तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे

तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे,
कधीचे जीवाला पिसे
विषारी तृणांचे पहारे सभोती
फुलांनी फुलावे कसे?

इथे कोंडवाड्यापरी सर्व बागा
धुक्याचीच झाली हवा
तरु स्तब्ध झाले तिथे पाखरांना
तराणे सुचावे कसे?

तुम्ही मोडक्या मांडवाची नव्याने
नका रोषणाई करू
उदासीनतेला असे उत्सवांचे
उखाणे सुचावे कसे?

उसासे दिखाऊ स्मितेही दिखाऊ
कसे नाटकी बोलणे
प्रश्न पडे या बेगडी चेहर्‍यांचे
धनी ओळखावे कसे?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: