लिंगाधारित व्यक्तिमत्त्व

लेखिकेचा अल्प परिचयः
लेखिका तनया मोहांती एफ एम युनिवर्सिटी, ओरिसा इथे समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. लिंग, व्यक्तीमत्त्व शोधन आणि माध्यम ह्या विषयांवर त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या छंदांमधे लघुकथा आणि इतर लेखन प्रकारांचाही समावेश आहे.
प्रस्तुत लेख त्यांच्या एम फिलच्या विषयावर आधारित असून निरिक्षणांसाठी/निष्कर्षांसाठी प्राथमिक शाळा ते बारावीपर्यंतच्या मुलामुलींच्या मुलाखतीतून मिळालेली माहिती वापरली आहे.

--------------

लिंगाधारित व्यक्तिमत्त्व
मुलं आणि मुलींची स्वप्नं, आकांक्षा, कल्पनाविश्वं, त्यांना वाटणारी भीती/असुरक्षिततेची कारणं एकमेकांपेक्षा वेगळी असतात. माणसाच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर त्याच्या पौरुष आणि स्त्रीत्वाबद्दलच्या कल्पनांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर मुलामुलींच्या मनांत त्यांच्या लिंगाधारित अस्तित्वाबद्दलच्या कल्पना कशा घडत/बदलत जातात - हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या भावविश्वात डोकावण्याचा हा प्रयत्न आहे.

माणसाची खरी आवड रिकाम्या वेळात - आनंदासाठी तो जे करतो त्यावरून कळते. त्यामुळेच माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेताना तो अशा रिकाम्या वेळात काय करतो हे बघणं महत्त्वाचं ठरतं.
व्यक्तिमत्त्वाच्या बर्‍याच बाजू असू शकतात - त्या जशा एखाद्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमधून दिसतात, एखाद्याच्या आवडीनिवडीतून दिसतात, तशाच एखाद्याच्या स्वतःच्या लिंगाबद्दलच्या कल्पनेतूनही दिसतात. पण मुळात स्वतःच्या लिंगाबद्दलची कल्पना प्रवाही / बदलती असू शकते. व्यक्तीची लिंगानुरूप अस्मिता तिच्या छंदांवरुन शोधण्याच्या माझ्या प्रयत्नांचा गोषवारा या लेखातून मांडते आहे. मी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे लिंगानुरूप व्यक्तिमत्त्वांचे वेगवेगळे प्रकार शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे, त्याचबरोबर ‘स्व’चा अभ्यास ‘इतर’ या संकल्पनेतून करण्याचाही प्रयत्न केला आहे. माझ्या अभ्यासावरून मला असं अनेकवेळा दिसून आलं आहे की आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर एकाच व्यक्तीची लिंगानुरूप ओळख तीच न रहाता वेगवेगळी असू शकते.
जन्मल्यापासून तीन ते पाच वर्षांपर्यंतच्या काळात मुलामुलींची जडणघडण साधारणपणे एकसारख्या पद्धतीनेच होते. त्यानंतर मात्र त्यांच्या वाढीचे मार्ग भिन्न होत जातात (काकर 1981).
स्वतःची ओळख पटण्याच्या काळात (बाल्यावस्था आणि पौगंडावस्था) हे दोन मार्ग कसा आकार, कोणती दिशा घेतात हे जाणून घेण्याकरता ‘स्वतः आणि इतर’ या संकल्पनेचा वापर आपण इथे करणार आहोत. ‘स्वतः आणि इतर’ या जाणिवा म्हणजे खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही जाणिवा एकमेकींमुळे दृढ होत असतात. व्यक्तीची मानसिक जडणघडण, दृष्टीकोन, इतर व्यक्तींशी असलेले संबंध आणि जीवनमार्ग या सर्वांवरच या जाणिवांचा प्रभाव पडलेला दिसतो, कारण माणसांचं सगळं जग ‘आपण’ आणि ‘ते’ मधे विभागलं गेलेलं असतं.
सोप्या भाषेत इतर म्हणजे 'स्वतः सोडून बाकी सगळे'. 'स्वतः' आणि 'इतर' या शब्दांच्या व्याख्या परस्परांवरूनच ठरतात. (स्वतः नाही ते इतर आणि तसंच इतर जे नाही ते स्वतः). इतरांपेक्षा वेगळं असावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. आपल्या वेगळेपणाचा शोध घेण्याची ओढ फार महत्त्वाची ठरते कारण ती माणसाला त्याची अस्मिता मिळवून देते. सामान्य असणं कुठल्याही माणसाला आवडत नाही. सार्त्रने यालाच 'अस्तित्वाचा लढा' म्हटलं आहे.
पण हा वेगळेपणा जपतानाही माणूस आपल्यातले आणि इतरातले समान धागे शोधत असतोच. एकाच वेळी समूहाचा भागही असावं आणि वेगळही असावं, सगळ्यांच्यात मिळून मिसळून रहातानाही आपलं स्वत्व जपावं याची गरज निर्माण झालेली इथे दिसून येते.
'इतर' या संकल्पनेला बर्‍याच बाजू असू शकतात. माझ्या अभ्यासानुसार बालवय ते पौंगडावस्थेत 'इतर'पणाचे जे प्रकार असतात ते खाली दिले आहेत. 'इतर' या कल्पनेकडं आपण ‘स्वतःची वेगवेगळ्या टप्प्यातली रूपं दाखवणारा आरसा’ म्हणूनही बघू शकतो - कारण आधी म्हटल्याप्रमाणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाची स्वतःबद्दलची व्याख्या आयुष्यभर बदलत असल्याने ‘इतर’ची व्याख्याही आयुष्यभर बदलत रहाते.
--------
’इतर’पणाचे वेगवेगळे टप्पे::

  1. Negative Others: (व्यतिरेकी / विरुद्ध इतर)

यामधे असे लोक येतात ज्यांच्याबद्दल व्यक्तीला फक्त घृणाच वाटते. इथे 'ते' आणि 'आपण' हे परस्परविरोधी गट असतात आणि हे दोन्ही गट परस्परांना तुच्छ लेखतात. दोन विजातीय ध्रुवच म्हणा ना! प्रत्येक गट स्वतःला दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ मानतो. शालेय वयात भिन्नलिंगी व्यक्तींबद्दलची मतं या प्रकारची असल्याचं दिसून येतं. या वयातल्या व्यक्तींच्या मते दुसर्‍या लिंगाच्या व्यक्तींचं वागणं, पद्धत म्हणजे चुकीची. त्यांच्या दृष्टीनं भिन्नलिंगी व्यक्ती म्हणजे नुसत्या निराळ्याच नव्हेत तर जणू परग्रहावरुन आलेले विचित्र प्राणीच! व्यक्तिमत्त्व घडणीचा हा सुरुवातीचा टप्पा होय.
आत्मसंघर्षाचा काळ
यातला पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आत्मसंघर्षाचा. ही बदलाची मधली पायरी असते. काहीजणांकरता ही ओलांडून पुढे जाणं कष्टाचं असू शकतं. आपण कसे आहोत आणि खरंतर आपण कसं असायला हवं यातलं द्वंद्व अजून मिटायचं असतं - 'आपली बाजू कुठली' हे अजून ठरत असतं. यासाठी आपण रूडयार्ड किपलिंगचं उदाहरण घेऊ. आपण ब्रिटिश की भारतीय हे तो ठरवू शकत नव्हता. ‘तो कोण होता’ आणि ‘तो कोण असणं रास्त / गरजेचं होतं’ यातला हा संघर्ष. अशा व्यक्ती मग स्वतःमधे नावडते आणि तरीही आवश्यक वाटणारे गुण बाणवायचा प्रयत्न करताना दिसतात. आपल्यावर दबाव आणणार्‍या व्यक्तीपेक्षा वरचढ होता यावं म्हणून त्या व्यक्तीसारखंच बनू पाहणं हा यातलाच प्रकार. भारतात ब्रिटिश राजवट असताना 'देशी साहेब' व्हायचा प्रयत्न करणारे भारतीय या गटातले होते असं म्हणता येईल.
म्हणजेच या व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वातला काही भाग पुसून टाकून त्याजागी त्यांना आदर्श किंवा अधिक परिणामकारक वाटणारा असा बदल घडवून आणू पाहत असतात. स्वतःची रूढ असलेली ओळख पुसून 'दुसर्‍यांसारखी' ओळख घडवण्याची इच्छा इथे दिसून येते.
माझ्या अभ्यासात पौगंडावस्थेतल्या मुली त्यांच्या स्वतःच्या लिंगाकडे परकेपणानं पहाताना दिसल्या. 'बायकी' म्हणून ओळखली जाणारी कुठलीही गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वामधून अक्षरशः पुसून टाकण्याकडे त्यांचा कल दिसला. पुरुषप्रधान स्पर्धात्मक जगाचा, समाजाच्या मुख्यप्रवाहाचा भाग होण्याची त्यांची इच्छा होती आणि याकरता लिंगविरहित किंवा प्रसंगी पुरुषी वाटेल असंही वागण्याची त्यांची तयारी होती, मात्र त्यांच्यातल्या स्त्रीत्वाचा काही भाग याच्या आड येत होता. असं वागण्याची इच्छा म्हणजे लिंगबदलाची इच्छा नव्हे तर हा केवळ स्वत: आणि इतर याच्या व्याख्या अजून स्पष्ट नसल्याचा परिणाम आहे.
माझ्या अभ्यासादरम्यान एका पौंगडावस्थेतल्या मुलीने “शी बाई, मी नाही मिल्स अ‍ॅन्ड बून्स वाचत. ती सवंग आणि अतर्क्य पुस्तकं असतात.” असं मला सांगितलं. पण आधीच्याच एका प्रश्नाचं उत्तर देताना तिनं 'एरिक सिगल'च्या प्रेमकथा आवडतात असंही सांगितलं होतं. म्हणजे तिला मिल्स अ‍ॅन्ड बून्स आवडतच नसतील असं नाही, पण तिच्या दृष्टीने मिल्स अ‍ॅन्ड बून्स वाचणं म्हणजे 'टिपिकल' बायकीपणाचं लक्षण होतं. अशी पुस्तकं वाचणार्‍या मुली म्हणजे डोक्याने कमी आणि स्वप्नरंजनापलीकडे दुसरा उद्योग नसलेल्या - असा तिचा पक्का ग्रह होता आणि म्हणूनच 'त्यांच्यातली एक' हा शिक्का तिला आवडत नव्हता. मी जमा केलेल्या माहितीनुसार तरी मुलांमधे मात्र असा लिंगाधारित न्यूनगंड दिसून आला नाही.

अशा मानसिक द्वंद्वाचं रुपांतर व्यक्तिमत्त्वाच्या खालील प्रकारांत होऊ शकतं:
अ. Equal but Different Others : समान स्तरावरील पण भिन्न असे इतर. या प्रकारामधे द्वंद्वाचं योग्य उत्तर मिळतं. स्वत:ची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते.
ब. Unequal but Different Others: भिन्न स्तरावरील इतर
क. Echoistic Others: अनुकरणीय इतर

'भिन्न स्तरावरील इतर' आणि 'अनुकरणीय इतर' या वर्गवारी मुख्यतः मुलींना लागू होतांना दिसल्या, तर 'समान स्तरावरील इतर' याचं प्रमाण मुलामुलींत सारखंच दिसून आलं.

२. Equal but Different Others (समान स्तरावरील पण भिन्न असे इतर):
इथे दुसर्‍यांकडे नकोसे म्हणून, घृणेने बघण्याऐवजी हवेहवेसे किंवा आदर्श म्हणून बघितलं जातं. स्वतःत नसलेलं असं काहीतरी ज्यांच्यात आहे असे म्हणजे 'इतर/भिन्न' अशा संदर्भानं इतरांकडे बघितलं जातं. तुम्हाला अजूनही हवंहवसं वाटणारं पण कालप्रवाहात वाहून गेलेलं, काही कारणास्तव तुम्ही सोडून दिलेलं असं स्वत:तलं काही या इतरांमधे असू शकतं. व्यक्तिमत्त्वाचा हा भाग आता तुमच्यात नाही, पण अजूनही तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होताहात. 'आपण' आणि 'ते' यातला तिर्‍हाईतपणा इथे कमी होऊन एक बंध तयार होऊ पहातो आहे.
हा प्रकार पौंगडावस्थेतल्या मुलामुलींमधे जास्त पहायला मिळतो, कारण त्या वयात आत्मकेंद्रितता कमी होऊन भिन्नलिंगी व्यक्तिंबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागतं. या काळात आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या व्यक्ती आपल्याला जास्त आवडतात - आपल्यात नसलेलं असं काहीतरी आपल्याला त्यांच्यात सापडतं. हे भिन्नलिंगी व्यक्तींतील नात्यांत तर विशेषत्त्वाने दिसतच पण समान लिंगाच्या व्यक्तींमधेही दिसून येतं.
यांना आपण नशीबवान म्हणू शकतो. आपल्यातल्या कमतरतेवर 'इतर' हा निरोगी पर्याय यांना सापडला आहे.
या प्रकारच्या 'स्व' च्या जाणिवेबद्दल विचार करताना मला प्लेटोनं सांगितलेल्या एका मिथकाची आठवण येते. स्त्री आणि पुरुष म्हणे पूर्वी अगदी एकजीव होते. पण एका दुर्घटनेने त्यांना एकमेकांपासून निराळं केलं. त्या प्रसंगानंतर कायमच स्त्री आणि पुरुष दोघही शक्य होईल तेव्हा हे द्वैत मिटवण्याचा - पुन्हा एकरुप होण्याचा प्रयत्न करतात. ही धडपड वेगवेगळ्या रूपांत दिसून येते.
"समानस्तरावरील पण तरीही भिन्न" असे लोक आपल्यातला आणि इतरातला फरक समजूतदारपणे मान्य करताना दिसतात.

३. Unequal but Different Others (भिन्नस्तरावरील इतर)
"संपूर्ण समाजासाठीच आपण 'इतर' किंवा दुय्यम आहोत" या जाणिवेने घेरलेला हा समूह असतो. सामाजिक जबाबदार्‍या आणि भूमिका यांच्या प्रचलित वर्गवारीवर त्यांचा विश्वास तर असतोच, पण जगण्याच्या या सरधोपट मार्गाचा त्यांनी स्वीकारही केलेला असतो. हे असंच चालत रहाणार, आपलं स्थान कधीच बदलणार नाही अशी त्यांची धारणा असते आणि बदलासाठी अशा समुहातल्या व्यक्ती काही प्रयत्नही करत नाहीत. आपल्या लिंगामुळे आपल्याला मर्यादा आहेत, यावर त्यांचा दृढविश्वास असतो. सर्वसाधारणपणे ही उणीव आपल्याला बहुतेक स्त्रियांमधे दिसते. त्या आपला दुय्यमपणा खोडून काढण्याचा किंवा संपूर्ण समाजरचनेत काही बदल करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तसंच स्वतःतही काही बदल करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत स्वतःला आरामशीरपणे सामावून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आखून दिलेल्या भूमिकेनुसार जगण्याची ही वृत्ती विशेषतः पौंगडावस्थेतल्या मुलींमधे दिसून आली. परीकथेतील नायिकेसारख्या त्या अक्रियाशील असतात आणि स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी त्या संपूर्णपणे नशिबावर अवलंबून राहतात. अशा प्रकारच्या मुलींसाठी सुखी कौटुंबिक आयुष्य हे यशस्वी व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं.

४. Echoistic Others (अनुकरणीय इतर)
तुमच्या दृष्टीने 'आदर्श' असं व्यक्तिमत्त्व अंगिकारण्यासाठी आडकाठी वाटणारे स्वतःचे गुण तुम्ही या अवस्थेत बाजूला सारु शकता. तुम्हाला द्वंद्वात अडकवणारा आत्मसंघर्ष आता संपुष्टात येतो आणि तुम्ही कुठलाही पण ठाम पवित्रा घेता. या गटातील व्यक्तींना त्यांचं स्वतःचं जेंडर परकं वाटायला लागतं आणि त्याऐवजी दुसर्‍यांचं जेंडर आपलंसं वाटतं. हया नव्या रुपात तुम्ही जास्त कम्फर्टेबल असता.
टॉमबॉईश मुलींच्या केसमधे त्या स्वतःच्या जेंडरकडे तिर्‍हाईतपणे बघताहेत, त्याचवेळी दुसरं जेंडर आपलंसं केलय. हा फक्त तात्पुरता/स्थित्यंतराचा काळ असतो का कायमस्वरुपी हे मला नक्की सांगता येणार नाही. मात्र आजपर्यंतच्या मान्यताप्राप्त सांस्कृतिक संदर्भांमधे हेच दाखवण्यात आलं आहे की अशा 'टॉमबॉईश' मुलींचं कालौघात परिपूर्ण स्त्रियांमधेच रूपांतर होतं. मग ती 'लिट्ल वुमन' ची जो मार्च असुदे, ‘कुछ कुछ होता है’ची काजोल असू दे किंवा ‘हुतुतू’ची तब्बू. सगळ्या शेवटी स्त्रीसुलभतेचा नमुना ठरताना दिसल्या.

व्यक्तिमत्त्वाच्या या सगळ्या प्रकारांचा संबध व्यक्ती अनुभवत असलेल्या आयुष्यातल्या विशिष्ट परिस्थितीशी/अवस्थेशी असतो. माणूस एक टप्पा पार करुन पुढच्या टप्प्यात जात असतो. पण हे टप्पे एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त नसतात, ते एकानंतर एक येतात किंवा कधीकधी एकमेकांत गुंतलेलेही असू शकतात. बर्‍याचदा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वात एकाच वेळी या 'इतरपणा'च्या एकापेक्षा जास्त छटा आढळू शकतात कारण आपली अस्मिता खरंतर लवचिक आणि बहुआयामी असते (Richardson 2001: 25)

याचमुळे तर मुलामुलींच्यात एवढं वैविध्य दिसून येतं. लिंगाधारित चौकटींना मिळणारं प्रोत्साहन हे प्रस्थापित समाजरचनेतून मिळतं, तसंच अगदी दैनंदिन आयुष्यातील लहानसहान बाबींत सभोवतालच्या व्यक्तींकडून प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे मिळत राहतं. लिंगसापेक्षतेचा पाया बालपणातच घातला जातो आणि मग यातूनच पुढे बहुतेक मुलामुलींची आयुष्यं समाजाने आखून दिलेल्याच वाटांवरून प्रवास करू लागतात. हा भेद मुलं आणि मुलींच्या विचारसरणीत, त्यांच्या आयुष्यातल्या अग्रक्रमांत जमीनअस्मानाचा फरक घडवून आणतो. लिंगाधारित चौकटींमुळे मुलं आणि मुलींमधे पडलेली ही दरी कमी होणं शक्य नाही. किंबहुना कुठल्याही समाजामधल्या लिंगभेदाचं हे मूळच म्हणता येईल.

-------
संदर्भः
Beauvoir, S. D. 1949. The second sex. New York: Vintage Books.
Chaudhari, M. 2004. ‘Feminism in the print media’ in M. Chaudhari (ed.) Feminism in
india. New Delhi. Kali for Women.
Kakar, S. 1981. The inner world: A psycho-analytic study of childhood and society in India,
New Delhi: Oxford University Press.
Mac an Ghaills, M. 1994. The making of men: masculinities, sexualities and schooling.
Buckingham: Open University Press.
Nandy, A. 1983. The intimate enemy. New York: Oxford University Press.
Rege, S. (ed.). 2003. Sociology of gender. New Delhi: Sage Publication.
Richardson, M. 2001. Experiencing culture. London: Sage Publication.
Said, E. 1979. Orientalism. New York: Vintage Books.
Sartre, J. P. 1984. Being and nothingness. New York: Oxford University Press.

- नानबा (अनुवाद)
- विशेष आभार: धुंद रवी, स्वाती आंबोळे

प्रतिसाद

उत्तम लेख आणि उत्तम अनुवाद.

नानबा,
मस्तच काम केले आहेस हे. धन्यवाद. :-)

सुंदर लेख! किती कमी शब्दांत अक्षरशः आरसा उभा केला आहे आपल्यासमोर.
धन्यवाद नानबा. :)

ज ब र द स्त

वेगळे विचार ! आवडले!!

मस्त ग नानबा.

नानबा, अनुवाद आवडला. सुरेख लेख.

नानबा, अनुवाद आवडला. धन्यवाद. :)

इथे एक विचारावेसे वाटते ते म्हणजे प्रस्तुत लेखिकेने हे जे 'इतर' पणाचे वेगवेगळे टप्पे सांगितले आहेत (निगेटिव्ह अदर्स, इक्वल बट डिफरन्ट अदर्स, अनइक्वल बट डिफरन्ट अदर्स आणि एकोइस्टिक अदर्स) त्यांची नावे / गुणविशेष (संज्ञा)या लेखिकेने स्वतः दिलेली आहेत की आधी कोणी इतर अभ्यासकाने वापरलेल्या टर्म्सचा संदर्भ वापरुन त्यावर आधारित संशोधन केले आहे?

हा प्रश्न विचारावासा वाटण्याचे कारण म्हणजे जर या टर्म्स (संज्ञा) इतर देशातील संशोधकाने आधी वापरल्या / निर्माण केल्या असतील व प्रस्तुत लेखिकेने त्यांच्या संदर्भाने जर संशोधन केले असेल तर पुढचा प्रश्न साहजिकच येतो की भारतीय समाजरचनेच्या संदर्भात या संज्ञांचा कितपत उपयोग आहे?

असा विचार करण्याचे कारण हे की असे अनेकानेक अभ्यास सतत होत असतात. त्यांपैकी आपल्या समाजरचनेला उपयुक्त / पूरक अभ्यास जर संदर्भासाठी केला असेल तर त्यापासून गैरसमज होण्याचा संभव कमी असतो. कारण जर या संज्ञा समजा कोणा अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने अमेरिकन समाजासंदर्भात निर्माण केल्या असतील आणि प्रस्तुत लेखिकेने त्या भारतीय संदर्भात वापरल्या असतील तर त्या अभ्यासाचा भारतीय समाजरचना समजून घेण्यात कितपत उपयोग होईल याबद्दल मी साशंक आहे.

या संबंधी कृपा करुन वेळीच खुलासा केल्यास बरे होईल.

धन्यवाद.

दीपक भिडे: संज्ञा कुणीही तयार केल्या असल्या तरी वरचे निष्कर्ष लेखिकेनं स्वतःच्या अभ्यासावरुन (वेगवेगळ्या वयोगटातल्या मुला/मुलींची मुलाखत घेऊन) त्यावरून काढले आहेत

अनुवाद आवडला. सुंदर लेख.

कबूल आहे की स्वतःचा अभ्यास केला आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या संज्ञा भारतीय समाजव्यवस्थेला किती प्रमाणात लागू आहेत?

उदाहरणार्थ, "मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम वीनस" या पुस्तकाचे संदर्भ अमेरिकेतील आहेत. त्यामुळे त्या पुस्तकातील स्त्री-पुरुषांच्या वर्तनाबद्दल जी चिकित्सा केली आहे, तिचा उपयोग "अमेरिकेतील स्त्री-पुरुष अशा-अशा प्रसंगी असे का वागतात" हे समजून घेण्यासाठी करुन घेता येईल. परंतु भारतीय समाजाच्या परिप्रेक्ष्यात हे पुस्तक केवळ मनोरंजन ठरते, कारण आपल्या स्त्री-पुरुषांची मानसिक जडणघडण थोड्या वेगळ्या धाटणीची आहे.

म्हणूनच तनया मोहंती यांनी केलेला अभ्यास जर केवळ प्रबंध म्हणून केला असेल आणि संज्ञा इतर ठिकाणच्या वापरल्या असतील, तर त्यावर आधारित चर्चा केवळ वेळेचा अपव्यय असेल. म्हणून मी विचारले आहे की संज्ञा कोणी व कुठे निर्माण केल्या आहेत?

तनया मोहंती यांच्या प्रस्तुत लेखासंबंधी धागा पुढे देत आहे:
http://books.google.co.in/books?id=7ZrwtgAACAAJ&dq=Tanaya+Mohanty&hl=en&...

इथे प्रस्तुत पुस्तकाचा सारांश असा दिला आहे:

Though a lot of things go into constructing gender identity of boys and girls, their exposure to popular literature as a social process, stands out different, since it occurs in their private and inner space. The fear, insecurities, dreams and aspirations which the child must have acquired through socialization, get re-organized or reconstructed through the child's reflections on the experience of going through popular literature. This study is but an attempt to understand how genres of such literature come into play in the construction of identity of boys and girls. The author also explores different nuances of 'othering' each boy or girl confronts and negotiates with triggered by the milieu and characters of the book.

>>आजपर्यंतच्या मान्यताप्राप्त सांस्कृतिक संदर्भांमधे हेच दाखवण्यात आलं आहे की अशा 'टॉमबॉईश' मुलींचं कालौघात परिपूर्ण स्त्रियांमधेच रूपांतर होतं. मग ती 'लिट्ल वुमन' ची जो मार्च असुदे, ‘कुछ कुछ होता है’ची काजोल असू दे किंवा ‘हुतुतू’ची तब्बू. सगळ्या शेवटी स्त्रीसुलभतेचा नमुना ठरताना दिसल्या.>>
मूळात टॉमबॉइश मुलगी हे विशेषण लावताना पारंपारिक चौकटच संदर्भासाठी वापरली जाते. मुलीने अमुक एका पद्ध्तीने वागायचे या अपेक्षेतून हे येते. परिपूर्ण स्त्री ती असतेच. फक्त चौकट पारंपारीक असल्याने तिच्या काहीतरी कमतरता आहे असे भासत रहाते. शेवटी परीपूर्ण स्त्रीची व्याख्या कशी करायची?

मुळात हा लेख तनया मोहंती यांनी "This study is but an attempt to understand how genres of such literature come into play in the construction of identity of boys and girls"' यासाठी लिहिला असे या सारांशात म्हटले आहे. मराठीत याचा अर्थ साधारणपणे असा होतो : "हा अभ्यास अशासाठी केला गेला की "अशा तर्‍हेचे" (पॉप्युलर) साहित्यप्रकार मुले व मुलींच्या लैंगिक ओळखीच्या धारणेवर काय परिणाम घडवतात हे पाहणे"
पुढे असेही लिहिले आहे : The author also explores different nuances of 'othering' each boy or girl confronts and negotiates with triggered by the milieu and characters of the book. अर्थात, :"अशा पॉप्युलर साहित्यप्रकारांतून प्रत्येक मुलाला वा मुलीला जी "इतरपणाची" जाणीव येते त्यावर ही मुले कशी मात करतात हे पाहणे". (इथे केवळ इंग्रजीतला सारांश दिला असल्याने कुठ्ल्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंग्रजीतला सारांश दिला आहे हे कळत नसल्याने माझे भाषांतर थोडे रस्ता बदलून जात असल्याची शक्यता आहे.) पण मूळ मुद्दा हा की "'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' हा विषय कुठे आणि मुळात संयोजकांनी दिलेल्या संदर्भात काय लिहिले आहे ते कुठे? असे नाही वाटंत?

शिवाय, नानबा यांनी मराठीतील अनुवाद म्हणून जे दिले आहे, त्याचा उल्लेख सारांशात अजिबातच कसा नाही? असे वाटल्यावाचून राहत नाही. संपादक मंडळाने यावर प्रकाश टाकल्यास उत्तम.

सुरेख लेख...छान माहिती मिळाली. उत्तम अनुवाद .

सुमेधा: कृपा करुन मला हे सांगू शकाल का की नानबा यांनी ज्या लेखाचा अनुवाद केला असे सांगण्यात येतं आहे तो तुम्ही स्वतः वाचला आहे काय? मला तो वाचायचा आहे म्हणून विचारले.

बेफिकीर यांच्या मताशी मी सहमत आहे. चर्चा "ड्राईव्ह" होत नाहिये. त्यासाठी आवश्यक "फ्यूएल" म्हणून मूळ कथावस्तूचा गाभा माहित असणं अत्यावश्यक आहे. तनया मोहंती यांनी मायबोलीसाठी जो काही लेख लिहून दिला असेल (ज्याचा अनुवाद नानबा यांनी केला असे सांगण्यात येते आहे व ज्या अनुवादावर आधारित राहून आपण मूळ लेखाची स्तुती करीत आहोत) तो आपण वाचणं आवश्यक नाही का?

सर्वांचेच लेख सुरेख आहेतच. पण जो मूळ लेख म्हणून दिला गेला आहे (अनुवादित) त्या मूळ लेखात याबद्दल काय लिहिलं आहे हे मुळापासून वाचणं मनोरंजक व माहितीप्रद ठरेल. तसेच आपण मूळ कथाविषयापासून किती फारकत घेतली आहे हेही कळायला त्यामुळे मदत होईल.

अनुवाद करताना मूळ आशय किती प्रमाणात बदलला गेला हे मूळ लेख / कथा इ. वाचल्याशिवाय समजत नाही. अजून मला "पिग्मॅलियन" वाचायला मिळालेले नाही. "ती फुलराणी" साठी पु.लं. नी भारतीय (मराठी) सामाजिक आशयाप्रमाणे पिग्मॅलियन च्या मूळ कथेत खूप बदल केले आहेत हे वाचनातून ठाऊक आहे. पण मी स्वतः पिग्मॅलियन वाचून मला स्वतःला जेव्हा ते कळेल, तेव्हाच मी (माझा अहं) समाधान पावेन.

बिंगो..........

तनया मोहंती यांच्याबरोबर ईमेल द्वारे संपर्क केला असता त्यांनी माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की, त्या चार संज्ञा त्यांनी स्वतः निर्माण केल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदनही केलं आहे.

आता त्यांची परवानगी घेऊन त्यांनी लिहिलेला रीप्लाय मी इथे लिहिणार आहे. त्यांना अशीही विनंती केली आहे की त्यांनी मायबोलीसाठी लिहिलेला मूळ लेख वाचायला दिला तर बरे होईल.

मला वाटते आता पुढच्या संवादाला हरकत नसावी.