एकला चालो रे

AsiaBrownFlycatcher.jpg
Asian Brown Flycatcher- HK 2012

गळी नाही म्हणता येणार, पण ही माझ्या पक्षीनिरिक्षणाच्या आणि पक्षीप्रकाशचित्रणाच्या छंदाची साधी वाटचाल. अजून माझे या विषयातील ज्ञान आणि कौशल्य प्राथमिक अवस्थेत आहे याची मला नम्र जाणीव आहे. वाचकांनीही लक्षात घ्यावे कृपया.

मी पहिला डिजिटल एसएलआर २००६ मध्ये घेतला. कॅनन किस डिजिटल एन. तो का घेतला हे मी नीटसे सांगू शकत नाही पण तो एंट्री लेव्हल कॅमेरा होता, त्यातल्या त्यात स्वस्त होता आणि मला डिजिटल कॅमेरा घेऊन पहायचाच होता. हो नाही करता करता घेतला.
फोटोग्राफीचे गमभन गिरवणे सुरू झाले. थोडे इतरांना विचारून, थोडे वाचून, कॅमेर्‍याशी खेळून वगैरे बेसिक डिजिटल प्रकाशचित्रण शिकण्यात काही वर्षे गेलीत्या कॅमेर्‍यावर हात बसला तसा तो अपग्रेड करायची इच्छा होत होती.

आता मला अगदी नक्की आठवत नाही पण बहुतेक २०१० पासून मी इंडियानेचरवॉच नियमीतपणे वाचायला लागलो. त्या संकेतस्थळाविषयी मला आदर आहे. तिथली उत्तम प्रकाशचित्रे, पक्ष्यांची माहिती, मुख्य म्हणजे फोटो कसा घेतला त्याची माहिती लोकं मोकळेपणाने शेअर करतात. ते नकळत मनात साठवत गेलो आणि कॅमेरा बदलायची सुरसुरी पुन्हा उफाळून आली.

RedWhiskeredBulbul.JPGहा माझा पहिला 'बरा' फोटो- पक्ष्याचा.
Red Whiskered Bulbul- Kerala 2011

२०११ मध्ये आम्ही केरळला जाणार होतो. त्याआधी मनाचा हिय्या करुन कॅनन 500D घेतला. एक कॅननची लेन्स घेतली आणि मग दुसरी कॅननची लेन्स घ्यायची हिम्मत होईना. स्वस्त म्हणून टॅमरॉनची घेतली.
LittleEgret-sd.JPG
Little Egret- Sewri 2011

बर्ड फोटोग्राफीचे असे कधी फारसे डोक्यात नव्हते, पण योगायोगाने प्रेमात पडलो, असेच म्हणावे लागेल. पूर्वीपासून मला हायकिंगची आवड होती. वाईल्ड लाईफचे आकर्षण होते. पर्यावरणाविषयी आस्था होती. दोन वर्षांपूर्वी आम्ही केरळला गेलो होतो, तिथली बर्ड डेन्सिटी आणि मुख्य म्हणजे वैविध्य पाहून स्तिमीत झालो. फार प्रभावित होऊन कधीचे घ्यायचे होते ते 'ग्रिमेट' (Field Guide) घेतले

TigressCrossRoad.jpg

नंतर दोन महिन्यांनी नागझिर्‍याला गेलो तेव्हा ती खचाखच गर्दी आणि वाहनांच्या मधून वाघीण जाताना पाहून माझे मन त्या प्रकाराला विटले. याला काही अर्थ नाही हे जाणवू लागले. प्राण्यांविषयीची आस्था अगदी कमी आणि एक्सॉटिक टूरिझम इतकाच दृष्टिकोन होता लोकांचा त्याकडे पहायचा आणि तो मला योग्य वाटत नाही.

IndianRobin.jpg
Indian Robin 2011

पक्ष्यांचे तसे नाही. ते बघायला तुम्हाला उठून मुद्दाम अभयारण्यात जावे लागत नाही, ते तुमच्या आजूबाजूस वावरत असतात. निदान कॉमन बर्डस. दुर्मिळ प्रजातींपर्यंत पोचायचा मला फारसा हव्यास नाही. थोडे कळायला लागल्यावर पक्ष्यांचे विश्व फार सुरेख असते हे जाणवत गेले. चातक पक्षी कसा बरोबर भारतीय मॉन्सूनच्या काळात आफ्रिकेतून भारतात येतो. ऋतुमानानुसार पक्ष्यांचे स्थलांतर हा फार मोठा आणि रोचक विषय आहे. काही पक्षी स्थलांतराच्या काळात पार अमेरिकेतून ऑस्ट्रेलिया पर्यंत न थांबता उडत जातात. मी तेव्हा मुंबईत होतो. शिवडीला येणारे रोहित पक्षी, तेथील इतर पक्षी, कीटक, सँड प्लोवर्स पाहणे ही एक फार इंट्रेस्टिंग ट्रीप आहे. पहिल्यांदा मी बीएनएचएस (BNHS) सोबत गेलो रोहित पक्षी पहायला, नंतर दोनतीनदा एकट्याने गेलो. प्राणी, पक्षी संवर्धन आणि माहिती यातील बीएनएचएस (BNHS)चे कार्य फार मोठे आणि मौलिक आहे. भांडुप पंपिंग स्टेशन, वसईचा किल्ला, कर्नाळा पक्षी अभयारण्य, तुंगारेश्वर, येऊरचे जंगल, बोरिवली राष्ट्रीय उद्यान या पक्षीनिरीक्षणासाठी मुंबईच्या आसपासच्या माझ्या आवडत्या जागा. पुण्यात सिंहगड व्हॅली, पिंपरीची एच ए कॉलनी या काही चांगल्या जागा.

मध्यंतरी आम्ही सासवण्याला गेलो होतो. काय पक्षी दिसले !! एका वडाच्या झाडात दिसलेली तांबटांची कॉलनी मी कधीही विसरु शकणार नाही.

CopperSmithBarbet.jpg
Coppersmith Barbets- Sasawne 2011

खंड्या ज्या कौशल्याने पाण्यात सूर मारतो त्याला 'सुळकन' हाच शब्द योग्य आहे. आपला श्वास घेऊन होईपर्यंत त्याच्या चोचीत मासा असतो. मी पाहिलेला 'ओरिएंटल ड्वार्फ किंगफीशर', मनाच्या कॅमेर्‍यात बंद आहे. तो मला तुंगारेश्वरला दिसला होता. त्यादिवशी मी कॅमेराही नेला नव्हता. अविस्मरणीय रंग असतात त्याचे.

सिंहगड व्हॅली माझ्यामते अक्षरश: पक्ष्यांचा स्टुडियो आहे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी ! पहाटे पहाटे जाऊन तळ ठोकायचा. ओढ्यात पक्ष्यांना डुबकी मारताना पाहणे हा सुद्धा एक सुंदर अनुभव आहे. तिथली शांतता तुम्हाला वेढून टाकते. चांगले फोटो मिळाले काय, न मिळाले काय त्याचे नंतर काहीही वाटत नाही.

गेल्याच आठवड्यात मी हाँगकाँगमधील 'डीप बे' या ठिकाणी, इथल्या 'क्रेस्टेड बुलबुल क्लब' सोबत गेलो होतो. हा येथील दोनांपैकी एक आयबीए (IBA- Important Bird Area) मानला जातो. नष्ट होऊ घातलेल्या प्रजातींमधले ब्लॅक फेस्ड स्पूनबिल (Black Faced Spoonbill) दिसले. दरवर्षी साधारण २०% स्पूनबिल्स हाँगकाँग मध्ये हिवाळ्यात पाहुणे येतात. आम्ही सातेक किलोमीटर वेटलँड तुडवत चालत गेलो होतो. खाडीपलीकडे समोर मेनलँन्ड चीनचा भूप्रदेश दिसत होता.

अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत मी फारसे पक्षी ओळखू शकत नसे. आता रेसिडेंट बर्डस आणि बरेचसे मायग्रेटरी बर्डस बहुतांशी अचूक ओळखू शकतो. आशिष महाबळ आणि मी पहिल्यांदा केरळमध्ये बर्ड डायरी संदर्भात बोललो. एक ट्रीप झाली की आल्यावर फोटो एडिट करणे, चांगले फोटो ठेवणे, नावे शोधणे, ग्रिमेट वाचून, महाजालावर वाचून खात्री करणे, त्यांची नोंद ठेवणे हे एवढे प्रत्येक निरीक्षकाने करायला हवे. ते मी नियमितपणे करतो. त्यातूनच विषय पक्का होत जातो. अजून माझा काउंट दोनशेच्या आसपासच आहे. मला अलिकडेच एकजण भेटला, त्याचा काऊंट १८०० होता. याला म्हणतात पक्षिनिरीक्षक !!

WhiteWagtail.jpg

चांगल्या पक्षीप्रकाशचित्रणासाठी :

१) एथिकल फोटोग्राफीचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यावश्यक. उदाहरणार्थ- फ्लॅश न वापरणे, घरट्यांचे फोटो न काढणे इतर..
२) सूर्योदयानंतरचे दोनतीन तास आणि सूर्यास्ताआधीचे एकदोन तास पक्षीनिरिक्षणासाठी उत्तम असतात त्यामुळेच सूर्यवंशी लोकांचे हे काम नाही !
३) पक्ष्यांचे बिहेवियर माहित असणे चांगल्या फोटोसाठी आवश्यक असतेच. उदाहरणार्थ- फ्लायकॅचर त्यांच्या आवडत्या फांदीवर येऊन बसतात, खंड्या फार सुळकन मासे पकडतो. त्याचीही सहसा एक आवडती जागा असते. अजूनही मला खंड्याचा उत्तम फोटो मिळाला नाही. पाण्यात डुबकी मारायच्या काही आवडत्या जागा असतात पक्ष्यांच्या. तसेच Breeding Plumages are more attractive. ही अशी रहस्ये हळूहळू सवयीने समजतात.

Shikra-Juvenile.jpg
Shikra - Juvenile 2011
MainaDrinkingTadi.JPG

ताडी पिणारी मैना २०११ वसई किल्ला
४) कॉल्सवरुन (विशिष्ट हाकार्‍यांवरुन) पक्षी ओळखता येणे महत्त्वाचे असते. ते मला अजून तितकेसे जमत नाही.
५) चांगल्या प्रकाशचित्रासाठी आपण नक्की पक्ष्यांच्या किती अंतरावर हवे, याची जाण येणे फार महत्त्वाचे. तसेच फोटो नेहमी डोळ्याच्या पातळीवर (eye level) ला हवा. ही इतकी साधी आणि बेसिक गोष्ट आहे, पण हे उत्तम फोटोचे एक गुपित आहे. मला हे समजायला काही वर्ष गेली.

BrahminyStarlingAmravati.jpg
Bramhiny Maina Amravati 2011 Eye- Level चा प्रयोग.

योग्य अंतर म्हणजे किती हे मला पहिल्यांदा अमरावतीला गवसले. मी घरी अंगणात होतो, आणि ही मैना माझ्या अगदी जवळ होती. त्या क्षणी कॅमेरा हाताशी होता हे नशीब. हा फोटो मी अक्षरश: रस्त्यावर लोळून काढला आहे.

ScalyBreastedMunia.jpg
ScalyBreastedMunia -Sasawane 2011

६) माझ्याकडे काही फार चांगल्या प्रतीच्या लेन्स नाहीत, त्यामुळे अजून फार उंचावर विहरत असणार्‍या घार, गरुड, ससाणा सारख्या पक्ष्यांचे, फार चंचल पक्ष्यांचे, खाडीभागात दूरवर राहणार्‍या पक्ष्यांचे चांगले फोटो नाहीत. नवीन निरिक्षकाला सर्वच पक्ष्यांचे फोटो काढावेसे वाटतात. आता मात्र कधीकधी कॅमेरा सोबत असूनही फोटो घ्यायची इच्छा होत नाही. डोळ्यासमोरच्या निसर्गाला आपसूक आपण शरण जातो. या छंदाचे माझ्यासाठी आणि माझ्यापुरते काही असलेच तर हेच श्रेयस आहे. कधी मिळाला तर एखादा चांगला फोटो मिळून जातो आणि कधी फार अट्टाहास केला तर एकही उत्तम फोटो मिळत नाही. साधारण माध्यमिक स्तरापर्यंत कुठलाही छंद जोपासला की पुढे तंत्र आणि सौंदर्य या दोन्हींची ओळख लागते तसेच ते इथेही लागू आहे.
७) सातत्याला आणि शिस्तीला पर्याय नाही अर्थातच. त्याबाबत नव्याने काय सांगणार?

माझ्यासारख्याला फारशी कलेची जाण/दृष्टी नाही, मी फार आर्टिस्टिक, क्रियेटीव्ह फोटो नाही काढू शकत. त्यामुळेही बर्ड फोटोग्राफी मला आवडते. आर्टिस्टिक असलात तर अधिकच उत्तम, नसलात तरी काम भागते. त्यातही वर्गीकरण असे.
१) रेकॉर्ड शॉट- म्हणजे त्या प्रजातीचा पक्षी दिसला रे भौ.. अशी आपल्यापुरती कॅमेर्‍यावर नोंद करणे.
२) उत्तम प्रकाशचित्र- म्हणजे पक्षी उठून दिसणे, बॅकग्राऊंड ब्लर असणे, त्याचा डोळा, त्याचे रंग व्यवस्थित दिसले पाहिजे. फोटो शार्प हवा.
तिथून पुढची पायरी गाठायला मात्र तुम्ही जितके आर्टिस्टिक असाल तितका फोटो सुंदर दिसणार.

ChineseBulbul.jpg

सध्या आमचे वास्तव्य हाँगकाँग येथे आहे. आकाराने जागा लहान असली तरी इथे बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. संख्येने पहायला गेल्यास असे म्हणतात की चीनमधील एकूण पक्षीसंख्येच्या एक चतुर्थांश पक्षी इथे, या छोट्याशा देशात आढळतात. विशेषतः हिवाळ्यात खूप स्थलांतरीत पक्षी येतात. अलिकडेच मी 'हाँगकाँग बर्डवॉचिंग सोसायटीचा' आणि 'क्रेस्टेड बुलबुल क्लबाचा' सभासद झालो आहे. दर शनिवारी सकाळी भटकायला बाहेर पडतो. अनेक समव्यसनेषु लोक भेटतात. समोरच्या माणसासोबत ४ तास जंगल तुडवले तरी आम्ही एकमेकांसोबत बोलूच असे नाही. निव्वळ पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी. हा माझा इथला पहिला हिवाळा. स्थलांतरीत पक्षी (winged) मित्रांची वाट पहातो आहे...

BirdWatcher_0.jpg

आता माझ्या विचारांचा प्रवास पक्षीप्रकाशचित्रणाकडून संवर्धनाकडे हळूहळू वळतो आहे. तरीही कॅमेरा आणि लेन्स अपग्रेड करायचा फार मोह होतो आहे. पाहूया.

बर्डफोटोग्राफी हा एक महागडा छंद आहे एवढे खरे. महागड्या आणि मोठ्या लेन्स लागतात, पक्षी तसे चंचल असतात त्यामुळे भराभरा फोटो काढावे लागतात, कॅमॅराचा FPS (Frames per second) चांगला पाहिजे, चांगली उत्तम प्रतीची दुर्बिण हवीच. छायाचित्रणाचे तंत्रशुद्ध ज्ञान जितके जास्त अवगत असेल तितके अर्थातच चांगले. अजूनही मला इमेज एडिटिंग सुधारण्यास बराच वाव आहे.

SilverEaredMesia.jpg
SilverEaredMesia- Tai Po Kau 2012

कुठल्याही छंदासाठी हवे ते सातत्य. ते अनिवार्य आहेच. उलट करावे तितके कमीच आहे. एखाद्या चांगल्या जाणकाराचे मार्गदर्शन हे मिळाले तर फारच उत्तम, नाही तरी महाजालावर किंवा बर्डवॉचिंग संस्थांमध्ये पुरेसे मार्गदर्शन मिळते. घरच्यांचे सहकार्य हवेच. दर आठवड्याला उठून जायचे म्हणजे आधीच घड्याळाशी जोडल्या गेलेल्या आपल्या आयुष्यात अजूनच तारेवरची कसरत. एक गंमत : माझी मुलगी मध्यंतरी आलेल्या पाहुण्यांसमोर उगाचच भाव खायला कावळा चिमणी दिसले तरी हॉर्निबिल वगैरे म्हणायची. कानावर पडून पडून आणि जिथे शक्य होते तिथे तिला सोबत नेल्यामुळे तिला पन्नासएक पक्ष्यांची नावे माहीत आहेत. कुठल्याही ट्रीपहून मी आल्यावर फोटो आम्ही सगळे एकत्र पाहतो. दिसलेल्या पक्ष्यांची माहिती शोधतो. बायकोलाही आता बरेच पक्षी ओळखता येतात. दर आठवड्यात माझ्या गायब होण्याने तिचा पारा मधूनमधून चढतो, पण एकंदरीत छंदांबाबत तीच जास्त नादिष्ट असल्यामुळे छंदाचे महत्त्व जाणून आहे.

या छंदाने मला काय दिले याचा विचार केला तर मी म्हणेन - संयम. आपण शांतपणे वाट पहावी, पक्षी यायचे तेव्हा येणारच. कधीकधी कितीतरी वेळ घालवून सुद्धा बरा फोटो मिळत नाही. चालायचेच !
पक्ष्यांचे विश्व मनोहर आहे. ते डोळ्यांनी पहायची संधी मिळते आहे. झाडांच्या, पाण्याच्या, निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे याहून उत्तम ते काय!! या छंदाने मला फार आनंद दिला. कुठल्याही छंदाने अजून काय द्यायचे असते ?

सध्या मी पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रणासाठी खालील साधने/संदर्भ वारंवार वापरतो.
याशिवाय मराठी, इंग्रजी पुस्तके आहेतच.
1) India Nature Watch www.indianaturewatch.net
2) Birds of Calcutta www.kolkatabirds.com
3) OBI- Oriental Bird Images www.orientalbirdimages.org
4) Active Mail Groups - Maharashtra Pakshimitra , Birds of Bombay
5) Field Guides: The Birds of Hongkong & South China
Birds of Indian Subcontinent- Grimett, Inskipp
6) Hongkong Birdwatching Society www.hkbws.org.hk
7) BNHS www.bnhs.org
8) Birds Calls and Photography : www.indiabirds.com
www.thejunglebook.com
www.sudhirshivram.com
9) Life of a Bird- Documentary BBC

- अमित रत्नपारखी
शब्दांकनः रैना
**************************

GreyHeronAtDeepBay.jpg

गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा या न्यायाने ज्या काही मोजक्या बर्डिंग ट्रिप्सना मी गेले त्या अनुभवांना जागून या विशेष टिप्पण्या. (घरचा आहेर !)
१) पाहणार्‍यांनाच पक्षी दिसतात. इतरांना नाही. 'पुण्यवान लोकांनाच देव दिसतो' च्या चालीवर वाचावे ! अवतीभवतीचे नेहमीचे पक्षी ओळखू यायला लागल्यावर मी अमितला, 'आधी कुठे होते रे पक्षी? आपल्याला कसे दिसले नाहीत' असे चकित होऊन कित्येकदा म्हटलेले आहे.' त्यातून माझे डोळे आधीच भोकराच्या बिया आहेत.कॅमेर्‍याच्या लेन्समधून तर सोडाच, साध्या डोळ्यांना सुद्धा पक्षी दिसायची मारामार. 'तो पहा, तो पहा, हा डोळ्यासमोर, अगं तो..वरती' असे लोकं म्हणतात. पण आपल्याला दिसलेच नाही मुदलात तर करणार काय? तरी आता सवयीने जास्त दिसू लागले हे मात्र अगदी खरं. तात्पर्य लेख वाचून वर नमूद केलेल्या जागांमधे जाऊन आपण बसलो की हेऽशेकड्याने पक्षी दिसतात वगैरे असे काही होत नाही. निरीक्षण टप्प्याटप्प्याने आणि दमादमानेच पुढे सरकते. कुठला तरी समूह / जाणकार सोबत असायलाच हवा सुरवातीला.

२) आम्ही काही वर्षांपूर्वी बीएनएचएस BNHS च्या एका छोट्याश्या सहलीला गेलो होतो. ऐन उन्हाळ्याचे दिवस, ऊन मी म्हणत होते आणि काय कोण जाणे त्यादिवशी सहल सुरु व्हायलाच उशीर झाला आणि मग फार गर्दी झाली. आणि पंचवीसेक लोकांच्या समूहाच्या पायरवाने पक्षी उडून जायला लागले. शेवटी चक्क हातात पुस्तक आणि 'हा जो आवाज ऐकू येतोय ना तो पक्षी असा दिसतो' असे व्याख्यान झाले. जाम वैतागलो. आणि अज्ञानापोटी शितावरुन भाताची परीक्षा करत मी घायकुतीला येऊन दोन निष्कर्ष काढले. ते तसे तुम्ही काढून बर्डिंग ट्रिप्स बाबत गैरसमज करुन घेऊ नये म्हणून ही कहाणी !! पक्षी दिसू आणि समजू लागायला पुरेसा अवधी लागतो. मग त्यांचे उत्तम फोटो मिळायला अजून कितीही अवधी लागू शकतो !

३) कॅमेरे, लेन्स- मग त्या ठेवायला चांगल्या केस, दुर्बिण, त्यांच्या किमती, लेन्स स्वच्छ करायचा सव्यापसव्य, एकूण सरंजाम आणि त्यांची मिजास (त्यांची म्हणजे त्या वस्तूंची - वापरणार्‍यांची नव्हे), बर्डिंग ट्रीप्स, कॉमन ट्रीप्स, अवघड ट्रिप्स, रानवाटा. या विषयावर अजून एक स्वतंत्र लेख होईल. एकेक करत ते भारूड किती वाढते ही अनुभवायचीच गोष्ट आहे.

४) स्वच्छ मोकळी हवा, पक्षी, उन, पाऊस, वारा, गवत, झाडं, निर्झर, नद्या, समुद्र- निसर्गसुक्तांचा अनुभव घेण्याची सिद्धता याचाच आनंद फार मोठा आहे. आणि त्यावर होणारे अतिक्रमण उघड्या डोळ्यांनी पाहणे/ पाहत राहणे यासारखे दु:ख नाही. यातल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विचार करु लागला, तर गीतारहस्यच गवसायचे एखाद वेळेस. केरळच्या देवभूमीतून आम्ही परत आलो. पक्षी पाहून विस्मयचकित आणि त्याच धुंदीत. दुसर्‍याच दिवशी सकाळी कामावर जाताना तुडुंब वाहून चाललेल्या उकिरड्यावर इग्रेट आणि खंड्या दिसले. अनेक राजस निळ्या खंड्याची प्रतिबिंबे मुंबईच्या गटारांमध्ये पाहताना काहीच न वाटून घ्यायची सिद्धी मला तरी गवसलेली नाही. खाड्या, जलाशये, पक्षी, मासे आणि यत्र तत्र सर्वत्र असलेले 'प्लॅस्टिक' हा प्रबंधाचा विषय होईल.

५) मला नेहमी वाटते प्राथमिक अवस्थेतून माध्यमिक अभ्यासक्रमापर्यंतचे स्थित्यंतर फार मोठे. कुठलाही छंद असो वा काम ! There one starts dabbling into elementary artforms. छंद जिथे पॅशन बनत जातो तिथला तो जाणिवांचा प्रदेश. तो तुम्हाला दिसतो पण तो प्रदेश तुडवणे हे फार अवघड काम. या वाटेवरच्या प्रवासाचे सुरवातीचे दिवस गुलाबी आणि मग नंतर खडतर होत जातात. आपण सामान्य माणसे अनेकविध कारणे देत मध्येच कुठे तरी तो प्रवास थांबवतो. एकेकाळी ज्यासाठी जीव सुद्धा दिला असता त्या सिड्यांवर चहाचे कप ठेवायची वेळ येते. त्या छंदापुरती आपली वाढ खुंटते. कदाचित आवाका मर्यादित असतो, कदाचित सातत्य कमी पडते, कदाचित रस निघून जातो. तीच मोक्याची वेळ. आमच्या घरी बेचक्याबेचक्यातून दोघांचे छंद असेच एखाद्या भिंतीवर पिंपळाची मुळे ठिकठिकाणी वाट फुटतील तशी भसकन बाहेर यावीत तशा अवस्थेत आहेत. आनंद आहेच, पण पुढली वाट शोधायची जबाबदारीही आहे. थोडक्यात, छंदांची व्याप्ती अमर्याद असते, पण आकलनाला मात्र मर्यादा आहेत.

न अन्तः अस्ति, मम दिव्यानां विभूतीनां|
विष्टभ्यां एक अंशेन अहं इदं कृत्स्नं स्तिथः जगत||

- रैना

प्रतिसाद

छान लिहिलय... पक्षी निरिक्षणाला जाणं हा प्रकार खूप बोर असेल असं मला नेहमी वाटतं... कारण रैना म्हणते त्यातला पहिला मुद्दा.. :)
एकंदरीत छंदाची सुरुवात, जोपासण्यासाठी केलेले प्रयत्न आणि छंदाने काय दिलं ह्याबद्दलचा आढावा मस्त घेतलाय.

छान लेख, आवडला.
मला पक्षी खुप दिसत असतात.. पण फोटो काढायला अजिबातच जमत नाहीत.
ऑफिसच्या खिडकीतून त्यांचे उद्योग बघायला खुप आवडतात. काचेमूळे मी त्यांना दिसत नाही, त्यामूळे
जवळून बघता येतात.

बर्ड फोटोग्राफी महाग हे खरय पण कठीण हे त्याहुन जास्त खरं, वसईला घराभोवती , गावी कितीतरी पक्षी दिसतात पण आजपर्यंत मला एकही धड फोटो काढता आला नाहीए.
Indian Robin चा फोटो चांगला आहे.

मस्त लेख. आणि सगळे फोटो एकसे एक!

एक गंमत.. मला आधी पक्षीनिरिक्षण आणि त्यांची फोटोग्राफी याबद्दल फारसे काहीच वाटायचे नाही. मुळात इथं (म्हणजे सिमेंटच्या जंगलात वगैरे वगैरे )पक्षीच नाहीत तर काय करायचे म्हणा असं वाटायचं. पण कॉलेजात असताना एक नवा मित्र मिळाला. त्याला येता-जाता दिवसभरात किती पोपट दिसतात हे मोजायचे वेड!!! बापरे, हे काय फॅड एकेक असं वाटलं. इथं आणि पक्षी आणि तेही पोपट! मोज बेट्या!
पण त्याच्यासोबत राहून काही काळ गेल्यानंतर मीपण नकळत एक चाळा म्हणून तेच करायला लागलोय हे लक्षात आले. अगदी रस्त्याच्या कडेला कोणाबरोबर संभाषणात असलो तरी वर आकाशातून उडालेल्या पोपटाची आपण मनात नोंद ठेवतोय हे एकदा लक्षात आलं. 'एक आणखी' पोपट दिसला की मनात छोटंसं भारी वाटतंय हे पण जाणवलं. आणि हळूहळू आपल्या आजूबाजूला अजूनही पक्षी आहेत आणि ते उडते-फिरते आहेत हे लक्षात आले. तेव्हा रैनानं लिहिलंय ते "पाहणार्‍यांनाच पक्षी दिसतात. इतरांना नाही. 'पुण्यवान लोकांनाच देव दिसतो' च्या चालीवर वाचावे !" हे तंतोतंतच!

पक्षांचे चांगले फोटो बघायला आनंद वाटतो. काही प्रयत्न स्वतः करून बघितले तेव्हा हा काही 'दूधभात' नाही हे खटक्यातच कळले. त्यामुळे तुम्हा पक्षी-छायाचित्रकारांविषयी आणि तो छंद जोपासणार्‍याविषयी- हे म्हणजे 'बापलोक' असं वाटतं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

सुरेख लेख. अथपासून इतिपर्यंत पकड सुटली नाही. वाचतच राहावासा वाटला. फोटो खूप आवडले :)

सुरेख लेख आणि फोटो :)

छान, प्रामाणिक लेख आणि मस्त फोटो!
>>या छंदाने मला काय दिले याचा विचार केला तर मी म्हणेन - संयम. >>
हे वाक्य खूप आवडले.

पाहणार्‍यांनाच पक्षी दिसतात. इतरांना नाही >> खरंय!

छंदाचा प्रवास मस्त उलगडला आहे. सुंदर फोटो.

उत्तम छंद. उत्तम लेख व उत्तम फोटो.

मस्त लेख.. छान निरीक्षण !

मला या लेखामधला down to earth approach फार आवडला.. :)

चांगलं लिहीले आहेस अमित. एकदम साधं सरळ. रैना छंदांबद्दल म्हणते तसे माझे फोटोग्राफीबद्दल झालय, स्वतःला उत्तम फोटॉग्राफी यावी असे मला नेहमी वाटते पण त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, उत्साह यात मी फार कमी पडते. शेवटी फोटोग्राफी इस नॉट माय कप ऑफ टी असे मी स्वतःला सांगून टाकलेय.
तुझे जसे पक्षीनिरीक्षणाबद्दल मत आहे तसेच माझे पॉटरी बद्दल आहे, एकुणात सगळेच छंद संयम शिकवतात तर.

अमित्/रैना,

सुंदर... सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे एकंदर छंद व प्रत्त्येक फोटो घेताना लिहीलेला प्रामाणिक अनुभव.. ऊगाच कुठलाही टेक्नॉलॉजिकल वा फिलॉसॉफिकल आव न आणता जे मनात आहे तेच कॅमेर्‍यात व लिखाणात ऊतरवणे हे फार आवडले.

पुढील छंद्प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!

Lekh aaNi phoTo mastach!
lekila shaLet soDa ANayala roj payee jate. khup chan chan pakshi disatat paN phoTo kadhayala kadhee jamel dev jaaNe!

खुप सुंदर लेख आणि फोटो तर एक से एक...लाजवाब!

फोटो छान आहेत हे आधिच कबुल करतो.. पण मनात एक शंका आहे.... बहुतांश फोटो मधे पक्षी जे तुमच मेन ऑब्जेक्ट आहे ते फ्रेमच्या मध्यभागी (सेंटर) आहे. तुम्ही रुल ऑफ थर्ड वापरलेला नाही... याच काहि विशेष कारण आहे का?
(शंका चुकीची असल्यास/वाटल्यास क्षमस्वः)

अमित, झक्कास फोटू...
रैने, एकदम साधं तरीही प्रभावी शब्दांकन.
<<छंदांची व्याप्ती अमर्याद असते, पण आकलनाला मात्र मर्यादा आह>> ह्याची जाणीव व्हायला लागते, तिथे छंदातून ज्ञानाची कवाडं उघडायला लागतात. नेमके तेव्हाच आपण पंख, पाय आवरून घेतो :(
सुंदर लेख

अमित आणि रैना सुंदर लेख!

अमितची पक्षीनिरिक्षणाची सुरवात वाचताना मला आरशात बघतोय की काय असा भास होत होता. अगदी हुबेहुब. BNHS सोबत शिवडीला पक्षीनिरिक्षणाची सुरवात झाली आणि या छंदाने अगदी झपाटून गेलो. आजपर्यंत माझ्या भात्यातही ५० पेक्षा अधिक पक्ष्यांची नोदं आहे. :)

सुंदर, वरच्या सर्वांनाच अनुमोदन.

अमित, रैना सुरेख लेख.. फोटो मस्त आहेत..

धन्यवाद. आवर्जून अभिप्राय आणि पोच देणार्‍या सर्वांचे मनापासुन आभार. :-)
वंदना, हिम्या, योग, रुनी, वत्सला, सुनिधी, पराग, गजानन, इंद्रा, योरॉक्स, आनंदयात्री, पाटिल, मंजिरी,दिनेशदा,दाद, शा.गं, बित्तुबंगा,अगो :- 'मंडळ अत्यंत आभारी आहे'. ;-)

इंद्रा- मस्त वाटले वाचून. शिवडीला बेस्ट म्हणजे खूप पक्षी दिसतात. सर्व नवशिक्यांचा हुरुप वाढतो. एकेक पक्षी पहायला नंतर किती कष्ट करावे लागतात त्याची कल्पना तेव्हा येत नाही ना. :फिदी:
शापित गंधर्व- धन्यवाद. मी विचारते रुल ऑफ थर्ड का नाही फॉलो केला ते. ;-)
गजानन- :हाहा: पोपट मोजणे लै भारी. कावळे पण फार दिसतात सुरवातीला. ;-)

तिथे छंदातून ज्ञानाची कवाडं उघडायला लागतात. नेमके तेव्हाच आपण पंख, पाय आवरून घेतो>>> दाद, यु सेड इट. परफेक्ट.

अमित आणि रैना
छंदप्रवास छान उलगडलात! फोटो खूपच आवडले!

प्रामाणिक लेखन आणि झक्कास फोटो मस्त वाटलं वाचताना बघताना :)

बिएनएचएस बरोबर आम्हीही एक सफर केली खरी शिवडीला पण माझ्या मेंदूतून बरिचशी नावं पुसटलीच गेल्येत काही ठराविक पक्षी सोडले तर मी नावासकट अजूनही ओळखू शकत नाही :( त्या सफरीचा परिणाम म्हणून एक छानशी दुर्बीण खरेदी मात्र झाली.

अहाहा...........सुरेख छायाचित्रं.......आणि लेख सुद्धा !!

मस्तच लिहीले आहे अमित. सिंहगड व्हॅलीची आपली ट्रीप छानच झाली होती. स्वर्गीय नर्तक न दिसल्याची रुखरुख मात्र राहुन गेली. :)

छान लिहिलय. फोटो तर एकदम भारी आहेत.

अमित आणि रैना
मस्त लेखन. फोटोतर अप्रतीमच.
मी ही असच पक्षी पहात पहात फोटो काढू लागलो. माझ्या घराभोवती खंड्या, घारी, बुलबुल, पाण कोंबड्या, पोपट, पांढरे आणि ब्राउन बगळे, धनेश, कोतवाल आणि बरेच छान शीळ घालणारे छोटे पक्षी असतात. एकदाच शिक्रा, चश्मेवाला, आणि ब्राह्म्णी मैना दिसली होती.

मस्त लिहीलय. फोटो अतिशय सुंदर आहेत. :)

अमित, रैना सुंदर लेख आणि सुंदर फोटो.

छान आहे लेख .. काहीकाही फोटो तर फारच सुरेख आहेत ..:)

रैना ने लिहीलेला भाग स्वतंत्र चालला असता .. लेखन शैलीतल्या आणि विषयाचा बदललेला फोकस ह्यातील फरकामुळे तो भाग ह्या लेखात अनावश्यक वाटला ..

सुंदर लिहिलंय, दोघांनीही.
'लेख' असं स्वरूप नाहीये, गप्पा मारल्याचा अधिक feel आला, त्यामुळे जास्त आवडलं. :)