भरून भरून आभाळ आलंय

भरून भरून आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा
माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा

(तुला चिंचा बोरं देऊ का ही देऊ का ही गं?
काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
पान पानाला सांगून जाई
कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा

भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
(सई साजणी साजणी )
कशी इकडचं घेऊ नावं
माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा

(बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं
तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
तट तटाला झोका देई
पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई? जाई की मोगरा?

(टपटप टपटप..)
टपटप टपटप..
लप पोरी लप पोरी घरात लप
जप पोरी जप जीवाला जप
राहू आत जाऊ, कुणी बाई सावरा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: