झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या ||धृ.||

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहून घेऊ या ||१||

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगू या ||२||

मामाची बायको सुगरण
रोजरोज पोळी शिकरण
गुलाबजामून खाऊ या||३||

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेवू या ||४||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झाला गडबड घोटाळा

झाला गडबड घोटाळा, सारा गडबड घोटाळा
पायपोस एकाचा दुसया तिसर्‍यावरी डोळा ॥ ध्रु ॥

बदाम गुड्डु हती धरोनी, घेऊन गेला किल्वर राणी
वौकट राजा शीळ घालितो, इस्पिक राणीला ॥ १ ॥

दीड शहाणे अमुचे मेहुणे, हात चोळिती खाती फुटाणे
ताई शहाणी आली सोडुनी आपल्या नवर्‍याला ॥ २ ॥

थापावरती मारुनी थापा, कुणी कुणाला खुशाल कापा
एकाची सुरी बकरा दुसरा मामाचा पडला ॥ ३ ॥

उतावळा नवरा हा असला, गुडघ्याला बाशिंग बांधुनी बसला
नवरी कुणाची कुठला नवरा, कोण उगा सजला ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झाडाखाली बसलेले

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झुलतो बाई, रास झुला

झुलतो बाई, रास झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वार्‍याची वेणू, फांद्यांच्या टिपर्‍या
गुंफतात गोफ चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा

प्राणहीन भासे, रासाचा रंग
रंगहीन सारे, नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे हरी सावळा

गुंतलास कोठे, नंद नंदना तू
राधेच्या रमणा, केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झिणी झिणी वाजे बीन

झिणी झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: