थेंबाचा प्रवास

नवनवीन जंगल, नवनवीन प्राणी बघून तो अगदी हरखून गेला. आता त्याला मोठमोठे मासे भेटले पाण्यात. मासे म्हणाले, "आम्ही समुद्रपण पाहिलाय. खूपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणार आहे बरं वाहात वाहात.." हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो असं झालं. हळूहळू नदीचं पाणी खारट झालं, थेंबसुद्धा खारट झाला आणि मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.

border2.JPG

गळ्या गोष्टींमध्ये असतं ना, तसंच एक जंगल होतं. पण हे जंगल मात्र अगदी खरं खरं होतं बरं का. छान छान उंच डोंगर, दाट हिरवी झाडं, झाडांवरचे पक्षी असं सगळं सगळं खरं. अशा डोंगरात होती एक गुहा. मोठ्ठी अंधारलेली दगडाची गुहा. गुहेत येणार्‍या झर्‍यांनी गुहेतले खड्डे सगळे पाण्याने भरून गेले होते.

अचानक एक पिटुकला थेंब आला जमिनीतून वरती. आधी गुहेतला अंधार पाहून घाबरूनच गेला.. गुहेतल्या थंडीने कुडकुडायला लागला. पण थोड्या वेळाने त्याला आजूबाजूचं नीट दिसायला लागलं आणि त्याच्यासारखेच अजून अनेक पाण्याचे थेंबसुद्धा दिसायला लागले. बरेच मित्र पाहून त्याला जरा हायसं वाटलं. असा खूप वेळ गेला आणि त्या थेंबटल्याला कंटाळा आला. "किती वेळ असं शांत बसून रहायचं? मला खेळायचंय, फिरायचंय ना!" थेंब जोरात ओरडला, पण त्याचा आवाज कुणाला ऐकूच गेला नाही. पण हळूहळू थेंब असलेल्या खड्ड्यात पाणी वाढत होतं.. ते पाहूनही त्याला बरं वाटत होतं.. तेवढेच जास्त मित्र जवळपास..

themb.jpg

इतक्यात तो खड्डा पूर्ण भरला आणि पाणी वाहायला लागलं. सगळे थेंब आधी बाहेर वाहून जाण्यासाठी मस्ती करायला लागले. हा थेंबटला पण लग्गेच बाहेर पडला आणि पाण्याबरोबर वाहायला लागला. "व्वा, काय मज्जा येतेय ना खेळायला.." असं म्हणत मस्त इकडे तिकडे हुंदडायला लागला.. वाहतं पाणी गुहेच्या बाहेर आलं आणि बाहेरच्या प्रकाशाने थेंबाचे डोळेच दिपले. "केवढा हा प्रकाश! पण काय छान वाटतंय ना, कित्ती उबदार आहे इथे.." असं आपल्या मित्रांशी बोलत अजून मस्ती करायला लागला..

पण अरेच्च्या! हे काय? आता गुहेतून बाहेर आलेलं पाणी बाहेरच्या मोठ्ठ्या डोहात थांबलं. थेंब जरासा हिरमुसला, पण मग म्हणाला, "जाऊ दे, इथे निदान प्रकाश आहे, छान उबदार वाटतंय आणि बाहेर बघायला तर कित्ती काय काय आहे." त्या डोहात पाय घालून बसलं होत एक झाड.
थेंबाने विचारलं, "तुम्ही कोण बरं? मी पाण्याचा थेंब, आत्ताच त्या गुहेतून बाहेर आलो. तुम्ही माझ्याशी गप्पा माराल का?"
झाड म्हणालं, "हो तर. मला पण आवडेल गप्पा मारायला. आणि हो, मला म्हणतात झाड, वडाचं झाड."
थेंब एकदम खुशीत येऊन म्हणाला, "मी इथे डोहात आहे नां, त्यामुळे दूरचं काही दिसत नाहीये. तुम्ही कित्ती वर आहात, मला छान छान गोष्टी सांगा ना."
झाडाने मग थेंबाला आकाशाच्या, डोंगराच्या गोष्टी सांगितल्या.

tale.jpg

इतक्यात झाडावरून चिमुकलं, रंगीत कोणीतरी उडालं.
थेंबाने विचारलं, "कोण आहे ते छोटंछोटं? रंगीत?"
चिमुकली चिमणी म्हणाली, "चिव चिव, मी रंगीत चिमणी. आकाशात उडते."
"ओहो कित्ती छान चिमणे! तू पण सांग ना मला दूरदूरच्या गोष्टी."
मग चिमणीने थेंबाला नदीची, धबधब्याची गोष्ट सांगितली. असे काही दिवस गेले. चिमणी आणि झाड रोज थेंबाला छानछान नवनवीन गोष्टी सांगायचे. मग थेंबाला वाटायचे आपण कधी जाणार हे सगळं बघायला? त्याला डोहात राहायचा अगदी कंटाळा आला. इतक्यात परत एक गंमत झाली.. तो डोह पाण्याने भरला आणि पाणी बाहेर वाहायला लागलं. पुन्हा एकदा सगळे थेंब आधी बाहेर वाहून जाण्यासाठी मस्ती करायला लागले..

हा थेंबटला झाडाला आणि चिमणीला म्हणाला,"मी पण जरा जाऊन बघतो, पण परत येईन हं मी, आणि मग तुम्हाला गंमतजंमत सांगेन." टाटा करून थेंब निघाला आणि त्याला थोडावेळ सोबत करायला चिमणीही उडू लागली.

आता खळखळ आवाज करत नदी वाहायला लागली. थेंबालापण प्रवाहाबरोबर खडकांवरून उड्या मारायला, मस्ती करायला मस्त वाटत होतं. नदीच्या आवाजात आवाज मिसळून गाणं म्हणायलासुद्धा मज्जा वाटत होती.
इतक्यात चिमणी सांगत आली, "अरे थेंबा, पुढे ना धबधबा आहे. आता काय करणार रे तू?"
थेंब म्हणाला, "असू दे गं, तू घाबरू नकोस. मी पण वाहत जाऊन बघेन काय होत ते."
तेवढ्यात आलाच धबधबा. थेंब मात्र त्याच्या मित्रांबरोबर तसाच वाहात पुढे गेला आणि पाण्याने धबधब्याच्या कड्यावरून जोरात खाली उडी घेतली. प्रचंड जोरात आवाज करत पाणी खालच्या डोहात पडलं आणि त्याबरोबर तो थेंबसुद्धा. खूप वेळा पाण्यात वरखाली झाल्यावर एकदाचा तो परत पोहायला लागला. चिमणी काळजीने वाट पहातच होती. "बाप रे, कित्ती मोठ्ठा होता नाही हा धबधबा!"
"आधी जराशी भीतीच वाटली गं चिमणे, पण नंतर बाहेर आल्यावर छान वाटलं."
थेंब प्रवाहात आलेला बघून चिमणीला हायसं वाटलं. मग रात्र व्हायला लागली तशी चिमणी म्हणाली, "आता परत जायला पाहिजे मला, नाहीतर अंधारात रस्ता सापडणार नाही." थेंबाला टाटा करून चिमणी परत गेली आणि थेंब तसाच पुढे पुढे जात राहिला.

नवनवीन जंगल, नवनवीन प्राणी बघून तो अगदी हरखून गेला. आता त्याला मोठमोठे मासे भेटले पाण्यात. मासे म्हणाले, "आम्ही समुद्रपण पाहिलाय. खूपच मोठ्ठा असतो तो. ही आपली नदी समुद्रातच जाणार आहे बरं वाहात वाहात.." हे ऐकून थेंबाला कधी एकदा समुद्रात जातो असं झालं. हळूहळू नदीचं पाणी खारट झालं, थेंबसुद्धा खारट झाला आणि मग अचानक प्रचंड मोठ्या समुद्रात थेंबाने प्रवेश केला.

एवढ्या मोठ्ठ्या समुद्रातले रंगीत, मोठमोठाले मासे पाहून, शिंपले आणि रंगीत वनस्पती पाहून पुन्हा एकदा तो अगदी हरखून गेला. अगदी किती पाहू आणि किती नको असं झालं त्याला. वरच्या लाटांमध्ये खेळताना मोठीमोठी जहाजं दिसायची त्याला.. तो विचार करायचा,'काय बरं असेल तिथे जहाजावर? काय बरं करत असतील माणसं?'

Clouds.jpg

मग अचानक एके दिवशी खूप म्हणजे अगदी खूपच गरम झालं. आणि आश्चर्यच घडलं! थेंबाची झाली वाफ आणि आकाशात उडायला लागली. थेंबटला काय, खूपच खूश झाला. आकाशात उडताउडता त्याला खूप पक्षी दिसले, विमानं दिसली, मऊमऊ कापसासारखे ढग दिसले. आकाशातून उडतांना जमीनसुद्धा दिसली. 'काय सुंदर देखावा आहे हा' असं म्हणत थेंब वाफ होऊन उंच, उंच उडत होता. तिथे मात्र जरा थंड वाटायला लागलं आणि त्याला जरा दमायलापण झालं होतं. म्हणून तो एका काळ्या राखाडी ढगावर बसला. बघतो तर काय? तिथे त्याच्यासारखे बरेच थेंब आधीच थांबले होते. वार्‍याने तो ढगसुद्धा पुढे, पुढे जायला लागला आणि थेंबांना अगदी विमानात बसल्यासारखं वाटायला लागलं. बघताबघता असे खूप काळे राखाडी ढग एकत्र जमले आणि अजून वर, वर उडायला लागले. वर, वर गेल्यावर मात्र खूपच थंडी वाढली. थेंबाचं परत पाणीच झालं आणि जमिनीवर पडायला लागलं. "अरेच्च्या!! आपण पाऊस झालो की काय?" सगळे थेंब आश्चर्याने म्हणायला लागले आणि आनंदाने परत जमिनीवर टपटप पडायला लागले.

Rain.jpg

जमिनीवर पाण्याचे खूप खूप ओहोळ खळखळा वाहायला लागले. हा थेंबसुद्धा त्यातल्या एका ओहोळातून खळाखळा उड्या मारत डोंगर उतरायला लागला. परत एकदा त्याला तोच पाण्याचा डोह दिसला जिथून त्याने सुरुवात केली होती. त्या डोहात आनंदाने उडी घेऊन वाहात वाहात परत आपला वडाच्या झाडाकडे आला. त्याला पाहून झाड आणि चिमणी दोघेही खूप आनंदले.

आता मात्र थेंबच त्यांना समुद्राच्या, आकाशाच्या, ढगांच्या गोष्टी सांगत परत एकदा प्रवास करायची वाट बघतोय.

- सावली

Taxonomy upgrade extras: