

मैत्रीचे निकष फारच योग्य लिहिले आहेत, दिनेशदा.

मैत्री म्हणजे काय ते स्पष्ट करून समेवर 'आता या एवढ्या चर्चेनंतर जर मी विचारले की यात स्त्री आणि पुरुष हा भेद येतोच कुठे ?' हा प्रश्न विचारणं - हे अतिशय आवडलं.

मामी, ते त्या दोघांना ठरवू दे कि. समाजाने का ठरवायचे ?
मिलिंद बोकीलांची एक कादंबरी (बहुतेक, समुद्र ) नुसत्या या विषयाभोवती फिरते.
त्यातला, तो आपल्या पत्नीचा जवळजवळ मानसिक छळच करतो, असे मला वाटू
लागले.
आणि असा घोळ तो आपल्या महाभारतातही झाला. द्रौपदी आणि कृष्ण यांच्या निखळ
नात्यावर, एका कादंबरीत तिचे नाव कृष्णा, तिचा जन्मच मूळी कृष्णासाठी झाला होता,
असे लिहिलेले वाचले.

दुसरी राधा. ती वयाने त्याच्यापेक्षा मोठी. विवाहीत. त्याकाळी अनयाने जितका अन्याय
केला नसेल, तितका नंतरच्या साहित्यात त्यांच्यावर झाला. अनेक नृत्यप्रकारात (उदा. मणिपुरी ) तर त्यांचे लग्न झालेले दाखवतात. का ? राधा निव्वळ त्याची बालमैत्रिण का नाही राहू शकली ?

या विचित्र समाजधारणेतून अशी मैत्री घडण्यात खूपच अडचणी येतात असे मला वाटते. एकमेकांचा सहवास आवडतो म्हणून जर एखादी स्त्री व पुरुष हे एकत्र सहलीला गेले, एखाद्या प्रदर्शनाला गेले किंवा .. >>>
हो अशी मैत्री सहज घडु शकते / घडायला पाहिजे पण समाज्याचा असा निर्मळ दृष्टिकोन नसतो म्हणुन त्या व्यक्तिंना 'हा माझा मानलेला/ली भाउ / बहीण' असे म्हणावे लागते...अश्या वाक्यांचा आधार घ्यावा लागतो. कारण 'हा माझा/झी प्रिय मित्र/मैत्रिण' म्हटल की लोकांच्या भुवया उंचवतात.

ललिता +१

इथे प्रत्येकाच्या प्रतिक्रियेखाली 'प्रतिसाद' असा एक ऑप्शन येतोय. मी ललिता_प्रितीच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिला पण तो एक वेगळा प्रतिसाद म्हणूनच आला. तारखाही मराठीत दिसतायत. हे काय नविनच?

मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते, हे माझे ठाम मत आहे... माझंही हेच मत आहे,,, मस्त लेख.

मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते, हे माझे ठाम मत आहे.> सह्मत!

मैत्रीचे निकष फारच योग्य लिहिले आहेत, दिनेशदा.> +१

मस्त लेख दिनेशदा.. मैत्रीचे निकष तर फारच आवड्ले :)

मुळात मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते, हे माझे ठाम मत आहे.
>> सहमत!

मैत्रीइतकं सुंदर नातं आजवर पाहण्यात नाही...

छान !

@ दिनेशदा,
मुळात मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते, हे माझे ठाम मत आहे. >>> अगदी सहमत!

स्त्री पुरुषांची मैत्री ही बाकीच्या लोकांना सहन होत नाही. याची नेमकी कारणे काय असावीत हे मला सांगता येत नाही.>>>
याबद्द्ल मला वाटतं की ही असूया असते, आपल्याकडे मुळात 'बाईचा मित्र' ही संकल्पनाच मान्य नव्हती, 'तो' तीचा बाबा असावा, भाऊ असावा, नाहीतर पती...
मग पुढे शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने स्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि हळूहळू आपल्या समाजाचा स्री-पुरुष नात्याचा typical view बदलला आणि 'मुलीचा किंवा बायकोचा मित्र' म्हट्ल्यावर भुवया उंचावणं बंद नाही पण कमी झालं (अजूनही 'नक्की मित्रच ना की तसं काही आहे तुमच्यात' हे प्रश्न पाठ सोडत नाहीत) 'जे सहज सुंदर नातं आम्हाला मिळालं नाही ते तुम्हाला मिळतं' हे अनेकांना (यात स्त्री पुरुष दोघेही आले) सहन होत नाही, आणि यामुळेच कदाचित स्त्री पुरुषांची मैत्री ही बाकीच्या लोकांना सहन होत नाही.

पूर्वी,
मी भारतात याचा अनुभव फार वेळा घेतला आहे. बसमधे असलेल्या ऑफिसमधल्या
स्त्री सहकर्मचार्‍यासोबत, तिच्याकडे छत्री नव्हती, म्हणून एका छत्रीतून आम्ही ऑफिसमधे आल्यावर, दिवसभर त्या क्षुल्लक गोष्टीची चर्चा चालली होती. ( हो गोष्ट २४ वर्षांपुर्वीची आहे.)
एकदा हैद्राबादला आमच्या कंपनीतील देशभरातील कर्मचार्‍यांचा ईंडक्शन कोर्स होता.
५/६ दिवस दिवसभराचे कार्यक्रम आटपून, आम्ही सर्व संध्याकाळी बाहेर फिरायला
जात असू. अर्थातच मैत्री झाली.
शेवटच्या दिवशी वेगवेगळ्या वेळचे फ्लाईट्स असल्याने आम्ही रात्रभर एका रुममधे
गप्पा मारत जागरण केले. पहाटेची फ्लाईट पकडण्यासाठी ज्यावेळी आमच्या ग्रुपमधल्या
दोन मुली निघाल्या, त्यावेळी अचानक भानावर आलेल्या, दिल्लीकर मुली म्हणाल्या,
"कभी किसीसे ये ना कहना कि इतनी देर तर हम आपके साथ थे. देल्हीमे इसका
बहुत गलत मतलब निकाला जायेगा."
आणखीही अनुभव आहेत, पण हे प्रातिनिधिक.

दुसरी राधा. ती वयाने त्याच्यापेक्षा मोठी. विवाहीत. त्याकाळी अनयाने जितका अन्याय
केला नसेल, तितका नंतरच्या साहित्यात त्यांच्यावर झाला. अनेक नृत्यप्रकारात (उदा. मणिपुरी ) तर त्यांचे लग्न झालेले दाखवतात. का ? राधा निव्वळ त्याची बालमैत्रिण का नाही राहू शकली ?>>>>>>> हा प्रश्न माझ्याही नेहमी मनात येतो.

मैत्रीचे निकष आवड्ले!

छान लिहिलय दिनेशदा!

त्यामुळे मला असे वाटते की, इथे समाजाचा दृष्टिकोन निर्मळ होणे अत्यावश्यक आहे.>>>>> बरोबर.
आपणच ( म्हणजे आपण सगळे) सुरवात करायला हवी.

हो बुवा, सुरवात अगदी इथूनच व्हायला हवी..

>>प्लीज मला एकट्याला सोड, असे निक्षून सांगितल्यावरही, जो माझा हात अधिकच घट्ट धरुन ठेवतो, तो मित्र. >> क्या ब्बात!
टोटल लेख आणि प्रतिक्रिया सुंदर. दिनेशदा, तुमच्याकडून अश्याच सुंदर लेखाची अपेक्षा होती. धन्यवाद. :)
बरेचदा, मी निखळपणाने सामोरी जाते एखाद्या पुरुष सहकारी/मित्र्/माबोकर किंवा तत्सम... पण त्या पुरुषाला माझा मोकळेपणा झेपत नाही तर लगेच तो मला ताई करुन टाकतो. मी चांगली मैत्रीण होउ शकत नाही का? एखाद्याची कविता प्रचंड आवडते, त्याला मी कधीच पाहिलेले नसते पण लोक काय म्हणतील माझ्या स्पष्ट प्रतिक्रियेवर किंवा त्याला काय वाटेल म्हणुन मग मी भाऊ, दा, दादा हे लावते.. स्वतःलाच फसवते कि! म्हणजे लिंगनिरपेक्ष मैत्री होण्यासाठी थोडा अधिक परिचय होणे गरजेचे आहे आणि तितकी ताकद्/हिम्मत त्या समोरच्या व्यक्तीतही असायला हवी. नाहीतर टवकारलेल्या नजरा आणि कान ह्यांना घाबरणारा हा समाज वाईट म्हणायचा कि त्याकडे सहानुभुतीने पहायचे, दुर्लक्ष करायचे कि जाऊ दे म्हणत अनुकरण करायचे?
मी स्त्री असूनही मी स्त्रियांच्या विषयात किंवा स्त्रीसुलभ वृत्तीने नाही राहू शकत. मी 'बोल्ड' आहे. मला अधिक मित्र आहेत. हा माझा दोष असू शक्तो का? काही लोकांनी निखळ मैत्रीचा केलेला आंधळा व्यापार आणि पर्यायाने निखळ मैत्रीवर उठणारी बोटे ह्यामुळे मी माझी मैत्री दडवायची??
माझे माझ्या डायरेक्टर लोकांशी मैत्रीचे नाते आहे, त्यातील काहिंशी तर छान गप्पा होतात अगदी वाटेल त्या विषयांवर आणि वाटेल तसे! त्यामुळे महिला सहकर्मचारी माझ्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पहातात... माझ्या मागे काही काही बोलतात पण समोर आल्या कि अगदी छान बोलतात! दुटप्पी नुस्त्या!! मला त्याने काहीच फरक पडत नाही. मी आहे तशीच आहे. त्यामुळे मी त्यांच्यात मिसळत नाही किंवा मला त्या घेत नाहीत. माझे मिस्टर बहारीनला असतात आणि मी भारतात. तर त्यावर ह्यांचे विधान 'काय बाई आहे! एकट्या बाईला शोभतं का हे? किती हॅपी असते ना सतत!' म्हणजे एकट्या बाईने काय आयुष्याचा आनंद घ्यायचा नाही! हेच एखाद्या एकट्या माणसाच्या बाबतीत घडले तर.. तिथे नसतो प्रश्न?
मला सांगा लिंगनिरपेक्ष तरी का म्हणायला हवे? आ?? मी एक बाई. आणि माझा एक पुरुष मित्र. दोघांचे काही निसर्गतः भिन्न विषय. त्यामुळे वेगळ्याच लेव्हलची वैचारिक देवाण घेवाण... मग अत्यंत सवेदनाशिल प्रसंगी त्याने माझे अश्रू पुसले किंवा एखाद्या अगदी साध्या प्रसंगात मी त्याच्या पाठीवर थाप मारली तर काय झाले?
उफ्फ! प्रचंड वैचारीक मंथन झाले... उत्तरे सापडाय्ची आहेत अजून... आयुष्य सरेल पण हे तसेच रहाणार का.... आभारी.......

पल्ली, हिच व्यथा.
एखाद्याशी मैत्री जूळते ती केवळ, त्याच्या गुणासाठी / स्वभावासाठी. मनात हि स्त्री आहे का पुरुष आहे, हा विचारच येत नाही कधी. पण बाकीचे बघे, हा विचार मनात
भरवून घेतात आणि पसरवतात.

मी वर राधा / द्रौपदी यांचे उल्लेख केले आहेत ना. तसंच मला अनेकदा वाटतं, कि सिता आणि लक्ष्मण चांगले मित्र असतील. पण त्यांच्या नात्याला पण असेच कैद केले गेले.
ज्यावेळी लक्ष्मण तिला वनात सोडायला जातो, त्यावेळी त्या दोघांत नक्कीच एक
हृद्य संवाद झाला असेल. पण तो नाही काव्यात गुंफला गेला.

मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते >>>> सहमत.

मैत्री ही जर लिंगनिरपेक्षच असली असती तर एवढा परिसंवाद ठेवला गेला नसता. मैत्री लिंगसापेक्ष आणि लिंगनिरपेक्ष, दोन्ही प्रकारची पाहायला मिळते समाजात. खरेतर आजकाल समाज अधिक "मोकळा" होण्याऐवजी अधिक "संकुचित" होत चाललेला दिसतोय मला तरी. म्हणजे असं की स्त्रिया नोकरी करु लागल्या, मग अधिकारी पदावर जाऊ लागल्या नि आपण म्हणू लागलो की समाज मोकळा झाला. पण स्त्रिया अधिक खुल्यापणे मैत्री करु लागल्या का? मला नाही तसं दिसत. समाजाच्या बंदिस्तपणाची, दांभिकतेची वा संकुचितपणाची व्याख्या "ज्या समाजात स्त्री-पुरुष मोकळेपणी मैत्री करू शकत नाहीत, तो समाज संकुचित" अशी करायला हरकत नाही.

गंमत म्हणजे माझ्या लहानपणी ज्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना आता बर्‍याच वर्षांनंतर भेटल्यावर त्या खुलेपणाने बोलत नाहीत, जशा लहानपणी बोलायच्या! आपल्या मायबोलीवरही अशी उदाहरणं आहेत. कारणं काहीही असोत, दांभिकता पुरुषांप्रमाणेच स्त्रियांच्याही मोकळेपणाचा बळी घेते आहे, असे मी बघत आलो आहे.

अर्थात ही एक बाजू झाली. दुसरीकडे काही नव-मैत्रिणी अशाही आहेत की आम्ही जगातील कुठल्याही विषयावर मोकळेपणाने बोलतो, एकमेकांची थट्टा-मस्करी करतो. आणि इतरांना त्याची असूयाही वाटत नाही, किंवा रागही येत नाही.

मला म्हणायचंय की दोन्हीही प्रकारच्या भूमिका समाजात पाहायला मिळतात. पण लिंगनिरपेक्ष मैत्री एकंदरीने कमीच प्रमाणात आढळली. कारणे काहीही असोत.

खुप छान....मैत्रीची 'कंसेप्ट' अगदी मस्तच मांडलीये :)