झुलतो बाई, रास झुला

झुलतो बाई, रास झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणू, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा

प्राणहीन भासे, रासाचा रंग
रंगहीन सारे, नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा

गुंतलास कोठे, नंद नंदना तू
राधेच्या रमणा, केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: