भावगीत

त्याची धून झंकारली रोमारोमांत

त्याची धून झंकारली रोमारोमांत
उमलून जीव आला माझ्या डोळ्यांत

चांदण्यांची लुकलुक झुले गगनी
बासरीने भारावून गेली रजनी
रासरंग उधळला कोनाकोनांत

दूर यमुनेच्या काठी पाय वाजले
दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे
चैतन्याचे वारे आले वाळवंटात

सावळ्याची खूण सखे, टाळी वाजली
धावू लागे मन आता आनंदमेळी
नुरले ग माझेपण माझ्या देहात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले

रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेउनी मी मागुती तव धावले

ध्यास लागे सारखा आभास होती या जिवा
अंतरी तुजला स्मरावे छंद लागे हा नवा
या जगाच्या निंदकांचे मी हलाहल प्राशिले

संपदा लाभो करी वा दैन्य कोरांटीपरी
तृप्‍त मी होईन नाथा दो करांच्या कोटरी
आवरीता आवरेना झिंगलेली पाउले

ना भिती जन-नीतिची मज, तू उभा मागेपुढे
रे नको मज स्वर्ग जेथे लाभ देवाचा घडे
तारि आता तूच, माझ्या देहि भिनली वादळे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

थांब रे, घना

थांब रे, घना,
जा निरोप घेऊनी, सांग मोहना

कुंज कुंज हा उदास
जागेपणि होत भास
तूच एक जाणिसी माझिया मना

एकटीच झुरत उभी
तारका न एक नभी
एकटीच सोशिते सर्व यातना

सांग जाऊनी तयास
वैरी माझेच श्वास
फूलही मला इथे होय वेदना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

बगळ्यांची माळ फुले

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात

त्या गांठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात

हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना
कमलापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात

तू गेलिस तोडुनि ती, माळ सर्व धागे
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जन्मच हा तुजसाठी प्रिया रे

जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
जन्मच हा तुजसाठी
नव्हत्या माहित मज वेडीला
जन्मांतरीच्या गाठी

मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली
आतुरता पोटी

चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने अज्ञानाने
आज उमटली लाल नवेली
मेंदी तळहाती

परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयाआधी
परिणय मग शेवटी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भोगले जे दु:ख त्याला

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ||धृ||

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले ||१||

लोक भेटायास आले काढत्या पायासवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले ||२||

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले ||३||

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले ||४||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍यांचे
आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची
हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी
स्वर आले दुरूनी...

विरहात मनाचे स्मित सरले
गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले
जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी
स्वर आले दुरुनी...

पडसाद कसा आला न कळे
अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे
निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केली कुणी
स्वर आले दुरुनी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वप्नात रंगले मी

ती: स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
तो: हे वेड प्रेमिकांचे गीतात गाईले मी
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी

ती: या वृक्ष-वल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिले मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

तो: एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्त वेळा
या नीलमंडपात जमला निसर्गमेळा
मिळवून शब्द-सूर हे हार गुंफिले मी
ती: सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

ती: घेशील का सख्या तू हातात हात माझा
तो: हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा
दोघे: या जन्म-सोबतीला सर्वस्व वाहिले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी
स्वप्नात रंगले मी...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे

प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
गर्जत आले वारे, वादळ
वारे हे वादळ

फिरू लागले जग वाटोळे,
सुन्न मनाने मिटले डोळे
रात निराशा ओकित काजळ, गर्जत आले वारे, वादळ

भग्न मनोरथ फुटला मचवा,
हात कुणी द्या मला वांचवा
मिळे सागरी अश्रू ओघळ, गर्जत आले वारे, वादळ

तुफान झुंजत दीप-मनोरा,
अढळ उभारी किरण-पिसारा
पिंजून लाटा झरे प्रभावळ, गर्जत आले वारे, वादळ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जन पळभर म्हणतिल हाय हाय

जन पळभर म्हणतिल 'हाय हाय'
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचे काय जाय?

रामकृष्णही आले, गेले
त्यांविण जग का ओसचि पडले?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मजशिवाय?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: