अ ’मेसी’ अफेयर

’सैन्य पोटावर चालते’ म्हणतात, हे अगदी खरे आहे. भारतीय सैन्यदलातील एका अधिकार्‍याशी लग्न करून आल्यावर काही दिवसांतच मला याची प्रचीती आली. लग्नाआधी होणार्‍या नवर्‍याकडून युनिट मेसबद्दल खूप ऐकले होते. हे नक्की काय प्रकरण असते, हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता होती आणि हळूहळू लक्षात आले की, आर्मीमध्ये ’मेस’ या ठिकाणाला विशेष महत्त्व असते. ’मेस’ ही एक जणू ’संस्था’च असते, जी एका अधिकार्‍याच्या आयुष्यात फारच महत्त्वाची भूमिका बजावते. युनिटमधल्या अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सामाजिक जीवन हे ’मेस’शी निगडित असते.

शब्दश: म्हटले तर ’मेस’मध्ये अधिकार्‍याया राहण्याची व जेवण्याची सोय असते. या मेसमध्ये एकटे राहणारे अधिकारी, लग्न न झालेले तरुण अधिकारी, कामानिमित्त बाहेरुन आलेले अधिकारी वगैरे राहतात आणि जेवण करतात. पण ’मेस’ फक्त ’जेवणा’पुरती मर्यादित न राहता, युनिट आयुष्यातले एक अविभाज्य अंग बनून जाते. आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे सर्वच अधिकारी या मेसमध्येच जेवतात. अगदी जनरल हुद्द्याच्या अधिकार्‍यापासून ते ’लेफ्टनंट’पर्यंत सर्वच. तसेच कुटुंबाबरोबर राहणारे अधिकारीसुद्धा मेसचे सभासद असतात. मेससाठी एक कमिटी नेमली जाते. युनिटचा प्रमुख (कमांडिंग ऑफिसर) हा चेअरमन असतो आणि उपप्रमुख हा प्रेसिडेंट असतो. इतर अधिकार्‍यांमधून ’मेस सेक्रेटरी’, ’फूड मेंबर’, वाईन मेंबर, ’गार्डन मेंबर’ वगैरे निवडले जातात. मेसच्या रोजच्या देखभालीसाठी काही माणसे नेमली जातात. प्रत्येक युनिटची एक मेस बिल्डिंग असतेच, मग ती इमारत मोठी असो की दोन खोल्यांत सजवलेली मेस असो. सहसा मेसच्या बाहेर मोकळी जागा असते तिथे छोटीशी बाग असते. आतमध्ये बार, अँटीरूम आणि जेवणाची खोली असते. प्रत्येक युनिटच्या संदर्भात त्यांच्या मेसला एक वेगळेच महत्त्व असते. युनिटची ’ऑफिसर्स मेस’ ही त्या युनिटचा आरसाच असते म्हणा ना! भारतीय सैन्यदलात शंभराहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली अनेक युनिट आहेत. युनिटच्या मेसमध्ये त्या त्या युनिटची परंपरा प्रदर्शित केलेली असते. युनिटला मिळालेली बक्षिसे, ट्रॉफ्या, मानपत्रे, युनिटच्या इतिहासातल्या ठळक घटनांच्या नोंदी, युनिटच्या अधिकार्‍यांनी बजावलेली कामगिरी, त्यांच्या शौर्यकथा, वेळोवेळी काढण्यात आलेले फोटो हे सगळे युनिट मेसमध्ये मांडण्यात आलेले असते. मेसच्या प्रवेशद्वारातच युनिटच्या सध्याच्या सर्व ऑफिसरांचे फोटो लावलेले असतात. मेसला भेट दिली, की त्या त्या युनिटचा सगळा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. आर्मीत ’तुमचे युनिट हेच तुमचे कुटुंब’ असते. त्यामुळे, युनिटमध्ये आलेल्या प्रत्येक नव्या अधिकार्‍याला आपल्या कुटुंबाची सगळी माहिती असणे आवश्यक असते. कमिशन होऊन युनिटमध्ये दाखल झालेला ’यंग ऑफिसर’ पहिले काही दिवस त्या सगळ्या ट्रॉफीवगैरेचा इतिहासच तोंडपाठ करत असतो! यामुळे युनिटबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होण्यास मदत होते.

ऑफिसर्स मेसची सजावट व टापटीप यांवर खूप कष्ट घेतले जातात, कारण ती मेस त्या युनिटलाच प्रतिबिंबित करत असते. त्यातले सोफे, गालिचे, झुंबरे, काचसामान, क्रोकरी-कटलरी आणि इतर गोष्टी अगदी चोखंदळपणे खरेदी केल्या जातात. कुठल्याही गोष्टीमध्ये हलकेपणा नसतो. कधीकधी ज्या ठिकाणच्या काही गोष्टी प्रसिद्ध असतात त्या ठिकाणाहून त्या खास मागवल्या जातात मेससाठी काही खरेदी करताना - मग ते पडदे असोत, सोफा कव्हर्स असोत, गालिचे असोत वा टेबल-कव्हर. अधिकार्‍यांच्या बायकांचा सल्ला हमखास घेतला जातो. कधीकधी तर आम्ही बायकाच या खरेद्या पार पाडतो, अगदी आपल्या घरच्यासाठी काही खरेदी करतो त्या जिव्हाळ्याने आणि चिकित्सेने (बायकांच्या ’नैसर्गिक’ आणि ’उपजत’ खरेदीकौशल्याचा असा फायदा होतो). मेससाठी लागणार्‍या अशाच काही गोष्टी खरेदी करताना बर्‍याच ठिकाणी फिरलेले मला अजूनही आठवते. मेसमध्ये नीटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छता आणि अंतर्गत सजावट यांवर नेहमी लक्ष दिले जाते.

मेसमधून काम करणार्‍या खानसाम्यांना आर्मीच्या ट्रेनिंगबरोबरच स्वयंपाकाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. ऑफिसर्स मेस, जेसीओ'ज मेस आणि 'ओ. आर. मेस'चे खानसामे वेगवेगळे असतात. त्यांच्या स्वयंपाकाच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. त्याप्रमाणेच मेन्यूही वेगवेगळे असतात. सर्वसाधारणपणे सगळ्याच ऑफिसर्स मेसमध्ये एकाच प्रकारचा मेनू असतो. सकाळी नाश्त्याला शक्यतो आलू पराठे, दही, लोणचे किंवा आलू सब्जी-पुरी किंवा साधे पराठे किंवा उपमा चटणी किंवा पोहे असा मेनू असतो. दर रविवारी दाक्षिणात्य मेनू वा बिर्याणी असते. इतर दिवशी दुपारचे जेवण शक्यतो भारतीय पद्धतीचे असते. पण रात्री वैविध्य असते. शुक्रवारी इंग्लिश मेनू, बुधवारी चायनीज, गुरुवारी छोले-भटूरे असा मेनू असतो. डेझर्टस्‌ही ठरलेली असतात. शेवयांची खीर, शाही तुकडा, कस्टर्ड, गुलाबजाम, आईसक्रीम, टिप्सी पुडिंग वगैरे. आर्मीच्या शैक्षणिक संस्थांमधून मोठ्या मेस असतात. रोज पाचशेहून जास्त अधिकारी जेवायला असतात. अशा मेसमध्ये दिवसानुसार डिनर मेनू ठरवावाच लागतो. कधीकधी बदली होवून नव्या जागी गेल्यावर घर मिळेपर्यंत मेसमध्येच जेवावे लागते. (मला हा काळ खूप छान वाटतो, कारण हे वेगवेगळे पदार्थ आयते खायला मिळतात!)

या मेसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मेसमध्ये आवर्जून पाळले जाणारे असे काही रीतिरिवाज आणि पद्धती! प्रत्येक मेसची आपली अशी एक परंपरा आणि वैशिष्ट्ये असतात. हे रीतिरिवाज मेसमध्ये येणार्‍या प्रत्येकाला पाळावे लागतात. मेसमध्ये जीन्स, टी-शर्ट, रंगीबेरंगी वा गडद रंगाचे शर्ट घालू नयेत असा दंडक आहे. मेसमध्ये रोज जेवायला जाणार्‍या अधिकार्‍यांनाही हे दंडक पाळावे लागतात. मेसमध्ये जेवण्याच्या वेळा पाळणे आवश्यक असते. वरिष्ठ अधिकारी मेसमध्ये आल्यावर, त्यांना उभे राहून विश केले जाते. जर आपण जेवत असताना वरिष्ठ आले तर मात्र उभे न राहता नुसतेच विश केले जाते. सहसा कनिष्ठ अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या आधी मेसमध्ये हजर राहावे लागते. ’कनिष्ठ ऑफिसर’ने युनिट-प्रमुखाच्या ’ड्रिंक्स’बाबत विचारणा करणे अपेक्षित असते. साधारणत: लंचच्या वेळी ड्रिंक्स घेतली जात नाहीत. क्वचितप्रसंगी लंचच्या अगोदर बिअर, जिन, शेरी घेतली जातात. डिनरच्या आधी व्हिस्की, जिन, कॉकटेल्स, शेरी ही ड्रिंक्स घेतली जातात. महत्त्वाचे म्हणजे आर्मीमध्ये ’ड्रिंक्स’ ही मर्यादित प्रमाणात घेणे आवश्यक असते. ’प्यायलेली चढणे’ म्हणजे अगदीच असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. आपल्या आर्मीची पाळंमुळं ही ब्रिटिश काळामध्ये असल्याने सभ्यासभ्यतेचे काटेकोर संकेत आहेत. मेसमध्ये कोणतेही वादग्रस्त तसेच, राजकीय आणि धार्मिक विषय चर्चिले जाऊ नयेत, असा संकेत आहे. स्त्रियांबद्दल बोलणे, चर्चेच्या दरम्यान अपशब्द वापरणे, ऑफिसच्या कामाबद्दल बोलणे हे वर्ज्य आहे. मोठ्याने बोलणे-खिदळणे असभ्य मानले जाते. वरिष्ठ अधिकारी आणि स्त्रिया जर उभ्या असतील तर बाकीच्यांनी बसणे हेही असभ्य मानले जाते. कोणतेही ड्रिंक्स, स्नॅक्स हे वरिष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत अशा क्रमाने सर्व्ह केले जातात. रोजचे जेवण सहसा टेबलावर मांडले जाते. त्यावेळी ’टेबल मॅनर्स’कडे विशेष लक्ष दिले जाते, अगदी बसण्याच्या पद्धतीपासून ते काट्याचमच्याच्या वापरापर्यंत. मेसमधून परतताना वरिष्ठ अधिकारी आधी बाहेर पडतात मग बाकीचे. वरिष्ठ अधिकारी मेसमध्ये असताना कनिष्ठ अधिकार्‍याने निघून जायचे नसते. असे अनेक रिवाज आहेत. प्रत्येक मेसमध्ये एक ’व्हिजिटर्स बुक’ असते. त्यामध्ये बाहेरून आलेल्या अधिकार्‍याने आपले अभिप्राय लिहायचे असतात. आजही जुन्या युनिट्स्‌च्या शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या व्हिजिटर्स बुकमध्ये जुन्या नामवंत लष्करी अधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या पहायला मिळतात.

मेसला खर्‍या अर्थाने रौनक येते ती म्हणजे ’मेस फंक्शन’मुळे! मेसमध्ये अनेक प्रकारच्या इव्हेंट्‌स्‌ होतात. युनिटमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी दिलेली पार्टी, युनिटच्याच एखाद्या कार्यक्रमानिमित्तचे सहभोजन, एखाद्या युनिट ऑफिसरची वैयक्तिक पार्टी तसेच युनिटच्या वार्षिक निरीक्षणानंतरची अत्यंत ’फॉर्मल’ अशी पार्टीही या मेसमध्येच होते. कोणताही अधिकारी जेव्हा युनिटमध्ये नव्याने रुजू होतो तेव्हा त्याची ’डाइनिंग इन’ केली जाते आणि कोणी काही कारणाने युनिट कायमचे सोडून जात असला किंवा निवृत्त होत असला की ’डाइनिंग आऊट’ केली जाते. तसेच आर्मीच्या विविध तुकड्यांच्या (फॉर्मेशन्स) मुख्यालयांमध्ये बदली होऊन येणार्‍या व जाणार्‍या अधिकार्‍यांसाठीही ’डाइनिंग इन/आऊट’ केली जाते. अशा वेळी ते अधिकारी ’पाहुणे’ असतात. एखाद्या अधिकार्‍याची ’डाइनिंग इन’ झाली की तो अधिकृतरीत्या त्या मेसचा सदस्य बनतो. तसेच ’डाइनिंग आऊट’ झाली की त्याचे त्या मेसचे सदस्यत्व संपते. मग तो बदली होऊन नवीन ठिकाणी रुजू झाला की नव्या ठिकाणी नव्या मेसमध्ये पुन्हा त्याची ’डाइनिंग इन’ होते. प्रत्येक अधिकार्‍याला कुठल्यातरी एका मेसचा सदस्य असणे बंधनकारक असते. या ’डाइनिंग आऊट’च्या वेळी मेसचे सगळे सदस्य त्या जाणार्‍या अधिकार्‍याला एका खास बनवलेल्या खुर्चीत बसवतात. त्या खुर्चीला पालखीसारखी दोन्ही बाजूंनी उचलण्याची सोय केलेली असते. मग सगळेजण त्या अधिकार्‍याला खुर्चीत बसवून ती खुर्ची उचलून मेसमधून बाहेर घेऊन जातात आणि जाताजाता ’ही इज अ जॉली गुड फेलो’ हे गाणे म्हणतात. अशा या ’डाइनिंग इन / आऊट’ पार्टीसाठी यजमानांकडून पाहुण्यांना आमंत्रणपत्रे धाडली जातात. युनिटकडून धाडली जाणारी आमंत्रणे आणि ऑफिसरकडून वैयक्तिक पार्टीसाठी धाडली जाणारी आमंत्रणे यांचा एक विशिष्ट मसुदा ठरलेला असतो. अशा पार्ट्यांना हजर राहताना, पाहुण्या अधिकार्‍यांना तसेच यजमान युनिटच्या अधिकार्‍यांना आमंत्रणपत्रावर उल्लेख केल्याप्रमाणे कपडे परिधान करावे लागतात. काही ऑफिशियल पार्ट्यांना ’६बी’, ’ब्ल्यू पेट्रोल’ अशा प्रकारचे आर्मी युनिफॉर्म घालावे लागतात. तर काही पार्ट्यांना ऋतूमानानुसार लाउंज सूट, शर्ट-टाय, ओपन कॉलर (टाय न लावता) असे कपडे घालावे लागतात. काही भारतीय पद्धतीचे पेहराव - जसे की ’जोधपुरी’ चालतात. पायात शूज हवेतच आणि शर्ट हा टक्ड्-इनच असावा लागतो. स्त्रिया सहसा साडी नेसतात किंवा भारतीय पद्धतीचे ड्रेस घालतात. मात्र जीन्स-टी शर्ट बंदीचा नियम बायकांनाही लागू असतो.

मेसमधील समारंभांना अधिकार्‍यांच्या पत्नीही उपस्थित असतात. (किंबहुना काही वेळेस ते सक्तीचेही असले तरीही आमंत्रणात ’लेडीज आर कॉर्डिअली इन्व्हायटेड’ असंच लिहिले जाते!) मेसमध्ये पार्टीच्या वेळी ऑफिसर्स सहसा उभेच राहतात आणि स्त्रिया बसतात. आर्मीत स्त्रियांना विशेष मान दिला जातो. अगदी सर्वांत कनिष्ठ अधिकार्‍याच्या पत्नीलाही वरिष्ठ अधिकारी उभे राहून विश करतात. अगदी जनरल रॅंकचे अधिकारीही स्त्रियांना आदराने ’मॅम’ असेच संबोधतात. पण बायकांनी त्यांना ’सर’ न म्हणता त्यांच्या रॅंक व नावानेच संबोधायचे अशी रीत आहे. मी जेव्हा नवी लग्न करून गेले तेव्हा नवर्‍याने मला अगोदरच हे सांगितले होते, तरीही अगदी अवघडल्यासारखे होऊन जायचे. ड्रिंक्स, स्नॅक्स पदार्थ हे आधी अधिकार्‍यांच्या पत्नींना सर्व्ह केले जातात. त्यातही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पत्नींना आधी आणि मग उतरत्या क्रमाने इतर बायकांमध्ये फिरवले जातात. जर पाहुणा ऑफिसर विवाहित असेल तर त्याच्या पत्नीला आधी सर्व्ह केले जाते, मग यजमान युनिटच्या सीनिअर लेडीला आणि मग उतरत्या क्रमाने इतरा बायकांना सर्व्ह केले जाते. बायकांनंतर मग अधिकार्‍यांना सर्व्ह केले जाते. त्यातही आधी पाहुणा अधिकारी, मग युनिट प्रमुख आणि उतरत्या क्रमाने इतर अधिकार्‍यांना सर्व्ह केले जाते. बाहेरून आलेले अधिकारी व त्यांच्या पत्नी यांच्या ड्रिंक्सची जातीने विचारपूस केली जाते. कधीकधी अशा कार्यक्रमांच्या वेळी छोटेछोटे खेळही खेळले जातात. ठरलेल्या वेळी मेस हवालदार येऊन युनिट उपप्रमुखाला उद्देशून ’जेवण तयार असल्याची’ वर्दी देतो. जेवण सहसा ’बुफे’ असते. ते घेतानाही बायका आधी व मग सगळे अधिकारी अशी पद्धत आहे. स्त्री-अधिकारी उपस्थित असेल तर ती इतर पुरुष-अधिकार्‍यांबरोबर तिच्या वरिष्ठतेला अनुसरून जेवण घेते. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी मेसच्या स्टाफला त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून छोटीशी भेट न चुकता दिली जाते.

आर्मी मेसमधला सर्वात रोमांचकारी अनुभव म्हणजे ’डिनर नाइट’! काळानुसार ’डिनर नाइट’ हल्ली फार कमी झाल्या आहेत. तरीही, डिनर नाइटचा एक वेगळाच अनुभव असतो. ’डिनर नाइट’ म्हणजे एक अत्यंत ऑफिशिअल प्रकारचे डिनर असते. यासाठी अधिकारी खास ’सेरिमोनिअल मेस युनिफॉर्म’ घालतात आणि बायका साडी नेसतात. मेसमधील इतर समारंभांना बुफे पद्धतीचे जेवण असते, तर डिनर नाइटला व्यवस्थित टेबल खुर्चीवर बसून जेवण करावे लागते. त्यासाठी उपस्थित असणार्‍यांसाठी आधीच ’सिटिंग प्लॅन’ आखलेला असतो. शक्यतो अधिकारी व त्याची पत्नी यांना एकाच टेबलवर किंवा जवळ बसवले जात नाही. सिटिंग प्लॅनमध्ये दोन अधिकार्‍यांमध्ये एक स्त्री बसेल याची काळजी घेतलेली असते. सर्वजण मेसमध्ये आल्यावर सिटिंग प्लॅनमध्ये आपापली जागा बघून ठेवतात. डिनर नाईटचा ’पाहुणा’ हा कोणी सीनियर अधिकारी असतो. यजमानांमधील एक अधिकारी ’प्रेसिडेंट’ आणि एक ’व्हाइस प्रेसिडेंट’ असतो. या समारंभाला ’पाईप बॅण्ड’ही हजर असतो. आकर्षक अशा गणवेशातला हा बॅण्ड आर्मीच्या मोहक धून सादर करतो. त्याच्याच साथीने साधारणत: चाळीस मिनिटांपर्यंत ’कॉकटेल’ चालते. मग बिगुलाची एक विशिष्ट धून वाजवली जाते. याचा अर्थ आता पाच मिनिटांनी कॉकटेल संपणार. पाच मिनिटांनी आणखी एक धून वाजवली जाते. मग सगळे जेवणासाठी आतमध्ये जाऊ लागतात. सिटिंग प्लॅननुसार आपापल्या जागी पोहोचतात. प्रमुख पाहुणे, प्रेसिडेंट व युनिट प्रमुख सर्वांत शेवटी येतात व आयताकृती टेबलाच्या मुख्य भागी बसतात, तर व्हाइस प्रेसिडेंट हा टेबलाच्या दुसर्‍या टोकाला बसतो. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर मग कडक गणवेशातल्या वेटर्सद्वारे जेवण सर्व्ह केले जाते. त्यांच्या सर्व हालचालींमध्ये कमालीचा समन्वय असतो. ते एकाच वेळी सर्व्हिंग सुरू करतात आणि संपवतातही. प्रत्येकाकडे समसमान अधिकार्‍यांची जबाबदारी दिलेली असते. जेवण सहसा तीन-चार कोर्सचे असते. प्रत्येक कोर्स सर्व्ह करून झाल्यावर जेव्हा प्रमुख पाहुणे खाणे सुरू करतात तेव्हा पाईप बॅण्ड पुन्हा आकर्षक धून वाजवतो. खाताना तुमच्या हालचाली, काट्या-चमच्यांचा वापर, खाण्याची पद्धत या सगळ्यामध्येच ’टेबल मॅनर्स आणि एटिकेट्‌स्‌’चे पालन करणे अपेक्षित असते. लग्न झाल्यावर नवर्‍याकडून या सगळ्या गोष्टींचे शिक्षणच घ्यावे लागते. असो. साधारणत: सर्वांचे खाणे संपले आहे हे पाहून प्रमुख पाहुणे खाणे थांबवतात. (पण तुम्ही मागे राहिलात तरी तुम्हाला प्लेट क्लोज करावीच लागते! (’प्लेट क्लोज करणे’ म्हणजे प्लेटमध्ये काटा आणि चमचा/सुरी एकमेकांना समांतर असे उभे ठेवणे.) म्हणून जेवताना तुम्ही प्रमुख पाहुण्यांवर एक नजर ठेवलेली बरी, हे मला नंतर कळले.) मग बॅण्डही थांबतो की पुन्हा वेटर त्याच कौशल्याने टेबल क्लिअर करतात व पुढच्या कोर्सचे सर्व्हिंग सुरू होते. असे तिन्ही-चारही कोर्सेससाठी केले जाते.

यानंतर डिनर नाइटचा सर्वांत महत्त्वाचा भाग येतो - ’टोस्ट’. सर्वांत शेवटी रिकामे स्टेम ग्लास ठेवले जातात. साध्या पाण्याचे डिकॅन्टर व्हाईस प्रेसिडेंटच्या बाजूने प्रत्येकाकडे सरकवले जाते, टेबलवरून न उचलता! सगळ्यांचे ग्लास भरले की प्रेसिडेंट त्याच्या शेजारी ठेवलेला मॅलेट तीनदा टेबलवर आपटतो आणि आपला ग्लास हातात घेऊन उभा राहतो व म्हणतो. “मिस्टर व्हाईस, दी प्रेसिडेंट”. याचा अर्थ भारताच्या राष्ट्रपतींच्या (जो की संरक्षणदलांचा सर्वोच्च सेनापती आहे) दीर्घायुष्यासाठी तो टोस्ट प्रस्तावित करतो. मग व्हाईस प्रेसिडेंट उभा राहून प्रस्तावाला अनुमोदन देताना म्हणतो, ”लेडीज अँड जंटलमेन, दी प्रेसिडेंट”. मग सगळे आपापल्या जागी उभे राहून ग्लास उचलतात. यावेळी पाईप बॅण्ड राष्ट्रगीताची धून वाजवतो व ती संपल्यावर सगळे राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आपापला ग्लास रिकामा करतात. यानंतर प्रमुख पाहुणे हॉलमधून बाहेर पडल्यावर बाकी सगळे बाहेर पडतात. नंतर सर्व जण पाईप बॅण्डपाशी येतात. बॅण्ड आपल्या सर्वोत्कृष्ट धून वाजवतो. मग बॅण्डप्रमुखाला पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते व कार्यक्रम संपतो. सेरेमोनिअल ड्रेसवर आपली तमाम मेडल्स रुबाबदारपणे मिरवणारे अधिकारी, सोबतीला आकर्षक दिसणार्‍या त्यांच्या बायका, कडक पेहरावामधले ते बॅण्डपथक आणि वेटर्स, मेसची चमचमणारी क्रोकरी-कटलरी, त्या ट्रॉफीज्, शिस्तीचे तरीही आपलेसे वाटणारे वातावरण यामुळे ’डिनर-नाईट’ हा एक अविस्मरणीय अनुभव होऊन जातो.

अशा डिनर नाइटचा अनुभव नसेल तर पहिल्यावेळी मोठी तारांबळ उडते. मजेदार अनुभव येतात. माझ्या पहिल्या डिनर नाईटला तर मी पुरती भांबावून गेले होते. मोठी डिनर नाईट होती. जवळपास ३५-४० लोक होते. आम्ही त्या ठिकाणी नवीनच होतो. अजून लोकांच्या ओळखीही झाल्या नव्हत्या. माझे लग्न होऊन तर जेमतेम ३-४ महिने झाले होते. माझा नवरा बसल्या जागेवरून डोळ्यांच्या खाणाखुणा करत मला काय करायचे ते सांगत होता. माझी कायम त्याच्यावर नजर होती. त्याची जागा व्हाईस प्रेसिडेंटच्या जवळच तीन-चार खुर्च्या सोडून होती. आमची ही ’आँखमिचोली’ पाहून व्हाईस प्रेसिडेंट त्याला म्हणाले, “इज शी युवर वाईफ?” तो म्हणाला, “येस सर”. मग ते म्हणाले, ”मी तुझ्या बायकोला ती केसांचं कारंजं बांधून फिरायची तेव्हापासून ओळखतो. मीट मी आफ्टरवर्डस्.” माझ्या नवर्‍याला काहीच कळेना. आता वाटले डिनर नाईटनंतर चांगलेच धारेवर धरले जाणार. डिनर नाईट संपल्यावर आम्ही दोघे जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांना बघितल्यावर मी ओरडलेच, ”मिलिंददादा! तू???” तो लांबच्या नात्याने माझा मावसभाऊच होता. मी लहान असताना बर्‍याचदा आमच्या भेटी व्हायच्या. मध्यंतरी नुसती बातमी कळत होती पण भेट नव्हतीच. आता जवळपास १५-१७ वर्षांनी आम्ही भेटत होतो. तो म्हणाला,” तू ओळखलं नाहीस?” मी म्हणाले, ”इथे भेटशील असं वाटलंही नव्हतं आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये होते की माझ्या नवर्‍याशिवाय दुसरीकडे माझं लक्षं ही नव्हतं. माझी पहिलीच डिनर नाईट होती ना!”

माझ्या आतापर्यंतच्या आर्मी जीवनात मी अनेक तर्‍हेच्या ’मेस’ पाहिल्या आहेत. युद्धसदृश्य परिस्थितीत बंकर्समधून चालवली जाणारी मेस, ’फ़ील्ड’मध्ये तंबूत चालणारी मेस, आर्मीच्या शैक्षणिक संस्थांच्या मोठ्या मोठ्या इमारतींमधल्या आलिशान मेस, आर्मीच्या विविध मुख्यालयांच्या मेस, प्रत्येक ’कोअर’च्या मुख्य मेस, युनिट मेस - सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. यात एक जाणवले, ते म्हणजे ’मेस’ कुठलीही असो, वातावरण एकाच प्रकारचे असते. मिळणारे जेवण बहुधा एकाच पद्धतीचे असते. मेन्यूही सहसा सारखाच. या मेसचा संपूर्ण खर्च हा अधिकार्‍यांच्या स्वत:च्या मासिक सब्स्क्रिप्शनमधूनच चालवला जातो. कोणतीही सरकारी ग्रान्ट किंवा फण्ड यासाठी नसतो. ही अधिकार्‍यांनी अधिकार्‍यांसाठी चालवलेली संस्था आहे. प्रत्येक पार्टीचा किंवा समारंभाचा खर्च अधिकार्‍यांमध्ये विभागला जातो व मासिक बिलाद्वारे जमा केला जातो. पण असे असले तरीही तुम्ही कोणत्याही युनिटचे असलात आणि भारतभर कोणत्याही युनिटच्या मेसमध्ये गेलात तरीही तुमचे दोन्ही हात पसरून स्वागतच होते.

आपले युनिट सोडून तुम्ही दुसर्‍या युनिटच्या मेसमध्ये गेलात तर तुम्ही ’पाहुणे’ असता आणि अगदी ’अतिथी देवो भव’ पद्धतीने तुमची बडदास्त ठेवली जाते. पण मग ’पाहुणे’ही मेस बिल चुकते करूनच जातात. फक्त पाहुण्यांना आमंत्रण देऊन कार्यक्रमाला बोलविले जाते तेव्हा त्यांचा खर्च हा यजमान अधिकारी उचलतात. मेसच्या या सगळ्या चालीरीती, रिवाज, पद्धती यांची माहिती अधिकार्‍यांना त्यांच्या खडतर प्रशिक्षणाच्या वेळीच दिली जाते. कधीकधी त्या नीट पाळल्या नाहीत म्हणून उपाशीपोटी राहिल्याचं, शिक्षा भोगल्याचंही माझ्या नवर्‍याला आठवतं. आपल्या बायकांना या चालीरीती शिकवण्याची जबाबदारी मात्र त्या त्या अधिकार्‍याची असते.

तुमच्या स्वत:च्या युनिटची मेस म्हणजे तुमचे हक्काचे स्थान. कधी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या गाण्यांच्या मैफिली आठवतात तर कधी निवांतपणे घालवलेले विरंगुळ्याचे क्षण...कधी पार्टीमध्ये खेळलेले खेळ आठवून आजही हसू येतं... कधी कार्यक्रम आटोपल्यावर केलेला ’श्रमपरिहार’ आठवतो... तर कधी भारतभर प्रवास करताना एखाददुसरा दिवस पाहुणचार अनुभवलेल्या काही मेस अचानक डोळ्यांसमोर येतात... खरंच मेसपासून ’आर्मी लाईफ’ वेगळे काढताच येऊ शकत नाही... त्यांचे नाते एवढे घट्टं आहे की, कधी भांडण झाले तर मी माझ्या नवर्‍याला धमकीही देऊ शकत नाही की आज जेवायला नाही मिळणार, कारण त्याची हक्काची ’मेस’ त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध असते!

जय हिन्द!

- प्राची

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

प्राची, लेख खूप आवडला. अगदी गुंगून जायला झालं. सैन्याची शिस्त तरीही आपलेपणा दोन्हीचा समतोल लेखातही मस्त साधलाय.

मस्त लेख प्राची! :)शेवटी लिहिलंस तर! :) सुरेख जमलाय.

Jhakaas ! Kuch alag hai ! Acchaa hi hai !

मस्त लेख प्राची :)
हे सगळं आम्ही कधीही अनुभवू शकत नाही त्यामुळे तुझ्याकडून ऐकायची कायमच उत्सुकता असते, लिहित रहा

वा मस्त लेख! आवडला.

आवडला... :)

मस्त लिहिलय. आर्मीबद्दल नेहमीच वाचायला आवडते.

फारच सुंदर लिहिलंय.
सैन्याची शिस्त तरीही आपलेपणा दोन्हीचा समतोल लेखातही मस्त साधलाय. >>+१

प्राची खुप छान.. आम्हाला हे सगळे नविनच.. पण सगळे डोळ्यसमोर उभे केलेयस... मस्त... !

मस्तच प्राची. वर कोणीतरी लिहिले तसे मला पण ह्या लाईफबद्दल वाचायला खूप आवडते. तू लिहिले सुद्धा मस्त आहेस. एकदम इंटरेस्टींग.

वॉव मस्त लेख. एका वेगळ्याच अनुभवांशी ओळख झाली. :)

चांगली ओळख करून दिलीस आर्मी लाईफची.

मस्त जमलाय लेख.

अधिकार्‍यांच्या बायकांना सर्विंग करताना प्राधान्य मिळते पण एक स्त्री ऑफीसर असेल तर तिला मात्र तिच्या दर्जानुसारच प्राधान्य दिले जाते यामागचे तार्किक काही कळले नाही.

मस्त लेख! एका नव्याच जगात गेल्यासारखं वाटलं! आर्मी लाइफ बद्दल नेहमीच कुतुहल वाटत आलंय, अजून वाचयला आवडेल !

>>+1

व्वा, फारच सुंदर, सुरस लेख आहे हा :-) जबाबदारीच्या कामाचा ताण अशा एकत्र येण्यातून, समारंभांमधून किती पद्धतशीरपणे आणि आनंददायी रितीने मॅनेज केला जातो ते लेखामधून व्यवस्थित दिसून येतंय.
धाकटा काका सैन्यदलात वैद्यकिय अधिकारी आहे, त्याच्या बदल्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी मेसचे नाही तरी त्यांसारखे काही अनुभव घेतले आहेत ते यानिमित्ताने पुन्हा आठवले. खुपच सुखद वातावरण असतं ते सगळं. त्यांच्यातला आपसातला आपलेपणा खुप देखणा असतो. धन्यवाद प्राची, अप्रतिम मांडणी आहे, खुप आवडला लेख.

प्राची,छान लिहिले आहेस.आवडले :)

एक वेगळंच आयुष्य.. छान वाटलं वाचताना.

प्राची, मस्तच जमलाय लेख. आम्हा सिव्हिलियन्सना कुतुहल असतं... कौतुक असतं ह्या सैनिकी पेशातल्या "करमणुकपण शिस्तीत" वगैरे प्रकारांचा.
ते 'केसांचं कारंजं' भल्तं आवडलं. मी कायम घोडे (पोनीटेल) आणि मग झिपरे (बॉयकट) अशाच नावांनी हाका ऐकल्यात :)

अगदिच अवांतर - एक गंमत आठवली. एका (वेड्याच) वयात आपला नवरा सैनिक असावा असं खरच वाटायचं.. किती वेळ?... "पहा टाकले पुसुनी डोळे".. गाणं संपेपर्यंत(च). पण त्या आयुष्याला पेलण्याचं धैर्य नव्हतंच आपल्यात हे ही आता नक्की उमगलय.

हे धैर्य पेललेल्या सगळ्या वीरांच्या स्त्रीयांना माझे शतशः प्रणाम.

खूपच सुंदर! ' मेसी ' अफेयर, भावले.

मस्त लेख.
पण या विषयावरच्या लेखाची खूप वाट पाहायला लावलीस प्राची :-)

सर्वांना परत एकदा खूप खूप धन्यवाद. :)

अधिकार्‍यांच्या बायकांना सर्विंग करताना प्राधान्य मिळते पण एक स्त्री ऑफीसर असेल तर तिला मात्र तिच्या दर्जानुसारच प्राधान्य दिले जाते यामागचे तार्किक काही कळले नाही. >>> कारण, ती आधी ऑफिसर आहे आणि मग एक स्त्री. सगळे ऑफिसर्स सारखे. स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही केला जात.

खूप छान लेख. एक वेगळेच जग अनुभवायला मिळाले.

प्राची अतिशय सुरेख लेख. खूप म्हणजे खूपच आवडला. :)

छान लिहिलय प्राची. अजुन वाचायला आवडेल.

मस्तच

प्राची, मस्त लिहिलयेस... आवडलच !!

मस्त झालाय लेख !!!!!!!!!!!!! धन्यवाद प्राची :स्मित:

छान लिहिलय प्राची.

मस्त लेख :)
अजुन वाचायला नक्कीच आवडेल :)

फारच छान व सविस्तर लिहिला आहेस लेख प्राची. डोळ्यासमोर उभे राहिले.
सैनिकांच्या खडतर प्रशिक्षणावर पण लेख लिहिता आला तर पहा.