मी, तीनशे किलोंचे धूड आणि एक सप्ताहांत

योसेमिटे हे पार्क जवळपास बाराशे चौ. मैलांवर पसरलेलं आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारा निसर्ग, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यांसाठी ते प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. मर्क नदी व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टिंग करता येतं.

border2.JPG

गस्ट महिन्यात अजून एकही ट्रिप झाली नाही, नॅशनल पार्कचा पास संपतोय आणि त्याचे ऐंशी डॉलर वसूल होत नाहीयेत, उन्हाळा संपत आला तरी कुठेच भटकंती झाली नाहीये, मोटरसायकल पार्किंगमध्ये धूळ खात पडलीये, ऑफिस-घर-ऑफिस करून करून गाढवाचं जिणं नशिबी येतंय.... एवढी कारणं माझ्यातला भटका भगत जागवायला पुरेशी होती. बुधवारी रात्री निर्णय घेतला की, येत्या सप्ताहांती योसेमिटे-मोनो लेकला मोटरसायकल दामटायची. 'कोणी कंपनी देईल का' म्हणून विचारायला चार बाइकर्स आणि पंधरा-वीस कारवाल्या मित्रांना मेल केला. अर्थात इतक्या ऐनवेळी विचारल्यामुळे कोणीही यायला तयार झाले नाही. पण आपला विचार एकदा झाला की झाला. शेवटी एकट्यानेच जायचं ठरवलं. होम मिनिस्टरांची इतक्या लांब मोटरसायकलवर बसण्याची अजिबात तयारी नव्हती. शेवटी त्यांच्याकडून हो-ना करता करता मला एकट्याला जायची परवानगी मिळाली.

मोटरसायकलवर रपेट मारायची तर सुरक्षितता सर्वांत महत्वाची. भारतात असताना मोटरसायकलवरून अगदी ब्रेड आणायचा झाला, तरी मी हेल्मेट वापरत असे. 'हेल्मेट हवं की नको' हे वाद फक्त भारतातच नाही तर अगदी अमेरिकेतही होतात. पण म्हणतात ना, 'सर सलामत तो राईड पचास'. त्यातल्या त्यात भारतात मोटरसायकलचा वेग आणि वजन पाहता हेल्मेट आणि थोडं जाड जॅकेट असलं की, चालून जातं पण इकडे मात्र हेल्मेटसोबत रायडिंग जॅकेट, पॅंट, बूट आणि ग्लोव्ज वापरलेलं चांगलं असतं. तीनशे किलोच्या मोटारसायकलवरून ताशी एकशेवीस किमीच्या वेगाने जाताना पडलो, तर त्यातून वाचायला एव्हढं सगळं लागणारच ना! त्याचबरोबर मोटरसायकल चालवायला सुरक्षित आहे की नाही, हेदेखील वेळोवेळी पाहणं योग्य असतं. टायर थ्रेड चेक करणे, तेल, हवा, पाणी योग्य आहे की नाही ते पाहणे, लादलेले सर्व सामान व्यवस्थित लादले गेले आहे की नाही ते पाहणे, कुठून खडखड आवाज येत असेल तर त्याचा योग्य तो बंदोबस्त करणे, इतक्या गोष्टी तर नेहमीच केल्या गेल्या पाहिजेत. कारच्या तुलनेत मोटरसायकल ट्रिपसाठी जरा जास्त काळजी घ्यावी लागते. पण एकदा का मोटरसायकल रपेटीचं व्यसन जडलं की, मग ते सुटणं कठीण असतं. या सर्व गोष्टी आदल्या रात्रीच करून झाल्या होत्या. सकाळी बेसिक चेक करून लगेच निघायचा बेत होता. पण एरवी चटकन संपणारा शुक्रवार आज रेंगाळत होता. सगळं पॅकिंग संपवूनही बराच वेळ शिल्लक होता. लवकर उठायचं म्हणून लवकर झोपायला गेलो तर झोपही येत नव्हती. अखेरीस रात्रभर पन्नासवेळा घड्याळ पाहून झाल्यावर एकदाची शनिवारची पहाट उजाडली. पावणेसातला मोटरसायकलला कॅमेरा बॅग, सॅडल बॅग, टॅंक बॅग आणि ट्रायपॉड बांधून मी तयार झालो. ताशी पासष्ट मैलाच्यावर(ताशी एकशेपाच किमी) मोटरसायकल न्यायची नाही, सांभाळून जायचं, झोप आली तर मोटरसायकल बाजूला लावून तोंड धुवायचं, अश्या हजार सूचना ऐकता ऐकता सात वाजले आणि एकदाचा मी मार्गाला लागलो. जीपीएस योसेमिटे साडेतीन तासांच्या अंतरावर दाखवत होता. एखाद-दुसरा फोटो ब्रेक आणि फ्युएल ब्रेक घेऊन माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण अकरा-साडेअकरापर्यंत पोहोचायला काही हरकत नव्हती. पहाटे हवेत गारठा होता. ग्लोव्ह्ज असूनही मुठी गारठत होत्या पण त्या गारठ्यामुळे निसर्गाच्या एकदम कुशीत शिरल्यासारखं वाटत होतं. मला वाटतं, असला अनुभव घेण्यासाठी बाईकच हवी. कार नामक पिंजर्‍यात तो कधीच मिळणं शक्य नाही. शहरातल्या गर्दीत मोटरसायकल चालवणं आणि शहराबाहेरच्या मोकळ्या निसर्गात मोटरसायकल चालवणं यात अल्ताफ राजाचं गाणं आणि रफी साहेबांचं गाणं ऐकण्यातला जो फरक आहे, तो आहे. ज्यांनी मोटरसायकलवर अजून शहराबाहेर एकही रपेट मारली नाहीये, त्यांनी शहराबाहेर एखाद्या सप्ताहांती तीनचार तासांची एक रपेट मारून बघा. पुण्याचे लोक महाबळेश्वरला जाऊ शकतात आणि मुंबईचे लोक लोणावळा, खंडाळा वा माथेरान करू शकतात. कोकणातले रस्ते तर एकदम मस्तच आहेत, ख़ास करून NH-17, पण हो, आधी सुरक्षितता महत्वाची!

दोन तासांनी, योसेमिटेचा घाट सुरू व्हायच्या आत एक ब्रेक घेतला. गुड-डे बिस्किटे खाऊन येणार्‍या-जाणार्‍या मोटरसायकलवाल्यांना हात दाखवत त्यांना 'गुड डे' विश करत होतो! फक्त ४५ मैल अंतर बाकी राहिलं होतं. पण आता उरलेलं अंतर घाटात होतं. जसजसा वर चढत होतो, तसतसं दरीचं रूप मोहक होत होतं. प्रत्येक हेअरपिन बेंडला उभं राहून फोटो काढावासा वाटत होता. दरीत फॉल कलर्स ऑगस्टमध्येच यायला सुरुवात झाली होती. पहा, तुम्हाला दिसतायत का ते...

Fall Colors_0.jpg

योसेमिटे हे पार्क जवळपास बाराशे चौ. मैलांवर पसरलेलं आहे. नयनरम्य धबधबे, श्वास रोखून धरायला लावणारा निसर्ग, जंगली जनावरं आणि रोज भेट देणारी माझ्यासारखी असंख्य टाळकी यांसाठी ते प्रसिद्ध आहे. हायकिंगची मजा लुटण्यासाठी फार चांगलं ठिकाण आहे. मर्क नदी व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पाचव्या स्तरापर्यंत तेथे राफ्टिंग करता येतं.

सव्वाअकराच्या सुमाराला योसेमिटेच्या गेटवर पोहोचलो. तिथे वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. माझा नंबर येईपर्यंत पंधरा-वीस मिनिटे गेली. माझ्याकडे पास आहे, असं सांगितल्यावर तो न पाहताच मला आत सोडण्यात आलं. आत गेल्यावर पावलापावलावर फोटो काढावेसे वाटत होते. मोटरसायकल असल्यामुळे पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम नव्हता. तिथल्या रिफ्लेक्शन लेकचा एक फोटो काढल्यावर कुणीतरी उपद्व्यापी कार्ट्याने त्या पाण्यात एक दगड मारला. त्याच्यापाठोपाठ त्याच्या बापाने एक मारला. मला त्या दोघांनाही मारून पाण्यात फेकावंसं वाटत होतं, पण इंग्रजीतला एक चार अक्षरी शब्द उच्चारण्यापलीकडे काहीच करता आलं नाही.

Yosemite1.jpg

reflection lake_0.jpg

दिवसभर साफ असणारं आकाश आता भरून यायला लागलं होतं. मग मी ते पाणी स्थिर होण्याची वाट न पाहता तिथून काढता पाय घेतला. मला सूर्यास्तापूर्वी मोनो लेकला पोहोचायचं होतं. आकाश आता पूर्ण अंधारून आलं होतं. वाटेत टेनाया लेकच्या इथे हे विलोभनीय दृश्य दिसलं आणि थांबलो.

dark clouds.jpg

एका छोट्याश्या सरीनंतर आता आकाशातील मळभ सरू लागलं होतं. पण कॅलिफोर्नियातील सर्वांत उंच मानल्या जाणार्‍या टिओगा पासच्या घाटात अत्यंत वेडीवाकडी हवा वाहत होती; साडेसहाशे पौंडांच्या मोटरसायकलीला त्याच्यावरच्या दीडशे पौंडांच्या स्वारासहित दरीत ढकलायला बघत होती. त्या घाटात दरीच्या दिशेला संरक्षक कठडेही नव्हते.

Tioga pass.jpg

उन्हाळा संपायला आला, तरी जागोजाग बर्फाच्छादित टेकड्या दिसत होत्या. थांबून फोटो काढावेसे वाटत होते. पण न जाणो, या हवेने दीडशे पौंडांच्या मला दरीत भिरकावले तर, या भीतीपायी मी न थांबता मोटरसायकल चालवत राहिलो. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मोटेलमध्ये चेक-इन केलं. जाऊन पाहतो तर काय, रूममध्ये फक्त बेसिन आणि बेड होता. फोनवर बुक करताना त्यांनी मला बेसिन आणि बाथरूम सेपरेट असतील, म्हणून सांगितलं होतं. मला वाटलं की, एकाच रूममध्ये बेसिन बाथरूमच्या बाहेर असेल, पण ते एवढे सेपरेट असतील, असं वाटलं नव्हतं! सूर्यास्ताला अजून अवकाश होता. एक कॉफी मारून जरा ताजातवाना झालो. साऊथ टुफा तिथून ७ मैलांवर होती. म्हटलं, लवकर जाऊन थोडी मोक्याची जागा पटकवावी. जाऊन पाहतो, तर मोक्याच्या जागा अगोदरच पटकावल्या गेल्या होत्या. त्यातल्यात्यात एका बर्‍या जागेवर मी माझ्या ट्रायपॉडचा संसार मांडला. थोडेफार सूर्यास्तापूर्वीचे फोटो काढून झाल्यावर सूर्यास्ताची वाट पाहू लागलो. पण नशिबात बहुतेक सूर्यास्ताचे रंग नव्हते. तासाभरापूर्वी निरभ्र असणारी पश्चिम दिशा अचानक ढगांनी भरून गेली. सूर्यास्त नशिबी नाही म्हटल्यावर सगळे फोटोग्राफर काढता पाय घेऊ लागले. काही वेळापूर्वी असणारी शेकडो माणसे निघून गेली आणि हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच टाळकी तिथे शिल्लक राहिली. निसर्गाला बहुतेक उरलेल्यांची दया आली असावी. त्यामुळे सूर्यास्ताचे नारिंगी केशरी नसले तरी, आसमंत एका गूढ निळ्या रंगाने त्याने भरून टाकला.

blue1_0.jpg

Blue2_0.jpg

अंधार पडल्यावर मी परत निघालो, वाटेत एक 'नेव्ही बीच १ मैल' दर्शवणारी पाटी दिसली. म्हटलं, एवढं आलो आहोत तर अजून एक मैल जाऊन येऊ आणि वळवली मोटरसायकल तिकडे. मोठ्ठी चूक! तो रस्ता एकतर निर्मनुष्य होता आणि कच्चा होता. शेवटी होऊ नये ते झालं. माझ्या बाईकचं मागील चाक मातीत रुतून बसलं.

stuck motorcycle_0.jpg

ते तीनशे किलोंचं धूड माझ्या एकट्याने हलणं तर शक्यच नव्हतं. इमर्जन्सी सर्व्हिसवाले म्हणाले, आम्ही नाय बा कच्च्या रस्त्यावर येत! आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं आणि रात्रीचे नऊ वाजले होते. मला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला. जाऊन पाहतो तर एका आर.व्ही.मध्ये एक गोरं जोडपं सुट्टीवर आलं होतं. त्यांना मोटरसायकल हलवण्याबाबत विनंती केली. नशिबाने ते तयार झाले. त्यांच्या मदतीने कशीतरी ती मोटरसायकल बाहेर काढली आणि नशिबाने त्याच्यानंतर मुख्य रस्त्यावर येईपर्यंत ती कुठे अडकली नाही.

मोटेलवर परत आलो तेंव्हा दिवसभरात दोनशे एक्याऐंशी मैल रपेट मारून झाली होती. त्या छोट्याशा गावात रात्री मी पोहोचेपर्यंत खायचे सगळे पर्याय बंद झाले होते. पण बराच थकल्यामुळे भुकेल्या पोटीही मस्त झोप लागली.

रात्रीच्या प्रकारामुळे होम मिनिस्टरांकडून 'रविवारी सकाळी उजाडलं की, गपगुमान घरी यायचं' अशी सक्त ताकीद मिळाली होती. पण घरच्या वाटेत 'बोडीचं स्टेट पार्क आहे' म्हटल्यावर, माझ्यातला फोटोग्राफर चाळवला. म्हटलं फक्त बोडीसाठी पुन्हा एक ट्रिप होईल की नाही, कोणास ठाऊक? बोडी हे कॅलिफोर्नियाच्या गोल्डरशसाठी उभं केलेलं आणि एकेकाळी दहाहजार लोकसंख्या असणारं एक छोटंसं गाव. पण त्या गावात गोल्डरशमुळे रोजच एक-दोन मुडदे पडायला लागले. असं होता-होता साधारण पन्नास-साठ वर्षांपूर्वी तिथला शेवटचा माणूस सोडून गेल्यावर ज्या स्थितीत गाव आहे, त्याच स्थितीत त्याचं जतन करण्यात आलं. 'फोटोग्राफर्स पॅराडाईज' म्हणून ओळखल्या जाणार्‍या जागांपैकी ही एक जागा आहे. होम मिनिस्टरांच्या धमकीमुळे तिथे केवळ एक तास घालवून मी परतलो. ही त्या भुताटकीने झपाटल्यासारखी दिसणार्‍या गावाची काही चित्रे :

Ghostroom_0.jpg

Bodie Car1_0.jpg

Wheel.jpg

परतताना सोनोरा पास नावाच्या घाटातून गेलो. हा माझ्या आत्तापर्यंतच्या रपेटीतला सर्वांत सुंदर मार्ग होता. पण घरी लवकर पोहोचायचं असल्यामुळे मी तिथे थांबलो नाही. तेवढंच पुन्हा भटकायला निमित्त! सहा तासांच्या राईडनंतर आणि पाचशेबासष्ट मैलांच्या रपेटीनंतर जेव्हा संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा शरीर थकलं होतं, होम मिनिस्टर रागावल्या होत्या पण मन मात्र एकदम ताजंतवानं झालं होतं...

- प्रवीणपा

Taxonomy upgrade extras: