लिंगनिरपेक्षता आणि फ्रॉईडचा सिद्धांत

"मला जर फ्रॉईडला भेटणे शक्य असते, तर तो भेटताक्षणी मी त्याच्या एक थोबाडीत ठेऊन दिली असती..." काय? दचकलात ना मंडळी हे वाचून? मी ही अशीच दचकले होते. मीच काय आम्ही सगळेच... पण हे उद्गार काही अगदीच अनाठायी नाहीत. सिग्मंड फ्रॉईड या जगद्विख्यात मानसशास्त्रज्ञाने / 'मनोविश्लेषणाच्या' (सायकोअ‍ॅनॅलिसिसच्या) जनकाने जो एक सिद्धांत अनेक वर्षांपूर्वी मांडून ठेवला आहे, तो कितीही प्रसिद्ध झालेली असला, त्याच्यातून कितीही नवनवीन विचारधारा जन्माला आल्या असल्या, तरीही मन त्याचा स्वीकार नाहीच करु शकत. मग आमचे सरच त्याला कसे अपवाद असतील? त्यांच्या मनातला उद्वेग त्यांनी फ्रॉईडच्या स्मृतिदिनानिमित्त भरवलेल्या परिषदेत हा असा व्यक्त केला.

आता तुम्हांला नक्कीच उत्सुकता वाटत असेल की मी हे का सांगतेय? फ्रॉईडने असा काय सिद्धांत मांडून ठेवलाय, ज्याचा ह्या परिसंवादाच्या विषयाशी काहीतरी संबंध असू शकेल? आहे, आहे! फार मोठा संबंध आहे. मनोलैंगिक विकसन (सायकोसेक्श्चुअल डेव्हलपमेन्ट) हे त्याच्या सिद्धांताचे नाव.

फ्रॉईडच्या मतानुसार माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या वयाच्या सुमारे पहिल्या पाच वर्षांत आकाराला येते. ह्या पाच वर्षांत त्याने जे अनुभव घेतलेले असतात, ते अनुभव त्याच्या नंतरच्या आयुष्यातील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्याच्या वागणुकीवर सातत्याने प्रभावही पाडत राहतात. ह्याचे स्पष्टीकरण तो असे देतो की, माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या बाल्यावस्थेतील अनेक टप्प्यांवर घडत जाते. ज्याला सहाय्यीभूत ठरतात दोन ऊर्जा. १. 'इड' म्हणजेच सुखाचा शोध घेणारी ऊर्जा - जी काही विशिष्ट भागांवर केंद्रित होते आणि २. 'लिबिडो' म्हणजेच आपल्या वागणुकीला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देणारी मनोलैंगिक ऊर्जा.

जर ह्या दोन्ही ऊर्जांनी आपापले काम चोख बजावले आणि सगळे मनोलैंगिक टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले, तर निरोगी असे व्यक्तिमत्त्व जन्माला येते. पण जर काही टप्पे योग्यप्रकारे नाही पूर्ण झाले, तर मात्र 'फिक्सेशन' होऊ शकते. म्हणजेच ज्या टप्प्याची जी गरज आहे, ती वेळीच पूर्ण नाही झाली तर आपण त्याच अवस्थेत अडकून पडतो आणि ती गरज पूर्ण होईपर्यंत तसेच अडकून राहतो, कितीही वय झाले तरीही! उदा. 'ओरल स्टेज'. ह्या टप्प्यात अडकून पडलेली व्यक्ती इतरांवर अती अवलंबून राहू शकते आणि मौखिक सुखाची गरज धूम्रपान, मद्यपान किंवा अतिअन्नसेवन इत्यादी अन्य मार्गांनी पूर्ण करायचा प्रयत्न करते.

विचित्र वाटतंय ना हे वाचायला? ह्याहून विचित्र 'टप्पा' तर पुढेच आहे! (फ्रॉईडच्या सगळ्या मनोलैंगिक टप्प्यांची ओळख शब्दमर्यादेमुळे इथे करुन देऊ शकत नाही. ती आंतरजालावर अथवा पुस्तकांतून करुन घेता येईल. तेव्हा आपण एकदम आपल्या परिसंवादाशी संबंधित टप्प्याकडे वळू.) तो म्हणजे 'फॅलिक स्टेज'. ह्या टप्प्यावर असणारी मुले म्हणजे साधारण ३ ते ६ या वयोगटातली. ह्या टप्प्याच्या दरम्यान लिबिडोचे प्राथमिक केंद्रस्थान लैंगिक अवयव हे असते. ह्याच वयात मुलांना स्त्री आणि पुरुष यांतील फरक समजायला लागलेला असतो.

फ्रॉईडच्या मते ह्या वयातली मुले ('मुलगा'चे अनेकवचन) आपल्या वडलांना आपल्या आईच्या प्रेमातला वाटेकरी / स्पर्धक समजायला लागतो. आई फक्त आपल्यापुरतीच हवी, ह्या इच्छेतून वडलांची जागा घेण्याची ईर्षा निर्माण होण्याच्या ह्या भावनेला फ्रॉईड 'इडिपस कॉम्प्लेक्स' असं संबोधतो. एकीकडे ही ईर्षा मनात आकार घेत असतानाच मुलाला सतत एक प्रकारची भीती वाटत असते की, वडलांना आपले हे विचार कळले तर ते आपल्याला जबरदस्त शिक्षा देतील. ह्या भीतीला फ्रॉईडने 'कॅस्ट्रेशन अ‍ॅन्गझायटी' (खच्चीकरणाची भिती) असे संबोधले आहे.

हीच गोष्ट मुलींच्याही बाबतीत अगदी उलट्या तर्‍हेने घडते. म्हणजे त्यांना आपल्या वडलांविषयी अशाच तर्‍हेची भावना वाटते. जिला फ्रॉईड (/ युंग) 'इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स' असे संबोधतो. त्यांना वडलांविषयी एक सुप्त आकर्षण आणि त्यातून आईशी स्पर्धा हे तर वाटत असतेच, शिवाय एक अवयव त्यांना मिळालेला आहे आणि आपल्याला नाही, याविषयीची आसूयाही त्यांच्या मनात घर करायला लागते आणि त्यातून मुलींमध्ये 'पीनस एन्व्ही' निर्माण होते.

ज्यांचा 'फॅलिक' हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण होत नाही, त्यांच्यात बरेच व्यक्तिमत्त्वदोष निर्माण होऊ शकतात. उदा. जी मुले इडिपस कॉम्प्लेक्समधून बाहेर येत नाहीत, ती एकतर वाया गेलेली (स्वतःच्या कर्तृत्वावर कमी विश्वास असणारी) किंवा अगदीच अतिमहत्त्वाकांक्षी (स्वतःच्या कर्तृत्वावर खूप विश्वास असणारी) होऊ शकतात. तर ज्या मुली इलेक्ट्रा कॉम्पेक्समधून बाहेर येत नाहीत, त्या वर्चस्व गाजवणार्‍या (पीनस एन्व्ही असल्याने), किंवा इतरांना मोहित करणार्‍या (जास्त अस्मिता असणार्‍या), किंवा अगदीच गरीब अशा - इतरांचे वर्चस्व सहन करणार्‍या (कमी अस्मिता असणार्‍या) बनू शकतात.

त्यांच्यात इतर व्यक्तिमत्त्वदोषांबरोबरच समानलिंगी तसेच भिन्नलिंगी व्यक्तींकडे बघण्याचा एक विचित्र दृष्टीकोन तयार होतो. मग समाजात योग्य तर्‍हेने न मिसळणे, भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास नाकारुन समलिंगी व्यक्तींसोबतच राहणे, अशा कृती घडू शकतात. समलिंगी संबंध हाही त्याचाच परिपाक. (हा सिद्धांत खोलात वाचल्यास तो अधिक योग्य प्रकारे समजू शकेल.)

अशी व्यक्तिमत्त्वं घडू नयेत, मुले या टप्प्यात अडकून राहू नयेत म्हणून फ्रॉईडने सुचवलेले उपाय म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य पद्धतीने हाताळणे. म्हणजेच त्यांच्याशी सुसंवाद साधणे. त्यांच्या वर्तणुकीतल्या समस्या योग्य पद्धतीने हाताळणे. त्यांच्या मनात शिक्षेविषयी भीती असेल तर ती काढून टाकणे.

लहान मुलांच्या मनातले सुप्त विचार मोठ्यांना कळणे कठीण असते, त्यातून मुलांना त्या वयात आपल्या भावना योग्य पद्धतीने शब्दबद्ध करणंही जमत नसतं. ह्या सिद्धांताला अनेकांचा जोरदार विरोधही झालेला आहे. शिवाय हा सिद्धांत नंतर अनेकांनी यशस्वीरित्या खोडलेला पण आहे. तेंव्हा फ्रॉईडचा हा सिद्धांत स्वीकारणे, नाकारणे, त्याचा राग करणे, हा वेगळा भाग झाला. पण त्याने सुचवलेले उपाय मात्र सहज पटण्याजोगे आहेत. त्याने अप्रत्यक्षपणे एक फार वेगळी गोष्ट यातून सुचवलेली असू शकते, असं मला वाटलं आणि म्हणूनच त्याचा हा सिद्धांत इथे लिहिण्याचे धाडस मी करु शकले.

त्यातून मला उमगलेला एक विचार म्हणजे निरोगी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत आपल्या लैंगिकतेविषयक विचारांचा, अनुभवांचा फार मोठा वाटा असतो. आपण जितके ते विचार दाबून टाकू, त्यांना नाकारु, तितके ते वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने उफाळून वर येऊ शकतात. मग या विचारांना निर्मळ आणि निरोगी पद्धतीने कसे व्यक्त करता येऊ शकेल? सुरुवातीचा मार्ग म्हणजे समानलिंगी आणि भिन्नलिंगी व्यक्तीच्या शरीराची पूर्ण ओळख. ती झालेली असेल, त्यांच्या शरीराविषयीची उत्सुकता पूर्णपणे नष्ट झालेली असेल, तरच आपण समोरच्या व्यक्तीकडे निव्वळ एक व्यक्ती म्हणून पाहू शकतो. एक स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही. ज्याला खरी लिंगनिरपेक्ष दृष्टी असे संबोधता येईल. म्हणजेच लिंगनिरपेक्षतेची शारीरिक पातळी ओलांडल्यावरच नंतर मानसिक / वैचारिक पातळी गाठता येईल. अशा टप्प्यांनी घडत गेलेली लिंगनिरपेक्ष ओळखच नंतर लिंगनिरपेक्ष मैत्री ह्या टप्प्यावर जाऊ शकते.

ही गोष्ट समजवण्यासाठी एक उदाहरण देते. जर्मनीतले बरेचसे पालक आपल्या मुलांसोबत एकत्र अंघोळ करतात. यामुळे मुलांची आपल्याहून भिन्न लिंग अथवा समान लिंग असणार्‍या भावंडांच्या आणि पालकांच्या शरीराविषयीची उत्सुकता पूर्णपणे नष्ट झालेली असते. शिवाय येथील मुलांना कमी वयातच जोडीदार निवडीचे मिळालेले स्वातंत्र्य, ज्या वयात लैंगिकसुखाची आस निर्माण होते, त्याच वयात ते उपभोगण्याची मुभा मिळते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातून एक मोठी उत्सुकता संपून जाते. म्हणजेच पोट भरलेलं असेल तर आपण अन्नाचा सतत विचार करु का? नाही ना? तसंच हे! त्यामुळेच कदाचित ट्रेनमध्ये त्यांच्यासमोर प्रचंड अंगप्रदर्शन करणारी तरुणी आली तरीही ते पुरुष तीळमात्रही विचलित होत नाहीत. त्यांचे पेपरमध्ये खुपसलेले डोळेही बाहेर येत नाहीत आणि इतर स्त्रियाही 'काय बाई हिने कपडे घातलेत', म्हणून नाकं मुरडत नाहीत... आणि स्वतः ते अंगप्रदर्शन करणारी स्त्रीसुद्धा आपण काही विशेष करतोय, अशा अविर्भावात नसते. अगदी सहजता असते या सगळ्यांत...

एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाहीये. आमच्या प्रोफेसरांनी आमची एकदा ट्रिप नेली होती. एका तळ्याकाठी आम्ही थांबलो. माझ्या सहकार्‍यांनी स्विमिंग कॉश्च्युम्स् आणले होतेच. त्या तळ्यात प्रोफेसरांसकट बाकी सहकार्‍यांनी (माझा अपवाद वगळता) एकत्र स्विमिंग वगैरे केलं. माझी एक सहकारी वेगवेगळे स्विमिंग स्ट्रोक्स दाखवून सर्वांना आश्चर्यचकित करत होती. कपडे बदलायला काहीच आडोसा नसल्याने तिकडेच एका कोपर्‍यात त्यांनी कपडे बदलले. कोणीही कोणाकडेही 'तशा' दृष्टीने पहात नव्हतं. सगळे आपल्याच विश्वात होते. मीच काय ती एकटी एकदम अन्कम्फर्टेबल झालेले होते. नग्नता - तीही भिन्नलिंगी व्यक्तींची - अशाप्रकारे जवळून पाहण्याचा पहिलाच अनुभव होता ना! हीच गोष्ट इथल्या स्विमिंगपूल अथवा सौना बाथ वगैरे ठिकाणची. या सार्वजनिक ठिकाणी लोक खुशाल एकमेकांसमोर मोकळेपणाने वावरतात - सार्वजनिक बाथरुममध्ये एकत्र अंघोळ करतात. कोणीही कोणाहीकडे पाहत नसते.

अशा पार्श्वभूमीवर लहानाची मोठी झालेली मुलं मग शिकत असतांना, मुलंमुली एकत्र एखादा प्रोजेक्ट करत असतांना, त्यांच्या मनातही आकर्षण वगैरे विचार येत नाहीत. पूर्ण फोकस हा त्या प्रोजेक्टवर असतो. लेक्चर्सनासुद्धा सगळे समरसून उपस्थित राहतात. बौद्धिक, तार्किक वादविवाद हे सगळं मनापासून चालतं आणि समजा, वाटलंच एखाद्याविषयी आकर्षण, तर ते सरळ बोलून दाखवलं जातं. होकारनकार दोन्ही बाजूंनी खेळकरपणे स्वीकारला जातो. कामाच्या ठिकाणीही त्याहून वेगळी परिस्थिती नसते. स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या नात्यात एक प्रकारची सहजता असते, मोकळेपणा असतो. शारीरिक / मानसिक सुखांच्या गरजेच्यावेळी त्या त्या गरजा पूर्ण झालेल्या असातात, त्यामुळे शिक्षणाच्यावेळी शिक्षण, कामाच्यावेळी काम हे सूत्रही सहजतेने पाळलं जातं. त्यामुळे चांगले विद्यार्थी, दर्जेदार काम, असं चित्रंही दिसून येतं. वखवखलेल्या नजरा, चोरटे स्पर्श, हे काहीही नाही. हो! मात्र, जे जोडीदार म्हणून आवडले, त्यांच्यासोबत राहून, कम्फर्ट लेव्हल पडताळून पाहून लग्न करणे, हेही दिसून आले. असे हे निकोप समाजजीवन घडण्यामागे हा लैंगिक पातळीवरचा मोकळेपणा कारणीभूत असेल का?

ही शारीरिक आणि मानसिक पातळीवरची सहजता समाजात रुजावी, म्हणून काही प्रगत देशांनी 'खुलेपणा' हा पर्याय निवडला असेल का? मात्र आपल्या देशाची सांस्कृतिक / धार्मिक / वैचारिक / नैतिक बांधणी पाहता या गोष्टी आचरणात आणणे प्रचंड अशक्यप्राय वाटू शकते. अनेकांना अमान्यही असू शकते. पचायलाही जड जाऊ शकते, मलासुद्धा जाते. त्यामुळे अशी शब्दशः लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री आपल्या देशात कशी रुजेल? ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. तुमच्याकडे आहे का?

- सानी

प्रतिसाद

छान लेख.

खूप नवीन वाचायला मिळालं या लेखामुळे!!पुन्हा एकदा निवांतपणे वाचणार अजून स्पष्ट होण्यासाठी!!

छान लेख. फ्रॉईडच्या सिद्धांताबद्दल नवीन वाचायला मिळालं!

(१) लेखातील काही मुद्दे पटले नाहीत तरी मांडणी मात्र चांगली केली आहे.
(२) फ्रॉइड्ने जास्त ’फूटेज’ खाल्लं.
(३) अप्रूप नष्ट करून लिंगनिरपेक्षतेकडे वाटचाल हे पटण्यासारखं नाही.
‘लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री’ या विषयाच्या अनुषंगाने; लिंगभिन्नता, लैंगिक आकर्षण, अप्रूप ही वास्तवता मान्य करून लिंगनिरपेक्ष विचार/व्यवहार याबाबत मतप्रदर्शन/अनुभव अपेक्षित होते.
प्रस्तुत लेख मूळ विषयापासून काहीसा दूर गेला असं वैयक्तिक मत. (चुकलंही असेल कदाचित)

मृदुला,

>> लैंगिकतेचा (स्त्री/पु/इतर) आणि नग्नतेचा सहज स्वीकार जर्मनांमध्ये आढळतो तितका इतर युरोपियनांतही
>> दिसून येत नाही.

युरोपात जर्मन मनुष्य साधारणत: कुटुंबवत्सल धरला जातो. कुटुंबवत्सलता आणि नग्नतेच सहज स्वीकार या परस्परपूरक वा संबंधित तर नसतील? उगीच एक आपली शंका!

आ.न.,
-गा.पै.

सानी, फ्रॉईडचे विचार इथे दिल्याबद्दल थँक्स. फार पूर्वी कधीतरी वाचलं होतं फ्रॉईडला.... तेव्हा ते सारे कळलेच होते असे म्हणायचे धाडस करणार नाही. आज तुझ्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा त्याच्या विचारांशी भेट झाली.
दोन अनुभव इथे शेअर करावेसे वाटतात. कोणाला कदाचित ते स्पिरिच्युअल/ फिलॉसॉफिकल वाटू शकतील. परंतु माझ्या दृष्टीने त्यांचे व्यवहारातही मूल्य आहेच!

१. काही महिन्यांपूर्वी एक अगदी जवळचा भारतीय मित्र युरोप टूरवर जाऊन आला. त्यात त्याने वेगवेगळ्या देशांतील हॉट स्प्रिंग्ज, स्पा, कम्यूनल शावर्स चे अनुभव पहिल्यांदाच घेतले. सुरुवातीला त्याला स्त्री-पुरुषांना निसर्गावस्थेत एकत्रित, आपल्या लहान मुलांसमवेत, आईवडिलांसमवेत सार्‍या कुटुंबासकट स्नान करताना, पोहताना, शावर घेताना, पाण्यात डुंबताना पाहून खूप विचित्र, अनकम्फर्टेबल वाटले होते. ते त्याने प्रामाणिकपणे नमूदही केले. काही ठिकाणी जाडजूड, लठ्ठमुठ्ठ स्त्री-पुरुष पाहून तर त्याला किंचित किळसही वाटली होती. सुरकुतल्या ओघळल्या त्वचेचे, अवयवांचे लोक पाहून 'नको' असे वाटले होते. पण नंतर नजर रुळली. अशी खुल्या अवस्थेत हिंडणारी माणसे पाहून सुरुवातीला ते चित्र अव्हेरणारे मन हळूहळू शांत झाले, मग हलकेच त्यांना त्या अवस्थेत पाहावयास लागण्याचा - त्या लोकांच्या त्या निसर्गावस्थेचा त्याने स्वीकार केला आणि हळूहळू त्यांच्या नग्नावस्थेवरून मन हटून ते लोक आपल्या पूर्ण परिवारासमवेत (आजी, आजोबा, आई, बाबा व मुले) किती मोकळेपणाने - शरीराचा बाऊ न करता जलतरणाचा, डुंबण्याचा आनंद एकत्रितपणे घेत आहेत हे त्याला दिसू लागले. असे काही फॅमिलीला एकत्रितपणे एंजॉय करता येऊ शकते ही कल्पनाच आजवर त्याच्या गावी नव्हती. त्याच्या मते हे मानसिक स्थित्यंतर खूप काही शिकविणारे ठरले. आपले मानवी देहाविषयीचे अनेक भ्रम, गैरसमज, खोट्या किंवा अवास्तव कल्पना असतात -टॅबूज असतात. एका सर्जन मित्राला त्याच्या विद्यार्थीदशेत मानवी देहाचे विच्छेदन त्याने जेव्हा पहिल्यांदा केले तेव्हा कसे वाटले हे विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर अद्याप माझ्या स्मरणात आहे, ''आपण ज्याला ब्यूटी म्हणतो ती ब्यूटी ''स्किन-डीप'' असते हे डिसेक्शन करताना अत्यंत अत्यंत पटलेच!'' अशा त्या बाह्यतः ''ब्यूटीफुल'' समजल्या जाणार्‍या देहालाही जेव्हा तुम्ही सामूहिक पातळीवर निसर्गावस्थेत पाहता तेव्हा त्या शरीर दर्शनालाही डोळे व मन सरावतात... मनातला एक संकोच गळून पडतो... समोरच्या 'व्यक्ती'च्या नजरेला नजर देताना मनातला चोरटा भाव नष्ट होतो हा युरोपमध्ये हिंडलेल्या त्या मित्राचा अनुभव आहे.

२. स्थळ : हर की पौडी घाट, हरिद्वार. येथे सकाळ सायंकाळ हजारो स्त्री-पुरुष गंगेत अगदी कमी कपड्यांत स्नान करताना पाहिलेत. कोणी पूर्णतः विवस्त्र होत नाहीत. परंतु एकमेकांसमोर घाटावरच ओले कपडे बदलताना अनेक स्त्री-पुरुषांना पाहिले आहे. गंमत म्हणजे तिथे कोणाचे लक्षही नसते तुम्ही काय करताय त्या कडे. पहिल्यांदा तिथे घाटावरच कपडे बदलताना मी कमालीची कॉन्शस झाले होते. पण नंतर लक्षात आले की अरेच्या! कोणी ढुंकून बघत नाहीए. लोक आपल्याच मस्तीत आहेत... डुंबत आहेत, स्नान करत आहेत, गंगेच्या पाण्याचा आनंद घेत आहेत. इतरांचे अनुभव काय ते माहित नाही.... पण माझ्यासाठी हा महत्त्वाचा म्हणावा असा अनुभव होता. माझ्यासाठी तो अनुभव स्पिरिच्युअल होता आणि त्याचबरोबर बाह्य-आवरणाला आपण एरवी किती महत्त्व देतो ह्याची जाणीव करून देणारा!!

झंपी, आपण एका क्षेत्रातल्या आहोत, हे वाचून छान वाटले. :-)

वैद्यबुवा, मला लेखातून अभिप्रेत असलेले विचार तुम्ही अत्यंत संयतपणे शब्दबद्ध केलेले आहेत. फार आवडले. खुप खुप आभार. :-)

अरुंधती, तुमच्या मित्राचा अनुभव इथे दिल्यामुळे इथल्या खुल्या संस्कृतीचा सुरुवातीला आपल्या मनावर बसणारा 'कल्चर शॉक' आणि मग त्यानंतर येणार्‍या अनेक गोष्टींचे रिअलायझेशन ह्या किती स्वाभाविक गोष्टी आहेत, याची जाणीव झाली. हा लेख लिहितांना हा विशिष्ट भाग लिहू की नको? मला काय म्हणायचेय, हे वाचकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल की नाही, ही धाकधूक वाटत होती. पण माझे विचार बर्‍यापैकी प्रातिनिधिक असावेत, हे तुमच्या मित्राच्या अनुभवामुळे समजले, आवर्जून हा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

तसेच आपल्या देशातील धार्मिक स्थळी गेल्यावर पहायला मिळणार्‍या अनुभवांची वरील खुल्या संस्कृतीशी केलेली तुलना फार इन्ट्रेस्टिंग वाटली. ह्या धार्मिक स्थळांवर सहजतेने केलेल्या नग्नतेच्या स्वीकारामागे काय आणि कशी प्रक्रिया असू शकते, याविषयी अनेक विचार मनात क्षणात डोकावून गेले. :-)

अनेक प्रतिक्रियांवरुन मला काय म्हणायचेय, तेही खुप जणांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेय, ह्याचेही समाधान आहेच.

सर्वच प्रतिसादकांची मनापासून आभारी आहे. :-)

नवीन माहिती मिळाली ह्या लेखामुळे. धन्यवाद :)

सानी
लेख चान्गला आहे.
परन्तु खरेतर मला 'लिन्गनिरपेक्षता' हा शब्द 'अनैसर्गिक' वाटतो.
नात्यात मोकळेपणा असावा. पण तसा मोकळेपणा अशावेळी येईल, जेव्हा स्त्री पुरुष स्वतःशी मोकळेपणे वागू शकतील.
मग समाज भारतीय असो वा परकीय !!