भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपीले सर्वांगा चिताभस्म

गळा सर्पमाळा, ल्याला व्याघ्रांबर
शिव तो शंकर सत्य तोचि
शंख, शिंग नाद गर्जे शिव्गण
पायी भक्तजन ओळंगीती .१

भोळा सदाशिव पावतो भक्तासी
उद्धरी दीनासी निलकंठ
हर हर शंकर सांब सदाशिव
सांब सदाशिव त्रिपुरारी ..२

भाळी अर्धचंद्र, माथी शुभ्र गंगा
लिंपीले सर्वांगा चिताभस्म

(हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव
हर हर शंकर सांब सदाशिव)

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भोगले जे दु:ख त्याला

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ||धृ||

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले ||१||

लोक भेटायास आले काढत्या पायासवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले ||२||

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले ||३||

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले ||४||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

श्रावणाचं ऊन मला झेपेना

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळ्या चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

श्रावणाच्या सरी पानभर थरथरी
हिरव्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भंग व्हावे स्वप्न ऐसे

भंग व्हावे स्वप्न ऐसे बोल तू बोलू नको
जीव घेण्या वेदनेचे गीत तू गाऊ नको॥धृ॥
पूर्व जन्मीचे असे का भोग माझ्या संगती
अंतरीच्या वेदनांना छेद तू देऊ नको
रेखिल्या मूर्तीस आता भंगुनी टाकू नको॥१॥
ओढ प्रितीची अनावर आठवणी येता मनी
पेटतो वन्ही स्मृतीचा उर येतो दाटुनी
पेटल्या वणव्यात माझी राख तू मागू नको
संपलेली प्रेमगाथा तू पुन्हा उघडू नको॥२॥
का उगा ही भेट झाली प्रीत जडलेली खुळी
प्राक्तनाचा खेळ झाला अंतरी सल राहिली
मीलनाचे स्वप्न आता तू वृथा ठेऊ नको
साठलेल्या त्या स्मृतींना तू उगा उधळू नको॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अपर्णा तप करते काननी

भस्मविलेपित रूप साजिरे, आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करते, काननी ॥ ध्रु ॥

वैभवभूषित वैकुंठेश्वर, तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या, भरलासे लोचनी ॥ १ ॥

त्रिशूल डमरु, पिनाकपाणि, चंद्रकला शिरी, सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ॥ २ ॥

कोमल सुंदर हिमनगदुहिता, हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भरून भरून आभाळ आलंय

भरून भरून आभाळ आलंय
भरल्या वटीनं जड जड झालंय
शकुनाचा आला वारा
माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा

(तुला चिंचा बोरं देऊ का ही देऊ का ही गं?
काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
पान पानाला सांगून जाई
कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा

भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
(सई साजणी साजणी )
कशी इकडचं घेऊ नावं
माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा

(बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं
तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
तट तटाला झोका देई
पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई? जाई की मोगरा?

(टपटप टपटप..)
टपटप टपटप..
लप पोरी लप पोरी घरात लप
जप पोरी जप जीवाला जप
राहू आत जाऊ, कुणी बाई सावरा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भावभोळ्या भक्तीची मी एकतारी

भावभोळ्या भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी ॥ ध्रु ॥

काजळी रात्रीस होसी तूंच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले, तुझ्या ही आज दारी ॥ १ ॥

भाबडी दासी जनी गातांच गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी ॥ २ ॥

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होतां दिव्य झाली
वैभवाचा साज नाही, मी भिकारी ॥ ३ ॥

अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही, तूच सारी ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: