पंढरीकाका अन् तबल्याची भाषा

मा

झ्या अडनिड्या वयातली ही गोष्ट. म्हणजे आपल्याला बरंच काही येतंय, समजतंय अशा गैरसमजातले हे काही महिने किंवा वर्ष असतात. आजूबाजूचा समाज कधीकधी त्याला खतपाणीही घालतो. आई-वडील आणि इतर वडीलधारे ह्या खड्ड्याला वळसा घालून प्रवास व्हावा म्हणून खूप प्रयत्नात असतात. आपले पाय जमिनीवर नाहीत आणि डोकं आभाळात अशा सुरेख गैरअवस्थेत आपण आत्मविश्वासाने चालत रहातो. तबला शिकण्याआधी अनेक वर्षं कथ्थक शिकले. ताल अंगात होताच, घरी वाद्यं होती. कसा कोण जाणे, पण तबला वाजवताच येत होता. नाच थांबला आणि मग रीतसर तबला शिकायला लागून तीनेक तरी वर्षं झाली होती.

माझा नाच सुटला, तरी मी अनेकदा नाचाच्या क्लासला जायचे. गुरुजींना, नटराजाच्या मूर्तीला सादर नमस्कार करून दोन पावलं टाकायची, इतर मुलींबरोबर. मग गुरुजींची आज्ञा घेऊन तबला समोर घेऊन साथीलाही बसायचं. सगळे तोडे, तुकडे आधीच पाठ आणि आता हातातही. तेव्हा तर अभिमानाने,आनंदाने भरून आलेला गुरुजींचा चेहरा बघून अगदी सार्थक झाल्यासारखं वाटायचं. गुरुजीही अभिमानाने "...आपलीच विद्यार्थिनी" म्हणून नावासह ओळख करून द्यायचे. क्लास घरापासून दूर होता तेव्हा, अडीच वर्षांची असल्यापासून खांद्यावर घेऊन मैलांची तंगडतोड केलेली माझ्या बाबांनी. आता क्लास अगदी घराजवळ आला. माझ्याबरोबर अन् अनेकदा मी नसतानाही बाबा नाचाच्या क्लासला जाऊन येत. गुरुजींशी गप्पा, जुन्या आठवणी, अशी छान संध्याकाळ घालवून परत येत. नुकताच माझ्या तबल्याच्या क्लासचा वार्षिक गुणदर्शन सोहळा झाला होता. मी सोलो वाजवून बरीच वाहवा मिळवली होती. "मुलगी असून तबला?" हे वाक्यं आधी टोचायचं, आता त्यातही मजा वाटायला लागली होती.

एके दिवशी दिवसभर कुठेतरी उंडारून संध्याकाळी घरात शिरतेय तर दिवाणखान्यात बाबा कुणाबरोबर तरी बोलत बसले होते. कोल्हापूर, सातार्‍याकडे घालतात तसा पांढराशुभ्र लेंगा, तशीच स्वच्छ टोपी अन् सदरा. खांद्याची शबनम समोर मांडीवर घेतलेली अन त्यात डावा हात. कोपर्‍यावरच्या कोणत्याही रसवंतीगृहात शोभून दिसेल असा माणूस वाटला मला. बाबांच्या ओळखीचा असेल कुणी म्हणून हातानं नमस्कार करून आत जाण्यासाठी वळले. "आलीस? हे श्रीयुत पंढरी. अगं, आपल्या नाचाच्या क्लासमधे तबला वाजवतात. आपल्याकडे यायला त्यांना आज वेळ मिळाला.त्यांना तुझा तबला ऐकायचाय आणि तुलाही काही नवीन शिकता येईल. सुरेख हात आहे त्यांचा." बाबांनी ओळख करून दिली.

मी पुढे होऊन वाकून नमस्कार केला. त्यांनी हसून "अरे अरे, नमस्कार कशाला! सर खूप सांगतात तुझ्याबद्दल. मलाही ऐकायचाच आहे तुझा हात. काही वाजवशील?"

मला कसलातरी टीव्हीवरचा कार्यक्रम खुणावत होता, दुपारपासून इथं-तिथं करून झाल्यावर आता झालच तर अभ्यासही भरीला. "तुझ्यासाठी थांबले होते ते इतकावेळ. जा हातपाय धुवून ये तोपर्यंत आम्ही अजून एक चहा घेतो," बाबा मला अगदी व्यवस्थित ओळखतात. आता सुटका नव्हती.

मी थोडी चिडूनच आत गेले. आईने दुसर्‍या चहाचं आधण ठेवलं होतं. हात-पाय धुवून तिच्या पदराला तोंड पुसत मी तक्रार केली. "बाबा म्हणजे ना, कोणालापण कधीपण काय घेऊन येतात? मला अभ्यासपण आहे आणि मला आधी सांगायचं तरी, मी काहीतरी चांगलं बसवून ठेवलं असतं. आता आयत्यावेळी काय वाजवायचं? तू सांग ना बाबांना."

शेवटच्या वाक्यापर्यंत माझाच स्वर मलाच फसवल्यासारखा होत गेला. आईनं रोखून बघितलं अन चहाचे कप हातात ठेवले. "आत्ताआत्तापर्यंत कार्यक्रमाचा काय तो रियाज केलास त्यातलं विसरलं का काय सगळं इतक्यातच?" इतकं स्वच्छ तिरकं बोलून ती वळली सुद्धा. हातात चहाचे कप घेऊन तणतणताही आलं नाही.
"दमली असशील तर राहू दे, पुन्हा येईन." पंढरीकाका मऊ स्वरात म्हणाले. माझ्या चेहर्‍यावरचे भाव इतके सदृश होते? "नाही नाही," असं म्हणत मी गडबडीनं चहा समोर ठेवला आणि तबला काढला. समोर घेऊन नमस्कार करून मी दोन-तीनदा चाट-थाप वाजवली अन संमतीसाठी त्यांच्याकडे बघितलं. "लाव ना सुरात, मी लावून देऊ?" काकांचे कान जबरी तयार दिसत होते. दोन-चार मिनिटं वाजवायचं तर कशाला लावत बसायचा सगळ्या घरात तबला? ही माझी पळवाट!

"नको नको मी लावते ना," असं म्हणून मी तबला लावायला घेतला. पंढरीकाका पेटीचा सूर धरायला उठत होते पण बाबांनी त्यांना थोपवलं अन स्वत: सूर धरला. "हं ठीकंय, काय वाजवतेस?" दोनवेळा सगळ्या घरात ठोकूनही चाट-थाप वेगळा वाजणारा तबला ऐकून काकांनी म्हटलं असणार. तबला तसाही जुनाच झाला होता.
"पेशकार आणि थोडे तुकडे... एकतालात," असं म्हणून मी डोळे मिटून पेशकार वाजवायला सुरुवात केली. काकांना राहवेना, ते उठले अन आमच्यात खाली येऊन बसले. बाबांच्या समोरची पेटी घेऊन त्यांनी अत्यंत सुंदर लहरा वाजवायला सुरुवात केली. मी हसून बघितलं अन क्षणात माझ्या चेहर्‍यावरचं हसू पुसलं गेलं.

पेटीचा भाता ओढणार्‍या डाव्या हाताला मनगटाच्या पुढे एक वेडावाकडा मांसाचा गोळा होता. अंगठ्याच्या मुळाकडे एक पेरच अन पहिलं बोटच नव्हतं. करंगळी अन अनामिकेचीही एखाददुसरीच पेरं! मी लय चुकले, सम चुकले, पुढे काय वाजवायचं ते विसरले. काकांनी समजून लहराच जमवून घेतला. मी उरलेलं वाजवलं कसंतरी. त्या हाताकडे बघायचं नाहीये. पण तरीही चोरून नजर जातेच आहे. ते त्यांच्या लक्षात येऊ न देण्याची केविलवाणी धडपड! ह्या सगळ्यातून रियाज केलेलं चक्कूताड्या-घोटाताड्या सारखं यांत्रिकपणे हातातून वाहत राहिलं.

'... हे तबला वाजवतात असं काय म्हणाले बाबा? बरे आहेत ना? पेटी वाजवत असतील... छान लहरा वाजवतायत. मला काय आणि कसं शिकायला मिळणार म्हणे ह्यांच्याकडून? डग्ग्याचा आवाज म्हणजे नक्की काय येत असेल?... तबल्याच्या गुरुजींकडे काय शिकणंच चालू आहे ना? काय नवीन आणखी शिकणं?... बाबा म्हणजे ना...’ डोक्यात हे चक्रसुद्धा चालू होतंच.

शेवटी जलद गतीत दोन रेले-बिले जरा तयारीनं वाजवून थांबले. काकांनी अगदी पुढे वाकून माझा हात हातात घेतला, "छान! चांगली तयारी करून घेतली आहे, तुझ्या गुरुजींनी, वा वा! आपले सर म्हणतात ते अगदी खरं... खरच चांगला हात आहे."
"...तुम्ही काही वाजवता, पंढरी?" बाबांनी त्यांना विचारलं आणि माझ्या पोटात खड्डा पडला. कुठेतरी ते नक्की कसा वाजवत असतील डग्गा ह्याची मला उत्सुकता तर होतीच. तबल्यात आपण कुठे आहोत ते कळण्यासाठी ते कुठे आहेत त्याची तपासणीही हवीच होती. माझं वाजवून झालं होतं तरी पोटात काय म्हणून फुलपाखरं आली होती ते कळेना.

"काय? वाजवू का?" त्यांनी माझ्याकडे बघून विचारलं
ते वय तसं का मीच मुळात तशी बावळट? पण मनातलं चेहर्‍यावर धोधो दिसत असणार त्याशिवाय का असं विचारतील ते? मी वरमून गडबडीनं, "हो हो, विचारता काय काका? वाजवा नं प्लीज," असं म्हटलं.

त्यांनी हसून तबला पुढ्यात घेतला आणि उजव्या हातात हातोडी उचलली. मला सूर धरायला सांगून अतिशय एकाग्रतेने एकेका घरात तबला, पुन्हा चाट-थाप जुळवीत लावला. उजव्याच हाताने हातोडी तोलीत होते अन त्याच हाताने तबला वाजवून बघत होते. त्यामुळे वेळही लागला. पण एकदा लागल्यावर सगळ्या घरांमधून एका सुरात वाजणारा तबला ऐकून मलाच भूल पडली. मी लावलेला तबला मुलांच्या आवाज फुटण्याच्या काळात एका वाक्यात दहावेळा पिचणार्‍या आवाजासारखा वाटला मला.

त्यांनी सांगितल्यावरून मी तीनतालाचा लेहरा धरला पेटीवर. सुरू करण्यापूर्वी मला थांबायला सांगून ते म्हणाले, "मी वाजवताना डोळे मिटून ऐकायचं बरं का, बघायचं नाही. चालेल?" माझ्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्हं अन् हताश भाव बघून डोळे मिचकावत पुढे म्हणाले, "ट्रेड शिक्रेट आपलं!"

हातावर ताल देत त्यांनी आधी कथ्थकचाच एक तोडा म्हटला, मला अगदी अगदी माहीत असलेला. मी डोळे मिटले, अन् अतिशय लयदार तीनताल ऐकू येऊ लागला. डग्ग्यावर किंचितच पण घुमारा असलेला धा अन धिन वाजत होते. हे कसं शक्य आहे? डग्गा वाजवताना पहिलं बोट, तळव्याचा नागफणीसारखा विशिष्ट आकार, त्याला जोड म्हणून मिळालेला अनामिकेचा जोर हे सगळं सगळं हवंच. ह्याविना डग्गा वाजूच कसा शकतो? अन् तोही इतका घुमारदार?

न राहवून मी डोळे उघडले. माझ्याच नकळत माझ्याकडून लेहरा वाजायचा थांबला. डोळे विस्फारून मी त्यांच्या डाव्या पंजाच्या हालचालीकडे अपलक पहात राहिले. एक विशिष्ट जलद हालचाल, किंचित वेगळ्या पद्धतीने मनगटाने दिलेला जोर अन् घीसकाम ह्यातून जमवलेला चमत्कार होता तो!

पेटी सोडून,स्वत:ला विसरून मी हातावर ताल द्यायला सुरुवात केली अन् हसून पंढरी काकांनी तोडा वाजवायला. आता मात्र माझे मीच डोळे मिटून घेतले. प्रत्येक बोल खणखणीत. लखलखीत सोनशिक्क्याचा! हवा तिथे घुमारा, हवा तिथे घीस. जोराचे बोल मोठ्या आवाजात वाजत होते अन् अगदी नेमक्या ठिकाणीच नाजूक नजाकत.

daad katha 2_f.jpg

शेवटचा समेचा "धा" डग्ग्यावर संपूर्ण हाताने जोरदार वाजवून पंढरीकाकांनी वादन संपल्याची खूण करीत तबल्यावर हात ठेवला. तेव्हाकुठे आपण श्वास घेतच नव्हतो की काय असं वाटून छातीभरून श्वास घेत मी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. माझ्या छोट्या,अगदी उबदार, बांधीव, कौलारू कलेच्या घरकुलात हा चमत्कार होता. माझ्या डोळ्यांदेखत असा सामोरी, अशक्य म्हणावं असं घडत होतं.

मला प्रश्न विचारायला न लावता पंढरी काका बोलत राहिले.
"पखवाज वाजवायचो. लेथ मशीनवर एक दिवस हात गेला. काय उरलं ते उरलं, गेलं ते गेलं. मधली दोनेक वर्षं तडफडून घालवली. पखवाजाची धुमपुडी ह्या हातानं वाजवताच येणार नाही. मग तबल्यावर डग्गा 'ढाम ढाम' वाजवीत भजनात वाजवीत राहिलो. आमचे पखवाजाचे उस्ताद तबलाही शिकवायचे. एक दिवस ते एका विद्यार्थ्याला बाया वाजवायचं कसब खोलून दाखवताना समोर बसून ऐकलं. दिवस-रात्र समोर बाया घेऊन बसलो. खूप यातायात केली आणि ते टेक्निक तयार झालं. परफेक्ट नाही, पण कामचलाऊ आहे, निभावून नेतो."

"पण काका, आधी किंचित मनगटाने दाब, नागासारख्या पंजाने मग डग्ग्यावर मधल्या बोटाने आघात, पण त्यासाठी नुसता मनगटाचा जोर उपयोगी नाही. पहिल्या बोटाची, तिसर्‍या बोटाची त्याला मदत... ", मी धा वाजवायचा म्हणजे काय ते काकांना सांगत होते.

मला मधेच थांबवत काका म्हणाले, "हो, पण मला बोटं नाहीत वगैरे डग्ग्याला कुठे ठाऊक आहे? मी त्याला 'धा'च वाजवायला सांगतोय फक्त वेगळ्या पद्धतीनं"

मी नि:शब्द झाले. मेंदूला झिणझिण्या आल्या. मी एक वाजवणारी अन् तबला एक वाद्य. त्यातून विशिष्ट बोल वाजवण्याची विशिष्ट पद्धत. ती वापरली तरच तबल्यातून तो बोल येणार. पण हे इतकं सरळ नाहीये. किंबहुना हे त्याहूनही अधिक सोप्पं आहे.

मी तबल्याला एका विशिष्टं पद्धतीनं आजवर सांगत आलीये. अन् तो ऐकत आला. माझी बोटं त्याच्याशी संवादत राहिली, तो प्रतिसादत राहिला. काकांनी त्याच्याशी संवादण्याची वेगळी भाषा शोधली. बिन बोटांची. मूकबधिरांची असते तशी साईन लॅंग्वेज? त्याला कळेल अशी... अन् तो पुन्हा बोलू लागला. माझ्या पोटात मोठ्ठा खड्डा पडल्याचं मला अजून आठवतं. काय करावं ते सुचेना. मानेवर काटे आले आणि डोळ्यांत पाणी येऊ लागलं होतं. आत्ताच्या ह्या वयाची समज असती तर मी त्या क्षणी त्यांच्या सुक्या-भेगाळल्या काळ्या पायांवर डोकं ठेवलं असतं!

"तुम्ही घरी बोलावून इतकं कौतुक केलं. माझ्या गरीबाकडून एक भेट! तुला लग्गी बनवण्याची एक पद्धत सांगतो." मी भानावर आले. पंढरीकाका हसतात तेव्हा त्यांचे डोळे चकाकतात अन कडांना सुरकुत्या पडून डोळेही हसतात असं माझ्या एकदम लक्षात आलं. "लग्गी बनवायची पद्धत? म्हणजे पारंपारिक असे लग्गीचे बोल नाहीत. लग्गी आपण बनवायची?" माझ्या इवल्या जगात मी म्हणून तबल्याच्या भाषेत काही बनवणं, घडवणं नव्हतच. कुणी शिकवलेलं लिहून दिलेलं घोटणंच.

पंढरीकाकांनी मग एखादा छोटा बहारदार तुकडा घेऊन तो दुप्पट लयीत एखाद्या तालाची लग्गी म्हणून कसा वापरायचा ते समजावून सांगितलं. रूपक तालात एक वाजवूनही दाखवली. मी फक्त उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या. कितीही प्रयत्न केला तरी आजूबाजूच्या कशाकशाकडे लक्षं लागेना. आपली आपण खटपट करीत वेगवेगळ्या तालांसाठी लग्गी बनवण्याचा सपाटाच सुरू केला. तिथल्या तिथेच!

सुरुवातीला काका कौतुक करीत असल्याचं ऐकू आलं. मधेच कधीतरी ते निघाल्याचं जाणवलं. मी उठून वाकून नमस्कार केल्याचं आठवतं. पण बाबांनी पाकिटात घालून पैसे दिले. ते आईला आत जाऊन भेटून गेले. जाताना पुन्हा पुन्हा मला तबला वाजवत राहण्याबद्दल, रियाज करीत राहण्याबद्दल सांगून गेले. ह्यातलं मात्र काहीकाही आठवत नाही. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमधून गजलांना, भावगीतांना, भजनांना, पंढरीकाकांच्या तंत्रानं दुप्पट लयीत लग्गी लावून खूप वाहवा मिळवली. अगदी प्रत्येकवेळी नाही पण एकटी असले की, रियाज करताना ह्या ऋणाची आवर्जून आठवण होत राहिली, जाणीव होत राहिली.

पंढरीकाकांना भेटत रहायला हवं, शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्याकडून. कलेतलं अन् आयुष्यातलंही, हे कळण्याचं ते वयही नव्हतं बहुतेक! मोठी झाले तशी जाणीव होत राहिली. त्या दीडेक तासांत पंढरीकाकांनी काय काय दिलं? परतफेड करता येणार नाही असंच खूप काही.... किंबहुना सगळंच.

त्यांना जसा तबला हाताळताना बघितलं तसा तबला हाताळते मी, प्रेमानं. तबल्यातून एखादा बोल वाजतो म्हणजे नक्की काय होतं? अजून वेगळ्या पद्धतीनं वेगळे आवाज ह्या वाद्यातून काढता येतील का? ह्यावर अभ्यास करण्याइतकी चिकाटी नसली तरी ती एक दृष्टी आलीये. घराण्याचा अन विशिष्ट अंगानं वाजणारा तबला म्हणजेच शुद्ध तबला अशी ती संकुचित न रहाता, पंढरीकाकांमुळे ती अधिक व्यापक झाली. माझ्याकडे काय आहे अन् काय नाही ह्या जमाखर्चा पेक्षा, माझ्याकडे काय आहे अन् त्याचा मी काय उपयोग करतेय हा विचार अधिक महत्त्वाचा हे ध्यानात आलं.

आपल्याला तबल्याची भाषा येते त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे ते आपलं म्हणणं तबल्याला कळू शकणं. मी तबल्याचे बोल अस्खलित बोलू शकते आणि ते वाजवू शकते ह्यापेक्षा अधिक कठीण आहे ते तबल्याला माझी भाषा समजणं अन त्यानं माझ्या हातून बोलणं. ह्यातलं कोणतंच कसब माझ्या हातात खरच नाही. दोन्ही हात अन बोटं शाबूत आहेत अशा श्रीमंतीतल्या कर्मदारिद्र्यानं ते क्षितिज अजूनतरी माझ्या कवेपल्याड ठेवलंय. पण नजर?
पंढरीकाकांनी आपल्या बिनबोटांच्या हातानं तिला धरून स्वहस्ते त्या क्षितिजापार नेऊन ठेवली...

- दाद

प्रतिसाद

__/\__

नेहमीप्रमाणे छानच, शलाका..
एक मात्र आहे, ह्या लेखानिमित्ताने, अलगद ओंजळीत , न मागताही अमूल्य दान टाकून गेलेल्यांची मनोभावे आठवण झाली, त्यांना मनोमन दंडवत घातला... त्यासाठी विशेष आभार

नेहमीप्रमाणेच ... मस्त मस्त आणि मस्त.
माणसं सगळ्यांनाच भेटतात मात्र प्रत्येकात दडलेला ईश्वरी अंश शोधनं जमायला ईश्वराचे आशीर्वादच हवेत आणि लिहायला एक निखळ मन ... न यु गॉट इट!!!

___/\___

तुमचे लेख वाचणं हीच एक प्रकारची मेजवानी असते :)
हा लेख वाचल्यावर लगेच मी माझ्या काही तबलावादक मित्रांना पाठवला आहे.
>>मला मधेच थांबवत काका म्हणाले, "हो, पण मला बोटं नाहीत वगैरे डग्ग्याला कुठे ठाऊक आहे? मी त्याला 'धा'च वाजवायला सांगतोय फक्त वेगळ्या पद्धतीनं"

मी नि:शब्द झाले. मेंदूला झिणझिण्या आल्या. मी एक वाजवणारी अन् तबला एक वाद्य. त्यातून विशिष्ट बोल वाजवण्याची विशिष्ट पद्धत. ती वापरली तरच तबल्यातून तो बोल येणार. पण हे इतकं सरळ नाहीये. किंबहुना हे त्याहूनही अधिक सोप्पं आहे. >>

हे वाचतानी मेंदूला झिणझिण्या आल्या तर..

सुंदर.. नेहमीप्रमाणेच..

नतमस्तक.

दाद.....अशक्य लिहितेस.
तुझ्या लेखातून उतरलेल्या व्यक्तिरेखा आम्हाला प्रत्यक्ष भेटल्या असं वाटतं गं... !! कसलं शब्दप्रभुत्व यार....... अंगावर काटा येतोच !!
पंढरीकाकांना दंडवत !! तुझी आणि त्यांची पुन्हा भेट होवो हीच प्रार्थना !!
जियो जानेमन !!

सुरेख लेख नेहमीप्रमाणेच !!

सुंदर..

सार्‍यांचे पुन्हा पुन्हा आभार. पंढरीकाकांसारखी "नजर" देणारे तारे तुमच्याही आयुष्यात येवोत... अनेक येवोत.

अप्रतिम अनुभव वर्णन केला आहे.
फारच छान.

__/\__

अधिक काही लिहू शकत नाही
एक एक शब्द, एक एक वाक्य जीवाचा ठाव घेणारं

<<<दोन्ही हात अन बोटं शाबूत आहेत अशा श्रीमंतीतल्या कर्मदारिद्र्यानं ते क्षितिज अजूनतरी माझ्या कवेपल्याड ठेवलंय.>>> अगदी अगदी :) __/\__ दाद, तुमच्या लिखाणाला आणि पंढरी काकांना :) याऊपर अजून काही लिहिवत नाही.

दाद खरंच हा अनुभव वाचून शहारा आला...

_____/\_______

मस्त! नेहमीप्रमाणेच अप्रतिम

वरच्या सगळ्या प्रतिसादांना + १. अतिशय सुरेख लिहिलंय, नेहेमीप्रमाणेच. पंढरीकाकांना __/\__ !
कुठेतरी भाबडी आशा वाटली की पंढरीकाका हा लेख वाचूदे ... त्यांनी निरपेक्षपणे पेरलेला दाणा किती रसरशीत अंकुरलाय हे बघण्याचा आनंद त्यांना मिळूदे.

अगो, अगदी माझ्या मनातलं... एकदाच भेटायला हवेत, ते. त्यांना कळायलाच हवं की केव्हढी श्रीमंती त्यांनी माझ्या झोळीत टाकली.

अगदी शैलजाने रेखाटल्याप्रमाणेच चित्र उभे राहीले डोळ्यापुढे!
तुम्हा दोघींचे ही कौतुक वाटते, अगदी :)

सुंदर !

सुरेख लेख!!

लेखावरचं चित्रही अतिशय सुरेख आहे. अगदी नजरेत भरलं. फारच छान!

दोन सुरांमधला अवकाश पकडण्याचं तुमचं सामर्थ्य नेहमीच चकित करतं.