लिंगनिरपेक्षता सोयीनुसार की प्रामाणिक?

परिसंवादाच्या घोषणेमधली ती डॉक्टरांची जाहिरात पाहिली आणि विषय एकदम क्लिक झाला (असं मला वाटतय!). कारण तसाच थोडाफार प्रकार अगदी २/३ महिन्यांपूर्वीच माझ्याबाबतीत घडला. माझ्या फिमेल फिजिशियनचा अनुभव पहिल्याच भेटीच्या वेळी चांगला आला नाही. त्यामुळं नवरा सारखा म्हणत होता की, आतातरी त्याच्याच मेल फिजिशियनला प्रायमरी फिजिशियन म्हणून निवड. खूप चांगला अनुभव आला होता नवर्‍याला वेळोवेळी. पण मी अडून बसले फिमेल फिजिशियनकडेच जाणार, फक्त आता दुसरी बघेन. "डॉक्टरच्या बाबतीत कसं बघू शकतेस तू मेलफिमेल वगैरे? चांगले उपचार हे महत्त्वाचं ना?", या नवर्‍याच्या बोलण्यावर ''जिथं पर्याय असेल तिथं मी हे आता बघणारच" इति मी. नवरा हताश, हतबल, अवाक इ. !

मला खरंच माझ्या या वागण्याचं नवल वाटतं. कॉलेजवयात मुलांबरोबर घनिष्ठ मैत्री, खिदळणं, पिकनिक, सिनेमा, अभ्यास हे अगदी साग्रसंगीत पार पडलंय. मैत्रिणींपेक्षा मित्र जास्त हेपण. खूप गोष्टी शेअर केल्यात मित्रांबरोबर. बेस्ट फ्रेंडपण (K2H2चा परिणाम) मित्रच होता / आहे अजूनही.

खरंतर मुलांशी मैत्री हा काही वेगळा किंवा कुतूहलाचा विषय नव्हताच मुळी माझ्यासाठी तेव्हा. लहानपणापासून मोठ्या दोन्ही बहिणींचे मित्र घरी यायचे मैत्रिणींप्रमाणेच ते बघत होतेच. दहावीपर्यंत मुलींची शाळा, त्यानंतर मैत्रिणींसारखेच मित्र पण असणार कॉलेजमध्ये हे अगदी ठरून गेलेलं जणू. माझ्या आईवडिलांनी आम्हां तिघी बहिणींना कधी मुलांबरोबरच्या मैत्रीमधले धोके, मर्यादा इ. काहीच सांगितल्याचे आठवत नाही. बहुतेक आमच्यावरचा प्रचंड विश्वास हे त्यामागचं कारण असावं. अर्थात अगदी लिंगनिरपेक्ष मैत्री असली तरी स्त्री म्हणून असणार्‍या शारीरिक जाणिवा तशा कायम सोबत करायच्या. बाईकवरून एकत्र पिकनिक, सिनेमाला जाणे असे असायचे, पण अगदी गळ्यात पडणे किंवा अंगचटीला येणे हे नव्हतेच. पण असे आजूबाजूला कायम बघितले तरी ते मुलंमुली वाया गेलेले, वाईटच असे चुकूनही कधी मनात आले नाही, तेव्हाही आणि अगदी आताही. कारण अशी स्त्री-पुरुष निखळ मैत्री असू शकतेच, हे माहीत होते. प्रत्येकाचा comfort zone वेगळा एवढंच.

व्यायसायिक जगाचा फारच तोकडा अनुभव आहे. लग्नाआधी वर्षभर नोकरी केली तेव्हा मात्र सहकारी हे टिपिकल 'पुरुष'च होते. अगदी जेवढ्यास तेवढे बोलणे पुरुष सहकार्‍यांबरोबर आणि बायकांमध्ये रमणे एरवी, हेच निवडले. खरंतर ज्या वयात धोका असतो म्हणतात मुलांबरोबर मैत्रीचा तेव्हा कधी या धोक्याचा वास पण आला नाही इतकं निरागस, सह़ज आणि निखळ होतं ते. पण थोडीशी मॅच्युरिटी की काय ते आल्यावर बरंचसं बदलून गेलं.

बाकी आम्ही तिघी बहिणीच म्हणून, पण कुणाचे शेरे वगैरे ऐकलेले आठवत नाहीत. अगदी जुन्या पिढीच्या लोकांकडूनसुद्धा नाहीत. घरात शिक्षणाचं दान मुबलक प्रमाणात पडल्यामुळं असेल कदाचित, पण कुठल्याच बाबतीत मुलगी म्हणजे मुलापेक्षा कमी, दुय्यम दर्जा अशा कोणत्याच गोष्टीची पुसटशीही जाणीव झाली नाही. लिंगनिरपेक्षता अगदी सुखेनैव नांदते माझ्या माहेरी. नवरा पण त्याच पठडीतला. म्हणून आनंदीआनंद गडे!

सार्वजनिक जीवनातही मी कुठल्याच बाबतीत हे 'स्त्रीपुरुष' बघत बसत नाही. दोघांबरोबरच सारख्याच मोकळेपणाने बोलू शकते (पुन्हा काही ठरावीक विषय सोडून हे आहेच!).खरंतर संसारचक्रात अशा प्रकारे अडकली आहे की, हा लिंगनिरपेक्षतेचा हा विषय पण जाणिवा-नेणिवा यांच्यापासून कोसो दूर आहे. त्यामुळं खूपच विस्कळित मांडलेत मी विचार, असं वाटतयं. अर्थात माझी झेप एवढीच आहे.

रतेशेवटी असा विचार येतोय की, हे लिंगनिरपेक्षता इ. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर,आजूबाजूच्या सर्कलनुसार थोडंफार काही बाबतींत बदलत असावं. वयाच्या तिशीला आल्यावर अचानक मला मेल डॉक्टरकडे उपचार घ्यावेसे वाटू नयेत, हे माझ्याही आकलनशक्तीपलीकडचं. कळतयं पण वळत नाही असं काहीसं. या परिसंवादाच्या निमित्तानं काही वळलं तर बरंच.

अगदी मनापासून वाटतं की, हे स्त्रीमुक्ती, महिला दिन अजिबात होऊ नयेत. समान वागणूक, दर्जा, निखळ मैत्री, त्यातली निरागसता असंच चित्र सगळीकडे दिसावं, असं वाटतं.पण जेव्हा स्त्रीवर शारीरिक अत्याचार होतो, तेव्हा 'दोष काय फक्त पुरुषाचा नाही, त्या स्त्रीनं अमुकअमुक कपडे घातले, तिचीपण चूक आहेच ना', असा सूर, मग तो अगदी हलकासा का असेना, उमटला की समस्त स्त्रियांनीच बाई आपली आपली काळजी घ्यावी. स्वतःच्या स्त्री असण्याची जाणीव ठेवावीच, हे राहून राहून वाटतंच. शेवटी स्त्रीच बहुसंख्य वेळेला बळी ठरते ना.

इथून पुढच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, व्यावसायिक जगात पुन्हा नव्याने कधी प्रवेश करेन तेव्हा या विषयावर काय विचार असतील, हे माहीत नाही. पण माझा मुलगा वयात येईल तेव्हा मुलींबरोबर काहीही चुकीचं वागू नकोस, असं सांगेन मी आणि माझ्या मुलीला वयात आल्यावर 'जरा जपून' असंही सांगेनच. मी आशावादी नाही हेच खरं!!!

- Shilpa_ka

प्रतिसाद

काहीच झालेले नसताना गेला तर भलत्याचे रोगाचे निदान>>> बेफि, काहीच झालेले नसतांना माणूस डॉक्टरकडे कशाला जाईल? हा हा... :-))))

जोक्स अपार्ट, मी पण ती दुसरी शक्यता काय असावी, हा विचार करतच होते. पण काही सुचले नाही.

arc,
विश्लेषण आवडलं तुमचं!!!आणि मला समजलंय असं वाटतंय तुम्हाला नक्की म्हणायचं आहे ते. पण मी घाबरत तर नाहीच आहे कारण डॉक्टर हा जबाबदारच आहे हे नक्की माहीत आहे. एरवी मी आमच्या दोघांचा प्रायमरी डॉक्टर एकच, ज्याचा चांगला अनुभव गाठीशी आहे म्हणून, हे अगदी स्वाभाविक होतं.पण अचानकच नव-याबरोबर मेल डॉक्टर नको मला असा वाद घातला :) नंतर आमच्या भारतातल्या (मेल :))डॉक्टरला फोन करून उपाय विचारला आणि तो छान लागू झाला.त्यामुळं मेल फिमेल कुठल्याच डॉक्टरकडे जावं लागलं नाही परत :) वर आता परत काही झालं तर नक्की मी विचार करेन तुझ्याच डॉक्टरकडे जायचा अशी (उगाचच)समजूत घातली नव-याची :) अर्थात खूप काही झालं नव्हतं मला पण अगदीच सर्दी खोकला असंही नव्हतं.पण अचानक मी इतकी कॉशस का झाले याचं मला आणि नव-याला पण आश्चर्य वाटलं.अर्थात यावर phase हेच उत्तर सापडतंय मला.

हो दुरुस्त केले.