लिंगनिरपेक्षता सोयीनुसार की प्रामाणिक?

परिसंवादाच्या घोषणेमधली ती डॉक्टरांची जाहिरात पाहिली आणि विषय एकदम क्लिक झाला (असं मला वाटतय!). कारण तसाच थोडाफार प्रकार अगदी २/३ महिन्यांपूर्वीच माझ्याबाबतीत घडला. माझ्या फिमेल फिजिशियनचा अनुभव पहिल्याच भेटीच्या वेळी चांगला आला नाही. त्यामुळं नवरा सारखा म्हणत होता की, आतातरी त्याच्याच मेल फिजिशियनला प्रायमरी फिजिशियन म्हणून निवड. खूप चांगला अनुभव आला होता नवर्‍याला वेळोवेळी. पण मी अडून बसले फिमेल फिजिशियनकडेच जाणार, फक्त आता दुसरी बघेन. "डॉक्टरच्या बाबतीत कसं बघू शकतेस तू मेलफिमेल वगैरे? चांगले उपचार हे महत्त्वाचं ना?", या नवर्‍याच्या बोलण्यावर ''जिथं पर्याय असेल तिथं मी हे आता बघणारच" इति मी. नवरा हताश, हतबल, अवाक इ. !

मला खरंच माझ्या या वागण्याचं नवल वाटतं. कॉलेजवयात मुलांबरोबर घनिष्ठ मैत्री, खिदळणं, पिकनिक, सिनेमा, अभ्यास हे अगदी साग्रसंगीत पार पडलंय. मैत्रिणींपेक्षा मित्र जास्त हेपण. खूप गोष्टी शेअर केल्यात मित्रांबरोबर. बेस्ट फ्रेंडपण (K2H2चा परिणाम) मित्रच होता / आहे अजूनही.

खरंतर मुलांशी मैत्री हा काही वेगळा किंवा कुतूहलाचा विषय नव्हताच मुळी माझ्यासाठी तेव्हा. लहानपणापासून मोठ्या दोन्ही बहिणींचे मित्र घरी यायचे मैत्रिणींप्रमाणेच ते बघत होतेच. दहावीपर्यंत मुलींची शाळा, त्यानंतर मैत्रिणींसारखेच मित्र पण असणार कॉलेजमध्ये हे अगदी ठरून गेलेलं जणू. माझ्या आईवडिलांनी आम्हां तिघी बहिणींना कधी मुलांबरोबरच्या मैत्रीमधले धोके, मर्यादा इ. काहीच सांगितल्याचे आठवत नाही. बहुतेक आमच्यावरचा प्रचंड विश्वास हे त्यामागचं कारण असावं. अर्थात अगदी लिंगनिरपेक्ष मैत्री असली तरी स्त्री म्हणून असणार्‍या शारीरिक जाणिवा तशा कायम सोबत करायच्या. बाईकवरून एकत्र पिकनिक, सिनेमाला जाणे असे असायचे, पण अगदी गळ्यात पडणे किंवा अंगचटीला येणे हे नव्हतेच. पण असे आजूबाजूला कायम बघितले तरी ते मुलंमुली वाया गेलेले, वाईटच असे चुकूनही कधी मनात आले नाही, तेव्हाही आणि अगदी आताही. कारण अशी स्त्री-पुरुष निखळ मैत्री असू शकतेच, हे माहीत होते. प्रत्येकाचा comfort zone वेगळा एवढंच.

व्यायसायिक जगाचा फारच तोकडा अनुभव आहे. लग्नाआधी वर्षभर नोकरी केली तेव्हा मात्र सहकारी हे टिपिकल 'पुरुष'च होते. अगदी जेवढ्यास तेवढे बोलणे पुरुष सहकार्‍यांबरोबर आणि बायकांमध्ये रमणे एरवी, हेच निवडले. खरंतर ज्या वयात धोका असतो म्हणतात मुलांबरोबर मैत्रीचा तेव्हा कधी या धोक्याचा वास पण आला नाही इतकं निरागस, सह़ज आणि निखळ होतं ते. पण थोडीशी मॅच्युरिटी की काय ते आल्यावर बरंचसं बदलून गेलं.

बाकी आम्ही तिघी बहिणीच म्हणून, पण कुणाचे शेरे वगैरे ऐकलेले आठवत नाहीत. अगदी जुन्या पिढीच्या लोकांकडूनसुद्धा नाहीत. घरात शिक्षणाचं दान मुबलक प्रमाणात पडल्यामुळं असेल कदाचित, पण कुठल्याच बाबतीत मुलगी म्हणजे मुलापेक्षा कमी, दुय्यम दर्जा अशा कोणत्याच गोष्टीची पुसटशीही जाणीव झाली नाही. लिंगनिरपेक्षता अगदी सुखेनैव नांदते माझ्या माहेरी. नवरा पण त्याच पठडीतला. म्हणून आनंदीआनंद गडे!

सार्वजनिक जीवनातही मी कुठल्याच बाबतीत हे 'स्त्रीपुरुष' बघत बसत नाही. दोघांबरोबरच सारख्याच मोकळेपणाने बोलू शकते (पुन्हा काही ठरावीक विषय सोडून हे आहेच!).खरंतर संसारचक्रात अशा प्रकारे अडकली आहे की, हा लिंगनिरपेक्षतेचा हा विषय पण जाणिवा-नेणिवा यांच्यापासून कोसो दूर आहे. त्यामुळं खूपच विस्कळित मांडलेत मी विचार, असं वाटतयं. अर्थात माझी झेप एवढीच आहे.

रतेशेवटी असा विचार येतोय की, हे लिंगनिरपेक्षता इ. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर,आजूबाजूच्या सर्कलनुसार थोडंफार काही बाबतींत बदलत असावं. वयाच्या तिशीला आल्यावर अचानक मला मेल डॉक्टरकडे उपचार घ्यावेसे वाटू नयेत, हे माझ्याही आकलनशक्तीपलीकडचं. कळतयं पण वळत नाही असं काहीसं. या परिसंवादाच्या निमित्तानं काही वळलं तर बरंच.

अगदी मनापासून वाटतं की, हे स्त्रीमुक्ती, महिला दिन अजिबात होऊ नयेत. समान वागणूक, दर्जा, निखळ मैत्री, त्यातली निरागसता असंच चित्र सगळीकडे दिसावं, असं वाटतं.पण जेव्हा स्त्रीवर शारीरिक अत्याचार होतो, तेव्हा 'दोष काय फक्त पुरुषाचा नाही, त्या स्त्रीनं अमुकअमुक कपडे घातले, तिचीपण चूक आहेच ना', असा सूर, मग तो अगदी हलकासा का असेना, उमटला की समस्त स्त्रियांनीच बाई आपली आपली काळजी घ्यावी. स्वतःच्या स्त्री असण्याची जाणीव ठेवावीच, हे राहून राहून वाटतंच. शेवटी स्त्रीच बहुसंख्य वेळेला बळी ठरते ना.

इथून पुढच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, व्यावसायिक जगात पुन्हा नव्याने कधी प्रवेश करेन तेव्हा या विषयावर काय विचार असतील, हे माहीत नाही. पण माझा मुलगा वयात येईल तेव्हा मुलींबरोबर काहीही चुकीचं वागू नकोस, असं सांगेन मी आणि माझ्या मुलीला वयात आल्यावर 'जरा जपून' असंही सांगेनच. मी आशावादी नाही हेच खरं!!!

- Shilpa_ka

प्रतिसाद

गोंधळासकट प्रामाणिकपणा भावला आणि आवडला शिल्पा. :-)
पटले मात्र नाही.

एक अतिशय आवडलं की आपण गोंधळलेलो आहोत हे अजिबात लपवलेलं नाहीये आणि त्यामुळे प्रचंड प्रामाणिक लेख. खरे तर आपण गोंधळलो आहोत हेच 'छे, मी कुठे गोंधळलोय/ लीय' या स्टॅन्डपेक्षा कितीतरी उच्च वाटले बुवा.

====================================

अगदी मनापासून वाटतं की, हे स्त्रीमुक्ती, महिला दिन अजिबात होऊ नयेत.>>>>>

व्वा (हे विधान लिंगनिरपेक्षतेशी निगडीत आहेच आहे)

समान वागणूक, दर्जा, निखळ मैत्री, त्यातली निरागसता असंच चित्र सगळीकडे दिसावं, असं वाटतं.पण जेव्हा स्त्रीवर शारीरिक अत्याचार होतो, तेव्हा 'दोष काय फक्त पुरुषाचा नाही, त्या स्त्रीनं अमुकअमुक कपडे घातले, तिचीपण चूक आहेच ना', असा सूर, मग तो अगदी हलकासा का असेना, उमटला की समस्त स्त्रियांनीच बाई आपली आपली काळजी घ्यावी. स्वतःच्या स्त्री असण्याची जाणीव ठेवावीच, हे राहून राहून वाटतंच. शेवटी स्त्रीच बहुसंख्य वेळेला बळी ठरते ना.>>

खरे आहे, पण हा विषय (लिंगनिरपेक्षतेशी संबंधीत असला तरीही) एक स्वतंत्र दर्जाचा विषय वाटला.

इथून पुढच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, व्यावसायिक जगात पुन्हा नव्याने कधी प्रवेश करेन तेव्हा या विषयावर काय विचार असतील, हे माहीत नाही.>>>

व्वा! आणखीन एक सुंदर विधान. (यात कोणतीही ठाम भूमिका एन्फोर्स केलेली नाही, करायला लावलेली नाही)

पण माझा मुलगा वयात येईल तेव्हा मुलींबरोबर काहीही चुकीचं वागू नकोस, असं सांगेन मी आणि माझ्या मुलीला वयात आल्यावर 'जरा जपून' असंही सांगेनच. मी आशावादी नाही हेच खरं!!!>>>

हे ठीकच, हे सगळेच आई वडील आपल्या मुलांना सांगतातच. अगदी लिंगनिरपेक्ष असे एक स्वतंत्र राष्ट्र जरी निर्माण झाले तरी आईवडील हे सांगतीलच. पण ए विधान मात्र लिंगनिरपेक्षतेला 'तडा देणारे' वाटले.

-'बेफिकीर'!

चांगल लिहिलयस गं.

मनाशी प्रामाणिक राहून केलेलं लेखन.

शिल्पा..आवडेश...
मनाशी प्रामाणिक राहून केलेलं लेखन..+१

शिल्पा तुम्ही मनापासून लिहिले आहे त्याबद्दल अभिनंदन..... विषयाबद्दल कळणे / न कळणे यापेक्षा लिहिणे महत्वाचे असते. तुम्ही ते केलेत यबद्दल धन्यवाद.

पुढील परिच्छेद तुम्ही लिहिल आहे, त्याबद्दल काही लिहवेसे वाटले.........:
>>>>>>>>>>अगदी मनापासून वाटतं की, हे स्त्रीमुक्ती, महिला दिन अजिबात होऊ नयेत. समान वागणूक, दर्जा, निखळ मैत्री, त्यातली निरागसता असंच चित्र सगळीकडे दिसावं, असं वाटतं.पण जेव्हा स्त्रीवर शारीरिक अत्याचार होतो, तेव्हा 'दोष काय फक्त पुरुषाचा नाही, त्या स्त्रीनं अमुकअमुक कपडे घातले, तिचीपण चूक आहेच ना', असा सूर, मग तो अगदी हलकासा का असेना, उमटला की समस्त स्त्रियांनीच बाई आपली आपली काळजी घ्यावी. स्वतःच्या स्त्री असण्याची जाणीव ठेवावीच, हे राहून राहून वाटतंच. शेवटी स्त्रीच बहुसंख्य वेळेला बळी ठरते ना><<<<<<<<<

मला वाटतं हे सर्व आपल्या समाजाने आपल्यावरंच घालून घेतलेले (चुकीचे) बंधनाचे प्रकार आहेत.............. आणखी एक उदाहरणा मला द्यावेसे वाटते ते म्हणजे, ट्रेनमध्ये स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे डबे कशाला? सर्वजण एकत्र गेले तर काय होईल? माझ्या मते भारतात आजतरी अशी परिस्थिती यायची शक्यता नाही की एकत्र असलेल्या स्त्रियांना इतर पुरुषांनी मिळून त्रास देणे (कुठल्याही प्रकारचा).......... सर्वजणा एकत्र गेले-आले तर उलट पुरुषांना सांभाळूनच राहायला लागेल.... असो.

दुसरी गोष्ट म्हणजे "शेवटी स्त्रीच बहुसंख्य वेळेला बळी ठरते" असे म्हणणे म्हणजे मला वाटते समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टीकोण असावा.......... उदाहरणार्थ बलात्कारित स्त्रीला समाज "चुकीच्या नजरेने" पाहत असेल, तर ज्याने बलात्कार केला त्याचा फायदाच होतो......... उलटतपासणीच्या वेळी म्हणूनच ते निर्लज्ज विधाने करु शकतात..... त्याऐवजी जर समाजाने बलात्कारित स्त्रीबद्दल तिला साथ देण्याची मनोवृत्ती अंगिकारली आणि ज्याने हे अधम कृत्य केले त्याला "पुरुष" नाटकात दाखविल्याप्रमाणे लिंग कापून टाकले व वाळीत टाकले किंवा अशी शिक्षा दिली गेली तर मोठ्या प्रमाणात "बळी जाते" हा वाक्प्रयोग बदलून बलात्कार करणारा "बळी जाणारा" ठरु लागेल.

हे स्त्रीमुक्ती, महिला दिन अजिबात होऊ नयेत. समान वागणूक, दर्जा, निखळ मैत्री, त्यातली निरागसता असंच चित्र सगळीकडे दिसावं, असं वाटतं. >> जोरदार अनुमोदन . पण तशी परिस्थिती यायला वेळ आहे . अन आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय ते अशक्य आहे .

भारतात आजतरी अशी परिस्थिती यायची शक्यता नाही की एकत्र असलेल्या स्त्रियांना इतर पुरुषांनी मिळून त्रास देणे >> कुठल्या गावात रहाता तुम्ही ? २०११ मधे हैदराबाद अन बंगलोर येथे ट्रेन स्टेशनवर बायकांच्या डब्याच्या आसपास कूली अन तत्सम पुरुष स्वतःच प्रदर्शन करताना पाहिलेत. सासरची मंडळी जवळ असल्याने पोलिसाला सांगणे हे सुद्ध जमले नाही. आमच्या गृपमधल्या लहानग्यांना तिथून सत्वर कटवणे एवढेच जमले.

मुंबईत, पुण्यात, नाशकात , भारतातल्या प्रत्येक शहरात , गावात असेच अनुभव अनेकींचे असतील. प्रत्यक्ष ट्रेनच्या बसच्या गर्दीत जे अनुभवावं लागतं त्याची तुम्हाला काय कल्पना येणार !

एक प्रामाणिकपणा या पलिकडे या लेखातून मला काही नाही सापडलं..
असो.

हा विषय समोर ठेवताना खुद्द संपादक/संयोजकांच्या मांडणीमुळे आमचा (पक्षी: माझा) जो गोंधळ उडाला होता आणि या विषयावर नक्की काय लिहायचं हे शेवटपर्यंत नीट कळलं नव्हतं, त्याचंच एक प्रतिबिंब (पक्षी: प्रातिनिधिक लेख) म्हणून हा लेख घेतला असावा काय?

आनंदयात्री, संपादकांच्या मांडणीलाच केवळ दोष देताना अनेकांचा गोंधळ उडाला नव्हता हे ही लक्षात असू द्यात. नक्की काय लिहायचं हे नीट कळलं नव्हतं हा कदाचित पुरेसा विचार करायचा कंटाळा केल्याचा परिणामही असू शकतो.

बाकी विषय क्लिष्ट आहे आणि कोणीच या विषयाचा विचार केलेला नसणार तेव्हा कुणाचाही गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. घोषणेच्या धाग्यावर प्रश्न विचारा असे वारंवार सांगूनही दोन तीन जण वगळता कुणाचेही प्रश्न आलेले दिसले नाहीत.

संपादकांच्या मांडणीलाच केवळ दोष देताना अनेकांचा गोंधळ उडाला नव्हता हे ही लक्षात असू द्यात.
>>>
संपादकांकडे बोट दाखवून स्वतःची सोयिस्कर सुटका करून घेत आहे असा समज नसावाच एवढंच सांगेन. या विषयावर आलेल्या सर्व जाहिराती मी वाचल्या आहेत. त्यावर मी एकही प्रश्न विचारला नसला तरी ते प्रश्न आणि आपल्याकडून (संपादक मंडळ) आलेली उत्तरेही वाचली आहेत. एक वेळ अशी आली, की लोकांनी इतके स्पष्ट प्रश्न विचारूनही संपादकांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये तेव्हा 'आपण न लिहिता इतर लोक काय लिहित आहेत हे वाचू. मग कळेल की आपल्याला काय कळलं होतं/नव्हतं' असं ठरवलं. आणि म्हणूनच सिलेक्ट न झालेलेही लेख वाचायला मिळतील का या प्रश्नाला त्या धाग्यावर मी अनुमोदन दिलंय. ते वाचून कदाचित अजून कळेल की काय अपेक्षित नव्हतं. एवढं स्पष्टीकरण पुरेसं असेल असे वाटते. अथवा दोघेही आपापल्या बाजूने बरोबर आहेत, असं समजूया.

लोकांनी इतके स्पष्ट प्रश्न विचारूनही संपादकांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये <<<
कोणते स्पष्ट प्रश्न? ते कुठे आहेत?
आम्ही लोकांनी प्रश्न विचारावेत म्हणून वारंवार सांगूनही तिथे खरोखर गांभीर्याने विचारणारे किती होते? २ किंवा ४ फार फार तर. .
हा उपक्रम कसा होऊच नये, संयुक्ता कसे असूच नये, संयोजक मूर्खच आहेत असले सूर म्हणजे प्रश्न नव्हेत नाही का?

अनेकांचा लिहिताना गोंधळ उडाला जे साहजिक आहे. हा विषय क्लिष्ट, अवघड आहे ह्याची कल्पना आहेच. आणि एवढ्या जड विषयावर लिहिणं जमलं नाही तर नाही.

सर्वांना प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !!
@आनंदयात्री
हा विषय समोर ठेवताना खुद्द संपादक/संयोजकांच्या मांडणीमुळे आमचा (पक्षी: माझा) जो गोंधळ उडाला होता आणि या विषयावर नक्की काय लिहायचं हे शेवटपर्यंत नीट कळलं नव्हतं, त्याचंच एक प्रतिबिंब (पक्षी: प्रातिनिधिक लेख) म्हणून हा लेख घेतला असावा काय?>>>>

संयोजकांनी हा लेख का घेतला असेल याबाबत काहीच भाष्य करता येणार नाही.पण अगदीच राहवत नाहीये म्हणून थोडंसं स्पष्टीकरण देत आहे.माझा ह्या विषयाबाबत उडालेला गोंधळ हा संयोजक वा जाहिराती यामुळे अजिबातच नाही.या विषयाचा असलेला प्रचंड आवाका आणि मी लेखात म्हटल्याप्रमाणे मला सध्या या विषयाशी जास्त रिलेट न करता येणं यामुळं जे मनाशी चाचपडून बघितल्यावर बाहेर आलं तेच लिहिलयं.वरती जे मी पहिल्या ओळीत 'असं मला वाटतयं'हे जे लिहिलयं ते याच अनुषंगानं.उलट संयोजकांसह इतरांनी घोषणेच्या धाग्यावर केलेल्या स्पष्टीकरणामुळे माझे विचार तपासताना खूप फायदा झाला.
घोषणेच्या धाग्यावर 'प्रयोजन काय' इ.संदर्भाने जी चर्चा चालू होती तेव्हा एक पोस्ट होती(बहुतेक मैत्रेयी यांची)'प्रामाणिकपणे आपलेच विचार तपासून बघणे यानिमित्ताने हे पुरेसे प्रयोजन नाही काय?' अशा प्रकारची. हेच मनाशी ठेवून हा लेख लिहिला.स्वतःचे विचार जाणून घेतले हेच माझ्यासाठी खूप होतं.परिसंवाद आहे त्यामुळे स्वतःचे विचार,अनुभव मांडायचेत,या विचाराने लेख पाठवण्याचं धाडस केलं.निवड झाली हा माझ्यासाठी बोनसच आणि प्रतिक्रिया हा डबल बोनस!!! परिसंवादातील बाकीचे एकापेक्षा एक सरस लेख आहेत त्यात माझा लेख कुठे बसतो याची पूर्ण जाणीव आहे.
अवांतर- तुमची आणि संयोजकांची जी नोकझोक :) चालू आहे (चर्चेच्या धाग्यावर पण वाचली मी) त्यात माझा लेख पण माध्यम झाला म्हणून किंचितसे वाईट वाटले म्हणून एवढी मोठी पोस्ट.

नक्की काय लिहायचं हे नीट कळलं नव्हतं हा कदाचित पुरेसा विचार करायचा कंटाळा केल्याचा परिणामही असू शकतो. >>>
नीधप,कंटाळा नाही हं अजिबातच :) झेपच तेवढी लिहिलयं की लेखात :)

अगं तुझ्यासाठी नाही. अजिबातच न लिहिलेल्यांसाठी. आणि तीही एक शक्यता केवळ. :)

ओह! असं होय!! ओके :)

आणखी एक उदाहरणा मला द्यावेसे वाटते ते म्हणजे, ट्रेनमध्ये स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे डबे कशाला? सर्वजण एकत्र गेले तर काय होईल? माझ्या मते भारतात आजतरी अशी परिस्थिती यायची शक्यता नाही की एकत्र असलेल्या स्त्रियांना इतर पुरुषांनी मिळून त्रास देणे (कुठल्याही प्रकारचा).......... सर्वजणा एकत्र गेले-आले तर उलट पुरुषांना सांभाळूनच राहायला लागेल.... असो. >>>>
वेगवेगळे डबे कशाला???? अजूनही स्त्रीयांचंच शोषण होत आलंय. एखाद्या पुरुषाला गर्दीत स्त्रीयांकडून
वावगा अनुभव आला असं उदाहरण शोधूनही सापडणार नाही!!!
एकत्र असलेल्या स्त्रीयांनाही कसा त्रास दिला जातो [स्त्रीयांच्या डब्यात शिरून, आणि एका शहराच्या मुख्य रस्त्यावर] याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय!
ह्या अनुभवांसाठी तरी पुढचा जन्म स्त्रीयांचा मिळावा पुरुषांना!!!

शिल्पा , प्रामाणिकपणा आवडला. आणि असेही विचार मनात येणारी खूपजणं असतील की!

अनिताताई, धन्यवाद!!तुमची पोस्ट वाचून बरं वाटलं मला !

@बेफिकीर,सविस्तर प्रतिक्रियेसाठी आभार!!<<< खरे आहे, पण हा विषय (लिंगनिरपेक्षतेशी संबंधीत असला तरीही) एक स्वतंत्र दर्जाचा विषय वाटला.>>>> हो मान्य.पण मला त्या विषयाला स्पर्श केल्याशिवाय पुढे जाता आलंच नाही . कारण माझ्यासाठी 'पण' हा तिथे येउन थांबतो.स्त्री पुरुषांमधील फरक हा फक्त निसर्गाने जो दोहोंच्या शरीररचनेत,त्यायोगे येणा-या जाणिवा इ.आहेत तेव्हढाच मला अपेक्षित आहे.थोडक्यात we should respect genders for the very same reasons nature has created.,nothing more or nothing less इतकं सोप्पं आहे/झालंय माझ्यासाठी.(यामुळं असेल की मला आता मेल डॉक्टर कडे जावसं वाटत नसेल शक्यतोवर)पण त्याचबरोबर चहूबाजूनी सतत आदळत येणारे वास्तव त्याकडे दुर्लक्ष कसं करणार?मला काहीच झळ पोचली नाही पण जवळच्या,लांबच्या,अनोळखी(म्हणजे इतरांकडून कळते अशांबद्दल) लोकांमधे हे स्त्री-पुरुष भेदभाव कोण्कोणत्या प्रकारे घडते हे पाहिलंय्.शाळा-महाविद्यालयांत मैत्रीणींच्या घरी हे"मुलगी असून" "मुलीच्या जातीला"अशा प्रकारचे संवाद अक्षरश: कुठल्यापण कारणासाठी(अर्थात माझ्यादृष्टीने)कानावर पडायचे.तेव्हा आश्चर्य वाटायचे.आता राग राग होतो असं आजूबाजूला पाहिलं की.(अगदी अगदी मोजके अपवाद जे मला अभिप्रेत अशी लिंगनिरपेक्षता जपणारे तेही अगदी सहज, कुठलाच आव आणून वगैरे नाही, अशांमुळं मात्र उजळून जातं सगळंच अवतीभवतीचं विश्व)
इतर कोणत्याही बातम्यांपेक्षा स्त्रियांवरील अत्याचाराच्या छोट्या मोठ्या बातम्या मला अस्वस्थ करतात काही क्षणांसाठीतरी ,कितीही धावपळीत नुसती नजर फिरवली वर्तमानपत्रांवरून तरी.त्यामुळं स्त्रियांनी जाणीव ठेवावी स्त्रीत्वाची असं वाटलं मला.तुम्हाला जे विधान लिंगनिरपेक्षतेला तडा देणारे वाटले तेही माझा नाईलाजच की मुलाला आणि मुलीला मला असा वेगवेगळा सल्ला द्यावासा वाटतो.बाकी इतर गोष्टीत मुलांच्याबाबतीत मुलगा-मुलगी असा भेदभाव असतो/करतात हे गावी पण नाहीये आमच्या.प्रथम माणूस/व्यक्ती हाच निकष कुणासाठीही.असो.फारच लिहिले बघता बघता मी :) आता थांबते :) आणि हो ते प्रामाणिकपणा काय किंवा वैचारिक गोंधळ काय पाचवीलाच पूजलेत हो ,उच्च वगैरे काही नाही त्यात :)

:) मेधा तुम्ही एवढं रागवायची आवश्यकता नव्हती. कारण माझे विधान "सर्वसाधारणपणे इतर देशांच्या तुलनेत" अशा आशयाचे आहे. आणि मी स्वत: जरी स्त्री नसलो तरी स्त्रियांच्या समस्यांची बर्‍यापैकी जाण आहे. पुरुष जेव्हा स्त्रियांवर अत्याचार करतात तेव्हा ते चुकीचे आहेत याची त्यांना जाण असतेच. कितीही निर्ढावलेला पुरुष असला तरी त्याला "आतून" माहित असते की ते चूक आहे. सत्ता, ताकद, समाजातील "सबकुछ चलता है" ही वृत्ती यांमुळे अशा वृत्तींना खतपाणी मिळतं. ज्यावेळी स्त्री-पुरुष एकत्र संघटितपणे असतील त्यावेळी बहुसंख्य पुरुष स्त्रियांच्या बाजूने बोलतात. "सर्व पुरुष शेवटी सारखेच" असे म्हणत असाल तरी मी तुमच्याशी सहमत आहे. किंबहुना म्हणूनच मी म्हटले आहे की "स्त्रियांसाठी वेगळा डबा कशाला?" आजही पुरुषांच्या डब्यात स्त्रिया आपण होऊन येताहेत कारण १. स्त्रियांच्या डब्यात स्त्रियाच "अ‍ॅड्जस्ट" करत नाहीत, २. मुळातच स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना दिलेले डबे कमी असतात त्यामुळे फारच जास्त गर्दी होते. ३. अशा तर्‍हेने पुरुषांच्या डब्यात आपणहून आलेल्या स्त्रीला काही त्रास झल्याचे ऐकिवात नाही.

शिल्पा धन्यवाद : we should respect genders for the very same reasons nature has created.,nothing more or nothing less अगदी हेच मला म्हणायचंय.........

प्रामाणिक लेखन खूप आवडले.

मंडळी, एकत्र असलेल्या पुरुषांनाही हिंसक जमावाकडून त्रास दिला जातो........... म्हणून त्यांनी (ज्यांना त्रास दिला जातो आहे अशा पुरुषांनी) काय करावे असे तुमचे म्हणणे आहे? (कृपा करुन "त्यांनी बांगड्या भराव्यात" असं काही उत्तर देऊ नका. नाहीतर मग समानतेच्या मूळ उद्देश्यालाच हरताळ फासला जाईल.

स्त्री-पुरुष समान आहेत ही कविकल्पना आहे. दे आर मेड फॉर इच अदर. म्हणूनच निसर्गाने आपलं काम चोख केलं आहे. त्यांच्यात मूलभूत फरक ठेवला आहे.

अरुंधती यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातही आज अनेक ठिकाणी काहीबाही त्रास स्त्रियांना दिला जातोय. पुढेही दिला जात राहील, त्याला शंभर टक्के इलाज नाही.

हो. सोशल कंडिशनिंग करता येईल की हे घाणेरडे वातावरण कमी करता येईल. एकत्र प्रवास करणे ही केवळ सुरुवात आहे. केवळ एक मार्ग आहे जेणेकरुन स्त्री-पुरुष जवळ येतील.

शिल्पा, लेख आवडला. प्रामाणिक आणि सुस्पष्ट वाटला.
वरती एका प्रतिसादातले तुझे हे मत- 'प्रामाणिकपणे आपलेच विचार तपासून बघणे यानिमित्ताने हे पुरेसे प्रयोजन नाही काय?' अशा प्रकारची. हेच मनाशी ठेवून हा लेख लिहिला.स्वतःचे विचार जाणून घेतले हेच माझ्यासाठी खूप होतं.>>> प्रचंड अनुमोदन, माझाही असाच प्रयत्न होता!

आगाऊ, थँक्यू थँक्यू !! लेख सुस्पष्ट(सुद्धा) वाटला म्हणून :) <<< माझाही असाच प्रयत्न होता!>>>>तुझा/झे लेखच काय पण एरवी सगळ्याच पोस्टस पण प्रामाणिकच असतात हे लग्गेच कळतं.Its great actually!!!

मेधा,
<<<जोरदार अनुमोदन . पण तशी परिस्थिती यायला वेळ आहे . अन आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय ते अशक्य आहे>> तुमची ही पोस्ट वाचल्यापासून मला माझा निराशेचा सूर जास्तच खटकतोय.आता इवल्याशा परिघात का असेना त्यासाठी प्रयत्न करायचे असं मनाशी ठरवलं आहे.अगदी कळत्या वयापासून मनाच्या एका कोप-यात अशा प्रकारचं ध्येय किंवा इच्छा म्हणा, होतीच.खरंतर final calling(असंच म्हणतात ना?) तेच आहे माझ्यासाठी.अजून काही काळानंतर पूर्ण जोमाने प्रयत्न करणारच हे नक्की.

अजुन एक 'दिल से' लेख :) आवडला.

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
नीधप | शुक्र., 03/09/2012 - 14:37

आनंदयात्री, संपादकांच्या मांडणीलाच केवळ दोष देताना अनेकांचा गोंधळ उडाला नव्हता हे ही लक्षात असू द्यात. नक्की काय लिहायचं हे नीट कळलं नव्हतं हा कदाचित पुरेसा विचार करायचा कंटाळा केल्याचा परिणामही असू शकतो.

बाकी विषय क्लिष्ट आहे आणि कोणीच या विषयाचा विचार केलेला नसणार तेव्हा कुणाचाही गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. घोषणेच्या धाग्यावर प्रश्न विचारा असे वारंवार सांगूनही दोन तीन जण वगळता कुणाचेही प्रश्न आलेले दिसले नाहीत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.

ओ हॅल्लो !! नीधपमगरेसा..................!!

माझे पोस्ट्स तुम्ही उडवून का टाकलेत हो?

पटले नाही, अंगाशी आलं, की टाका झटकून, म्हणून?

ह्ये वागनं बरं न्हवं ताई..........!! :)

ह्या विषयाशी प्रत्यक्ष संबध नाही ह्या पोष्टचा पण पुरुष doctor कडे ज्या बायका जायला घाबरतात त्यांच्यासाठी.
डोक्टर जेव्हा पेशंटला तपासत असतो तेव्हा diagnose करताना खालील ५ शक्यता असतात
१.false +ve, म्हणजे कुठलाच रोग झालेला नाहिये तरी "अबक" हा रोग झालाय असे अनुमान
२.false -ve "अबक" हा रोग झालय असे असताना काहीच झालेले नाहीये हे अनुमान
३."पफब" हा रोग झालेला असताना "यरल" हा रोग झालाय हे चुकीचे अनुमान
४."अबक" रोग झालेला असताना "अबक" झालाय हे बरोबर अनुमान
५.बर्‍याच वेळा रुग्नाचे मानचे खेळ असतात तेव्हा,काहीच झाले नाहीये हे अनुमान
आजकाल अनेक चाचण्यांची/MRI ची मदत जरी घेत जात असली तरी त्या चाचण्यांची योग्य दिशा ठरवण्यासाठीसुध्दा ,चांगल्या डोक्टरकडे फक्त काही मिनिटे असतात ज्यात त्याला तपासताना पहिल्या ३ शक्यता टाळुन ४ किंवा ५ व्या शक्यतेवर उडी मारायची असते.त्यामुळे तपासत असताना समोरचा पेशंट स्त्री आहे की पुरुष हे लक्षात न घेता आतापर्यंतचे अभ्यासलेले ज्ञान,अनुभव पणाला लावुन तपासणी चालु असते. हा फक्त नैतिकतेचा नाही त्याच्या व्यावसायिक अस्तित्वाचाही प्रश्नही असतो. कुठलाही जबाबदार डोक्टर पेशंटकडे एक object म्हणुन बघतो आणि योग्य उपचार कसे देता येतील याचा प्रयत्न करतो.
त्यामुळे मनातले सगळे गैरसमज बाजुला ठेवुन डोक्टरकडे जा.

ओके थँक्स

नीधप | शुक्र., 03/16/2012 - 18:26 नवीन
ए आर सी,
१ आणि २ मधे काही टायपो आहे का? नसेल तर दोन्हीतला फरक मला कळला नाही.>>>

त्यांना असे म्हणायचे असावे की काही झाले म्हणून माणूस डॉक्टरकडे गेला तर भलत्याच रोगाचे निदान आणि काहीच झालेले नसताना गेला तर भलत्याचे रोगाचे निदान