दुआ करें......

“दु

आ करें दरवेश, रहम करें अल्ला!
कमानेवालों को हयाती दे अल्ला!”
DuaaKare.gif
फकीरबाबाचा आवाज गल्लीत घुमला तशी पियू चटकन उठली. स्वैपाकघरात जाऊन तिने आईचा पदर ओढला.
“आई, लहमबाबा आलाय. पीथ दे ना!”
“देते हं!” जया हसून म्हणाली. वाटीभर पीठ घेवून पियू बाहेर आली.
“लहमबाबा, धल!” ती आपला छोटासा हात पुढे करत ओरडली.
“आ रहे है बिटीयाँ|" फकीरबाबाने जवळ येऊन झोळी पुढे केली. वाटीतले पीठ त्यात टाकताना पियूचा चेहरा फुलला.
“बश का?” आपल्या बोबडया आवाजात तिने विचारले.
“हाँ बिटीयाँ! बहोत है| अल्ला आपको बरकत दे|” तिच्या डोक्यावर, अंगावर त्याने हातातल्या मोरपिसांच्या झाडूने झाडले. जणू सगळया बददुआ झटकत होता. पियू गंमतीने हसली. फकीरबाबा पण मंदस्मित करत पुढे गेला.

दर गुरूवारी फकीरबाबा कॉलनीत फिरायचा. कुठून आला, कधी आला, कोणालाच माहिती नव्हते. सर्वांसाठी दुआ मागत तो दारापुढून फिरायचा. कोणी आवाज दिलाच तर त्या घराकडे वळायचा. अल्लाच्या नावावर त्याने कधीच भीक मागितली नाही. घराघरांतून जे स्वखुशीने मिळायचे, त्यातच तो समाधानी असायचा. पहिल्यांदा तो आला तेव्हा त्याला पाहून पियू घाबरली होती. अवघी तीन-साडेतीन वर्षांची ती अजाण बालिका त्याच्या लांब दाढीला अन् घोळदार कफनीला बिचकली नसती तरच नवल! पण जयाने वाटीभर पीठ वाढले आणि बाबाने तोंडभर आशीर्वाद दिला.
“अल्ला आपको बरकत दे, माई|”
पियू तिचा पदर पकडून आपल्या बिटबिट्या डोळयांनी बाबाला न्याहाळत राहिली. हातातल्या मोरपिसांच्या झाडूने त्याने झटकले तशी गुदगुल्या होऊन ती हसली. त्या दिवसानंतर मात्र दर गुरूवारी ती फकीरबाबाची वाट पाहू लागली. जयाला तिने प्रश्न विचारून भंडावून सोडले.
“आई, लहमबाबाचे घल कुथे आहे?”
“माहीत नाही, बाळ ”
“तो पायी पायीच फिलतो का?”
“हो.”
“का?”
“त्याला बाप्पाने सांगितले आहे म्हणून!”
“त्याची आई कुथेय?”
“तू नं…त्यालाच विचार. मला माहिती नाही.” जयाने स्वत:ची सुटका करून घेतली. पियूच्या मनात मात्र प्रश्न फेर धरून नाचतच होते. तिच्या बालसुलभ प्रश्नांतून फकीरबाबाही सुटला नाही.
“तू कुथे लहातोश लहमबाबा? ”
“हम दूर रहतें हैं, बिटीयाँ|”
“घली तुजी आई आहे?”
“नही बिटीयाँ|”
“मग…तुला खाऊ कोन देतं?” पियूने काळजीने विचारले.
“आप जो हो…मुझे खाने को देने के लिय|" बाबा हसत उत्तरला.

फकीरबाबाच्या घरी कोणी नाही हे कळल्यावर पियूची नैतिक जबाबदारी अजूनच वाढली. घरात काही चांगले बनवले किंवा आणले की फकीरबाबासाठी ठेवायचा हट्ट व्हायचा. पियूचा बाबा पण तिला यावरून चिडवायचा.
“पियूताई, जिलेबी आवडली का?”
“होऽ मी शगली शंपवली.”
“पण तुझ्या रहमबाबाला नाही ठेवलीस?” पियूचा हात तोंडावर गेला. डोळे मोठे झाले.
“मी विशलले. आता ले बाबा? बाप्पा लागावनाल.” ती रडवेली झाली.
“नाही रे पिल्ला! बाप्पाला सगळं माहिती असतं. तो नाही रागावणार.”
“खलंच?”
“हो, खरंच! झोपा आता.” गप्पा मारत ती झोपून गेली.

एके दिवशी पियूचा बाबा लवकरच घरी आला.
“बाबा, आपण फिलायला जायचे?” बाहेर जायचे असले की तो लवकर यायचा एवढेच पियूला माहिती होते.
“आज नाही हं बेटा! नंतर जाऊयात.” तिला खेळायला पाठवून तो कपडे बदलू लागला.
“आज लवकर आलांत?” जयाने आत येत विचारले.
“हं!” तो फक्त हुंकारला.
“बरे वाटत नाहीये का?” तिने जवळ येत विचारले.
“नाही, ठीक आहे.” त्याच्या चेहरा व्यग्र होता.
“काही झालंय का?” तिने काळजीने विचारले.
“कंपनीत चर्चा सुरू आहे. कामगार कमी करणार आहेत म्हणून!”
“मग…? पण तुम्ही तर परमनंट आहात ना ?” तिने धास्तावून विचारले.
“काही निश्चित नाहीये. कळेल दोन-तीन दिवसांत!” जवळचा पेपर उचलून त्याने तोंडापुढे धरला. जया काही क्षण बघत राहिली. मग स्वैपाकघरात येऊन आवरू लागली. मनातल्या शंकाकुशंका थैमान घालत होत्याच.
पियूच्या बाबाने नोकरीसाठी काही मित्रांच्या कानावर घालून ठेवले. कंपनीचा निकाल काही लागो, आपण तयारीत असलेले बरे!

“दुआ करें दरवेश, रहम करें अल्ला!
कमानेवालों को हयाती दे अल्ला!”
फकीरबाबाचा आवाज ऐकून पियू बाहेर आली. हातात पिठाची वाटी होतीच. पीठ घेऊन त्याने मोरपिसांनी झाडले तरी ती हसली नाही. ओठ दाबून गप्पच उभी राहिली.
“क्या हुआ बिटीयाँ?” तिने नकारार्थी मान हलवली.
“भूख लगी है क्या?” परत नकार.
“तो माँ ने डाँटा?” काहीतरी बोलायला ओठ हलले पण शब्द बाहेर आले नाहीत. विझलेल्या डोळयांनी त्याच्याकडे पाहून ती आत पळून गेली. फकीरबाबा ती गेली त्या दिशेला पाहत राहिला. त्या निरागस जीवाने या निरिच्छ मनालाही लळा लावला होता. तिचा हसरा, फुललेला चेहरा पहाण्याची सवय असलेल्या त्याच्या डोळ्यांना आज तिचा कोमेजलेला चेहरा खटकत राहिला.
पियूच्या बाबाची नोकरी गेली होती. काही काळ तो सैरभैर झाला पण जया आणि पियूकडे पाहून त्याने स्वत:ला सावरले. नवीन नोकरीचा शोध सुरू झाला. मंदीच्या काळात ते फार अवघड झाले होते. पियूला हे सर्व कळत नसले तरी जाणवत नक्कीच होते. घरातली पैशांची टंचाई, अव्यक्त दडपणाचे सावट तिच्यावर पडत होतेच. दिवसभर नोकरीच्या शोधात वणवण भटकणारा तिचा बाबा वैतागून कधी कधी जयावर खेकसत होता. हसत्याखेळत्या एका कुटुंबावर निराशेचे, अस्थिरतेचे काळे ढग पसरत होते.

आज पण फकीरबाबाची हाक ऐकून पियू पीठ घ्यायला घरात आली. जयाने जरा छोटीच वाटी भरून दिली. पियूने डोळयांनीच तिचा निषेध केला, पण आपल्याच विवंचनेत असलेल्या जयाचे तिकडे लक्ष गेले नाही.
“लहमबाबा”
“आ रहा हूँ बिटीयाँ|” येवून त्याने झोळी पसरली.
“मालिक इस घरको बरकत दे, कमानेवालों को हयाती दे|”
“लहमबाबा, आज तुजे पोत भलेल का?”
“हाँ बिटीयाँ| ”
“तू खोतं बोलतोश ना!” ती रागाने उद्गारली. गोबरे गाल लाल झाले.
“नहीं तो बिटीयाँ! क्या हुआ?"
“मग…एवल्याशा पिथाने तुजे पोत नाहीच भलनाल!” ती ठामपणे उत्तरली.
“अरे नहीं, बिटीयाँ, प्रेमाने दिलेल्या एका घासाने पण पोट भरते. मग एवढया पिठाने का नाही भरणार?” तो हसत उत्तरला. पियूचा चेहरा उजळला.
“लहमबाबा, अल्ला तुजा मित्ल आहे ना?”
“हाँ बिटीयाँ|"
“मग तो तुज सगलं ऐकतो का?” पियूच्या प्रश्नाने फकीरबाबा चमकला.
“क्युं बेटा ?”
“त्याला शांग ना, बाबाला हापिशला जाउ दे. मग तो लागावणाल नाही, आपल्याला खाऊ आणेल ना!”
“जरूर बताऊंगा| तो परवरदिगार नक्कीच रहम करेल.” पियू खुश झाली. नाचतच ती खेळायला निघून गेली. त्या बालजीवाच्या विश्वासाचे ओझे खांदयावर पेलत फकीरबाबा रस्ता तुडवू लागला.

फकीरबाबा पीठ मागत फिरत होता. तसा निरनिराळया गल्लीबोळातून तो रोजच फिरायचा. प्रत्येक एरियात जायचा त्याचा दिवसही ठरलेला होता. क्वचितच त्यात खंड पडत असे. पण आज आयुष्यात पहिल्यांदाच त्याची पावले अडखळली होती. पियूच्या कॉलनीकडे जायचे त्याला धाडस होत नव्हते. एका तीन वर्षाच्या बालजीवाने त्याला धर्मसंकटात टाकले होते. तिच्या प्रश्नांना काय उत्तर होते त्याच्याकडे? कुठल्या तोंडाने तो तिला सामोरा जाणार होता? त्याने तिकडे जाणेच बंद केले.

“दुआ करें दरवेश, रहम करें अल्ला!
कमानेवालों को हयाती दे अल्ला!”
आरोळी घुमत होती. पसापसा पीठ घेवून तो पुढे सरकत होता.
“लहमबाबाऽ” कुठूनतरी पुकारा झाला.
“या अल्ला! रहम कर!” फकीरबाबा अविश्वासाने बघत होता. पियू आईला ओढत त्याच्याकडे घेवून येत होती.
“लहमबाबा, तू कुथे गेला होताश? मी तुजी वाट पहात होते.” तोच फुललेला चेहरा! फकीरबाबा कसनुसा हसला.
“तुम्ही बरेच दिवस आलाच नाहीत. पियू फार आठवण काढत असते.” जया म्हणाली.
“लहमबाबा, तुला कानात एक गंमत शांगते!” पियू त्याला जवळ बोलवत म्हणाली. फकीरबाबा वाकला.
“बाबा हापीशला जातो. तुज्या मित्लाला शांग, थॅन्कू!” ती कुजबुजली.
“या परवरदिगार! या मददगार!” दुआ मागण्यासाठी फकीरबाबाचे हात आपोआपच आकाशाकडे उठले.

-विनीता.झक्कास

प्रतिसाद

आवडली. जरा वेगळ्या विषयावर छोटीशी पण सुंदर कथा.

आवडली. जरा वेगळ्या विषयावर छोटीशी पण सुंदर कथा. >+1

झक्कास... :D

मस्त. आवडली.

:)

आवडली. जरा वेगळ्या विषयावर छोटीशी पण सुंदर कथा. >+1

छान लिहिलंय. साधसं पण स्पर्शून जाणारं कथानक :)

आवडली. छान लिहिलय.

अगदी छान.

खुप सुंदर.... :)

साधसं पण स्पर्शून जाणारं कथानक>>>>+१ आवडली

साधं आणि छान! :)

सिंडी +१

मस्तंय. :)

आवडली! :)

आवडली :)

अतिशय आवडली, विनिता. लहान मुलांची श्रद्धा ही किती विलक्षण नितळ गोष्टं आहे... ओघवती अन सहज जमलीये गोष्टं.

सुंदर.

मस्त !

खूप टचिंग आहे गोष्ट. आवडली. :)

लहान मुलांची श्रद्धा ही किती विलक्षण नितळ गोष्टं आहे.>>> अगदी खरे, दाद :)
दिवाळीअंकात ही माझी पहीलीच कथा आहे. प्रतिसादाबद्दल आभारी आहे :)

सुरेख.

आमच्या घरी पण एक फकीरबाबा यायचे त्यांची आठवण झाली.. :) खुप छान.. :)

सुरेख !!
"काबुलीवाला" आठवला :)

सुरेख. आवडलीच :)

छोटिशीच.. पंण सुंदर कथा

क्युट.

सुन्दर :)

आमच्या नासिकच्या कॉलनीत एक फकीरबाबा यायचा, माझी धाकटी बहीण त्याला पीठ द्यायला पळायची, इनफॅक्ट ती त्याची वाट पहायची. त्यावरुन सुचली ही कथा!
कथेचे चित्र पण एकदम समर्पक आहे :) संपादक मंडळ आणि चित्रकारांचे आभार!

छान कथा..