सात पर्‍यांची कहाणी

पर्‍यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्या उठून बसल्या. घाबरल्या.. बावरल्या.. एकमेकींना विचारू लागल्या,"हे कोण? हा कसला आवाज? अगंबाई, किती उशीर झाला! आपल्याला घरी गेलं पाहिजे. चला, चला, किरणावर चढा.."
त्या हळूच पाण्याबाहेर आल्या.. सूर्यकिरणांवर चढू लागल्या.. पण त्यांना थोडा उशीर झाला होता.. पहाटेचा पहिला किरण कधीच निघून गेला होता. आता त्यांना काही किरणांवर चढता येईना!

border2.JPG

फा

र फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. निळ्या निळ्या आकाशात सात पर्‍या राहात असत. मऊ मऊ ढगांच्या वर. पर्‍या होत्या गोर्‍या, हसर्‍या, नाजूक, सुंदर, लाजर्‍या..

Pari2.jpg

त्यांच्यातली सगळ्यात छोटी परी होती ना, ती खूप मस्तीखोर होती.. सारखी इकडे धावायची, तिकडे धावायची.. उड्या मारायची.. काहीतरी खेळत असायची.. घरभर पसारा करून ठेवायची.. पडायची, रडायची.. सारखी बडबड करायची.. मोठ्या पर्‍यांना काही करूच द्यायची नाही! तिला त्यांच्यासारखा मुकुट हवा असे, उंच टाचांचे बूट हवे असत, त्यांच्यासारखं आकाशात उडायला हवं असे.. पण ती इतकी छोटी होती ना, म्हणून तिला यातलं काही मिळत नसे. मोठ्या पर्‍या त्यांचे खेळ खेळत, आकाशात उडत.. पण छोटी मात्र एकटीच खेळायची. आईला तिची काळजी वाटत असे. 'अशी कशी ही छोटी? शहाणी कधी होणार ही? सारखी इथे जाते, तिथे जाते, नीट घरी येईल ना परत?' आई म्हणे.

पर्‍यांच्या घराला होत्या सात खिडक्या. त्यातून खाली पाहिलं की दिसायचं एक तळं. निळं निळं तळं.. गावाबाहेर.. दूर डोंगरापलीकडे.. तळ्याच्या काठाला होतं हिरवंगार कुरण.. कडेने छोटी छोटी झाडं, झाडांवर रंगीबेरंगी फुलं. गावातल्या माणसांना हे तळं ठाऊकच नव्हतं, त्यामुळे तिथे कुणीच येत नसे.. अगदी शांत होतं तळं. तिथे इवली इवली फुलपाखरं गवतावरून, फुलांवरून बागडायची. पक्षी किलबिल करायचे.. झाडांवर खेळायचे.. रात्र झाली की झोपायचे.

पर्‍या आकाशात राहात खर्‍या, पण त्यांना पाण्यात खेळायला, पोहायला खूप आवडायचं. रोज संध्याकाळी सूर्य मावळताना शेवटच्या किरणांवर बसून त्या हळूच आकाशातून खाली यायच्या.. काळोख पडताच तळ्यात शिरायच्या.. खूप खेळायच्या, खूप पोहायच्या. रात्रभर. मग पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणावर चढून त्या परत आकाशात आपल्या घरी जायच्या.. सकाळ व्हायच्या आत. त्यामुळे त्यांना कधीच कोणी पाहिलं नव्हतं. अगदी पक्ष्यांनी, फुलपाखरांनीसुद्धा नाही.

एकदा काय झालं, छोटी परी पाण्यात खेळून कंटाळली. ती सगळ्यात मोठ्ठ्या परीला म्हणाली,"परीताई, आपण पाण्याबाहेर जाऊया ना.. मला बघायचंय या तळ्याच्या बाहेर काय आहे ते."
तशा सगळ्याच पर्‍या म्हणाल्या,"हो हो, जाऊया आपण तळ्याबाहेर."
मग हळूच त्या तळ्याबाहेर आल्या.. गवतावर धावल्या.. झाडांभोवती खेळल्या.. खेळून खेळून दमल्या.. आणि झाडाखाली झोपल्या.

पहाट झाली, पण पर्‍या काही उठल्या नाहीत. कशा उठणार? खूप दमल्या होत्या त्या.. हळूहळू सकाळ झाली. फुलपाखरं उठली. फुलांवरून उडू लागली. पक्षी उठले. झाडांवर किलबिल करू लागले.

पर्‍यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि त्या उठून बसल्या. घाबरल्या.. बावरल्या.. एकमेकींना विचारू लागल्या,"हे कोण? हा कसला आवाज? अगंबाई, किती उशीर झाला! आपल्याला घरी गेलं पाहिजे. चला, चला, किरणावर चढा.."
त्या हळूच पाण्याबाहेर आल्या.. सूर्यकिरणांवर चढू लागल्या.. पण त्यांना थोडा उशीर झाला होता.. पहाटेचा पहिला किरण कधीच निघून गेला होता. आता त्यांना काही किरणांवर चढता येईना! सकाळचं ऊन तर तापू लागलं होतं.. त्यावर कसं चढणार? त्यांचे नाजूक पाय भाजू लागले.. त्या घसरून खाली पडू लागल्या.. रडू लागल्या. त्यांना त्यांच्या घराची, आईची खूप आठवण येऊ लागली.. भूकही लागली होती.. आता काय करायचं?

छोटी परी मात्र मजेत होती.. हसत होती.. पक्ष्यांशी खेळत होती, त्यांना दाणे भरवत होती.. फुलपाखरांशी बोलत होती, त्यांच्यामागून पळत होती, झाडांच्या फांद्या दूर करून मागची फुलं दाखवत होती.. मोठ्या पर्‍या छोटीला रागावू लागल्या.. "तुझ्यामुळे आपण आज तळ्याबाहेर आलो आणि इथे झोपून राहिलो. आता तूच सांग घरी कसं जायचं ते.. हसतेस काय? तुला भीती नाही वाटत?"
छोटी मोठ्ठ्याने हसली. म्हणाली, "मला नाही भीती वाटत. मला ठाऊक आहे घरी कसं जायचं ते."

मोठ्या पर्‍यांना आश्चर्य वाटलं."तुला ठाऊक आहे कसं घरी जायचं ते? सांग की मग.."
छोटी म्हणाली,"अंहं.. मी नाही सांगणार जा.."

मोठ्या म्हणाल्या,"असं काय करतेस, घरी गेल्यावर तुला गोड गोड खाऊ देऊ.. सांग लवकर.."
छोटी म्हणाली,"मला नको खाऊबिऊ. मी नाही सांगणार जा."

मोठ्या म्हणाल्या,"मग तुला खूप खूप फुगे देऊ. सांग की आता.."
छोटी म्हणाली,"मला नकोत फुगेबिगे. मी नाही सांगणार जा."

मोठ्या म्हणाल्या,"बरं बाई, तुला काय हवं ते देऊ. सांग लवकर घरी कसं जायचं ते.."
छोटी म्हणाली,"मला तुमच्यासारखा मुकुट द्याल?"
मोठ्या म्हणाल्या,"हो, हो. देऊ.."

छोटी म्हणाली,"उंच टाचांचे बूट द्याल?"
मोठ्या म्हणाल्या,"हो, हो. देऊ."

छोटी म्हणाली,"आणि मला उडायला शिकवाल?"
मोठ्या म्हणाल्या,"हो, हो. शिकवू."

छोटी म्हणाली,"माझ्याशी खेळाल? "
मोठ्या म्हणाल्या,"हो, हो. खेळू."

मग छोटी खुशीने हसली. म्हणाली,"बरं तर मग.. मी सांगते घरी कसं जायचं ते.."

असं म्हणून तिने तिच्या गळ्यातली माळ हातात घेतली.. आणि... एकदम रडू लागली..

मोठ्या पर्‍या म्हणाल्या,"काय गं? आता का रडतेस? काय झालं? सांग की गं लवकर.."

छोटी रडतरडत म्हणाली,"आता काय करू? माझ्या या माळेत एक छोटी पेटी होती.. मला आईने दिली होती ती. त्या पेटीत एक मंत्र लिहिला होता.. आई म्हणाली होती, 'कधीही तो मंत्र म्हटला की घरी यायचा रस्ता सापडेल.' पण ती पेटी हरवली.. मी ती कधीच उघडली नाही आणि मंत्रही वाचला नाही.. आता काय करू? अं अं अं.."

मोठ्या पर्‍या म्हणाल्या, "असं होय? मग आपण ती पेटी शोधू. इथेच पडली असेल कुठेतरी.." त्यांनी सगळीकडे शोधलं. पण पेटी काही मिळेना! सगळ्या पर्‍या पुन्हा रडू लागल्या..

छोटी दूर जाऊन एकटीच रडत बसली.. तिचे नवीन मित्र तिच्या भोवती जमले- पक्षी आणि फुलपाखरं.. त्यांनीही ऐकलं होतं पर्‍यांचं बोलणं..
पक्षी म्हणाले, "छोटी, घाबरू नकोस! आम्ही शोधतो तुझी पेटी. रडू नकोस. चल आमच्या मागून."

छोटी उठली, त्यांच्या मागून निघाली. ते दूर दूर उडू लागले. उंच उंच आकाशातही जाऊन तिथून खाली पाहू लागले.. पण पेटी काही दिसेना. सगळे दमून गेले.. एका झाडाखाली बसले..

इतक्यात छोटीच्या पायाला गुदगुल्या झाल्या.. तिने वाकून पाहिलं, तर मुंग्यांची रांग घाईघाईने कुठेतरी चालली होती.. तिला गंमत वाटली.. ती रडायची थांबली.. पेटीबिटी सगळं विसरून त्या मुंग्यांच्या मागे जाऊ लागली.. पहाते तर काय? एका दगडामागे बर्‍याचशा मुंग्या जमल्या होत्या.. एकमेकींशी बोलत होत्या.."कसला खाऊ आहे हा? गोड वास नाही.. आणि घट्ट तरी किती? चावताही येत नाही.. कसा खायचा हा?"

छोटीने जरा जवळ जाऊन पाहिलं तर काय! तिच्या माळेतली ती इटुकली पेटी तिथे पडली होती, आणि मुंग्या पेटीच्या वर, खाली, बाजूला फिरत होत्या. बडबडत होत्या.. छोटी आनंदाने हसली.. तिने ती पेटी उचलली, हळूच उघडली.. आतला इवलासा कागद काढला आणि मुंग्यांना दाखवला. मुंग्या निराश झाल्या."हात्तिच्या! खाऊ नाहीच का?" म्हणाल्या आणि तरातरा निघून गेल्या.. दुसरा खाऊ शोधायला..

छोटीने जोरात ओरडायला सुरुवात केली, "पेटी सापडली! पेटी सापडली!!"
पक्षी, फुलपाखरं, मोठ्या पर्‍या धावत आल्या.. छोटीने वाचायला सुरुवात केली..

त्यांच्या आईने कागदावर लिहिलं होतं,'माझ्या लाडक्या पर्‍यांनो, हा मंत्र वाचण्याआधी हातात सात रंगांची फुलं धरून एकमेकींशेजारी उभ्या राहा आणि मगच मंत्र वाचा बरं का.'

पर्‍या इथे तिथे पाहू लागल्या.. सात रंगांची फुलं कुठं बरं मिळतील? पुन्हा सगळ्या पर्‍या भोकाड पसरणार, इतक्यात फुलपाखरं पुढे आली..'आम्ही दाखवतो' म्हणाली.. भराभर पर्‍यांना घेऊन निघाली.

थोड्याच वेळात सात पर्‍या सात रंगांची फुलं घेऊन आल्या.. हातात फुलं घेऊन एकमेकींशेजारी उभ्या राहिल्या..

छोटीने मंत्र वाचला,

"सोनेरी ऊन्हात न्हाऊन या
पावसाच्या सरींनो धावून या

सात फुलांचे रंग घ्या
इंद्रधनुष्य रंगवून द्या"

आणि काय चमत्कार! खरोखरच उन्हात पाऊस पडू लागला.. बघता बघता पर्‍यांच्या हातातल्या फुलांचे रंग फिकट झाले आणि आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागलं. पर्‍या आनंदल्या.. हसत, उड्या मारत टाळ्या पिटू लागल्या.. इंद्रधनुष्य त्यांच्या चांगल्याच ओळखीचं होतं.. इथे पृथ्वीवर ते कधीतरीच दिसत असलं तरी त्यांच्या आकाशातल्या घरासमोर इंद्रधनुष्याचीच तर कमान होती! त्याच्यावर चढलं की आपल्या घरी जाता येईल हे त्यांना ठाऊक होतं. पक्ष्यांचे, फुलपाखरांचे आभार मानत धावतच त्या इंद्रधनुष्यावर चढल्या आणि आपल्या घरी गेल्या.."पुन्हा रात्री येऊ रे खेळायला".. आपल्या नव्या मित्रांना सांगत..

Castle.jpg

घरी गेल्यावर मात्र पर्‍यांनी तो मंत्र पाठच करून टाकला. पुन्हा पेटी हरवली तर?
यानंतर कित्येक वर्षं उलटून गेली.. अजूनही रोज रात्री त्या तळ्यात सात पर्‍या खेळायला येतात. कधी वेळेवर परत जातात.. कधी विसरतात. तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसलं की नक्की समजा.. आज पर्‍यांना घरी जायला उशीर झालाय बरं का!

-स्मिताके

Taxonomy upgrade extras: