बागवासरी

पहाटे तीनच्या सुमाराला अचानक जाग आली. ब्राह्ममुहूर्त म्हणतात तो हाच का? बाहेर चांदणं निवांत पसरलं होतं. चांदण्याच्या एका पारदर्शी रंगात सगळ्या पानाफुलांचा 'अवघा एक रंग' झाला होता. सावल्याही चांदण्यात माखून गेल्या होत्या. बाहेर माडाच्या झावळ्यांतून चांदणं झिरपत होतं. खिडक्यांतून चांदण्याचे ओहोळ घरात आले होते. आम्ही नीरवतेला न जागवता, हलक्या पावलांनी बाहेर आलो. सुखद गारव्याची चाहूल आणि पायाखालची ओलसर चांदवळ! अवघा परिसर ब्रह्मरुप.

border2.JPG

प्र

थम तुज पाहता...

avoc.JPG...आज ते दोन रस्त्यांच्या मधल्या कोनातलं घर पाहिलं. मागच्या बाजूच्या डेरेदार वृक्षांसकट मनात भरलं. परिसराचा निवांतपणा वार्‍याच्या झुळकीसारखा घराला वेढून राहिला होता. मी अशोककडे पाहिलं. आम्ही दोघांनी एकदमच म्हटलं, "हे आपलं घर!" आणि बघता बघता ते 'आमचं' झालं की! मागचे अवाकाडोचे वृक्ष, त्यांमधला तो उंचदांडगा आक्रोडाचा. पलीकडला भरजरी हिरव्या पानांचा लोक्वाट. कोपर्‍यातली हिरव्या मांडवाची ओकची झाडं. घराभोवती नवथर माती. तिथे अंगण आणि बाग करायची. पुढे पुष्करिणी हवीच. बेत करता करता आम्ही आजूबाजूला 'बाग'डलो. तिकडे खारीही बागडत होत्या. मध्येच दोन ससे पळत गेले. "अरे वा! हे कोण पाहुणे?", आम्ही म्हणालो. ती सर्व मंडळीही कुतुहलाने आम्हाला न्याहाळत होती. "हे कोण आले आपल्या हद्दीत?" त्यांच्या डोळ्यांतली प्रश्नचिन्हं पाहून आम्ही म्हटलं, "हे इथले मूळ रहिवासी बरं. बागेत यांचीही घरं असणार."

त्या तिथे, पलीकडे...

boganvel.JPG...आज आम्ही उत्साहानं गुलाबाची पंचवीस रोपं आणली. वाटलं, झालं बागेचं काम. ती रोपं लहानशा कोपर्‍यात राहून गेली. ती ऐसपैस नवथर माती जेवढीच्या तेवढी उरलीच! तेव्हा आमच्या डोक्यात उजेड पडला - म्हणजे आता बागेचा नाही तर बागांचा विचार करायला हवा. अगदी पुढच्या कोपर्‍यातली स्वागतिका, पुढच्या दाराला लागून सदनिका, त्यासमोर गुलाबवटी, मागील दारी अंगणिका, स्वादवाटिका, त्यामागे फलोद्यान, शेजारी मांडवी, एका बाजूला क्रीडाकुटीर... हं आणि झोपाळा कुठे बांधायचा? जुन्या घरातून असोशीनं आणलेलं आंब्याचं झाड इथे मोठं होईल. त्याला पार बांधू या...आमचे बेत सुरू झाले. सर्वांत पाठीमागच्या वृक्षांखाली, 'रानफुले लेवून सजलेल्या' हिरव्या वाटा हव्या. लोक्वाटच्या वृक्षांमध्ये जागा आहे. तिथे लहान टेबल आणि दोन खुर्च्या ठेवू. वर नैसर्गिक मांडव आहे. तिथे दुपारचा चहा घ्यायला मजा येईल. पण 'मांडवी'ची कल्पना विसरायची नाही हं. ('साउंड ऑफ म्युझिक' चित्रपटातला तो गझिबो माझ्या मनात भरलेला!) ती उजव्या कोपर्‍यात बांधायची. या नैसर्गिक मांडवापासून रस्त्यापर्यंत कमानी-कमानी घालून मोठी पायवाट करू. त्या कमानीवर द्राक्षांचे वेल सोडू. (अशोकच्या मनात घरगुती वाइनरीची कल्पना दिसते आहे!) पण वाटेवर दोन उंच माड आहेत. त्याला मात्र बोगनवेलीचे वळसे देऊ. गुलबक्षी रंगाची बोगनवेल छान दिसेल. सर्वात पुढच्या कमानीवर चांदणजाई सोडायची. घमघमाट येईल. क्रीडाकुटिराच्या जागी आता मोठी हिरवळ टाकू. त्यावर काहीही खेळता येईल. दुपारी तिथे ऊन येणार. म्हणून वीपिंग विलोचं झाड मध्ये लावू. ते लवकर मोठं होतं. त्यावर लहानसा श्रावणझुला टांगू. त्यावर बसलं की समोर कांचनाचा बहर दिसला पाहिजे. तेव्हा समोर कांचन हवा. स्वागतिकेत दुतर्फा माड लावू या का? नको. फार उंच होतात ते. आपण शिरीषाची दोन झाडं लावू. फांद्यांच्या विस्ताराची सावली होईल. म्हणजे आपली यक्षरंगापासून गुलाबी रंगाची रंगमालिका दिसेल. मग पलीकडे गुलाबी बहरणारी सावरी (सिल्क फ्लॉस) लावू. (सप्टेंबरात जीव भरुन फुलणार्‍या सावर्‍यांच्या रांगा मी या गावाच्या मुख्य रस्त्यावर पाहिल्या होत्या.) या रंगमालिकेत पुढच्या दारी लव्हेंडर, व्हायोलेटपासून सगळ्या जांभळ्या छटांची फुलं लावायची. आगा पन्थस, आयरिसेस, ग्लॅडियोलाज, जांभळी टणटणी (लॅन्टाना) अशी लावली तर वेगवेगळ्या ऋतूंत येतील. तिथून खालच्या उतारावर पाहिलं की, गझेनियाची पिवळी गवती फुलं दिसतील. त्यांना जोडून घराच्या बाजूच्या कडेला पिवळा बहावा! मग पिवळी जास्वंद आणि तांबडी मणिकुंतला (बॉटल ब्रश) अशी एकाआड एक लावायची. (अशोकला एका रंगछटेतून दुसर्‍या रंगछटेकडे जाण्यापेक्षा रंगीबेरंगी फराटे मारायला आवडतात...) गुलाबवाटिकेसाठी आणलेली रोपं अशीच सर्व रंगांची. पुढचा उतार फार उंच आहे. त्यातला थोडा भाग बदलू आणि तिथे पायर्‍यापायर्‍यांच्या ताली बांधू. मग एकेका पायरीवर एकेका रंगाची वेल सोडू. मधल्या रुंद पायरीवर हिरवळ आणि मुख्य दरवाजासमोर येईल अशी मध्ये पुष्करिणी.
lavender.JPG

अभ्यासिकेपुढे दोन कॅलिफोर्निया पेपरची आयती झाडं आहेत. ती तशीच ठेवून भोवती कट्टा करू. संध्याकाळचं केशरी ऊन येईल, तेव्हा तिथे बसायला मजा वाटेल. स्वादवाटिका स्वयंपाकघराच्या खिडकीलगत हवी. पटकन एखादं पान खुडून फोडणीत घालता यायला हवं. फलोद्यान मागीलदारच्या उतारावर. न्याहरीच्या टेबलावर बसलं की खिडकीतून समोर केळ दिसली पाहिजे. तुळशीचं वृंदावन बांधू या का मागीलदारी? निजायच्या खोलीलगत जाईचा मांडव हवा. स्नानगृहाच्या खिडकीसमोर रातराणी! मोगरे आणि अनंताची एक वाटिका करू या का ? धवलगंधा नाव ठेवू तिचं...
आमची सगळी दिवास्वप्नं आम्ही आजच कागदावर चितारली. चांगले टेबलाएवढे मोठ्ठाले ताव आणून. ते आमचं बागेचं कल्पनाचित्र. आता ती गावच्या समितीसमोर घेऊन जाणार आणि त्यांच्या अनुमतीची मोहोर उठली की, जमिनीत जलशिंपाचे (वॉटर स्प्रिंकलर) नळ टाकायची तयारी सुरू. बाग इतकी छान दिसेल! खिडक्यांना पडदे करायचे नाहीत! म्हणजे घर बागेत बांधलं आहे असं वाटेल. रात्री आम्ही खिडकीतून बाहेरचा अंधार पाहत होतो. अजून या वस्तीत कोणीच आलं नाही. फक्त आमचंच घर पूर्ण बांधून तयार आहे. नीरव शांततेनं मन भरुन आलं...

रंग खेळू चला...

आज गंमतच झाली. आमचं कल्पनाचित्र घेऊन आम्ही नगरपालिकेत गेलो. खरं तर बाग आमची, झाडं आम्ही लावणार. पाणी त्यांचं, पण ते आम्ही विकत घेणार! मग हे कोण ठरवणार आम्ही बाग कशी लावणार ते? पण हे गाव खेड्यासारखं नांदतं ठेवण्याची नगरपालिकेची योजना. तेव्हा सगळं नैसर्गिक दिसायला हवं, असा नियम. त्या नियमात हत्ती, घोडे काय, वाघ पाळले तरी चालतात. (अरेच्च्या! आधी माहीत असतं तर, आमच्या चित्रात खारी आणि ससे नसते का दाखवले?) पण बाग कशी दिसावी ते त्यांच्या अनुमतीनंच ठरवायचं. आम्ही चित्रं पुढे केली. तर तिथल्या सुंदरीला भोवळ आली. "हे असलं काय आणलं? आम्हाला ब्लू-प्रिंटस् दाखवा.", तिनं आवाज काढला. आमचा गडी कोकणातला. तो काय घाबरतोय थोडाच! शेवटी, "नैसर्गिक दाखवायचं तर चित्र काढल्याखेरीज कसं कळणार?" अशी डावी-उजवी होत प्रकरण वरच्या साहेबाकडे गेलं. इतकी मन लावून काढलेली आमची चित्रं निळ्या रंगाच्या फुल्या आणि ठिपके काढणार्‍या माणसाकडे नेऊन 'ब्लू प्रिंटस्' काढण्याची माझी तर मुळीच इच्छा नव्हती. शेवटी 'आमचं कोकण' यावर त्याला एक व्याख्यान देऊन गप्पाटप्पा करुन मनात भरवलीच ती चित्रं त्या साहेबाच्या. त्यालाही ती आवडली बहुधा. त्यानं 'हो' करुन टाकली आमची बाग!..

गंधावली हिरवळ...

chafa_0.jpgबघताबघता वर्षाचे दिवस बागेत उमलून गेले. नवथर मातीवर आता हिरवळीचे सुंदर गालिचे पसरले आहेत. शेजघराच्या दारासमोरच्या जाईला बहर येऊ लागला आहे. तिच्या वासानं हिरवळ गंधावली आहे. शैलानं तिच्याकडे पुण्याहून लपवून छपवून आणलेली जाई लावली आहे. तिचीही फांदी तिनं दिली. तसाच नंदानं मोगर्‍याचा वेल दिला. वडिलांनी कोकणच्या घरातल्या गुलबक्षीच्या (संध्यावळी) बिया पाठवल्या. ती फुलली आहे. बागेला त्यांच्या सौहार्दाचं क्षेम मिळालं आहे. लाल विटांच्या वाटांची वळणं बागेला लपेटून बसली आहेत. आमच्या कल्पनाचित्रात असलेली आणि नसलेली किती फुलं जागोजागी नटून बसली आहेत. काही तर अकल्पित आणि अयाचित! सोनचाफा, सुवर्णपुष्पी (हे कोकणातलं नाव. देशावर तिला सोनटक्का म्हणतात.) आणि कृष्णकमळानं असा अकल्पित आनंद दिला! कर्दळीचे आणि जास्वंदीचे तर किती रंग मिळाले...

rose.JPGआमच्या कल्पनाचित्राप्रमाणे योग्य जागी आणि योग्य प्रमाणात बहरायचं मात्र सर्वांनी साफ नाकारलेलं आहे. प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्त्व आहे आणि कसं वाढायचं याचं स्वतःचं मत आहे. जाईनं मांडवावर चढण्याऐवजी भिंतीवरुन दुसरा मजला गाठण्याचा बेत मांडला आहे. आंब्याचा जीव इथे रमत नाही. बिचारा कुढत बसला आहे. निशिगंध भुईतून वर यायलाच तयार नाही. अळूच्या पानांचा विस्तार डोळ्यात मावेना! पण भाजी करावी म्हटलं तर खाज जाईना. मसाल्याच्या बागेत मिरच्या आणि पुदिना यांची हातघाईची लढाई सुरू आहे. पुष्करिणीवरची गुलाबाची फांदी पहिले दोन महिने फुलांनी वाकली. नंतर दृष्ट लागावी तसा गुलाब सुकत गेला. तुळशीला अंगण एवढं आवडलं की तिचा वृक्ष होण्याची वेळ आली आहे. आता वृंदावनाऐवजी पार बांधावा लागेल. जास्वंदीने पिलावळ घातली आहे. रंगसंगतीचा (आणि रांगसंगतीचाही) विचार करुन तालींवर वेली लावल्या. त्या सरळ एकमेकींच्या गळ्यात गळे टाकून राहिल्या आहेत. कढीलिंब रुग्णाइतासारखा जरत्कारु दिसतो आहे. सोनचाफ्याच्या बहरानं मागचं अंगण दरवळलं आहे. ती गुलाबी रानफुलं कुठून आली न कळे. कोणीतरी म्हटलं, "त्यांना प्रिम रोझेस म्हणतात." गोड दिसली म्हणून "असू दे." म्हटलं. तर त्यांनी सरळ हिरवळीवर आक्रमण केलं आणि हटवता हटवता आमचे हात थकले. गारवेलीला कमानीवर ठेवली. वाटलं, चांगली ताब्यात राहील. तर तिनं आडदांडपणे कमानच पाडली...
नीलमोहोराचा(जाकरांडा) मोठा वृक्षच आणला मुद्दाम. पण अजून फुलण्याचं चिन्ह नाही. रोज जाऊन गप्पा मारते त्याच्याशी. एक मात्र आहे. रोज बागेत काहीतरी नवं घडतं. नवे धुमारे फुटतात. दुपारनंतरचे पश्चिमवारे बागेलाही सुखावतात. छपराला टांगलेला रुणझुणा मंद झंकारतो...

सोयरे वनचर...

परवा पाहिलं तर तीन आडदांड खारी सशाच्या मागे लागल्या होत्या. तो बेटा पळून गेला शेवटी. सर्वांनी गुण्यागोविंदानं राहायचं ठरवलं होतं ना? खारी एवढ्या वस्ताद असतात, हे माहीत नव्हतं. रोज आक्रोडावर चढून दोन्ही गालांत तोबरे भरुन सुळसुळत पळून जातात. एवढे आक्रोड कधी खातात कोण जाणे. अशोकची आणि त्यांची जी काही मारामारी चालते, की विचारता सोय नाही. आता गुण्यागोविंदाने राहण्याच्या करारानुसार त्यांनी घेतले काही आक्रोड तर आमचं काही म्हणणं नाही. पण यंदा आमच्या वाट्याला एकही आला नाही. अशोकनं बुंध्याला दोन फूट उंची असलेला पत्रा ठोकला. एकदा त्यावरुन घसरली खार. पुढच्या वेळी समोरच्या अवाकाडोवर गेली आणि तिथून सरळ झेप घेतली आक्रोडावर. पत्र्याची युक्ती वाया! पेरूला फळं धरू लागली आहेत. काहीही झालं तरी खारींना पेरूजवळ फिरकू द्यायचं नाही. खारी आणि ससे एवढेच मूळ रहिवासी, ही आमची धारणा धुळीला मिळाली 'गोफर'मुळे.

गेल्या महिन्यात लिंबाचं झाड अचानक उन्मळून पडलं. नर्सरीत जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं, "गोफरचा प्रताप. हा उंदरासारखा प्राणी मुळं खातो. तो राहतो जमिनीखाली." गोफर निर्मूलनाच्या वर्गाला हजेरी लावली तेव्हा गोफर निर्मूलनवाल्यांचा समदु:खी गट भेटला. एकानं सांगितलं की, त्यांच्या बागेतली हिरवळच्या हिरवळ खचली. जमिनीखाली गोफरांची भुयारी नगरी होती. दर वसंत ऋतूत नवी फौज जन्माला येते. तेव्हा दरवर्षी ही निर्मूलन मोहीम करावी लागते. हे ऐकल्यावर अशोकनं गोफरांचा नाद सोडला आणि गोफर मारणार्‍या कंपनीला भाडं देऊन सेवा सुरु केली.

गोगलगायींचंही असंच झालं. पहिले काही दिवस सकाळच्या उन्हात डुलत डुलत निघालेल्या गोगलगायींची मजा वाटली. पण एकदा हौसेनं झेंडूची फुलं लावली तर तिसर्‍या दिवशी सगळी फुलं गायब! कोणी चोरुन नेली असा विचार करताना नर्सरीवाल्यानं विचारलं, की बागेत गोगलगायी दिसतात का? सगळ्या गोळा करुन 'फ्रेंच रेस्तोरां'ला विकू या असा सोप्पा उपाय मी सुचवला. गोळा करायला पहिलीतल्या मुलांची सहल आणावी वगैरे विचार ओघाने आलेच...
hummingb.JPGफुलं आली तशी सुंदर फुलपाखरं आली. फुलचुख्यांचे (हमिंग बर्ड) थवे दिसू लागले. पुष्करिणीत आंघोळ करणार्‍या चिमण्या आणि कवडे आले. काहींनी बागेत घरटी बांधली. पिल्लं अंड्यातून बाहेर पडून उडायला शिकेपर्यंतची त्यांची कौटुंबिक लगबग पहाण्यात आमचे तासन् तास जात. एकदा अशोकला अपेक्षितपणे फुलचुख्यांचं घरटं दिसलं. फांद्यांच्या बेचक्याऐवजी ते दोन पानांच्या देठांमध्ये होतं. इतकं नाजूक आणि लहानसं. आत दोन साबुदाणी अंडी होती. एक दिवस दोन इटुकली मिटुकली पिल्लं आली. आता ती मावणार कशी या घरट्यात? खरंच नव्हती मावत. चोची बाहेरच काढून बसत. आईबाबा शेजारच्या पानावर बसून चारा भरवीत. मग एक दिवस उडाली बाहेर ! ..

एकदा बदकाचं कुटुंब आलं. पाण्यात डुंबलं आणि मग गेलं निघून. कधीकधी एक बगळा येतो. आपल्या बंगल्याची आणि मालमत्तेची टेहळणी करायला आल्यासारखा ऐटीत फिरतो आणि जातो निघून. ससाणा येऊन माडावर बसतो आणि झेप घेतो. माडावर सुतार पक्षी सारखी ठोकठोक करतात. पण इतके वेडे की माड कोणता आणि त्याचं प्रतिबिंब कोणतं हे समजत नाही. आमच्या खिडकीच्या काचेवर ठोकत बसतात. चोच फुटेल म्हणून माझा जीव थोडा थोडा झाला. मग खिडकीत रेडिओ लावून ठेवला. पक्ष्यांची नावं समजण्यासाठी आम्ही एक पुस्तक आणलं आहे...

एक पक्षी मात्र अनपेक्षित होता.. मोर! पहाटे दारात आला. 'मोर केशराचे झुलती' वगैरे कवितेतला नव्हे. खरा. मागे पिसारा.. आम्ही हरखलो खरे. पण नगरपालिकेला कळवण्याचं भान ठेवलं. कुठल्या संग्रहालयातून सुटला असेल तर? ते म्हणाले, "आम्हाला नाही माहिती. तुमच्या दारचा मोर तुमचा. मोर पाळायला परवानगी आहे." आता मोराला कुठला चारा घालावा म्हणून मी कविकल्पनांची शोधाशोध सुरु केली. मोर रोजच येई. चार्‍याचा विचार त्यानेच केला. आमच्या फलोद्यानातल्या जर्दाळूचं काही खरं उरलं नाही. सकाळी त्याची मंजूळ केकावली ऐकून जाग येईल अशी माझी कविकल्पना. पण करकचून ब्रेक लावलेला ट्रक थांबतो तशा आवाजातली केका(टणी) आली. अशोक त्याच्यामागे हाकलायला धावू लागला. मी म्हणत होते, "अरे, देऊ त्याला दोन जर्दाळू आणि घेऊ त्याला सांभाळून..." एकदा तर गंमतच झाली. मागील दारातून हा आपला स्वयंपाकघरात डोकावत होता. मला तर आपण 'सरस्वती' असल्याचाच भास झाला! शेवटी आला तसा तो मोर गेला अचानक आणि आम्हाला चार जर्दाळू शिल्लक राहिले यंदा.

सळसळ पिंपळ...

आज सकाळीच थोडा पाऊस शिडकून गेला. सँडीला प्रभातफेरी करायची होती म्हणून दोघी निघालो. ओलसर पायवाटेनं जाताना दिसली आक्रोडाची रोपटी. हेच ते, हेच ते खारींचं रहस्य! खारींनी जमिनीत लपवलेल्या आक्रोडांचा असा शोध लागला. त्यांचा माग काढत आणखी मागच्या बाजूला गेलो दोघी. गझिबोच्याही पलिकडे. वारा आला. अचानक मला आठवला कोवळ्या उन्हात सळसळणारा पिंपळ! कुठेतरी आतला गाभा थरथरला. मी थबकले. सँडीही. ती म्हणाली, "आय फील स्पिरिचुअल हिअर." तिलाही ऐकू आली का ती आतली सळसळ? आम्ही बागेच्या एका टोकावर उभ्या होतो. सगळा परिसर समोर एकवटला होता. मी एका वेगळिकीनं बागेकडे पाहिलं. नजरेला नवे धुमारे फुटले. बागेचं नवं रूप मला दिसत होतं. मी, अशोक आणि सँडी मग पुन्हा कल्पनेत बागडलो. "इथे बुद्धाची मूर्ती ठेवू या? मग कुंपणालगत बांबू लावू. या अशोकवृक्षाभोवती सपाटी करून अंगण करू या. सोनचाफ्याशेजारचा तो उतार आहे ना, तिथे खळखळ करणारा झरा हवा...द्राक्षांचे मांडव आहेत ना, त्यांच्या मागे ध्यान करायला निवांत जागा आहे." दुपारी खरंच अशोकनं बुद्धमूर्ती आणली. झाडाचा जुना ओंडका पडला होता. तो उभा करुन त्यावर बुद्धाला बसवलं. वर एक फांदी दिसली. तिच्यावर रुणझुणा टांगला. आणखी ओंडके होते. ते आम्ही इथे तिथे बसवले. त्यांच्यावर फळ्या टाकून "चिंतनपार" (क्वाएट स्पॉट्स) बनवले. सगळं अगदी सहज होत गेलं...

चांदणस्पर्शाची पहाट...

पहाटे तीनच्या सुमाराला अचानक जाग आली. ब्राह्ममुहूर्त म्हणतात तो हाच का? बाहेर चांदणं निवांत पसरलं होतं. चांदण्याच्या एका पारदर्शी रंगात सगळ्या पानाफुलांचा 'अवघा एक रंग' झाला होता. सावल्याही चांदण्यात माखून गेल्या होत्या. बाहेर माडाच्या झावळ्यांतून चांदणं झिरपत होतं. खिडक्यांतून चांदण्याचे ओहोळ घरात आले होते. आम्ही नीरवतेला न जागवता, हलक्या पावलांनी बाहेर आलो. सुखद गारव्याची चाहूल आणि पायाखालची ओलसर चांदवळ! अवघा परिसर ब्रह्मरुप. पुन्हा एकदा 'तो' साक्षात्कारी क्षण मनात झंकारला...

सहयोगाच्या आठवणी...

ओकवृक्षाभोवतीच्या अंगणाला जाईची कमान लागली आहे. तिथे बसून अशोकनं आमच्या योगशिबिरात 'योगा इन एव्हरीडे लाईफ' असं व्याख्यान दिलं होतं. बागेचं काम तो मन लावून करतो. तीच त्याची योगसाधना असते. आमचे 'योगा इन द गार्डन'चे वर्ग आणि योगशिबिरं लोकप्रिय झाली आहेत. द्राक्षांमागे ध्यानासाठी दगडाचा पूर्वाभिमुखी पार बांधला आहे. केळीचं बन मोठं झालं आहे. सकाळी 'योगा' करायला शुभ्र केसांची जूली येते तेव्हा तिला केळीखालच्या चिंतनपारावर ध्यान करायला आवडतं. तिथल्या एका झाडावर पुन्हा शैलाच्या एका जाईची आणखी एक विस्तारवेल ऐसपैस पसरली आहे. गेल्या काही वर्षात या जाई जागोजागी पसरू दिल्या आहेत. सोनचाफ्याशेजारी झरा झुळझुळतो. त्याच्या वरच्या अंगाला मोठा कातळ ठेवला आहे. ते तरुण तरुणींच्या सलज्ज कुजबुजींचं संकेतस्थान. अमित-रुचिका, अपर्णा-विभास .. लग्नं ठरली तेव्हा इथेच बसून त्यांचे फोटो काढले होते.

jaswand.jpgनीलमोहोर केवढा उंच झाला आहे आता. बहर येतो, तेव्हा उठल्या-उठल्या खिडकीतून जांभळसर घोस दिसतात. बहावा तर चांगलाच विस्तारला आहे. पुण्यात एकदा धुवांधार पाऊस आला होता. उंबर्‍यावर बसून मी तो मनात भरुन घेतला होता, समोरच्या बहाव्यासकट! त्याची कधीकधी आठवण होते. मणिकुंतलेचे घोस पाहिले की रविन्द्रनाथ टागोर आठवतात. हा शब्द मी प्रथम त्यांच्या साहित्यात वाचला होता. सुवर्णपुष्पीची अनेक बनं झाली आहेत. त्यांचा गंध कोकणाची आठवण देतो. मोगरे फुलतात तेव्हा गजरे होण्याइतके. चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाची आठवण होते. संध्यावळीचे हार करून आजी संध्याकाळच्या आरतीआधी पूजा करीत असे. संध्यावळ फुलते तेव्हा आजीच्या आवाजातला तो 'नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे..' श्लोक आठवतो. वीस पंचवीस प्रकारच्या जास्वंदी फुलतात. पण त्यातली लाल जास्वंद पाहिली की हेमा आठवते. जास्वंदीचं फूल डोक्यात घालून येई. नंतर हवाईला जास्वंद डोक्यात घालणार्‍या खूप मुली पाहिल्या. पण आठवते फक्त हेमाच.

loquat.JPGलोक्वाटच्या झाडाखाली पिटुकलं बाक आहे. विभा चिमुकली होती, तेव्हा त्यावर बसायला विभाला फार आवडायचं. आता प्रत्येक पिटुकलं पोर बरोबर तिथेच जाऊन बसतं. त्याच्या शेजारी दोन 'पिकनिक' बाक आहेत. तिथे 'पिकनिक' करण्याची कल्पना रोहन नि नीरज आले होते तेव्हाची...
आमच्या या बागेतल्या घरी किती सगेसोयरे आले. बाग कित्येकांच्या पाऊलखुणांनी गजबजली. 'कत अजनारे जानिले तुमी' या रविन्द्रनाथांच्या कवितेच्या ओळींची आठवण करुन देणारे किती अनोळखी जन्मांतरीची ओळख पटवून गेले,
प्रत्येक दिवस नवे धुमारे घेऊन येतो आणि नव्या आठवणीचा गंध...
लहानपणी 'ऋतुचक्र' वाचलं तेव्हा 'निसर्गाची चित्रलिपी' जाणवली. पण तिचं खरं रहस्य उलगडलं ते या बागेमुळे! त्याचे किती साक्षात्कारी क्षण आठवतात.
हे सगळं सोडून आता आम्ही निघणार आहोत. पण सहयोगाच्या आठवणींचं रुपडं बागेच्या रुपड्याबरोबरच मनात रुमझुमतं असणार आहे...

- विद्या हर्डीकर सप्रे
(रेखाटने: अश्विनीमामी)

Taxonomy upgrade extras: