गंगेच्या काठी

मावळत्या सूर्याच्या साक्षीने, सहस्र ज्योतींच्या प्रकाशात गंगेचे स्तवन करणारे मंत्रघोष, दुमदुमणारा गंभीर घंटानाद, प्रवाहात फुलांनी सजवलेल्या द्रोणांतून सोडलेले असंख्य दिवे, वातावरणात भरून राहिलेला कापूर-चंदनाचा सुगंध.... पंचेंद्रिये तृप्त व्हायची. बसल्या जागी आपोआप डोळे मिटायचे. मन स्थिर व्हायचे. एक गहिरी शांती अंतर्यामी दाटून यायची.

border2.JPG

ति

चे पहिले दर्शन झाले ते काळ्या रेशमी अंधारात. हृषीकेशनगरी निद्रेच्या अधीन होण्याच्या बेतात होती. सभोवतालच्या पर्वतरांगा आणि वनराजी अंधारात लुप्त झाल्या होत्या. धुक्याच्या दुलईत वेढलेल्या नगरखुणांमध्ये कोठेतरी दूरवर एक धडधडणारी चिता दिसत होती. उत्तरेकडून येणारे थंडगार वारे अंगाला झोंबत होते. दोन दिवसांच्या प्रवासानंतर शिणलेले, आंबलेले शरीर घेऊन ऊबदार मुक्कामाच्या ओढीने आम्ही रामझुला ओलांडू लागलो आणि तिच्या पहिल्याच स्नेहल दर्शनाने तिथेच थबकलो. निळ्या-काळ्या अंधारात रस्त्यावरच्या मंद उजेडासरशी चमचमणारे तिचे पाणी, तो खळखळता अवखळ प्रवाह, काठावर डुचमळणार्‍या नौका आणि धुक्याचे अवगुंठन ल्यालेले दगडी घाट...

एखादे चित्र जिवंत अवतरावे तसे तिचे ते गूढ दर्शन मनस्वी भावले.

विभूषितानङ्गरिपूत्तमाङ्गा सद्य:कृतानेकजनार्तिभङ्गा |
मनोहरोत्तुङ्गचलत्तरङ्गा गङ्गा ममाङ्गान्यमलीकरोतु ||

गंगे, माते, तुझ्या ओढीने आज इथवर आणलेय. आजवर तुझे दर्शन फक्त चित्रांमधून, कृत्रिम पडद्यावर होत राहिले. तुझी स्तोत्रे, गाणी, श्लोक यांनी माझी वाचाशुद्धी झाली. तुझ्या सुरस कथांनी माझे बालपण समृद्ध झाले. आता या नेत्रपटलांना तुझ्या दिव्य सौंदर्याचं दर्शन प्रत्यक्ष होत आहे. तुझं हे आनंददायी स्वरूप मला अंतर्यामी साठवून घेऊ दे गं माये!

मनात हे असे विचार दाटून येत होते. नकळत कंठ भरून आला होता. अजूनही रेंगाळलो असतो तिथेच! पण आमचे सामान हातगाडीवर वाहून नेणार्‍या भारवाहकाला आपल्या घराचे वेध लागले होते. एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ती भेटली आणि लगेच तिचा निरोपही घ्यावा लागणार होता. तिला मनोमन दुसर्‍या दिवशी भेटण्याचे वचन दिले आणि जड पावलांनी तिथून निघाले.

स्वर्गाश्रमाच्या वाटेवर ती अधूनमधून दर्शन देतच राहिली. मार्केट रोड संपत आला तसे वेगवेगळे आश्रम दिसू लागले. ह्या रस्त्यावर अनेक आश्रम आहेत. घडवलेले रस्ते व घाट यांनी नटलेला हा शांत, रम्य परिसर देवभूमी हे नाव सार्थ करणारा. त्याच्या एका टोकाला स्वर्गाश्रम. वाटेत गीता भवन, परमार्थ निकेतन यांसारखे अनेक सुंदर आश्रम. तेव्हा परमार्थ निकेतनच्या पुढ्यातील घाटावर आतासारखी विशालकाय शिवमूर्ती वसली नव्हती. पण तरीही तिथून होणारे गंगेचे दर्शन लोभसवाणे होते. स्वर्गाश्रमाची खासियत म्हणजे त्याच्या मुख्य द्वारापासून गंगेचे पात्र अगदीच थोड्या अंतरावर आहे. आणि येथे दगडी घाट वा पायर्‍या नसून पाण्याच्या अखंड प्रवाहाने झिजून गुळगुळीत झालेल्या दगडगोट्यांचे पात्र आहे. त्यावरून चालत, उड्या मारत तुम्ही थेट गंगेच्या पात्रात शिरू शकता. घाटाप्रमाणे इथे वर्दळही नसते. असते ती फक्त गूढगंभीर शांतता!

त्याच रात्री मी ठरवले, पहाटे गंगास्नानाला जायचे! भल्या पहाटे चारचा गजर लावला, तरीही उठायला साडेचार वाजलेच. घाईघाईत बदलायच्या कपड्यांचे बोचके हातात घेऊन घाटाच्या दिशेने चालू लागले. सोबत ओला अंधार तर होताच! रात्रीतून पाऊस पडून गेला असल्यामुळे रस्ता ओलाचिंब झाला होता. वाटेतील आश्रमांमध्ये तशी सामसूम दिसत होती. पण ती किती फसवी होती ते मला घाटावरच्या लोकांच्या गर्दीवरून कळले.

देशोदेशींचे, भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले भाविक पर्यटक आणि आश्रमांमध्ये निवासास असलेले साधक यांची वर्दळ पाहून मला नवल वाटत होते. घाटावरच्या निसरड्या पायर्‍यांवरून तोल सावरत मी खाली गंगेच्या पात्राच्या अगदी जवळ पोहोचले खरी, पण इतक्या थंडीत त्या बर्फाळ पाण्याचा स्पर्शही कसा असेल ह्या विचाराने अंगावर शिरशिरी येत होती. आजवर कोणत्या नदीत स्नान केले नव्हते. आणि पहिले नदीस्नान करण्याचा योग आला तोही गंगेच्या पात्रात!

थोडासा संकोच, थोडीशी भीती आणि त्याचबरोबर गंगेच्या पाण्याची अनिवार ओढ, ह्या सर्वांमुळे मी काहीशी गोंधळले होते खरी!

सोबतच्या महिला गंगेत डुबक्या मारून, स्नान उरकून आल्या तरीही मी काठावरच होते. मग मनाचा हिय्या करून पायर्‍यांना लडिवाळपणे ढुशा देणार्‍या पाण्यापर्यंत आले.

शेजारी एक अनोळखी वयस्क महिला पाण्यालगतच्या पायरीवरच आपला अवाढव्य देह तोलत बसली होती. हातातल्या लोटीने ''जय गंगा मैंया'' पुकारत अंगावर गंगेचे पाणी ओतून घेत होती. त्या बाईंनी माझी घालमेल पाहिली आणि चुचकारत म्हणाल्या, ''बेटा, पहले मैय्याको प्रणाम करो । और बादमें उनके पानीमें पाँव रखना. देखो, तीन डुबकियां लगाना. पहले कठिनाई होती है, लेकीन मैंया सँभाल लेती है.'

कोणा अनोळखी व्यक्तीशी बोलायला काहीही निमित्त, परिचय वगैरे लागतोच असे नाही, हे मी गंगेच्या तीरी पुन्हा एकदा नव्याने अनुभवले. त्या बाईंचा अनुभवी सल्ला शिरोधार्य मानून आधी गंगेच्या त्या पाण्याला मनोभावे नमस्कार केला. मनातल्या मनात म्हटले, ''बाई गं, बोलावून तर घेतलेस, आता तुझा थंडगार स्पर्श सहन करण्याची ताकदही दे!! मला पोहता येत नाही, तेव्हा सांभाळ गं बायो मला!! ''

त्या माउलीने माझी प्रार्थना ऐकली असावी. साखळदंडाचा आधार घेत कंबरभर पाण्यात उभे राहत, बसत मी पहिली डुबकी मारली आणि त्या बर्फाळ पाण्याचा गोठवून टाकणारा प्रथम स्पर्श झण्णकन् शरीरातील नसांनसांना जागेपणाची जाणीव करून गेला. क्षण-दोन क्षण काय झाले तेच कळले नाही. माझ्या अगोदर डुबकी मारणार्‍यांची उडालेली गाळण मी याची देही याची डोळा पाहिली असल्यामुळे खरं तर मला थोडीफार कल्पना आली होती. परंतु त्या पहिल्या डुबकीचा झटका देणारा, पेशी अन् पेशी जागृत करणारा अनुभव वर्णनातीत होता!

मी पाण्यातून डोके बाहेर काढले नाहीच, ते आपण होऊनच निघाले. पुढची काही मिनिटे केवळ त्या बर्फाळ अनुभवातून श्वास सावरण्यात गेली. पुन्हा एकदा मनाचा हिय्या, पुन्हा एक डुबकी. पुन्हा तोच अनुभव!

तिसरी डुबकी मारायला शरीर जुमानत नव्हते. तेवढ्यात माझ्याकडे लक्ष ठेवून बसलेली ती महिला उद्गारली, ''लगाओ, लगाओ बेटा, और एक डुबकी लगाओ.' पडत्या फळाची आज्ञा मानून मी पुन्हा एकवार त्या पात्रात मस्तक बुडविले आणि काय आश्चर्य! एवढा वेळ मला धक्क्यावर धक्के देणारा तो प्रवाह आता मखमली लडिवाळपणे अंगावर झेपावत होता. मघाचा गारठा आता अजिबात जाणवत नव्हता. थोडा वेळ साखळदंडाला धरून त्या पाण्यात तशीच डुंबले. पाण्याच्या शुभ्र तुषारांशी मस्ती करताना खूप मस्त वाटत होते. मनातली भीती चेपली गेली होती. गंगेचे विशाल पात्र जणू मला खुणावत होते. आजूबाजूची स्नानासाठी आलेल्या लोकांची गडबड, घाटावरचे आवाज.... काही काही जाणवत नव्हते. त्या जगात फक्त मी होते आणि होते गंगेचे ते मातृवत लडिवाळ पाणी. ते अनोखे द्वैत विलक्षण शांत करणारे होते. तिच्या त्या कृष्ण श्यामल रूपात मोठ्या प्रेमाने विहरताना वेगळाच आनंद आणि ऊर्जा मिळत होती.

जरा वेळाने ओलेत्या अंगाने कुडकुडत मी पाण्याच्या बाहेर आले. त्या वयस्क बाई आपले स्नान आटोपून कधीच नाहीशा झाल्या होत्या. निथळत्या पावलांनी घाटावरच्या कपडे बदलण्याच्या जागेवर जाऊन अंगावर कोरडी वस्त्रे चढवली. इथेही तोच एकांताचा भास. आत्ममग्न होणे हे असेच असते का? एव्हाना क्षितिजावर आकाशाचा रंग पालटू लागला होता. सभोवतालच्या शेकडो देवळांमधील घंटानाद वातावरणातील गंभीर मुग्धतेला झंकारून जात होता. वृक्षमाथ्यांवर पक्षी किलबिलू लागले होते. ओल्या अनवाणी पावलांनी भिजलेल्या मातीचा स्निग्ध स्पर्श अनुभवत मी स्वर्गाश्रमाची वाट धरली ते गंगेला पुनःपुन्हा भेटायचे वचन देऊनच!

गंगेची व माझी ती पहिली गळाभेट केवळ अविस्मरणीय! त्यानंतर मला अनेकदा गंगेकाठी जाण्याचा, तिथे मुक्कामी राहण्याचा व गंगेच्या पात्रात डुंबण्याचा योग आला. परंतु पहिल्या प्रेमाप्रमाणे गंगेत केलेले ते पहिले स्नान आजही माझ्या मनात ताजे आहे!

नंतरचे दहा दिवस मी अनेक रूपांमधील गंगा अनुभवत होते. पहाटे बर्फाळ असणारे तिचे पाणी सकाळी सहा-साडे सहाच्या दरम्यान अजूनच गार असते ह्याचाही अनुभव घेतला. कधी भर दुपारी कडकडीत उन्हात तिच्या शीतल पात्रात पाय घालून बसले, तर कधी कातरवेळी, सायंकाळी पश्चिमेला बुडणार्‍या सूर्याच्या साक्षीने समाधिस्थ होणारी गंगा अनुभवली. एखाद्या कातळावर बसून तिच्या अखंड वाहणार्‍या प्रवाहाकडे अनिमिष नेत्रांनी बघत मीही आपोआप मौन झाले. कधी डोळे जडावले, मिटले आणि ध्यान लागले तेही कळले नाही. तिच्या खळखळाटाचा जणू ध्यासच लागला. पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी अनेकदा रामझुल्यावरून जाण्याऐवजी आम्ही नदीतून छोट्याशा होड्यांमधून जायचो. नदीपात्राच्या मध्यभागी पोचलो की पाण्यात डोकावून बघायचे. इतका स्वच्छ, नितळ प्रवाह की पात्राचा दगडगोट्यांनी आच्छादलेला तळही दिसायचा. लांबुळके काळे मासे इकडून तिकडे विजेच्या चापल्याने पोहताना, उड्या मारताना पाहण्यात मजा यायची. पात्रात हात घातला तर त्या वेगवान प्रवाहात हाताची कातडी किंचित सोलवटली जायची.

गंगेच्या किनार्‍याभोवतीची अनेक दृश्येही ह्या अनुभवाचा एक अविभाज्य भाग होती. अंगाला राख फासलेले, जटाधारी कृश बैरागी हातात कमंडलू, त्रिशूळ घेऊन तिच्या दर्शनाला नित्य यायचे. अनेकदा तिथेच पायर्‍यांवर बसून राहायचे. कधी कोणी चिलीम ओढत आपल्याच विश्वात धुंद पडलेले दिसायचे. स्वर्गाश्रमापासून काही अंतरावर धगधगणार्‍या चिताही दिसायच्या. त्यांचा तो जळका वास आणि धूप, कापूर, चंदन, उदबत्त्यांचा सुगंध ह्यांचे बेमालूम मिश्रण झालेले आढळायचे त्या हवेत! एकीकडे एक आयुष्य संपत असायचे तर दुसरीकडे नव्या आयुष्याचा उत्सव सुरू असायचा. कोणी पितरांना तर्पण देत असायचा तर कोणी शून्यात नजर लावून बसलेला असायचा. अनेक परदेशी लोक पावलापावलाला आढळायचे. कोणी भारतीय पोशाख घालून, तिलक-गंध-भस्मचर्चित अवस्थेत असायचे तर कोणी हिप्पी स्टाइलने वावरताना दिसायचे. अनेकदा घाटांवर गायी, वासरे आणि कळपाकळपाने वावरणारे वानरसमुदायही दृष्टोत्पत्तीस यायचे. आणि इतर कोणत्याही तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथील स्थानिक लोक आपले गिर्‍हाईक हेरण्यात आणि त्याचा पाठपुरावा करण्यात अव्वल नंबर!

दोन-तीन दिवसांनंतर आमच्या स्वयंसेवी गटातील लोकांनी गंगेचा काठ स्वच्छ करण्यास, तेथील कचरा, प्लॅस्टिक उचलण्यास सुरुवात केली. जवळजवळ बारा-तेरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट! स्थानिक लोक कुतुहलाने आम्ही काय करतोय हे बघत असायचे. मग हळूहळू त्यांच्यातील काही उत्साही लोकही सामील होऊ लागले. मार्केट रोडवरील व्यापार्‍यांनीही आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहकांना सामान प्लॅस्टिकच पिशव्यांतून न देता कागदी किंवा कापडी पिशव्यांमधून देण्यास अनुकूलता दर्शविली. सुरुवातीला आम्ही त्यांना वर्तमानपत्रांच्या रद्दीच्या पिशव्या भेटीदाखल दिल्या. नंतर त्यांच्यापैकी काहींनी ते तंत्र शिकूनही घेतले.

आमचा जथ्था काठावर फिरत तेथील कचरा गोळा करत असायचा. ते पाहून अनेक पाश्चात्य पर्यटकही आमच्याबरोबर उत्स्फूर्तपणे कचरा वेचू लागायचे. हा अनुभव खूप आगळा होता. बरं, कोणताही कलकलाट नाही, गोंधळ नाही. मूकपणे, शिस्तीत काम चालू असे. आठ दिवस असे केल्यावर स्थानिक लोकही पर्यटकांना कचरा करू नका, कचरापेटीचा वापर करा, प्लॅस्टिक इतस्ततः फेकू नका वगैरे आवाहन करू लागले. लोकांचा बदलणारा दृष्टिकोन व सवयी हीच आमच्या श्रमांची पावती होती. तास-दोन तास काम केल्यावर घामेजलेल्या अंगाने, दमलेल्या शरीराने गंगेच्या पात्रात पाय जरी बुडवले, त्या शीतल जलाचा किंचित स्पर्श जरी झाला तरी तत्काळ सारा शिणवटा दूर पळत असे.

गंगेच्या सोहळ्यातील सर्वांत सुंदर भाग म्हणजे सायंकालीन गंगारती. हा अतिशय देखणा, नादमयी, चित्तवृत्तींना संजीवन देणारा उत्सव प्रत्यक्ष अनुभवण्यासारखाच असतो! हरिद्वारप्रमाणे येथे गर्दी नसायची. मात्र उत्साह तोच! परमार्थ निकेतनच्या समोरील घाटावर होणार्‍या गंगारतीला आम्हांला कायमचेच निमंत्रण असायचे. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, सहस्र ज्योतींच्या प्रकाशात गंगेचे स्तवन करणारे मंत्रघोष, दुमदुमणारा गंभीर घंटानाद, प्रवाहात फुलांनी सजवलेल्या द्रोणांतून सोडलेले असंख्य दिवे, वातावरणात भरून राहिलेला कापूर-चंदनाचा सुगंध.... पंचेंद्रिये तृप्त व्हायची. बसल्या जागी आपोआप डोळे मिटायचे. मन स्थिर व्हायचे. एक गहिरी शांती अंतर्यामी दाटून यायची. त्या शांतीत डुबकी मारताना गंगेच्या पात्रानेच आपल्याला कवेत घेतल्याचा अनुभव यायचा. किती क्षण, मिनिटे अशीच जायची ते कळायचेच नाही.

जाग यायची तेव्हा सूर्य मावळलेला असायचा. गंगेचे नितळ पाणी दाटून आलेल्या अंधारात अजूनच लोभस दिसायचे. त्या गार पात्रावरून येणारे वारे अंगावर शिरशिरी आणायचे. दोन्ही किनार्‍यांवर दिवेलागणी झालेली असायची. आश्रमांच्या परिसरातून सायंकालीन परवचांचे स्वर कानी पडायचे. कोणी बैरागी-संन्यासी रस्त्याच्या कडेला एकतारीवर तल्लीन होऊन भजने म्हणताना दिसायचा. कोणी बाबाजी धुनी पेटवून तिच्या उबेत चिलीम ओढत असायचा. कोणी हिप्पी झोकावत, हिंदकळत आपल्याच नशेत चूर होऊन जाताना दिसायचा. काळ जणू येथे स्थिरावला होता. बदलत्या परिस्थितीच्या खुणा अंगी बाळगतानाही तिथे एक प्रकारचा कालातीतपणा जाणवायचा. जणू अनादी काळापासून हे जीवनचक्र इथे असेच चालू आहे. माणसे बदलली, सत्ता बदलल्या, परिसर बदलला.... परंतु येथील घनगर्भ शांतता, ह्या वातावरणात ठायी ठायी जाणवणारे तरंग समयातीत आहेत. गंगेच्या प्रवाहात जाणवणारी विरक्ती, वैराग्यभाव तिच्या सहवासात आपोआप मनात उतरू लागायचा. एका वेगळ्याच धुंदीत परतीच्या वाटेला लागायचे.

काही वेळा आम्ही पलीकडच्या तीरावरील घाटावरून गंगारतीचा आनंद घ्यायचो. एकाच वेळी सर्व घाटांवर बांधली जाणारी ती गंगेची मनोरम पूजा पाहून नेत्रांचे पारणे फिटायचे. कानात फक्त घंटानाद व मंत्रघोष घुमत राहायचा. मी कोण, कुठली, माझ्या अस्तित्वाचा उद्देश काय.... असे प्रश्नतरंग आपोआप मनात उमटत जायचे. कधी त्यांच्या उत्तराचा विचार करताना विस्मय वाटायचा, तर कधी निरुत्तर व्हायचे. सोऽहं, कोऽहंचा हा संवाद मनोमन चालूच राहायचा. कधीतरी थंडगार वार्‍याच्या शिरशिरीने वास्तवाचे भान यायचे. जवळच कोणीतरी शेकोटी पेटवू लागलेले असायचे. त्या उबेशी बसायला कोण कोण येईल ह्याची शाश्वती नसायची. धुंद बैराग्यांपासून हिप्पींपर्यंत, भिकार्‍यांपासून भटक्या कुत्र्यांपर्यंत कोणीही त्या शेकोटीच्या आसर्‍याला येताना दिसायचे. परतीच्या मार्गाला लागण्यासाठी एवढे पुरेसे असायचे.

एव्हाना मार्केट रोडवरील दुकानांमधून लोकप्रिय स्तोत्रे, आरत्या व भक्तिगीतांची चढाओढ लागलेली असायची. चोटीवालाच्या परिसरात 'असली देसी घी'मध्ये बनवलेल्या आलू पराठे, समोसे आणि कचोरीचा भूक चाळवणारा वास अलगद सर्वसामान्य जगात घेऊन यायचा. भोवतालच्या अंधाराची जाणीव व्हायची. झपाझप पावले उचलत स्वर्गाश्रमाचा रस्ता कापताना मन मात्र अजूनही गंगातीरीच रेंगाळत असायचे. रात्री उशिरा टिपूर चांदण्या अंगावर मनसोक्त झेलून झाल्या की कधीतरी अशीच झोप लागायची. स्वप्नातही गंगेच्या आर्त ओढीची साद मात्र कानात तशीच गुंजत राहायची!

गंगेच्या पाण्याशी खेळून आजमितीला सात-आठ वर्षे लोटली. आता पुन्हा त्या माईच्या कुशीत शिरण्याची, तिच्या संजीवक स्पर्शाची आणि उल्हसित करणार्‍या चैतन्याची मनोमन प्रतीक्षा आहे.

- अरुंधती कुलकर्णी

Taxonomy upgrade extras: