वटवृक्ष आणि गवत

अशा गर्विष्ठ झालेल्या वडाला मग गवताशी कोणीही मैत्री केलेली चालेनाशी झाली. मुलांनी गवतावर लोळण घेणं त्याला सहन होईना. त्याच्या फांदीएवढीदेखील उंची नसलेल्या गवताची फुलपाखरांनी विचारपूस करावी हे ही त्याला बघवेना. गवताबरोबर खेळून त्याच्यापाशी आलेल्या फुलपाखरांना तो हाकलून लावी.....

border2.JPG

र्‍याऽऽच वर्षापूर्वीचं हे गाव. आटपाट नगरी होतं त्याचं नाव.
आटपाट नगरातून वाहायची एक नदी. नदीकाठी पसरली होती जणू गवताची गादी!
सकाळी गुरं सोडावीत चरायला त्या गवतात आणि यथेच्छ डुंबावं नदीत आणि संध्याकाळ घालवावी गवतावर लोळण्यात हा तर रोजचाच परिपाठ गावातल्या काही मुलांचा. पण दुपार होताच वर सूर्यबाप्पा आऽऽग ओकू लागे, मग मात्र गवतातून चालणंदेखील मुश्किल होऊन बसे.

vng1.JPG

मुलांचे असे पाय भाजू लागले की त्या गवताला मात्र फार फार वाईट वाटे. अशावेळी त्याला वाटे 'का मला देवबाप्पाने असा छोटा ठेवला? मी पण वाढलो असतो जर ह्या वडाच्या झाडासारखा... तर धरली असती ना मीही सावली ह्या मुलांवर, मग पक्ष्यांनाही वाटलं असतं ऊन-पावसात माझ्या पात्यांवर घरटं करावं नि व्हावं सुरक्षित. पण मी हा असा छोटासा! आणि माझा हिरवा रंगपण टिकत नाही वर्षभर. माझा काहीच उपयोग नाही कोणाला!'

असं त्याने म्हटलं की वार्‍याची एक झुळूक येऊन समजूत काढी त्याची. गुदगुल्या करुन त्याला थोडं हसवी. त्याचे हे बोल ऐकून तिथून उडणारं फुलपाखरुही थांबे त्याच्याजवळ आणि म्हणे "असं का वाईट वाटून घेतोस तू मित्रा! तू आवडतोस की आम्हाला. तुझ्या पात्यांवर बसून खेळायला आम्हांला येते की खूप मजा, जी मजा आम्हाला पारंब्यांवर नाही येत. तो देतो सावली पण तूही देतोस की आनंद, मग कशाला वाटून घेतोस वाईट?"

vng2.JPG

वार्‍याचं आणि फुलपाखराचं असं बोलणं गवताला बराच धीर देऊन जाई. मग ते प्रेमळपणे बघत बसे समोरच्या वडाच्या झाडाखाली बसलेल्या मुलांकडे.

उन्हाने पाय भाजायला लागताच वड ह्या मुलांना आपल्यापाशी बोलवी. त्याच्या सावलीत बसून मग ते बरोबर आणलेल्या डब्यांचा चट्टामट्टा करीत आणि उन्हं कलण्याची वाट बघत झाडाखालीच आराम करीत. नाहीतर मग पारंब्यांचा झुला करुन दुपार सरेऽऽपर्यंत तिथेच वेळ काढीत.

त्याकाळी घरात काही आजच्यासारखे नळ नव्हते. मग कपडे धुवायला, अंघोळींना सगळी माणसं नदीवरच येत. सकाळची वेळ असेल आणि ऊनही नसेल तेव्हा आईबरोबर नदीवर आलेली मुलं आईचं काम संपेपर्यंत ह्या गवताबरोबरच खेळत बसत. तेव्हा मात्र ह्या गवताला कोऽण आनंद होत असे. पण खरा चेहरा तेव्हा फुले, जेव्हा एखादा वाटसरू दमून भागून त्या वडाच्या झाडाखाली बसे आणि बैलगाडीच्या बैलांना हे गवत खाऊ घाली तेव्हा. आपण त्या बैलांची भूक भागवू शकलो ह्या आनंदात त्याला स्वतःच्या छोटेपणाचं दु:ख विसरायला होई.

दिवस असेच जात होते. पण कसे कोण जाणे माणसाच्या दुनियेतले काही वाईट गुण त्या वटवृक्षालाही येऊन चिकटले.

'मी सावली देतो म्हणून ह्या मुलांना, दमल्या भागल्या वाटसरूला माझा आधार वाटतो. पक्ष्यांनाही घरटं करायला मी जागा देतो!' असे विचार त्याच्या मनात वाढायला लागले आणि मग दिवसेंदिवस त्याला गवताचा छोटेपणा खुपायला लागला. 'मीच सर्वश्रेष्ठ!' असं म्हणून तो गवताला कमी लेखू लागला आणि हळूहळू त्याचा पूर्वीचा प्रेमळपणा कमी होऊन त्याची जागा गर्वाने घेतली.

अशा गर्विष्ठ झालेल्या वडाला मग गवताशी कोणीही मैत्री केलेली चालेनाशी झाली. मुलांनी गवतावर लोळण घेणं त्याला सहन होईना. त्याच्या फांदीएवढीदेखील उंची नसलेल्या गवताची फुलपाखरांनी विचारपूस करावी हे ही त्याला बघवेना. गवताबरोबर खेळून त्याच्यापाशी आलेल्या फुलपाखरांना तो हाकलून लावी.

मुलं दूर गेली की मग तो गवताला हिणवत म्हणे "ए गवता, तुझं राज्य अजून काहीच दिवस. तुझा हा सारा हिरवा डोलारा फक्त हा पावसाळा संपेपर्यंतच. नंतर जेव्हा उन्हाचे तडाखे बसतील तेव्हा तू जाशील करपून"

हे ऐकून गवत बिचारं रडवेलं झालं की त्याला आनंद होत असे. अधिकच जोमाने मग ते गवताला वाईट वाटेल असं बोलत असे. गवत बिचारं उदास होऊन त्याला म्हणे "झाडभाऊ, असं का हो म्हणता? मी तुमच्याएवढा मोठा नाही हे मान्य आहे मला. पण आपल्या दोघांनाही ज्या देवाने बनवलंय त्याने प्रत्येकाला काहीतरी काम देऊन पाठवलंय ना, मग असं असताना का बरं असं टोचून बोलता मला माझ्या छोटेपणावरून, माझ्या थोडेच दिवस टिकणार्‍या हिरव्या रंगावरून?"

पण गर्वाने फुललेल्या वडाला काही हे शहाणपणाचे बोल पटायचे नाहीत. स्वतःलाच श्रेष्ठ समजत तो गवताला कमी लेखायची संधी काही सोडायचा नाही.

त्या वटवृक्षाचं हे वागणं कोणालाच आवडत नव्हतं. त्याच्या फांद्यांवर घरटं केलेल्या पक्ष्यांनीदेखील समजावून पाहिलं त्याला. पण छे! उलट त्याने घरटं असलेल्या फांद्या हलवून, त्यांनाच हैराण केलं.
"माझ्या फांद्यांवर राहायचं असेल तर त्या गवताची बाजू घ्यायची नाही. मलाच मोठा म्हणायचं" असा दमच दिला त्याने सगळ्या पक्ष्यांना.
शेवटी त्याच्या अशा वागण्याला कंटाळून, पक्षी दुसर्‍या झाडावर घरटं करायला निघून गेले. तरीदेखील त्याचं वागणं काही सुधारलं नाही.

"इतकी घमेंड बरी नव्हे. तुझ्यापेक्षाही मोठी झाडं बनवलीत देवाने. पण ती नाही असा गर्व करीत." वार्‍यानेही समज देत सांगितलं.

पण माणसाच्या दुनियेतला 'मी'पणा, गर्व एकदा शिरला अंगात की तो असा सहजासहजी निघत नाही हेच खरं. त्या वृक्षाचं वागणे काही सुधारत नव्हतं.

शेवटी वार्‍यानेच त्याला अद्दल घडवायचं ठरवलं आणि एक दिवस वादळ होऊन वारं थडकलं.

वादळाच्या वार्तेने सगळे गावकरी आपापल्या घरात बसून राहिले. पक्षीदेखील सुरक्षित ठिकाणी जाऊन बसले. घोंघावत आलेल्या ह्या आपल्या मित्राला गवताने बरोबर ओळखले. त्याला प्रेमाने थोपवायचा प्रयत्नदेखील केला त्याने. पण त्या वडाच्या झाडाला धडा शिकवायचा निश्चयच करुन आलेलं ते वादळ! घोंघावत त्याने वटवृक्षाला घेराव घातला. वटवृ़क्षाने सगळ्या पारंब्या पसरुन वादळाला थोपवायचा प्रयत्न केला, पण त्या अक्राळविक्राळ रूपापुढे त्याचा टिकाव काही लागला नाही. वटवृक्षाच्या बर्‍याच फांद्या तुटून खाली पडल्या.

गवत अजूनही वार्‍याचा राग शांत करायचा प्रयत्न करतच होतं. वार्‍यालाही काही पाडायचं नव्हतं त्या वृक्षाला. त्याला फक्त घडवायची होती अद्दल, म्हणून जेव्हा वृक्षाने केली क्षमायाचना वार्‍याकडे आणि गवताकडे, तेव्हा वादळ झालं शांत.

vng3.JPG

जेव्हा वृ़क्षाने केला पुढे हात मैत्रीसाठी, तेव्हा गवतानेही मनात काही राग न धरता धरला त्याचा हात. पुन्हा सारं झालं पहिल्यासारखं. झाड पुन्हा गजबजलं पक्ष्यांच्या किलबिलाटाने.

एक दिवस वृक्षाने विचारलं गवताला, पक्ष्यांना आणि वार्‍याला, "इतका मी वाईट वागलो तुम्हा सगळ्यांशी, तरी तुम्ही मला माफ केलंत. माझ्याशी पुन्हा मैत्री केलीत. राग नाही येत का माझा तुम्हाला कधी?"

तेव्हा एकमुखाने सगळे म्हणाले, "मनात राग ठेवून वागायला आपण काय माणसं आहोत का?"

- कविता नवरे

Taxonomy upgrade extras: