लेह-लडाख मधील ढगफुटी

खिडकीतून बाहेर बघण्याचेही धाडस होत नव्हते. कोणत्याही क्षणी आमच्या घराचे छत उडून जाईल असे वाटत होते. अजस्र अशा हिमालयाच्या पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर तो पावसाचा धुमाकूळ मनात अक्षरश: धडकी भरवत होता. अत्यंत रौद्र स्वरूप धारण केलेल्या पावसाने आता कोणलीही दयामाया न दाखवता निर्दयीपणाने आपल्या अमानवी शक्तीचे जणू प्रात्यक्षिकच मांडले होते.

border2.JPG

डाख म्हटले की डोळ्यासमोर येते ते निखळ नैसर्गिक सौंदर्य. तिबेटी भाषेमध्ये 'ला' म्हणजे 'खिंड' आणि 'दख' (किंवा 'डख') म्हणजे 'हजार'. थोडक्यात 'लडाख' म्हणजे 'हजारो खिंडींचा प्रदेश'.

तिबेटी भाषेमध्ये अशी एक म्हण आहे की, लडाख हा प्रदेश मानवी जीवनासाठी इतका कठीण आणि खडतर आहे की केवळ तुमचा जिवलग मित्र किंवा कट्टर वैरी हेच तुमच्यासाठी इथवर येतात.

लडाखवर जगातल्या काही सर्वाधिक उंचीच्या पर्वतरांगा आपले निर्विवाद वर्चस्व आणि अधिराज्य शतकानुशतके गाजवत आल्या आहेत. साधारणत: पश्चिमोत्तर ते दक्षिणपूर्व पसरलेली ग्रेट हिमालयन पर्वतरांग लडाखला काश्मीर खोर्‍यापासून वेगळे करते. आणखी तसेच पूर्वेकडे गेलात तर झंस्कार पर्वतरांग, लडाख पर्वतरांग आणि काराकोरम पर्वतरांग अशा अतिउंच आणि अतिदुर्गम पर्वतशृंखला ओळीने येतात. याही सगळ्या पश्चिमोत्तर ते दक्षिणपूर्व अशाच पसरलेल्या आहेत. झंस्कार पर्वतरांगेमध्ये झंस्कार नदीचे खोरे आहे, तर लडाख पर्वतरांगेमध्ये सिंधू नदीचे. या सगळ्या पर्वतशृंखलांच्या कुशीत पहुडलेला आहे तो लेह-लडाखचा अस्पर्श असा प्रदेश. या भागात 'उन्हाळयाचे' २-३ महिने सोडले तर झाडे, जंगल किंवा हिरवळ पहायलाही मिळणार नाही. अशा या अतिउंचावरील वाळवंटामध्ये पाहायला मिळतात ती फक्त रुक्ष आणि उजाड पर्वतशिखरे! उन्हाळ्यामध्ये तापमान १५ ते २० अंश सेल्सियस असते तर हिवाळ्यात ते उणे ४० अंशांपर्यंत उतरते. अशा या अतिउंच पर्वतरांगांपैकी पहिल्या, म्हणजे ग्रेट हिमालयन रांगेमुळे, हिंदी महासागरावरुन येणारे पावसाळी ढग लडाखमध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे या भागात पाऊस अत्यल्प, म्हणजे प्रतिवर्षी ५ सेंमी. एवढाच पडतो.

लडाखच्या केंद्रस्थानी आहे तो स्पितुक आणि हेमिस गोम्पा यांच्यामधला सुमारे ५० किमी.चा सिंधू नदीचा प्रदेश आणि यातच वसले आहे ते लडाखची सांस्कृतिक व भौगोलिक राजधानी असलेले लेह शहर! तसे पाहिले तर ऑगस्ट हा इथला उन्हाळ्याचा महिना. पण या वर्षी सगळीकडेच विस्कळीत झालेल्या ऋतुचक्रामुळे इथेही ऑगस्टमध्ये पावसाचा शिडकावा चालू होता. पावसाचे प्रमाणही इथल्या सर्वांसाठीच आश्चर्यजनक होते. अफगाणिस्तान व पाकव्याप्त काश्मीरवरुन येणारे पश्चिमी वारे यंदा थोडेसे लवकर हजेरी लावत होते आणि त्यांच्या मनातही यंदा काहीतरी वेगळे होते. पण या सगळ्यांचा गंधही नसलेले लेह शहर नेहमीप्रमाणे हजारोंच्या संख्येने आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांच्या सरबराईमध्ये मग्न होते. स्थानिक हॉटेल्स ओसंडून वाहत होती. सहलींचा धडाका चालू होता आणि सर्वत्र उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण होते.

दिनांक ५ ऑगस्टची २०१०ची दुपार. मी नेहमीप्रमाणे माझ्या कामात गर्क होतो. दिल्लीहून माझे काही सहकारी आले होते. साधारणत: साडेचार-पाचच्या सुमारास आम्ही लेह विमानतळाच्या परिसरात असताना अचानक संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी भरून गेले. मी म्हणालो, 'आज मौसम कुछ ज्यादाही खराब हो रहा है| बारिश से पहले काम निपटा लेते है|'

माझ्या सहकार्‍यांना चिंता भेडसावू लागली ती त्यांच्या दुसर्‍या दिवशीच्या दिल्लीच्या फ्लाईटची. हवामान सुधारले नाही, तर कदाचित फ्लाईट रद्द होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने अर्ध्या-पाऊण तासात पुन्हा आकाश मोकळे झाले. आम्ही रात्री साडेदहापर्यंत सगळे काम उरकले होते.

मी खोलीवर परतलो. जेवण वगैरे आटोपून टीव्ही पाहत बसलो. बारा वाजता आमच्या परिसरातले जनरेटर्स बंद केले जातात. (अजूनही आम्ही राहतो तिथे कायमस्वरूपी विद्युत पुरवठा नाही.) मी झोपण्याचा प्रयत्न करतच होतो इतक्यात बाहेर सोसाट्याचा वारा वाहू लागला. प्रचंड वेगाने वाहणारे ते वादळी वारे पाहून काळजी वाटू लागली. माझी सहा वर्षांची मुलगी कधीच झोपली होती. पण वार्‍याच्या आवाजाने माझी बायको जागी झाली. आम्ही कशातरी खिडक्या बंद करून घेतल्या.

जेमतेम वीसएक मिनिटे झाली असतील, आता बाहेर निसर्गाचे तांडव सुरू झाले होते. हा हा म्हणता निसर्गाने रौद्र रूप धारण केले होते. सोसाट्याच्या वार्‍याबरोबरच काळ्या ढगांनीही आकाशावर आक्रमण केले होते. ढगांच्या गडगडाटाने आणि विजांच्या कडकडाटाने आसमंत भरून गेला. विजांच्या प्रकाशात दिसत होते की वार्‍याने या भागातली वाळवंटी माती उडवल्यामुळे पूर्ण परिसर गढूळ होऊन गेला होता. आणि अशातच अचानक एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाने अक्षरश: झोडपून काढायला सुरुवात केली होती. आडवा-तिडवा, उभा-तिरका...पावसाला काही धरबंधच राहिला नव्हता! खिडकीतून बाहेर बघण्याचेही धाडस होत नव्हते. कोणत्याही क्षणी आमच्या घराचे छत उडून जाईल असे वाटत होते. अजस्र अशा हिमालयाच्या पर्वतरांगांच्या पार्श्वभूमीवर तो पावसाचा धुमाकूळ मनात अक्षरश: धडकी भरवत होता. अत्यंत रौद्र स्वरूप धारण केलेल्या पावसाने आता कोणलीही दयामाया न दाखवता निर्दयीपणाने आपल्या अमानवी शक्तीचे जणू प्रात्यक्षिकच मांडले होते.

आम्ही दोघेही चिंतामग्न अवस्थेत हे सर्व कधी संपतेय याची वाट पाहत होतो. माझ्या बायकोने विचारले, "ढगफुटी म्हणतात ती हीच का रे?"
मी म्हणालो, "नाही, ती याहूनही भयंकर असते". मी असे म्हणालो खरे, पण मनोमन माझी खात्री पटली होती की असेच काहीतरी भयंकर घडते आहे. साधारण दहा वर्षापूर्वी लाहौल-स्पितीमध्ये (हिमाचल प्रदेश) मी अनुभवलेली ढगफुटीची भयंकर घटना सर्रकन डोळ्यांसमोर येऊन गेली.

सुमारे अर्ध्या तासाने पावसाचा जोर किंचितसा कमी झाल्यासारखा वाटला. पाण्याचा आणि वार्‍याचा आवाज आता आणखीन प्रकर्षाने जाणवू लागला. तेवढ्यात दरवाज्यावर कुणाची तरी थाप पडली. मी दरवाजा उघडला. बाहेर माझ्या युनिटमधले दोन जवान होते. त्यांना पाहताच मला कल्पना आली की काय झाले असावे. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सांगितले, 'साहब, पूरे युनिट में पानी भर गया है'. मी लगेचच पायात शूज चढवून बाहेर पडलो. मागून बायकोची सूचना ऐकू आली, 'पाण्यात जरा बघून आणि सांभाळून जा.'

माझ्या बाकी सहकारी अधिकार्‍यांना निरोप पाठवून आम्ही तडक निघालो. एव्हाना साधारणत: रात्रीचा एक वाजला होता. पाऊस जवळपास थांबलाच होता. माझे आणखी काही जवान बरोबर घेऊन मी परिसराची पाहणी करत होतो. आमच्या हद्दीची मोठी भिंत तोडून पाणी थेट आमच्या जवळपास अर्ध्या युनिटमध्ये शिरले होते. सर्वत्र पाणी, चिखल, दगडधोंडे हेच दिसत होते. जवळपास गुडघाभर पाणी सगळीकडे साचून राहिले होते. सुदैवाने आमच्या परिसरातल्या मुख्य गेटच्या बाहेर उताराचा भाग होता आणि त्या दिशेने बरेचसे पाणी निघून गेले होते. पण त्याच्या वाटेत आलेल्या आमच्या मोठमोठ्या पाच टन वजनाच्या कंटेनर्सना त्याने जवळपास १५ मीटर दूर फेकले होते. आमच्या राहण्याच्या जागेकडे त्याने मोर्चा वळविला नव्हता, त्यामुळे आम्ही सर्वजण सुखरूप होतो. पण आमची बरीचशी साधनसामुग्री चिखलाखाली गाडली गेली होती. माझ्या ऑफिससकट सगळ्या खोल्यांमध्ये चिखल, घाण, दगड यांचेच राज्य होते. मुख्य गेटचा मोठा पिलर आणि रस्ता पावसाने उद्ध्वस्त केला होता. आणखी बर्‍याच ठिकाणी बरेच नुकसान झाले होते. रात्रीच्या अंधारात जेवढा घेता येईल तेवढा नुकसानाचा अंदाज आम्ही घेतला आणि आमच्या लक्षात आले की आता परिस्थिती पूर्वपदावर यायला अथक परिश्रमांची गरज आहे.

दिनांक ६ ऑगस्ट २०१०ची सकाळ. एव्हाना आम्ही आमचे काही जनरेटर्स दुरुस्त केले होते. टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या होत्या. आदल्या रात्रीच्या त्या अवघ्या तासाभराच्या तांडवाने दीडशेच्या वर बळी घेतले होते. चारशे-पाचशे लोक बेपत्ता झाले होते, बहुतेक पुन्हा कधीच न सापडण्यासाठी. आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये मृतदेहांची रांगच लागली होती. लेहच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाणी शिरून खूप नुकसान झाले होते.

दिवस जसा जसा पुढे सरकू लागला तशा तशा नुकसानीच्या बातम्या आणखीन कळू लागल्या. आर्मीचे स्वत:चेही बरेच नुकसान झाले होते. कित्येक जवान बेपत्ता झाले होते आणि काही युनिट्स पूर्णत: उद्ध्वस्त झाली होती. परंतु आर्मीने दुसर्‍याच दिवशी मदतकार्य आपल्या हाती घेतले. लेहच्या आसपासची काही गावे, जसे की चोगलमसर, सावो वगैरे पूर्णपणे नेस्तनाबूत झाली होती. रस्ते, पूल इमारती यांचे प्रचंड नुकसान झाले होते. लेह शहराचा बराचसा भाग सुरक्षित होता पण ज्या भागांमध्ये पाण्याने प्रकोप केला होता तेथे काहीच शिल्लक राहिले नव्हते. आमच्या ओळखीचा एक भाजीवाला याच भागात होता. त्याच्या दुकानाचा तर पत्ताच नव्हता. नंतर कळले की तो आणि त्याचा भाऊ दोघेही मरण पावले होते. माझ्या दिल्लीहून आलेल्या सहकार्‍यांशी काही संपर्कच होऊ शकत नव्हता. मोबाईल सेवा ठप्प पडली होती. बीएसएनएलचे कार्यालयच जमीनदोस्त झाले होते. इथली सरकारी यंत्रणाही उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये इथे बरीचशी कामे आटोपते. अशा कामावरच्या बर्‍याचशा मजुरांचाही मागमूस नव्हता. आदल्या रात्री पाण्याने काय रौद्र रूप धारण केले होते त्याचा अंदाज आता येऊ लागला होता.

पुनर्वसनाचे काम आर्मी आणि वायुसेनेने आपल्या हाती घेतले. त्यांनी रसद, कपडे, औषधे, साधनसामुग्री यांचा पुरवठा जोराने सुरू ठेवला. चोगलमसर, साबोमध्ये असंख्य सहाय्यता शिबिरे उभारली गेली. पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा यांचा तात्पुरता बंदोबस्त केला गेला. या भागात अडकलेल्या शेकडो देशीविदेशी नागरिकांना सेना व हवाईदलाच्या हेलिकॉप्टरांनी वाचवले. संरक्षणदलांची साधने आता मातीचे ढिगारे उपसण्यापासून ते रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीपर्यंत सर्वांमध्ये व्यस्त झाली होती. त्यामध्ये आम्हीही सामील झालो. मी माझ्यापरीने मदत म्हणून काही कपडे आणि अन्नधान्य एका शरणार्थी शिबिराला द्यायला गेलो होतो. तेव्हा रस्त्यात एक वृद्ध बाई हात जोडून माझ्याकडे मदतीची विनंती करू लागली. तिच्या दोनपैकी एका मुलाचा पत्ता नव्हता, घरही राहिले नव्हते. असे अनेक लोक होते ज्यांचे काहीच शिल्लक राहिले नव्हते. मातीचा ढिगारा उपसताना एका बाईचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या मिठीत तिचे लहान मूलही तसेच होते. कदाचित या भयाण संकटापासून आपल्या मुलाला वाचवण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न तिने केला होता अन् त्या बाळाला कल्पनाही नसेल की आपल्या आजूबाजूला काय घडते आहे.

घटनेच्या दुसर्‍याच दिवशी संरक्षणदलांनी लेहच्या विमानतळाची धावपट्टी दुरुस्त केल्याने आता मदतीचा ओघ वाढला होता, कारण लेहला जोडणारे सर्वच रस्ते खराब अवस्थेत होते. दोन-तीन दिवसांनी मोबाईल चालू झाले. राष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघही वाढला. मीडियाचे लोकही आपापले कॅमेरे सावरून पोचले. अतिरंजित बातम्यांची जणू चढाओढच लागली. असे भासवले गेले की संपूर्ण लेह शहर नेस्तनाबूत झाले. आता इथे काहीही उरले नाही. सर्वत्र अगदी होत्याचे नव्हते झाले...वगैरे वगैरे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण पसरले. सुमारे २००० देशी-विदेशी पर्यटक, ज्यांच्यावर इथली पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून होती, ते सगळे परत निघून गेले. त्यामुळे जे स्थानिक लोक वाचले होते त्यांच्यावर बिकट वेळ येऊन ठेपली.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी खरंतर प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागले पाहिजे, पण प्रसारमाध्यमे आणि परिपक्वता यांचा जणू छत्तीसचा आकडा असावा आणि त्यांनी यावेळीही ते सिद्ध केले. अनेक नेते, पुढारी भेट देऊन गेले. आमिर खान, दलाई लामा, ओमर अब्दुल्ला, ए. के. अ‍ॅन्टनी, गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, फारूख अब्दुल्ला यांच्या भेटींनंतर दस्तुरखुद्द पंतप्रधान, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रपती महोदया येऊन गेले. देशाचे सर्वोच्च नेतेही कागदांवर लिहून आणलेली स्फूर्तिहीन आणि चैतन्यहीन 'भाषणे' देऊन गेले. ना कळकळ, ना संवेदना, ना आपुलकी. आपले नेते थेट आपल्या मनाहृदयापासून बोलायला कधी शिकणार? का त्यांचे हृदयच एवढे कोरडे असते?

आपत्तीनंतर तिसर्‍या दिवशी 'नॅशनल डिझॅस्टर रिलीफ फोर्स'चे लोक अवतरले- 'डिझॅस्टर मॅनेजमेन्ट' करण्यासाठी! यावरही कळस म्हणजे या भागात अडकलेल्या लोकांकडे विमानाने परतण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता. याचा फायदा उठवून खाजगी विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर दुपटीपेक्षा जास्त वाढवले. नेहमी लेह-दिल्ली चे १२०००-१४०००रु.चे तिकीट आता चक्क ३०००० रु. केले गेले. अखेर सिव्हिल एव्हीएशन मंत्रालयाला या कंपन्यांना दर न वाढविण्याची ताकीद द्यावी लागली. त्याचा परिणाम किती झाला तो विषय वेगळा. तेवढ्यात कोण्या एका स्थानिक लामाने 'भविष्यवाणी' केली की आठवड्याभरात आणखी एक नैसर्गिक आपत्ती येऊन सगळेच संपून जाईल. त्यामुळे लोक आणखीनच घाबरून गेले.

एकीकडे असा सगळा आनंदीआनंद असताना कित्येक स्वयंसेवी संस्था जीव ओतून काम करत होत्या. कित्येक परदेशी ट्रेकर्सनी आपला कार्यक्रम रद्द करून मदतकार्य करायचे ठरवले. हळूहळू जीवन पूर्वपदावर येऊ लागले. बाजार, दुकाने पुन्हा उघडू लागली. हॉटेल्स, टूर ट्रॅव्हल्सची दुकानेही उघडली, पण गिर्‍हाईकच नव्हते. जवळपास एका आठवड्याच्या परिश्रमांनंतर आमच्याही ऑफीसमध्ये स्थिती आता सामान्य होत चालली होती. माझ्या दिल्लीच्या सहकार्‍यांशी चार दिवसांनंतर संपर्क झाला. ते सगळे दिल्लीला सुखरूप पोचले होते.

अत्यंत कमी वेळेत नेहमीपेक्षा प्रचंड जास्त पाऊस पडून जाण्याच्या घटनेला सामान्यत: ढगफुटी म्हटले जाते. इथेही मानवनिर्मित कारणे आहेतच. जुन्या तिबेटी लिखाणांमध्ये 'माने' भिंतींचा उल्लेख आहे. या भिंती साधारणत: पर्वतीय भागांमध्ये नद्या-नाल्यांचा मार्ग दर्शविण्यासाठी किंवा मानवाने आपली वस्ती कुठे वसवू नये हे दर्शवण्यासाठी बांधल्या जात. पण प्रगतीच्या मागे आंधळ्यासारखे धावणार्‍या माणसाने त्याकडे लक्ष न देता नद्या-नाल्यांच्या रस्त्यातच गावे, शहरे वसवली. ढगफुटीनंतर आलेल्या पुराने मग मागेपुढे पाहिले नाही. या भयंकर घटनेचा इथल्या लोकांच्या मनावर एवढा परिणाम झाला की पाऊस, ढग नुसते पाहिले तरी मानसिक संतुलन ढळल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत.

नैसर्गिक आपत्ती आली.....येऊन गेली. आयुष्य पूर्वपदावर येत आहे....लवकरच येईल. पण निसर्गाच्या अमर्याद आणि अचाट शक्तीची नुसती झलक पाहिली तरी माणूस किती क्षुल्लक चीज आहे याचा अंदाज येतो. हिमालयाच्या या अतिप्रचंड आणि अजस्र अशा पर्वतांपुढे नुसते उभे राहिले तरी आपल्या खुजेपणाची जाणीव होते. इथे जाणीव होते ती एकाच गोष्टीची; ती म्हणजे इथे राज्य आहे ते निसर्गाचे. इथला अनंतकालचा मालक (राजा) आहे निसर्ग, अन् इथे वर्चस्व आणि अधिपत्यही चालते ते फक्त त्याचेच. माणूस असेल वा नसेल पण ग्रेट हिमालयन रांग, लडाख रांग, कारोकरम रांग, झंस्कार-सिंधू नद्या हे सर्व राहणारच. वर्षानुवर्ष...शतकानुशतके....असेच अढळ...अविचल.

- शंतनु

Taxonomy upgrade extras: