गीत

तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे

तुझ्या चंद्रशाळेत नेशील का रे,
कधीचे जीवाला पिसे
विषारी तृणांचे पहारे सभोती
फुलांनी फुलावे कसे?

इथे कोंडवाड्यापरी सर्व बागा
धुक्याचीच झाली हवा
तरु स्तब्ध झाले तिथे पाखरांना
तराणे सुचावे कसे?

तुम्ही मोडक्या मांडवाची नव्याने
नका रोषणाई करू
उदासीनतेला असे उत्सवांचे
उखाणे सुचावे कसे?

उसासे दिखाऊ स्मितेही दिखाऊ
कसे नाटकी बोलणे
प्रश्न पडे या बेगडी चेहर्‍यांचे
धनी ओळखावे कसे?

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झाडाखाली बसलेले

झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

झिणी झिणी वाजे बीन

झिणी झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अतिलीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका
घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एकतारी गाते

एकतारी गाते,
गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा
ध्वजा वैष्णवांची नाचे

मराठीचा बोल
बोल जगी अमृताचा
ज्ञानियांचा देव
देव ज्ञानदेव नाचे

नाचे चोखामेळा
मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव
देव कीर्तनात नाचे

अनाथांचे नाथ
नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत
संत रुप अनंताचे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: