त्या तरूतळी विसरले गीत

त्या तरुतळी विसरले गीत,
हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत ॥ ध्रु ॥

मुक्या मना मग भार भावना, स्वरातुनी चमकते वेदना
तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत ॥ १ ॥

विशाल तरु तरि फांदी लवली, थंडगार घनगर्द साउली
मनिची अस्फुट स्मिते झळकती, तसे कवडसे तीत ॥ २ ॥

हिरवळ तृप्तिच जशी पसरली, फुले अनामिक त्यात विकसली
निळेभोर अव्याज गगन, वर हसते ढग पिंजीत ॥ ३ ॥

जवळ टेकडित झरा झाकला, कसातरी वाहतो खळखळा
निकट जीवाची पुरति न कळली, जशी संभ्रमित प्रीत ॥ ४ ॥

मदालसा तरूवरी रेलुनी, वाट बघे सखि अधीर लोचनी
पानजाळि सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत ॥ ५ ॥

पदर ढळे कचपाश भुरभुरे, नव्या उभारित ऊर थरथरे
अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत ॥ ६ ॥

उभी उभी ती तरुतळि शिणली, भ्रमणी मम तनु थकली गळली
एक गीत परि, चरण विखुरले, द्विधा हृदय संगीत ॥ ७ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: