आलेल्या लेखांसंदर्भाने..

परिसंवादासाठी 'लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख' हा तसा क्लिष्ट विषय जाहीर करताना कशाप्रकारचा प्रतिसाद मिळेल, याबद्दल आम्ही थोडे साशंक होतो. नेहमीच्या विषयांसारखा लिखाणाचा पाऊस पडणार नाही ह्याची कल्पना होतीच.

विषय जाहीर झाल्यावर अर्थातच अनेकांना अनेक प्रश्न पडले. काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे आम्ही देऊ शकलो तर काहींना नाही. पडलेले प्रश्न, असलेले आक्षेप घेऊन मनोगत लिहून पाठवण्याविषयी आम्ही विनंती केली होती, कारण त्या प्रश्नांतूनच या विषयाचा वेध घेणे शक्य होणार होते. एखाददुसरा अपवाद वगळता फारसे कुणी असे लेख पाठवले नाहीत.

एकूण वीस मायबोलीकरांनी आपले लिखाण या परिसंवादासाठी पाठवले. त्यातल्या दहा लेखांची आम्ही विशेषांकासाठी निवड केली. विषयाची मांडणी, त्यातले मुद्दे आणि त्यांचा विस्तार या साधारण निकषांवर ही निवड केली गेली.

विषयाची घोषणा करताना विषय स्पष्ट व्हावा तसेच व्याप्तीचा अंदाज यावा या दृष्टीने घोषणेत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते. लेख वा मनोगत म्हणजे त्या आणि तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे असाही काहींचा गैरसमज झालेला आढळला.

या विषयाची व्याप्ती कुठपर्यंत असू शकते, हे आपण संपादकियात वाचले असेलच. आलेल्या लेखांपैकी क्वचित एखाद्या लेखात विषयाच्या व्याप्तीला स्पर्श केलेला दिसला. बर्‍याचशा लेखांमध्ये लिंगनिरपेक्ष मैत्रीच्या अनुषंगानेच चर्चा केलेली दिसून आली. त्यामधे 'मैत्री ही लिंगनिरपेक्षच असते' (दिनेशदा) ते 'लिंगनिरपेक्ष हे मानवनिर्मित मूल्य, वैविध्यासाठी मारक' (ललिता-प्रिती) अशा सर्वप्रकारच्या मतांचा समावेश आहे, हे मात्र विशेष.

अनेकांनी लिंगनिरपेक्ष विचार हे एक स्वप्न आणि वैयक्तिकरित्या वास्तवात ते शक्य होईलच असे नाही, अशी प्रांजळ कबुली दिली. काहींनी आपल्या मनातले गोंधळ अतिशय प्रांजळपणे मांडले. काहींनी विविध शक्यता मांडल्या. लहानपणापासून स्त्री वा पुरूष म्हणून वाढवलं जाताना केले जाणारे फरक, लिंगनिहाय अपेक्षा आणि त्याचा फोलपणा, अशा मुद्द्यांचा ऊहापोह केला आहे.

व्यवसायाच्या अनुषंगाने लिंगनिरपेक्षतेचा विचार, जीवशास्त्रीय लिंग आणि मानसिक लिंग यांच्यात एकवाक्यता नसणे, अशा काही विषयांना मात्र कोणीच स्पर्श केलेला दिसला नाही.

निवड न होऊ शकलेल्या लेखांमध्ये काही लेख विषयाला सोडून भरकटलेले वाटले तर काही विस्कळीत पण तरी त्या लेखांमध्येसुद्धा काही काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे येतात. संपूर्ण लेख निवडीस पात्र ठरला नसल्याने त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणे योग्य नव्हे, या विचाराने न निवडलेल्या लेखांतील महत्त्वाच्या मुद्द्यांचा या आढाव्यामध्ये समावेश करत आहोत.

मुक्तसुनित यांनी आपल्या लेखात विषयाच्या व्याप्तीला स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे -

लैंगिकता हा विषय मानवप्राण्याच्या उत्क्रांतीच्या संदर्भातला पुरातन विषयांपैकी एक असा मानायला हरकत नाही. मात्र लैंगिकता या विषयाकडे अभ्यासविषय म्हणून पहाणे, एका व्यक्तीच्या 'ओळखी'चा भाग म्हणून या विषयाकडे पाहणे, लिंगसापेक्षतेकडे अन्यायाचा एक स्रोत म्हणून पाहणे, त्याची सांगड स्त्रियांच्या हक्कांसंबंधीच्या, त्यांच्या शोषणासंबंधीच्या प्रश्नांशी घालणे, LGBT या शीर्षकाखाली येणार्‍या, पर्यायी लैंगिक-दिशानिदेशन (म्हणजे समजेल अशा भाषेत बोलायचे तर alternate sexual orientation) असलेल्या व्यक्तीसमूहांच्या हक्कांसंबंधीच्या प्रश्नांची, सामाजिक बाबींची चर्चा या सार्‍या घटना विसाव्या शतकामध्ये क्रमाक्रमाने घडत गेलेल्या बदलांमुळे, झालेल्या चळवळींमुळे, अस्तित्वात आलेल्या व्यासपीठांमुळे आणि एकंदर वैचारिक प्रगतीमुळे घडल्या आहेत असे सामान्यपणे म्हणता येईल.

नंदिनी यांनी लिंगसापेक्षतेकडून लिंगनिरपेक्षतेच्या प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला -

संस्कृती ही कालप्रवाही असते. त्यामुळे या लिंगसापेक्षतेमध्येदेखील बदल होत गेलेच. सध्यादेखील हे बदल होत आहेतच. इंटरनेट, टेलिव्हिजन, सिनेमा यांसारख्या जनसंपर्काच्या माध्यमांनी सध्या जगामध्ये संपर्कक्रांती घडवून आणलेली आहे. यामुळे विविध संस्कृती एकदम वेगाने आपापसात मिसळत आहेत. सर्व दर्‍या आजच्या युगात मिटत आहेत. मग सेक्सिझम तरी त्याला अपवाद कसा असेल?

बेफिकीर यांनीही लिंगनिरपेक्षतेचे या समाजातले वास्तव मांडले आहे -

माणसाला लिंगनिरपेक्षता शिकण्याचा अधिकारच न मिळणे, हे या संस्कृतीमध्ये सातत्याने पाहिले जाते. अगदी स्त्री शिकली आणि मोठमोठ्या पदांवर नोकरी करू लागली, अगदी तिचे अनेक सहकारी तिला रिपोर्ट करत असले अणि अगदी घरची आर्थिक जबाबदारी ती एकटीच उचलत असली, तरीही लिंगनिरपेक्षता तिच्या वाट्याला येत नाही, ही बाब दुर्दैवी व वास्तव आहे. स्त्रीमधील माणूसपण जागृत होण्याआधीच सोशिकपणा प्रमाणाबाहेर जागृत झाल्याने तिच्यातील माणूस तिलाच नकोसा होण्याइतपत पुरुषांनी दबाव टाकलेला आढळतो.

लिंबुटिंबु यांनी लिंगनिरपेक्षतेची गरज आणि ती का भासते याबद्दल ऊहापोह केला. शिवशंकराच्या अर्धनारीनटेश्वर रुपासंदर्भाने लिंगनिरपेक्षतेचा विचार यावर अजून वाचायला आवडले असते -
मूळात लिन्गनिरपेक्ष दृष्टीची/नजरेची आवश्यकताच का भासते याचा विचार करता त्यामागे या सार्वकालिक तत्कालिक वास्तव परिस्थितीनुसार सामाजिक 'असमान' वागणूक हेच मूळ कारण आहे.
प्रत्यक्ष शिवशंकराचे रुप 'अर्धनारीनटेश्वर' मानले जाते, त्यानुसार, प्रत्येक स्त्री वा पुरुषात, भिन्नलिन्गत्वाचे गुण असतातच असतात, त्या स्वतःत असलेल्या अस्पष्ट भिन्नलिन्गत्वी गुणान्चा व दुसर्‍यात पूर्णत्वाने असलेल्या भिन्नलिन्गी गुणांचा आदरच करायला शिकावे.

बागेश्री यांनी लिंगनिरपेक्ष नात्याबद्दल अतिशय मार्मिक अपेक्षा व्यक्त केल्या -

शेवटी, नात्याला जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे निव्वळ 'व्यक्ती' म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन लाभतो आणि त्याच वेळी त्या 'व्यक्तीला' असणार्‍या मर्यादेचेही भान राखण्याची उंची गाठली जाते, तेव्हा आपसूकच लाभलेला पारदर्शीपणा त्या नात्यातले भेद मिटवतो, अगदी लिंगभेदही!!

अश्विनीमामी यांनी प्रसिद्ध अशा सुंदर मैत्रीची उदाहरणे देऊन लिंगनिरपेक्ष मैत्री कशी असावी हे विशद केले -

अनिल अवचट व कमल देसाई, जी. ए. व सुनीताबाई ही अशा प्रगाढ मैत्रीची काही उदाहरणे आहेत. जिथे स्वत्व पूर्णपणे बाजूला ठेवून दिले गेले आहे. गौरी देशपांड्यांच्या 'चंद्रिके ग, सारिके ग' ह्या दीर्घकथेतही दोन स्त्रियांमधली अशीच हळूवार मैत्री चितारलेली आहे. चांगली मैत्री कशी असावी? दोन जिवांनी एकमेकांचे गुणच नव्हे तर दोषही समजून घ्यावेत. आवडीनिवडी समान नसल्या तरी पूरक असाव्यात. एखादी गोष्ट पटत नसल्यास ते गैरसमज न होता मांडता यावे, टोकाचे मतभेद असले तरी ते व्यक्त करता यावेत व त्यामुळे मूळ मैत्रीच्या गाभ्याला धक्का पोहोचू नये. आपण एकमेकांबरोबर जे अमूल्य क्षण व्यतीत करतो ते सुखाचे, जीवनात काहीतरी सकारात्मक भर घालणारे असावेत. कला, साहित्य, संगीत ह्यांच्या आविष्कारांचा एकत्र बसून आनंद घेता यावा. आपल्या हळव्या क्षणी किंचितसा आधार मिळावा व आपणही प्रसंगी तो द्यावा. ह्यात लिंगसापेक्षता येतच नाही. हे पूर्णपणे मनाचे व्यापार आहेत. लिंगनिरपेक्ष मैत्रीस समाजात फारसे समजून घेतले जात नाही. प्रत्येक मुद्द्याला एक रेडिमेड लेबल लावून त्याचा अकारण गहजब करणारी एक फौज असते व त्यांच्याजवळ मोठी कुमक, बँड बाजा, ताशे जास्त असतात. समाजाची बंधने, रूढी, परंपरा वगैरेचे मोठ्ठे प्रिस्क्रिप्शनही अशांच्या जवळ तयारच असते.

योगुली यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवातून लिंगनिरपेक्षतेच्या संस्कारांसंदर्भाने भाष्य केले -

जीवनातला माझा सर्वांत पहिला मित्र आहे माझे पप्पा. पहिली पोळी (चपाती) त्यांनीच शिकवली मला आणि पहिल्यांदा शहाणी झाले तेव्हा रडतरडत त्यांच्याकडेच धाव घेतली मी, कारण आई गावाकडे असायची. त्यावेळी स्त्री-पुरुष, मुलगी-वडील असा भेद न करता ते काय असते, त्या चार दिवसामध्ये काय करायचे, कशी स्वच्छता राखायची, याची सविस्तर माहिती ते देत होते अगदी चारही दिवस. त्यांनीच नीडर बनवले मला आणि बिनधास्तही. तेव्हापासुनच लिंगनिरपेक्ष दृष्टिकोन आपोआपच रुजत गेला.

या आढाव्यासकट संपूर्ण परिसंवाद विशेषांक तुमच्या समोर ठेवत आहोत. मात्र तुमच्या चर्चारूपी सहभागाशिवाय हा अंक पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक लेखाच्या खाली प्रतिसादाची सोय आहे. तिथे आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात.
या ठिकाणी चर्चेसाठी धागा उघडलेला आहे. विषयाचा शोध या चर्चा धाग्यावर सुरू ठेवावा ही विनंती.

- संपादक मंडळ

प्रतिसाद

नीधप, नीलू, अगो, नादखुळा, नानबा, पराग, सानी, स्वाती२: खूप सुंदर लिहिले आहे.

छान आढावा. पूर्ण लेख नाहीत तरी विषयावरची ही सगळी मार्मिक मतं एकत्र करण्याची कल्पना उत्तम आहे.

योगुली, खूप भाग्यवान आहेस तू.

वा! निवड होऊ न शकलेल्या लेखांचाही आढावा घेण्याची ही कल्पना उत्तम :)

ललीता , मामी +१ ..

हे मस्त आहे.
किंबहुना इटॅलिक्समधील परिच्छेद वाचून जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या विषयाच्या संदर्भातली ही वसंत बापटांची कविता आठवली म्हणून इथे लिहीत आहे. यातला 'अकलंकाचे नाते' हा शब्द किती सुंदर आहे ना?

स्मरते तुजला शैशव आपुले मनहारी, चंदेरी
हसू-रुसूंचा गंगाजमनी शेला
नकळत विणला दोघांनी, दोघांनी

मांडव रचिले तरल धुक्यांचे, रंगांचे अंगांचे
त्यात मांडिली स्वयंवरे थाटाची
नल-दमयंती, सीता-रघुराजांची

मात्र आपुले सदैव होते अकलंकाचे नाते
शेजार्‍यांनी म्हटले काहीबाही
मात्र आपुली अभंग होती वाणी

स्मरते मजला विवाह मंगल तुझे
सजल कुंभ सुख सजल लोजना
तुझी करवली होते

हेवा केला बहिणींनी बहिणींनी
निरखियले अन मला नव्या वहिनींनी
कुतुहलाने, हलाहलाने किंचित

मात्र आपुले सदैव होते अकलंकाचे नाते
शेजार्‍यांनी म्हटले काहीबाही
मात्र आपुली अभंग होती वाणी

स्मरतो का परि तुझा कालचा अर्धस्फुट नि:श्वास
स्पर्शून माझ्या कानाच्या पाळीला
उडवून गेला कुरळ कुंतला भाळी

नि:श्वासाचा एक इशारा होता
गिळले माझे चक्र भुईने खाली
ऐन जगाच्या बाजारी उघडी मी

आता नाही खरेच वाटत मजला
की कृष्णाची बहिण होती कृष्णा
अन रामाची सीतेवरली प्रीत

(ही कविता आईला कॉलेजच्या फर्स्ट इयरला होती. ती ही नेहमी म्हणायची ते माझ्या लक्षात होतं. आता तिला फोन करून तिच्याकडून घेतली. पण तिला शेवटचं कडवं आठवत नाहीये. थोड्याफार इतरही चुका असण्याची शक्यता आहे. कोणाला माहित असल्यास सांगा.)

निवड न होऊ शकलेल्या लेखांतील उल्लेखनीय मुद्द्यांचा आढावा देण्याची कल्पना आवडली.

>> व्यवसायाच्या अनुषंगाने लिंगनिरपेक्षतेचा विचार
रैना आणि आगाऊंच्या लेखात दिसला ना हा. की त्यापलीकडे काही अपेक्षित होतं?

निवड न होऊ शकलेल्या लेखांतील उल्लेखनीय मुद्द्यांचा आढावा देण्याची कल्पना आवडली. >>> +१

निवड न झालेले लेखही वाचावेसे वाटत आहेत. शक्य आहे का संयोजक मंडळ?

निवड न झालेले लेखही वाचावेसे वाटत आहेत. शक्य आहे का संयोजक मंडळ?
>> +१

माफ करा पण याचे उत्तर नाही असेच द्यावे लागणार आहे. अंकाचे काम पूर्ण झालेले आहे.
निवड न केलेले लेख विशेषांकात सामील करणे शक्य नाही.
तुम्ही वैयक्तिक पातळीवर त्या त्या लेखकांना विनंती करू शकता किंवा ते ते लेखक आपले लेख वैयक्तिकरित्या प्रकाशित करू शकतातच.

तुम्ही वैयक्तिक पातळीवर त्या त्या लेखकांना विनंती करू शकता किंवा ते ते लेखक आपले लेख वैयक्तिकरित्या प्रकाशित करू शकतातच.>>

मी लेख दिलेला होता व तो स्वीकारला जाऊ शकला नाही याचा विरोपही मला मिळाला. त्यानंतर ही विनंतीही करण्यात आली होती की मुख्य अंक प्रकाशित होईपर्यंत मी माझा लेख प्रकाशित करू नये, जी अर्थातच मी मान्य केलीच. पण मला अजूनही तो लेख प्रकाशित करावासा वाटत नाही आहे याची कारणे:

१. जे काही त्या विषयावर मुळातच प्रकाशित झालेले आहे त्यावरही नेमकी व पुरेशी चर्चा होत असल्यासारखे (मला तरी) वाटत नाही आहे

२. कदाचित मी कव्हर केलेले मुद्दे मुळातच इतर काही जणांनी कव्हर केलेले असावेत असा माझा अंदाज आहे, खात्री नाही.

संपादक मंडळ -

आपण अनेक जाहिराती व संदेशांमार्फत हा विषय रुजवायचा व सर्वमान्य शैलीने त्यावर लेखन / चर्चाप्रस्ताव मागण्याचा भरपूर व यशस्वी प्रयत्न केलात हे खरेच, त्यामुळेच इतके लेख आले व इतकी चर्चा होत आहे. अभिनंदन!

मात्र लिंगनिरपेक्षता या संकल्पनेबाबत आपले थेट मुद्दे आपण एखाद्या चर्चाप्रस्तावात नोंदवायला हवे होतेत असे वाटते.

http://www.maayboli.com/node/33326?page=1#comment-1949403

या धाग्यावर आपण आपली कोणतीच मते (स्वतःची, म्हणजे संपादक मंडळाची व पॉलिसी म्हणून ठरलेली ) दिलेली नाहीत. माफ करा, पण चर्चा ड्राईव्ह करणे हे होतच नाही आहे. अजूनही विषयाबाबत गोंधळ असणे व गोंधळ असण्याबाबत तुमची ठाम विरोधी भूमिका असणे हेच होत आहे असे वाटते.

संपादक मंडळ म्हणून तुम्हा सर्वांना लिंगनिरपेक्षतेमधून काय म्हणायचे आहे आणि या उपक्रमाद्वारे तुम्ही त्यात कसे कसे यशस्वी झालात याबाबत लिहा की?

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

निवड होऊ न शकलेल्या लेखांमधील उल्लेखनीय मुद्दे व त्यांचा आढावा द्यायची कल्पना आवडली.

इथले दिपक भिडे यांचे विषयाशी संबंधीत नसलेले तसेच सर्व धाग्यांवर दिलेले तेच तेच प्रतिसाद काढून टाकलेले आहेत. चर्चेत सहभागी असलेल्या सर्व संबंधीतांना सूचना: तुमचे प्रतिसाद त्या त्या धाग्यापुरते मर्यादीत असूद्यात. कॉमन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संपादकांनी वेगळा धागा उघडला आहे.

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
इथले दिपक भिडे यांचे विषयाशी संबंधीत नसलेले तसेच सर्व धाग्यांवर दिलेले तेच तेच प्रतिसाद काढून टाकलेले आहेत. चर्चेत सहभागी असलेल्या सर्व संबंधीतांना सूचना: तुमचे प्रतिसाद त्या त्या धाग्यापुरते मर्यादीत असूद्यात. कॉमन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संपादकांनी वेगळा धागा उघडला आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

अ‍ॅडमिनिस्ट्रेटर :

विषयाशी संबंधित नाहीत असे कोणतेही मुद्दे मी लिहिलेले नव्हते, नाहीत नि असणारही नाहीत.... तुम्ही सिद्ध करा की माझे मुद्दे तसे होते किंवा मान्य करा की तुम्ही "काही न सांगता येण्यासारख्या कारणांसाठी" नीधप आणि दीपक यांचे प्रतिसाद काढून टाकले आहेत.

केवळ माझेच प्रतिसाद नाही तर तुम्ही नीधप यांचेही प्रतिसाद काढून टाकले आहेत, हे इथे तुम्ही का लपवले आहे?

तनया मोहंती यांनी मायबोलीसाठी त्यांच्या मुळातल्या लेखापासून वेगळा असा लेख मायबोलीसाठी लिहून दिला असं नीधप यांनी मला उद्धट भाषेत सांगितलं त्यावर मी त्यांना समज दिली की कृपा करुन उद्धट भाषा वापरु नका, व तनया मोहंती यांनी लिहिलेला लेख, जो तुमच्या म्हणण्याप्रमाणे नानबा यांनी अनुवादित केला, तो लेख मुळापासून देण्याची विनंती केली होती.

यात विषयापासून काय संबंधित नव्हते? मला तर असे दिसतेय की तुम्ही सर्वजण मिळून मला टारगेट करायला पाहत आहात. कशासाठी? असे म्हणा हवे तर की तुम्हा मंडळींना खरे ते लपवायचे आहे. का?

तेच तेच प्रतिसाद द्यायला लागल्याबद्दल तुमच्याकडून दिलगिरी अपेक्षित होती. अजूनही वेळ गेलेली नाही. खरे काय ते सर्वांसमोर आणा.

आता मला वाटू लागले आहे की तुम्हाला खरेच याचा जाब विचारायला हवा. आधी खरे बोला.

<<<<<<<<<<<<<
चर्चेत सहभागी असलेल्या सर्व संबंधीतांना सूचना: तुमचे प्रतिसाद त्या त्या धाग्यापुरते मर्यादीत असूद्यात
>>>>>>>>>>>>>>>>>>>

म्हणजे तेरी भी चूप, मेरी भी चूप?

संपादक मंडळ, अ‍ॅड्मिनिस्ट्रेटर महाशयः

पुसून टाकलेले सर्व प्रतिसाद व तनया मोहंती यांचा "मायबोलीसाठी लिहिलेला"लेख कृपा करुन सर्वांच्या संदर्भासाठी लगोलग द्या. सर्वांच्या फायद्याचे राहील. मूळ लेख काय लिहिला आहे व नानबा यांनी कसे अनुवादन केले आहे याचे निरीक्षण करायला मिळेल.

एक जुने हिंदी गाणे तुम्हा सर्वांसाठी आठवले:

जरा सामने तो आओ छलिये, छुपछुप छलने मे क्या राज है?
यहां छुप ना सकेगा परमात्मा, तेरी आत्मा की क्या आवाज है?

माझे मायबोलीचे अकाऊंट दोन दिवसांपासून कोणीतरी घुसखोर उघडायचा प्रयत्न करीत आहे. तुमच्या कोणाकडून तर ही आगळीक झालेली नाहिये ना? मला तीन तीन वेळा पासवर्ड पुनः पुन्हा मागवून घ्यावा लागलाय.

दररोज या अंकातले बहुतेक लेख 'बदलून' असे का दिसतात?

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
निवड न होऊ शकलेल्या लेखांमध्ये काही लेख विषयाला सोडून भरकटलेले वाटले तर काही विस्कळीत पण तरी त्या लेखांमध्येसुद्धा काही काही मुद्दे अतिशय महत्त्वाचे येतात. संपूर्ण लेख निवडीस पात्र ठरला नसल्याने त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणे योग्य नव्हे, या विचाराने न निवडलेल्या लेखांतील महत्त्वाच्या मुद्द्यांचा या आढाव्यामध्ये समावेश करत आहोत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
संपादक मंडळः

क्षमा करा, पण तुमचा मूळ उद्देशच काय याबद्दल आता शंका येऊ लागली आहे. कारण जेव्हा शंका विचारल्या जातात तेव्हा त्यांचे निरसन करायचे सोडून त्या व्यक्तीचे पोस्ट तुम्ही डिलीट करताय. का?

ललिता, प्रत्येक वेळी नवीन पोस्ट पडली की बदलून दिसतेय ते. मूळ लेखात बदल होत नाहीये.

ओह, ओके, नीरजा :)

भिडे, उगाच काय भांडताय अ‍ॅडमीनशी?

:)
अहो बेफिकीर, मीही शेवटी मराठीच पडलो ना...................!!

आणि, "अरे" ला "कारे" केलं नाही तर तो मराठी कसला? काय?

आणि शिवाय, "उगीच" तर मी नक्कीच भांडत नाहिये............ असो.

दीपक भिडे | गुरु., 03/15/2012 - 17:31 नवीन
आणि, "अरे" ला "कारे" केलं नाही तर तो मराठी कसला? काय?

आणि शिवाय, "उगीच" तर मी नक्कीच भांडत नाहिये............ असो.>>>>>>

याचा संबंध समजला नाही.

तुम्ही एका मुळातच प्रकाशित लेखाचा एक भाग सर्वत्र स्वतःच्या प्रतिसादातून सादर करत होतात इतके समजले व त्यामुळे प्रशासकांनी कडक भूमिका घेतली हेही समजले.

पण आता अरे ला कारे याचा संबंध काय हे काही समजलं नाही

असो

मी आता तुमचा लेख वाचतो

:-)

'शु भे च्छा'!

-'बेफिकीर'!

त्याचं असं झालं, की आपली चर्चा चर्चेच्या पानावर सुरू होती. माझ्या मनात विचार आला की नानबा यांनी ज्या लेखाचा अनुवाद केला आहे त्या लेखात ज्या चार संज्ञा लिहिल्या गेल्या आहेत त्या संज्ञा मुळात तनया मोहंती यांनी भारतीय समाजाच्या संदर्भात स्वतः तयार (डिवाईज) केल्या आहेत अथवा इतर देशातील कोणी समाजशास्त्री संशोधकाने तयार केलेल्या संज्ञा वापरुन त्यांच्या अनुषंगाने भारतीय समाजात सर्वे केला आहे? असा विचार येताच मी संपादक मंडळाला त्याबद्दल पृच्छा केली असता नानबा यांच्याकडून असे उत्तर आले की "जरी तनया मोहंती यांनी संज्ञा स्वतः तयार केल्या नसल्या तरी त्यांनी स्वतः अभ्यास करुन निष्कर्ष काढले आहेत". यावर मी लिहिले की असे अनेक सर्वे होत असतात व जर इतर देशातून केलेल्या सर्वेचे निकष भारतातील संदर्भात वापरले असतील तर तसे संशोधन व आपली चर्चाही फुकाची असेल. उदाहरणार्थ, "मेन आर फ्रॉम मार्स, वीमेन आर फ्रॉम वीनस" हे पुस्तक अमेरिकेतील स्त्री-पुरुष नजरेसमोर ठेवून लिहिलेले असल्याने भारतीय परिप्रेक्ष्यात ते पुस्तक केवळ मनोरंजन ठरते.

यावर नीधप यांचे उत्तर असे होते : "नानबा यांनी सांगितलेले तुम्हाला समजत नाही का? " !!

मला साहजिकच शंका आली की मुळात तनया मोहंती यांचा लेख यांनी वाचला आहे काय? म्हणून मी शोधला तर त्याच्या सारांशात जे दिलं होतं ते नि नानबा यांनी केलेला अनुवाद, या दोन्ही लेखांत बराच फरक जाणवला. मी तसे लिहून दाखवले तर समोरून अधिकच आक्रमक व उद्धट भाषा वाचायला लागली. मला असेही उत्तर मिळाले की नानबा यांनी मी जो सारांश कोट केला आहे त्याचे (तनया मोहंती यांनी लिहिलेल्या मूळ लेखाचे) भाषांतर केले नसून, त्यांनी मायबोली साठी वेगळा (स्वतंत्र) लेख पाठवला होता, त्याचे भाषांतर केले आहे !! त्यामुळे साहजिकच मी त्यांना विचारले की मग आता आम्हाला तो लेख वाचायला मिळाला तर बरे होईल, कारण तेव्हाच मला वा इतरही कोणाला नानबा यांचा अनुवाद मूळ लेखाशी कितपत प्रामाणिक आहे हे समजेल, व त्याप्रामाणे टीका (कौतुक / टिप्पणी) करता येईल. मला असे वाटले की सर्वजणांच्या पोस्ट वर माझे म्हणणे टाकावे म्हणजे कोणालातरी ही संपादक मंडळाकडून झालेली गडबड लक्षात येईल. पुढे अ‍ॅड्मिनिस्ट्रेटर यांनीही माझी बाजू समजून न घेता रिमार्क दिले, जे तुम्ही वाचले असतील.

मी तनया मोहंती यांच्याशी ई मेल द्वारे संपर्क साधला असता त्यांनी मला सांगितले आहे की, होय, माझी शंका रास्त आहे, व त्यांनी स्वतः या संज्ञा भारतीय संदर्भात तयार केल्या आहेत (भुवनेश्वर जवळील भागात त्याबद्दल संशोधन केले आहे). याचाच अर्थ हा, की मुळात (निदान नानबा यांना तरी) हे मुळात माहित नव्हते. मग त्यांनी मला असे उत्तर कसे दिले, की "जरी तनया मोहंती यांनी संज्ञा स्वतः तयार केल्या नसल्या तरी त्यांनी स्वतः अभ्यास करुन निष्कर्ष काढले आहेत"?

आता मला सांगा, यावर मला राग येणार नाही का? नानबा, नीधप व अ‍ॅडमिनिस्ट्रेटर यांच्या मुळातील "अरे" लाच मग मला "कारे" करावे लागले आहे ना?