गढीgaDhee 2.1_f.jpg जुनाट गढीच्या वाटेत लागते भरल्या दिसांची राई
कोमट ओठांना अजून गाभूळ चवीचा आठव येई

हिरव्या दिशांना उडत गेलेले उर्मट पंखांचे वारे
फुटक्या वेळेला उन्हाचे काहूर सोसती उघडी दारे

नक्षीचे कोनाडे, उत्तुंग कमानी, काचेत प्रकाश दडे
सातही रंगांचे भोवरे खेळती आतल्या महालापुढे

गोलट पायर्‍या चढत चालल्या घागरी फुंकत पाणी
शंभर खांबांचे मंदिर, इथेच पूजेला यायची राणी

खांबांच्या वरती चढत गेलेले कमळदेठांचे जाळे
तटाच्या दगडी भिंतीचे सौष्ठव भक्कम कुरुंद काळे

खोलात गेलेली पिंडीची शाळुंका दुधाने नाहून गेली
उरलीसुरली फुलांची रांगोळी पाण्याने वाहून नेली

उभार चवर्‍या ढाळत बाहेर पिंपळ शाश्वत उभा
उतली मातली पांथस्थसावली घालत साकडे नभा

कंकणसुखाच्या व्रताची एकच कहाणी बावनकशी
राणीच्या श्रद्धेची पालखी निर्माल्यवाटेस पोचली अशी

सोन्याच्या समया गप्पच राहिल्या जळते डोळे मिटून
गाभारा रिकामा टाकून रुसले देवांचे पंचायतन

गढीच्या पाठीला पैंजणभेटीची दिसली घुंगरे काही
बाकीचे सारेच मातीच्या पोटात, आता ते विचारू नाही

-जया एम

प्रतिसाद

विलक्षण! जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचं प्रतिबिंब दिसतं आहे गढीत! सगळं वातावरण डोळ्यांपुढे उभं राहिलं. काय सही शब्दकळा आहे आणि कविता ऐकताना तिची लय अक्षरशः संमोहित करतेय!

आहाहाह! काव्य, शब्दकळा, आशय..... नं १

अप्रतिम!

अफ्फाट वर्णन! अगदी समोर उभं राहिल असं...
सादरीकरणातही लय छान सांभाळली गेली आहे..
अभिनंदन! :)

फार गूढसुंदर कविता.. जी.एं.ची तर आठवण येतेच आहे,पण स्वतःचा अभिजात डौल असलेले शब्द.

क्या बात है !!

राणीच्या श्रद्धेची पालखी निर्माल्यवाटेस पोचली अशी >>> !!

सही !! एकदम उच्च !!

बापरे... ही कविता वाचणं हा एक विलक्षण अनुभव आहे. वेगळ्याच श्रीमंत शब्दकळेमुळे ऐकल्यावर, पुन्हा वाचणं अधिक पसंत केलं मी. ही कविता पोचायला ती माझ्याच नजरेनं वेचून आत पोचवावी लागली (सॉरी, जया एम... सादरीकरण छान आहे. पण तुमची कविताच तितकी गर्दं आहे... )
वेचावं तितकं गहन, गूढ...
अप्रतिम, अप्रतिम... आज आता अजून काही वाचणं नाही!

कविता- सुंदर, सुंदर सुंदर................

सादरीकरण मात्र त्या मानाने बरेच एकसूरी वाटले..

दाद +१. मलाही तुमच्या कविता ऐकण्यापेक्षा त्या स्वतः वाचून अनुभूती घ्यावी असे वाटते. दुसर्‍या कवितेखालच्या प्रतिक्रियेत म्हटलं तसं तुमच्या कविता वाचतावाचता आपोआप एक चित्र रेखाटले जाते. कवितेतले शब्द इतके भुरळ घालणारे असतात की ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी पिऊन घ्यावेत असं वाटतं.
विलक्षण, गूढगर्भ कविता !

वा! सुंदर!
जे सगळं वर्णनात आलंय ते सुंदर आहेच, पण जे 'आता ते विचारू नाही' आहे ते फार फार सुंदर आहे!
तुमच्या कविता नेहमीच आवडतात.

बापरे... ही कविता वाचणं हा एक विलक्षण अनुभव आहे. >> ++१
काय सही शब्दकळा आहे >. ++१

सुंदर

भरल्या दिसांची राई, गाभूळ चव-आठव.. सारं काही सुंदर!