संपादकीय

प्रेम नमस्कार,

सर्व रसिकजनांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट, आंब्याच्या पानांचं तोरण, आकाशकंदील, लक्ष्मीपूजनासाठी केलेली सगळी सिद्धता, सुगंधी तेल आणि उटण्याचा मन उल्हासित करणारा हलका गंध! सजवलेल्या घराकडे पुन्हा पुन्हा वळणारी नजर, स्वयंपाकघरातून येणारा गोड-खमंग दरवळ! या जगात येऊन काहीच दिवस झालेल्या पिटुकल्या गाठोड्यापासून ते पलंगावर निजलेल्या पणजीपर्यंत, सगळ्यांसाठी झालेली खरेदी. पणत्या रंगवण्याच्या, भेटकार्ड बनवण्याच्या मदतीसाठी घरातल्या सगळ्यांनाच वेठीला धरणारे चिमुकले दोन हात. गेरु, रांगोळ्यांचे रंग, फुलांची परडी, आणि भेटेल त्याला उत्साहाने शुभेच्छा! थोड्याफार फरकाने दिवाळीच्या दिवसातलं घराघरातून दिसणारं दृश्य!

मराठी साहित्य रसिकांना दिवाळीतील या सगळ्या गोष्टींबरोबरच उत्कंठा असते ती दिवाळीत मिळणार्‍या साहित्य मेजवानीची. आंतरजालावर गेली अकरा वर्ष "मायबोली"ने सातत्याने दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना दिले आहेत. प्रत्येक वर्षीच्या संपादक मंडळाच्या निराळ्या कल्पना, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न, आणि या सगळ्या प्रयत्नांना मिळणारी मायबोली प्रशासनाची साथ आणि आधार.

स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं शोधणारं कोणी, सोबत चालणार्‍या नात्यांचा थांग शोधणारं कोणी, हे सगळं अगम्य, गूढ आहे, असं म्हणणारं कोणी! मत-मतांतरे असूनही त्या त्या नात्यावर गाढ विश्वास ठेवून वाटचाल करणारं कोणी! 'माझा बाबा', म्हणून वडिलांबद्दल भरभरुन बोलणारं कोणी. बहिणीचं कौतुक करणारं कोणी. मैत्रीचा अभिमान असणारं कोणी. कोणापासून दूर होऊनही ते नातं मनातल्या मनात जपणारं कोणी. आणि अशाच काही नात्यांच्या वेगवेगळ्या छटा अनुभवणारे, जपणारे आपण सर्व!

अंकासाठी संकल्पना निवडताना बरेच विषय सुचले आणि शेवटी शिक्कामोर्तब झालं ते 'थांग-अथांग' या नात्यांवर आधारित संकल्पनेवर. मग चर्चा अशीही झाली की, फारच सरळसोट संकल्पना देतोय का आपण? पण नात्यांवर आधारित लिहायचं म्हटल्यावर अगदी कधीतरीच लिहिणारे किंवा कधीच न लिहिणारेही सहभागी होतील, ही त्यामागची भूमिका. आणि झालंही तसंच! कितीतरी नवोदितांनी लिखाण पाठवलं, कोणी आपल्या घरातल्या ज्येष्ठांचं लिखाण पाठवलं. दोन पिढ्यांचा नातेसंबधातला दृष्टिकोन वाचायला मिळाला.

संकल्पनेवर आधारित कथा, कविता, वैचारिक लेख, ललित लेख असं भरपूर साहित्य आलं. कोणी अतिशय हळवं होऊन एखाद्या नात्याबद्दल ललित लेखातून सांगितलं तर कोणी तेच भाव कथेतून लिहून मोकळं झालं. कविता तर काय भावना व्यक्त करणारं हक्काचं माध्यम! नेहमीच उत्तमोत्तम कविता, गझल लिहिणार्‍यांनी आपल्या रचना आम्हाला पाठवून आमची पाठराखण केली.

मायबोलीकरांबरोबरच बाहेरुनही भरभरुन साहित्य आलं. काही घेता आलं, काही वेगवेगळ्या कारणांनी नाकारावं लागलं, याचा खेद आहेच! डॉ. नागनाथ कोतापल्ले सरांनी लिहिलेला 'विठ्ठल रामजी शिंदे' यांच्यावरचा संशोधनपर लेख आमच्या विनंतीवरून आम्हाला पाठवला. दिवाळी संवादांसाठी रंगमंच कलाकार ते चित्रपट कलाकार, कवी ते पटकथाकार, अशा बर्‍याच जणांचा विचार करता करता, 'निर्माण' च्या अमृत बंग यांच्या मुलाखतीची विचारणा आली. तोवर आम्ही, राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री 'मिताली जगताप-वराडकर' हिच्या मुलाखतीची देखील तयारी केली होती. तिसरी मुलाखत अगदी वेगळ्याच कारणासाठी काम करणार्‍या शरयू आणि नागेश घाडी या दांपत्याची मिळाली आणि आम्ही भरून पावलो.

अंकाचं संपादन करत असताना अनेक मदतीचे हात पुढे आले. त्या मदत करणार्‍या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत!

नात्यांच्या अथांगतेचा थांग शोधणार्‍या विशेष विभागाबरोबरच, कथा, कविता, वैचारिक लेख, ललित लेख, दिवाळी संवाद आणि जोडीला दृकश्राव्य विभागाने सजलेला मायबोलीचा हा बारावा 'हितगुज दिवाळी अंक' तुम्हा सर्वांसमोर सानंदे सादर करीत आहोत.

श्रेयनामावली

- संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०११