तुझे रुप चित्ती राहो

तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||धृ||

देहधारी जो जो त्यासी विहीत नित्य कर्म
सदाचार नितीहुनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||१||

तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी
वाट प्रवासाची देसी स्वये पापरासी
दिसो लागली तु डोळा अनुपी अनाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||२||

तुझ्यापदी वाहीला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठ याम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: