भक्तिगीत

तुझे रुप चित्ती राहो

तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||धृ||

देहधारी जो जो त्यासी विहीत नित्य कर्म
सदाचार नितीहुनी आगळा न धर्म
तुला आठवावे गावे हाच एक नेम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||१||

तुझे नाम पांडुरंगा सर्वतापनाशी
वाट प्रवासाची देसी स्वये पापरासी
दिसो लागली तु डोळा अनुपी अनाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम
तुझे रुप चित्ती राहो मुखी तुझे नाम ||२||

तुझ्यापदी वाहीला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा म्हणूनी आठ याम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपीले सर्वांगा चिताभस्म

गळा सर्पमाळा, ल्याला व्याघ्रांबर
शिव तो शंकर सत्य तोचि
शंख, शिंग नाद गर्जे शिव्गण
पायी भक्तजन ओळंगीती .१

भोळा सदाशिव पावतो भक्तासी
उद्धरी दीनासी निलकंठ
हर हर शंकर सांब सदाशिव
सांब सदाशिव त्रिपुरारी ..२

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपीले सर्वांगा चिताभस्म

(हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहसी अनंता ||धृ.||

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ||१||

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे ध्यान देसी तुझ्या प्रिय संता ||२||

तूच जन्मदाता तूचि विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

समाधी साधन संजीवन नाम

समाधी साधन संजीवन नाम | शांती तयासम सर्वांभूती || १ ||
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू | हरिनाम उच्चारू दिधला तेणें || २ ||
शम दम कळा विज्ञान सज्ञान | परतोनि अज्ञान न ये घरा || ३ ||
ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट | भक्तीमार्ग नीट हरिपंथी || ४ ||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

टाळ बोले चिपळीला

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥

दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥

ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

आकाशी झेप घे रे पाखरा

आकाशी झेप घे रे पाखरा (२)
सोडी सोन्याचा पिंजरा (२) ||धृ.||

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा ||१||

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा ||२||

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा ||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सुंदर ते ध्यान

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया

तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप

मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

गौळणिंनो, जाउ नका बाजारी

दह्यादुधाचि करतो चोरी, नंदाचा हरी
गौळणिंनो, जाउ नका बाजारी ॥ ध्रु ॥

नंदाघरचा कृष्ण सावळा, वाट अडवुनि उभा राहिला
गौळणिंना ग छळतो भारी, खट्याळ गिरीधारी ॥ १ ॥

पदराशी तो लगटहि करितो, दह्यादुधाचे घडे मागतो
खडे मारतो, पळुनी जातो, कॄष्ण करी मस्करी ॥ २ ॥

रोज त्याजला हवेच लोणी, करी मागणी हात पकडुनी
नकार देता शारंगपाणि, करितो शिरजोरी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥ धॄ ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुता, मी नित्य पाहिला होता
मज वदलासी, अन्य देशि चल जाउ, सृष्टिची विविधता पाहू
तइ जननीह्द विरहशंकितही झाले, परि तुवा वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पॄष्ठी वाहीन, त्वरित या परत आणिन
विश्वसलो या तव वचनी मी, जगदनुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ति उद्धरणी मी, येईन त्वरे कथुनि सोडले तिजला ॥ १ ॥

शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती, दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृ़क्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बालगुलाबहि आता रे. फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ २ ॥

नभी नक्षत्रे बहुत एक प्रिय प्यारा, मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी, आइची झोपडी प्यारी
तिजविण नको राज्य, मज प्रिय साचा, वनवास तिचा जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहु जिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तदविरहाची शपथ घालितो तुजला ॥ ३ ॥

या फेनमिषे हंससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिउनी का आंग्लभूमीते
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देशी
तरी आंग्लभुमि भयभीता रे, अबला न माझि ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

हे हिंदुशक्ति संभूत दीप्ततम तेजा
हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्य भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा

करि हिंदुराष्ट्र हे तूतें, वंदना
करि अंत:करणज तुज, अभिनंदना
तव चरणि भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतो ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ॥ १ ॥

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे, भंगले
जाहली राजधान्यांची, जंगले
परदास्य पराभवि सारी, मंगले
या जगति जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ॥ २ ॥

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहीस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदातली तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी, राहू दे
ती बुद्धी भाबड्या जींवा, लाहु दे
ती शक्ति शोषितामाजी, वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: