अपर्णा तप करते काननी

भस्मविलेपित रूप साजिरे, आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करते, काननी ॥ ध्रु ॥

वैभवभूषित वैकुंठेश्वर, तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परी उमेच्या, भरलासे लोचनी ॥ १ ॥

त्रिशूल डमरु, पिनाकपाणि, चंद्रकला शिरी, सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी, तोच आवडे मनी ॥ २ ॥

कोमल सुंदर हिमनगदुहिता, हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे, फुलवी रात्रंदिनी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: