तिन्हीसांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू मला हृदयाला ॥ धृ ॥
कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा,
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गंभीर निशा,
त्रिलोकगामी मारूत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करूनि तव कर करि धरिला ॥ १ ॥
स्वकरे तरूवर फुले उधळिती, प्रीतिअक्षता या
मंत्रपाठ हा झुळझुळु गातो निर्झर या कार्या,
मंगलाष्टके गाति पाखरे मंजुळ या समया
सहस्त्रकर दिनकर हा स्वकरे उधळि गुलालाला ॥ २ ॥
नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत,
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्शात,
पाणी जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णांत,
हृदयी मी साठवी, तुज तसा, जीवित जो मजला ॥ ३ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: