पर्यावरण, संशोधन आणि मी...

वनखात्याला नुसतीच नावं ठेवण्यापेक्षा लोकांनी काही मदत केली तर खूप जास्त सकारात्मक काहीतरी होऊ शकेल. मला प्रामुख्याने वाटतंय ज्या लोकांना थोडासा कळवळा आहे या सगळ्यांबद्दल, त्यांनी सरकारी लोक किंवा यासंदर्भात धोरणं आखणार्‍या लोकांबरोबर काम केलं तर बर्‍याच गोष्टी होऊ शकतील. वनखातं काही गोष्टी करू शकतं ज्या लोक करू शकणार नाहीत आणि लोक काही गोष्टी करू शकतात ज्या सरकारी खात्यांमधून सहजपणे नाही होऊ शकणार. त्यामुळे जर हे दोन्ही गट एकत्र आले तर काहीतरी आशेचा किरण आहे.

border2.JPG

००२ साली प्रसिद्ध झालेल्या 'एका रानवेड्याची शोधयात्रा' या पुस्तकामुळे मराठी वाचकांना कृष्णमेघ कुंटेचे नाव चांगलेच परिचयाचे आहे. मदुमलाईच्या जंगलातील संशोधनाचे अनुभवकथन असलेले हे पुस्तक. १९९९ साली देहरादून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून (WII) वन्यजीवशास्त्रातील उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अमेरिकेतील ऑस्टिन, टेक्सास येथील टेक्सास विद्यापीठामधून परिस्थितिकी, उत्क्रांती आणि वर्तन (ecology, evolution and behavior) यांमधील संशोधनावर २००८मध्ये पीएच.डी मिळवली. सध्या तो अमेरिकेतीलच हार्वर्ड विद्यापीठात पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो म्हणून संशोधन करत आहे. फुलपाखरे या मुख्य अभ्यासविषयाला अनुसरून उत्क्रांती, परिस्थितिकी, जैवविविधता या विषयांवर त्याचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्याचा प्रवास, संशोधन व जडणघडणीबद्दल त्याच्याशी मारलेल्या या गप्पा.

km3.jpg

तू फुलपाखरांवर संशोधन करायचं हे कसं ठरवलंस?

ते थोडंसं रोचक आहे. मी अगदी सुरुवातीला निसर्ग निरीक्षणासाठी फिरायला लागलो तेव्हा पुण्यात काय, भारतातदेखील फार कमी लोक फुलपाखरं बघायचे. माझी स्वतःची शिबिराची सुरवात 'फ्रेन्ड्स ऑफ अ‍ॅनिमल्स'मधल्या शिबिरांपासून झाली. ८४-८५ साली मी पहिलं शिबीर केलं होतं. तेव्हा बाहेर गेल्यावर लोक काय दाखवायचे, तर पक्षी, प्राणी, साप, थोडीफार झाडं. पुण्यामध्ये विशेषतः पक्षी आणि सापांवर जास्ती लक्ष केंद्रित केलं जात होतं. बहुतांशी अभयारण्यं, शिबिरं यांचा भर असायचा तो वन्य प्राणी पाहण्यावर, त्यामुळं त्यांच्यावर आधीपासूनच संशोधन सुरू होतं. पण तेव्हा पुण्यामध्ये किंवा भारतामध्ये फुलपाखरांवर फारसं संशोधनात्मक काम झालेलं नव्हतं.

मी आधी चारएक वर्षं पक्षी आणि प्राणी बघत होतो आणि सापही पकडायला लागलो होतो. पण तरीही या तिन्ही प्रकारांत मी काम असं सुरू केलं नाही. मी बघायचो, निरीक्षण करायचो, नोंदी करायचो पण खरं शास्त्रीय संशोधन म्हणता येईल अशी सुरुवात मी केली नव्हती. त्यानंतर ९१च्या सुरवातीला किंवा ९०च्या शेवटी माझी फुलपाखरांशी ओळख झाली. लगेचच काही महिन्यांत मी पुण्यातल्या चार जागा निवडल्या आणि त्या ठिकाणी एक वर्षभर दर आठवड्याला जाऊन निरीक्षणं करणं चालू केलं. कुठल्या जातीची फुलपाखरं कुठे, कुठल्या आठवड्यात जास्त दिसली, त्याच्या नोंदी. त्या वेळेला मी बारावीसुध्दा झालेलो नव्हतो आणि मला फुलपाखरांबद्दल सांगणारं किंवा त्यांचा असा असा अभ्यास कर, असं मार्गदर्शन करणारं कुणीच नव्हतं. नंतर मिलिंद वाटवेसरांनी मला विश्लेषण करायला किंवा शोधनिबंध लिहायला खूप मदत केली. पण त्यावेळी ते मदुमलाईला पीएच.डी करत होते. मग पुण्यामध्ये माझं मीच डोकं लढवून प्रयोगाचा आराखडा तयार केला आणि निरीक्षणं नोंदवायला लागलो. जरी आधी मी पक्षी किंवा प्राण्यांवर भरपूर वेळ घालवला होता, तरी त्यांच्याविषयी असं काहीतरी करून बघावं, असं मला सुचलं नव्हतं. पण फुलपाखरांबद्दल काही वाचलं नसूनसुद्धा, ते सगळं माझ्यासाठी खूप नवीन असूनसुद्धा, मला पहिल्यांदा आतून असं वाटलं की, यांचा अभ्यास करण्यासारखा आहे आणि करावा. नंतर मी मदुमलाईला गेलो. तिथे काय केलं ते सगळं 'एका रानवेड्याची शोधयात्रा'मध्ये आहे. तिथून परत आल्यावर मी फुलपाखरांवर जास्त लक्ष केंद्रित केलं.

km2.jpg

सुरुवातीला तुला बरंच धडपडावं लागलं असेल मग त्यावेळी...

फुलपाखरांवर संशोधनात्मक काम फारसं नव्हतं असं मी म्हटलं ते भारताच्या संदर्भात. परदेशामध्ये त्यांच्यावर बरंच संशोधन झालं होतं. अर्थात त्यावेळी मला ते माहीत नव्हतं, पण नंतर तरी वाचता आलं. ९७ साली आलेला माझा शोधनिबंध हा त्यावेळी भारतामधला त्या प्रकारचा पहिलाच शोधनिबंध होता. खरंतर भारतातल्या फुलपाखरांवर काही खूप सुंदर पुस्तकं आहेत. त्यातलं शेवटचं पुस्तक १९५७ साली M. A. Wynter-Blyth नावाच्या ब्रिटिश माणसानं लिहिलेलं होतं. हा माणूस गुजरातमध्ये शाळेत शिकवायचा बरीच वर्षं. खूप सुंदर पुस्तक आहे हे माहितीच्या दृष्टीनं. भारतामध्ये ते पहिलं असं पुस्तक होतं ज्यात फुलपाखरांच्या प्रत्येक प्रजातीबद्दल माहिती होती. त्यांच्या अळ्या कुठल्या झाडांवर राहतात, मोठी प्रौढ फुलपाखरं कुठल्या झाडांवर असतात, अशी खूप माहिती त्यात दिलेली होती.

यात काम करायचं असं ठरवल्यावर मग पुढचा प्रवास कसा झाला? कारण तू IISc मध्येही होतास काही काळ...

मदुमलाईच्या पुढचा प्रवासदेखील थोडा मजेशीर आहे. तिथून परत आल्यावर मी आधी बीएस्सी संपवलं. भारतातला पहिला मोठा वन्यजीवनाचा अभ्यासक्रम देहरादूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये आहे. तिकडे बरीच स्पर्धा असते. नेहमीच्या एमएस्सीसारखा तो अभ्यासक्रम नाहीये. प्रत्येक वेळी फक्त दहा विद्यार्थ्यांना ते वन आणि पर्यावरण मंत्रालयाची शिष्यवृत्ती देतात. वर्ग बर्‍यापैकी लहान असतात. दर दोन वर्षांनी एक तुकडी असते. तिकडे सुदैवाने माझी निवड झाली. त्यामुळे WIIमध्ये मी एमएस्सी केलं. एमएस्सीला तीन सहामाहींचा अभ्यासक्रम असतो आणि त्यात चौथ्या सहामाहीला जो विषय निवडला असेल त्या विषयात तुम्ही भारतात किंवा भारतीय उपखंडात जी जागा निवडली असेल तिकडे जाऊन सहा महिने प्रकल्प करायचा असतो. त्यासाठी मी कोईमतूरजवळचं जे अनमलाईचं (Topslip) जंगल आहे तिथे फुलपाखरांवर काम केलं. ते माझं दुसरं महत्त्वाचं असं फुलपाखरांवरचं काम होतं. पहिलं जे पुण्यातलं काम होतं ते बर्‍यापैकी महत्त्वाचं होतं, पण त्याची पातळी खूप वेगळी होती. त्यावेळी मला फुलपाखरांच्या संदर्भातल्या संज्ञा नीट कळायच्या आधीच मी ते काम केलेलं होतं. पण या प्रकल्पाच्या वेळी मला संशोधनासंदर्भात थोडी कल्पना आलेली होती. ह्यादरम्यान म्हणजे ९८च्या नोव्हेंबरपासून ते ९९च्या मेपर्यंत त्यावेळेला मी बंगलोरला खूपदा जायचो. तिथे IIScमध्ये माझा एक मित्र होता उत्कर्ष घाटे नावाचा. सुरवातीला या फुलपाखरांच्या कामामध्ये त्यानेसुद्धा खूप मदत केलीये. तो सह्याद्रीमध्ये जैवविविधतेवर माधव गाडगीळांबरोबर काम करत होता. त्यांना त्यावेळी कुणीतरी फुलपाखरांवर काम करायला हवं होतं. उत्कर्षने त्या प्रकल्पावर काम करायला मला त्यांच्या संपर्कात आणलं. ते माझं सुरुवातीच्या कामांपैकी जैवविविधतेमध्ये सर्वांत मोठं काम होतं. आधी पुण्यातून, मग बंगलोरमधून, मग WIIमधून, असं थोडं थोडं करत माझं फुलपाखरांवरचं काम मी पुरं करत होतो.

आताच्या तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे?

मी माझं पोस्टडॉकचं काम ज्यावर करतो आहे त्या 'बेटेशियन नकले'ची (Batesian Mimicry) मूळ कल्पना अशी की, छोटे प्राणी किंवा किडे यांना खाणारे मोठे प्राणी कायमच असतात. त्यांचं भक्ष्य होणं टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रजाती वेगवेगळ्या मार्गांनी उत्क्रांत झाल्या आहेत. काही वेगात उडतात, तर काही छद्मावरण (camouflage) स्वीकारतात, काहींमध्ये जैविक बदल झालेले आहेत. काही फुलपाखरं विषारी झालेली आहेत किंवा काही किडेही. त्यांची नक्कल करणारे इतर काही किडे आहेत. काही विषारी साप असतात आणि त्यांची नक्कल करणारे बिनविषारी सापही असतात. हे जे नक्कल करणारे प्राणी आहेत ते स्वतः विषारी नसतात. पण ते इतर विषारी जातींसारखे दिसायला लागतात हळूहळू. तशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असली तरी यासाठी फुलपाखरं जास्त प्रसिद्ध आहेत. जेव्हा पक्षी विषारी फुलपाखरांना खातात तेव्हा त्यांचा वेगवेगळ्या पक्ष्यांवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. पण एकदा त्यांना कळलं की, अमुक फुलपाखरं विषारी आहेत, की ते त्या प्रकारची फुलपाखरं किंवा तशी दिसणारी फुलपाखरं खायचं टाळतात. आणि मग दुसरी जी बिनविषारी फुलपाखरं आहेत त्यांतल्या काही जाती या विषारी जातीच्या फुलपाखरांची नक्कल करतात. त्यामुळं पक्षी ही नकली बिनविषारी फुलपाखरंसुध्दा खात नाहीत. अशा नकलेच्या कार्यप्रक्रियेवर मी काम करतो आहे.

km1.jpg

आधीचं माझं पीएच.डीचं काम केवळ भारतातल्या फुलपाखरांवर असं नव्हतं. त्यासाठी मी पूर्ण जगभरातील फुलपाखरं बघत होतो. पण पोस्टडॉकचं काम हे भारतातल्या प्रजातींवरचं आहे. मी ज्या फुलपाखरांचा अभ्यास करतोय ती फिलिपीन्समधली आहेत आणि ही प्रजाती भारतापासून ते जपान, श्रीलंका, फिलिपीन्स अशी सगळीकडे दिसते. Common Mormon (Papilio polytes) नावाची ही प्रजाती आहे. नर पाहिलेस तर ते काळे आणि त्यावर पांढरा एक पट्टा असतो. माद्या मात्र वेगवेगळ्या रूपात असतात. भारतामध्ये या माद्यांचे तीन प्रकार सापडतात. त्यांत एका प्रकारात नर-मादी दोघेही सारखेच दिसतात. म्हणजे मूळ बिनविषारी फुलपाखराचा नमुना आहे तसे दिसतात. बाकीच्या दोन माद्या Common Rose (Pachliopta aristolochiae) आणि Crimson Rose या विषारी फुलपाखरांची नक्कल करतात. दुसरं एक उदाहरण म्हणजे Plain Tiger( Danaus chrysippus). ते थोडसं जास्त रंगीत असतं. त्याची नक्कल एक Danaid Eggfly (Hypolimnas misippus) नावाचं फुलपाखरू करतं. हे Plain Tiger शहरात बागांमध्ये दिसतं तर Danaid Eggfly शक्यतो झुडुपांवर दिसतं. यातला नरसुध्दा Common Mormonच्या नराप्रमाणेच कुणाची नक्कल करत नाही. पण माद्या मात्र Plain Tigerची नक्कल करतात.

आता काही जातींमध्ये फक्त नर, काही जातींत फक्त माद्या, तर काही जातींत दोघंही नक्कल करतात. या प्रकारची विविधता का निर्माण झाली असावी, यावर मी थोडसं काम करतोय. पुढची एक बाब म्हणजे एखाद्या पक्ष्याला विषारी फुलपाखरू खाऊन त्रास झाला तरच तो त्या प्रकारची फुलपाखरं खाणं टाळेल. बरोबर? त्यामुळे एखादं बिनविषारी नकली फुलपाखरू असेल तर त्याला अशा साधर्म्याचं संरक्षण मिळतं. पण ही बिनविषारी नकली फुलपाखरं जर का खूप जास्त झाली, तर नवीन जे पक्षी असतात घरट्यातून बाहेर पडलेले, नुकतेच स्वतःच्या स्वतः शिकार करायला लागलेले, ते सगळ्यांत आधी कुठलं फुलपाखरू चाखतील, तर बिनविषारी. ते जर का त्यांनी आधी खाल्लं - विषारी फुलपाखरू खाऊन अक्कल सुचण्याच्या आधी किंवा अनुभव येण्याच्या आधी - तर त्यांना कळणार नाही आणि ते त्या प्रकारची फुलपाखरं खात राहतील. त्यामुळं जर का बिनविषारी फुलपाखरांची संख्या वाढली तर त्याचा फायदा बिनविषारी फुलपाखरांना किंवा विषारी फुलपाखरांना नसतो किंवा पक्ष्यांनाही नसतो. तर या विषारी आणि बिनविषारी फुलपाखरांचं एकमेकांबरोबरचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यावरून बिनविषारी फुलपाखरं त्यांची नक्कल करू शकतील की नाही, हे ठरतं.

आपल्याकडच्या जंगलांविषयी आणि आज होणार्‍या पर्यावरणाच्या हानीबद्दल काय सांगू शकशील?

आता जैवविविधता वर्षाच्या निमित्ताने आणि इतर वेळीसुध्दा आपण ऐकतो की, जागतिक तापमानवाढ (Global Warming) चालू आहे किंवा प्राण्यांचे अधिवास (habitat) नष्ट होत आहेत. सगळ्या पशुपक्ष्यांची संख्या कमी होत आहे किंवा मोठ्या प्राण्यांची शिकार खूप चाललीये. गेंडे नष्ट होत आहेत कारण त्यांच्या शिंगांसाठी त्यांची हत्या केली जाते. सुळ्यांसाठी हत्तींची हत्या होत आहे, आणि त्यांचे अधिवास खूप कमी झाल्यामुळे मानवी हस्तक्षेप खूप वाढला आहे. हत्तींनी शेतात येऊन नासधूस केली की चिडून लोक हत्ती मारतात. या सगळ्या गोष्टी तर निश्चितच होत आहेत आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण हादरून जागे झालेलो नाही आणि अजून अशा गोष्टी करणं थांबवलेलं नाही, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. आता परवापरवाच एक लेख वाचला की भारताच्या मानाने महाराष्ट्राची लोकसंख्यावाढ कमी झाली आहे. पण तरीही महाराष्ट्राचा प्रश्न थोडा जास्त अवघड आहे कारण मुळातच लोकसंख्या जास्त आहे. आणि ज्या प्रकारे शेती केली जातेय, खर्च करण्याची क्षमताही लोकांची वाढली आहे, त्यामुळे साधनसंपत्तीचा वापर वाढलाय. एकतर हा वापर कमी होण्याची काही चिन्हं नाहीत आणि खासकरून गेल्या काही दशकात खूपच जंगलतोड चालली आहे. त्यामुळे खरं बघायला गेलं तर चित्र बर्‍यापैकी निराशाजनक आहे. पण काही जागांवर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्या जागा आपण जतन करायचा प्रयत्न केला, तर जैवविविधतेच्या दृष्टीने ते चांगलं ठरेल.

विशेषतः मागच्या दशकात WWF, पुणे आणि काही संस्था खूप चांगलं काम करत होत्या. जसं भीमाशंकर हा एक शेवटचा तुकडा उरलाय तो चांगल्या प्रकारे संरक्षित करणं. त्यासाठी आम्ही दोनेक वर्षं भीमाशंकरला जंगलात जाऊन लोकांनी ३१ डिसेंबरला दंगा करू नये यासाठी प्रयत्न केले होते. तसंच मुळशीच्या जवळ एक माणूस शेकराची कातडी विकायचा. त्याला पकडून आम्ही वनखात्याच्या हवाली केलं होतं. अशा बर्‍याच गोष्टी अजूनही लोक करत असतील, आणि हे फक्त लोकांचंच नाही तर वनखात्याचंही काम आहे. पण वनखात्याला नुसतीच नावं ठेवण्यापेक्षा लोकांनी काही मदत केली तर खूप जास्त सकारात्मक काहीतरी होऊ शकेल. मला प्रामुख्याने वाटतंय की, ज्या लोकांना थोडासा कळवळा आहे या सगळ्यांबद्दल, त्यांनी सरकारी लोक किंवा यासंदर्भात धोरणं आखणार्‍या लोकांबरोबर काम केलं तर बर्‍याच गोष्टी होऊ शकतील. वनखातं काही गोष्टी करू शकतं ज्या लोक करू शकणार नाहीत आणि लोक काही गोष्टी करू शकतात ज्या सरकारी खात्यांमधून सहजपणे नाही होऊ शकणार. त्यामुळे जर हे दोन्ही गट एकत्र आले तर काहीतरी आशेचा किरण आहे. सगळ्यांत मोठा मुद्दा हा आहे की, पुण्यामुंबईतील लोक किंवा कोल्हापूर-नागपूरमधले लोक - ज्यांचा आवाज गावकर्‍यांपेक्षा मोठा आहे - या लोकांनी जर साधनसंपत्तीच्या वापराचं प्रमाण कमी केलं तर मागणी थोडी कमी होईल, आणि त्यामुळे जंगलावरचा ताण कमी होईल.

पर्यावरणाचा बळी देऊन आपण जो विकास साधतोय तो काही अंशी कमी करायला हवा...

बर्‍याच, बर्‍याच अंशी कमी करायला हवा. आपण साठ-सत्तरच्या दशकात बोलत असतो तर काही प्रमाणात कमी करायला हवा, असं मी म्हटलं असतं. पण आता आपण अशा स्थितीला पोचलोय की काही पावलं तातडीनं उचलली नाहीत तर अवघड आहे. मी लहानपणी मुठा नदीच्या पात्रात जाऊन वेगवेगळे पक्षी पाहू शकायचो. तिकडे भरपूर साप, बेडूक, चतुर किंवा अनेक कोळी असायचे. पक्षी बघायला किंवा त्यांच्यावर काम करायला खूप मिळायचे. तिकडे आता थोडेच उरलेत. हे एक उदाहरण झालं. आता किमान साध्या साध्या गोष्टी ज्या काही करायच्या त्या तरी ठामपणे केल्या पाहिजेत. साधी गोष्ट, प्लॅस्टिक पिशव्यांवरून लोक खूप बोंबाबोंब करत असतात. पुण्यात झालंय का प्लॅस्टिक बंद?

नाही, पूर्णपणे नाही...

तेच तर. दबाव गटांनी त्यावर जोर दिला पाहिजे. त्यासाठी चांगले कायदे करवून घ्यायचे आणि ते झाले की ते राबवायला मदत करायची. पण हे दबावगट सम्यकदृष्टी देऊ शकत नाही. लोक जेव्हा तक्रार करतात किंवा त्यासाठी दबाव आणतात तेव्हाच त्या गोष्टी होतात. जोपर्यंत पर्यावरणवादी म्हणतील की हे बंद करायला हवं आणि तरीही लोक पिशव्या घेतील तोपर्यंत पिशव्या तयार करणारे लोक करत राहणार आणि घेणारे घेत राहणार. त्यासाठीच दबाव गट थोडे जास्त सशक्त व्हायला हवेत. खरंतर साध्या प्लॅस्टिक पिशव्यांबद्दल चर्चासुद्धा करायची गरज नाही. लोकांनी स्वत:च सहजपणे सुरू केलं पाहिजे. त्यापलीकडेसुध्दा बदल करता येऊ शकतात. लोक चहाकॉफी पितात तर ते कमी करू शकतील. सह्याद्री किंवा आसाममध्ये जंगलं तोडून चहाकॉफीचे मळे झालेले आहेत. तुम्ही चार कपांच्या ऐवजी दिवसातून एक कप पिऊ शकता. तसं म्हटलं तर खूप साधी गोष्ट आहे आणि तसं म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे. अजून काय तर साधे सुती कपडे वापरावेत. किंवा पुण्यात खूप उकाडा असतो तर पातळ कपडे वापरावेत आणि पंखा कमी लावावा. इतक्या साध्या गोष्टी आहेत. पण त्या मुळात खूप लोकांनी करायला हव्यात. त्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत लोकांना उपकरणं लागणार, त्यासाठी वीज लागणार, त्यासाठी धरणं लागणार.

विकसनशील देश म्हणून भारताचं पर्यावरणविषयक धोरण काय असावं असं तुला वाटतं?

खरंतर भारत आणि चीनसारख्या देशांची इतर कुठल्याही देशांशी तुलना करू नये. तरी मी इथे थोडी भारत आणि अमेरिकेची तुलना करतो आहे. अमेरिकेची लोकसंख्या आणि एकूण भूभाग किती हे बघायला गेलं तर अजूनही प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे नैसर्गिक संपत्ती आहे, जंगलं आहेत, पेट्रोलियम साठा आहे. खनिजं किंवा शेतजमीन, इतर अनेक गोष्टींसाठी जमीन भरपूर आहे. आणि आधुनिक संवर्धन चळवळ अमेरिकेत सुरू झाली. इंग्लंडमध्येही पर्यावरण चळवळीसंदर्भात गोष्टी होत होत्या. पण त्याचा जो आधुनिक चेहरा होता तो अमेरिकेतून आला होता. त्या पार्श्वभूमीवर आजकाल अमेरिकेत काय चालू आहे हे बघायला गेलं तर खरंच खूप निराशाजनक गोष्टी दिसतात. पर्यावरण चळवळ साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकात जेवढी प्रबळ होती ती आता राहिलेली नाही. मेक्सिकोच्या आखातात जी तेलगळती झाली त्यावर खूप बोंबाबोंब झाली. मग त्यांनी त्यावर काही कायदा किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या का? तर नाही. या सगळ्यांची भारत किंवा चीनशी तुलना केली तर चीनविषयी आहेत काही गोष्टी बोलण्यासारख्या. पण भारतावर मी जास्त भर देईन. भारताच्या लोकसंख्येची घनता बघायला गेलो तर आपल्याकडे अमेरिकेच्या मानाने किंवा एकूण जगाच्या मानाने काही पट जास्त घनता आहे. आपल्याकडची साधनं बघायला गेलो तर खूप कमी आहेत. लोकसंख्या लक्षात घेता आपल्याकडे खूप कमी नैसर्गिक साठे आहेत. आणि भारताच्या डोक्यावर जे काही भूत बसलेलं आहे महासत्ता बनण्याचं, म्हणजे अर्थव्यवस्था वाढवायची आहे, आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे. त्यामुळं साधनसंपत्तीचा वापर वाढणार आहे. या सगळ्यांचा प्रचंड ताण आहे आपल्या पर्यावरणावर.

विकसनशील देश म्हटला की बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन इथली साधनसंपत्ती वापरतात आणि त्या़कडे आपण विकास म्हणून दुर्लक्ष करतो. सध्या आर्थिक वाढीसाठी जमेल तिथे धरणं बांधायचा प्रयत्न सुरू आहे, मिळतील त्या जमिनी वापरल्या जात आहेत, जमेल तिथे लाकूडतोड होते आहे, जितकं ओरबाडता येईल तितकं घ्यायचं, असं सुरू आहे. सकारात्मक बाब अशी की, या पार्श्वभूमीवरसुद्धा गेल्या दहाएक वर्षांत वनविभागाने बर्‍याच ठिकाणी यशस्वीरीत्या नवीन अभयारण्यं निर्माण केलेली आहेत, राष्ट्रीय उद्यानं निर्माण केलेली आहेत. भारतात आता जी काही औद्योगिक क्रांती सुरू आहे त्यासाठी साधनसंपत्ती आणि जमीन हवी आहे आणि त्याचे तात्कालिक आर्थिक लाभ खूप पटींनी जास्त आहेत. एवढं असूनसुध्दा वन मंत्रालयाने ठिकठिकाणी जंगलांसाठी आणि संवर्धनासाठी जागा राखीव ठेवलेली आहे, हे निश्चितच प्रशंसनीय आहे. हे सगळं का झालं, तर काही वनाधिकारी किंवा तज्ज्ञ त्यात लक्ष घालत आहेत. सरकार काही गोष्टी करायचा प्रयत्न करत आहे, शास्त्रज्ञ काही गोष्टींवर अभ्यास करत आहेत. या गोष्टी आपण जितक्या अधोरेखित करू तितका सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. सरकारविरुद्ध पर्यावरणवादी संस्था कायम भांडायला उठलेल्या आहेत, असं जे चित्र आहे ते बदलायला मदत होईल. आणि ते जितकं बदलेल तितका त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. नेहमी ज्या निराशाजनक गोष्टी समोर येतात त्यामुळं लोक खचून जाऊन काहीच करत नाहीत किंवा काय करायचं हेही त्यांना माहीत नसतं. या क्षेत्रात, वनविभागात नासके आंबे नाहीत असं नाही. पण काही लोक काही चांगलं करायचा प्रयत्न करत आहेत. एकतर आपण नासक्या आंब्यांना लक्ष्य करू शकतो किंवा जे लोक चांगलं काही काम करत आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे हात जास्त बळकट करून काही चांगलं करू शकतो. आता कुठे लक्ष द्यायचं हे लोकांना कळायला हवं. या सकारात्मक गोष्टी पुढे आल्या तर लोकांना या गोष्टींसाठी पाठिंबा द्यावासा वाटू शकेल. मुळात लक्ष दुसरीकडे कुठेतरी केंद्रित करण्यासारखं आहे, ही गोष्टच लोकांना माहीत नसते कारण बहुतांश वेळा प्रसारमाध्यमं त्यांची मनोभूमिका घडवतात. तज्ज्ञांपासून ते सामान्य जनतेपर्यंत जी उतरंड आहे त्यात सर्वांनीच वेगवेगळ्या पातळीवर काम केलं पाहिजे. काही शास्त्रज्ञ किंवा सरकारी नोकर यांना खूप प्रभावशाली संवाद साधता येतो. पण ज्यांना सहसा धोरणं आखणं जमतं त्यांना संवाद साधणं जमत नाही. पत्रकारांचं, प्रसारमाध्यमांचं मोठं काम असं असेल की, त्यांनी सरकार, शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक यातला दुवा बनावं.

दुसरी बाब म्हणजे काही खूप महत्त्वाचे कायदे झालेले आहेत. त्या कायद्यांमध्ये सुधारणा करायला हव्यात का? तर निश्चितच करायला हव्यात. पण महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी अशी आहे की ते कायदे झालेले आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा जैवविविधता कायदा २००४ साली संमत झाला. त्यामुळे आधीच्या मानाने आपलं संवर्धनविषयक धोरण बळकट झालं आहे. पूर्वी ब्रिटिश सरकारने जंगलातील आदिवाशांकडून जमीन हिसकावून घेतली होती, आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तीच भूमिका चालू ठेवलेली होती. पण आदिवासी कल्याणावर भर देण्यात आला विशेषतः गेल्या वीस-पंचवीस वर्षांत. त्यामुळे ही जमीन आदिवाशांना परत देण्यात आली. हा एक खूप महत्त्वाचा कायदा आहे, पण काही लोकांच्या मते त्याची अंमलबजावणी खूप चुकीच्या पद्धतीनं झाली आणि आदिवाशांना त्याचा पुरेसा फायदा होणार नाही. पण भविष्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर या गोष्टी सुधारता येण्यासारख्या आहेत. हे सगळं मी आदिवाशांबद्दल बोललो त्याचं कारण असं की, भारतात अमेरिकेसारखी किंवा दक्षिण अमेरिकेसारखी 'जंगलं आहेत पण माणसं नाहीत' अशी जागा जवळपास नाही. म्हण़जे १०० किमीच्या परिसरात का होईना कुठे ना कुठे तरी गावं असतीलच. आणि सर्वांत मोठी समस्या ही होती की आपण राष्ट्रीय उद्यानं तयार केली तेव्हा या लोकांना बाहेर काढलं. या लोकांचा प्रचंड राग होता संरक्षित भूभागजालाबद्दल (Protected area network). अशा प्रकारचे काही कायदे झाले तर त्यांना थोडा हिस्सा मिळेल. विशेषतः त्यांची जी पूर्वीची जमीन होती ती कायदेशीररीत्या त्यांच्या हाती सोपवली गेलेली आहे. आपल्याकडे आत्तापर्यंत संवर्धन म्हणजे शहरातून आलेल्या लोकांनी गावकर्‍यांवर काहीतरी लादायचं अशी संकल्पना होती. वनविभागाने एकात्मिक व्यवस्थापन नावाचा प्रकार सुरू केला आहे. म्हणजे आदिवासी किंवा आजूबाजूचे गावकरी यांना विश्वासात घ्यायचं, जंगल संवर्धनात त्यांना समाविष्ट करून घ्यायचं. याचा दीर्घकालीन फायदा निश्चितच होईल.

आजच्या तरूण पिढीची यशाची व्याख्या म्हणजे भरपूर पैसा. असं असताना हे वेगळं क्षेत्र निवडतांना तुला काय अनुभव आला? आणि यात तुझ्या घरच्यांचा पाठिंबा किती होता?

जगात सगळीकडेच वेगळी वाट निवडणार्‍यांना अडचणी असतात, काही ठिकाणी त्या कमी असतात, काही ठिकाणी खूप जास्त असतात. आपली संस्कृती काही अर्थांनी चांगली आहे. कुटुंबं एकत्र व्यवस्थित राहतात. पण कुटुंबाचं दडपणही खूप असतं. आईवडिलांची खूप मर्यादित अपेक्षा असते की, आपल्या मुलाने शिक्षण म्हणून किंवा नोकरीधंदा म्हणून अमुकअमुक गोष्टी कराव्यात. आपण शिक्षणासाठी आईवडिलांवर अवलंबून राहणं, जोपर्यंत अवलंबून आहोत तोपर्यंत ऐकणं आणि एकदा सवय लागली की आपण आयुष्यभर ऐकत राहणं, हे सुरू राहतं. वेगळं काही काम करणारी आणि वेगळी स्वप्नं पाहणारे जे लोक असतात त्यांची विशेष घुसमट होते त्या वातावरणामध्ये. माझ्या घरी सुदैवाने तसं नव्हतं. विशेषतः माझ्या वडिलांनी प्रचंड पाठिंबा दिला. मी पर्यावरणात जे काही करायला लागलो त्याच्या मागेसुध्दा तेच होते. त्यांनी मी सहावीत असताना पहिल्यांदा मला शिबिराला पाठवलं. सुरवातीपासून त्यांचं म्हणणं होतं की, तुम्ही वर्गामध्ये पहिलं यायला पाहिजे किंवा फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे असं नाही. शिक्षण महत्त्वाचं नाही. नापास होऊ नका, पण ज्याबद्दल तुम्हांला खरोखर प्रेम आहे अशा क्षेत्रात झोकून द्या. माझ्या भावानं संगीत निवडलं, मी पर्यावरण निवडलं, माझ्या बहिणीने वाणिज्य निवडलं आणि आता ती बँकेत काम करते. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत आम्ही तिघेही गेलो.

पहिल्यापासून आई आणि विशेषतः वडील म्हणायचे की, पदवीपर्यंत आम्ही तुमचा खर्च करू. म्हणजे शिक्षण, बाकी जे काही असतं ते. त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं. आणि तुम्ही काय करणार ते तुम्ही बघा. तुमची काय लायकी असेल, तुम्ही जे काही क्षेत्र निवडलंय त्यात तुम्हांला गती असेल, तुम्ही सगळं व्यवस्थित चालू द्याल. त्या बाबतीत तुम्हांला आमची गरज नसेल. काय तुम्हांला खटपट करावी लागेल ती करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. दुसरी गोष्ट ही की, पहिल्यापासून त्यांनी सांगितलं की तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यात स्थिर व्हा, आमची काळजी करू नका. आम्ही म्हातारे झाल्यानंतर आमची काळजी तुम्हांला घ्यावी लागणार नाहीये. ती जबाबदारी तुमच्यावर नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या पंखामध्ये बळ आहे तेवढं उडा, जेवढं लांब जाऊन उडायचं आहे तेवढं उडा.

हे प्रचंड महत्त्वाचं आहे. मी खूप जणांकडून ऐकतो, विशेषतः आजकाल लोक मला लिहायला लागले आहेत की, 'बाबारे, मला या क्षेत्रामध्ये कसं प्रस्थापित व्हावं माहीत नाही. अमुक एखादी गोष्ट मला आवडते पण त्यात कारकीर्द घडवावी कशी हे कळत नाही'. मी आता जीवशास्त्रज्ञ आहे आणि परत शैक्षणिक क्षेत्रात आहे. पण मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक लिहितात 'एका रानवेड्याची शोधयात्रा' वाचून. त्यांना माझ्याकडून सल्ला नको असतो. थोडसं प्रोत्साहन हवं असतं, थोडासा पाठिंबा हवा असतो. कुणीतरी मध्यंतरी मला लिहिलं होतं की त्याला गड-किल्ल्यांमध्ये प्रचंड रस आहे आणि त्यात त्याला काहीतरी करायचं आहे - इतिहासात. किंवा एका बाईंनी लिहिलं होतं की, त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत आणि त्यांना पर्यावरणाशी संबंधित काहीतरी करायचं होतं. किंवा काहीकाही लोक असतात त्यांना याच क्षेत्रात काहीतरी करायचं असतं, पण संशोधन नको असतं. आणि बर्‍याच लोकांना अडचण अशी असते की, मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे मला वर्षातले चार महिने बाहेर राहता येणार नाही किंवा लांबचे प्रवास करता येणार नाहीयेत. ही कुटुंबाची जी बंधनं आहेत ती आपल्या समाजात प्रचंड असतात. मी जे काही करू शकलो ते मुळात हे जे स्वातंत्र्य मला दिलेलं होतं त्याच्यामुळे करू शकलो. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी माझ्या आईवडिलांचं प्रचंड देणं लागतो.

आई-वडील मुलांकडे भावी गुंतवणूक म्हणून पाहात असताना हा विचार क्रांतिकारक म्हणावा लागेल...

हो निश्चितच. हा विचार की मुलांना पाहिजे ते करू द्यावं, त्यांना क्षेत्र निवडताना साखळ्या लावून सोडू नये, हाच प्रचंड क्रांतिकारक आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की प्रचंड मुक्त करणारा आहे. आता मला अडचण नाही. मला चांगली नोकरी आहे, माझं नाव पुरेसं झालेलं आहे. पुढेही चांगल्या नोकरीची संशोधक म्हणून अडचण नाही. पण ते झालं नसतं आणि मी दुसरं काही क्षेत्र निवडलं असतं, मी मदुमलाईला गेलो नसतो, समजा माझ्या IIScमध्ये ओळखी झाल्या नसत्या, या सगळ्या अनुभवांनंतर टेक्सासला जाता आलं नसतं किंवा हार्वर्डला यायला मिळलं नसतं. या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या तर मी आज काय करत असतो माहीत नाही. कदाचित आर्थिकदृष्ट्या माझं खूप काही वाईट झालं असतं. मी माझं माझं प्राणी-पक्षी बघत जंगलात हिंडलो असतो आणि त्यात समाधान मानलं असतं. पैसे किती मिळाले असते माहीत नाही आणि मला त्याची तेव्हासुद्धा आणि आतासुद्धा फिकीर नाही. मी जोपर्यंत आनंदी आहे, माझं पोट अधनंमधनं का होईना पण भरतं आहे, तोपर्यंत मला जे आवडतं आहे ते करता येणार आहे, हे माहीत आहे. हा जो विचार आहे तो प्रचंड मोकळं करणारा आहे. आणि खरोखर अशा खूप कमी गोष्टी असतात आयुष्यामध्ये. काही बंधनं, काही ओझी नसताना तुम्ही तुमची वाटचाल करणं आणि तुम्हांला ज्या गोष्टी आवडतात त्या करणं, यासारखं स्वातंत्र्य खरोखरीच कुठलंही नाही.

संदर्भ -
# http://www.people.fas.harvard.edu/~kunte/index.htm
$ छायाचित्रे सौजन्य -
कृष्णमेघचे छायाचित्र - सोनाली मेढेकर
फुलपाखरांचे छायाचित्र - कृष्णमेघ कुंटे

- अनीशा

Taxonomy upgrade extras: